कृष्णधवल जमान्यातील मालिका हा एक वेगळाच जिव्हाळ्याचा विषय होता. त्याबद्दल अजूनही मन:पूर्वक बोललं जातं. अगदी सुरुवातीच्या काळात टीव्ही फक्त संध्याकाळी असायचा. बातम्यांमध्ये सर्वात आधी स्मिता गोविलकर ( तळवलकर ) शाळेच्या युनिफॉर्मचीच साडी नेसून interview साठी गेली आणि थेट बातम्या देऊनच आली! प्रदीप भिडे, शोभा तुंगारे, ज्योत्स्ना किरपेकर ह्याही होत्या. सुरभि कार्यक्रम गाजला. सुधीर गाडगीळची गद्धेपंचविशी दाद मिळवून गेली. हमलोग, उडान, श्वेतांबरा, गुन्ह्याचा शोध घेणाऱ्या मालिका लोकप्रिय झाल्या.
फक्त रविवारी टीव्ही सकाळीही असायचा. तेव्हा’ प्रतिभा आणि प्रतिमा ‘आणि ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ मध्ये तबस्सुम आणि सुहासिनी मुळगांवकर ज्येष्ठ कलाकारांच्या मुलाखती घ्यायच्या. दोघीजणी अभ्यासपूर्ण मुलाखती घेत; मात्र केसांत माळलेली फुलं हमखास दिसतील याची काळजीही घेत. सुधीर मोघे यांना घेऊन अरुण काकतकरांनी गाण्याचे काही चांगले कार्यक्रम केले. यातून शैला दातार, अनुराधा मराठे, शोभा जोशी, श्रीकांत पारगांवकर पुढे आले. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होत. आकाशवाणी संगीत संमेलनाप्रमाणे अखिल भारतीय संगीत सभाही असत. ह्या सगळ्या कार्यक्रमांना उत्कृष्ट दर्जा होता. लोक बाहेर फिरायचं सोडून हे कार्यक्रम बघू लागले. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम ठरू लागले. रस्ते ओस पडण्याचं हे भाग्य नंतरच्या काळात फक्त रामायण आणि काही प्रमाणात स्वामी आणि आता भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच यांनाच मिळत राहिलं.
२०००नंतर वाहिन्यांचं युग सुरू झालं. अल्फा मराठी ही पहिली वाहिनी. जोवर तेरा भागांच्या मालिका सुरू होत्या, तोवरही चांगलं चाललं होतं; पण त्यांचा कार्यकाल वाढू लागला आणि त्यात पाणी मिसळण्यास सुरुवात झाली – इतकी की मग मालिकांचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक आणि मग नाइलाजाने कलाकारही ते अंगवळणी पाडून घेताना दिसू लागले. झोपेत संवाद लिहितात का? आधी काय म्हणालो होतो, ते विसरून जातात का ? एखादा धागा मध्येच सहज सोडून देतात का? मालिका कुठेतरी वाहत जाते आणि मग ती पिछाडीला जाते, विस्मरणात टाकली जाते आणि मग कळत नकळत बंदही होते. ( सुंदरा मनामध्ये भरली ) जाऊ तिथे हिरोईनला नवे नवे शत्रू निर्माण होतात. ‘ या मालिकेत व्हिलन नाही ‘ असं म्हटलं गेलं तरी हे सगळे वेगवेगळे व्हिलनच असतात. ( भाग्य दिले तू मला )मालिकेतल्या वीस-वीस वर्षांनंतरही एक एक व्यक्ती पुन्हा तेच तेच वाक्य बोलताना दिसते – ‘मी असं काही होऊच देणार नाही.’ असं म्हणणारी कांचन, ‘तो माझा मुलगा आहे, मी त्याचं वाईट कधीच होऊ देणार नाही ‘ किंवा ‘ती अरुंधती आहे, माझ्याइतकं तिला कुणीच ओळखत नाही,’ असं पुन्हा पुन्हा म्हणत राहणारा अनिरुद्ध, ‘माझ्यापेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे,’ असं म्हणणारी आणि उगाच त्याला गौरीला भेटायला पाठवणारी मूर्ख आरोही… ह्यांना कोणीच त्यांच्या असल्या कृत्यांपासून अडवत नाही. सतत अरुंधतीला अडीअडचणीला घरी बोलावून पुन्हा तिला ‘ तू या घरातले निर्णय घेऊ नको, तुला आता काही अधिकार नाही ‘ असं म्हणणाऱ्यांना अरुंधती कधीच सांगत नाही, की मग तुम्ही मला आता कधी बोलावू नका. मी माझा निर्णय तुझ्यावर लादत नाही, असं वारंवार म्हणणारा आशुतोष तितक्याच मूर्खपणाने चाळीशीनंतर मूल दत्तक घेण्यासाठी अरुंधतीला भरीस घालतो आणि जानकीसारख्या छोट्या नातीला खेळवत आनंद घेण्याऐवजी आश्रमातल्या सात वर्षांच्या मोठ्या मुलीला – मनूला घरात आणून ठेवतो. मालिका कुठे वाहत जाव्यात ह्याला काही धरबंधच राहत नाही. ज्यांना घरातून कधीच बाहेर काढायला हवं त्यांना माफ करत राहून कुणी ना कुणी पुन्हा संधी देण्याच्या भानगडीत पडतं आणि मालिकेच्या पुढच्या पंचवीस भागांची तजवीज करून ठेवतं. लक्ष्मीच्या पावलांनी मधली कला अप्रतिम सुंदर, अवघड मूर्ती बनण्याचं काम करते,पण तेव्हा विनाकारण स्वतःची ओळख लपवते. ती सुंदर मूर्ती तर आपल्याला अजूनही दाखवलेलीच नाही, पण ती नैनाही आपला उद्देश सफल झाल्यावर आता या लग्नात आपल्याला काहीही इंटरेस्ट नाही हे का सांगत नाही? अद्वैतकडून अंगठी चुकून कशी कलेच्या बोटात जाते? हळद अशी कशी गालांना लागते ? एका मालिकेत झालं की तेच दुसऱ्यात, तेच तिसऱ्यात अशा आयडिया कशा चोरल्या जातात? त्याही वेगवेगळ्या वाहिन्यांवर? सारे काही तिच्यासाठी’मध्ये ‘या मातीतलं व्हायचं म्हणजे नेमकं काय’ हे त्या दादा खोताला तरी सांगता येतं का? परीक्षा परीक्षा म्हणजे आणखी किती आणि किती वेळा घ्यायची ? एकदाच सगळ्या अटी सांगून मोकळं व्हायचं नाही – तर एक पूर्ण केली की दुसरी, मग पुन्हा तिसरी असं कितीतरी वेळ वाढवतंच राहायचं. त्या प्रकाराला कोणी ‘आता बास, पुरे…’ असंही म्हणत नाही. लाली नीरजच्या स्वास्थ्यासाठी पैसे घेते; तर ती त्याच्या खाण्यापिण्याची, अंथरूण पांघरूणाची, दुखल्याखुपल्याची काळजी आणि जबाबदारी का घेत नाही ? श्रीनु आणि ओवी आपलं प्रेम व्यक्त करायला किती काळ घेतात आणि तरी बाकीच्यांपुढे अजून बोलतच नाहीत. आता ही ओवी राहिली आहे; तर कुणासाठी हेही कुणी तिला विचारात नाही. आपली आई आपल्या माघारी निशीशी काय बोलते, हे चुकूनही नीरज कधीच ऐकत नाही किंवा दुसऱ्या कुणाला तुम्ही नीरजजवळ येऊनच देणार नाही म्हणता; तर मग त्याचं लग्न कुणाशीच करणार नाही का? असं निशी चुकूनही सासूला विचारात नाही. ती कधीही, केव्हाही खोतांच्या घरी जाऊन टपकते; पण त्यांच्या दारातून मात्र खोतांकडचं कुणीही आत पाऊल टाकत नाही… हे कसं काय ? शिवाय ती मेघना येथे येते ; कशासाठी तर आपला मुलगा कुठे राहतोय, कसा राहतोय, त्याचं काम कसं चाललंय हे बघायला. स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एखादीने मुलाने मुलगी पसंत केली म्हणल्यावर आनंदाने त्याचं लग्न करून दिलं असतं; तरी इथे सूड घ्यायला आल्यासारखी येऊन राहते काय, घर काय विकत घेते आणि परत जायचं नावच काढत नाही; ही किती आश्चर्याची गोष्ट आहे !
इकडे शिकवीन चांगलाच धडा मध्येही तेच! एक मागणं – एक अट पूर्ण केली की दुसरी परीक्षा; मग तिसरी… अक्षरा घरातून अशी कशी निमूट बाहेर पडते? सासूही प्रथम घरची सून. तिचा जेवढा अधिकार या घरावर, तेवढाच आता या सुनेचा – हे भुवनेश्वरीला कोण सांगणार? सुनेला बाहेर काढून तीच ते घर मोडते आहे. सून तिला बाहेर जा म्हणत नाही. एरवी ही सगळ्यांना वचनांची आठवण करून देते, अधिपतीलाही म्हणते, ‘लग्नात सात जन्म सुखदुःखात माझ्याबरोबर राहणार… याची आठवण करून न देता त्याने हाताला धरून बाहेर काढल्यावर ही निमूटपणे बाहेर कशी पडते ? तीही अधिपतीला म्हणत नाही, आपण दोघे एकाच ठिकाणी राहणार, ना तिचा सासरा सांगतो, ती बाहेर जाणार नाही म्हणून ! मुलावर विश्वास आहे म्हणताना भुवनेश्वरी दुर्गेश्वरीला तरीही त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगते आणि त्या चंचीला गावाबाहेर न काढता तिथेच चांगल्या हॉटेलमध्ये राहू देते? या कोणाचेच हेतू इतरांना कधीच कळत नाहीत? आणि अशी माणसं न ओळखता ते अनेक वर्ष एवढी मोठी फॅक्टरी चालवतात ?
Make belief म्हणजे खरं आहे असं मानून नाटकावर विश्वास ठेवा असं म्हणतात; पण ते ॲक्टिंगसाठी शक्य आहे. मोठमोठे adventures प्रत्यक्षात न करता ते फक्त अभिनयाने दाखवावे, आम्ही विश्वास ठेवू… पण ह्या मूर्खपणाच्या वागण्यांवर कसा विश्वास ठेवायचा? रंग माझा वेगळा मध्येही दोन-तीन व्हिलन बायका… त्यातल्या कुणाचंच कटकारस्थान इतर कुणाच्या कधीच कानावर पडत नाही. अशी असंख्य उदाहरणं देता येतील; पण इतक्या सातत्याने सतत सगळ्या मालिका ना आपण बघतो, ना बघू शकतो. त्यामुळे वानगीदाखल इतकं पुरेच !

