डॉमिनिक लापिएर : समाजातून साहित्य, साहित्यातून समाज ???

साहित्याच्या पलीकडे जाऊन समाजावर आपला ठसा उमटवणारा आणि भारताबद्दल विशेष जवळीक असलेला एक प्रतिभावान साहित्यिक फ्रांसमधील आपल्या घरी ४ डिसेम्बर २०२२ ला  वारला. १९३१ साली जन्मलेले डॉमिनिक लापिएर मृत्यूसमयी ९१ वर्षांचे होते. शेवटची दहा वर्षे ते कोमामध्ये होते. निमित्त झाले होते पाय घसरून पडल्याचे. ‘वेदनांपासून त्यांना आता मुक्ती मिळाली आहे,’ या शब्दांत त्यांच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या. योगायोगाने पत्नीचेही नाव डॉमिनिक हेच आहे. गेल्या पन्नास वर्षांतील सर्वाधिक लोकप्रिय लेखकांपैकी एक असलेल्या लापिएर यांच्या पुस्तकांची जगातील तीसहून अधिक भाषांत भाषांतरे झाली असून त्यांच्या दहा कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. आपल्या लेखनावर त्यांनी अमाप पैसा मिळवला आणि त्यातील बराचसा भारतात ते करत असलेल्या सामाजिक कार्यावर खर्च केला. 

   साधारण चौथी-पाचवीत असताना नाथमाधव यांच्या स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याची स्थापना, स्वराज्याचा कारभार, स्वराज्यावरील संकट यांसारख्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी माझ्यासाठी तीनशे-सव्वातीनशे वर्षांपूर्वीचा शिवकाळ जिवंत केला. भारताची फाळणी, त्यावेळचा हिंसाचार, एक पंचमांश मानवता स्वतंत्र झाली तो महान दिवस, गांधीहत्या अशा १९४७-४८ सालातील तुलनेने आधुनिक घटना लापिएर यांनी माझ्यासारख्या असंख्य वाचकांसाठी ‘फ्रीडम ऐट  मिडनाइट’ या १९७६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जिवंत केल्या. भारताच्या इतिहासातील तो युगप्रवर्तक कालखंड ज्यांना समजून घ्यायचा असेल त्यांच्यासाठी याहून अधिक उपयुक्त पुस्तक सापडणे अवघड आहे.   

   लापिएर यांचा लेखनप्रवास एखाद्या कादंबरीइतकाच रंजक आहे. वयाच्या सतराव्या वर्षी, १९४८ साली, अवघे ३० डॉलर्स खिशात घेऊन त्यांनी आपले पॅरिसमधील सुखवस्तू घर सोडले आणि थेट अमेरिका गाठली. तिथे पोटासाठी बारीकसारीक कामे करत तब्बल ३०,००० मैल प्रवास केला. हिच-हायकिंग करत जाताना त्यांची सुटकेस एका ट्रक ड्रायव्हरने पळवली. पण पोलिसांनी त्याला पकडण्यापूर्वीच स्वतः लापिएर यांनी त्याला पकडले. त्या प्रसंगावर आधारित त्यांनी लिहिलेला लेख ‘शिकागो ट्रिब्युन’ने प्रसिद्ध केला आणि त्याबद्दल त्यांना शंभर डॉलर्स मानधन मिळाले! त्यांच्या लेखनप्रवासाची ही सुरुवात. अमेरिकेतील त्या भटकंतीवर लिहिलेले ‘अ डॉलर फॉर अ थाउझंड माइल्स’ हे त्यांचे पुस्तक बेस्टसेलर ठरले. मोटारीतून जगभर अवघड वाटांनी भ्रमंती करणे हा त्यांचा साहसी छंद त्यांनी आयुष्यभर जपला.   

  लॅरी कॉलिन्स या अमेरिकन पत्रकाराशी त्यांचा १९५४ साली पॅरिसमधल्या एका हॉटेलात योगायोगाने परिचय झाला. दोघेही त्यावेळी सक्तीची लष्करी सेवा करत होते. पहिल्या भेटीतच दोघांची मने जुळली. लष्करी सेवा पूर्ण केल्यावर लापिएर ‘पॅरिस मॅच’ या लोकप्रिय साप्ताहिकात नोकरी करू लागले. त्याचवेळी कॉलिन्स यांना अमेरिकेतील प्रॉक्टर अँड गॅम्बल या बहुराष्ट्रीय कंपनीत कम्युनिकेशन्स विभागात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली होती आणि दोनच दिवसांनी ते रुजू होणार होते. पण लापिएर यांनी त्यांचे मन वळवून त्यांना पॅरिसमध्येच पत्रकारिता करण्यासाठी प्रवृत्त केले. कॉलिन्स यांनी न्यूजवीक साप्ताहिकात नोकरी धरली. १९६० साली दोघांनी एकत्र लेखन करायचे ठरवले. त्यासाठी छोटे-छोटे विषय न घेता जागतिक स्तरावर औत्सुक्य असलेले विषयच लेखनासाठी निवडायचे त्यांनी नक्की केले आणि त्यातून आकर्षक इतिहासलेखनाचा एक आदर्श त्यांनी प्रस्थापित केला. दोघांचे शेवटचे एकत्रित पुस्तक लिहून झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी, २००५ साली, कॉलिन्स यांचे निधन झाले. मत्सराचा स्पर्शही न झालेला आणि दोघांच्याशी सर्जनशिलतेला तब्बल ४५ वर्षे पूरक ठरलेला हा दोन लेखकांमधला स्नेह म्हणजे एक चमत्कारच आहे. 

   लापिएर यांनी १९८० साली डॉमिनिक कॉनशॉं (Conchon) यांच्याशी लग्न केले. लापिएर आणि कॉलिन्स ही दोन्ही कुटुंबे फ्रेंच रिव्हिएरात शेजारीशेजारीच असलेल्या घरांत राहात असत. ‘अ थाऊजंड सन्स’ हे १९९९ साली लिहिलेले आपले आठवणींचे पुस्तक लापिएर यांनी कॉलिन्सला आणि अलेक्झांड्रा या आपल्या मुलीला, जी कॉलिन्स यांचीही मानसकन्या होती, अर्पण केले आहे. ‘इज पॅरिस बर्निंग?’ हे दोघांनी मिळून लिहिलेले पहिले पुस्तक १९६५ साली प्रसिद्ध झाले. १९४४ सालच्या ऑगस्टमध्ये पॅरिस सोडून जाण्यापूर्वी ते शहर जाळून टाकायची हिटलरची आज्ञा होती, पण पॅरिसमधील जर्मन जनरलने ती नाकारली. त्या काळाचे चित्रण करणारे हे पुस्तक युरोप-अमेरिकेतील वाचकांनी अगदी डोक्यावर घेतले. त्यावर १९६६ निघालेला सिनेमाही पुस्तकाप्रमाणेच खूप गाजला. ‘ऑर आय विल ड्रेस यू इन मोर्निंग’ (१९६८), ‘ओ जेरुसलेम’ (१९७२), ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ (१९७६), ‘द फिफ्थ हॉर्समन’ (१९८०) आणि ‘इज न्यू यॉर्क बर्निंग?’ (२००४) ही दोघांनी एकत्रित लिहिलेली इतर पाच पुस्तकेदेखील न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर लिस्टमध्ये कैक आठवडे राहिली आहेत.  

   एकत्र लेखन करण्याची एक विशिष्ट पद्धत दोघांनी तयार केली होती. साधारण पहिली तीन वर्षे सगळे संदर्भ गोळा करण्यात, मूळ कागदपत्रांचे खोलात जाऊन संशोधन करण्यात, मुलाखती घेण्यात जात. त्यानंतरचे एक वर्ष प्रत्यक्ष लेखनात. दोघेही स्वतंत्ररीत्या आपापल्या मातृभाषेत लिहीत आणि त्यानंतर त्याचे स्वतःच भाषांतर करत. आशय बोजड होऊ न देता, उलट जिवंत करण्यासाठी तपशीलवार नोंदींचा ते वापर करत. लापिएर यांचा भर आकर्षक भाषेवर होता तर कॉलिन्स यांचा भर अचूक लेखनावर होता. अनेक खर्डे झाल्यावर जेव्हा पुस्तक तयार होई तेव्हा त्यात हे दोन्ही गुण उतरत आणि तेच पुढे त्यांच्या द्वैभाषिक पुस्तकांचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. 

   भारतीय वाचकांचा विचार केला तर ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ हे त्यांचे पुस्तक सर्वांत खळबळजनक ठरले. ते प्रसिद्ध झाले त्याच सुमारास ‘इंडिया टूडे’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता. जेपी आंदोलनाने देश ढवळून निघत होता. अशा काळात हे पुस्तक आमच्या हातात आले आणि सखोल माहितीसाठी हपापलेली आमची टीव्हीपूर्व व गुगलपूर्व तरुण मने अगदी भारावून गेली. १ जानेवारी १९४७ रोजी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांनी लुईस माऊंटबॅटन यांना भारतात व्हाइसरॉय म्हणून त्यांनी जावे असे सुचवले त्या दिवसापासून या पुस्तकाचे कथानक सुरू होते आणि २१ जून १९४८ रोजी माऊंटबॅटन यांनी गव्हर्नर-जनरलपद राजगोपालाचारींच्या हाती सोपवले तिथे ते संपते. हे पुस्तक वाचेपर्यंत मलातरी ठाऊक नव्हती अशी बरीच माहिती या सहाशे पानी पुस्तकात खच्चून भरली आहे. उदाहरणार्थ, तत्पूर्वी भारतात कधीही पाऊल न ठेवलेल्या सर सिरील रॅडक्लिफ या लंडनमधील एका नामांकित बॅरिस्टरवर या उपखंडाचे भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांत विभाजन करायची जबाबदारी २७ जून १९४७ रोजी कशी सोपवली गेली; अवघ्या ३५ दिवसांत त्यांनी ती कशी पार पाडली; विभाजित भारताचा त्यांनी केलेला नकाशा माऊंटबॅटन यांनी संभाव्य दंगल टाळण्यासाठी कसा गुप्त ठेवला; दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाल्याचा क्षण जेव्हा त्यांचे नेते साजरे करत होते त्यावेळी त्यांना कोणालाच हे विभाजन नेमके कसे झाले आहे याची कल्पना कशी नव्हती; जिनांना असलेला क्षयरोग मुंबईच्या डॉक्टरांनी कसा व का लपवून ठेवला; देश स्वतंत्र झाल्यानंतरही तत्कालीन बिकट परिस्थितीत गव्हर्नर-जनरलपद सांभाळण्याची विनंती माऊंटबॅटनना गांधी-नेहरू-पटेल यांनी कशी केली; संस्थानांचे विलीनीकरण प्रत्यक्षात कसे होत गेले; सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे संबंध; सर सिरील यांनी आपल्या इतक्या अवघड कामाची सरकारने दिलेली २००० पौंड फी का नाकारली वगैरे माहिती त्यापूर्वी मी कुठेही वाचली नव्हती. गांधीखून खटल्यातील आठ आरोपींचे — नारायण आपटे, नथुराम व गोपाल गोडसे, मदनलाल पहवा, विष्णु करकरे, वीर सावरकर, दत्तात्रेय परचुरे आणि दिगंबर बडगे — यांचे पुढे काय झाले, त्यांतला एक मदनलाल पहवा उदरभरणासाठी खेळणी कसा विकू लागला आणि एक दिगंबर बडगे बुलेटप्रूफ जॅकेट्स कसा विकू लागला, आणि हा तपास करणारे मुख्य पोलीस अधिकारी जिमी नगरवाला निवृत्तीनंतर काय व्यवसाय करू लागले हेही लेखकद्वय नोंदवतात!       

   त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना खरोखरच तोड नाही. ‘फ्रीडम ऐट मिडनाइट’ लिहिताना त्यांनी तब्बल सहा हजार मैलांचा प्रवास केला. तीन लाख डॉलर्स खर्च केले. माऊंटबॅटन आणि रॅडक्लिफ यांच्यापासून इंदिरा गांधी आणि बादशहा खान यांच्यापर्यंत सुमारे पाचशे जणांच्या टेपरेकॉर्डेड मुलाखती घेतल्या. पुस्तकात संदर्भासाठी वापरलेल्या पुस्तकांची यादी तब्बल आठ पानी आहे आणि संदर्भ नोंदवणारी यादी दहा पानी आहे! ‘गांधी’ चित्रपट बघितल्यानंतर हा चित्रपट एखाद्या भारतीय दिग्दर्शकाने का बनवला नाही हा प्रश्न मला पडला होता; त्याचप्रमाणे ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ वाचल्यानंतर हे पुस्तक एखाद्या भारतीय लेखकाने का लिहिले नाही हा प्रश्न मला पडला होता! 

   ‘बियॉन्ड लव्ह’ (१९९१) हे एड्सग्रस्तांवरील पुस्तक, पूर्वी उल्लेख केलेले ‘अ थाऊजंड सन्स’ हे पुस्तक, ‘फाइव्ह पास्ट मिडनाइट इन भोपाल’ (२००१) हे जेविएर मोरो या आपल्या स्पॅनिश भाच्याबरोबर लिहिलेले पुस्तक आणि ‘इंडिया माय लव्ह’ (२०१२) हे स्वतःचे शेवटचे पुस्तक ही लापिएर यांची इतर काही महत्वाची पुस्तके. कॉलिन्स यांनीही काही पुस्तके स्वतंत्ररीत्या लिहिली. 

   भारतीयांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे असलेले त्यांचे आणखी एक पुस्तक म्हणजे ‘द सिटी ऑफ जॉय’. लापिएर यांची ही स्वतंत्र निर्मिती. ह्या पुस्तकाची जन्मकथा मोठी रोचक आहे. आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा लापिएर दान करत असत. त्यासंदर्भात ते मदर टेरेसांना भेटले. ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’पासून मिळालेल्या पैशांतून पन्नास हजार डॉलर्सची देणगी देण्यासाठी. त्याचवेळी टेरेसांनी जेम्स स्टीव्हन्स नावाच्या एका ख्रिस्ती धर्मगुरुशी त्यांची ओळख करून दिली. हावरा स्टेशनजवळ असलेल्या फिलकाना भागातील एका झोपडपट्टीत ‘उदयन’ नावाचे अनाथालय स्टीव्हन्स मागची दहा वर्षे चालवत होते; पण आर्थिक अडचणींमुळे ते बंद करायची वेळ त्यांच्यावर आली होती. महारोगी आई-वडलांच्या पोटी जन्मलेली अडीचशे दुर्दैवी मुले तिथे राहात होती. त्यांच्या जेवण्याखाण्याची, राहण्याची, शिक्षणाची सगळी व्यवस्था उदयनने केली होती. ते सारे बघून लापिएर खूपच प्रभावित झाले. “मी आहे तोवर हे काम मी बंद पडू देणार नाही” असे आश्वासन त्यांनी स्टीव्हन्सना दिले. त्यावेळी आगामी पुस्तकासाठी कुठलाही विषय त्यांच्या मनात नव्हता; पण ते सारे बघताबघता हाच आपल्या पुढच्या कादंबरीचा विषय असेल असे त्यांनी ठरवले.   

   त्यानंतर ते जीवन प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी लापिएर त्या झोपडपट्टीत अनेक महिने राहिले. तेथील लोकांसारखेच स्वतः जगले. त्यासाठी बंगालीदेखील शिकले. सगळे जण त्यांना ‘डॉमिनिकदादा’ म्हणू लागले. त्या झोपडपट्टीत सुमारे ७५,००० लोक दाटीवाटीने राहत होते. दारिद्रय, उपासमार, रोगराई यांच्याशी झगडत. तेथील हसारी पाल ह्या रिक्षा ओढून पोट भरणाऱ्या भूमिहीन शेतमजुराची, मॅक्स लोवे या अमेरिकन डॉक्टरची आणि स्टीफन कोवलस्की या तरुण पॉलिश धर्मगुरूची कहाणी म्हणजेच ‘द सिटी ऑफ जॉय’ ही १९८५ साली प्रकाशित झालेली कादंबरी. ‘आनंदनगर’ हे त्या झोपडपट्टीचे कादंबरीतील नाव. तिच्यावर त्याच नावाचा सिनेमादेखील निघाला, ज्यात ओम पुरी, शबाना आझमी आणि पॅट्रिक स्वेझ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कंबोडियातील नरसंहारावरील ‘द किलिंग फिल्डस’ हा ऑस्कर-विजेता चित्रपट बनवणाऱ्या रोलंड जॉफे याने तो दिग्दर्शित केला होता.  

   फिलकानामध्ये राहात असतानाचा एक संस्मरणीय अनुभव लापिएर यांनी नोंदवला आहे. एक दिवस सकाळी त्या झोपडपट्टीतच राहणाऱ्या दहा-बारा मुली नटूनथटून, डोक्याला पाने-फुले-पिसे वगैरे बांधून, गाणी गात, मिरवणुकीने चालल्या होत्या. आश्चर्य वाटून लापिएर यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना कळले की, त्या रवीन्द्रनाथांचे एक गीत गात वसंतऋतूचे स्वागत करत होत्या. लापिएर स्तंभित झाले. ते लिहितात, “जिथे आजूबाजूला एकही झुडूप दिसत नव्हतं, फूल नव्हतं, फुलपाखरू नव्हतं; सगळीकडे फक्त चिखल आणि मानवी विष्ठा पसरली होती, अशा त्या गलिच्छ वातावरणातही त्या मुली नाचत नाचत वसंतऋतूचं स्वागत करत होत्या! अशा वसंतऋतूचं स्वागत, ज्याचं दर्शनही त्या घाणीत त्यांना कधी होणार नव्हतं. मानवी मनातील आशा किती प्रबळ असते, अशक्यप्राय वाटणाऱ्या परिस्थितीतही ती कशी तग धरून राहते याचा साक्षात्कार मला त्या दिवशी झाला. गरिबांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच त्या दिवशी बदलला.” उगाच नाही त्यांनी त्या झोपडपट्टीला ‘आनंदनगर’ आणि कादंबरीला ‘द सिटि ऑफ जॉय’ हे नाव दिले.  

   त्यानंतर ते पॅरिसला परतले त्यावेळी त्यांच्याकडे नोंदींनी भरलेल्या तीस वह्या, दोन हजार फोटो व संभाषणे नोंदवणाऱ्या शेकडो कॅसेट्स हेच केवळ नव्हते; आनंदनगरमधला क्षण न् क्षण त्यांच्या मनावर कोरला गेला होता. पुढले संबंध वर्ष प्रत्यक्ष लेखनात गेले. खूपदा योग्य ‘मूड’ यावा म्हणून लापिएर बरोबरचे फोटो खोलीत सगळीकडे पसरून ठेवत. रिक्षा ओढणारे हॉर्न म्हणून जी घंटा वापरत तशी एक घंटा आपल्या खिशात ठेवत असत. आजवर मोठमोठ्या नेत्यांचे चित्रण केलेली त्यांची लेखणी गोरगरिबांच्या चित्रणातही तितकीच रमली. आपल्या कारकिर्दीतील हे सर्वश्रेष्ठ लेखन आपण करत आहोत याची त्यांना जाणीव होती. प्रत्यक्षात तसेच घडले. पहिल्या दहा वर्षांत ‘द सिटी ऑफ जॉय’च्या साठ लक्ष प्रती खपल्या आणि वाचकांकडून तब्बल एक लाख सत्तर हजार पत्रे लापिएरना त्या कालावधीत आली. आजही या पुस्तकाला मागणी आहे.

   कादंबरीच्या लौकिक यशापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे या कादंबरीने यांच्या आयुष्यात घडून आलेले आमूलाग्र परिवर्तन. ते लिहितात, “माझी जगाविषयीची कल्पना, माझी मूल्ये हे सारे या कादंबरीने बदलून गेले. पार्किंगसाठी योग्य जागा न मिळणे वगैरे फालतु गोष्टींना आता मी फार महत्त्व देत नाही. इतक्या कमी पैशांत जगणाऱ्या त्या माणसांसोबत राहताना मला साध्या साध्या गोष्टींची किंमत कळली. दिवे बंद केल्याशिवाय आता मी हॉटेलची रूम सोडत नाही, साबणाची वडी पूर्ण झिजेस्तोवर वापरतो, ज्याचा कोणी वापर करू शकेल अशी कुठलीही गोष्ट फेकून द्यायचे टाळतो.”    

   ‘द सिटी ऑफ जॉय’पासून स्वामित्वहक्कापोटी मिळणाऱ्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम त्यांनी ‘उदयन’च्या कामासाठी खर्च केली. याच समाजातून ही साहित्यकृती निर्माण झाली आणि या साहित्यकृतीतून निर्माण झालेला पैसा पुन्हा त्याच समाजात गेला. दानाची सुरुवात स्वतःपासून केल्यामुळे इतरही अनेकांचा सहभाग या मदतकार्यात लापिएर यांना मिळाला. एक योगायोग म्हणजे याच ‘उदयन’ संस्थेशी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट फलंदाज आणि संघाला जगज्जेता बनवणारा कर्णधार स्टीव्ह वॉ गेली पंचवीस वर्षे जोडला गेला आहे. त्यांच्यासाठी तो दरवर्षी निधी गोळा करत असतो. उर्वरित आयुष्य याच कामासाठी द्यायचे वॉने ठरवले आहे.  

  मदर टेरेसा यांच्या प्रेरणेतून लापिएर यांनी १९८१ साली ‘द सिटी ऑफ जॉय फाउंडेशन’ स्थापन केले. २००५ साली दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “गेल्या २४ वर्षांत दहा लाखांहून अधिक क्षयरोगी आमच्या कामातून बरे झाले. ९००० महारोगी मुलांना आम्ही सांभाळत आहोत. ५४० खेड्यांमध्ये ट्यूब वेल्स बांधल्या आहेत.” दवाखाने, रुग्णालये, अनाथालये, वृद्धाश्रम, तांत्रिक प्रशिक्षण केंद्रे वगैरे मुख्यतः बंगालमधले वीस प्रकल्प ते चालवतात. २००५ सालापर्यंत स्वतःचे ३५ लक्ष डॉलर्स (सुमारे २६ कोटी रुपये) या कामासाठी लापिएर यांनी खर्च केले होते. आज हा आकडा खूपच अधिक असला पाहिजे. 

   अनेक जण उत्स्फूर्तपणे दान देत. विख्यात फ्रेंच फॅशन डिझायनर ह्युबेर जिवांशी (Givenchy) त्यांच्यापैकी एक. त्यांनी लापिएर यांना ऑड्रे हेपबर्न या नटीने ‘ब्रेकफास्ट इन टिफनी’ज्’ या गाजलेल्या चित्रपटात परिधान केलेला एक काळा ड्रेस भेट म्हणून दिला. त्या ड्रेसचा लिलाव करून दहा हजार डॉलर्स उभारता येतील अशी त्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तो तब्बल ८,२५,००० डॉलर्सना (सुमारे सव्वासहा कोटी रुपयांना) विकला गेला!

   आपल्या पॅरिसमधील घरातच लापिएर यांनी संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय स्थापन केले. त्यामुळे टेलिफोन, घरभाडे, वीज वगैरे खर्च नाही. पगारी माणूस एकही नाही. सर्व काम स्वयंसेवकांमार्फत. जमवलेल्या मदतीपैकी एक पैसाही वाया जाऊ नये, यावर लापिएर यांचा कटाक्ष असे. दरवर्षी युरोपातील साधारण २५० तरुण-तरुणी या कामासाठी स्वयंसेवक म्हणून सहा-सहा महिन्यांसाठी भारतात जातात. लापिएर पतिपत्नी स्वतः वर्षातून तीन वेळा या कामासाठी कोलकात्याला येत. कुठलाही गाजावाजा न करता. उजव्या आणि डाव्या दोन्ही पक्षांकडून त्यांच्या कार्याला विरोधदेखील भरपूर झाला. सरकारी भ्रष्टाचार आणि लाल फीत तर कायमच अडथळे आणत गेली. पण चिकाटीने आपले काम लापिएर करत राहिले आणि आपल्या कामाच्या बळावर त्यांनी विरोधकांची मनेही जिंकली. भारत सरकारतर्फे त्यांना २००८ सालच्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते असामान्य सामाजिक योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार दिला गेला.  

  बारीकसे काहीतरी काम करायचे, तेही स्वतःला काही झळ न लागू देता आणि आपल्या सामाजिक बांधिलकीची दवंडी गावभर पिटायची, असला प्रकार खूप जण करतात. त्या पार्श्वभूमीवर लापिएर यांच्यासारखी माणसे पाहिली की मन हेलावते. 

Author

Leave a Reply