*उर्दू भाषा आणि उर्दू गझल* : भाग २  

मागील लेखात आपण गझलची काही रचनात्मक वैशिष्ट्ये पाहिली.  आता  गझलचे प्रकार पाहू.  

याचे प्रकार मुख्यत्वे करून असे आहेत : 

१) सुफियाना ( हम्द, नआत , मनकबत) 

२) रुमानी गझल 

३) तरक्की पसंद ( सुधारणावादी ) 

४) जदीद ( नवमतवादी ) 

५) आझाद गझल 

तुम्ही म्हणाल की ती तलत अज़िज, पंकज उधासवाली गझल कुठल्या प्रकारात मोडते ? याचे उत्तर थोडे वेगळे  वाटेल पण त्याचे असे आहे की :   

एके काळी तलत अझीझ, पंकज उधास यांनी गझल म्हणणे हा प्रकार म्हणजे  दारू पिणाऱ्या लोकांनी इतर दारू पिणाऱ्या लोकांसाठी केलेली कविता म्हणजे गझल, असा गैरसमज निर्माण केला होता – दोन चार शब्द ज्यात दारू पिण्याबद्दल आले – जसे जाम , शराब, मयखाना इत्यादी – की ऐकणारे लोक खुश होत असत आणि त्यात मश्गूल होऊन त्याबद्दल गोड गैरसमज बाळगत  की आम्ही गझल ऐकतो – आणि ती ऐकतो म्हणून ती ऐकताना दारू पितो – निव्वळ बाष्कळपणा होता हा .  

एखाददुसरी चांगली गझल  गायलीही असेल या गायकांनी; पण त्यातला गर्भितार्थ काय हे कोणी फारसे समजून  घेतले नाही आणि त्यांनीही हा अर्थ समजावून सांगितला नाही – त्यातील अभिजातपण आणि भाषिक आणि रूपकात्मक सौंदर्य पूर्णपणे बाजूला पडले. त्याला बाजारू  स्वरूप आले आणि त्यामुळे गझल फारच संकुचित झाली – बदनाम झाली. 

असो! पण ती तिच्या खऱ्या चाहत्यांनी जिवंत ठेवली – तिला मरू दिले नाही.  

मुळात गझल गायकीचे प्रकार आहेत ते म्हणजे 

१) बनारसी गझल २) दिल्ली गझल ३) लखनवी गझल 

 यात जशी गायकीची घराणी असतात तशी घराणी आहेत. वेगवेगळ्या धाटणीने गझल सादरीकरण करणे आणि ती प्रथा /परंपरा चालू ठेवणे असे ते आहे –  

गझल मांडणीमधील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गझलमधील सगळे शेर एकमेकांना सुसंगत असतील; किंवा एकाच विषयाला धरून मांडले गेले असतीलच  असे नाही.

प्रत्येक शेर हा आपले स्वतंत्रपण बाळगून असतो किंवा असू शकतो.  

पुढच्या शेरात दुसरी कुठली भावना, विचार मांडला जाऊ शकतो.  

ज्या गझलमध्ये विषय कायम तोच असतो; किंवा सुसंगत असतो त्याला किंवा त्या गझलला ‘मुसलसल’ गझल म्हणतात आणि ज्यात नसेल त्याला ‘गैर मुसलसल’ गझल असे म्हणतात. 

याने होते काय तर, स्वतंत्र शेर, त्या त्या परिस्थितीमध्ये उद्धृत करायला खूप वाव राहतो – पूर्ण गझल लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही. 

 त्यामुळेच ह्या काव्यप्रकाराची quotability प्रचंड वाढते – तो आपण एखाद्या परिस्थितीला अनुरूप दाखला म्हणून पट्कन उद्धृत  करू शकतो आणि त्यावर भाष्य करू शकतो. वाक्प्रचारांसारखा  किंवा आपल्या मराठीमध्ये असलेल्या म्हणींसारखा त्याचा वापर करू शकतो; त्यामुळेच हा काव्यप्रकार प्रचंड लोकप्रिय आहे. 

 हा काव्यप्रकार  एक प्रकारचा  ‘भाष्यसदृश गोफ आहे’ असेही म्हणता येईल;  जो प्रत्येक गझलकार कवी तयार करू शकतो आणि लोकप्रिय करू शकतो,   आपल्या सभोवताली असलेल्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य किंवा टीका , जीवनावर  खेद , खंत , आनंद अशा अनेक भावना तो त्यात थोडक्यात मांडू शकतो. 

एकदा प्लेगची साथ दिल्लीत आली होती.  अलीकडच्या करोनासदृश परिस्थितीप्रमाणेच गालीबलाही  क्वारंटाइन  होण्यासाठी लांब राहायला जावे लागले होते. 

या परिस्थितीवरही गालीबने एक अशीच गझल लिहिली  होती. 

रहिये अब ऐसी जगह जहां कोई न हो,
हम-सुख़न कोई न हो और हम-ज़ुबां कोई न हो। 

अशा ठिकाणी जायला हवे तिथे कोणी ‘हम-सुखन’ म्हणजे आपल्याशी हितगुज करणारा  आणि ‘हम जुबा’ म्हणजे आपली भाषा बोलणारा नसेल!  

बे-दर-ओ-दीवार सा एक घर बना लेना चाहिए,

कोई हमसाया न हो और पासबां कोई न हो। 

एखाद्या बिना दरवाजा किंवा भिंतीच्या घरात आता राहायला हवे, जिथे ना कोणी येणार न जाणार  (म्हणून कशाला दरवाजे आणि कशाला भिंती ) आणि न कोणी जवळचा माणूस,  न कोणी चौकीदार ( पासबां )असेल; कारण कोण कशाला तिथे येणार अशा परिस्थितीत अशा अर्थाने – 

पडिये घर बिमार तो कोई न हो तीमारदार

और गर मर जाएं तो नोहकवां कोई ना हो 

आजारी पडलो तर  आपली काळजी करणारा कोणी नसेल आणि मेलो तरी त्या विषयी दुख किंवा शोक करणारा  नसेल.  

दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेली ही गझल…    असे वाटेल की आत्ता २०२० सालच्या करोनावर ही गझल लिहिली गेली आहे. 

हा कालातीतपणा, त्यातील दार्शनिकता आणि थोडक्या शब्दात जास्तीत जास्त प्रभावीपणे जे म्हणायचं आहे ते पोचवणे हा उर्दू गझलचा गाभा आहे आणि म्हणूनच आत्तापर्यंत गेल्या ७५ वर्षांच्या भारतीय लोकसभा कार्यकाळात सगळ्यात जास्त उर्दू शायरी उद्धृत केली गेली . 

यांपैकी सगळ्यात जास्त वेळा उद्धृत केला गेलेला  चपखल शेर   लिहिला आहे शाहब जाफरी या शायर ने  आणि हा  माननीय सुषमा स्वराज यांनी उद्धृत केला होता. मनमोहन सिंग  सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर टीका करायच्या उद्देशाने हा शेर म्हणला  गेला होता  – तो असा : 

तू इधर उधर कि न बात कर

ये बता के काफिला क्यूँ  लुटा   

मुझे रेह्जनो में गिला नही 

तेरी रेह्बरी का सवाल है 

म्हणजे मला इतर जणांबाबत तक्रार नाही जे प्रवासी होते आणि  त्यांनी काहीच केले नाही; पण तू तर त्या काफिल्याचा रेह्बर म्हणजे पथदर्शक किंवा मार्गदर्शक होतास मग असे कसे काय झाले हा प्रश्न आहे –  तुझ्या नेतृत्वाखाली हे असे काय झाले हा प्रश्न आहे 

या काव्यप्रकाराची लोकप्रियता पुढील काळात वाढीस लागणार यात काही शंका नाही. आजच्या tweeter आणि इंस्टाग्रामला थोडक्यात आणि कमीत कमी शब्दांत  जास्तीत जास्त भावना पोहोचवणे याबाबत हा एक उत्तम प्रतिस्पर्धी ठरणार यात काही शंका नाही . 

‘उर्दू ज़बाँ’

ये कैसा इश्क़ है उर्दू ज़बाँ का 

मज़ा घुलता है लफ़्ज़ों का ज़बाँ पर 

कि जैसे पान में महँगा क़िमाम घुलता है 

ये कैसा इश्क़ है उर्दू ज़बाँ का….  

नशा आता है उर्दू बोलने में 

गिलौरी की तरह हैं मुँह लगी सब इस्तेलाहें 

लुत्फ़ देती है, हलक़ छूती है उर्दू तो, हलक़ से जैसे मय का घोंट उतरता है 

बड़ी अरिस्टोकरेसी है ज़बाँ में 

फ़क़ीरी में नवाबी का मज़ा देती है उर्दू 

अगरचे मअनी कम होते है उर्दू में 

अल्फ़ाज़ की इफ़रात होती है 

मगर फिर भी, बुलंद आवाज़ पढ़िए तो बहुत ही मो’तबर लगती हैं बातें 

कहीं कुछ दूर से कानों में पड़ती है अगर उर्दू 

तो लगता है कि दिन जाड़ों के हैं खिड़की खुली है, धूप अंदर आ रही है 

अजब है ये ज़बाँ, उर्दू 

कभी कहीं सफ़र करते अगर कोई मुसाफ़िर शेर पढ़ दे ‘मीर’, ‘ग़ालिब’ का 

वो चाहे अजनबी हो, यही लगता है वो मेरे वतन का है 

बड़ी शाइस्ता लहजे में किसी से उर्दू सुन कर 

क्या नहीं लगता कि एक तहज़ीब की आवाज़ है, उर्दू

~गुलजार

(उर्दू साहित्य हेतु  ५८ वां ज्ञानपीठ पुरस्कार २०२३)

मिलिंद घांग्रेकर 

Author

One thought on “*उर्दू भाषा आणि उर्दू गझल* : भाग २  

  1. फारच छान! विशेषतः सुरुवातीला शराबबाजी आणि त्या गजलनी जो उच्छाद मांडला होता, त्यामुळे गजल बदनाम झाली हा मुद्दा अगदी योग्य!

Leave a Reply