रा.ग. जाधव
१९९५ हे वर्ष. त्यापूर्वी रा.ग.जाधवांचे समीक्षात्मक लेखन नियतकालिकांतून वाचले होते. पुस्तके मुळातून वाचली नव्हती; पण त्यांची वाखणणी ऐकून होतो. माझा ‘मनातले घर’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि तो देण्यासाठी मी अनुराधा पोतदारांकडे त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे रा.ग. जाधव पहिल्यांदा भेटले. मी त्यांनाही माझे ‘मनातले घर’ दिले. त्या वेळी जाधवांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी उद्भवल्या होत्या. अनुराधाबाई जाधवांना प्रकृतीची काळजी घ्यायला सांगत होत्या. अनुराधाबाईंचा मुलगा प्रियदर्शन पोतदार – हाडाचा कवी आणि हाडाचा डॉक्टरही – तिथेच होता. त्याचे हॉस्पिटलही घराला लागूनच होते. तो म्हणाला, “इकडे या, तुम्हांला ॲडमिटच करून टाकू” जाधव हसले; पण तयार झाले नाहीत. आपल्या घरी म्हणजे ‘राजीव लॉज’मधल्या खोलीकडे परत गेले.
काही दिवसांतच मला जाधवांचे पत्र आले – पोस्टकार्ड! आपल्या किरट्या अक्षरांतील ते संपूर्ण पत्रच उद्धृत करण्याजोगे आहे. ते माझ्या कवितेविषयी आहेच; पण त्याहूनही अधिक त्यातून जाधवांचा स्वभाव, वृत्ती, मिस्कीलपणा आणि विचार व्यक्त होतात. ते म्हणतात :
प्रिय मित्रवर्य हेमंत,
स.न.वि.वि.
आपल्या ‘मनातले घर‘मधील कवितांनी माझ्या मनातच आपले घर थाटले. मनात तीन चतुर्थांश जमीन आणि एक चतुर्थांश पाणी असते म्हणूनच वाचलो…!- आपले मनःपूर्वक अभिनंदन!
काँक्रीट कविता कशी असते – असावी, तिने अवतीभवतीच्या संवेद्य मूर्तामूर्तातून कविता कशी abstract करावी, या विषयी माझी उत्सुकता पूर्ण करणारी तुमची निर्मिती आहे. अलीकडची कविता खूपच पोकळीप्रिय व बरीचशी ढोबळी मिरचीप्रिय झालेली वाटते. तुमची वाट व वळण वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुमचे मूर्ताचे, गोचराचे संवेदन त्या मूर्त गोचराच्या खास रंगाढंगाचे, सहज सुंदरतेचे आहेच. Narrative मराठी गद्यतेवरील लयीची पकड प्रभावी आहे. परंतु पुष्कळदा रविकिरण मंडळाच्या संवेदनशीलतेचेच एक कालोचित विस्ताररूप त्यातून जाणवते. वेधक स्वच्छंदतावादी छटाही त्यात गडद होतेसे वाटते . तुमच्या कवितेच्या आशयसूत्रांना अधिक सखोलता, अधिक गहिरेपणा, अधिक डोळसपणा यावा असे वाटते. Your poems please too much. The poet in you may succumb to this pleasure trap. Be on watch please! तुमच्या पुढील निर्मितीसाठीही शुभेच्छा व पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन!
आपला स्नेहांकित
रा.ग. जाधव
पत्र वाचूनच मी भारावून गेलो; पण पूर्ण समजले असे नाही. मग मी वेळ ठरवून त्यांना भेटायला त्यांच्या खोलीवर गेलो. केळकर रस्त्यावरच्या ‘राजीव लॉज’च्या वरच्या मजल्यावरच्या एका छोट्या खोलीत जाधवांचा सारा संसार होता. वर पत्र्याचेच छप्पर. तिथे ते एकटेच राहत होते. मी सकाळी दहा-अकरा वाजता गेलो असेन. जाधव यांची मूर्ती छोटेखानी होती. जाड काचांचा चष्मा, ओठांवर हसू आणि वर ते शाकारणाऱ्या मिश्या! मला बसवून ते माझ्या कवितेबद्दल बोलत राहिले. मधून मधून सिगरेट ओढत. दोन-तीनदा मला घेऊन खाली समोरच्या एका टपरीवजा हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. जवळजवळ दोन वाजेपर्यंत ते आस्थेने कवितांची उदाहरणे घेऊन बोलले. मी त्यांना ‘मनातल्या तीन चतुर्थांश जमीन आणि एक चतुर्थांश पाणी’ याचा अर्थ विचारला; तर तो प्रश्न त्यांनी हसण्यावारी नेला. मी त्यांना काही वृत्तपत्रीय समीक्षेत दाखवलेल्या दोषांबद्दल विचारले. तेही त्यांना दोष वाटले नाहीत. एकूणच कविता या विषयावरील त्यांचे विचार सविस्तर ऐकण्यासाठी पुन्हा त्यांची भेट घेण्याचे ठरवूनच मी तिथून बाहेर पडलो.
नंतर पुण्यात होणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांत जाधवांची भेट होई. मी श्रोता म्हणून गेलेला असे. कार्यक्रमानंतर जाधव माझी आस्थेने चौकशी करत. नियतकालिकांत/ दिवाळी अंकांत वाचलेल्या माझ्या कवितेबद्दल बोलत. एकदा साहित्य परिषदेत एक कार्यक्रम होता. जाधव अध्यक्ष असावेत. कवितेविषयीच्या कविता असा काहीतरी चर्चेचा विषय होता. मी श्रोत्यांत समोरच बसलेला होतो. कार्यक्रमात जाधवांनी मध्येच मला माझी ‘हा कागद’ जी मनातले घर या संग्रहात सुरुवाती-सुरुवातीस येते – वाचायला बोलावले. ती त्यांना आवडलेली कविता होती. त्यांनी बोलावल्यावर टाळणे शक्य नव्हते. मला माझ्या कविता पाठ नसतात. या कविता आपल्या मनातून नंतर शब्दांत आलेल्या असतात, शब्द विसरायला होतात. इतरांच्या कविता शब्दांतून आपल्यापर्यंत पोहोचतात; त्यामुळे आवडलेली कविता शब्दांमध्येच लक्षात असते. मी व्यासपीठावर गेलो. अनेकदा आपल्या कविता कार्यक्रमांतून वाचून वाचून लक्षात राहतात; तसेही माझे नव्हते. मी आठवली तशी कविता म्हणालो. शेवटच्या ओळी उलट्या पालट्या झाल्या; पण वेळ निभावली गेली. नंतर एका चर्चकाने, ‘कवीला आपलीच कविता आठवत नाही म्हणजे काय?’ असा प्रश्न केला होता. कार्यक्रम संपल्यावर जाधव मला घेऊन पुढे टिळक चौकातल्या एका साध्याशा हॉटेलला चहा प्यायला गेले. हॉटेलमधील वेटर जाधवांना ओळखत होता. जाधव अनेकदा तिथे जात असत. पत्नी हयात असताना तिला घेऊन तिथे आलेले असल्याने जाधव यांना त्या हॉटेलबद्दल ममत्व होते . ती आठवण काढत जाधवांनी तिथे काही खाल्ले. मीही चहा घेतला.
पुण्यात दर बारा मार्चला, यशवंतरावांच्या स्मृतिदिनी, रामदास फुटाणे एक हास्यधारा नावाचा कविसंमेलनाचा कार्यक्रम करतात. एका वर्षीच्या कार्यक्रमात त्यांनी जाधवांना जीवनगौरव पुरस्कार दिला होता; त्यामुळे जाधव सरही स्टेजवर होते. मी एक निमंत्रित कवी होतो. मी माझी ‘आईशप्पत’ नावाची कविता वाचली. कविता मोठी होती, हळूहळू गंभीर होत जाणारी होती. मी वाचत गेलो आणि कविता संपली तेव्हा सारे सभागृह सुन्न झाल्याचे मला स्टेजवरूनही जाणवले; नंतर जाधव म्हणाले, “जोगळेकर कविता वाचत होते. आम्ही सारे पाहत होतो. कविता ऐकताना, आता पुढे काय होणार अशी एक प्रकारची भीती वाटायला लागली आणि कविता अप्रतिम शेवटापर्यंत पोहोचली.” जाधवांचा असा अभिप्राय ऐकून मलाही कृतकृत्य वाटले.
डॉ. शंतनू चिंधडे हे त्यांच्या शब्दवैभव ग्रुपतर्फे कविता वाचनाचे कार्यक्रम करत असत. डॉ.संगमनेरकरांच्या इस्पितळात आयोजित केलेल्या अशा एका कार्यक्रमात त्यांनी माझे कवितावाचन आयोजित केले होते. जाधवांच्या अध्यक्षतेखाली. मी माझ्या कविता वाचल्या. माझे कविता वाचन झाल्यावर मान हलवीत जाधव म्हणाले , “ही अगदी रविकिरण मंडळीय कविता आहे.” त्या काळात वाङ्मयीन नियतकालिकांत मुख्यतः गंभीर, निराशावादी कविता असत. त्या कवींच्यासाठी ‘रविकिरण मंडळीय’ ही शिवीच होती. भावविवश कवितेसाठी ती योजली जाई. जाधव रविकिरण मंडळाचा अधिक्षेप करणारे समीक्षक नव्हते. ते केवळ माझ्या कवितेची मुळे शोधत होते. माझ्या कवितेतील रोमांटिसिझम हा त्यांना रविकिरण मंडळातील कवींच्या संवेदनशीलतेचे कालोचित विस्ताररूप वाटत होता.
जाधवांचे समीक्षालेखन जोरात होते. स्वतःच्या समीक्षात्मक लेखांच्या पुस्तकांबरोबर ते अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे संपादनही करत होते. त्यांचे स्वतःचे काव्यलेखन मात्र त्यामुळे मागे पडले होते; पण त्याची त्यांना जराही खंत नव्हती. समकालीन कवितांवर, कवींवर लिहिणे हे त्यांना महत्त्वाचे किंबहुना कर्तव्यच वाटत होते. आपण एका महत्त्वाच्या कालखंडाचे साक्षीदार आहोत अशी त्यांची भावना होती. हे लेखन संपादनाचे काम ते आनंदाने करत होते. वाङ्मयाच्या परिशीलनातूनच आपल्याला आपले जीवन अधिक समजते अशी त्यांची धारणा होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांच्या बोलावण्यावरून, वाईला जाऊन त्यांनी विश्वकोशाच्या संपादनाचे कामही केले. २००० ते २००२ मध्ये ते विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. पुण्याच्या साहित्य परिषदेसाठी त्यांनी १९५० ते २००० या कालखंडातील मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे चार खंड संपादित केले. दलित साहित्याचे साहित्याच्या प्रमुख धारेत स्वागत करणारे ते पहिले समीक्षक होते. साधनाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांत संपादन करण्याचे काम त्यांनी ग.प्र प्रधानांबरोबर केले. २००४ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते बिनविरोध अध्यक्ष निवडले गेले. ते अजातशत्रू असल्याने त्यांच्या विरोधात कोणी उभे राहिले नाही आणि त्यांचे कर्तृत्व तर वादातीतच होते. ‘विंदा करंदीकर’ जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला. या पुरस्काराचे पाच लाख रुपये आणि संमेलनाध्यक्षांसाठीचे एक लाख रुपये त्यांनी ‘आता मला या पैशांचे काय करायचे आहे?’ असे म्हणत साधनेला दिले. आमदार विजय काळे यांनी त्यांच्याकडे ‘काही पैसे स्वतःजवळ कधी उपचारासाठी लागले तर ठेवा’ असा आग्रह धरला होता. राजीव लॉजमधील खोली सोडल्यावर ते सदाशिव पेठेत अनपट बिल्डिंगमध्ये एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत राहत होते. शासनाकडे अनेकांनी या थोर साहित्यिकाला सदनिका देण्यासाठी आग्रह धरला होता. सरकारने त्याला मान्यताही दिली होती. जाधवांना स्वतःला कशाचाच मोह नव्हता. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ते बहुधा पांढरा फुल शर्ट आणि निळी पॅंट या पेहरावात वावरत असत. शर्टचे वरचे बटन लावलेले आणि तो पॅंटीत खोचलेला! नरेंद्र दाभोळकरांच्या पुढाकाराने त्यांना साधनेत सदनिका देण्यात आली. पुढे ते साधनाचे ट्रस्टीही झाले .
२००५ या वर्षी मी अंतर्नाद मध्ये ‘अगा कवितांनो’ नावाचे एक कवितांवरील लेखांचे सदर लिहू लागलो. कवितेतील एकेका विशेषावर एक एक लेख. त्या अनुषंगाने विविध कविता उद्धृत करून मी हे लेख लिहित होतो. २०१३-१४ मध्येही मी हे सदर पुढे चालवले. मध्यांतरी २०१०-११ मध्ये मी १५ समकालीन कवींवरही लेख लिहिले. हे आस्वादक समीक्षापर लेखन जाधवांना अतिशय आवडले. कुठेही भेटले की ते तसे आवर्जून सांगत. हे लेखन त्यांना मर्मग्राही आणि मौलिक वाटत होते.
नरेंद्र दाभोळकर साताऱ्याहून पुण्यात आले की साधनेच्या अभ्यागत गृहात राहत असत आणि त्यांच्या आणि जाधवांच्या गप्पा रंगत असत. २०१३ या वर्षी दाभोळकर असेच साधनेत राहून, सकाळी फिरायला बालगंधर्व पुलावरून जात असताना, त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम न पटणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली आणि हल्लेखोर फरारी झाले. या घटनेचा जाधवांना मोठा धक्का बसला. त्यांनी आयुष्यभर जपलेल्या माणुसकीवरच्या विश्वासालाच हा तडा पडला होता.
मला लिहिलेल्या पत्रातून आणि नंतर झालेल्या संवादातून त्यांनी माझ्या कवितेचे जसे नेमके विश्लेषण केले होते तसे तोपर्यंत कोणीही केले नव्हते आणि नंतरही नाही! जाधवांनी आपल्या लेखनावर समीक्षात्मक लिहावे असे मला फार वाटत होते; पण मी त्यांना तसे कधी स्पष्ट विचारले नाही. त्यांनी इतकी कामे स्वतःहून अंगावर ओढवून घेतली होती की त्यांना हे काम करायला सवडही मिळाली नसती; पण ते तसेच राहून गेले आणि २७ मे २०१६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
