प्रभू श्रीरामचंद्र भारतवासींचे दैवत मानले जाते. त्यांना भगवान नारायणाचे सातवे अवतार मानतात. नुकतेच अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. संपूर्ण देशातच नव्हे; तर परदेशातही लोक रामभक्तीत डुंबून गेले होते.
प्राचीन काळापासून रामाचा महिमा गायला जात आहे. वाल्मीकींनी संस्कृत भाषेत रामायण लिहून ठेवले. गोस्वामी तुलसीदास यांनी सुप्रसिद्ध महाकाव्य रामचरितमानस रचले. राम केवळ हिंदू लोकांचेच नव्हे तर मुसलमानांसाठीदेखील आदर्श होते. रसखान, आलम रसलीन, ख्वाजा मोहिउद्दीन चिश्ती, अब्दुल रशीद खान अशा अनेक मुसलमान कवींनी आपल्या काव्यातून रामाची स्तुती केलेली आढळते. जगभरात आजही अनेक लोक प्रभू रामचंद्रांना आपला आदर्श मानतात
‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ सारखी देशभक्तीपर रचना करणाऱ्या इकबाल यांनी श्रीरामांची महती कवितेद्वारे मुसलमान वाचकांसमोर आणली आहे हे फार थोड्या लोकांना माहीत असेल.
लबरेज़ है शराब-ए-हक़ीक़त से जाम-ए-हिंद
सब फ़लसफ़ी हैं ख़ित्ता-ए-मग़रिब के राम-ए-हिंद
ये हिन्दियों की फ़िक्र-ए-फ़लक-रस का है असर
रिफ़अत में आसमाँ से भी ऊँचा है बाम-ए-हिंद
इस देस में हुए हैं हज़ारों मलक-सरिश्त
मशहूर जिन के दम से है दुनिया में नाम-ए-हिंद
है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़
अहल-ए-नज़र समझते हैं इस को इमाम-ए-हिंद
एजाज़ इस चराग़-ए-हिदायत का है यही
रौशन-तर-अज़-सहर है ज़माने में शाम-ए-हिंद
तलवार का धनी था शुजाअ’त में फ़र्द था
पाकीज़गी में जोश-ए-मोहब्बत में फ़र्द था
आपल्या कवितेत इकबाल म्हणतात- हिंदुस्तानचा प्याला सत्याच्या चांगल्या विचाराने ओसंडून वाहतो आहे. उच्च आसनावर बसलेल्या रामाचा आम्हांला अभिमान वाटतो. राम म्हणजे एक चमत्कार आहे. त्यांच्या ज्ञानाच्या पूर्ण प्रकाशाने हिंदुस्तानची धरती उजळून निघाली आहे.
या देशातील लाखो लोकांच्या हृदयात राम वसलेले आहेत. ईश्वरी अवतार असलेल्या रामाच्या अस्तित्वाचा हिंदुस्तानाला अभिमान आहे. राम हिंदुस्तानाची आभा आहेत. ही संत महात्म्यांची पुण्यभूमी आहे. रामाची भव्यदिव्य विचारसरणी सर्वसमावेशक आहे.राम नाम हे सर्वव्यापी आहे. जनमनात ठाण मांडून आहे. राम हिंदुस्तानातील महान उंची साधलेला एक महानचिंतक आहे. आकाशाला भिडणाऱ्या त्याच्या विचारसरणीमुळे जगभरात भारताला आदर मान मिळत आहे. रामाच्या अस्तित्वाचा भारताला अभिमान वाटतो.
या कवितेत इकबालच्या हृदयाची तार हिंदुस्तानच्या ईश्वरी अवतार असलेल्या, उच्च आसनावर विराजमान दैवी व्यक्तींबरोबर जोडली गेल्याचे स्पष्ट दिसते. ते रामाला ‘इमाम’ म्हणतात. इमाम म्हणजे ज्याच्याकडे दिव्यदृष्टी आहे, ज्याचे अनुकरण सर्वजण करतात. कधी ते रामासाठी ‘अहले नजर’ सारखे शब्द वापरतात. अहले नजर म्हणजे केवळ नेत्रदृष्टी नव्हे; तर आध्यात्मिक दृष्टी. इकबालच्या नजरेत राम हा एक असा नेता आहे जो लोकांना योग्य मार्ग दाखवू शकतो, त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेऊ शकतो. रामाचे मार्गदर्शक तत्त्व माणसाला तारून नेणारे आहे. रामाचे बोल, विचार, सर्वमान्य आणि सर्वसमावेशक आहेत. त्यांची वचने दिव्याच्या प्रकाशासारखी लख्ख, अंधारात (कठीण परिस्थितीत) उचित मार्ग दाखवणारी आहेत. श्रीरामांच्या मार्गदर्शनामुळे हिंदुस्थानची संध्याकाळदेखील जगाच्या सकाळीपेक्षा लख्ख प्रकाशाने न्हालेली असते. रामाला मिळालेला मानसन्मान तो त्यांच्याच उपदेशाचा परिपाक आहे. त्यांचा उपदेश दिव्याच्या प्रकाशासारखा पथदर्शक आहे.
श्रीराम हे पावित्र्य, शुद्धता, शौर्य आणि प्रेमाने परिपूर्ण आहेत. अतिशय पराक्रमी असलेले राम हे शौर्याचे प्रतीक आहे. रामाचे अस्तित्व एक वास्तववादी सत्य आहे. हिंदुस्तान ही संत महात्म्यांची पुण्यभूमी असे वर्णन करताना इकबाल म्हणतात की पाश्चिमात्य तत्त्वज्ञदेखील भारताच्या आध्यात्मिक विचारसरणीने अत्यंत प्रभावित झालेले आहेत. राम हे पूजनीय आणि आदर्श पुरुष म्हणून त्यांचा उल्लेख मर्यादा पुरुषोत्तम असा केला जातो.
इकबाल यांनी हिंदुस्तानातील महान,आदरणीय,देवतुल्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या रामाचा आपल्या कवितेतून आवर्जून उल्लेख केलेला दिसतो. प्रभू रामचंद्रांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांनी सुंदर रितीने विशद केले आहे. त्यांच्या साध्या शब्दांत मोठा आशय दडलेला दिसतो.
इकबालच्या कवितेत धार्मिक एकता तर होतीच; पण दुसऱ्या धर्माचा आदर देखील स्पष्ट परिलक्षित होतो; त्यामुळेच हिंदुस्तानाच्या संस्कृती संवर्धनात त्यांचे मोठे योगदान आहे ही गोष्ट कोणी नाकारू शकणार नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून व्यक्त होणारे रामाचे महत्त्व, रामाविषयी असलेले प्रेम इकबालच्या शब्दाशब्दांतून प्रकट झालेले दिसते.
डॉ नीता पांढरीपांडे
