स्वागत : आम्हीही भारताचे लोक

  भारत माझा देश आहे.   (काही लोक सोडून) सारे माझे बांधव आहेत अशीच जणू आपली प्रतिज्ञा असावी याची जाणीव करून देणारं ‘आम्हीही भारताचे लोक’ हे निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेलं पुस्तक सर्वसामान्यांच्या मनातल्या शुभ्रधवल भासणाऱ्या स्वतःच्याच प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. 

 “आप के घर में छक्का पैदा हुआ है|” हे प्रसूतितज्ज्ञांचे उद्गार अथवा अंतर्मनातून येणारे, स्वतःच्या लिंगभावनेच्या  विरोधात घुमणारे सूर आणि त्यांचा  समाजावर एकविसाव्या शतकातही होणारा विपरीत परिणाम, त्यातून उठलेली वादळं, अपमान, उपेक्षा यांचं न संपणारं चक्र याचा परखड लेखाजोखा हे कथन मांडतं

नर-मादी-किन्नर हे जीवशास्त्रीय वर्गीकरण!  यांतील किन्नराचं स्थान प्रस्थापित लैंगिक विभागातून कधी आणि का काढलं गेलं असावं? खजुराहोमधील समलैंगिकतादर्शक शिल्पे, शिखंडी, श्रीकृष्णाचं मोहिनी अवतार घेऊन अरावनाशी लग्न, बृहन्नडेचं रूप पूर्वजांनीही सहज स्वीकारलेलं दिसतं,  कथांमध्ये रंगवलेलं दिसतं… आजच्या विज्ञानयुगात आपण ते का स्वीकारू शकत नाही? समाजाच्या या अघोषित बहिष्कारामुळे एलजीबीटीआयक्यू(प्लस) यांच्या आयुष्याची होणारी परवड या कथनातून स्पष्ट दिसते.

जोया लोबो – एक फोटो जर्नालिस्ट – आजही लोकलमध्ये भीक मागते, राधा राजपूत यांना ‘आप  छक्का हो’ म्हणून कर्ज मिळत नाही. इतक्या नकारात्मक वातावरणातही ३ ट्रक आणि एसी गाडी हिमतीवर त्या घेतात; मग अपयशी कोण? असा भेदक सवाल राधाबाई करतात.  डॉ. सान्वी जेठवाणींची लोकनृत्यातली आणि व्यवस्थापन क्षेत्रातली अशा दोन पीएचडी या विरोधी वातावरणातूनच कष्टपूर्वक मिळवलेल्या! निष्ठा निशांत, प्रणित हाटे  अशा अनेकांच्या कष्टांची, संघर्षाची कथा इथे वाचायला मिळते. 

तरीही माणूस म्हणून स्वीकारलेलंच नसल्याने यांच्याकडे रेशन कार्ड नव्हतं, मतदार यादीत  आत्तापर्यंत नावही नव्हतं, यांच्यासाठी  शौचालयेही नाहीत! रुग्णालयात बाल महिला पुरुष यांखेरीज आणखी वेगळा विभाग नाही… संविधानाने दिलेले अधिकार त्यांच्यापर्यंत पोचलेलेच नाहीत. दक्षिण भारतात ट्रांसजेंडरला त्याच्या जेंडरमुळे व्यावसायिक पायलटचं लायसंस मिळालं नाही! 

बलात्कार ही नित्याची बाब! बलात्काराची तक्रार करायला गेल्यावर तृतीय पंथींवर बलात्कार कसा होऊ शकतो, म्हणून ४८ तास  तक्रार नोंदवून घेतलीच जात नाही, पुढे केस होऊनही काहीच घडत नाही… 

यात षंढ कोण हा प्रश्न स्वतःलाच विचारावासा वाटतो. 

‘हिजडे आहात का?’ ‘मर्द असाल तर पुढे या,’ ‘बांगड्या भरल्यायत का?’ ही  वारंवार व्यथित करणारी हेटाळणी!

चित्रपटांत यांचा वापर फक्त नाच्ये म्हणून, विनोदनिर्मितीसाठी किंवा खलनायक म्हणून! का? त्यांच्यातलं प्रेम, सोज्ज्वळपणा, तेजस्वीपणा,  प्रामाणिकपणा दाखवता येत नाही?

देव दानवा नरें निर्मिलेप्रमाणेच सौंदर्याच्या कल्पनाही मानवानेच निर्माण केलेल्या! विविधतेत सौंदर्य न पाहता ठरीव आकारांत सौंदर्य बघून इतरांना बीभत्सता बहाल करणारे आपण कोण? असे कधी न जाणवलेले  प्रश्न हे कथन वाचताना उभे राहतात. तृतीयपंथींचं चित्रण करणाऱ्या ‘आम्ही का तिसरे’ या चित्रपटात भूमिका करणाऱ्या कलावंताला तृतीयपंथी सांगतात, “तू भूमिका करतोयस हे लक्षात ठेव!” हे तुझं खरं जग नव्हे… तुझ्या वाट्याला आमच्या यातना येऊ नयेत हे दर्शवणारा प्रसंग खजील करून जातो. 

मुळात तृतीयपंथी का? हे नाव कोणी ठरवलं? प्रथमपंथी कोण? असे मूलभूत संज्ञेलाच आक्षेप घेणारे प्रश्नही या संवादातून पुढे येतात.  जन्मतः मुलगा मुलगी म्हणूच नये, ती व्यक्ती मोठी झाली की तिला तिचं लिंग ठरवू दे अशा सूचनाही अंतर्मुख करतात.

सगळ्या बाजूंनी नन्नाचा पाढा अनुभवणाऱ्या या दुर्दैवी सजीवांना आरक्षणामध्ये  सामावलं जायलाच हवं हेही मनोमन पटतं. 

आपला लिंगभाव पालकांकडे मोकळेपणानं सांगण्याचं धैर्य यांच्याकडे नाही याला कारण आपला समाजच! त्यामुळे जरी त्यांनी पालकांकडे मन मोकळं केलं; तरी जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील या भीतीने लोक अंगारे-धुपारे जादूटोणा यांच्या मागे लागतात आणि यांचं तडफडणारं मन आणि शरीर आतल्या आत रडत राहतं. 

तू सरळ मी वाकडी… 

आपला लिंगभाव  सहजतेनं सांगितल्यावर त्याला बसलेला आघात, रंगलेली चर्चा असं समाजदर्शन घडवणारी दिशा पिंकी शेख यांची कविता व्यथित करून जाते. 

एलजीबीटीआयक्यू(प्लस) या संज्ञा, कष्टाने वर आलेल्या व्यक्ती यांचं कौतुक इथेच न थांबता भविष्यात  शिक्षण आणि कायमस्वरूपी रोजगार यांसाठी काय योजना कराव्यात या भरीव वैचारिक देवघेवीबरोबरच पालकांनी पाल्याचं ‘तृतीयपंथी’ असणं कसं स्वीकारलं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दाही या कथनात चर्चिला गेला आहे;  यामुळे पाल्याच्या तथाकथित वेगळेपणामुळे द्विधावस्थेत असणाऱ्या पालकांना वैचारिक दिशा लाभेल. चित्रपट, साहित्यात येणारं तृतीयपंथींचं नकारात्मक चित्रण हा चिंतनाचा महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा… चित्रपटाचा जनमानसावर पडणारा प्रभाव आणि पुन्हा पुन्हा तृतीयपंथींना दिलेली खलनायकी अथवा विदूषकी भूमिका जनमानसावर ‘हे लोक असेच’ ही भावना प्रतिबिंबित करतात. या प्रतिमेतून बाहेर येणे महत्त्वाचे आहे, हा विचारही मोलाचा आहे. 

या आपल्याच सुहृदांसाठी आरोग्यव्यवस्था, निवारा अशा अनेक बाबींवर झालेली अभ्यासपूर्ण व मुद्देसूद चर्चा हाही या पुस्तकाचा मोठा विशेष आहे. 

प्रश्नांची मांडणी झाल्यावर, चर्चा झाल्यावर तत्संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्या विषयी बोलण्यास सांगणं हा या चर्चेचा महत्त्वाचा भाग. अन्यथा नुसत्या कोरड्या चर्चा, त्यावर ‘अरेरे बिचारे’ ही तात्पुरती कणव आणि पुढे काही नाही ही सर्वसाधारण परिषदांची रीत असते.

कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयात उभं केलेलं ट्रांसजेंडर क्लिनिक, त्यांच्यासाठी शाळा, आरक्षण, पालकांसाठी समुपदेशन केंद्रे,ससूनमध्ये ट्रांसजेंडरसाठी वेगळा वॉर्ड, शासकीय शिक्षिका म्हणून, सरपंच म्हणून नेमणुका अशा विविध सकारात्मक घटना वाचताना  आधीच्या वाचनानं मनात वाढत गेलेल्या  अपराधी भावनेतून थोडं बाहेर पडायला दिशा मिळाली असं वाटलं. 

 एखाद्याला जन्मतः जुळी बोटे, जन्मखूण, काही वैगुण्य असतं त्याचा आपण स्वीकार करतो; मग या वास्तवाचा स्वीकार करण्यात आपण का अपयशी ठरतो? माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे फक्त गाण्यापुरतं मर्यादित? 

या अन्यायाला वाचा फोडत निवडणूक आयोगाने हे शिवधनुष्य उचललं आहे. राजन गवस म्हणतात तसं बांधावर  उभं राहून लिहिणारे आणि जगून लिहिणारे यांच्यापलीकडे असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना या दुनियेची कल्पनाच नाही. 

निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलून अनेक कार्यक्रम  हाती घेतले. आजवर उपेक्षित राहिलेल्या या भारतीय लोकांना खऱ्या अर्थाने भारतीय म्हणून वागणूक देण्याच्या प्रक्रियेला आता वेग येईल ही आशा निर्माण करणारे चित्र हे कथन दाखवतं. 

निवडणूक आयोगाच्याच प्रेरणेने माहीम सार्वजनिक वाचनालयात श्रीमती दिशा पिंकी शेख यांना निमंत्रित केलं होतं; तेव्हा सुजाण श्रोत्यांनी सभागृह भरून गेलं होतं. कार्यक्रम संपला तरी श्रोत्यांचा पाय निघत नव्हता. आजवर मानवसमाजाने आपल्याच भावंडांवर केलेल्या अन्यायाची सर्वांनाच प्रकर्षाने जाणीव झाली हे सगळ्यांनी साश्रू नयनांनी  पुन्हा पुन्हा सांगितलं. 

नेमक्या शब्दांत मांडलेला, मनाला थेट भिडणारा मोलाचा आशय, सुबक बांधणी, कथनात आलेल्या विविध संज्ञांचे तपशीलवार अर्थ देणारी सूची,  किरकोळ अपवाद वगळता वाचताना ठेचा न लागणारं  प्रमाणलेखन या विशेषांमुळे हे विचारधन अधिकाधिक लोकांपर्यंत जावं आणि त्याचं लवकरच आचरण व्हावं ही मनोमन इच्छा! 

पुस्तक विकत घ्यावयाचे असल्यास आपले नाव, संपर्क क्र., पिनकोडसह संपूर्ण पत्ता आणि पुस्तकाच्या अपेक्षित प्रती ही माहिती 9967425095 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा … ते पुस्तक पाठवण्याची व्यवस्था करतील. 

सुषमा जोशी 

Author

Leave a Reply