मौज – सत्यकथेचा अस्त 

It is much easier to be critical than to be correct. 

(अचूक असण्यापेक्षा टीका करणे खूप सोपे असते.)

बेंजामिन डिझरेली, ब्रिटिश मुत्सद्दी (१८०४ – १८८१) 

सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर या मान्यवर संपादकांनी प्रस्तुत लेखकाला दिलेल्या ‘मौज–सत्यकथा बंद पडण्यामागील कारणांची मीमांसा’ या विषयाचा आवाका मोठा आहे आणि त्यामुळे लेखाची व्याप्तीही मोठी असणे अपरिहार्य आहे. सुरुवातीला ‘मौज’ साप्ताहिक आणि ‘सत्यकथा’ मासिक यांच्याविषयी काही लिहिणे आवश्यक आहे; कारण मौज बंद झाले जानेवारी १९६० मध्ये – म्हणजे ६२ वर्षांपूर्वी; तर सत्यकथा बंद झाले ऑगस्ट १९८२ मध्ये – म्हणजे ४० वर्षांपूर्वी. इतकी वर्षे लोटल्यानंतरच्या आजच्या वाचकाला त्यांचे एकूण स्वरूप काय होते हे ठाऊक असेल असे गृहीत धरता येणार नाही आणि ते लक्षात घेतल्याशिवाय पुढे ती नियतकालिके बंद पडली या घटनेची आज इतक्या वर्षांनंतर मीमांसा करण्याची गरज काय आहे हेही त्याला कदाचित समजणार नाही. सुरुवात मौजपासून करू.  

एक महत्त्वाची, फारशी कुठे नमूद न झालेली आणि त्यामुळे कदाचित बहुतेक वाचकांना ठाऊक नसलेली वस्तुस्थिती म्हणजे मौज साप्ताहिकाची स्थापना भागवत कुटुंबीयांनी नव्हे; तर पुढे ‘समतानंद’ या नावाने अधिक प्रसिद्धीस आलेल्या अनंत हरि गद्रे यांनी केली होती. बुधवार, २९ मार्च १९२२ रोजी, गुढीपाडव्याच्या  मुहूर्तावर. त्यापूर्वी आठ वर्षे गद्रे पुण्यात राहून ‘संदेश’मध्ये पत्रकारिता करत होते. लोकमान्य टिळकांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचवणे हे  गद्र्यांनी  आपले ध्येय मानले होते. लोकमान्यांच्या प्रत्येक भाषणाचा विस्तृत वृत्तान्त गद्रे संदेशमध्ये लिहीत. संदेशचे मालक-संपादक अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी ‘टिळकांचे खास वार्ताहर’ म्हणूनच गद्र्यांची नेमणूक केली होती. पुण्याहून प्रसिद्ध होणारे टिळकांचे ‘केसरी’ हे तेव्हा साप्ताहिक होते. त्याची भाषा काहीशी विद्वज्जड असे. याउलट संदेश मुंबईहून दैनिक म्हणून निघे व त्याची भाषा सर्वसामान्य वाचकाला समजेल अशीच असे; त्यामुळे टिळकांचे विचार अधिक लोकांपर्यंत पोचवण्यात संदेशचा व त्यातील गद्रे यांच्या वृत्तान्तांचा मोठा वाटा होता. टिळकांचे निधन झाल्यानंतर गद्र्यांनी राजकीय पत्रकारिता सोडली व मुंबईला स्थायिक होऊन त्यांनी स्वतःच्याच मौज साप्ताहिकाची स्थापना केली.

पहिल्या महायुद्धानंतरचा तो काळ. भारतात व विशेषतः मुंबईत त्यावेळी नव्या विचारांचे वारे वाहू लागले होते. पाश्चात्त्य शिक्षण, विचार, कला आणि साहित्याच्या संपर्कातून जीवनाच्या अनेक क्षेत्रांत रुची असलेला एक नवा वाचकवर्ग उदयाला येत होता. व्यापार, उद्योगधंदे, तंत्रज्ञान यांतून प्राप्त होत असलेल्या सुविधा आणि आधुनिक राहणी यांचाही परिणाम या वर्गावर होत होता. गद्रे यांनी तो नेमका टिपला होता. तत्पूर्वी बहुतेक सर्व नियतकालिके मुख्यतः राजकीय विचारांचा प्रसार करायचे एक माध्यम म्हणून वापरली जात. गद्र्यांना वेगळे काहीतरी करायचे होते. मौजच्या पहिल्याच अंकात, ‘नेहमीचे राजकारणाचे धीरगंभीर विषय बाजूला ठेवून लोकांची करमणूक करावी,’ हा आपला उद्देश त्यांनी स्पष्ट केला होता; तीही नव्या शहरी वाचकाची मोठी गरज होती. मौज या नावातच गद्र्यांना अपेक्षित असलेले साप्ताहिकाचे वेगळेपण दिसते.   

गद्रे स्वतः नाटककार असल्याने मौजमध्ये नाटकविषयक मजकुराला बरीच जागा दिली जाई. ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ या सदरात जगभरातील काही सनसनाटी घटना येत. ‘चहा, चिवडा, चिरूट’ हे समकालीन घडामोडींवर खुसखुशीत भाष्य करणारे सदर खूप वाचकप्रिय होते. तसेच मालवणचे वसंत लाडोबा म्हापणकर यांचे राशिभविष्य आणि क्रिकेट सामन्यांचे सविस्तर वृत्त. वि. वा. हडप यांच्या ‘बहकलेली तरुणी’ आणि ‘इष्काचा प्याला’ यांसारख्या त्यावेळच्या ‘सोवळ्या’ वाचकांना अश्लील वाटणाऱ्या कादंबऱ्या मौजमधून क्रमश: प्रसिद्ध झाल्या व वाचकप्रियही ठरल्या. एखाद्या विषयाला वाहिलेला खास अंक काढायची प्रथा मौजनेच सुरू केली. 

वासंतिक अंक, काँग्रेस अंक, दिवाळी अंक असे विशेषांक मौज काढत असे. हळूहळू मौजच्या  नेहमीच्या साप्ताहिक अंकाचा सरकारमान्य (certified) खप सात हजार आणि दिवाळी अंकाचा खप पंधरा हजार झाला. त्यावेळी केसरीच्या खालोखाल मौजचा खप होता. पुढे त्यांनी घराशेजारीच खटाववाडीत मौज प्रिंटिंग प्रेसही सुरू केला. नियतकालिक गंभीरच असले पाहिजे या कल्पनेला छेद देत केवळ रंजनप्रधान नियतकालिकांचा पायंडा मौजने पाडला असे म्हणता येईल. दुर्दैवाने जास्त खपामुळे आलेली मौजची समृद्धी फार वर्षे टिकली नाही. १९२५ सालानंतर तोटा बराच वाढत गेला आणि शेवटी गद्रेंना मौज साप्ताहिक आणि छापखाना हे दोन्ही भागवत कुटुंबीयांना विकावे लागले.  

रा. के. लेले यांनी मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या आपल्या ग्रंथात (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, तिसरी आवृत्ती, पृष्ठ ९०७) लिहिले आहे :  

‘पांडुरंग महादेव भागवत यांनी मौज छापखाना व मौज साप्ताहिक खुल्या लिलावात बोलून आपल्या हाती घेतले. त्याच वेळी ‘मौज प्रिंटिंग प्रेस’, ‘मौज प्रिंटिंग ब्युरो’ झाला (मार्च-एप्रिल १९२९). पांडुरंग महादेव भागवत यांनी नागपुरात ‘महाराष्ट्र’कार दादासाहेब ओगले यांच्या हाताखाली पत्र-व्यवसायाचा अनुभव घेतला होता. मुंबईच्या ‘लोकमान्य’ दैनिकाशीही त्यांचा संबंध होता. पुढे अनंतराव गद्रे आपल्या नाटक कंपनीबरोबर बाहेरगावी गेले असता द. ग. सारोळकर हे संपादकीय काम पाहत असत. पुढे अनंतरावांनी सुचविल्यावरून संपादकीय जबाबदारी पूर्णपणे सारोळकरांच्या हाती देण्यात आली. या काळात ‘मौज’मध्ये प्रचलित राजकीय, सामाजिक, वाङ्मयीन तसेच कामगार प्रश्नांची चर्चा होऊ लागून विषयांची विविधता वाढली. सारोळकर एप्रिल १९३४मध्ये वारले आणि ‘मौज’ची संपादकीय सूत्रे स्वतः पांडोबा भागवत ह्यांनी आपल्या हाती घेतली.’

इथे हे नमूद करायला हरकत नाही की गद्रे यांच्याप्रमाणेच भागवत कुटुंबही मूळचे देवरूखचेच होते, दोन्ही कुटुंबांचा व्यवसाय छोटी किराणा मालाची दुकाने हाच होता व त्यामुळे दोन्ही कुटुंबांचा जुना परिचय होता. मुंबईत आल्यावरही दोन्ही कुटुंबांचा निवास गिरगावातील गोरेगावकर चाळीतच होता. त्यामुळे मौजच्या मालकीचे हस्तांतरण झाल्यावरही अनंतरावांचे मौजशी स्नेहाचे संबंध राहिले. 

   भागवतांकडे मौजची मालकी गेल्यानंतर साप्ताहिकाच्या स्वरूपात काय बदल झाले? रातोरात खूप बदल झाले असे म्हणता येणार नाही; कारण नव्या मौजमध्येही पहिले दीड वर्ष गद्रेच संपादकपदी राहिले; तसेच त्यांनी पूर्वीच नेमलेले कवी सदाशिव अनंत शुक्ल हेही काम करत राहिले. नवे संपादक पांडुरंग महादेव भागवत असले, तरी ते स्वतः फक्त व्यावहारिक बाजू सांभाळत. मुद्रण हा भागवतांचा मुख्य व्यवसाय होता आणि नियतकालिके चालवताना तूट आली तर ती तूट ते मुद्रणालयाच्या नफ्यातून भरून काढू शकत; शिवाय नियतकालिके हे मुद्रणालयालादेखील एक हक्काचे नियमित काम असे. परस्परपूरक असेच हे दोन्ही व्यवसाय होते. नंतरच्या काळातही अनंत अंतरकरांची हंस, मोहिनी, नवल ही मासिके किंवा पु. वि. बेहेरे यांची माहेर, मेनका, जत्रा हे मासिके किंवा किर्लोस्करांची किर्लोस्कर, स्त्री ही मासिके त्यांच्या-त्यांच्या मुद्रणालयांतच निघत होती. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर, ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे आणि इतरही अनेकांच्या बाबतीत ते खरे आहे.   

२५ ऑगस्ट १९३८ रोजी पांडुरंग महादेव भागवत वारले. त्यांना मुलगा नव्हता आणि त्यामुळे त्यानंतर त्यांचे पुतणे दत्तात्रेय पुरुषोत्तम भागवत यांच्यावर मौजची जबाबदारी पडली. त्यांना राजकीय विषयांत रस होता. आदल्या वर्षातील प्रमुख घटनांचा आढावा घेणारा एक लेख मौज दिवाळी अंकात ते दर वर्षी लिहीत. शीर्षक असे, ‘गेले वर्ष’. दुर्दैवाने अवघ्या पाचच वर्षांनी, १५ नोव्हेंबर १९४३ रोजी, द. पु. भागवत यांचेही निधन झाले. त्यानंतर विज्ञानाचे पदवीधर असलेले त्यांचे धाकटे बंधू तेवीस वर्षांचे विष्णुपंत पु. भागवत आणि वीस वर्षांचे, इंटरला असलेले श्रीकृष्ण पु. भागवत ऊर्फ श्रीपु यांच्याकडे मौजची सूत्रे गेली.  विष्णुपंत भागवत यांचे नाव संपादक म्हणून छापले जात असले तरी, आपल्या धाकट्या भावाला साहित्याची अधिक चांगली जाण आहे असा त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळे साधारण १९४५पासून संपादकीय बाजू त्यांनी श्रीपुंवरच सोपवली. या कामात ग. रा. कामत हेही पूर्णवेळ मदत करत. वि. गं. देशपांडे हेही अंकात विपुल लेखन करत. ज्ञानेश्वर नाडकर्णी व रामदास भटकळ नाटक-चित्रपट या विषयांवर लिहीत. व्यंकटेश माडगूळकर यांचे ‘माणदेशी माणसं’ हे दीनानाथ दलाल यांच्या रेखाटनांसह प्रसिद्ध होणारे सदर विशेष लोकप्रिय होते व पुढे त्याचे पुस्तकही निघाले. पु. ल. देशपांडे, न. र. फाटक, मामा वरेरकर, चिं. वि. जोशी, वि. द. घाटे, द. न. गोखले, काकासाहेब कालेलकर, र. गो. सरदेसाई, र. पु. परांजपे वगैरे इतरही नामांकित लेखक मौजेत लिहीत. 

आठवड्याभरातील प्रमुख बातम्यांचे संकलन करणारे ‘धावते जग’ नावाचे एक सदरही असे. गुर्जर, माळी, हळदणकर, बेंद्रे, दलाल वगैरेंची रंगीत चित्रेही मुखपृष्ठावर असत. सर्वच ललितकलांना अंकात स्थान असे. चित्रकला-शिल्पकला यांची प्रदर्शने, नाट्यप्रयोग, संगीताचे कार्यक्रम यांची विस्तृत परीक्षणेही मौजमध्ये असत. अशा विविध ललितकलांना स्थान हे मौजचे एक वैशिष्ट्य होते. त्यातून या कलांसंबंधीची अभिरुची विकसित झाली आणि समीक्षाही काही प्रमाणात तयार झाली. पुढे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून नावारूपाला आलेले द्वा. भ. कर्णिकदेखील बऱ्याचदा लिहीत. मौज परिवारातीलच ‘प्रभात’ दैनिकाचे संपादक श्री. शं. नवरे हेही मौज साप्ताहिकात लिहीत. राजकीय विषयांवरचे लेखही अनेकदा छापले जात.

एक आश्चर्य म्हणजे मौजच्या आधुनिक स्वरूपाशी विसंगत असे सोमणशास्त्री लिहीत असलेले ‘आठवड्याचे भविष्य’ हे अगदी शेवटच्या अंकापर्यंत प्रसिद्ध होत होते. जुन्या मौजमध्ये म्हापणकर भविष्य लिहीत आणि नव्या मौजमध्ये सोमणशास्त्री भविष्य लिहीत, एवढाच काय तो फरक! आपल्या सुशिक्षित समाजाचीदेखील एकूण मानसिकता कशी होती; एकीकडे तो आधुनिक बनत होता आणि त्याचवेळी दुसरीकडे परंपरानिष्ठदेखील कसा होता यावर भाष्य करणारे हे वास्तव आहे. आजही ती परिस्थिती कायम आहे हेही इथे जाता जाता नमूद करायला हरकत नाही. 

भागवतबंधूंच्या हातात सूत्रे गेल्यानंतर साधारण दहा-पंधरा वर्षांत, केवळ करमणूक करणारे नव्हे तर एक भारदस्त साप्ताहिक अशी नव्या मौजची प्रतिमा जनमानसात स्थिरावली. पण मौजची आर्थिक बाजू लंगडीच राहिली. शेवटचा, म्हणजे ३९व्या वर्षातील १८वा अंक प्रकाशित करून, ३१ जुलै १९६० रोजी मौज साप्ताहिकाचा अवतार संपला. शेवटच्या अंकातील अग्रलेखाचे शीर्षक होते ‘आभार’. त्यात म्हटले होते :  

“मौजेचे नव्या रूपातील प्रकाशन व्यवहारदृष्ट्या नेहमी आतबट्टयाचे होते. गेल्या काही वर्षांत तर छपाईच्या वाढत्या खर्चामुळे हे नुकसान वाढतच गेले. मौज प्रकाशन गृहाच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर ते गेल्यामुळे, नाइलाज होऊन, मौजेचे प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे याचे दुःख होते.” 

साप्ताहिक मौजचा अवतार इथे संपला. त्यानंतर आजपर्यंत मौज केवळ दिवाळी अंक म्हणून प्रकाशित होत आहे. 

मौज साप्ताहिकाप्रमाणे ‘प्रभात’ हे दैनिकही पां. म. भागवत यांच्या मालकीचे होते. २१ नोव्हेंबर १९२९ रोजी प्रभातचा पहिला अंक निघाला. संपादक म्हणून पांडोबा भागवतांचे नाव छापले जात असले तरी मौजप्रमाणे इथेही प्रत्यक्ष संपादकीय कामासाठी ते इतरांचीच मदत घेत. केसरीचे संपादक न. चिं. केळकर यांचे चिरंजीव काशिनाथ नरसिंह केळकर यांनी काही काळ संपादकपदाची धुरा वाहिली. अच्युत बळवंत कोल्हटकर हेही स्वतःचे संदेश दैनिक बंद झाल्यानंतर प्रभातमध्ये नोकरी करत असत; पण त्यांच्याकडे संपादक म्हणून जबाबदारी दिलेली नव्हती. पुढे मुंबईतील ‘सार्वजनिक काका’ म्हणून  ओळखले जाणारे श्रीपाद शंकर ऊर्फ काकासाहेब नवरे यांच्यावर संपादकीय जबाबदारी १ एप्रिल १९३४पासून सोपवण्यात आली व अखेरपर्यंत नवरे यांचेच नाव संपादक म्हणून छापले जात होते. 

१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्याकाळी परदेशातून बोटीने आणल्या जाणाऱ्या कागदाचे आणि मुद्रणसाहित्याचे भाव अतोनात वाढले. त्या सुमारास काही बडे मारवाडी भांडवलदारदेखील वृत्तपत्रव्यवसायात शिरले व त्यांच्या स्पर्धेत टिकाव धरणे प्रभातसारख्या दैनिकाला अशक्य होऊन गेले. मौज साप्ताहिक त्यांनी कसेबसे चालू ठेवले पण २६ नोव्हेंबर १९५० रोजी, २१ वर्षांच्या वाटचालीनंतर, प्रभात दैनिक मात्र बंद केले गेले. शेवटच्या अंकात पहिल्या पानाचा आठ-स्तंभी मथळा होता, ‘प्रभातच्या वाचकांचा निरोप : असाच लोभ असावा ही विनंती’. ‘प्रभात’पर्व इथे संपले. मौज साप्ताहिक बंद करायच्या दहा वर्षे आधीच.   

आता ‘सत्यकथा’ मासिकाकडे वळू या.   

पुढे नाटककार म्हणून प्रसिद्धीस आलेल्या मो. ग. रांगणेकर यांनी नोव्हेंबर १९३३मध्ये ‘ट्रू स्टोरी’ या इंग्रजी मासिकाच्या धर्तीवर ‘सत्यकथा’ सुरू केले. ‘ट्रू स्टोरी’ अमेरिकेतील न्यूयॉर्क येथून १९१९ सालापासून प्रकाशित होत होते. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांचे वृत्तान्तच फक्त त्यात असत; काल्पनिक असे काहीही नसे. ‘Truth is stranger than fiction’ ही ओळ त्याच्या प्रत्येक मुखपृष्ठावर छापलेली असे. त्यात मुख्यतः स्त्रियांच्या कहाण्या असत व ते मासिक अफाट लोकप्रिय होते. पहिल्या दहा वर्षांतच, म्हणजे १९२९ सालीच, त्याचा खप वीस लाख झाला होता! रांगणेकर यांच्या मनात तसेच प्रत्यक्ष घटनांवर आधारित, पण स्त्रियाच केंद्रस्थानी असतील अशी अट नसलेले, मासिक होते. त्यासाठी भांडवल पुरवायचे आश्वासन त्यांना द. शं. कुलकर्णी या स्नेह्यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात अपेक्षित ते भांडवल मिळाले नाही आणि दोन-तीन अंकांनंतर कंटाळून रांगणेकर यांनी सत्यकथेशी असलेला संबंध तोडला. 

नंतर काही काळ सत्यकथा अनियमित स्वरूपात निघत राहिले. त्यावेळी अंकाची पृष्ठसंख्या ४० व वार्षिक वर्गणी तीन रुपये होती. पुढे त्याचीही मालकी भागवतबंधूंकडे गेली. सप्टेंबर १९३६मध्ये दत्तात्रय पुरुषोत्तम भागवत संपादक बनले. ते समकालीन घटनांवर लिहीत. भटकळ फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या ‘मराठी वाङ्ग्मयकोश’मधील नोंदीनुसार (पहिली आवृत्ती, पृष्ठ ७०२) “त्यांच्या कारकिर्दीत राजकीय, सामाजिक घडामोडींचा आढावा, युद्धाच्या ताज्या बातम्या यांना आवर्जून जागा दिली गेली. १९३८ ते १९४२ या काळात अनंत अंतरकरांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले.” भागवत कुटुंबीयांप्रमाणे तेही गोरेगावकर चाळीतच राहात. त्यांना उत्तम साहित्यिक दृष्टी होती. सत्यकथा, मार्च १९४२ अंकात ‘लिरा’ या शीर्षकाखाली जी. ए. कुलकर्णी यांची एक तीन पानी कथा प्रसिद्ध झाली आहे. पुढे स्वतःची मासिके सुरू करण्याच्या जिद्दीने अंतरकर सत्यकथा सोडून गेले आणि त्यानंतर वर्षभरातच द. पु. भागवत यांचेही निधन झाले. त्यानंतर विष्णुपंत आणि श्रीपु भागवत यांनी सगळी जबाबदारी घेतली.  त्या काळातले अंक वाचताना सत्यकथेचे सुरुवातीचे स्वरूप किती वेगळे होते याची कल्पना येते.  

  ‘परख’ या सोहराब मोदी यांच्या चित्रपटाची पूर्ण पान जाहिरात सप्टेंबर १९४४ अंकात आहे. ही बहुधा गद्रे यांच्यामार्फत आली असावी कारण मोदींच्या सर्व जाहिराती गद्रेच करत. “दर बुधवारी प्रसिद्ध होणारे मुंबईतील सर्वांत जुने राष्ट्रीय बाण्याचे साप्ताहिक – किंमत दोन आणे” अशी मौज साप्ताहिकाची जाहिरात सत्यकथेच्या त्याच अंकात आहे. रामतीर्थ ब्राह्मी तेल, बेडेकर मसाले, धूतपापेश्वर, डोंगरे बालामृत, बॉम्बे प्रोसेस स्टुडिओ, किर्लोस्कर मोटर्स यांच्याही जाहिराती वरचेवर आढळतात. 

सत्यकथा, ऑक्टोबर १९४४, अंकातील साहित्य संमेलने व्यर्थ आहेत असे सांगणाऱ्या संपादकीयाचे शीर्षक आहे : “ही संमेलने बंद करा”. साहित्यसंमेलनांवर आजही होणारी टीका ही किती पूर्वीपासून सुरू आहे याची त्यावरून कल्पना यावी! त्या अंकाच्या मुखपृष्ठावर महात्मा गांधींचे चित्र असून यातील मुख्य लेखही गांधींवरचा आहे. म्हणजेच राजकीय विषय त्या काळात सत्यकथेला वर्ज्य नव्हते. 

सत्यकथा, एप्रिल १९४५ अंकातील संपादकीयाचे शीर्षक आहे : “वृत्तपत्रे धंदा म्हणूनच चालवली गेली पाहिजेत”. हे सत्यकथेचे संपादकीय आहे!  

जून १९४६ सालच्या सत्यकथा अंकात तीन अगदी वेगवेगळ्या विचारांची मांडणी करणारे लेख आहेत – ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’ (लेखक न. र. फाटक), ‘जोसेफ मॅझिनी’ (लेखक वि. दा. सावरकर) आणि ‘विनोबा’ (लेखक भा. श्री. परांजपे).      

पुढच्या दहा वर्षांत मात्र तरुण श्रीपुंनी मुख्यतः वाङमयीन रूप सत्यकथेला प्राप्त करून दिले. अर्थात इतर अनेक विषयांवरील लेखही सत्यकथेत प्रकाशित होतच असत.   

मराठी मासिकांसाठी १९४५नंतरचा वीसएक वर्षांचा तो काळ म्हणजे जणू वसंत ऋतु होता. टीव्ही नसलेला, बहुसंख्य विद्यार्थी मराठी माध्यमात शिकत असलेला तो काळ होता. समाजव्यवहारात साहित्याला मानाचे स्थान होते. खूप लेखक नव्या उमेदीने लिहीत होते; आपल्या लेखनातून साहित्यात नवे नवे प्रवाह प्रवर्तित करत होते. बा. सी. मर्ढेकरांचे नवकाव्य याच काळातले आणि गाडगीळ, गोखले, भावे, माडगूळकर यांची नवकथाही याच काळातली. अभिरुची, रत्नाकर, प्रतिभा, निर्भीड, ज्योत्स्ना, झंकार, हंस, वसंत, मनोरंजन, विविध ज्ञान विस्तार, किर्लोस्कर, स्त्री, काव्यरत्नावली, यशवंत वगैरे अनेक मासिके त्यावेळी ऐन भरात होती. 

व्यवसायाची धुरा पुढची तब्बल ३२ वर्षे विष्णुपंतांनी वाहिली. दुर्दैवाने २३ डिसेंबर १९७५ रोजी वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या त्यांचे निधन झाले. मौजेवर झालेला तो मोठाच आघात होता. विष्णुपंतांच्या पश्चात व्यवसायाची अंतिम जबाबदारी श्रीपुंवर आली. सत्यकथेच्या कुठल्याच अंकावर श्रीपुंचे नाव संपादक म्हणून छापलेले नाही; पण प्रत्यक्षात १९४५ ते १९६० या काळात तेच अलिखित संपादक होते. एकेकाळी रुइया कॉलेजात श्रीपुंचे विद्यार्थी असलेले राम पटवर्धन केवळ वाङमयाच्या प्रेमापोटी आणि श्रीपुंच्या आग्रहामुळे १९४९मध्ये सरकारी नोकरी सोडून मौजेत काम करू लागले. 

पुढे १९६०पासून ते सत्यकथा बंद होईपर्यंत सत्यकथेच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली गेली. त्यांचे नाव १९६८पासून कार्यकारी संपादक म्हणून छापले जाऊ लागले. ‘अभिन्नजीव सहकारी’ असा श्रीपुंनी त्यांचा एकदा उल्लेख केला होता. अर्थात याचा अर्थ प्रत्येक बाबतीत दोघांची मते जुळणारी होती असे नाही. पटवर्धन यांचे समकालीन घडामोडींची धावती नोंद घेणारे आणि कधी कधी अंकाची तब्बल पाच-सहा-सात पाने व्यापणारे ‘परिक्रमा’ सदर अंकात येऊ लागले तेव्हा श्रीपुंना ते पसंत नव्हते. तरीही ते सदर चालू राहिले.  

 राम पटवर्धन

 

    सत्तरच्या दशकात सत्यकथेपुढच्या आर्थिक अडचणी वाढतच गेल्या. ‘माणूस’च्या १९८३ सालच्या दिवाळी अंकात मंगेश पाडगावकर यांनी घेतलेली श्रीपुंची एक दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे व त्यात श्रीपुंनी म्हटले आहे, “१९७५ साली मौज प्रकाशनाचा रौप्यमहोत्सव झाला, तेव्हा एकूण आढावा घेताना ‘सत्यकथे’त येणाऱ्या तोट्याची विष्णुपंतांना पूर्ण कल्पना आली होती आणि ‘सत्यकथा’ आणखी तीन वर्षं चालवून बघावी असं आमचं ठरलं होतं.” १९७५ साली विष्णुपंतांचे अचानक निधन झाल्यावर श्रीपुंनी आपला निर्णय पक्का केला. सत्यकथेच्या डिसेंबर १९७९ अंकात मासिक बंद करण्याचा आपला मानस संपादकांनी जाहीर केला होता. “आम्ही खरोखरच पार थकलो,” अशी कबुलीही त्यात दिली होती. काही हिशेबाचे आकडेही दिले होते. 

‘सत्यकथे’चा प्रत्येक अंक सुमारे पावणेचार हजार रुपये नुकसान सोसून काढला जातो, असेही त्यात लिहिले होते. त्यानंतर काही जणांनी थोडेफार आर्थिक सहकार्य केले, धीर दिला व तो निरोपाचा क्षण दोन-तीन वर्षे लांबला. फेब्रुवारी १९८१ अंकातील मालकी हक्काबद्दलच्या निवेदनाखाली मौज प्रकाशनाचे भागीदार म्हणून ज. पु. भागवत, श्री. पु. भागवत, प्र. पु. भागवत, रा. वा. भागवत, उषा वि. भागवत, श्री. वि. भागवत आणि मंगला प. देसाईअशा सात जणांची नावे आहेत. (यांतील उषा म्हणजे दिवंगत वि. पु. भागवत यांच्या पत्नी आणि मंगला म्हणजे श्रीपुंच्या भगिनी.)  

सत्यकथेच्या १९८१ सालच्या दिवाळी अंकातील संपादकीयाचे शीर्षक आहे, “नव्या वर्षाचे सुतोवाच”. अंकात गरवारे नायलॉन्स, मफतलाल, स्वस्तिक, एअर इंडिया वगैरेंच्या जाहिराती आहेत. प्रकाशन संस्थांसाठी असलेले जाहिरातीचे सवलतीचे दरही छापलेले आहेत. “एक अंकाची किंमत पाच रुपये, एका वर्षाची वर्गणी चाळीस रुपये आणि दोन वर्षांची वर्गणी पंच्याहत्तर रुपये” अशीही अंकात नोंद आहे. दोन वर्षांची वर्गणी त्यावेळी सत्यकथा घेत होते याचा सरळ अर्थ अंक चालू ठेवायचा त्यांचा त्यावेळी तरी इरादा होता. पण पुढच्या आठ महिन्यांत तो पालटला. ऑगस्ट १९८२मध्ये, सुवर्णमहोत्सव हातातोंडाशी आला असताना, सत्यकथा बंद केले गेले. त्या अंकातील निरोपाच्या निवेदनात म्हटले होते, 

“डिसेंबर १९७९च्या अंकात ‘सत्यकथे’च्या बिकट आर्थिक परिस्थितीबद्दल निवेदन केले होते. वस्तुतः त्याच वेळी ‘सत्यकथा’ बंद पडायची. परंतु तिच्या वाङमयीन व सांस्कृतिक कार्याविषयी जिव्हाळा व महत्त्व वाटणाऱ्या काही स्नेह्यांनी केलेल्या निरपेक्ष मदतीने तिला त्या वेळी जीवदान मिळाले. तथापि ही मदत सातत्याने व पुरेशी घ्यायला, किंवा ‘सत्यकथे’च्या आर्थिक अडचणींवर कायमचा उपाय शोधून तो अमलात आणायला, अनेक कारणांमुळे आम्ही असमर्थ ठरलो… तेव्हा आज ना उद्या अपरिहार्य असलेला अंत स्वीकारण्यावाचून इलाज उरला नाही. अखंड जोगवा मागून कोणाला जन्मभर जगता येत नाही किंवा मरणोन्मुखाला सतत रक्तदान करून किंवा कृत्रिम रीतीने प्राणवायू देऊन कायमचे जगवता येत नाही. शिवाय ज्यासाठी जगायचे ते पुरेसे व मनासारखे साधत नसेल तर जगणे एवढेच प्रयोजन मानून जीव जगवत राहण्यात स्वारस्यही नसते.”

सत्यकथा अजून किती काळ तग धरणार याविषयीच्या चर्चेला इथे पूर्णविराम मिळाला.  

मौज-सत्यकथा बंद झाले इथपर्यंतच्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेतला; पण या साऱ्याची कारणमीमांसा करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. नियतकालिके बंद करण्यामागे आर्थिक अडचण हे कारण नमूद केले गेले आहे; पण त्यामागे इतरही काही कारणे होती का? काही मुद्दे या ग्रंथाच्या संपादकांनी प्रस्तुत लेखकाला पाठवलेल्या आपल्या अपेक्षापत्रात पुढीलप्रमाणे उपस्थित केले आहेत – 

“याच काळात ‘सत्यकथा’ मासिकावर काही गंभीर आरोप केले जात होते. या मासिकाला सामाजिक बांधिलकी नाही; हे उच्चभ्रूंचे त्यांच्याचसाठी चालवले जाणारे मासिक आहे. त्याच्या लेखकवर्गाचे विशिष्ट वर्तुळ असून त्यात या वर्तुळाबाहेरील लेखकांच्या लेखनाला स्थान नाही. रूपवादी स्वरूपाचेच लेखन ते छापतात; हे लेखन सामाजिक वास्तवापासून पूर्णतः तुटलेले आहे. या काळात नव्याने उदयाला आलेल्या अनियतकालिकांच्या चळवळीतील लेखकांचे सामान्यपणे हे आक्षेप होते. या लेखकसमूहाने सत्यकथा मासिकाची जाहीर होळीही केली. या आक्रमकस्वरूपी चळवळीचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम सत्यकथेसंबंधीच्या निर्णयावर झाला काय?” 

अर्थात उपरोक्त मुद्दे हे या विशिष्ट ग्रंथाच्या संपादकांचे नसून सामान्यतः मौज-सत्यकथेवर केल्या जाणाऱ्या आरोपांची ही नोंद आहे हे उघड आहे. 

हे आरोप प्रस्तुत लेखकाला बव्हंशी मान्य नाहीत. त्याची कारणे पुढीलप्रमाणे —   

जे मासिक जवळपास पन्नास वर्षे चालू राहिले त्याला ‘सामाजिक बांधिलकी’ नव्हती असे म्हणताच येणार नाही. समाजाशी पुरेसे जोडलेले नसते तर ते इतके टिकूच कसे शकले असते? 

अस्तित्वासाठी अत्यावश्यक तेवढातरी लोकाश्रय त्याला कसा मिळू शकला असता? आरोप करणाऱ्यांच्या मते कुठल्या इतर मासिकांना तशी ‘सामाजिक बांधिलकी’ होती? आणि ती मासिके स्वतःतरी किती वर्षे चालली? शिवाय ‘सामाजिक बांधिलकी’ फक्त बोलण्यात असावी की प्रत्यक्ष जगण्यातही ती दिसावी? श्रीपुंनी अनेकांना आर्थिक मदत केली होती, काही लेखकांना त्यांची परिस्थिती बिकट असताना स्वतःच्या घरात अनेक वर्षे मुक्कामाला ठेवून घेतले होते. 

मध्यंतरी एकदा अनंत हरी गद्रे यांच्या चरित्रलेखनासाठी काही माहिती गोळा करायला मी देवरुखला गेलो होतो. त्यावेळी तेथील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन ही संस्था बघायला मिळाली. देवरुखसारख्या एखाद्या छोट्या गावी असे आर्ट कॉलेज असावे याचे खूप आश्चर्य वाटले होते आणि या कॉलेजसाठी आवश्यक ती दीड एकर जमीन भागवत कुटुंबीयांनी कुठलीही अट न घालता, स्वतःचे नावही कुठे येऊ न देता, देणगी म्हणून दिली आहे ही ऐकून अधिकच आश्चर्य वाटले होते. साहित्यवर्तुळात किती जणांना ही गोष्ट ठाऊक असेल? तेव्हा ‘सामाजिक बांधिलकी’चा अभाव हा आरोप चुकीचा वाटतो.  

उपरोक्त आरोपांतील ‘उच्चभ्रू’ शब्द तर फारच गोंधळात टाकणारा आहे. ‘उच्चभ्रू’ हा शब्द ‘हाय ब्राऊ’ या इंग्रजी शब्दाचे मराठीकरण आहे आणि मूळ इंग्रजी अर्थाप्रमाणेच मराठीतही ‘उच्च आर्थिक स्तर आणि नागर शिष्टपणा’ त्यात अनुस्यूत आहे. सत्यकथेचे चालक, तसेच त्यात लिहिणारे बहुसंख्य लेखक, माझ्या अल्प माहितीनुसार त्या काळाततरी चाळीतच राहणारे होते! कदाचित ‘उच्चभ्रू’ शब्दात काही जणांना ‘ब्राह्मण’ शब्द अभिप्रेत असेल. त्याही संदर्भात हा आरोप चुकीचा ठरतो. कारण सत्यकथेचे आणि मौजचे अनेक लेखक ब्राहमणेतर होते. मर्ढेकरांच्या कविता कधीच ‘उच्चभ्रू’ नव्हत्या. व्यक्ती आणि वल्ली किंवा आहे मनोहर तरी यांत काय उच्चभ्रू आहे? 

माधव कोंडविलकर किंवा चिं. त्र्यं. खानोलकर यांना कुठल्या अर्थाने उच्चभ्रू म्हणणार? श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही ‘मौज’ने छापलेली पहिली कादंबरी. ती पूर्णतः ग्रामीण भागातीलच आहे; शहरी नव्हे. व्यंकटेश माडगूळकरांचे गावाकडच्या गोष्टी किंवा बनगरवाडी हे उच्चभ्रूंचे साहित्य कसे काय म्हणायचे? आणि माडगूळकरांप्रमाणे शंकरराव खरातांच्याही कथा सत्यकथेत येतच होत्या. त्यामुळे ‘उच्चभ्रूंचे मासिक’ वगैरे टीका प्रस्तुत लेखकाला तरी पटणारी नाही. सत्यकथेला फारतर ‘चोखंदळ वाचकांचे’ किंवा ‘सुसंस्कारित अभिरुची असलेल्या वाचकांचे’ मासिक म्हणता येईल; आणि तो दोष नसून मोठा गुणच मानायला हवा.

वस्तुस्थितीचा आणखी एक भाग इथे नमूद करायला हरकत नाही. आपली नियतकालिके सामान्य वाचकांनाही परवडावी अशी भागवतबंधूंची अगदी पूर्वीपासून भूमिका होती. प्रभात दैनिकाची किंमत त्यांनी त्या काळाच्या संदर्भातही अगदी कमी, म्हणजे फक्त एक पैसा एवढी ठेवली होती. त्यामुळे मुंबईच्या परळ-लालबाग भागात प्रभातचा चांगला जम बसला होता. ‘कामगारांचे वृत्तपत्र’ म्हणूनच प्रभात दैनिक ओळखले जाई; ‘उच्चभ्रू वाचकांचे वृत्तपत्र’ म्हणून नव्हे!
आता ‘विशिष्ट वर्तुळा’बद्दल. साधारण १९४५नंतरच्या त्या काळात मराठी साहित्याचे मुख्य केंद्र मुंबई हे होते, पुढे ती जागा पुण्याने घेतली; पण अगदी आजही साहित्यव्यवहार खऱ्या अर्थाने राज्यव्यापी झालेलाच नाही. बहुतेक जिल्ह्यांमध्ये शालेय पुस्तके सोडली तर अन्य पुस्तकांची दुकाने नाहीत, खपही नाही. जिथे बहुसंख्य प्रकाशक, लेखक, छापखाने, पुस्तकांची दुकाने असतात तिथेच साहित्यव्यवहार केंद्रित होणार. कुठलेही नियतकालिक घ्या; ज्याचे-त्याचे काही ‘अधिक पसंतीचे’ लेखक असतात आणि त्यांचीच नावे त्यात अधिक आढळतात. व्हीनस, कॉन्टिनेन्टल, पॉप्युलर, मॅजेस्टिक या सगळ्यांचेच स्वतःचे असे लेखक होतेच की.
असे घडणे अगदी स्वाभाविकच आहे. कारण कुठलाही संपादक सगळ्याच लेखकांच्या संपर्कात कसा येईल? पण याचा अर्थ संपर्कात नसलेल्या लेखकांचे साहित्य मुद्दाम वगळले जाते असा अजिबात नाही. एन्कीच्या राज्यात ही किरण नगरकर यांची पहिली कादंबरी मौजनेच काढली. श्याम मनोहर, विलास सारंग, दिलीप चित्रे यांचे पहिले कथासंग्रहही मौजनेच प्रकाशित केले आहेत. शंकर पाटील किंवा आनंद यादव हे ग्रामीण लेखक मानले जातात, पण त्यांनी सत्यकथेत भरपूर लिहिले आहे. समाजवादी आचार्य भागवत आणि साम्यवादी दि. के. बेडेकर दोघेही सत्यकथेत लिहीत. शहरी, ग्रामीण, नवोदित, प्रस्थापित, अल्पशिक्षित, उच्चशिक्षित, परंपरावादी, पुरोगामी अशा सगळ्याच प्रकारच्या लेखकांचे साहित्य सत्यकथेत येत होते.

त्याचप्रमाणे ‘संपर्कातील लेखकांचे’ सगळे साहित्य स्वीकारले जाते असेही मुळीच नाही. उदाहरणार्थ, मर्ढेकरांविषयी श्रीपुंना अतिशय आदर होता. आणखी काही कविता, सौंदर्य आणि साहित्य ही त्यांची पुस्तके त्यापूर्वी मौजने काढली होती आणि नंतर त्यांची सगळीच पुस्तके मौजने काढली. साहित्याची भूमी या २५५-पानी संकलनातील तब्बल ५७ पाने श्रीपुंनी मर्ढेकरांविषयी लिहिलेल्या तीन लेखांनी व्यापलेली आहेत! एवढे विस्तृत लेखन श्रीपुंनी अन्य कोणाही व्यक्तीबद्दल केलेले नाही. पण असे असूनही मर्ढेकरांची पाणी कादंबरी मात्र श्रीपुंनी नाकारली होती. पुढे ती युगवाणी प्रकाशनातर्फे निघाली. हेच मंगेश पाडगावकर यांच्याविषयी म्हणता येईल. पाडगावकरांच्या जवळ जवळ प्रत्येक कवितेचे पहिले वाचक (किंवा श्रोते) श्रीपु असायचे. दोघेही नंतरची अनेक वर्षे शीव येथेच राहत आणि एकमेकांचे मित्रही होते. पण तरीही १९५० ते १९७८ या प्रदीर्घ काळात पाडगावकरांचे एकही पुस्तक मौजने प्रकाशित केलेले नव्हते. तेव्हा ‘विशिष्ट वर्तुळ’ वगैरे आरोपांतही फारसे तथ्य दिसत नाही.   

‘सत्यकथेच्या अंकाची जाहीर होळी आणि तशा घटनांचा सत्यकथेबाबतच्या निर्णयावरील प्रभाव’ याचा उल्लेख उपरनिर्दिष्ट आरोपांत केला गेला आहे. या प्रकाराची थोडी अधिक माहिती घेतली तर प्रश्न पडतो की या घटनेचा जितका गवगवा सतत केला गेला, तितकी ती महत्त्वाची होती का? ती प्रतीकात्मक मानली, तरी काही मूठभर असंतुष्ट लेखक सोडले तर एखाद्या मोठ्या लेखकवर्गाचे ती प्रतिनिधित्व करत होती का? जयवंत दळवी यांनी या संदर्भात लिहिले आहे (श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक, पृष्ठ ५१-२) : “श्रीपुंच्या संपादनाची थोरवी अशी की, श्रीपुंची चेष्टा करणारे, इतकेच नव्हे तर टीका आणि विरोध करणारेसुद्धा आपले साहित्य ‘सत्यकथे’त यावे म्हणून प्रयत्नशील असत. आपली कथा, कविता ‘सत्यकथे’त येत नाही म्हणून नवीन लेखकांची एक फळीच्या फळी संतप्त असे. अशा संतप्त लेखकांचे अध्वर्यू, राजा ढाले, यांनी १९६९च्या प्रारंभी ‘येरू’ नावाच्या एका अनियतकालिकाचा अंक काढला. तो संपूर्ण पंचेचाळीस पानी अंक सत्यकथेबद्दलच होता. ‘येरू’च्या शेवटल्या पानावर पुढीलप्रमाणे एक ‘जाहीर बोलावणे’ छापले होते : 

‘आमचे येथे आमचे कृपेकरून मराठीतील उच्चभ्रू मासिकांची होळी करण्याचे घाटत आहे. या निमित्ताने ‘सत्यकथे’च्या एका अंकाची होळी केली जाईल. या प्रसंगी सुप्रसिद्ध तापसी तरुण हजर राहातील…’ असे छापून पुढे या तापसी लेखकांची यादी दिली होती. त्याप्रमाणे बोंबा वगैरे मारून त्यांनी ‘सत्यकथे’ची होळी केली. पण त्या घटनेचा ‘सत्यकथे’वर काय परिणाम? मी ठणठणपाळ सदरात चेष्टेने लिहिले होते : 

‘श्रीपु ‘सत्यकथे’ची स्पेशल जळिताची आवृत्ती घेऊन खटाववाडीत निदर्शकांची वाट बघत उभे होते. निदर्शकांची ऐन वेळी अडचण व्हायला नको म्हणून आगपेटीही त्यांनी बरोबर आणली होती. तसेच ‘सत्यकथा’ तिच्या शांत प्रकृतीमुळे ऐनवेळी पेट घेईल, न घेईल या भीतीने श्रीपुंनी बाटलीभर घासलेट तेलही आणले होते!..’ जळिताच्या घटनेचा ‘सत्यकथे’वरील परिणाम याच स्वरूपाचा होता. आज या तापसी तरुणांपैकी एक-दोघे वगळता कोणीही साहित्यनिर्मितीशी संबंधित राहिलेला नाही! श्रीपुंच्या संपादनाचे मोठेपण मात्र ‘सत्यकथा’ बंद झाल्यावरही टिकून राहिले आहे.” 

या विशिष्ट मुद्द्यावर अजून काय भाष्य करणार!         

प्रस्तुत ग्रंथाच्या संपादकद्वयांनी लिहिलेल्या पत्रातला आणखी एक मुद्दा पुढीलप्रमाणे आहे : 

“१९७०नंतर लेखकांची नवी पिढी उदयाला येत होती. त्यांच्या वाङमयीन भूमिका आणि निर्मितीमागील उद्दिष्टे सत्यकथेच्या वाङमयीन भूमिकेहून आणि वाङमयीन निर्मिती-उद्दिष्टांहून भिन्न होती. किंबहुना या दोन भूमिका परस्परविरोधी होत्या.” 

एकूणच ‘सत्यकथेची वाङमयीन भूमिका’ हा शब्दप्रयोग इथे काहीसा संदिग्ध वाटतो. हा मुद्दा जरा विस्ताराने विचारात घ्यायला हवा. स्वतः श्रीपुंनी या संदर्भात काही लिहिले आहे का? 

श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक हे श्रीपुंविषयी त्यांच्या काही सुहृदांनी केलेल्या लेखनाचे संकलन आणि साहित्याची भूमी हे श्रीपुंनी केलेल्या एकूण २३ भाषणांचे-लेखांचे संकलन अशी दोन पुस्तके अभ्यासकांसाठी आज उपलब्ध आहेत. त्यांचे प्रकाशन १९९४ साली ग्रंथालीने केले आहे. आश्चर्य म्हणजे उपरोक्त दोन्ही संकलनांतील बहुतेक मजकूर हा सत्यकथा बंद झाल्यानंतरच्या काळातला आहे; सत्यकथा चालू असतानाच्या काळातील श्रीपुंचे विचार त्यांच्या स्वतःच्या शब्दांत फारसे कधी प्रकाशित झालेलेच नाहीत. खरे तर श्रीपुंनी स्वतः फारच कमी लेखन केले आहे. त्यामुळे त्यांची सैद्धांतिक मांडणी अशी कुठेच आढळत नाही.
उपरोक्त दोन्ही पुस्तकांत ‘माझी वाङमयीन भूमिका ही अशी अशी आहे’ असे श्रीपुंनी स्वतः कुठेच म्हटलेले नाही. वेगवेगळ्या समीक्षकांनी ‘सत्यकथेची वाङमयीन भूमिका’ आपापल्या अंदाजाने व्यक्त केली आहे, पण प्रत्यक्ष सत्यकथेत ती कधीच प्रकाशित झालेली नाही. १९४५ ते १९५२ या काळात संपादकीय स्फुटे सत्यकथेत लिहिली गेली; पण त्यातही मुख्यतः त्या विशिष्ट अंकातील साहित्याबद्दल सर्वसाधारण जुजबी स्वरूपाची माहिती असे; संपादकीय भूमिकेबद्दल काहीही नसे. त्यानंतर ती स्फुटेही थांबली; अंकाविषयी माहिती देणारी संपादकीये फक्त दिवाळी अंकापुरती राहिली.
“वाङमय म्हणजे शर्करावगुंठित तत्त्वज्ञान नव्हे, वाङमय ही एक अनुभवाची वैशिष्ट्यपूर्ण आकृती असते”, असे एक विधान गंगाधर गाडगीळ यांनी ‘नवकाव्याची सफलता’ या आपल्या १९५० सालच्या लेखात केले होते. आकृतीवादी किंवा रूपवादी साहित्य हा तेव्हाच चर्चेचा विषय बनला. रूपवादी किंवा कलावादी मासिक अशी त्या चर्चेतून सत्यकथेची ओळख बनली. पण ते तितकेसे बरोबर नव्हते असे माझेतरी मत आहे, कारण वाङमयाची अशी भूमिकानिष्ठ व्याख्या करणे शक्य दिसत नाही.
रामायण किंवा महाभारत साहित्याच्या अशा व्याख्येत कुठे बसते? शेक्सपीयर आणि कालिदास कुठे बसतात? खुद्द गाडगीळ यांनी नंतरच्या आपल्या लेखनात वरील विधानाला छेद देणारी आणि कुठल्याही व्याख्येच्या साच्यात साहित्य बसू शकत नाही अशीच भूमिका ठामपणे मांडलेली आहे. कडू आणि गोड किंवा बिनचेहऱ्याची संध्याकाळ तुम्ही कुठल्या साच्यात बसवणार? प्रतिभेचा स्वयंस्फूर्त आविष्कार तुम्ही एखाद्या भूमिकेच्या चौकटीत कसा बसवू शकाल?

शिवाय सत्यकथेच्या संदर्भात विचार केला (आणि तो करताना ऐकीव माहितीवर विसंबून न राहता सत्यकथेचे जुने अंक स्वतः चाळून पाहण्याचे कष्ट घेतले) तर लक्षात येते, की सर्वच प्रकारचे साहित्य सत्यकथेत प्रसिद्ध होत असे. ‘चांगल्या वाचकवर्गात आपले साहित्य वाचले जावे’ अशी आस प्रत्येक लेखकाला असते आणि सत्यकथेला तसा वाचकवर्ग लाभला होता. त्यामुळे सगळ्याच विचारधारांचे लेखक आपले सर्वोत्तम साहित्य सत्यकथेकडे पाठवत असत. वि. द. घाटे, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, रा. भि. जोशी, गौरी देशपांडे, पु. शि. रेगे, गीता साने, गोदावरी परुळेकर, मं. वि. राजाध्यक्ष, ग. रा. कामत, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, शरच्चंद्र मुक्तिबोध, प्रभाकर पाध्ये, नरहर कुरुंदकर, कुसुमावती देशपांडे, विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, श्री. ना. पेंडसे, स. ह. देशपांडे, गो. नी. दांडेकर, वसंत पळशीकर, दि. के. बेडेकर या साऱ्यांचेच साहित्य सत्यकथेत येत होते. त्यांत मार्क्सवादी होते, समाजवादी होते, कलावादी होते, जीवनवादी होते, सौंदर्यवादी होते, आकृतिवादी होते.
वि. स. खांडेकरांसारखे ज्येष्ठ होते आणि अनिल अवचटांसारखे त्यावेळचे नवोदितही होते. गंगाधर गाडगीळांसारखे शहरी होते आणि र. वा. दिघेंसारखे ग्रामीणही होते. एखादे लेखन संपादकांना चांगले वाटले तर ते प्रकाशित होत होते आणि एखादे लेखन संपादकांना चांगले वाटले नाही तर ते प्रकाशित होत नव्हते. हा निर्णय मुख्यतः व्यक्तिगत आवडीनिवडीवर किंवा अभिरुचीवर अवलंबून असतो. काही समीक्षकांचे निकष वेगळे असू शकतील, पण सर्वसामान्य वाचकासाठीही ‘भूमिका’ नव्हे तर ‘आवड’ हाच निकष असतो; एखादे लेखन त्याला आवडते किंवा आवडत नाही, एवढेच.
इथे हेही नमूद करायला हवे की सत्यकथेकडे येणाऱ्या साहित्यातील ज्या उणिवा किंवा त्रुटी संपादकांना जाणवत, त्या ते लेखकाला कळवत, त्यावर चर्चा करत आणि त्या दूर झाल्यावर मग ते लेखन प्रसिद्ध होई. याचा एक इष्ट परिणाम असा झाला, की कच्चे किंवा नव्याने लिहू लागणारे लेखक अधिक चांगले लिहू लागले. शरच्चंद्र चिरमुले, सखा कलाल, श्री. दा. पानवलकर वगैरे कथाकारांच्या जडणघडणीत सत्यकथेचा वाटा मोठा आहे. अर्थात याचा एक दुष्परिणाम म्हणजे सत्यकथेतील साहित्यात शेवटी शेवटी साचेबद्धता येऊ लागली.
पण मग सत्यकथा बंद का झाले? याचा शोध व्यावसायिक, सामाजिक तसेच व्यक्तिगत पातळीवरही घ्यायला हवा. त्यादृष्टीने पुढील कारणे जाणवतात :

श्रीपुंनी (किंवा मौजने) विपणनाकडे (मार्केटिंगकडे) पुरेसे लक्ष दिले नाही हे एक महत्त्वाचे कारण वाटते. आपण प्रकाशित केलेले साहित्य उत्तमच आहे, वाचकाने स्वतः होऊनच ते विकत घ्यावे अशी भावना त्यामागे असावी. यातील पहिला आत्मविश्वासाचा भाग समजण्यासारखा आहे, पण उत्तरार्ध मात्र व्यावसायिकदृष्ट्या अगदी चुकीचा होता. सत्यकथेची थट्टा करताना ठणठणपाळने अनेकदा काही गोष्टी गमतीने लिहिल्या. उदाहरणार्थ, खटाववाडीत सुतकी वातावरण होते, कारण कुठल्यातरी रेल्वे स्टेशनवर सत्यकथेची प्रत विक्रीसाठी ठेवलेली दिसली असे कोणीतरी सांगितले व आपला दर्जा इतका खालावला आहे का, याची काळजी खटाववाडीतल्या चालकांना वाटू लागली! सत्यकथेच्या दोनऐवजी चार प्रती एखाद्या विक्रेत्याकडे खपल्या अशी बातमी आली असताना ‘आपण खपाऊ बनलो आहोत की काय’ या भीतीने असेच सुतकी वातावरण तिथे पसरले होते! (खरे तर सत्यकथेची व श्रीपुंची अशी खपविन्मुख प्रतिमा तयार होण्यात आणि एकूणच सत्यकथा आणि श्रीपुंबद्दलच्या बऱ्याच दंतकथा मराठी साहित्यविश्वात रूढ होण्यात ठणठणपाळचा बराच मोठा हिस्सा आहे!)
प्रत्यक्षात श्रीपु विक्रीबद्दल इतके बेफिकीर होते असे मला वाटत नाही; पण त्याचबरोबर खप वाढावा म्हणून त्यांनी फारसे प्रयत्न केले असेही दिसत नाही. कोल्हापूरच्या गुलमोहोर बुक डेपोचे अरुण गाडगीळ सोडले तर मौजचा प्रसार करणारे दुसरे कोणी विक्रेते माझ्यातरी माहितीत नव्हते. गावोगावी आपले विक्रेते नेमणे, ग्रंथप्रदर्शनांत आपले अंक किंवा पुस्तके उपलब्ध आहेत की नाही याकडे लक्ष देणे, जाहिराती मिळवण्यासाठी शब्द टाकत राहणे, सरकारी योजनांमध्ये किंवा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत आपली अधिकाधिक पुस्तके समाविष्ट होतील यासाठी प्रयत्न करणे वगैरे प्रकार मौजने कधीच केले नाहीत. ते करायला हवे होते असे मागे वळून पाहताना आज वाटते.
पुस्तक छापून तयार करणे हा प्रकाशनाचा एक भाग झाला; पण कुठल्याही लेखकाचा जीव आपल्या पुस्तकात कमालीचा गुंतलेला असतो. आपल्या पुस्तकावर जास्तीत जास्त परीक्षणे छापून यावीत, त्याची जाहिरात व्हावी, त्याची सतत चर्चा व्हावी, ते योग्य लोकांपर्यंत पोचावे, ते विकले गेल्यावर त्याच्या वेळच्या वेळी पुढच्या आवृत्त्याही निघाव्यात,त्यापासून आपल्याला चांगले मानधन मिळावे, प्रसिद्धी मिळावी असे लेखकाला साहजिकच वाटत असते. त्याबाबत सत्यकथा उदासीन राहिले.
श्रीपुंना उत्तराधिकारी नसणे हेही एक कारण म्हणावे लागेल. श्रीपुंच्या पत्नी विमलाताई डी.एड. कॉलेजात अध्यापक म्हणून आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून नोकरी करत होत्या. मौजमध्ये त्यांचा सहभाग नव्हता. एकुलते एक चिरंजीव अशोक सायन्सचे विद्यार्थी होते; पुढे उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले, तिथेच कायमचे स्थायिक झाले. त्यांचाही सहभाग मौजमध्ये असणे शक्य नव्हते. सीए असलेले संजय भागवत (विष्णुपंतांचे चिरंजीव) यांचे नाव प्रकाशक म्हणून १९९७पासून पुस्तकांवर आणि मौज दिवाळी अंकात छापले जाऊ लागले; पण सत्यकथा त्याच्या बऱ्याच पूर्वी बंद झाली होती.
पूर्वी उल्लेख केलेल्या १९८३ सालच्या मुलाखतीत पाडगावकरांनी विचारले होते, “तुमच्यासारखी साहित्याची उत्कट आवड आणि समज असलेला सध्या भागवत कुटुंबात कोण आहे? आजचा दर्जा सांभाळून ही प्रकाशन संस्था पुढंही चालावी अशी कोणती व्यवस्था तुमच्या डोळ्यांसमोर आहे? त्यासाठी नव्या पिढीतल्या कुणाला तुम्ही तयार करत आहात काय?” त्याला दिलेल्या उत्तरात श्रीपुंनी म्हटले आहे (पृष्ठ ३४),
“तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज तरी नाही असं आहे. आमची प्रकाशनसंस्था एकखांबी तंबूच राहिला आहे… अशा प्रकाशन संस्था व्यक्तिमत्त्वनिष्ठ राहतात, आणि कवीप्रमाणं समृद्ध रसिकतेच्या संपादक-प्रकाशकाचं व्यक्तिमत्त्व शिकवून तयार करता येत नाही… असा माणूस मिळाला नाही त्तर आमचा प्रकाशनव्यवसाय उद्या चालू राहिला किंवा वाढला तरी त्याला आजचं वाङ्ग्मयीन व्यक्तिमत्त्व उरणार नाही. कदाचित वाङ्ग्मयीन किंवा सांस्कृतिक क्षेत्रात तसं होणंच अधिक स्वाभाविक असेल. ती क्षेत्रं जात्याच अधिक व्यक्तिमत्त्वनिष्ठ असतात.”
पुस्तकप्रकाशनाबद्दल असले तरी हे उत्तर सत्यकथेच्या संदर्भातही तितकेच लागू पाडणारे आहे.
यशोदा भागवत यांनी ‘श्रीपु : काही घरगुती आठवणी..’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे (अंतर्नाद, दिवाळी २००८). त्यांचे पती गजानन म्हणजे श्रीपुंच्या ज्येष्ठ भावाचे चिरंजीव. “घरातल्यांच्या मते, तात्याकाका आणि विमलाकाकू यांची बारा सुनांमधली सगळ्यांत लाडकी सून” असे त्यांनी सुरुवातीलाच स्वतःबद्दल लिहिले आहे. (तात्याकाका हे श्रीपुंचे घरगुती संबोधन.) त्या लेखात दुबईहून मुंबईला परततानाचा श्रीपुंबरोबरचा पुढील संवाद त्यांनी दिला आहे :

“दुबईची भूमी सुटताच, त्यांचं मन मुंबईच्या मार्गाला लागलं असावं. बोलणं सुरू झालं ते मौजेची पुस्तकं, प्रेसमधली कामं यांसंदर्भात. ते बोलत होते, बोलत होते, काकू नि मी ऐकत होतो. त्यांनी जेव्हा सत्यकथा बंद करावी लागल्याची खंत आणि ‘माझ्यानंतर मौजेचं काय?..’ अशी चिंता व्यक्त केली, तेव्हा न राहवून मी बोलू लागले, ‘ही लटकी खंत नि चिंता कशासाठी? … तुम्हांला मुळी नकोच होतं कुणी — तुमची जागा घेईल असं. अन्यथा तुम्ही प्रयत्न केला असता की आधीपासून तसा… अशक्य नव्हतं ना ते, आपल्या एवढ्या मोठ्या कुटुंबात… ’
“’तू म्हणतेस त्यात तथ्य असेल कदाचित!’ हळू आवाजात ते इतकंच बोलले.
“‘असेल नाही, आहेच!…” मी भडाभडा बोलत राहिले. शांतचित्ताने ते ऐकत राहिले. दोषारोपांचं कुठलंही समर्थन त्यांनी केलं नाही. किंवा तुझं म्हणणं मला पटतंय, असंही ते म्हणाले नाहीत. त्यांचा चेहरा पूर्ण कोरा होता.”
श्रीपुंनी उत्तराधिकारी जाणीवपूर्वक शोधला नाही की त्यांना तो मिळालाच नाही, याचे नेमके उत्तर आपण देऊ शकणार नाही; पण तसा कोणी नव्हता हे सत्यकथा बंद होण्यामागचे एक मोठे कारण असावे. धोरणनिश्चितीच्या दृष्टीने सत्यकथा हा विष्णुपंत गेल्यानंतर एकखांबी तंबूच राहिला; संस्थात्मक उभारणी मौजला करता आली नाही. “व्यावसायिक दृष्टीचा, संघटनाकौशल्याचा, आधुनिक कारभारतंत्राचा आमच्यात अभाव आहे,” असे श्रीपुंनीही एके ठिकाणी म्हटले आहे.
श्रीपुंच्या भोवती लेखकांचा एखादा विशिष्ट गट (ग्रुप) नव्हता हेही सत्यकथेच्या अस्त व्हायचे एक कारण असू शकेल. काही जणांना हे पटणे अवघड जाईल, कारण ‘मठ’, ‘पीठ’ किंवा ‘कंपुशाही’ असे शब्द सत्यकथेच्या संदर्भात खूपदा वापरले गेले आहेत! पण माझ्या मते वास्तव वेगळेच असावे. श्रीपु कोणाला दुखवत नसत, पण सुरुवातीला ज्यांनी सत्यकथेकडे बरेच लिहिले असे बहुतेक लेखक काळाच्या ओघात दुरावले हेही खरे आहे. अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगूळकर अशी अनेक मोठी नावे त्यात होती. अनेक लेखकांनी आपली पुस्तके पुढे मौजऐवजी तुलनेने अगदी नव्या अशा प्रकाशकांकडेही द्यायला सुरुवात केली. ‘आमची श्रेष्ठता प्रकाशकामुळे ठरत नाही तर आम्ही स्वतःच स्वयंसिद्ध आहोत’ हेच जणू त्यांना सिद्ध करायचे होते. कुठल्याही लेखकाला दुसऱ्या कोणा संपादकाने आपल्याला ‘घडवले’ हे मान्य होणे तसे अवघडच. स्वतः श्रीपुंनी तसा दावा कधीच केला नव्हता आणि खरे तर त्यांच्या मनात तसे काही नसेलही; पण तरीही असे बोलले मात्र जायचे की श्रीपुंनी अनेक लेखकांना घडवले वगैरे. आपल्या स्वभावाप्रमाणे अशा वेळी श्रीपु मौन पाळत, पण त्यांचे मौन ही सहमती मानली जात असावी. तशा स्वरूपाचा वाढता लौकिक हाही एक अडथळाच ठरला असावा. त्यामुळे उगाचच अनेक प्रतिभावान लेखक डिवचले जात. स्तुतीही कधीकधी मारक ठरत असावी!
श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक या पुस्तकात वेगवेगळ्या लेखकांना संपादकांनी पाठवलेल्या प्रश्नावलीत “लेखक म्हणून आपल्या घडणीत आणि विकासात श्री. पु. भागवत यांचे स्थान कोणते?” असाही एक प्रश्न आहे. अनेक प्रतिभावान लेखकांनी त्याची दिलेली उत्तरे आवर्जून वाचण्यासारखी आहेत. उदाहरणार्थ,
“मी त्यांच्याकडे आलो तेव्हा टणक आणि घट्ट झालेलो होतो. त्यामुळे त्यांना दुरुस्ती करण्यास वाव नव्हता.” – वि. वा. शिरवाडकर.
“गारंबीचा बापू हे माझे पहिले मौज प्रकाशन. ही गोष्ट १९५२ मधील. त्यापूर्वी माझ्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. साहित्यात मला स्थान मिळाले होते. त्यामुळे माझ्या घडणीत, विकासात श्रीपुंना स्थान नव्हते.” – श्री. ना. पेंडसे.
“माझ्या लेखक म्हणून झालेल्या विकासात किंवा घडणीत श्री.पु.ला किंवा कोणत्याच प्रकाशकाला खास असे स्थान नाही.” – विंदा करंदीकर.
“सत्यकथेने नवसाहित्य घडविले अगर त्याला आकार दिला, असे म्हणता येणार नाही. मर्ढेकर, पु. शि. रेगे, पु. भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ इत्यादी लेखकांना ‘सत्यकथे’शी संबंध येण्यापूर्वीच आपले वाङ्ग्मयीन सत्त्व गवसले होते. सत्यकथेने त्यांना घडवले असे म्हणता येणार नाही.” – गंगाधर गाडगीळ.

सत्यकथेत ज्यांनी सुरुवातीच्या काळात उत्तम आणि विपुल लेखन केले अशा अनेक लेखकांनी श्रीपुंवर बरीच टीकाही केली आहे. उदाहरणार्थ, गंगाधर गाडगीळ लिहितात, “त्या काळात एक दैनिक, एक साप्ताहिक, आणि एक मासिक अशी तीन पत्रे भागवतबंधूंच्या हातात होती. ती एकामागून एक, सर्वच बंद पडावी, यात भागवतबंधूंचा खात्रीने दोष आहे आणि त्यात श्री. पु. भागवतांचा वाटा फार मोठा आहे.” (श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक, पृष्ठ १९१-२)
मॅजेस्टिकचे केशवराव कोठावळे, त्यांनी आपल्या लेखकांशी साधलेली व्यक्तिगत जवळीक आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेल्या ‘ललित’ मासिकाचे उदाहरण या संदर्भात अभ्यासण्यासारखे आहे.
‘मौज-सत्यकथा-ललितचे दिवस’ या आपल्या लेखात, १९६५ नंतर काही काळ सत्यकथेत लेखन केलेले, पण पुढे मॅजेस्टिकशी कायमचे जोडले गेलेले, मधु मंगेश कर्णिक लिहितात (अंतर्नाद, दिवाळी २००५) :
“आपल्या प्रकाशनासाठी हक्काचे लेखक असावेत, हा केशवरावांचा हेतू होता. त्यातून त्यांची उपक्रमशीलता दिसून आली. सर्व लेखकांना एकत्र जमवून जेवायला न्यायचा बूट त्यांनी काढला. शिवाजी पार्कला आज जिप्सी, नेबुला आहेत, तिथे ‘शेटेज’ नावाचे एक नॉन-वेज, प्रशस्त जागेचे रेस्टॉरंट होते. तिथे केशवराव आम्हाला जेवण द्यायचे. मग खारला त्यांनी फ्लॅट घेतल्यावर त्यांच्या घरी जेवणाचे कार्यक्रम होऊ लागले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई अत्यंत अगत्याने आमचे स्वागत करीत.स्वहस्ते मालवणी पद्धतीचे वडे, सागुतीचे जेवण खिलवत. त्या दिवसांत आम्ही लेखक मंडळी एखाद्या शनिवार-रविवारी मुंबईबाहेर खंडाळा, लोणावळा, अलिबाग, कर्नाळा, दहिसर अशा ठिकाणी पिकनिकसाठी जात असू. सर्व खर्च व सरंजाम कोठावळे यांचा. त्यांना लेखकांच्या सहवासात अपार आनंद व्हायचा. क्रिकेट, पत्ते, गप्पा, टिंगलटवाळी या साऱ्याला ऊत येई. अशीच एक पावसाळी सहल १९६३मध्ये मुंबईजवळच्या पवई-विहार लेकवर गेली होती…. जयवंत दळवी, वसंत सरवटे, पुरुषोत्तम धाक्रस, श्री. ज. जोशी, पंढरीनाथ रेगे, चंद्रकांत काकोडकर, उमाकांत ठोमरे, ज्ञानेश्वर नाडकर्णी व मी एवढेजण होतो. या सहलीमध्ये आपणा सर्व साहित्यिकांचे एक वाङ्ग्मयीन मासिक असावे, असे ठरले. या बैठकीचा कार्यवृत्तान्त माझ्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. मला वाटते, उपस्थित सर्वांनी त्यावर सहमतिदर्शक सह्या केल्या होत्या. ‘ललित’ या नावाचं मासिक १९६४च्या प्रारंभापासून काढायचा निर्णय त्या सहलीमध्ये ठरला.”
श्रीपुंच्या संदर्भात अशा प्रकारचा मजकूर कधी लिहिला जाऊ शकेल असे वाटत नाही.
दुसऱ्या कोणी त्यांच्याशी विशेष सलगी करावी असा कदाचित श्रीपुंचा स्वभावच नसावा. श्रीपुंविषयी अनेक लेखक आज भरभरून लिहितात, आणि ते वाचताना त्यांची श्रीपुंशी खूप जवळीक होती असे वाचकाला वाटू शकते, पण प्रत्यक्षात ती तशी होती का हे सांगणे मला तरी खूप अवघड वाटते.
मूळ सांगलीच्या पण आता ठाण्याला राहणाऱ्या स्वाती घारपुरे दिवेकर या नात्याने श्रीपुंच्या नात. ‘श्रीखंड पुरी भाजी’ या आपल्या आजोबांच्या सुरेख व्यक्तिचित्रात त्यांनी लिहिले आहे, “धीरगंभीर मितभाषी असलेल्या श्रीपुंबद्दलचा आदर जितका लेखकांमध्ये होता, त्याहून कित्येक पटीने अधिक आदरयुक्त भीती, काही अपवाद वगळता, समस्त भागवत कुटुंबीयांमध्ये होती. प्रत्यक्ष न बोलता, आपल्या नजरेतून बोलणाऱ्या त्यांच्या डोळ्यांचा अंदाज घेतच त्यांच्यासमोर सगळे बोलत.” अशा परिस्थितीत कुटुंबीयदेखील पुरेशी सल्लामसलत करत होते का, सत्यकथेचे पुढे काय करावे याविषयी त्यांच्यात तरी एकमत होते का, हे सांगणे अवघड आहे. योग्य सल्ला देणाऱ्या सुहृदांचा अभाव हेही एक कारण सत्यकथा बंद होण्यामागे असू शकेल.
नव्या वाचकांशी नाळ जुळवून घेता आली नाही, त्यांच्या अभिरुचीचा नेमका अंदाज श्रीपुंना आला नाही हेही सत्यकथेचे एक वैगुण्य होते.

अवघ्या विसाव्या वर्षी, त्यांच्यावर सत्यकथेच्या संपादनाची जबाबदारी पडली होती आणि बघता बघता मराठी प्रकाशनक्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाचे स्थान त्यांना प्राप्त झाले. मूळची गंभीर वृत्ती अधिकच गंभीर बनली. या सगळ्यामुळे त्यांची अभिरुची सर्वसामान्य नव्या वाचकापेक्षा खूपच वेगळी झाली होती का आणि संपादन हा विशिष्ट अभिरुचीचाच एक आविष्कार असल्याने त्याचा साहित्यनिवडीवर परिणाम होत होता का?
नव्या वाचकांशी नाळ जुळवून घेणे माणूस आणि किर्लोस्कर यांच्यासारख्या नियतकालिकांना काही वर्षे तरी जमले. साहित्याची भूमी या श्री. पु. भागवत यांच्या लेखसंकलनात किर्लोस्कर किंवा माणूसचा उल्लेखदेखील नसावा याचे आश्चर्य वाटते. हाच प्रकार ‘ग्रंथाली’सारख्या साहित्यिक उपक्रमांबद्दलही झाला. दिनकर गांगल यांनी लिहिले आहे, “ग्रंथालीच्या कामाबद्दल त्यांनी दोन-तीन वेळा धन्योद्गार काढले आहेत, पण त्यांना ते काम ‘पॉप्युलिस्ट’ वाटत असावे. त्यांनी त्यामध्ये कधी मनःपूर्वक रस दाखवला नाही.” (रुची, दिवाळी अंक, २००७)
परिणामतः सत्यकथेत येणाऱ्या साहित्याचा दर्जा अखेरची काही वर्षे खूपच घसरला होता. जे प्रकाशित होत होते तेही खूपदा शुष्क, क्लिष्ट, नीरस होते. अनेक वर्गणीदारही सत्यकथेचे नंतरच्या काळातील अंक न वाचताच किंवा अगदी वरवर चाळून बाजूला ठेवत होते. राम पटवर्धन यांना याची जाणीव होती. “कथेत ‘कहाणी’ येऊ द्या, कथा रसाळ असायला हवी” असे मी त्यांच्या तोंडून दोन-तीनदा ऐकले आहे. पण प्रत्यक्षात तसे लेखन त्यांच्याकडे येत नसावे. कदाचित सत्यकथेची रूढ प्रतिमा त्याला कारणीभूत असावी.

अनेकदा सत्यकथेकडे एखादी कथा पाठवताना काही लेखक मुद्दामच ती कथा काही खास पद्धतीने लिहीत असत. जो आशय सरळ, साध्या शब्दांत मांडता येईल तो उगाचच समजायला कठीण अशा भाषेत मांडत असत; अनेक भाषिक क्लरुप्त्या वापरुन अनावश्यक मोडतोड करत असत. सत्यकथेच्या संपादकांना तशीच गूढता आणि क्लिष्टता अधिक भावते, अधिक कलात्मक वाटते असा त्यांचा समज असायचा. सत्यकथेत आपली कथा यावी ही इच्छातर तीव्र असायची आणि मग त्या इच्छेपोटी लेखक कथेत अनेक करामती करत. त्यातून त्या कथेतील उत्कटता कमी व्हायची, कथा रटाळ व्हायची. हे मी निश्चितपणे सांगू शकतो कारण मी स्वतःही हा प्रमाद एकेकाळी केलेला आहे! रा. रं. बोराडे यांनी आपली ‘पाचोळा’ ही कादंबरी श्रीपुंच्या सांगण्यानुसार पाच वेळा लिहिली असे जाहीरपणे आणि तेही काहीशा कृतज्ञतापूर्वक सांगितले होते. त्यातून मूळ कादंबरीतील उत्कटता कमी झाली की वाढली हे सांगणे, मूळ संहिता आणि अंतिम संहिता यांची प्रत्यक्ष वाचनोत्तर तुलना केल्याशिवाय, अशक्य आहे. खूपदा अतिसंस्करण कलाकृतीला मारकही ठरते; उत्स्फूर्ततेमध्ये असलेले अंगभूत सौन्दर्य त्यातून उणावते.
लघुनियतकालिकांमधून त्या काळात अनेक तरुण लेखक, विशेषतः ग्रामीण भागातील नवोदित लेखक, लिहीत असत. समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी या लघुनियतकालिकांच्या योगदानाबद्दल लिहिले आहे. लघुनियतकालिकांनी केलेला बोलीभाषांचा वापर, त्यांतून मुखर झालेल्या वंचित समाजाच्या वेदना, मुख्य माध्यमांतून उपेक्षित राहिलेल्या लेखकांचा वाढलेला आत्मविश्वास या गोष्टी साहित्याला वेगळे आयाम देऊन समृद्ध करणाऱ्या होत्या. या साऱ्याकडे श्रीपुंनी पुरेसे लक्ष दिले नसावे असे म्हणायला जागा आहे. पण त्याचबरोबर हेही नमूद करायला हवे, की श्रीपुंनी जरी या साहित्याची अधिक दखल घेतली असती, तरी त्यामुळे सत्यकथेचा अस्त टळला असता असे अजिबात म्हणता येणार नाही; कारण त्या साहित्यावरच पूर्णतः अधिष्ठित असलेली लघुनियतकालिकांची चळवळ ही स्वतःदेखील जेमतेम दहा-बारा वर्षेच चालली; तीही अशीच थंडावली.
सत्यकथेच्या अस्ताच्या संदर्भात मला सर्वाधिक पटणारा मुद्दा म्हणजे श्रीपुंच्या विशिष्ट अभिरुचिनुसार आणि मानदंडांनुसार त्यांना चांगल्या वाटणाऱ्या साहित्याची निर्मितीच मंदावत चालली होती. शेवटी संपादकालाही हाती येणाऱ्या साहित्यावरच अंक सजवावा लागतो. आणि तेच जर संपादकाच्या (विशिष्ट अभिरुचिनुसार आणि मानदंडांनुसार) सकस, दर्जेदार नसेल तर? शेवटच्या अंकामधल्या निवेदनातील “शिवाय ज्यासाठी जगायचे ते पुरेसे व मनासारखे साधत नसेल तर जगणे एवढेच प्रयोजन मानून जीव जगवत राहण्यात स्वारस्यही नसते,” हे वाक्य माझ्या मते सर्वाधिक कळीचे वाक्य आहे. कसदार साहित्याच्या एकूणच आक्रसत चाललेल्या स्रोताकडे ते लक्ष वेधणारे आहे.
तसे पाहिले तर सत्यकथा बंद झाली त्यावेळी श्रीपुंचे वय केवळ ५९ होते; म्हणजे फार होते असे म्हणता येणार नाही; आणि शिवाय नंतरची वीसएक वर्षे ते बऱ्यापैकी सक्रियदेखील होते. त्यामुळे वयपरत्वे येणारा स्वाभाविक थकवा हेही आर्थिक अडचणीप्रमाणे सत्यकथा बंद करण्यामागचे कारण असावे असे वाटत नाही. एकूणच सत्यकथेच्या कामाचा, प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा त्यांना मनुष्यसुलभ शीण आला असावा किंवा त्या कामात त्यांचा जीव रमेनासा झाला असावा असे मला वाटते.

सत्यकथा बंद झाली यामागे व्यक्तिगत कारणांप्रमाणे आपल्या समाजाचीही मोठी जबाबदारी आहे हेही कबूल करावेच लागेल. कारण सत्यकथेप्रमाणे इतरही काही चांगली नियतकालिके त्या काळात निघत होती, पण ती सत्यकथेएवढीदेखील टिकली नाहीत. उदाहरणार्थ, ‘छंद’ हे द्वैमासिक १९५४ सालापासून पु. शि. रेगे चालवत असत पण तेही सहा वर्षांनी, म्हणजे १९६० सालीच, बंद पडले. बाबूराव चित्रे चालवत असलेले ‘अभिरुची’ मासिक १९३७ ते १९५० अशी तेरा वर्षे नीट चालले, पण त्यानंतर बंद झाले. ते पुन्हा सुरू करायचे एक-दोन वेळा झालेले प्रयत्न असफलच ठरले. ‘चित्रा’ हे साप्ताहिक अनंत काणेकर व मो. ग. रांगणेकर यांनी चालवले, पण तेही १९४८ साली बंद पडले. अनंत हरी गद्रे यांनी ‘मौज’ विकल्यानंतर १९३३ साली सुरू केलेले ‘निर्भीड’ हे साप्ताहिकही १९४७ साली बंद पडले. मराठी समाजात साहित्याला फारशी प्राथमिकता दिली जात नाही हे पूर्वापार चालत आलेले वास्तव आहे आणि सत्यकथा बंद होण्याची मीमांसा करताना त्याचाही आवर्जून विचार करायला हवा.
याची खंत श्रीपुंनी अनेकदा व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ, महाबळेश्वर येथील मराठी प्रकाशक परिषदेत केलेल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणतात, “महाराष्ट्रीयांच्या सांस्कृतिक अग्रक्रमात पुस्तकांना फार खालचे स्थान आहे. विविध नोकरपेशांतली आणि नव्याजुन्या व्यवसायांतली माणसे याला अपवाद नाहीत; लहानमोठ्या कारखानदारीतली नाहीत; शेतकरी-बागाइतदारांतली नाहीत की राजकारणातली नाहीत; आणि सर्वांत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अध्यापनाच्या क्षेत्रातलीदेखील नाहीत. आणि मिठानेच जर खारटपणा सोडला तर कसे व्हायचे?” (साहित्याची भूमी, पृष्ठ २२३)
१९५० साली प्रभात दैनिक बंद झाले, १९६० साली मौज साप्ताहिक बंद झाले, आणि १९८२ साली सत्यकथा मासिक बंद झाले. प्रत्येक वेळी त्यामागे आर्थिक कारण असल्याचे नमूद केले गेले आहे. आर्थिक पातळीवर भागवतबंधूंना हे अपयश का आले? “सत्यकथेच्या संपादकाला मराठीच्या ज्येष्ठ प्राध्यापकाला जेवढा पगार मिळतो तेवढातरी मिळायला हवा, पण आम्हाला ते कधीच शक्य झाले नाही”, असे श्रीपु प्रस्तुत लेखकापाशी बोलल्याचे आठवते. सरकारी नोकरी सोडून राम पटवर्धन मौजमध्ये आले याची पुरेशी बूज आपण राखू शकलो नाही ही खंतही श्रीपुंनी नोंदवलेली आहे. लेखकांनाही यथोचित मानधन आपण देऊ शकत नाही याची जाणीव त्यांना होती. पुरेसे वर्गणीदार किंवा जाहिराती न मिळणे हे तर मराठी मासिकांचे कायमच भागधेय राहिले आहे. ज्यांनी मदतीचे आश्वासन दिले त्यांनीही प्रत्यक्षात दिलेली मदत अगदीच तुटपुंजी होती; बहुतेक जण बोलके शंखच निघाले. हाही अर्थात इतर अनेक नियतकालिकांना काळाच्या ओघात आलेला अनुभव.
यासंदर्भात विचार करताना फेब्रुवारी १९९८ मध्ये माणूस प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झालेल्या निवडक माणूस या संकलनाची आठवण झाली. त्यात अगदी शेवटच्या पानावर (पृष्ठ ६११) सतीश कामत आणि प्रसन्नकुमार अकलूजकर यांनी लिहिले आहे, “’माणूस’ बंद होणे अपरिहार्य होते का? ‘सत्यकथा’ बंद का झाले? ‘माणूस’ किंवा ‘सत्यकथा’ बंद व्हायला केवळ आर्थिक कारणे आहेत का? की आणखी काही? १९७०नंतरच्या काळात, त्यातही १९८० नंतरच्या दशकात मध्यमवर्गीय मराठी समाजाकडे सुबत्ता आली. समृद्धी आली. मग या समाजाला ‘माणूस’ची गरज वाटेनाशी झाली असा अर्थ घ्यावयाचा का? ही काळाची अपरिहार्यता मानायची का?”
पण सत्यकथेचा अस्त ही केवळ ‘काळाची अपरिहार्यता’ मानणे म्हणजे समाजाने स्वतःची जबाबदारी पूर्णतः झटकून टाकायचाच एक प्रकार वाटतो; सामाजिक निष्क्रियतेचे ते समर्थन वाटते.

भागवत परिवाराला स्वतःलाच ही तूट मुद्रणालयाच्या किंवा पुस्तकप्रकाशनाच्या नफ्यातून भरून काढता आली असती ही काही जणांच्या तोंडून ऐकलेली अपेक्षा मला अवास्तव वाटते. इतकी वर्षे त्यांनी हे केलेच की. अजून किती वर्षे त्यांनी ते करायला हवे होते? आणि मग यात वाचकांची काही जबाबदारी आहे की नाही? महिन्याला पावणेचार हजार रुपये ही एकूण तोट्याची रक्कम, त्या काळातील चलनमूल्याचा विचार करताही, अगदीच कमी होती. तेवढी रक्कम दहा-बारा प्राध्यापक किंवा अन्य व्यावसायिक एकत्र येऊनही अगदी सहज उभारू शकले असते. एखाद्या संस्थेच्या किंवा उद्योगपतीच्या दृष्टीने तर ही रक्कम खरोखर क्षुल्लक होती. ज्यांचे लेखन सत्यकथेत येत होते त्यांच्यापैकी काहींनी जरी मनावर घेतले असते तरी ते जमले असते. सत्यकथा बंद पडल्यानंतर त्याबद्दल बरेच मंथन झाले.
दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील अशाच एक सभेला प्रस्तुत लेखक हजर होता. पण सत्यकथा बंद झाल्याबद्दल त्यावेळी गळे काढणारे अनेक जण स्वतः मात्र सत्यकथेचे साधे वर्गणीदारसुद्धा नव्हते. या मंडळींनी अशा वेळी स्वतःच्या खिशात हात का घातला नाही? व्यासपीठांची गरज लेखकांनासुद्धा असतेच, त्यासाठी चांगली मासिके टिकायला हवीत, आणि त्यासाठी आपण स्वतःही थोडीफार झीज सोसावी असे त्यांना का वाटले नाही? या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी-त्यांनी आपल्याच मनात प्रामाणिकपणे द्यावीत.

सत्यकथा ज्या ‘ट्रू स्टोरी’ ह्या इंग्रजी मासिकापासून प्रेरणा घेऊन सुरू झाले होते, ते १९१९ साली सुरू झालेले मासिक आज चार पिढ्या उलटल्यानंतरही चांगल्याप्रकारे चालू आहे हे इथे लक्षात घ्यायला हवे.
सत्यकथा मासिक आजही चालू असते तर मराठी वाङमयजगतातील त्याचे पूर्वीचे स्थान आजही कायम राहिले असते का असाही एक प्रश्न उपस्थित केला गेला आहे. व्यक्तिशः मला याचे उत्तर “बहुधा नाही” असे द्यावेसे वाटते. सत्यकथेच्या अस्तानंतरच्या चाळीस वर्षांत समाज खूपच बदलला आहे. उदाहरणार्थ, लेखकाचे आणि साहित्याचे समाजातील एकेकाळचे अग्रस्थान आज उरलेले नाही. परिणामतः मासिकांचा प्राणवायू मानता येईल अशा दर्जेदार साहित्याची निर्मिती खूपच मंदावली आहे. या बदलामागे इतरही अनेक कारणे अर्थातच आहेत.
नुसती रिमोटची कळ दाबताच घरबसल्या उपलब्ध होणाऱ्या शेकडो रंगीबेरंगी वाहिन्या, जवळजवळ प्रत्येकाच्या हातात पोचलेल्या मोबाइलचा सोशल मिडिया म्हणून होणारा अखंड वापर, वृत्तपत्रांच्या अल्प किमतीत घरपोच येणाऱ्या भरगच्च पुरवण्या, मराठी भाषेची व एकूणच साऱ्या भारतीय भाषांची सातत्याने होत गेलेली हेळसांड, लाखाच्यावर पगार घेणाऱ्या अभिजनवर्गाचीदेखील मासिकांची वर्गणी भरण्याबद्दलची कमालीची अनास्था, गंभीर स्वरूपाच्या वाचनाकडे वाचकांनी फिरवलेली पाठ, त्यांच्यातील एकाग्रतेचा झालेला ऱ्हास, लेखनपूर्व चिंतनासाठी पुरेसा वेळ देण्यातला लेखकांचा अनुत्साह, उत्तम अक्षरजुळणीकार-मुद्रितशोधक वगैरे व्यावसायिक सेवांचा तुटवडा, सामाजिक जीवनातील वाढते तणाव, विविध तांत्रिक उपकरणे हाताशी असूनही निवांत वेळेचा आश्चर्यकारकरीत्या जाणवणारा अभाव वगैरे कारणेही विश्लेषण करायला लागले तर पुढे येतात.
या खूप बदललेल्या सामाजिक पर्यावरणात सत्यकथेचे योगदान काय राहिले असते; ते वाचणारे किती वर्गणीदार मिळाले असते यांची उत्तरे शोधणे अवघड आहे. अर्थात मर्ढेकरांनी गाडगीळांच्या संदर्भात लिहिलेल्या शब्दांत किंचित फेरफार करून म्हणायचे तर, “मासिकाची कुंडली कोणी मांडावी!”
मौज-सत्यकथा बंद झाल्याची मीमांसा माझ्या अल्पामतीप्रमाणे मी केली आणि तोच विषय संपादकांनी मला दिला होता. ‘एक संपादक आणि एक व्यक्ती म्हणून मला भेटलेले श्रीपु आणि त्यांनी मराठी साहित्यविश्वाला दिलेले योगदान’ हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण या लेखाशेवटी एवढे तरी नमूद करायला हवे, की मराठी संपादन-प्रकाशनक्षेत्रात श्री. पु. भागवत यांनी निर्माण केलेला अभिरुचिसंपन्न उत्तमतेचा मानदंड आणि काळाच्या एका मोठ्या पटावर त्यांनी उमटवलेला ठसा आजही विस्मरणात गेलेला नाही. जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

(पूर्वप्रसिद्धी : ‘वाडमयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ हा गौरवग्रंथ)

  

Author

Leave a Reply