चित्रपटांच्या रिमिक्सच्या जमान्यात…

ओह… गॉड! हा सुमारे १९७७ च्या आसपासचा चित्रपट असावा. मुळात रंगकर्मी असलेल्या जॉर्ज  बर्न्स नावाच्या सुमारे ८० वर्षांच्या आणि उबदार आवाजाच्या नटाने त्यातील देवाची मध्यवर्ती भूमिका केली होती; पण त्या वेळी मात्र मुंबईत हा चित्रपट जेमतेम चार दिवस चालला. मला ह्या चित्रपटाची डीव्हीडी पहाण्याचा योग मस्कतच्या लायब्ररीमुळे लाभला. मन लावून रमून बघण्याचा हा चित्रपट रात्री आम्ही सर्वांनी मिळून बघितला आणि संध्याकाळी सीडी परत करायची त्या आधी सासऱ्यांनी दिवसभरात पुन्हा एकदा शांतपणे बघून घेतला. देव हा चित्रपटाचा एक नायक, तर दुसरा एक सामान्य माणूस – तुमच्या-आमच्यासारखा ! 

पुढे जाण्यापूर्वीच एक आठवण झाली तेही लगेच सांगते. अलीकडचा म्हटलं तरी वीस-पंचवीस वर्षं झाली असतील – ‘ओह! माय गॉड…!’ हा चित्रपट! एक नायक देवच… झोपाळ्यावर बसलेला श्रीकृष्णाच्या रूपातला अक्षय कुमार आणि दुसरा सामान्य माणूस – एका दुकानाचा मालक – परेश रावल. दुकान कसलं तर देवाच्या मूर्ती, फोटोफ्रेम्स विकण्याचं… पण हा माणूस अगदीच सामान्य, साधासुधा नाही बरं. खरं तर कलियुगातील म्हटल्यावर तो आणखी कसा असणार? त्यामुळे तसाच जरा बदमाश, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारा, त्यांना लुबाडणारा, स्वतः संपूर्ण नास्तिक आणि काहीसा ढोंगी. ओह गॉडमध्ये त्या माणसाच्या हातात एक पत्र पडतं, अमुक इमारतीच्या तेराव्या मजल्यावर चोवीस नंबरच्या खोलीत मला भेट. महत्त्वाचं काम आहे. खाली ‘गॉड’ म्हणून सही ! असं कोण लिहिणार म्हणून तो ते पत्र चुरगळून फेकून देतो; तर ते चेंडूसारखं उसळून परत परत त्याच्याकडेच  येत राहतं. शेवटी तो जातो. त्या आकाशी रंगाच्या निळसर खोलीत उबदार आवाज त्याचं स्वागत करतो. नुसताच आवाज, हा काय चावटपणा ? म्हणून तो खाली येतो; रिसेप्शनिस्टला विचारतो; तर ती सांगते, या हॉटेलला तेरावा मजलाच नाही! हळूहळू देव आहे याची त्याला खात्री पटू लागते. तो लोकांना तसं सांगू लागतो. लोक त्याला वेड्यात काढतात. त्याच्यावर खटला भरतात. शेवटी साक्ष द्यायला प्रत्यक्ष ईश्वर येतो. संशयाचा फायदा म्हणून हा सुटतो. एक छानशी विश्वास बसेल अशी स्टोरी , छानसे संवाद, कृष्णधवलची वेगळीच गोडी. तसा जुना चित्रपट. तंत्र इतकं सुधारलेलं नाही; तरीही ट्रिक सीन्स फार सुंदर वर्कआऊट होतात. चित्रपट दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो. 

पापभीरू माणसं सहसा देवाला मानतात; शिवाय ज्यांच्यावर इतरांच्या प्राणांची जबाबदारी असते असे डॉक्टर, वैज्ञानिक, पायलट, इंजिनियर, रॉकेट सोडणारे हेही सश्रद्ध असतात. आपल्या प्रयत्नांना शंभर टक्के यश कधीच मिळत नाही, मध्ये कुठेतरी एक अदृश्य हात असतोच ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव असते. वाईट कामं करणाऱ्यांना त्यांच्या परिणामांची क्षिती नसते. प्रयोग अयशस्वी झाला तर स्वतःचा जीव देण्याची तयारी त्यांनी ठेवलेली असते. देवभोळी माणसं सहसा आपल्या किंवा दुसऱ्याच्या जीवाला धक्का लागू देत नाहीत. 

इकडे अक्षयकुमार मात्र त्या दुकानदाराच्या घराच्या वरच्या मजल्यावर झोपाळ्यावर झुलत त्याला अधूनमधून भेटत राहतो. त्याला काही इशारे देतो, त्यातून सावध व्हायला सांगतो. यात काहीतरी तथ्य आहे असं त्यालाही वाटू लागतं; पण ते मान्य कसं करायचं? भूकंप होणार, त्यात त्याच्या दुकानाला धोका पोचणार, नुकसान होणार याची सूचना शेजारचा माणूस त्याला देतो; पण तो बेफिकीर राहतो. भूकंपात अनेक मूर्ती बळी पडतात. 

पण अमुक तमुक उत्खननात इतक्या पूर्वीच्या अत्यंत पुरातन मूर्ती केवळ तुझ्यासाठीच इथे येऊन दाखल झाल्यात आणि त्यांची  किंमत फारच जास्त आहे, असं म्हणून तो त्या श्रीमंत गिऱ्हाइकांच्या दागिन्यांवर डोळा ठेवतो. ते मिळवण्यात यशस्वी होतो. दहीहंडीच्या वेळी त्याचा लहानसा मुलगा स्वतःच्या आनंदासाठी सर्वात वरच्या थरावर चढायला जातो. आई बरोबर असते. इतर मुलंही छान सांभाळतात; पण ह्याला बातमी समजताच तिकडे धावत सुटतो. जोरजोरात त्याला हाका मारत सुटतो आणि त्यामुळेच त्याच्याकडे बघताबघता मुलाचा तोल जातो! देवावरच खटला भरायचं ठरवतो; पण कोणी वकील केस घ्यायलाच तयार होत नाही; मग तडजोड म्हणून तो देवाच्या दलालांवर म्हणजे धर्मगुरू, पुजारी, भटजी यांच्यावर भरायचा ठरवतो. भारतात या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व धार्मिक स्थळांवर नोटिसा पाठवायला सांगतो. ते येतात. कोर्टात हजर राहतात; पण समाधानकारक उत्तरं देता येत नाहीत म्हणून पळून जातात. ह्याला आपणच जिंकल्याचा पोटभर आनंद मिळतो. 

चित्रपट संपतो. भाराभर चित्रपटांच्या भाऊगर्दीत आपण तो विसरूनही जातो. 

सुधीर मोघे यांचा जुन्या ओह! गॉड…वरील लेख वाचताना आज या सगळ्याची आठवण झाली. 

Author

Leave a Reply