‘खेड्याकडे चला!!’ महात्मा गांधीजींनी अशी हाक देशाला दिली. गाव-खेड्यांकडे लोकांचा ओघ वळून पर्यायाने खेड्यांचे सक्षमीकरण होईल असा हेतू यामागे होता. प्रत्यक्षात परिस्थिती आजही अगदीच विपरीत असलेली आढळून येते. गाव-खेड्यांतून शहरात, छोट्या शहरातून मोठ्या शहरात आणि मोठ्या शहरातून महानगरात जाण्याकडे सगळ्यांचा कल दिसून येतो आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करताना दिसून येतात. शिक्षण, रोजगार यांच्या चांगल्या आणि वेगवेगळ्या संधी, राहणीमानात होणारा बदल, सामाजिक स्थिती, प्रगती आणि प्रतिष्ठेचे सामाजिक निकष, शहरी झगमगाटाचे सुप्त आकर्षण अशी अनेक कारणे या स्थलांतरामागे असतात.
एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यामागेदेखील बहुतांशी हीच करणे असतात. परदेशी चलन आणि भारतीय चलन मूल्य यांतील तफावत आणि त्यामुळे उत्पन्नात होणारी घातांकी वाढ (exponential growth), पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण ही आणखी काही कारणे अशा निर्णयामागे असतात; पण मग या अशा स्थलांतरानंतर सगळ्यांची परिस्थिती बदलते का? अधिक उत्पन्न मिळून सगळ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारते का? चलन दरातील फरकाचा लाभ सगळ्यांनाच मिळतो का? या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांच्या बाबतीत सारखीच असतील असं नाही. आता हे समजून घेण्यासाठी आपण काही प्रातिनिधिक उदाहरण पाहू :
सौरभ घरातला एकुलता एक मुलगा, अभ्यासात तसा हुशार, होतकरू तरुण. शालोत्तर शिक्षणासाठी गावातून मोठ्या शहरात आला. एमसीए झाला. आयटी कंपनीत लागला. बघता बघता बढती मिळत ३ वर्षांत १८ लाख वार्षिक पगार मिळवू लागला. लग्न झाले, बायकोदेखील आयटी क्षेत्रातील – तिलाही पगार चांगला. दोघांनी स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली. घरात स्वयंपाकाला, केर-लादी करायला, मुलांना सांभाळायला असे २-३ नोकर होते. वीकेंडला हॉटेल, एखादं नाटक/सिनेमा वगैरे ठरलेलं. सुखवस्तू आयुष्य सुरू होतं. महिन्याला खर्च वजा जाता चांगले पैसे शिल्लकदेखील पडत होते. आता त्याला परदेशात जाऊन आणखी चांगली नोकरी करण्याची स्वप्नं पडू लागली आणि लवकरच तशी संधी चालून आली. अमेरिकेत नोकरी. वर्षाला ६०,००० डॉलर पगार. सौरभने डॉलरच्या पगाराचे भारतीय रुपयांत किती होतात ते काढलं; म्हणजे महिना ४.१० लाख आणि जवळजवळ ४९ लाख रुपये वर्षाला (१ डॉलर = ८२ रुपये). आत्ताच्या पगाराच्या जवळपास पावणेतीन पट. सौरभने लगेच होकार कळवला आणि अमेरिकेत सहकुटुंब स्थलांतरित झाला. नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर मात्र काही गोष्टी जाणवू लागल्या. खर्च जास्त होतोय, नोकर-चाकर मंडळी परवडण्यासारखी नाहीत. जवळपास तिप्पट पगार असूनही भारतात जसे आयुष्य जगता येत होते तसे जमत नाहीये हे स्पष्ट व्हायला लागलं. शिल्लक कमी होऊ लागली; मग ओघाने काहीतरी इतर कामं करायची वेळ येऊ लागली.
दुसरीकडे जान्हवीलादेखील अशीच परदेशात नोकरीची संधी मिळाली. भारतात पगार १०लाख रुपये. आता कंपनीने बढती दिली आणि युकेमध्ये बदली केली. तिकडे पगार ४८००० पाउंड वर्षाला. भारतीय रुपयांमध्ये ४.२० लाख महिना आणि साधारण ४९ लाख वर्षाला (१ पाउंड = १०५ रुपये); म्हणजे भारतीय रुपयांमध्ये विचार करता सौरभ आणि जान्हवीचा पगार साधारण सारखाच झाला; मात्र इकडे जान्हवीच्या उत्पन्नात, पर्यायाने राहणीमान आणि शिलकीत भारताच्या तुलनेत चांगली वाढ झाली; पण मग हे असं का घडलं असावं? भारतीय रुपयात दोघांचा पगार सारखाच असून दोघांच्या बाबतीत अगदी उलटी परिस्थिती का निर्माण झाली?
तर हे असं घडण्यामागे कारण आहे क्रयशक्ती समता / तुल्यता (Purchasing Power Parity). या सिद्धांताचा उद्देश दोन चलनांच्या विनिमय दरांमध्ये एकमेकांच्या क्रयशक्तीच्या बरोबरीने तुलना करण्यासाठी आवश्यक समायोजने (Adjusting factor / index) निर्धारित करणे असा आहे. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, जेव्हा विनिमय दराचा (exchange rate) हिशोब केला जातो तेव्हा समान वस्तूवरील खर्च दोन्ही चलनांमध्ये समान असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत प्रत्येक चलनाची क्रयशक्तीची चाचपणी करून ती निश्चित केली जाते. उदाहरणार्थ समजा भारतात एका जोड्याची किंमत २,५०० रुपये आहे; जेव्हा डॉलर आणि रुपयांमध्ये विनिमय दर ८० असा असेल — अर्थात एका डॉलरसाठी ८० रुपये मोजावे लागणार असतील; तेव्हा त्याच जोड्याची अमेरिकेतील किंमत ३१.२५ डॉलर असायला हवी (३१.२५ * ८० = २५००). असं असल्यास भारतातील २५०० रुपये आणि अमेरिकेतील ३१.२५ डॉलर यांची क्रयशक्ती किंवा खरेदी करण्याची क्षमता ही सारखी आहे असं म्हणता येईल; परंतु प्रत्यक्षात ही समानता वेगवेगळ्या देशांत/ प्रदेशांत अस्तित्वात नाही; त्यामुळे २५०० रुपयांना भारतात मिळणारे जोडे अमेरिकेत ३१.२५ डॉलरलाच मिळतील असं नाही. अमेरिकेत जर ही किंमत ४० डॉलर असेल तर भारतीय रुपयांमध्ये ही किंमत ३२०० रुपये होईल. (१ डॉलर = ८० रुपये); म्हणजेच भारतातले २५०० रुपये अमेरिकेत तेच जोडे घेण्यासाठी पुरणार नाहीत.
क्रयशक्तीची समानता (Purchasing Power Parity) ही कल्पना दोन भिन्न चलनांच्या क्रयशक्तीची तुलना करण्यासाठी वापरतात. या सिद्धांतामध्ये दोन चलनांच्या दीर्घ मुदतीमधील समतोलावरून त्यांच्या तुलनात्मक क्रयशक्तीचे अनुमान करतात.
क्रयशक्तीच्या समानतेच्या दरात आणि चलनांच्या विनिमय दरांत बराच फरक असू शकतो. उदाहरणार्थ : १ अमेरिकन डॉलर बरोबर ८२ रुपये असा विनिमय दर (exchange rate) आहे; पण एका डॉलरची क्रयशक्ती मात्र २२.३२ रुपयांच्या समान आहे; म्हणजे, अमेरिकेत एका डॉलरमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी विकत मिळतील, त्या विकत घ्यायला भारतात २२.३२ रुपये लागतील; पण मग एखाद्या चलनाची क्रयशक्ती ठरवायची कशी? यासाठी वेगवेगळ्या देशांत समान वस्तूंच्या किमतीची तुलना करून त्याची दुसऱ्या देशातील चलनाच्या विनिमय दराशी तुलना करून ही क्रयशक्ती काढली जाते. द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड कोऑपरेशन (OECD) तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) विविध देशांच्या चलनांच्या क्रयशक्तीचा अभ्यास करून ती प्रसिद्ध करतात. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बाकी देशांच्या चलनाची क्रयशक्ती किती आहे हे प्रसिद्ध केले जाते. २०२२ च्या या अहवालानुसार एका डॉलरची क्रयशक्ती २२.३२ रुपयांच्या समान आहे; तर एका ब्रिटिश पाउंडची क्रयशक्ती ३५.२० रुपयांच्या समान आहे; म्हणजे अमेरिकेत एका डॉलरमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी विकत मिळतील त्या विकत घ्यायला भारतात २२.३२ रुपये लागतील तसेच ब्रिटनमध्ये एका पाउंडमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी विकत मिळतील, त्या विकत घ्यायला भारतात ३५.२० रुपये लागतील.
आता यावरून आपण सौरभ आणि जान्हवीच्या परदेशातील पगार आणि भारतातील पगाराची तुलना करू शकू. सौरभचे ६०,००० अमेरिकन डॉलर विनिमय दरानुसार ४९ लाख रुपये होतात (१ डॉलर = ८२ रुपये); मात्र ६०,००० डॉलरचे क्रयशक्तीनुसार १३.४० लाख रुपयेच होतात (१ डॉलर = २२.३२ रुपये); म्हणजे विनिमय दरानुसार जरी ४९ लाख रुपये सौरभला मिळत असले; तरी प्रत्यक्षात त्यातून १३.४० रुपये मूल्याचे खर्चच होऊ शकतात. आता हे सौरभच्या भारतातील पगारापेक्षा खूपच कमी आहे आणि म्हणूनच सौरभची अवस्था अशी झाली. दुसरीकडे जान्हवीचे ४८००० पाउंडपण विनिमय दरानुसार ४९ लाख रुपये होत असले ( १ पाउंड = १०५ रुपये) तरी पौंडचे क्रयशक्तीनुसार १६.९० लाख रुपये होतात (१ पाउंड = ३५.२० रुपये). ही रक्कम जान्हवीच्या भारतातील पगाराच्या जवळपास १.७० पट आहे. त्यामुळे जान्हवीचे राहणीमान आणि शिल्लक यांत चांगली वाढ झाली.
तात्पर्य काय; तर परदेशात स्थलांतर करण्याच्या संधीचे मूल्यांकन करताना विनिमय दरानुसार उत्पन्न किती हा एकच मापदंड ठेवून निर्णय घेऊ नये. आपले सद्यःस्थितीतील राहणीमान जपण्यासाठी परदेशी चलनात किती उत्पन्न असावे आणि त्यानुसार आपल्याला मिळणारा मोबदला हा पुरेसा आहे की नाही याचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे. अनेकदा परदेशातून परत येण्याचा निर्णय घेतानाही फक्त विनिमय दराचा विचार करून कमी होणारी आवक हा निर्णप्रक्रियेत महत्त्वाचा घटक ( अडथळा?) ठरतो. अशा वेळीदेखील ही क्रयशक्ती तपासून योग्य असा तौलनिक अभ्यास करून निर्णय घ्यावा. एकाच देशात खेड्यातून / छोट्या शहरातून मोठ्या शहरात / महानगरात जातानादेखील हा अभ्यास करायला हरकत नाही. Purchasing Power Parity (PPP तौलनिक क्रयशक्ती ) ची तोंडओळख व्हावी यासाठी हा लेखनप्रपंच.

अप्रतिम लेख. अगदी अडाणी माणसालाही समजेल इतक्या सुगम भाषेत सोदाहरण देवून अत्यंत क्लिष्ट विषय समजावून सांगितला आहे.
अत्यंत क्लिष्ट संकल्पना अगदी सामान्य माणसालाही सहज समजेल असे उदाहरण देवून अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. . परदेशी नोकरीला जाणार्या मित्रांना हा लेख जरुर पाठवावा असा आहे
क्रयशक्ती आणि विनिमय दर या संकल्पना क्लिष्टता टाळून उदाहरणांसह अतिशय सोप्या रीतीने समजावून सांगितल्या आहेत.
खूप छान लेख. उदाहरणे दिल्यामुळे समजण्यास अत्यंत सोपा होता. क्रयशक्तीचा विचार आधी केला पाहिजे हे समजले.