भाग ५ वा
समर्थ रामदास : भाग १
एका बाजूला समर्थांची ‘ब्रह्मांड रचनेहून जाड’ अशी काव्यरचना, दुसर्या बाजूला अंतर्नादचा जाणकार, रसिक वाचकवर्ग आणि काव्यरचनेविषयी भरभरून बोलावंसं वाटलं तरी ‘गौल्यता नाही वचनाची!’ अशी आत्मस्थिती!
तरीही ‘येत्न साक्षेपी जोडावा’ या उक्तीला अनुसरून समर्थांच्या काव्यरचनांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न!
समर्थांची काव्यरचना कशी?
‘अमृताचे मेघ वोळले’ अशी मधुर शैली समर्थांची नाही. अध्यात्माचे, नीतीचे घास ते मायेने भरवत नाहीत. ते करड्या पंतोजींसारखे आहेत. कधी दटावून, कधी कळकळीने, कधी दृष्टान्त देऊन ते शिकवत राहतात. या अर्थी ते शिक्षक आणि कवी म्हणून ‘शिक्षकवी’ आहेत. वृत्ते, धाटी, कवित्त, सवाया, शब्दचित्रं, ओव्या, आरत्या अशा विविध धाग्यांनी त्यांनी मराठी साहित्यात एक विशाल काव्यपट विणला आहे. या भव्य काव्यपटाचं रसग्रहण दोन भागांत आपण पाहणार आहोत. पहिल्या भागात छंदांचा; तर दुसऱ्या भागात अलंकार, शब्दचित्रे, हिंदी व मुसलमानी रचना या काव्यविशेषांचा विचार.
छन्दः पादौ तु वेदस्य| छंद हे वेदांचे पाय आहेत — म्हणजेच छंद नसतील तर वेद पंगू होतील. छंदांमुळे काव्याला सौंदर्य मिळतं, गेयता येते, पाठांतर सोपं होतं, आशयही पट्कन ठसतो; कदाचित म्हणूनच समर्थांनी छंदोबद्ध काव्यरचनांचा अवलंब केला असावा.
समर्थांच्या रचनांवर वृत्ताचे नाव लिहिलेले नाही. हा पट समोर ठेवताना अक्षरगण आणि मात्रा दोन्ही प्रकारांचा विचार करून मांडणी केली आहे. छंदोबद्ध रचनेत रामदासांनी गणमात्रांचे नियम काटेकोरपणे पाळलेले नाहीत. रचनेच्या बांधिलकीपेक्षा त्यांना शिकवणुकीचं महत्त्व अधिक होतं. त्यांच्यातल्या कवीपेक्षा त्यांच्यातला शिक्षक अधिक प्रभावी होता. अर्थात यामुळे त्यांचं कवित्व कमी ठरत नाही; ते प्रत्येक रचनेत नवं काही देऊन जातं — त्याचंच हे रसग्रहण.
१)चतुर्भुजावेदमाता|वीणापुस्तकधारिणी
वंदिता अंतरी वाढे|स्फूर्तीरुपे प्रकाशते||
ही अष्टाक्षरी रचना सर्वपरिचित अनुष्टुप छंदातली.
याखेरीज चार प्रकारच्या अष्टाक्षरी रामदासांनी रचल्या आहेत.
२)अष्टाक्षरी
ताळे ताळे तिहीं ताळे |
नाना ताळे भूमंडळी |
ये दरी सुंदरी गुंफा |
नेटकी गायनी कळा ||
समर्थांचा अनुप्रास छोट्या रचनांमधूनही लक्ष वेधून घेतो.
प्रमाणिका, समानिका, नाराचिका यासुद्धा अष्टाक्षरी पण त्यांची बांधणी वेगवेगळी आहे.
३)प्रमाणिका
विषे भरूनिया स्तनां|
कुटील धात पूतना|
हरीस होय माउसी|
बळेंचि सोखिली कसी||
स्तनांमध्ये विष भरून, बाळकृष्णाची मावशी होऊन आलेल्या पूतनेचं रेखाटन चार ओळींत रामदास करतात.
याच आठ अक्षरांच्या मेळ्यात
भ्रमे भुलेल चोर तो|
तया हरामखोर तो|
तयास हाल हाल रे|
झडेल बाल बाल रे||
असे दरडावतातही.
प्रमाणिकाचा भाऊबंद —
४)समानिका
यातला चित्रदर्शी वीररस बघा!
च्याप वोढिले करार|बाण सोडिले सरार|
पिछ्य वाजती सरार| आरपार होतसे|
थाडफाड थाडफाड| युद्ध होतसे भडाड|
वाड वाड ते निवाड| ताड ताड तोडिती|
५)नाराचिका
हळुहळूच बोलणे|हळुहळूच चालणे|
अशी पुसटती झलक या अष्टाक्षरीची मिळते.
६)इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, उपजाति
दशानन सर्व दिशाहि दाही|
जिंकोनि त्रासी विबुधां सदाही|
आकांत चवदा भुवनासी जाला|
या कारणें जन्म तया अजाला||
सहज साधलेलं यमक इथे लक्षवेधक ठरतं.
७)शालिनी वृत्तातून समर्थ
‘आजी माता सुंदरी तेचि कन्या’ अशी विविध नात्यांची गुंफण घालतात; तर कधी :
‘आला आला जीव जन्मासि आला|’
‘गेला गेला बापुडा व्यर्थ मेला’ अशी अटळता दर्शवतात.
कधी समाजातल्या भ्रामक समजुतीही गुंफतात आणि कानउघाडणी करतात. ढोपरात म्हणे लोक ‘जीवपोळी’ घालतात, पोटात झाडांची जाळी वाढते असं सांगतात, अमुक बघितलं तर डोळे जातात, विचारायला गेलं की कावळा शिवला असं सांगतात…
‘बाऊ बाऊ बाळका चाळवावे’ हे चुकीचं सांगणं योग्य नाही असं म्हणत रामदास बजावतात, ‘पाही पाही सार शोधूनी पाही|’
८)स्वागता
यज्ञयाग केले, मल्लिकार्जुनाला कोटीवेळा पाहिलं तरी राममुखाची सर नाही! हे छोट्याशा रचनेतून वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावणं हे या ‘शिक्षकवी’चं कर्तृत्व!
अश्वमेध घडले शत ज्याला|
सोमयाग गणना नहि त्याला!
कोटिवेळ मल्लिकार्जुन केला
रामचंद्र वदना जरि आला|
९)भुजंगप्रयात
विविध रसांसाठी रामदासांनी भुजंगप्रयाताचा चपखल वापर केला आहे. त्यांच्यातल्या कवीने या वृत्ताला तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घातले आहेत.
‘नमूं सर्व कर्ताचि तो विश्वभर्ता|
गुणी शोकहर्ताचि हर्ता विवर्ता’
असा कोमला वृत्ती अनुप्रास,
‘तया रावणा क्रोध पोटीं भडाडी’ ‘धुधुकार सांडित घर्डीत दाढा’ सारखा परुषा वृत्ती अनुप्रास,
‘अधोमूख विष्ठेमधें मायपोटी’ असा बीभत्स रस,
‘बहुतां दिसांच्या वयोवृद्ध मुला…’ असं खोचक संबोधन आणि पुढे
तयें जननीच्या कुळा निंदितोसी|
वृथा पुष्ट तू मानवांमाजि होसी|
अशी कानउघाडणीही या केवळ १२ अक्षरांच्या वृत्तातून ते प्रभावीपणे करतात.
१०)द्रुतविलंबित
रिपुकुळांतक राघव हा रणी
सकळ शूर प्रताप चुडामणी
सकळ बंद विमोच रणांगणी
विबुध कारण कारण कारणी
ण चा अनुप्रास गेयता वाढवणारा ठरतोच शिवाय रिपुकुळांतक – हा समास रामाचं कर्तृत्व अधोरेखित करणारा ठरतो.
११)आनंदवेळ मनीची मन वेळ वाहे
उल्हासवास भरला गगनीं न साहे
बेफाम सो हरकती दुरु मारु कुत्ते
मार्तंड वैभव तरी करी काम फत्ते
वसंततिलकेचा आस्वाद घेत असतानाच भाषांची अशी धक्कादायक सरमिसळ मजा आणते.
१२) मालिनी
वण वण वण हिंडे चित्त वृद्धाप्यकाळी
भणभणभण माशा भोवती सर्वनाळी
असं म्हणत
गडगड कफ कंठी सर्वदा दाटलासे
भडभड भड वांती वस्त्र सर्वांग नासे
असा करुण रसोत्कर्ष एकीकडे; तर दुसरीकडे
रजनिचर विभांडी दो करें पोट फाडी|
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी
असा वीर रस!
नटवर नट नाट्य नाट्य नटवांग संगी
गजवदन सुरंगी रंग साहित्यरंगी
असं नृत्यनाट्य
एकीकडे आणि
दुसरीकडे
हरिसुतदुहिता ते मुख्य आधीं वदावी… (जिच्यामुळे)
मतिकमळ विकासे सर्व साहित्य भासे!
हरिसुतदुहिता कोण? रचनेत असं कूटही!
१३)चामर – रौद्ररूपाचा प्रकर्ष
‘रुद्र हा समुद्र देखताक्षणी उठावला’ किंवा
‘हातपाय मान माज वोढितें पछ्याडितें
आड्चणीत आड्कऊनि पीळपेंच काढितें
अशा रौद्ररूपाबरोबरच चामर
वेद श्रुती नेति नेति तो मनासि नाकळे
किंवा
इंद्रनीळ रंग राम शाम धाम योगिया
समर्थांच्या वैराग्य आणि सगुण रेखाटनातही खुलून दिसतं.
१४)पंचचामर
हेही रौद्ररूप चितारणारं तेजस्वी वृत्त. समर्थांच्या शब्दांनी साक्षात भूतपाळाचं नृत्य जिवंत होतं. ‘गळा कराळ मुंडमाळ व्याळ लाळ गाळितो|
करी कपाळ भूतपाळ शूळ ते झळाळितो||
१५)शिखरिणीतल्या काही निसर्गदर्शक रचना!
महीमुर्वी पृथ्वी| वसुमतिथरा| भार धरितें|
बहु सेते भातें| आगणित पिकें| सौख्य करितें |
असं रंगवलेलं पृथ्वीपंचक
संव्हार पंचकात कलियुगातील लोकांना सावध करतात :
अनावृष्टी लोकीं| शतक वरुषं| मेघ न दिसे!
रवी जाळीताहे| गिरिवर धरा| दग्ध भुवने|
तरु वेली नद्या| बहुविध स्थळें| शुष्क जिवनें|
आणि दामयमकाचा आलंकारिक प्रयोगही करतात.
स्मरारीचा दाहो| सितळ करी| त्यासि भजिजे
जिजे तो रामाते| सदय हृदयांत| कवळिजे||
१६)शार्दूलविक्रीडितासारख्या मोठ्या रचनेतही या कवीने विलक्षण बहार आणली आहे.
भोगें रोग जडे स्वसुख बिघडे उद्वेग चिंता पडे|
गर्वें गर्व चढें महत्त्व न चढें संताप देहा चढें||
स्वभावाच्या अतिरेकानं होणारे परिणाम दाखवणाऱ्या याच वृत्तात
रामू आठविता गुणी सगुणता विश्रामता देखतां|
असं रामाच्या शीतलतेचं चांदणंही ते पांघरतात,
देवामंडण दैत्यखंडण उभा वक्रांग ठाणे रणीं|
असं सगुण दर्शन घडवतात.
‘नाना काव्य रसाळ भव्य करणे’
या धारणेतून
‘जेणे कीचक मारला सवंदळी| घालून पायातळी’
हा वीररस उभा करतात आणि
‘राया रंक करी महत्त्व उतरी’
अशी प्राक्तनाची जाणीव करून देतात.
धोंडे संघटले|कितेक फुटले| काळे कडे तुटले|
झोतावे सुटले| दरे उतटले| पाटारसे वाटले||
असं पुष्पयमकही साधतात.
१७)स्रग्धरा
(चाल :ध्यायेदाजानुबाहुं) या २१ अक्षरी वृत्तातूनही विविध विषय समर्थांनी मांडले आहेत.
लोकीकी घात होता| जिवलग मरता| दुःखशोकी पडावे|
संसारी चर्फडावे|तडफड करिता|बोंबलावें रडावे|
हाहा हाहा म्हणावे| करकमळी तोंड| हाणोनि घ्यावे|
शोकाकुल जीवनाविषयी वाचत असताना बोंबलावे, करकमळाने तोंड हाणणे ही तिरकस भाषा हसूही आणते.
रामाच्या झळझळीत तेजाचं वर्णन करताना रामदास म्हणतात,
‘उद्यन्न मार्तंड कोटि|
प्रकट रुचि नभा| कुंडले द्यूतकर्णीं|’
रामाचा पराक्रम दाखवतात…
कानाडी राम वोढी| गगन गडगडी|
वीज जैसे कडाडी|
वज्राची शक्ती थोडी| रघुपति शर तो| मेरुमांदार फोडी|
स्रग्धरेतली आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारी रचनाही अंतर्मुख करते…
चौऱ्याशी लक्ष योनी| बहुविध भ्रमणें| व्यर्थ देहाभिमानें|
नाना स्थाने विधाने|अगणित जननी| जनकें कोण जाणे||
आजवर किती ठिकाणी जन्म झाला, किती माता, किती जन्मदाते झाले असे प्रश्न व्याकूळ करतात.
१८)समर्थांच्या ओव्या १२/१० अशा; पण सैल रचना असलेल्या. तिसऱ्या चरणात यमक साधलेलं असतं. ज्या शब्दाने शेवट त्याने पुढच्या ओळीची सुरुवात अशी गंमतही यात गुंफली आहे.
शौच केला तेणे सुचीर्भुत जाला|
जळस्नाने केला मळत्याग|
मळत्यागे जाले शरीर निर्मळ|
अंतरीचा मळ कैसा जातो?
१९)समर्थांचे अभंग चतुश्चरणी. साधारणपणे ६/६/६/४ अशी रचना असते. यमक तिसऱ्या चरणात.
सुखाचे सांगाती| सर्वहि मिळती|
दुःख होतां जाती| निघोनिया|
निघोनिया जाती संकटाचे वेळे|
सुख होता मिळे समुदाव||
अगदी सोपी पण चिरसत्य सांगणारी रचना!
२०)घनाक्षरी
तीन चरणांत एकच यमक असा हा प्रकार! प्रत्येक चौथ्या चरणाचं एकच यमक!
हटांग हटवर|कटांग कटवर
नटांग नटवर|थक्कितसे रे||
धिलांग धिधिकिट|थोगांग थरिकिट|
कडधिक ध्रिमिकिट |बिकट से रे|
संगीताचे जाणकार असलेल्या समर्थांनी मृदंगाचे बोल गुंफलेले दिसतात.
२१)अकराक्षरीतून कथेची मांडणी हे विलक्षण!
खवळले रजनीचर भारे|
भडकितां तडके भडमारे|
अवचिता गर्जे भुभुकारे|
रगडिले गमके दळ सारे||
२२)श्रवणाभरण (चाल: अयि गिरिनंदिनि) रामपंचायतानासह अंगद, सुग्रीव, बिभीषण, जांबुवंत यांचा जयघोष समर्थ करतात…
जय रघुनंदन|पूर्ण कृपाघन|
वामांकी सति शोभतसे|
सव्य लक्षुमण|भरत शत्रुघन|
सन्मुख मारुती तो विलसे|
अंगद सुग्रीव| भक्त बिभीषण|
जांबुवंत गुज| गर्जतसे|
समर्थांनी मात्रावृत्तांततही वैविध्यपूर्ण रचना केल्या आहेत.
२३)बालानंद
जगलिना म्हणून जगाया
नरहरी सुख दे जगा या
वरद दे मजला तुज गाया
यात समुद्रक यमकाचीही योजना करून समर्थांनी बहार आणली आहे.
२४)मंजरी(लीलारति) २+८+८+३
सिंहापुढे कोल्हा मिजास दाखवतो! मानवी प्रवृत्ती दाखवणारी रचना
मज रे सिंहाच्या पिल्याची बाळलीला|
देखूनि जंबुकें मद केला आगळा|
२५) साकी(लवंगलता) २८
भविष्य वदला वाल्मिक ज्याला चुकविल कोण तयाला|
विकल्प रचला तटस्थ पाहतां घारी अंश नेला|
तटस्थ शब्दाने अधोरेखित झालेली अटळता वाल्मीकीचं भविष्य सत्यात येईल याची जाणीव करून देते.
याखेरीज
स्वर्गंगामधील नव्हेचि सुंदर| जन्म धुरंधर| इंद्राचा पुरंदर म्हणून उल्लेख हा अनुप्रास,
‘भजनीं गुज हे मज सांपडले’ असं सांगत विचारांच्या जंजाळातून रस्ता दाखवणारं तोटक,
विविध पंचकं खुबीने गुंफणारं रथोद्धता,
काक विलोकन हंस करीना
सूर्य कदा रजनीस वरीना|
विरुद्धार्थी जोड्यांचा दृष्टान्त मांडत सत्त्व आणि तम यांच्यातला भेद स्पष्ट करणारं दोधक,
जनी हरकसी वरकसी बरळसीसी
अशी मजेशीर रचना असलेलं वंशमणी,
केतकी त्या जुती मालती सेवती|
मांडवी वोळल्या डोलती तोलती||
फुलांची नावं गुंफत मांडवावर डोलणाऱ्या वेलींचं स्रग्विणीतून रेखाटलेलं चित्र,
धर्माभिमानी क्षेत्राभिमानी| विद्याभिमानी विप्राभिमानी| जानाभिमानी सत्याभिमानी| भक्ताभिमानी कोदंडपाणि||
मंदाकिनी छंदात केलेली ही रामरायाच्या व्यक्तित्वाची गुंफण,
परमसुंदर| रुप शामल| इंद्रनीळकीळ|कांतिकोमल||
श्रीरामाची सावळकांती, पराक्रम, कीर्ती, भक्तवत्सलता वर्णन करणारी सवाई,
मान थोर यान थोर तो समोर मोरया|
सार सारसा विचार तोचि राखतो रया||
समोर मोरया, सार सारसा, अशा यमकांमुळे गेय झालेले देवप्रिया,
सौख्यदायक देवनायक तो विनायक वंदिला| म्हणणारा सीता छंद,
अवगुण आपले झांकी|आंगावेगळे टाकी|सुख नाही परिपाकी|कष्ट होते लोकिकी|| ही शिकवण देणारा दिग्पाल,
सकळ चराचर कोठुनि जाले कोठे निमाले तरी|
दास म्हणे जरी समजसी तरी मुळींची सोय धरी||
मुळातला प्रश्न मांडणारं सूर्यकांत वृत्त …मी कोण? कुठून आलो? कुठे जाणार? आपलं कूपमंडूकपण अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना गळून पडतं… मी माझं — किंबहुना मीच आणि माझंच ऐवजी अवघं विश्व आपल्याला व्यापून उरतं.
विश्वाची प्रेरणा आणि समर्थांच्या काव्यपटाचा आशयधागा एकच आहे. काव्याचा आस्वाद घेत असताना तो धागा गवसला तर मुळापर्यंत जाण्याचं सामर्थ्य मिळू शकेल… तो मिळेपर्यंत समर्थ रचनांच्या वाचनातून अपार आनंदच लाभेल.
छंदविषयक भागाचा समारोप करताना मोहिनी वृत्तातील एका रचनेचा आधार घेते :
बहु श्रवणे घटेल ज्ञाता होउनियां ठेलों| सिद्धपणाचा थाटा अंगी घेऊनी बैसलो||
उथळ माणसाने वरवर काहीतरी अभ्यासावं, ज्ञानी म्हणून शाल पांघरून बसावं – अशा दांभिकाचं हे शब्दचित्र!
समर्थांच्या काव्यरचनांमधील छंदांचा मागोवा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न मांडताना घटेल ज्ञात्याच्या सिद्धपणाचा आवेश अर्थातच नाही. समर्थांच्या रचना, काव्यप्रयोग अंतर्नादच्या रसिक वाचकांपुढे ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
(क्रमश : )
