पुनर्भेट नॅशनल पार्कची ४ :  विरहाच्या आणि मिलनाच्या गोष्टी  

  दि.  १४.११.२०२३ 

       नॅशनल पार्कमध्ये नदीच्या आसपास एक जखमी माकड फिरत आहे असा निरोप आम्हांला मिळाला. आम्ही त्या माकडाला शोधण्यासाठी बाहेर पडलो. पार्कमध्ये नेहमी चिंचा बोरे विकणाऱ्या बायकांना विचारलं तर त्या म्हणाल्या, “आता तर इकडेच होतं! बहुतेक त्या दिशेला गेलं.”  दुसरी म्हणे, “या दिशेला गेलं.”  पण माकड काही त्या दिवशी सापडलं नाही. 

१५.११.२०२३ 

    मी कार्यालयात माझ्या कामात गढले होते; तर बाहेर आरडाओरडा  ऐकायला आला. मी बाहेर येऊन पाहिलं तर ऱ्हीसस माकडांचा एक कळप तिथून जात होता. त्यात ते जखमी माकड होतं. त्याच्या उजव्या हाताचं पूर्ण साल गेलं  होतं; त्यामुळे  तो हात लालभडक दिसत होता. आम्ही घाईघाईने एक पिंजरा त्या कळपाच्या बाजूला ठेवला.  पिंजऱ्याचं दार प्रशांतने   उघडून ठेवलं. मी ऑफिसमधून एक केळं मागवलं. मी त्या जखमी माकडाला केळं दाखवलं तसं ते केळ्याच्या आशेने पुढे आलं. मी केळं पट्कन पिंजऱ्यात फेकलं.  ते माकड केळं घेण्यासाठी आत पिंजऱ्यात शिरलं. प्रशांतने पट्कन पिंजऱ्याचं दार बंद केलं; तसं ते माकड मागे फिरलं आणि दरवाजावर हाताने धडका मारू लागलं. त्याच्या कळपात एक चांगला जाडजूड नर होता. तो नर दात विचकून आमच्या अंगावर येऊ लागला.  हाकलल्यावर  तो थोडा दूर जाऊन एका झाडावर जाऊन बसला; पण तोंडाने मोठमोठा आवाज काढत होता. ते पकडलेलं जखमी माकड साधारण चार पाच किलोचं छोटेखानी होतं. त्याच्या कपाळावरचे केस मागे फिरवल्यासारखे होते. त्याचं बूड लाल रंगाचं होतं. ही ऱ्हीसस माकडं होती.  त्या कळपातला झाडावर बसलेला  नर चांगलाच बळकट होता. त्याचं वजन तर दहा किलोपर्यंत असावं. आम्ही माकडाचा पिंजरा ऑफिसच्या मागच्या बाजूला नेला. त्या छोट्या पिंजऱ्यातून त्याला नेहमीच्या मोठ्या उपचार पिंजऱ्यात काढून ठेवलं. आम्ही हे सगळं करताना झाडावरचं ते मोठं माकड हे सगळं बघत होतं. आम्ही त्या जखमी माकडाच्या हातावर औषध फवारलं आणि पिंजऱ्याचं दार बंद करून संध्याकाळी सगळे घरी निघून गेले. 

१६.११.२०२३ 

     मी सकाळी ऑफिसला आले तर  प्रशांत धावतच आला. तो म्हणाला, “मॅडम , ते कालच आपलं माकड दरवाजा उघडून पळून गेलं!” मी पिंजऱ्याकडे धावत गेले. मी पिंजऱ्याकडे पाहिलं पिंजऱ्याची  कडी कोणीतरी बाहेरून उघडली असावी हे उघड होतं. प्रशांत म्हणाला, “आपण काल गेल्यावर तो त्याच्या कळपातला तो मोठा नर आला असावा आणि त्याने आपल्या मित्राची सुटका केली असावी.” आम्ही पुन्हा एकदा त्या जखमी माकडाला शोधायच्या मोहिमेवर पार्कमध्ये फिरू लागलो; तर आमच्या ऑफिसमधला पंकज सांगत आला, “ती दोन्ही माकडं नदीच्या तीरावर बसली आहेत. छोटं  माकड मोठ्या माकडाच्या केसात बघतं आहे.”  पुढे पंकज हसत म्हणाला, “मॅडम , तो त्या मोठ्या माकडाचा मॉलिशवाला आहे म्हणूनच तो त्याची सुटका करून घेऊन गेला.” आम्ही हसू आवरत  पंकजने सांगितलेल्या दिशेने नदीच्या जवळ गेलो. दुरूनच पाहिलं तर खरोखर दोघं एकमेकांच्या जवळ बसले होते. जणू दोन जिवलग मित्र शिळोप्याच्या गोष्टी करत आहेत ,असं वाटत होतं; पण त्यांना आमची चाहूल लागली आणि ते चट्कन दूरवर पळून गेले. 

१७.११.२०२३ 

       त्या  दिवशी आमच्या रेस्क्यू टीममधला दिनेश म्हणाला, “मी आज एकटाच जातो आणि लपून बसतो.  ते जखमी माकड दिसलं की लगेच डार्ट मारतो.” आम्हांलाही ते पटलं. दिनेश माकडांच्या नेहमीच्या बसण्याच्या जागी नदीतीरावर गेला. त्याला लांबून ती दोन नरांची जोडी दिसली. त्याने लांबूनच बंदुकीने बेशुद्धीच्या औषधाचा डार्ट मारला. नर डार्टच्या आवाजाने घाबरून पळून गेला. दिनेश  त्या माकडाला घेऊन आला. त्याच्या हाताचं आम्ही ड्रेसिंग केलं. या वेळी मात्र पिंजऱ्याला चांगलं कुलूप लावून ठेवलं. थोड्या वेळातच तो मोठा नर त्याला शोधत आला. पिंजऱ्यात बंदिस्त झालेल्या आपल्या मित्राला बघून त्याने तोंडाने हुहू असा आवाज काढला. पिंजऱ्यातील जखमी माकडानेही त्याला तसाच आवाज काढून प्रतिसाद दिला. तो  मोठा नर उतरून पिंजऱ्याच्या दरवाजाच्या जवळ आला. त्याने दरवाजा हाताने ओढायचा प्रयत्न केला; पण यावेळी मात्र तो दरवाजा उघडू शकला नाही. मी मनात म्हटलं, “अरे तो बरा झाल्यावर पुन्हा सोडते तुझ्या जवळ.” तो निरुपाय झाल्यासारखा निघून गेला; पण त्यांनतर तो प्रत्येक संध्याकाळी यायचा, आपल्या मित्राची खुशाली विचारून  निघून जायचा; पण मित्राच्या विरहाची वेदना त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसायची .  

       गेल्या वर्षी मार्चमध्ये आमच्याकडील  श्रीवल्ली वाघिणीने तीन पिल्लांना जन्म  दिला. बाजीराव हा वाघ पिल्लांचा पिता होता. श्रीवल्ली गरोदर झाल्यावर लगेच बाजीराव आणि श्रीवल्लीला वेगळं केलं होतं. श्रीवल्लीला दूध न आल्याने झालेली पिल्लंही   वेगळी करावी लागली आणि ती बाहेरच्या दुधावर मोठी करण्यात आली. त्या वेळी मी पार्कमध्ये नव्हते. मी जूनमध्ये पार्कची पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले तोपर्यंत पिल्लं  मोठी झाली होती; परंतु त्यानंतर बाजीराव आणि श्रीवल्ली बराच काळ वेगवेगळेच होते आता यांना आपण वेगवेगळं न ठेवता पुन्हा एकत्र करू असा आम्ही विचार केला; परंतु वाघ-वाघिणींना एकत्र करणं ही प्राणिसंग्रहालयातील एक अतिशय कठीण गोष्ट आहे. जर दोघांपैकी एकाच्या मनात दुसऱ्याबद्दल राग असेल; तर तो वाघ दुसऱ्याला कधी कधी मारूनही टाकतो; त्यामुळे त्यांच्या दोघांचं एकमेकांशी वागणं प्रथम बाजूबाजूच्या पिंजऱ्यांत ठेवून निरीक्षण करावं लागतं. बाजूबाजूला राहताना दोघंही एकमेकांवर गुरगुरले नाहीत किंवा एक – दुसऱ्याला मारायचा प्रयत्न केला नाही; तर ते एकत्र राहू शकतात हा निष्कर्ष काढला जातो; पण तरीही दोघांना एकत्र सोडताना दोन-चार माणसं जाळीजवळ उभी करावी लागतात. वाघ-वाघीण एकमेकांना मारण्यासाठी भिडलेच; तर त्यांना पाण्याचे फवारे मारून, मोठ्याने आवाज करून वेगळं करावं लागतं.  मी माझ्या मनातील गोष्ट आमच्याकडच्या रेस्क्यू पथकातील हरिश्चंद्र भोईर याला बोलून दाखवली. भोईर हा पार्कमधील अतिशय धाडसी, हुशार आणि अनुभवी आहे. त्याने ती गोष्ट लगेच मनावर घेतली. वाघांच्या पिंजऱ्यांची स्वच्छता करणाऱ्या गोपाळ या मजुराचा अनुभव मी विचारला. तो म्हणाला, “मॅडम, बाजीराव आणि श्रीवल्ली एकमेकांशी प्रेमाने वागतात. त्यांना एकत्र सोडलं तरी ते एकमेकांशी भांडण करणार नाहीत.”  गोपाळ पिंजरे साफ करताना त्यांना वर्षानुवर्षे  रोज जवळून बघत होता म्हणून गोपाळचं म्हणणं महत्त्वाचं होतं. 

दिनांक २९/१/ २०२४ 

    आज आम्ही सगळेजण जय्यत तयारीनिशी वाघांच्या पिंजऱ्यावर गेलो. पिंजऱ्याच्या वर चढून तिथून प्रथम बाजीरावला बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला . बाजीराव नेहमीप्रमाणे बाहेर आला. तो  १० – १५ मीटर लांबी रुंदी असलेल्या सेकंडरी  पिंजऱ्यात   फिरू लागला. मी वरून बाजीरावचं वागणं न्याहाळत होते. बाजीराव शांतपणे पिंजऱ्यात फिरत होता. मजुरांनी  श्रीवल्लीच्या छोट्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. श्रीवल्ली शांतपणे बाहेर आली. आम्ही वरून धडधडत्या छातीने त्या दोघांकडे बघत होतो. श्रीवल्ली धावतच बाजीरावाकडे गेली. तिने तोंडातून अस्फुट डरकाळी फोडली. बाजीरावने बसल्या जागेवरून तिच्याकडे नजर टाकली.  श्रीवल्ली बाजीरावाच्या  जवळ आली. दोघं आपापले चेहरे  एकमेकांवर घासू लागले. जणू खूप काळाने भेटलेले दोन मित्र असावेत तशीच ती दोघं एकमेकांशी वागत होती. आम्ही सगळ्यांनी नकळत टाळ्या वाजवल्या. वर्षभराच्या विरहानंतर झालेली वाघ-वाघिणीची भेट मला खूप हृदयस्पर्शी  वाटली .  

           दोन जिवलग मित्र असलेल्या माकडांना उपचारासाठी का होईना  दूर केल्यामुळे मनाला   वाटत असलेली रुखरुख त्या दिवशी थोडी कमी झाली. 

Author

Leave a Reply