गेले ते दिन गेले

कोरा कागद… निळी शाई… 

आम्ही कुणाला भीत नाही…

दगड का माती…

असे खेळ खेळत मोठी झालेली आपली पिढी ! या निळ्या शाईने आपल्याला सहनशीलता दिली, उज्ज्वल भवितव्य दिलं, लढण्याचं बळ दिलं! पेनामध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी…

दुकानदारही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे – कधी शाई हातावर सांडायची – ती तशीच डोक्याला पुसायची… 

कधी शर्ट खराब व्हायचा; तर कधी चड्डी! 

 या रांगेनंच आमच्या पिढीला सहनशील बनवलं. 

तो शाई मिळाल्याचा आनंद भारीच असे. 

हीच सहनशीलता पुढे रक्तपेढीत काम करताना कामाला आली. पुन्हा पुन्हा त्याच त्या लॅटेक्सच्या रबरी नळ्या व बोथट झालेल्या सुया वापरून किती जणांनी रक्तसंकलन केलेले आहे?

आमच्या पिढीने आई-बापांचा खच्चून मार खाल्ला; भरीस भर म्हणून एकत्र कुटुंबातील काका, काकी, मावशी, आत्या, मामा, मामी, आजी, आज्जा आणि उरलासुरला गल्लीतील मोठ्या माणसांचाही! तरीही त्यात खूपच मजा होती राव…

शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती. कान धर, कोंबडा हो, बेंचवर उभा रहा, अंगठे धर, वर्गाबाहेर उभा रहा – अशा सगळ्या शिक्षा निमूटपणे हसत-खेळत सहन केल्या… शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या; यातूनही सहनशीलता वाढली;  

त्या शिक्षणाची गोडीपण न्यारीच होती.

बालपणी अंगी बाणलेली ही सवय रेसिडेंसीमध्ये चांगलीच कामाला आली. JR असताना SR च्या, SR असताना CR च्या व CR असताना Lecturer च्या शिव्या खात-खातच आपण MD झालो. सलग २४ तास न कंटाळता Emergency Duty  केली. एकाच दिवसात अर्धा डझन PM( शवविच्छेदने ) केली. भारत फोर्जसारख्या ठिकाणी एकाच दिवसात ५०० जणांचे रक्त संकलन करून घेतले. रायचूरसरांपुढे उपाशीपोटी तासन् तास Grossing** केले.

जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी… दप्तरे म्हणजे तरी काय – तर कापडाची पिशवी; फार तर काय त्यालाच आतून कंपास ठेवण्यासाठी केलेला कप्पा… असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही! शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची आणि ‘आई खेळायला चाललो’ असं ओरडायलापण मजा यायची! 

वैद्यकीय महाविद्यालयात या दप्तराची जागा ‘एप्रन’ने घेतली. बाॅसचा ‘Full Sleeve एप्रन’ मनाला भुरळ घालत असताना रेसिडेंसीची पहिली काही वर्षे MBBS च्या ‘एप्रन’वरच काढावी लागली.

‘वॉटर बॅग’ नावाचा प्रकार तर आमच्या बालपणी अस्तित्वातच नव्हता. सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचे… हौद धुतलेला आहे का नाही, पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचार मनात नसायचा; पण पूर्ण तहान भागवायची, शर्ट वर करून किंवा शर्टच्या बाहीलाच तोंड पुसायचं. रेसिडेंसीमध्येसुद्धा यात फारसा बदल झाला नाही. रूममध्ये पाण्याचा नळ हा कंसेप्टच नव्हता. अंघोळीच्या बादलीतच पिण्याचे पाणी भरून ठेवावे लागत असे.

शाळेत पायीच जाणारी आमची पिढी. सायकल म्हणजे चैन असणारा तो काळ. सायकल असली तरी तिची चेन सारखी सारखी पडायची. ती चेन बसवताना नाकी नऊ यायचे आणि हाताबरोबर तोंडही काळे व्हायचे. काळे हात मातीने पुसायचे – लईच भारी ! जुन्या सायकलच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात चालायचे. कुणाची सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा. दहा वेळा भेटून, मध्यस्थ टाकून, घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची. आधी मधून हाफ पॅडल मग हळूहळू  टांग मारायची; मगच नंतर डबल सीट… 

MBBS करताना स्वतःची ॲटलास सायकल असण्याची ‘श्रीमंती’ माझ्याकडे होती. ती मी रेसिडेंसीपर्यंत जपली; मग तिची जागा Luna TFR ने घेतली.

दहावीपर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची. चांगल्या स्थितीतील पुस्तके कुणाकडे सापडतील याचा दोन-चार महिने आधीच शोध घेतला जायचा. ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्याकडे चकरा मारल्या जायच्या आणि वशिला लावला जायचा. पुस्तके व्यवस्थितरीत्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची. शक्यतो निम्म्या किमतीत व्यवहार ठरवला जायचा. पुस्तके मिळाली की स्वर्ग दोन बोटे उरायचा, कव्हर घालायला झिंग असायची! 

माझी पॅथाॅलाॅजीची पुस्तके मी चंद्रकांत कोतकर या माझ्या ज्येष्ठाकडून निम्म्या किमतीत मिळविली होती. त्यासाठी त्याच्या व माझ्या तीर्थरूपांचा बालपणीचा ‘दोस्ताना’ कामी आला होता.

आपल्या बालपणी जुन्या वह्या सगळ्या जपून ठेवल्या जायच्या. वह्या वापरतानाही जपूनच वापरल्या जायच्या. जास्तीत जास्त कोरी पाने ठेवली जायची. सगळी कोरी पाने वेगळी काढायची आणि मग ती एकत्र केली जायची. पुन्हा नव्याने एखादा प्रेसवाला शोधायचा आणि किमतीची घासाघीस करून वह्या बाइंडिंग करून आणायच्या – त्यासाठी सतरा चकरा माराव्या लागायच्या; ‘उद्या या, परवा या, अजून झाल्या नाहीत, नंतर या!’ असं बरेच दिवस चालायचं. शेवटी एकदाच्या वह्या मिळाल्या की उड्या मारत घरी यायचं. एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडून वशिला लावायचा. दहा वेळा मागणी करावी लागायची. यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली…

वैद्यकीय महाविद्यालयात वह्यांची जागा कागदाच्या दस्त्यांनी व जर्नल्सनी घेतली. क्लिप असलेल्या फाईलमध्ये कागदाच्या दस्त्यांमधील काही कागद टाकले की रोजचे काम भागायचे.

बालपणी वर्षभरात कपड्यांचे दोनच जोड मिळायचे – त्यांतला एक शाळेचा असायचा; तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघावी लागायची; तोपर्यंत ठिगळ लावलेले शर्ट, चड्ड्या वापराव्या लागायच्या. चड्ड्या नेमक्या नको त्या जागेवरच फाटायच्या. त्यावर मग ठिगळ लावून घेतले जायचे. विशेष म्हणजे याचे कोणालाही काहीही वाटायचे नाही. दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे.

वैद्यकीय महाविद्यालयात असतानादेखील यात काही फार फरक पडलेला नव्हता. फक्त ‘ठिगळा’ची जागा बदलली होती. सीटवरचे ‘ठिगळ’ आता घोट्यावर आले होते – कशासाठी – तर ‘नॅरो बाॅटम’ ची ‘बेल बाॅटम’ करण्यासाठी !

‘मागितलं की हजर’ असं कुणालाच काही मिळाले नाही…

यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली…

बरं! त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती – त्यात गरीब, श्रीमंत असा भेदभाव नव्हता. पोराचे सगळे मित्र माहिती असायचे, कुठे जातो, काय करतो यावर नजर असायची. चुकला की पहिले कानफटवले जायचे. उगाचच लई लाड नव्हते. कामापुरतेच कौतुक असायचे; त्यामुळे पोराचे पाय जमिनीवरच राहायचे… मोठ्यांचा धाक होता, दडपण होते, मानसन्मान होता. पोरगं इकडं तिकडं दिसलं तर दहा जण विचारायचे, ‘काय रे ? तू अमक्याचा ना? इकडे काय करतोस?’ उलट उत्तरे देण्याची बिशाद नव्हती… भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशीच झोपावे लागायचे… घरातीलच एखादी आज्जी, आत्या, मावशी गुपचूप ताट आणून प्रेमाने जेवण भरवायची. पोरगं मुसुमुसु रडत रडत, एका हाताने डोळे पुसत पुसत चार घास खायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं… दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं. आपण म्हणू तसेच होईल असे नाही हे पोराच्या लक्षात यायचे. त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची. ‘हे केले तर ते देईन’ अशी कुठलीही प्रलोभने नव्हती.

ताटात जे वाढले ते गुपचूप खावे लागायचे. कोणतेही नखरे चालत नव्हते; नाहीतर उपाशीच झोपावे लागेल हे माहिती होते…

वैद्यकीय महाविद्यालयांच्या मेसमध्ये तरी अशी काय वेगळी परिस्थिती होती ?

जगणं लुटुपुटुचं नव्हतं – खरं खरं जगणं होतं, आभासी जग नव्हतं, जिवाभावाचे मित्र होते, अवास्तव अपेक्षा नव्हत्या, कोणती स्वप्नं पाहायची याचं भान होतं. पालकांनाही पोराचा वकूब माहिती असायचा; त्यामुळे त्यांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या.

काळ बदलला आणि सगळंच बदललं; पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाईचे डाग मात्र अजूनही तसेच आहेत… ते काही पुसता म्हणता पुसले जात नाहीत!

—————————————————————————————————————-

*पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात  जूनियर  रेसिडेंट (JR ) सीनियर रेसिडेंट (SR ) , चीफ  रेसिडेंट(CR ) आणि लेक्चरर  अशा पायऱ्या असतात.

** तपासणीसाठी आलेल्या नमुन्याची बाह्यतपासणी करून त्यातील दोषयुक्त भाग हेरून त्याचा तुकडा काचपट्टीत बंद करण्यासाठी निवडण्याच्या प्रक्रियेला ग्रॉसिंग (Grossing) म्हणतात. 

Author

Leave a Reply