आम्ही लटिके ना बोलू!
सोमवार दि. ४ व मंगळवार दि. ५ मार्च २०२४ रोजी सह्याद्री फार्म्स परिसर, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक येथे ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शेतीउद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणाऱ्या मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म्स परिसरात आयोजित संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक भानू काळे भूषविणार असून नाम फाउंडेशनचे संस्थापक,आघाडीचे सिनेकलावंत नाना पाटेकर संमेलनाचे उदघाटन करणार आहेत. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे स्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असून कार्याध्यक्ष म्हणून गंगाधर मुटे यांची तर संयोजक म्हणून मुंबई हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनामागची वैचारिक प्रेरणा शरद जोशी यांची आहे हे नि:संशय. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या शेतकरी चळवळी बाबत आणि त्या मागच्या अर्थशास्त्राबाबत फारसे गांभीर्याने लिहिले गेले नव्हते. भानू काळे यांनी लिहिलेल्या शरद जोशी यांच्या ‘अंगार वाटा’ या चरित्राने ही उणीव बरीचशी भरून काढली. अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिल्या गेलेल्या पुस्तकात शरद जोशींचे व्यक्तिगत व वैचारिक आयुष्य व त्यांतला अनुबंध अत्यंत रसाळपणे उलगडून दाखवला आहे. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली प्रथम महाराष्ट्रात आणि नंतर अखिल भारतात झालेल्या शेतकरी चळवळीचे अधिकृत दस्तऐवजीकरण या पुस्तकानी झाले आहे. शेतीप्रश्नाचा शास्त्रशुद्ध अभ्यास व त्यावरचे शास्त्रशुद्ध तोडगे यांमुळे शरद जोशी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एकेकाळी पंतप्रधान पदाच्या अगदी जवळ पोहोचले होते; ते कसे हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होते. शरद जोशींशी, शेतकरी संघटनेशी व चळवळीशी संबंधित असंख्य कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष मुलाखत, चळवळीशी संबंधित अनेक गावांत केलेली मुशाफिरी, त्या वेळेला प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख यांचा अभ्यास यावर हे पुस्तक आधारित आहे आणि त्यातल्या प्रत्येक माहितीला आधार आहे; त्यामुळे लौकिक अर्थाने शेतकरी नसलेल्या भानू काळे यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सार्थ आहे. आतापर्यंत जगाचा इतिहास हा शेतकऱ्यांच्या लुटीचा इतिहास आहे असे म्हटले जाते. आजही चित्र दुर्दैवाने फारसे बदललेले नाही. शेतीच्या दुर्दशेमुळे निर्माण झालेली परिस्थिती, आत्महत्या, कधी ओला तर कधी सुका दुष्काळ, वीज, पाणी, रोगराई यांचे प्रश्न आजही आपल्यासमोर आ वासून आहेत. नागरिकीकरणाचा रेटा सध्या वाढलेला आहे. थेट शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आता उद्योग व सेवा या दोन घटकांकडे हळूहळू वळली आहे; तरी देखील आजही भारतातल्या लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के लोक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेतीवरच अवलंबून असल्याचे चित्र आहे. शेती व शेतकरी यांच्या या दारुण स्थितीचे प्रतिबिंब मराठी साहित्यात प्रभावीपणे व्यक्त होत नाही अशी आपल्या शेतकरी बंधूंची खंत आहे व ती खरी आहे. त्यासाठी गेली दहा वर्षे हा शेतकरी साहित्य संमेलनाचा उपक्रम राबवला जात आहे.
‘आम्ही लटिके ना बोलू!’ हे या साहित्य संमेलनाचे काहीसे रोखठोक बोधवाक्य आहे. ते असे का आहे हे समजून घ्यायचे असेल तर या उपक्रमाच्या पहिल्या अधिवेशनाला अध्यक्षपदावरून शरद जोशी यांनी केलेले भाषण मुळापासून वाचले पाहिजे. नागरी संस्कृती व शेती यांच्यातली दरी सांस्कृतिक आणि आर्थिक अशी दोन्ही पातळ्यांवर आहे. भारत आणि इंडिया यांच्यातली ही तफावत शरद जोशींना खूप अस्वस्थ करायची; परंतु ही दरी कमी करण्यासाठी कुणापुढे झुकणे हेदेखील त्यांना मान्य नव्हते. ‘भीक नको – हवे घामाचे दाम’ या घोषणेतच त्यांच्या विचारांचे सार आहे. पहिल्या साहित्य संमेलनाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते समक्ष हजर राहू शकले नव्हते. त्यांचे लिखित भाषण त्यांनी पाठवले होते. हे संमेलन वर्धा येथे भरले होते.
‘शेतकर्यांच्या घरी जन्मलेल्या साहित्यिक भावांनो, बहिणींनो आणि त्यांचे कौतुक करायला जमलेले अभिजनहो,’
भाषणाची ही सुरुवातच बरेच काही सांगून जाते. ते पुढे म्हणतात ‘आम्हांला ताट वाढून आलं नाही तर मोठं दु:ख होतं आणि त्यांना भाकरी मिळाली नाही तरी त्यांना दु:ख होत नाही; कारण त्यांना उपासमारीची सवय असते.’ ही भावना नागरी संस्कृतीची आहे आणि थोडं तथ्यही असावं त्यात! भाकरी नाही मिळाली, कर्ज नाही मिळालं तर शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि ज्यांना संध्याकाळची व्हिस्की मिळाली नाही, त्यांनी राज्यक्रांत्या केल्या, सरकारं उलथवून टाकली; मग आता कोणती गरज मोठी म्हणायची? शेतकर्यांच्या जीवनात हे असं चालायचंच. त्यांनी धान्य काढायचंच असतं, ते आपल्याला पुरवायचंच असतं, त्याचा विचार अधिक करू नये; केला तर क्लेशदायकच असतो असा विचार करून म्हणा किंवा काही म्हणा, शेतकर्यांविषयी नागरी समाजानं आपली मनं बधिर करून घेतली आहेत; मग त्या समाजातलं ते कलाक्षेत्र असो, नाट्य असो, काव्य असो, संगीत असो की साहित्य असो! नागरी समाजाच्या ग्रामीण जनतेबद्दलच्या करुणेच्या सहभावनेच्या इंद्रियाला आलेली बधिरता दूर होणे ही सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता आहे. ही बधिरता जर आपल्याला दूर करता आली तर ग्रामीण साहित्य हे प्रभावशाली होऊ शकतं.
इंडियाने थोडेसे आपल्या भारताकडेही पाहावे ही अपेक्षा हे संमेलन अंशतः तरी पुरे करेल अशी आशा करू या!
शरद जोशी

अभिनंदन . भानुजी .