रामकृष्ण केशव नायक यांचे पाच-सहा दिवसांपूर्वी, म्हणजे २८ जानेवारी रोजी मडगाव येथे वयाच्या ९४व्या वर्षी झालेले निधन खूप चटका लावून गेले. वयाचा विचार केला तर ते अगदी अकाली म्हणता येणार नाही; पण तरीही त्यांच्या निधनाने अंतःकरणात खोलवर कुठेतरी एक कळ उमटली. साधारण वर्षापूर्वी दत्तप्रसाद दाभोळकर, अनिल व शुभांगी जोशी, तसेच वर्षा व मी अशा पाच जणांनी गोव्यात थोडी भटकंती केली होती. गोव्यातील एक लेखक आणि उद्योगपती दत्ता दामोदर नायक हेही बरोबर होते आणि त्यांच्याच सौजन्याने आमची गोवाभेट पार पडली होती. त्या वेळी आवर्जून फोंडा येथील स्नेहमंदिरात गेलो होतो. रामकृष्णबाब आजारी असल्याने भेटू शकतील की नाही याची शंका होती; पण आम्ही आल्याचे कळल्यावर आवर्जून ते आम्हांला भेटले. खूप थकले होते, आपल्या छोट्याशा खोलीत अंथरुणाला खिळून होते; पण तरीही त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. त्यांचे त्यावेळचे स्नेहार्द्र डोळे आजही आठवणीत आहेत. ती अखेरची भेट ठरेल याची मात्र तेव्हा कल्पना नव्हती. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर फिरून गोवा बघण्याचे भाग्य मला तीन-चार वेळा लाभले होते. खूप शिस्तप्रिय म्हणून त्यांचा लौकिक होता; पण माझ्या वाट्याला आलेले रामकृष्णबाब खूप मायाळू, अगदी वडलांसारखे होते. माझ्या मनातला गोमंतकाचा नकाशा त्यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
जिच्याशिवाय मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास लिहिता येणार नाही त्या ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’च्या कलाविभागाचे रामकृष्ण नायक हे अध्वर्यू. १९५६ साली स्थापन झालेल्या या कलाविभागाने एकापाठोपाठ एक अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला दिली. रामकृष्णबाब शिक्षणाने चार्टर्ड अकाउंटंट; पण संस्थेसाठी स्वतःला वाहून घेतलेले. बरोबर दुपारी दोन वाजता ते मुंबईतील माहीम येथील आपल्या ऑफिसचा दरवाजा बंद करत. त्यानंतर व्यावसायिक कामासाठी थांबावे लागेल इतकी कधी आपली प्रॅक्टिस वाढवायचीच नाही, हा स्वतःच घालून घेतलेला दंडक त्यांनी शेवटपर्यंत पाळला. दोन वाजले की सरळ गिरगावात जाणारी बस पकडायची, तिथल्या ‘गोमंतधाम’ इमारतीतील संस्थेच्या कार्यालयात जायचे; मग जिथे नाटकांची तालीम वा प्रयोग असेल तिथे. तिथून रात्री केव्हातरी माहीमला घरी परत.
त्या वेळी गोव्यावर पोर्चुगिजांची सत्ता होती आणि असोसिएशनचे काम मुंबईतून चालायचे. संस्थेचा कलाविभाग सुरू झाल्यावर सुरुवातीला पाच-सहा वर्षे फक्त राज्य नाट्यस्पर्धेसाठी वर्षातून एक नाटक बसवले जायचे. स्पर्धेत भाग घेणारी इतर हौशी मंडळी सहसा हात लावणार नाहीत अशी – खडाष्टक, संशयकल्लोळ, शारदा, मृच्छकटिक, करीन ती पूर्व ही नाटके कलाविभागाने दर्जेदार स्वरूपात सादर केली; ती खूप गाजलीही. गोपीनाथ सावकार, गोविंदराव अग्नी, रामदास कामत, रघुवीर नेवरेकर, मनोरमा वागळे, मो.ग.रांगणेकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, जितेंद्र अभिषेकी, मास्टर दत्ताराम, भीमसेन जोशी, स्नेहल भाटकर, दामू केंकरे, विजया मेहता, मोहनदास सुखटणकर, काशिनाथ घाणेकर यांच्यासारखे ताकदीचे गायक-संगीतकार-दिग्दर्शक-अभिनेते ह्याच प्रारंभीच्या काळात कलाविभागाशी जोडले गेले, पुढे यांच्याच सहकार्याने संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवरही एकापेक्षा एक उत्तम अशी नाटके सादर केली.
सुरुवात झाली ती वसंत कानेटकर यांच्या १९६२ सालच्या रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकाने. त्याने अक्षरशः इतिहास घडवला. त्याचे ६६६ प्रयोग झाले. त्यानंतर अशा उत्तमोत्तम नाटकांची एक शृंखलाच सादर केली गेली. १९६४ साली कानेटकरांचे मत्स्यगंधा (४१५ प्रयोग), १९६६ साली त्यांचेच लेकुरे उदंड जाली (४३१ प्रयोग), १९७० साली वि. वा. शिरवाडकरांचे नटसम्राट (७६० प्रयोग), १९७४ साली कानेटकरांचे अखेरचा सवाल (२३४ प्रयोग), १९७७ साली जयवंत दळवींचे बॅरिस्टर (२३० प्रयोग), १९७८ साली कानेटकरांचे सूर्याची पिल्ले (२०० प्रयोग), १९७९ साली सुरेश खरेंचे मंतरलेली चैत्रवेल (२०७ प्रयोग) ही त्यांतली काही ठळक नावे. याशिवाय गोपाळ कृष्ण भोबे यांचे धन्य ते गायनी कळा, रत्नाकर मतकरी यांची आटपाटनगरची राजकन्या आणि बिर्हाड वाजलं, जयवंत दळवी यांची सभ्य गृहस्थ हो आणि दुर्गी वगैरे नाटकेही रसिकांनी उचलून धरली. नटसम्राट हे तर मराठी रंगभूमीवरचे सर्वांत गाजलेले नाटक म्हणता येईल. त्यातील आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका सुरुवातीला श्रीराम लागू आणि त्यानंतर दत्ता भट, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले अशा दिग्गजांनी केली. इंग्रजी रंगभूमीवर ज्या प्रमाणे शेक्सपीयरचा हॅम्लेट सादर करणे हे प्रत्येक नटाचे स्वप्न असते, त्याच प्रमाणे ‘नटसम्राट’मधील बेलवलकर सादर करणे हे प्रत्येक मराठी नटाला आव्हान वाटत आले आहे.
कलाविभागाच्या नाटकांना तथाकथित ‘चौथा अंक’ नसायचा. रामकृष्णबाबांची ही शिस्त सगळेच कलाकार – मग ते कितीही नामवंत असले तरी – कुरकुरत का होईना; पण पाळायचे! रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात काशीनाथ घाणेकर यांची प्रमुख भूमिका होती आणि त्यांना प्रयोग संपल्यावर नियमित मद्यसेवनाची सवय होती. रामकृष्णबाबांना त्यांची ती सवय आवडत नसे. अनेकदा सांगूनही घाणेकरांच्या वागण्यात फरक पडेना. शेवटी शंभर प्रयोग झाल्यावर त्यांना त्या नाटकातून काढायचा खूप धाडसी निर्णय रामकृष्णबाबांनी घेतला; त्यांची भूमिका कृष्णकांत दळवी करू लागले. त्यांची तशी तयारी रामकृष्णबाबांनी आधीच करून घेतली होती आणि त्यांनीही ती भूमिका उत्तम वठवली; पण यातून सर्वच कलाकारांना योग्य तो संदेश गेला. आपली शिस्त राबवण्यासाठी आवश्यक तो नैतिक दरारा रामकृष्णबाबांनी निर्माण केला होता. संस्थेसाठी त्यांनी केलेल्या त्यागातून आणि घेतलेल्या अथक परिश्रमांतून तो निर्माण झाला होता. संस्थेच्या कामासाठी पूर्ण मोकळीक राहावी म्हणून त्यांनी स्वतः कधी लग्नही केले नाही. संस्था हाच त्यांचा प्रपंच.
या सर्व कलावंतांशी रामकृष्ण नायक यांचे आणि कलाविभागाचे काम करणारे इतर कार्यकर्ते यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. संस्थेसाठी कितीही कष्ट करायची तयारी असलेल्या तरुण कार्यकर्त्यांचा एक मोठा गट रामकृष्णबाबांनी तयार केला होता. त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले होते आणि त्यांना जीवही लावला होता. संस्थेच्या सर्वच नाटकांना प्रचंड लोकप्रियता लाभली होती आणि वेगवेगळ्या नाटकांचे एकावेळी तीन-तीन ठिकाणी प्रयोग चालत. त्यासाठी कलाकारांचे तीन-तीन संच असत. अशा प्रत्येक गावी रामकृष्णबाब स्वतः बसने आधी जात आणि आपल्या कलाकारांची तिथे चांगली सोय होईल याची खातरजमा करत. त्याची जाणीव कलाकारांनाही असे आणि तेही जीव तोडून भूमिका बजावत. कुसुमाग्रजांचेतर ते जणू मानसपुत्र होते. जयवंत दळवी यांनी म्हटले आहे, “या कलाविभागाचे तळमळीचे कार्यकर्ते तुम्हांला जोडून इतके घरगुती करून टाकतात, की आपण कलाविभागासाठी काय करतो किंवा कलाविभाग आपल्यासाठी काय करतो याची जाणीवच शिल्लक उरत नाही. आपणही त्यांच्यातलेच एक होऊन जातो!”
गोमंतकभूमी म्हणजे कलावंतांची खाण आहे आणि इथला एकेक कलावंत म्हणजे लख्ख हिराच. मीनाक्षी शिरोडकरपासून वर्षा उसगावकरपर्यंत इथल्या अनेक रूपगर्वितांनी लाखो प्रेक्षकांची हृदये जिंकली आहेत. लता मंगेशकरपासून किशोरी आमोणकरपर्यंत इथल्या अनेक गानसम्राज्ञींनी लाखो कानसेनांना तृप्त केले आहे. मोगूबाई कुर्डीकर, ज्योत्स्ना भोळे, केसरबाई केरकर, श्रीपाद नेवरेकर, मास्टर दत्ताराम, प्रसाद सावकार, सुरेश हळदणकर, रामदास कामत, आशालता वाबगावकर, जितेंद्र अभिषेकी, भास्कर चंदावरकर… नावांची मालिका मारुतीच्या शेपटीसारखी लांबलचक आहे; शिवाय ही गोमंतकभूषणे फक्त कलेच्या क्षेत्रापुरतीच आहेत असे नव्हे – प्रेमानंद रामाणी, अरविंद बावडेकर यांच्यासारख्या सर्जन्सपासून अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांपर्यंत अनेक गोवेकरांनी देशाची मान उंचावली आहे आणि जोडीने मारिओ मिरांडा, गर्सन दकुन्हा, चार्ल्स कोरीआ यांसारखी नावेही घ्यायलाच हवीत. सगळ्या गोवा राज्याची लोकवस्ती जेमतेम पंधरा-सोळा लाख असेल; म्हणजेच मुंबईच्या एक दशांश आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका जिल्हयापेक्षा कमी; हे लक्षात घेतले तर गोवेकरांचे हे सामाजिक योगदान अधिकच थक्क करते. एक पारशांचा अपवाद सोडला तर संख्येने इतकी अल्प पण गुणवत्तेने इतकी मोठी जमात सापडणे कठीणच. यांतल्या अनेकांशी नायकांचा निकटचा परिचय होता आणि त्यांच्या बर्याच आठवणी नायकांशी गप्पा मारताना मलाही ऐकायला मिळाल्या होत्या.
पुढे २००२ साली उत्तमोत्तम नाटके देणारा हा कलाविभाग संस्थेला बंद करावा लागला. रामकृष्ण नायक म्हणाले होते, “आम्ही फक्त चारशे अन् पाचशे रुपये नाइट घेऊन प्रयोग करायचो. हा सगळा आमच्या नाट्यप्रेमाचा भाग होता, त्याकडे आम्ही धंदा म्हणून कधीच बघितलं नाही; त्यामुळे इतकी लोकप्रिय नाटके देऊनही आमची आर्थिक बाजू तशी लंगडीच राहिली; शिवाय दुसरं आणि तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे आपआपले व्यवसाय सांभाळून नाटकांसाठी वेळ देणारी तरुण कार्यकते पुढे पुढे मिळेनासे झाले. तसे कार्यकर्ते हाच संस्थेचा खरा आधार होता.” अर्थात अशी परिस्थिती आपल्याकडच्या अनेक उत्तम सामाजिक संस्थांच्या बाबतीत झालेली दिसते. आजच्या आत्मकेंद्रित समाजात स्वतःपलीकडे समाजासाठी काही व्यापक करायची वृत्ती दुर्दैवाने फारच कमी झाली आहे. पण सतत नवी-नवी स्वप्ने पाहणाऱ्या रामकृष्ण नायक यांना तक्रारी करण्यात किंवा समाजाच्या नावाने बोटे मोडत बसण्यात उर्वरित आयुष्य घालवायचे नव्हते; त्यामुळे लवकरच त्यांनी आपल्या समर्पित आयुष्यातील दुसरा अध्याय सुरू केला. फोंड्यापासून पाच किलोमीटर्सवर, बांदिवडे या गावी दि गोवा हिंदू असोसिएशनने ‘स्नेहमंदिर’ हा वृद्धाश्रम सुरू केला – मुख्यतः रामकृष्णबाबांच्याच पुढाकारातून. सहा-सात एकरांच्या डोंगरउतारावर त्यांनी एका सुंदर वास्तूची उभारणी केली. गोव्यातील चार प्रमुख देवळांपासून पायी जाता येईल इतक्याच अंतरावर, खूप निसर्गरम्य परिसरात. वृद्धाश्रम ही संकल्पना त्यावेळी गोव्यात कुठेच राबवली गेली नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यासह सर्वांचाच त्या संकल्पनेला विरोध होता. त्यातून कुटुंबव्यवस्था कोलमडेल असे अनेकांना वाटत असे; पण रामकृष्णबाबांनी घरोघर फिरून त्या संकल्पनेचे आजच्या काळातील महत्त्व लोकांना पटवले आणि त्यासाठी आवश्यक तो निधीही उभारला. ४ फेब्रुवारी १९८९ रोजी कुसुमाग्रजांच्या हस्ते आणि पु. ल. देशपांडे यांच्या उपस्थितीत ‘स्नेहमंदिर’ची पायाभरणी झाली. प्रत्यक्ष वास्तूचे उद्घाटन २४ ऑगस्ट १९९३ रोजी नानी पालखीवाला यांच्या हस्ते झाले. इथे ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची सोय होती. त्यानंतर ७० ते ८० या वयोगटातील – म्हणजे अतिवृद्धांसाठी शेजारीच वेगळी इमारत उभारली गेली; तिचे नावे आहे ‘सायंतारा.’ हिचे उद्घाटन १७ डिसेंबर १९९५ रोजी गोव्याचे तत्कालीन राज्यपाल रोमेश भांडारी यांच्या हस्ते झाले होते. स्नेहमंदिर आणि सायंतारा ही दोन्ही समर्पक नावे दिली आहेत कुसुमाग्रजांनी. या उपक्रमांसाठी एक कोटीहून अधिक रक्कम (त्या काळात) नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देणग्यांतून उभारली होती. त्यानंतर त्याहूनही पुढच्या वयाच्या अतिज्येष्ठ रहिवाशांसाठी ‘आश्रय’ हा विभाग उभारला गेला. त्यासाठी स्वतंत्र दीड कोटीची देणगी रामकृष्णबाबांनी मिळवली. तिथे अगदी स्वस्तात वृद्ध राहू शकतात. त्यांच्याकडून सध्या या तीन विभागांसाठी दरमहा अनुक्रमे फक्त साडेसात हजार, दहा हजार आणि बारा हजार इतकी माफक रक्कम घेतली जाते. यातून सगळा खर्च अर्थातच भागत नाही; म्हणून मग अतिरिक्त खर्चासाठी देणग्या मिळवल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देता यावी म्हणून एक नर्सिंग स्कूलही संस्थेने सुरू केले आहे. इथे राहणारे ज्येष्ठ आसपासच्या गरीब पण होतकरू मुलांना शिकवायचे कामही करतात. तशा मुलांना पुढे संस्था शिष्यवृत्तीदेखील देते. या सगळ्या प्रकल्पात सरकारकडून एक रुपयासुद्धा अनुदान स्वरूपात घेतला जात नाही; लोकवर्गणीतूनच सगळा प्रपंच चालतो हे नमूद करायला हवे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर विजय मर्चंट यांनी उर्वरित आयुष्य अपंगसेवेत घालवले. ‘माझी दुसरी इनिंग्ज पहिल्या इनिंग्जपेक्षा अधिक चांगली होती,’ असे ते आयुष्याच्या शेवटीशेवटी म्हणत. नाट्यसेवेनंतरची ही वृद्धसेवा म्हणजे नायकांची जणू दुसरी इनिंग्ज होती.
नायकांना सामाजिक कामाची आवड लहानपणापासूनच होती. तो त्यांना मिळालेला कौटुंबिक वारसाच ! गोवा मुक्तिसंग्रामाच्या काळात ते गोवा नॅशनल काँग्रेसचे खजिनदार होते. अध्यक्ष होते पीटर अल्वारिस. राजकारणात आणि समाजकारणातही अल्वारिस त्यांचे आदर्श होते; पण त्यांच्यावर सर्वाधिक संस्कार झाले ते त्यांच्या वडलांचे. त्यांचे वडील कै. केशव अनंत नायक हे मडगाव येथील प्रख्यात गोमंत विद्या निकेतनचे एक प्रमुख संस्थापक. सत्तावीस वर्षे ते संस्थेचे मानद चिटणीस होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून रामकृष्णबाब वडलांचा हात धरून संस्थेत जाऊ लागले; पडेल ते काम करू लागले. गोव्यातील पहिली कन्याशाळा त्यांच्या वडलांनी सुरू केली होती. महाराष्ट्रात महर्षी कर्वे यांनी केले तशाच प्रकारचे हे कार्य होते. त्या वेळी शाळेला कुठलेही अनुदान नसायचे. विद्यार्थ्यांच्या फीमधून खर्च भागत नसे. अशा वेळी आपल्या गावातील दुकानातून जो थोडाफार नफा होई तो सगळा वडील शाळेसाठी खर्च करत. शिक्षकांना जेवणाचा डबा रोज त्यांच्याच घरून जायचा. तो पोचवायचे काम छोट्या रामकृष्णकडे असायचे. शाळेसाठी वडलांना झालेले कर्ज पुढे आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावर रामकृष्ण नायकांनीच फेडले; त्यासाठी त्यांना तब्बल चार वर्षे लागली. आपल्या वडलांविषयी नायक यांनी आयुष्याच्या संध्याकाळी खूप दुर्मीळ अशा प्रांजळपणे लिहिले आहे. वडलांविषयी आदरभाव तर त्यांच्या मनात कायमच होता; पण त्यांच्या जीवनातील एका त्रुटीचाही नायक उल्लेख करतात. त्यांनी लिहिले आहे, ‘आपण करीत असलेल्या कार्याच्या संबंधात ते माझ्या आईशी कधीच बोलले नाहीत. तिला विश्वासात घेणे तर दूरच! घरात पै-पाहुणे येतच असायचे; पण त्याचीसुद्धा आगाऊ कल्पना वडिलांनी तिला कधी दिली नाही. मामा वरेरकर, बाकीबाब बोरकर यांच्यापासून अनेक नामवंतांची आमच्याकडे ये-जा चालू असे; पण त्याची कल्पना पत्नीस द्यावी असे माझ्या वडिलांना कधीच वाटले नाही. आई हे सगळे निमूटपणे सहन करीत असे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन गोव्यात पहिली कन्याशाळा चालविणारे, मुलींना व्हरनॅक्युलर फायनल परीक्षेसाठी कारवारला स्वतः घेऊन जाणारे माझे वडील! पण त्यांना स्वतःच्या धर्मपत्नीच्या भावना जाणून घ्याव्या, असे कधीच वाटले नाही. माझे वडील आणि आई जणू दोन भिन्न जगांत वावरत होते.’
प्रसिद्ध गोमांतकीय साहित्यिक लक्ष्मणराव सरदेसाई त्यांचे अगदी जवळचे मित्र. ‘गोव्याचे धोंडो केशव कर्वे – केशव अनंत नायक’ या शीर्षकाचा एक लेख सरदेसाई यांनी लिहिला व तो त्या वेळी अतिशय प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या ‘स्त्री’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी पाठवला. संपादकांना तो आवडला; पण त्यांना लेखासोबत एखादा फोटो हवा होता. त्या वेळी रामकृष्ण मुंबईतल्या कॉलेजात शिकत होते. सरदेसाईंनी सांगितल्यानुसार त्यांनी वडलांना पत्र पाठवून स्वतःचा एखादा फोटो पाठवायची विनंती केली. वडलांनी ती तत्काळ एक पंधरा-पानी पत्र लिहून फेटाळली. “कोणत्याही परिस्थितीत, कोणालाही हा लेख प्रसिद्ध करायला माझी परवानगी नाही,” असे त्यांनी अगदी कडक शब्दांत बजावले. स्वतःचा उदोउदो झालेला, स्वतःला कोणी मोठेपणा दिलेला त्यांना अजिबात चालणार नव्हता. सोबतच्या पत्रात वडलांनी व्यक्त केलेले विचार रामकृष्ण नायकांना आपल्या सामाजिक जीवनात कायम मार्गदर्शक ठरले. वडलांनी लिहिले होते, ‘एक माणूस संस्था स्थापन करू शकत नाही; तसे केले तरी ती चालू शकणार नाही. कशीबशी चालू ठेवली तरी तिची सर्वांगांनी वाढ होणार नाही. ती नामशेष होईल; म्हणून लहानसा असला तरी समविचारी, एकध्येयी, निःस्वार्थी, प्रागतिक विचारांचा एक गट सोबत असला पाहिजे. मोठे यश मिळाले तरी त्याने हुरळून जाता कामा नये. यशाचे श्रेय कोणीही एकाने घेऊ नये; कारण सामुदायिक कष्ट व प्रयत्न यांमुळे हे यश मिळालेले असते.”
वडलांची ही प्रसिद्धिपराङमुखता रामकृष्ण नायकांनी आयुष्यभर कसोशीने जपली. मी-पणाचा स्पर्शही त्यांनी कधी आपल्या मनाला होऊ दिला नाही. त्यांच्या पुढाकारातून गोव्यात आणि इतरत्रही अनेक सार्वजनिक कार्यक्रम होत पण त्यावेळी ते स्वतः शांतपणे कुठेतरी श्रोत्यांमधील एका खुर्चीवर बसून असत. स्वतः मागे राहून इतरांना महत्त्व घेऊ द्यायचे हा जणू स्वभावच बनलेला. मला भावणारा त्यांचा हा एक मोठा गुण.
प्रसिद्धीचा अन् मोठेपणाचा मोह हा अर्थ आणि काम यांच्या मोहापेक्षाही कधी-कधी अधिक प्रबळ असतो. भल्या-भल्यांना तो टाळता येत नाही. वरकरणी कितीही नको-नको म्हटले तरी! रामकृष्ण नायक यांच्यासारखी माणसे सामाजिक क्षेत्रात अपवादच म्हणायची. ‘कार्यकर्त्या’च्या पारंपरिक प्रतिमेत न बसणारी, वरकरणी सुखवस्तू भासणारी; पण अंतर्यामी अवडंबरहीन साधेपणा असलेली.
चांगले सामाजिक काम पैशावाचून थांबत नाही हे कदाचित खरे असेल; पण निरलस कार्यकर्त्यांवाचून ते कधी उभेच राहू शकत नाही हे नक्कीच खरे आहे. असे कार्यकर्ते आजच्या ‘इमेज-बिल्डिंग’च्या जमान्यात दुर्मीळच; पण जेव्हा कधी ते रामकृष्ण नायकांसारख्यांच्या रूपात भेटत, तेव्हा बाकीबाब बोरकरांच्या त्या प्रसिद्ध ओळी आठवत :
जीवन त्यांना कळले हो,
मीपण ज्यांचे पक्व फळापरी,
सहजपणाने गळले हो.
या निरलस कार्यकर्त्याच्या स्मृतीला माझे शतश: प्रणाम!
***
रामकृष्ण नायक व भानू काळे
