लेखन हा माझा व्यवसाय. गेल्या काही वर्षांत मी या व्यवसायात जे काही काम केले त्याकडे जेव्हा मी पाहिले, तेव्हा मला जे यश मिळालं त्यात फक्त मी आणि माझं यशच मला दिसू लागलं. कदाचित लोकांनाही तेच यश दिसेल; पण मी थोडेसे अधिक मागे जात गतकाळाचे चिंतन केले तेव्हा माझ्या दृष्टीला काही वेगळंच दिसलं; जे माझ्या विस्मरणात गेलं होतं. या विस्मृतीत काही व्यक्ती होत्या, अनुभव होते ते मला आता स्पष्टपणे दिसू लागले.
माझे वडील कै. मधुसूदन कालेलकर हे एक यशस्वी नाटककार व चित्रपट लेखक. घरातल्या नाट्य आणि चित्रपट सृष्टीतल्या वातावरणामुळे मी या क्षेत्राकडे ओढला गेलो. वडिलांच्या लिखाणाचे संस्कार माझ्यावर होत गेले आणि आपण या क्षेत्रातच जायचे हे विचार माझ्या मनात केव्हा रुजले ते माझं मलाच कळलं नाही आणि मी चित्रपटसृष्टीतच माझं करिअर करणार हा माझा ठाम निर्धार मी घरातल्या लोकांसमोर जाहीर केला. हे क्षेत्र म्हणजे अळवावरचं पाणी, कितीतरी खाचखळगे आहेत. कुठलीही शाश्वती नाही. प्रथम शीक आणि मग हवं तर या क्षेत्राकडे जा असं काळजीनं आणि प्रेमानं मला सांगण्यात आलं; पण शेवटी माझा हट्ट पाहून मला माझ्या आई-वडिलांनी चित्रपट सृष्टीत जाण्याची परवानगी दिली आणि मी वडिलांच्या लिखाणाच्या कालेलकरी मार्गावर चालू लागलो. त्या वेळी माझ्या वडिलांचे मित्र – चित्रपट दिग्दर्शक शंकर मुखर्जी हे देव आनंद व आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘महल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. त्यांच्याकडे मी शिकाऊ सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो. शिकाऊ असल्यामुळे काही प्रमाणात बॉसगिरी आणि कधी कधी अपमानास्पद वागणूक सहन करावी लागायची; पण शिकायचं म्हणजे हे सारं सहन करायला हवं होतं.
प्रथम शिकाऊ असल्यामुळे मला पगार मिळत नव्हता; पण पुढे पुढे प्रवासखर्च व जेवण भत्ता मिळू लागला. ते पैसे इतके कमी असायचे की कसंबसं पोट भरायचं; पण या बाबतीत मी घरी कधीच सांगितलं नाही; कारण हे क्षेत्र मी स्वतः निवडलं होतं. बरं, पैसे मिळायचे ते फक्त शूटिंगच्या वेळेला. मग इतर वेळी काय? म्हणून काहीतरी मार्ग काढायलाच हवा होता म्हणून मी नाट्यसृष्टीकडे नजर वळवली. वडिलांनी मला त्यांच्याच नाटकाला बॅक स्टेज वर्कर म्हणून कामाला लावलं. नाटक सुरू होण्यापासून नाटक संपेपर्यंत मी रंगभूमीवरच्या नाटकाला लागणाऱ्या प्रॉपर्टीची व्यवस्था सांभाळू लागलो आणि इतर लोकांबरोबर मलाही मानधनाचं पाकीट मिळायला लागलं. कधी चित्रपटाचं शूटिंग तर कधी नाटकाचे प्रयोग/दौरे अशा दोन्ही ठिकाणी माझी धावपळ सुरू झाली. या व्यवसायात तग धरायचा असेल तर पैसा हा मिळवायलाच हवा होता .
मी आणि माझ्या काही मित्रांनी मिळून ‘वैशाली रंगभूमी’ ही संस्था स्थापन केली. शिवाजी मंदिराचा फूटपाथ आणि माझा मित्र उदय मिटबावकर याचा प्रकाश फोटो स्टुडिओ हे आमचं ऑफिस. आम्ही सगळे नवीनच. ‘दिल्या घरी तू सुखी रहा,’ ‘वेगळं व्हायचंय मला,’ ‘तुझे आहे तुजपाशी ’ या नाटकांचे प्रयोग आम्ही श्रीगणेशोत्सव व नवरात्रोत्सवात करू लागलो. जे पैसे मिळतील ते पैसे वाटून घेऊ लागलो. त्या वेळी काही नाटकांचं दिग्दर्शन केलं; तर काही नाटकांत कामही! त्याच सुमारास विलेपार्ले येथे एकांकिका स्पर्धा होत्या. सगळ्या मित्रांनी मला एकांकिका लिही असा नुसता आग्रहच नाही तर हट्टच केला. मी कबूल केलं. दुसरा दिवस हा स्पर्धेत प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस होता. रात्री अकरा वाजता मी लिहायला सुरुवात केली आणि सकाळी सात वाजेपर्यंत ‘कलाकार’ ही एकांकिका लिहून पूर्ण केली. एकांकिकेचा प्रयोग झाला त्या वेळी मला ज्या ज्या ठिकाणी टाळ्या आणि हशे अपेक्षित होते त्या त्या ठिकाणी प्रेक्षक मनापासून तशी दाद देत होते. एकांकिका संपल्यावर लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. या एकांकिकेला स्पर्धेत बक्षीस मिळालं नाही; पण माझ्यातला लेखक मात्र जागृत झाला. आपणही लेखक होऊ शकतो हा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. त्यानंतर लिहिलेल्या ‘पश्चाताप’ या एकांकिकेलाही चांगलं यश मिळालं. नाट्यसृष्टी आणि सिनेमा या दोन्ही ठिकाणी जसा वेळ मिळेल तसं काम करत होतो आणि व्यावसायिक लेखक होण्यासाठी योग्य संधी केव्हा मिळेल याची वाट पाहू लागलो… आणि अचानक ती संधी माझ्यासमोर चालून आली.
निर्माता हुकमीचंद बाफना यांना मराठी चित्रपट काढायचा होता. माझे मित्र कलाकार वसंत इंगळे आणि रहाळकर यांनी त्यांना माझं नाव सुचवलं. निर्मात्यांना मी कथा ऐकवली, ती सगळ्यांना आवडली. चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. चित्रपटाचं नाव होतं ‘शांतता खून झाला आहे.’ लेखक म्हणून माझ्या वडिलांचं नाव खूप मोठं होतं. लोक सांगत होते, “अनिल, संभल के!… खूप कठीण आहे! वडिलांची आणि तुझी तुलना केली जाईल… काहीतरी दुसरं कर!” काही लोक चेष्टा करायचे; तर काही लोक काळजीने बोलायचे. मी हे सगळं ऐकत होतो; पण मी मनाशी एक गोष्ट पक्की केली की ‘मी माझ्या वडिलांच्या एवढा चांगला लेखक होईन की नाही या गोष्टीचा विचार करायचा नाही; फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, वडिलांनी जे एवढं मोठं नाव मिळवलंय त्याला कमीपणा येईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही. बस्स!’… आणि मी पुन्हा एकदा कालेलकरी लेखनाच्या मार्गावर ठामपणे चालण्याचा निर्धार केला.
व्यावसायिक लेखक होण्याकरता आता मला गरज होती ती प्रसिद्धीची! मी लोकसत्ताच्या कार्यालयात शरद गुर्जरांसमोर जाऊन उभा राहिलो. त्या वेळी ते चित्रपटाचा स्तंभ लिहीत. त्यांना मी माझं काम सांगितलं, ते म्हणाले, “ठीक आहे, होईल तुझं काम!” त्याच वेळी मी पत्रकार पंडित यांना भेटलो. पंधरा दिवसांनंतर तर मी कथा, पटकथा व संवाद लेखक झालो. ही बातमी दोघांनी लोकसत्ता व स्क्रीनमध्ये दिली. मनातल्या मनात मी त्या दोघांचे आभार मानले. लेखक म्हणून प्रथमच वर्तमानपत्रात माझं नाव छापून आलं होतं. तो आनंद काही वेगळाच होता. माझा पहिला चित्रपट पूर्ण झाला. प्रदर्शित झाला. माझ्या कामाची प्रशंसा झाली; पण चित्रपट अयशस्वी ठरला. चालला नाही. चित्रपटाला यश मिळालं तरच तुम्ही पुढे जाता. घेतलेले सर्व श्रम अपयशामुळे वाया गेले. मी काही पावलं मागे आलो.
पुन्हा एकदा संघर्ष-धावपळ… काम आणि पैसा मिळवण्यासाठी धडपड! त्या वेळी मी मिळेल त्या ठिकाणी सात-आठ हिंदी-मराठी चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. माझे वडील हे सगळं पाहत होते; पण त्यांनी मला कुठलीही सूचना केली नाही. या क्षेत्रात तग कसा धरायचा ते त्यांनी माझं माझ्यावर सोपवलं; पण एक गोष्ट त्यांनी केली – माझी मेहनत पाहून आमच्या ‘नाट्यवैभव’ या संस्थेचा पुढे मला बॅकस्टेज वर्करचा मॅनेजर केला व नंतर त्या कंपनीचा निर्माताही केला.
यावेळी मी शंकर मुखर्जी यांच्या देव आनंद यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बनारसी बाबू’ या चित्रपटासाठी काम करत होतो. देवसाहेब त्या वेळचे आमचे आवडते हिरो. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळची गोष्ट. देवसाहेबांची मेकअप रूम इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर. शॉट रेडी झाला की त्यांना बोलावण्याची जबाबदारी माझ्यावर होती. देवसाहेब जवळ जवळ प्रत्येक शॉट झाला की आपल्या मेकअप रूममध्ये जाऊन बसायचे; त्यामुळे दिवसातून दहा-पंधरा वेळा मला त्यांना बोलावण्यासाठी वर खाली करावं लागायचं. मला वैताग यायचा. एकदा घरी मी माझ्या मित्रांकडे ही गोष्ट बोलून दाखवली. माझ्या बाबांनी ती ऐकली. ते हसत म्हणाले, “देवसाहेब तुझ्यापेक्षा वयाने एवढे मोठे, दहा वेळा वरखाली करताना त्यांना काही वाटत नाही आणि तू एवढा तरुण असून…”
पुढे बाबांनी आणखी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. मी काय समजायचं ते समजलो. देवसाहेब केसांची आणि कपड्यांची काय काय आणि कशी कशी स्टाईल करतात याकडे लक्ष देण्यापेक्षा या व्यक्ती मोठ्या कशा होतात या गोष्टी समजून घेण्याकडे मी लक्ष देऊ लागलो.
अचानक एक मोठी संधी चालून आली – मी एका हिंदी चित्रपटाचा लेखक झालो. प्रमुख भूमिकेसाठी निर्माता-दिग्दर्शकांना नूतनजी हव्या होत्या. लेखक म्हणून मी मुंब्रा येथील त्यांच्या बंगल्यावर कथा ऐकवायला गेलो. माझ्या आवडत्या अभिनेत्रीला मी प्रथमच माझ्या समोर बसलेली पाहत होतो. कथा ऐकल्यावर नूतनजींनी ताबडतोब होकार दिला. त्यांना कथा खूप आवडल्याचं त्यांनी सांगितलं आणि मी निघता निघता मला म्हणाल्या, “आप कहानी बहोत अच्छी सुनाते हो|” तो माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंदाचा क्षण होता. त्यानंतर मराठी किंवा हिंदी चित्रपटातल्या कुठल्याही मोठ्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला कथा ऐकवताना मला कधीच अडचण आली नाही. चित्रपटाचं नाव ‘प्यारी भाभी.’ या चित्रपटाचे संवादही मीच लिहिले होते. एका मराठी तरुण लेखकाने नूतन आणि गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे संवाद लिहिले होते; पण कुठल्याही कलाकाराने माझ्या भाषेबद्दल अजिबात तक्रार केली नाही. उलट दिग्दर्शकाने तर “तू अगदी सोप्या भाषेत छान संवाद लिहिलेस,” अशी शाबासकी दिली. हा चित्रपट प्रदर्शित झाला; पण तोही अपयशी ठरला. पुन्हा सहायक दिग्दर्शक आणि नाटकाचे दौरे सुरू झाले. याच दरम्यान ‘तू सौभ्यागवती हो’ हा चित्रपट लिहिला. चित्रपट प्रदर्शित झाला; पण हा चित्रपटदेखील अपयशी ठरला. माझ्या कामाचं कौतुक होत होतं; पण यश मिळत नव्हतं. लागोपाठ दोन मराठी आणि एक हिंदी चित्रपट असे तीन फ्लॉप चित्रपट लिहून मी एक वेगळीच HAT TRICK साधली होती. काही लोक चेष्टा करत होते; तर घरचे लोक आणि जवळचे मित्र धीर देत होते.
या सर्व गोष्टी विसरून मी भरपूर वाचन करून, चित्रपट व नाटके बघून माझ्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करत होतो. याच वेळी ‘फरार’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं. या चित्रपटाचे पटकथा लेखक माझे वडीलच होते. अमिताभ बच्चन, संजीव कुमार व शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आतापर्यंत सहायक दिग्दर्शक म्हणून माझा क्रमांक वरचा लागला होता व पगारातही चांगली वाढ झालेली होती. एकदा ज्या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग होणार होतं, ती जागा रद्द होऊन दुसरीकडे करण्याचं ठरलं. दुपारनंतर अमिताभजींनी आम्हांला चित्रीकरणासाठी वेळ दिला होता. सकाळी ते ‘मढ आयलंड’ येथे दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग करत होते. जागा बदलल्याचं त्यांना ताबडतोब सांगणं आवश्यक होतं. त्यावेळी मोबाईलही नव्हते. मढ आयलंड म्हणजे खूप लांब – त्यावेळचं जवळ जवळ एक निर्जन ठिकाणीच – तिथे जाऊन तो निरोप देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मढ आयलंडच्या समुद्रकिनारी बीचवर जाऊन पोहोचलो; पण आजूबाजूला कुठेच शूटिंग सुरू असल्याचं दिसत नव्हतं. आता काय करायचं! मला प्रश्न पडला. तोच मला रस्त्यावरून खूप लांबून एक जीप येताना दिसली – नक्की अमिताभजींची असणार! मी वाळूवरून त्या रस्त्यावर धावत सुटलो. वाट्टेल ते करून मला ती जीप अडवायलाच हवी होती. जीवाच्या आकांताने मी धावत रस्त्यावर पोहोचलो. मला बघून काही फुटांवरच त्यांची जीप थांबली. अमिताभजींनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि खुणेने “काय!” असं विचारलं. धावून धावून मला एवढी धाप लागली होती की तोंडातून शब्दच फुटत नव्हता. त्यांनी दोन्ही हातांनी खूण करून मला ‘प्रथम शांत हो!’ असं सांगितलं. काही क्षणांनंतर मी शांत झालो. शूटिंगचं ठिकाण बदललंय हा निरोप दिला आणि पट्कन जायला निघालो. त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाले, “गाडी में बैठो!” मी जीपमध्ये बसलो आणि फिल्मीस्तान स्टुडिओपर्यंत आलो. येताना मी विचार करत होतो, ‘अमिताभजी हे एवढे मोठे सुपरस्टार! त्यांच्या समोर मी तर कुणीच नाही; पण एवढ्या लांबून हा मुलगा परत कसा जाणार हा विचार त्यांनी केला. मला जीपमध्ये बसवण्याची माणुसकी दाखवली.’
या क्षेत्रामध्ये तुम्हांला खूप काळ टिकायचं असेल तर तुमच्यामध्ये फक्त चांगली कला असून चालत नाही; तर स्वभावही चांगला असावा लागतो हे कळलं.
१९८५ साली माझ्या वडिलांचं निधन झालं. अपयशाने मागे पडलो होतो; पण तरीही नाटक आणि सिनेमा या दोन्ही ठिकाणी काम करत माझा आर्थिक प्रश्न सोडवत होतो. याच दरम्यान माझ्या आयुष्याला चांगली कलाटणी देणारी एक संधी चालून आली. माझा मित्र अभिनेता कुलदीप पवार याचा फोन आला, “अधिकारी बंधू ‘बंदिनी’ या मालिकेची जुळवाजुळव करत आहेत. मी तुझं नाव सुचवलंय. तू काम करणार का?” मी ताबडतोब हो म्हटलं. गौतम आणि मार्तंड अधिकारी यांची भेट झाली. मी ‘बंदिनी’ ही मालिका लिहिली. या मालिकेला तुफान लोकप्रियता मिळाली. याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने माझी नाटकाच्या सेंसॉर बोर्डावर नेमणूक केली. ‘बंदिनी’नंतर, ‘परमवीर’ व ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या मालिका आल्या. या दोन्ही मालिकांना तुफान लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर या तीनही मालिकांना त्यावेळची सर्वोत्कृष्ट मालिकांची पारितोषिके मिळाली. लागोपाठ तीनही मालिकांना सर्वोत्कृष्ट मालिकांचे पारितोषिक मिळवणारा मी HAT TRICK लेखक ठरलो. पहिले ३ चित्रपट फ्लॉप देऊन मी HAT TRICK साधली होती आणि काही दिवसांनी ३ यशस्वी मालिका लिहून मी यशाची वेगळीच HAT TRICK साधली. टीव्हीमुळे घरोघरी माझं नाव पोहोचलं. माझ्या वडिलांच्या वेळचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनी मला शाबासकी दिली आणि सर्वात मोठं म्हणजे माझ्या आईच्या चेहऱ्यावरची चिंता जाऊन, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, सुखावत होतो; पण त्याच वेळी माझ्या हातून एक चूक घडत होती. यशाने मी थोडा सुस्तावलो; पण गौतम आणि मार्तंड यांची मेहनत मी बघत होतो. मी समजलो. अनेक वर्षं या क्षेत्रात जर टिकायचं असेल तर सतत काम करायलाच हवं आणि सतत काम मिळवायला मेहनतही घ्यायला हवी. मी पुन्हा कामाला लागलो. मालिकांबरोबर चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आतापर्यंत हिंदी, मराठी व गुजराती भाषा मिळून एकोणतीस चित्रपट; तर या तीनही भाषांत तिसाहून अधिक मालिका लिहिल्या. चित्रपट व मालिका या दोन्हींच्या लिखाणात फरक आहे; पण मला मिळालेल्या अनुभवाने तो चांगल्या प्रकारे लक्षात आला. मी जास्त भर दिला तो पटकथेवर; कारण एका वाईट कथेवर चांगली पटकथा बऱ्यापैकी चित्रपट निर्माण करू शकते; पण तसंच एक वाईट पटकथा चांगल्या कथेचं वाटोळंही करू शकते.
एका कादंबरीवर ‘आहुती’ हा चित्रपट लिहीत होतो. कादंबरी खूप मोठी. दोन तासांत कशी बसवायची! माझी भंबेरी उडाली. काय करावं समजत नव्हतं. त्याच वेळी या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक शरद पालेकर यांनी मला एकच पण मौलिक सूचना केली. या सूचनेत एवढी ताकद होती की एका आठवड्यात मी चित्रपट लिहून पूर्ण केला. चांगली सूचना आणि योग्य मार्गदर्शन यांमुळेच ते शक्य झालं. कथेबद्दल चित्रपटाला पारितोषिक मिळालं. आहुती चित्रपटाचा खास शो होता. चित्रपट पाहायला माननीय बाळासाहेब ठाकरे, मीनाताई आणि यश चोप्रासाहेब आले होते. बाळासाहेबांना, यशजींना चित्रपट खूप आवडला होता. बाळासाहेबांनी खास मला बोलावून घेतलं आणि यशजींबरोबर ओळख करून दिली, “हा आहे अनिल कालेलकर, या चित्रपटाचा लेखक!” मी यशजींना नमस्कार केला. त्यांनी मला जवळ घेऊन शाबासकी दिली, “चित्रपट खूप चांगला आहे. तुम्ही खूप छान लिहिलंयत.”पुढे ‘आहुती’ हा चित्रपट रिलीज झाला. रिलीज होण्यापूर्वी अनेकांनी हा चित्रपट पाहून चित्रपट खूप चांगला झाला असल्याचे सांगितले होते… मराठीमधील मोठमोठे कलावंत त्या चित्रपटात होते. चित्रपटाची भरपूर प्रसिद्धी झाली होती; पण पहिले ३ दिवस अतिशय कमी प्रेक्षक चित्रपट पाहायला आले होते; त्यामुळे आम्ही सगळे खूप निराश झालो होतो. माझ्या आईने चित्रपट पाहिला होता तिलाही खूप आवडला होता… तिने माझ्या चेहऱ्यावरची निराशा पाहिली आणि मला विचारले, “तू एवढा निराश का दिसतोस?” मी तिला कारण सांगितले. “तीन दिवसांत हा चित्रपट जेवढ्या प्रेक्षकांनी पाहिला असेल ते बाहेर जाऊन नक्की लोकांना सांगतील की हा चित्रपट पहा, चांगला आहे…” आई म्हणाली… आणि अक्षरशः तसंच झालं… माझ्या आईचे म्हणणे खरे ठरले! पहिल्या शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या दिवशी प्रेक्षक जरी चित्रपटगृहात फिरकले नसले तरी सोमवारपासून चित्रपटाला एवढी गर्दी झाली की ॲडव्हांसमध्ये चित्रपटाचे शो हाउसफुल व्हायला लागले आणि महाराष्ट्रभर चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवली आणि चित्रपट सिल्वर जुबिली झाला. ही सगळी माउथ पब्लिसिटीची कमाल होती. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच्या प्रसिद्धीएवढीच प्रेक्षकांची माउथ पब्लिसिटी ही किती महत्त्वाची असते हे त्यावेळी मला कळले.
एकदा ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या मालिकेत शम्मी कपूर ह्यांना घ्यायचे ठरले. शम्मी कपूर यांनी माझ्या वडिलांच्या ३ ते ४ हिंदी चित्रपटांतून कामे केली होती. मी आणि अधिकारी बंधू त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना कथा ऐकवली. त्यांनी काम करायला होकार दिला; पण भाषेची अडचण होती. त्यांना मराठी येत नव्हतं; त्यांनी एकतरी वाक्य मराठीत बोलावं अशी माझी इच्छा होती. ‘शम्मीसाहेब तुमच्या कारखान्यात खून झालेल्या कामगाराचा खुनी जर मी शोधून काढला; तर मला बक्षीस म्हणून तुम्ही ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचं;’ अशी इन्स्पेक्टर मागणी करतो. शम्मीसाहेबांनी आनंदानं ते कबूल केलं आणि भाग संपताना शेवटी ते हात उंचावून आनंदाने “जय महाराष्ट्र” म्हणाले. स्वतः शम्मीसाहेबांना, मला आणि तमाम मराठी प्रेक्षकांनाही याचा आनंद झाला. मालिका लिहिताना अचानक अडचणी येतात आणि तुम्हांला ताबडतोब त्यातून काहीतरी मार्ग काढावा लागतो .
वांद्रे येथे राहणारे एक पती-पत्नी कायमचे डोंबिवली येथे शिफ्ट होणार असतात; तसं ते सगळ्यांना सांगत असतात. एक दिवस एक टेंपो येतो, त्यांच्या घरातलं सगळं सामान घेऊन निघून जातो. संध्याकाळी पती-पत्नी घरी आल्यावर घर पूर्ण साफ झालेलं दिसतं. इमारतीमधील लोक सांगतात की आम्हांला वाटलं तुम्ही शिफ्ट होताय. पण खरं तर चोरट्यांनी ते सामान पळवलेलं असतं – ही सत्य घटना होती. ‘आपल्या खासगी गोष्टी सार्वजनिक ठिकाणी बोलू नयेत,’ असा संदेश देणारी ही सत्य घटना मी ‘परमवीर’ या मालिकेत वापरली. वेगवेगळ्या कथांवरची मालिका लिहिताना जगात काय घडतंय यावर सतत लक्ष ठेवावं लागतं.
व्यावसायिक लेखकाला यशाबरोबरच प्रसिद्धीची गरज असते, हे मी ओळखून होतो. त्याच वेळी ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानातर्फे मला ‘चैत्रबन’ हा पुरस्कार देण्यात आला. हा माझ्या आयुष्यातला मोठा आनंदाचा क्षण होता. यादरम्यान पत्रकार रवींद्र आवटी हे माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी मला योग्य ती प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी रमेश उदारेसारख्या इतर पत्रकारांशीही ओळख करून दिली. माझे वडील हयात नसताना त्यांच्याच लेखनाच्या क्षेत्रात मला जे भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळत होती; त्यामुळे होणारा आनंद आणि माझ्याबद्दल वाटणारा अभिमान माझ्या आईच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसून येत होता आणि जे मला मिळावं असं सारखं वाटत होतं ते मला मिळालं होतं. आईकडून मिळालेले हे पारितोषिक मला आयुष्यभर सुखावत राहील.
एखाद्या कथेवर आधारित २०० ते ३०० भागांच्या अनेक मालिका लोकप्रिय झाल्या. त्या मालिका लिहिणाऱ्या लेखकांचे कौतुक हे केलेच पाहिजे; पण का कुणास ठाऊक माझे मन एखाद्या मालिकेच्या कथेसाठी २०० ते ३०० एपिसोड लिहिणे – ह्यात एवढे रमले नाही ते मी एन्जॉय नाही करू शकत, मला त्यात आनंद नाही मिळत. तेव्हा असे लिखाण मी कटाक्षाने टाळले, त्याच्यावर कधी विचारही केला नाही. वेगवेगळ्या कथांवर काम करणे मला नेहमीच आवडते आणि म्हणून मी जास्तीत जास्त मालिकांचे लिखाण केले ते वेगवेगळ्या कथांवर केले आहे. एखादी कथा एका भागात, दोन भागांत, तीन भागांत किंवा चार भागांत, दहा, वीस, पंचवीस किंवा ५० भागांत अशा रितीने लिखाण करायला खूप आवडते; कारण प्रत्येक वेळेला नवीन कथा, नवीन पटकथा, नवीन संवाद, नवीन व्यक्तिरेखा हे करण्यात मला खूप मजा येत होती आणि म्हणूनच मी एकाच कथेवर २०० ते ३०० भागांच्या मालिका कधी लिहिल्या नाहीत. आतापर्यंत मी ३०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या कथांवर पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लोक असेही म्हणतात की कदाचित हा माझ्या नावावर एक विक्रमही असू शकतो पण अशा प्रकारचे लिखाण करताना मला खूप आनंद मिळाला.
आज मी राहत असलेल्या साहित्य-सहवाससमोरील रस्त्याला ‘मधुसूदन कालेलकर मार्ग’ हे नाव आहे. त्याच कालेलकरी लेखनाच्या मार्गावर मी चालत आहे.
सुरुवातीला आलेल्या अपयशाने खचून जात असतानाच माझ्या मेहनतीवर मोठमोठ्या लोकांची शाबासकी आणि त्यांच्याकडून मिळालेला अनुभव मला एक एक पाउल पुढे नेत होता. अजून या मार्गावर मला खूप चालायचंय. असंच यश आणि अपयश पचवून मिळणाऱ्या नवनवीन अनुभवांतून सतत काही शिकत…

