काही दिवसांपूर्वी झेन तत्त्वज्ञानाविषयी एक पोस्ट वाचनात आली होती. त्या पोस्टमध्ये फार सोप्या शब्दांत जीवन आनंदाने जगण्याची तत्त्वे सांगितली होती.
*कोणतीही गोष्ट करताना ती मनाच्या विशिष्ट एकाग्रतेने, मनाच्या शांतपणानं आणि साधेपणानं करणं. ज्यात ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळतो ती गोष्ट म्हणजे झेन होय.
*आपले आयुष्य जगत असताना आपल्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या बाबतीत घडू शकणारी सर्वोत्तम गोष्ट आहे असे समजावे म्हणजे आपण आनंदात जगू शकतो.
* तुमचा सर्वात वाईट शत्रू तुमचे जितके नुकसान करू शकणार नाही तितके बेसावध विचार तुमचे नुकसान करू शकतात; पण एकदा का आपण त्यांच्यावर प्रभुत्व मिळवले की आपण आनंदाने राहू शकतो.
* माणसाच्या मनातल्या नकारात्मक भावना या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात; तर सकारात्मक भावना या रोगमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतात.
* एखादी गोष्ट तेव्हाच अनुकूल ठरते जेव्हा माणूस तिच्याशी जुळवून घेतो.
* आयुष्याच्या मार्गावर जशी तुमची बरीवाईट वर्तणूक असेल त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य उलगडत जाईल.
* तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना कशी प्रतिक्रिया देता, हे तुमच्या वैयक्तिक तत्त्वज्ञानानुळे निश्चित होते. तुमच्या आनंदासाठी आणि हितासाठी ते पूर्णपणे जबाबदार असते.
* सत्य नेहमीच हाताच्या अंतरावर – तुमच्या आवाक्यातच असते.
* जेव्हा भोवतालच्या कोलाहलातसुद्धा तुम्ही शांत राहू शकता – तीच निसर्गाची खरी अवस्था असते.
* जेव्हा तुम्ही दुःखाच्या काळातही आनंदी राहू शकता तेव्हा तुम्ही मनाचे खरं सामर्थ्य पाहू शकता.
* माझ्याबाबतीत जे काही घडते ते केवळ मला त्यापासून सर्वाधिक फायदा व्हावा या एकाच हेतूने घडते.
* आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं,निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि दैनंदिन आयुष्यात आनंद कसा जोपासावा? वर्तमानात जगत असतानाही भविष्य कसं बदलावे? या विषयी झेन तत्त्वज्ञान सकारात्मकता शिकवते.
आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्या विशिष्ट क्षेत्रात अनेक छोटे छोटे विषय असतात आणि या विषयांतसुद्धा अनेक छोटे छोटे संप्रदाय तयार झालेले असतात; या संप्रदायानांसुद्धा अनेक वेगवेगळे फाटे फुटलेले असतात आणि या फाट्यांमध्येसुद्धा अनेक नवनवीन प्रयोग होत असतात .
काही जण हे प्रयोग, नव्या दिशा, नव्या वाटा , नवे विचार यांचे सहजपणे आत्मचिंतन करून आपल्या जीवनात खरोखर परिवर्तन करून घेतात. या नव्या चिंतनामुळे जो आतमधून बदल होतो, तो बदल होत असताना व झाल्यानंतर आतमध्ये अनेक रोमांचक बदल होत असतात. शरीरात व मनात वयामुळे , अनुभवांमुळे, खूप नाजूकपणे , हळुवारपणे, नकळतपणे खूप आश्चर्यचकित करणारे बदल होत असतात; पण त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो; त्यामुळे खरेतर आपले नुकसानच होते .
झेन तत्त्वज्ञान स्वतःला ओळखायला, आतमध्ये डोकावयाला प्रेरित करत असते.
एकदा एक उत्कृष्ट नाव कमावलेला, निष्णात, जसे दिसते तसे रेखाटणारा- रंगवणारा निसर्गचित्रकार होता. तो वेळ मिळाला की सर्व साहित्य घेऊन निसर्गात जायचा. डोंगर, दऱ्या, इमारती, रस्ते, नद्या, समुद्र, बोटी, किल्ले यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्रं काढायचा – अगदी बारीकसारीक तपशील रंगवायचा, रंगवताना तल्लीन होऊन जायचा. त्याला स्वतःचे रंगवलेले निसर्गचित्र पाहून खूप आनंद व्हायचा. आपण खूप भारी चित्रकार आहोत असा थोडा अहंकारही त्याच्या मनात निर्माण झाला होता. त्या चित्रकाराने आपल्या निसर्गचित्रांची प्रदर्शने करून थोडेफार व्यावसायिक यशही मिळवले होते .
एक दिवस त्याने आपल्या चित्रांचा एक मोठा गठ्ठा सोबत घेतला आणि तो त्याच्या एका गुरूंना दाखवण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी घेऊन गेला. गुरुजी झेन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. मोठी साधना केली होती त्यांनी. गुरुजींनी त्याचे प्रत्येक चित्र नीट, शांतपणे, व्यवस्थितपणे पाहिले आणि चित्राची फाईल पुन्हा होती तशी ठेवली .
निसर्गचित्रकाराने मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली; पण गुरुजी काही पुढे बोलण्यास तयारच दिसेनात. त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला व तो परत जायला निघाला. निघताना त्याने गुरुजींच्या पायावर डोके ठेवले.
दरवाजातून बाहेर जाताना त्याने पाहिले की गुरुजी काही तरी सांगत आहेत. तो परत आत आला व जमिनीवर मांडी घालून शांतपणे डोळे मिटून बसला .
गुरुजी म्हणाले प्रत्येक ठिकाणी जाऊन जसे दिसते तसे रेखाटण्याचे कौशल्य तू फार कष्टाने मिळवले आहेस; त्याबद्दल तुझे अभिनंदन करतो; पण आता तुझे डोळे मिटलेले आहेत. आता तुझ्या आतमध्ये डोकावून पहा, तिथला निसर्ग तुला दिसतो आहे का?
आपण सगळेच जण बहिर्मुखी झालेले आहोत. आपण बाहेरचा निसर्ग, बाहेरचे रूप, बाहेरचे जग पाहून एकमेकांची नक्कल व तुलना करून, स्पर्धा करून, जसे दिसते तसे पाहतोय. तेच चित्रण कागदावर , कॅनव्हासवर रंगवतो. आतला निसर्ग,आतला आवाज, आतले जग, आतली अद्भुत दृश्ये, आतला आनंद, आतल्या वेदना कागदावर कधी रंगवणार? ज्या दिवशी तू आनंद, दुःख, सर्व संवेदना रंगवायला सुरुवात करशील त्या वेळी तुझी चित्रे नक्की वेगळी असतील. निसर्गात फिरशील त्यावेळी चिंतन कर , खूप वेळ नजर खिळवून एकाच ठिकाणी बस. ते दृश्य मनात साठव. शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या, धमन्यांमध्ये ते दृश्य खेळते राहील व नंतर हृदयावर त्याचे एक प्रतिबिंब उठेल व नंतर त्या प्रतिबिंबालाच कागदावर उतरव. तनमनधन चित्रांवर केंद्रित कर, एक वेगळे अनवट चित्र निर्माण होईल. जे आतून येईल ते तुझे खरे चित्र असेल.
त्या चित्रकाराने या झेन गुरुजींना मनःपूर्वक नमस्कार केला व आतून चित्रे काढता येतात का त्याचा प्रयत्न करू लागला. मी देखील त्या चित्रकाराचे अनुकरण करण्याचे ठरवले. मनाच्या आतमध्ये खूप खोलवर गेल्यावर उंचच उंच पाचगणीच्या टेबललॅंडचे पठार दिसू लागले. त्या पठाराच्या अतिउंच कड्यावर मी उभा राहून खाली वाकून पाहतोय असे काहीसे दिसू लागले. सभोवतालच्या डोंगररांगा, कडेकपाऱ्या, आसमंतात भरलेली शुद्ध हवा, धुक्याची किमया , सूर्यकिरणांमुळे चमकणाऱ्या निसर्गाचे अद्भुत दर्शन घडू लागले; मग पेन्सिलीने रेखाटने करण्याचीही गरज वाटत नव्हती. जसजसा आत जाऊ लागलो तसतसा बाहेरच्या जगाचा विसर पडू लागला. स्पर्धा संपल्या, टीकास्त्रे संपली, द्वेष संपला, विरोध संपला, मोठा चित्रकार होण्याची हाव संपली. आतमध्ये एक अद्भुत उजेड आहे. एक मोठी पोकळी आहे. त्या स्वच्छ निर्वात पोकळीतून प्रवास करताना आता फक्त आनंदच आनंद दिसत आहे .
* तुम्हीदेखील या झेन गुरुजींचे कधी तरी ऐका🙏
कदाचित तुम्हांलाही झेन गुरुजींचे ऐकल्यामुळे धर्मभेद ,जातिभेद , व्यक्तिभेद , स्वार्थ, आंदोलने , , हिंसा, द्वेष, सामाजिक – राजकीय – आर्थिक-मानसिक भेदाभेदाचा विसर पडेल व आपल्या आतल्या अनोख्या विश्वात संचार करून नवा प्रकाश सापडेल !
*प्रत्येकाला असा आतला नवा आनंद, नवा उजेड सापडावा यासाठी शुभेच्छा !💐
