मोठी माणसे ५

बाळ गाडगीळ

   बाळ गाडगीळ यांचे विनोदी लेखन मी लहानपणापासून वाचत आलो होतो. मला त्यांचे विडंबनपर लेखन विशेष आवडत होते; विशेषतः ‘अखेर पडदा पडला, एकच प्याला पण कोण?’  वगैरे नाटकांचे विडंबन करणारे लेखन; पण प्रत्यक्ष भेट बरीच उशिरा झाली. तसा मी १९६५ ते १९६७ पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात होतो. तेव्हा ते तिथे उपप्राचार्य होते, अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ‘रसिक मंडळ’ असे काहीतरी मंडळही ते चालवीत होते; पण गाडगीळ ‘साहित्य सहकार’ या मराठी साहित्यविषयक मंडळात मात्र नव्हते. मी यांपैकी कुठल्याच मंडळात गेलो नव्हतो. मी गाडगीळ यांना कधीतरीच पाहिले असावे. विनोदी लेखक वाटू नये असा त्यांचा उग्र चेहरा होता .

   १९७५ च्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र टाइम्सने घेतलेल्या ‘कविता तुमची  निवड पाडगावकरांची’ या नावाने मुख्यतः नवोदित कवींसाठी असलेल्या कवितास्पर्धेत पाडगावकरांनी माझ्या ‘होड्या’ कवितेची पहिल्या क्रमांकाने निवड केली आणि तिचे आपल्या लेखातून भरपूर कौतुक केले. नंतर म.टा. ने अशा स्पर्धा दरमहा घेतल्या व त्यात वेगवेगळ्या मान्यवरांनी परीक्षकाचे काम केले होते. अशा निवडलेल्या कवींचे एक कविसंमेलन तेव्हाच्या मुंबई दूरदर्शनने आपल्या ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रमात घेतले. तेव्हा पाडगावकरांनी आस्थेने माझी चौकशी केली आणि माझ्या इतर कविताही वाचायला मागितल्या. मीही हौसेने तोपर्यंत लिहिलेल्या सगळ्याच कविता त्यांच्या घरी नेऊन दिल्या. त्यावर त्यांचे उत्तरही आले. त्या कविता पाडगावकरांना कच्च्या वाटल्या होत्या. ‘होड्या’ कवितेने त्यांच्या मनात ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्या या कविता पूर्ण करत नव्हत्या. माझ्या कविता परत देण्यासाठी आणि त्याविषयी सविस्तर बोलण्यासाठी त्यांना मला प्रत्यक्ष भेटायचे होते. ते लवकरच पुण्याला येणार होते. बाळ गाडगीळ, मला वाटते, तोपर्यंत फर्ग्युसनचे प्राचार्य झाले होते. पाडगावकर त्यांच्या घरीच उतरणार होते. तिथेच त्यांनी मला भेटायला बोलावले. मी गाडगीळ यांच्या घरी त्यांना जाऊन भेटलो. पाडगावकरांनी माझ्या कविता मला परत देऊन त्यावर सविस्तर चर्चाही केली. नंतर मला प्राचार्य बाळ गाडगीळ यांच्या घरी, ते आणि पाडगावकर यांच्याबरोबर चहाचाही लाभ मिळाला.

   १९८२ मध्ये माझा ‘होड्या’ कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे नवलेखक पुस्तक अनुदान मिळवून सिद्ध होऊन प्रसिद्धही झाला. त्यानंतर १९८४ मध्ये माझा विडंबन कविता संग्रह ‘माझा (पण ) बेहद्द नाममात्र घोडा’ ला देखील ‘मरासासंमं’ चे लेखकाच्या दुसऱ्या पुस्तकासाठीचे अनुदान मिळाले. या पुस्तकाचे प्रकाशक होते ‘विश्वमोहिनी’ चे आनंद अंतरकर. या पुस्तकासाठी प्रस्तावना कोणाची घ्यावी असा विचार करताना  मला बाळ गाडगीळ यांचे नाव सुचले. त्यांच्या विडंबनपर लेखनाने माझ्यावर मोहिनी घातली होती. मी आनंद अंतरकरांना त्यांचे नाव सुचवताच ते आनंदाने तयार झाले. बाळ गाडगीळ अंतरकरांच्या ‘मोहिनी’ मासिकाचे नियमित विनोदी लेखक तर होतेच; शिवाय त्यांचा ‘अखेर पडदा पडला’ हे नाटकांविषयी विडंबनपर लेखनाचे पुस्तकदेखील ‘विश्वमोहिनी’ने प्रकाशित केले होते.

मी रीतसर बाळ गाडगीळ यांना भेटलो. त्यांना पुस्तकाची संहिता दाखवली. गाडगीळ यांनी त्या पुस्तकात ज्या कवितांची विडंबने होती त्या मूळ कविताही मागितल्या. त्याही मी त्यांना दिल्या. दोन्ही वाचून गाडगीळ प्रस्तावना लिहायला तयार झाले. प्रस्तावना लिहून त्याचा पहिला खर्डा त्यांनी माझ्या स्वाधीन केला. कवितेच्या पुस्तकाची प्रस्तावना गाडगीळ पहिल्यांदाच लिहीत होते. त्यांनी मला त्यांच्या प्रस्तावनेत मला आणखी काही गोष्टी याव्यात असे वाटत असेल तर तेही सांगायला सांगितले.  आपल्या प्रस्तावनेत त्यांचा समावेश करायचीही त्यांची तयारी होती. दरम्यान त्यांनी माझा पहिला स्वतंत्र कवितांचा संग्रह ‘होड्या’ही वाचला. तो वाचल्यावर गाडगीळ यांनी आणखी एक गोष्ट केली; चक्क ‘होड्या’ आणि ‘मा(प)बेनाघो’ ची संहिता पु. ल. देशपांडे यांना वाचायला दिली आणि एक दिवस खुद्द ‘पुलं’चे पत्र मला आले.  आपल्या विनोदी लेखनामुळे लहानपणापासूनच पु ल. माझे दैवत झाले होते. त्यांनी पत्रात लिहिले होते, “तुमच्या ‘होड्या’तल्या ‘तेव्हा ना’ या पहिल्या कवितेनेच मला पकडून धरले. ‘तेव्हा ना मुठीमधे आईचे बोट बंद असे’ ही ओळ वाचताना खळ्कन् डोळ्यांत पाणी आले.” पुलंसारख्या मर्मज्ञाकडून अशी दाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि ती केवळ बाळ गाडगीळांनी ‘होड्या’ पुलंना दिल्यामुळे घडून आली होती! 

   पुढे पुलंनी ‘मा(प)बेनाघो’बद्दलही लिहिले होते, ‘तुमचा घोडाही मजेदार आहे; पण त्या कवितांतील खोच मर्मज्ञांनाच कळावी. मूळ कविता थोडीफार गाजलेली असणे विडंबनाला आवश्यक आहे.’ पुढे पुलंनी ‘गाडगीळ यांनी तुमची भेट घडवून देण्याचे मान्य केले आहे. भेट झाली तर आनंद वाटेल.’ असेही लिहिले होते. पुलंची अशी आनंददायक भेट माझ्या आयुष्यात गाडगीळ यांच्यामुळेच आली. 

   माझ्या कविता आणि विडंबनांबद्दल बहुधा गाडगीळ आणि पुलं यांचं बोलणं झालं असावं. गाडगीळ यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिलं, ‘जोगळेकरांचा होड्या संग्रह मी ह्या ‘मा(प)बेनाघो’ चे वाचन केल्यानंतरच वाचला. तेव्हापासून माझा असा ग्रह झालेला आहे की, स्वतंत्र कविता हीच जोगळेकरांची ताकद (Forte) आहे.’ पुढे आपल्या खास शैलीत गाडगीळ लिहितात, ‘पण सध्या आपल्यापुढे हा बेहद्द नाममात्र घोडा आपल्या टापांनी जमीन उकरीत उभा आहे; त्याचे काय?’ आणि मग त्यांनी या घोड्याला त्याने कायम मिरवावे असे प्रशस्तिपत्र दिले आहे, ‘आचार्य अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांनंतर खऱ्या अर्थाने मराठी कवितांच्या विडंबन क्षेत्रात आपल्या टापा टाकणारा जोगळेकरांचा बेहद्द नाममात्र घोडाच आहे.’ हेच वाक्य मग या पुस्तकाची आपल्या मलपृष्ठावर वसंत सरवटे त्यांच्या चित्रासह पाठराखण करते झाले. 

   यापुढे गाडगीळ यांनी आपल्या प्रस्तावनेत एक धाडसी विधान केलेले आहे,  ‘तसे पाहिले तर हे विडंबनकाव्य काहीसे धाडसच आहे. आचार्य अत्रे किंवा केशवकुमार यांचे तसे नव्हते. त्यांचे काम सोपे होते; कारण त्यांनी मुख्यतः ज्या रविकिरणांचे विडंबन केले, ते कवी सुमार वकुबाचे होते. त्यात मुळी एक रवी आणि बाकीची सगळी किरणे! जोगळेकरांचे मी धाडस म्हणतो याचे कारण, त्यांचे काही कवी तरी मराठीतले मातबर कवी आहेत. त्यांचे विडंबन ही करामत एकंदरीत अवघडच.’ 

   पुढे पुलंच्या मताशी जुळणारा मुद्दा गाडगीळ मांडतात, ‘जोगळेकरांनी केलेली ग्रेस किंवा अरुण कोलटकर अशांच्या कवितांची विडंबने बाजी मारून जातात. इतरांच्या बाबतीत त्यांच्या मूळ कविता माहीत नसल्याने त्यातील विडंबनाची खुमारी समजून येत नाही.’ ती खुमारी दाखवण्यासाठी मग गाडगीळांनी काही मूळ कविता किंवा त्याचे अंश उद्धृत करून त्यापुढे त्यांचे मी केलेले विडंबन ठेवलेले आहे. नंतर ते प्रश्न करतात, ‘तरीही या संग्रहातील बहुतेक कविता मूळ संदर्भांशिवाय मजेदार का वाटतात?’ पुढे त्याचे उत्तरही देतात, ‘कारण या विडंबनांतून जोगळेकरांची कल्पनेची चमक, हास्य निर्मिणारी खोचक दृष्टी  दिसते म्हणून.’ पुढे गाडगीळांनी मला विडंबनांखेरीज स्वतःच्याच स्वतंत्र अशा हसऱ्या कविता फुलवण्याचाही सल्ला दिला आहे. 

   विडंबनांचा मूळ कवीवर काय परिणाम होतो याची चर्चा करताना गाडगीळ म्हणतात, ‘विडंबन विषयाचे जनक चिडतात, रागावतात, प्रसंगी डोक्यात राखही घालतात.’ खुद्द गाडगीळांनाही अशा प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले होते. जी.ए., पु.शि.रेगे यांनी गाडगीळांच्या अशा विडंबनपर लेखनाच्या हेतूविषयीच (आपल्या खाजगी पत्रव्यवहारांतून) शंका प्रदर्शित केली होती. नाटककार बाळ कोल्हटकर तर प्रकटपणे रागावले होते. त्याला कोपरखळी देण्यासाठी प्रस्तावनेत गाडगीळ लिहितात, ‘काही सुदैवी लोक असे की त्यांनी केलेले विडंबन काही बुजुर्गांना – या ना त्या कारणाने असेल – निर्विष वाटते. इतर काहींचे वाटत नाही. ‘एखाद्याचे नशीब’ असे म्हणायचे’ (हे बाळ कोल्हटकर यांच्या एका नाटकाचे नाव होते!) 

   मा(प)बेनाघो च्या प्रकाशनासाठी विद्याधर पुंडलिक यांना बोलवायचे ठरवले. त्यांना आधीपासूनच मी केलेली विडंबने आवडत आली होती. गाडगीळ तेव्हा फर्ग्युसनचे प्राचार्य असल्याने फर्ग्युसनचे बाई जेरबाई ग्रंथालय आम्हांला एका रविवारी म्हणजे कॉलेजच्या सुट्टीच्या दिवशी प्रकाशनासाठी मिळाले. पुंडलिक आले. गाडगीळांनाच यायला थोडा उशीर झाला. पुंडलिक आणि गाडगीळ यांचे दर्शनी रूप हे वेगळे वेगळे होते. बाळ गाडगीळ विनोदी लेखक; पण त्यांचा चेहरा उग्र भासायचा. चष्म्याच्या जाड काचांआडचे डोळे रागावून मोठे झाल्यासारखे वाटायचे. पुंडलिक गंभीर लेखन करणारे; पण त्यांचा चेहरा हसरा प्रसन्न ! आपल्या भाषणात, पुंडलिकांनी सुरुवातीलाच सांगितले, “बाळ गाडगीळ यांनी या पुस्तकाला एक छान प्रस्तावना दिली आहे. त्यातले काही मुद्दे हे त्यांनी माझे चोरलेले आहेत. ही बाळ गाडगीळला पहिल्यापासून सवय आहे. तो आणि मी वर्गमित्र. मी पुढे बसायचो, हा मागे बसायचा आणि माझ्या उत्तरपत्रिका कॉपी करायचा. तरी पण त्याला फर्स्ट क्लास मिळाला, मला कधी मिळाला नाही.” 

   माझ्या या विडंबन कवितेबद्दल बोलताना पुंडलिक म्हणाले, “प्रत्येक साहित्यिक पिढीचा एक चैतन्यधर्म असतो. Ethos असतो. हा Ethos जोगळेकरांनी बरोबर पकडला आहे. प्रत्येक कवीची लय त्यांनी पकडली आहेच; त्याबरोबर त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा वेध अगदी अचूकपणे घेतला आहे. जोगळेकरांची प्रत्येक विडंबन कविता मूळ कवितेला एक सर्जक पर्याय देते; वरवरचा उपहास, शब्दांची टिंगल यापलीकडे जाते; अगदी अपेक्षित असा धक्काही देते. शुद्ध प्रसन्नता जोगळेकरांजवळ आहे.” गाडगीळ माझ्या विडंबन कवितांतील विनोदाकडे पाहत होते तर पुंडलिक कवित्वाकडे. कदाचित पुंडलिक यांचा या सर्व मूळ कवींच्या कवितांचा अभ्यास होता आणि गाडगीळ यांचा नसावा. गाडगीळही पुंडलिकांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत होते आणि हा दृष्टिकोन लक्षात घेत होते.

   मा(प)बेनाघो प्रसिद्ध झाल्यानंतर  यांनी मराठीतील विनोदासंबंधी अनेक लेख लिहिले; भाषणे केली. त्या सर्वांत त्यांनी माझ्या विडंबन कवितांचा आवर्जून उल्लेख केला. १९९२ मध्ये मुंबईत झालेल्या विनोदी साहित्य संमेलनाचे गाडगीळ अध्यक्ष होते. या संमेलनाला मीही एक निमंत्रित हास्यकवी होतो.  गाडगीळांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात माझ्या विडंबन कवितांचा आणि लेखनाचा गौरव केला होता. विनोदी साहित्याला दुय्यम समजले जाते याची त्यांना खंत वाटायची. विनोदी साहित्याला भरपूर लोकप्रियता मिळते; पण समीक्षक त्याकडे लक्ष देत नाहीत. जागतिक स्तरावरही नोबेलसारखे अत्युच्च पुरस्कार गंभीर साहित्यालाच मिळतात. असे का होते याचे ते चिंतनही करत होते. 

   माझे घर फर्ग्युसन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरच असल्याने , कधी कधी गाडगीळ पती-पत्नी मला माझ्या घराच्या फाटकात रस्त्यावरून जाताना दिसायचे.  आता ओळख झाली असल्याने, मी एकदा त्यांना एक जिना चढून वर माझ्या घरी यायची विनंती केली होती. तेही कोणताही अनमान न करता आले. माझ्या घराच्या बैठकीच्या खोलीत माझ्या बायकोने काढलेले एक घराचे पेंटिंग होते. ती तेव्हा पेंटिंग शिकत होती. ते चित्र पाहताच गाडगीळ यांच्या पत्नी म्हणाल्या, “हे शेक्सपियरच्या प्रेयसीचे घर ना?” माझी पत्नी चकित झाली आणि तिने होकार भरला. मूळ चित्र पाहूनच तिने ते चित्र काढले होते. गाडगीळ पती-पत्नी गाडगीळांच्या फेलोशिपच्या निमित्ताने, इंग्लंडमध्ये वास्तव्याला होते. सौ. गाडगीळ यांनी ते घर पाहिले होते. त्यांच्या स्मरणशक्तीला दाद दिली पाहिजे आणि त्याचे स्मरण करून देण्याइतके ते चित्र माझ्या नवशिक्या चित्रकार बायकोने हुबेहूब काढले होते या गोष्टीलाही! 

   फर्ग्युसनमध्ये असतानाच प्राध्यापक शां.ब. मुजुमदार गाडगीळांचे सहकारी होते. मलाही ते प्री. डिग्रीला वनस्पतिशास्त्र शिकवायचे. त्यांनी सिंबायोसिस ही विशेषतः भारतात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठीची शैक्षणिक संस्था सुरू केली. गाडगीळ फर्ग्युसनमधून निवृत्त  झाल्यानंतर प्रथम सिंबायोसिसचे उपाध्यक्ष, नंतर अध्यक्ष झाले. त्याआधी त्यांनी तेव्हाच्या पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदाचीही धुरा वाहिली होती. सिंबायोसिसचे अध्यक्ष झाल्यानंतर ते प्रशासकीय कामात अधिक गुंतून राहिले. त्यांचे विनोदी लेखन कमी होत गेले; पण तरीही त्यांनी आयुष्यात साठाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांच्या दोन पुस्तकांना राज्य पुरस्कारही मिळाले. ‘वळचणीचे पाणी’  हे आत्मचरित्र लिहिले. त्यांच्या पुस्तकांत अर्थशास्त्रावरची पुस्तके आणि अनुवादही आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षी ते निवर्तले. 

   मा(प)बेनाघो चे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे वसंत सरवटे यांनी काढली होती. गाडगीळ यांच्या प्रस्तावनेच्या अखेरीस त्यांनी एक चित्र दिले होते. त्यात चाके लावलेल्या लाकडी फळीवर घोडा उभा केला आहे आणि त्याचा लगाम हातात घेऊन गाडगीळ त्याला ओढत आणत आहेत, घोड्याच्या तोंडावर ‘एखादी तरी स्मितरेषा’ भासत आहे!  हा घोडा स्वयंसिद्ध आहे, त्याला कोणी ओढत आणण्याची जरूर नव्हती असे कदाचित सरवट्यांना सूचित करायचे असावे; पण माझ्या या घोड्याला मराठी वाङ्मयक्षेत्रात पुढे आणण्याचे श्रेय बाळ गाडगीळ यांनाच दिले पाहिजे !

Author

Leave a Reply