प्रत्येक शहराचे असे एक अंतरंग असते. मूळ शहर हळू हळू वाढत जाते; पण तरी त्या मूळ भागाचा स्वतःचा असा एक अभिमान असतो. मुळात प्राचीन काळात कोणतेही गाव शहर वसत होते ते पाण्याच्या उपलब्धतेवरून! आता त्यात वाहतूक, नोकरी-व्यवसायाच्या संधी अशा अनेक गोष्टींची भर पडली आहे. मुंबईमध्ये रेल्वे लाईनवरून जागेचा अभिमान बाळगला जातो, पुण्यात तोच पेठा आणि इतर भाग किंवा नदीच्या या भागातले आणि नदीपलीकडचे असे म्हटले जाते. तसेच काहीसे बेंगलोरमध्ये नॉर्थ बेंगळुरू आणि साऊथ बेंगळुरू आणि बेंगलोरच्या बाहेरचे बेंगलोर असे शहराचे भाग मानले जातात. ORR म्हणजेच आऊटर रिंग रोड पलीकडचा भाग हा अनेक स्थानिक लोकांच्या भाषेत बेंगळुरूच नाही. ते एका अर्थाने खरेही आहे; कारण हे सगळे उपनगरीय भाग गेल्या काही वर्षांत बेंगळुरूला जोडले गेले आहेत. तेथील रहिवासी हे बहुतांश करून बिगर कन्नडीगा आहेत किंवा बंगळुरू बाहेरचे कन्नडीगा आहेत.
मागील काही वर्षांत बेंगलोरमधील पुराच्या घटना गाजल्या होत्या. कावेरीच्या पाण्याचा प्रश्नदेखील गेल्या अनेक दशकांपासून गाजत आहेच. या शहरातून एक नदी जरी वाहत असली तरीही पाणी अडवून बांधलेले तलाव, छोटी-मोठी धरणे हेही या शहराचे वैशिष्ट्य. आजही बेंगलोरमध्ये फिरताना अनेक तलाव दिसतात. आजची बेंगलोर डायरी ही बेंगलोरच्या तलावांबाबत!
१९४९ मध्ये केवळ ६९ स्क्वेअर किलोमीटर परिघात असलेले बेंगलोर २००७ मध्ये ७०० स्क्वेअर किलोमीटर झाले. बेंगलोर अजूनही वाढत आहेच; फक्त आता बृहत् बेंगलोर महानगरपालिकेने (bbmp) मात्र आता ७४१ स्क्वेअर किलोमीटर परिघावर या शहराला थोपवून धरले आहे. तसेही अधिकृत सीमेच्या दहा-पंधरा किलोमीटरलादेखील त्याच शहराचा भाग म्हणायची आपल्याकडे पद्धत असल्यामुळे, ठाणे, कल्याण, वसई, बोरिवली सगळेच काही मुंबई होऊन जाते आणि पिंपरी चिंचवड, खराडी पुणे होऊन जाते – तसेच काहीसे. बेंगलोर हे कित्येक शतकांपासून प्रसिद्ध आहे ते इथल्या तलावांसाठी. गंमत म्हणजे सगळेच तलाव नैसर्गिक नाहीत; काही मानवनिर्मित आहेत; तर काही wetland (पाणथळ जागा) आहेत. Wetlands म्हणजे पाण्याने झाकली गेलेली जागा. कधी ही जागा, मोसमी असते, कधी ही जागा कायमच पाण्याखाली असते; तर कधी ही जागा पुरापासून संरक्षण मिळवण्यासाठी तयार केलेली असते. अनेकदा सांडपाणी सोडण्यासाठी देखील अशा पाणथळ जागा तयार केल्या जातात. अशा पाणथळ जागा आणि निसर्गनिर्मित पाण्याचे स्रोत असलेले, पावसाचे पाणी धरून ठेवणारे अशा सगळ्याच जागांना तलाव म्हणूनच अनेकदा ओळखले जाते. आजमितीला बेंगलोर शहरात २१० तलाव आहेत ज्यातील १६७ BBMPच्या देखरेखीखाली आहेत, ३३ BDA कडे आहेत, ५ फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कस्टडीत आहेत, ४ लेक डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे आहेत; तर ४ तलाव चक्क बेंगलोर मेट्रोच्या अखत्यारीत येतात. तलाव संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन १६७ पैकी ९२ तलाव विकसित केले आहेत, होत आहेत किंवा लवकरच होतील.
आज २०२४ मध्ये १०० एकरांपेक्षा मोठे असलेले १६ तलाव आहेत. बेगूर, बेलंडूर, चिकबानवारा, दोडबोमसंद्रा, दोडअनेकुंडी, हेब्बाल, होरमावू, जक्कूर, काल, माडीवला, मारगोंडणहल्ली, राचेनहल्ली, अलसूर, वरथूर, येलहंका, येले मलप्पा शेट्टी हे ते अजूनही पाणी टिकवून ठेवलेले नशीबवान तलाव. मात्र यांतले सगळेच तितकेसे नशीबवान नाहीत. बेलंडूर तलाव (जो सगळ्यात मोठा आहे) तब्बल ८९२ एकरांवर पसरलेला आहे, तो कायम तिथल्या प्रदूषित पाण्यामुळे बातम्यांत असतो. खरंतर हा तलाव आणि वरथुर तलाव यांचे पाण्याचे प्रवाह पुढे दक्षिण पिनाकिनी जी पुढे पेंनार नदी होते तिला जाऊन मिळतात आणि हा प्रवाह अर्थातच पूर्व बेंगलोरचे सांडपाणी या नदीत घेऊन येतो.
बेंगलोर शहरातून चक्क एक नदी वाहते; तर आणखी एक नदी बेंगलोरच्या सीमेपासून अगदी हाकेच्या अंतरावरून वाहते. वृषभावती ही नदी शहराच्या अगदी मध्यातून जाते; तर दक्षिण पिनाकिनी/पेंनार नदी शहरात न येता सीमेच्या जवळून वाहते. बेंगलोरच्या उत्तरेला नंदी डोंगरावर या दोन्ही नद्या उगम पावतात. यातली वृषभावती तर आता केवळ सांडपाणी वाहून नेणारी गटारगंगा झाली आहे. तिला मिळालेले नाल्याचे स्वरूप बघून कोणे एके काळी हिच्या पाण्यावर लोक जगत होते यावर विश्वास बसत नाही. दोष नदीचा नसतो – तो असतो तिचे मोल न समजणाऱ्या माणसांचा; पण मग एखाद दिवशी नदी तिचा हिसका दाखवते आणि पसरते इकडे तिकडे आणि मग येतो पूर, घुसते घरात, दारात पाणी. काही वर्षांपूर्वी असाच एकदा जोरदार पाऊस आला होता आणि वृषभावती तिचा जुना रस्ता शोधता शोधता रस्त्यावरच ठिय्या देऊन थांबली होती काही काळासाठी. गेल्या वर्षी बेंगलोरच्या पूर्व भागात अतिवृष्टीने असाच हाहाकार उडाला होता. नंतर जुन्या सॅटेलाइट चित्रामुळे कळले जिथे जिथे पाणी शिरले होते त्या रहिवासाच्या ठिकाणी पूर्वी तलाव क्षेत्र होते.
अशीच काहीशी गत आहे बेलंडूर, वरथुर या तलावांची. या तलावात अनेक औद्योगिक प्रकल्पांमधले पाणी सोडले जाते आणि त्यामुळेच इथे पाण्यावर froth असतो. १९९७ साली या तलावाचे पाणी वापरण्यायोग्य नाही असे जाहीर केल्यापासून इथले प्रदूषण वाढलेच आहे. २०१८ मध्ये तर इथल्या फेसाला लागलेली आग जवळपास ३० तास जळत होती. या तलावाच्या संवर्धनाचे अनेक प्रयत्न झाले; पण त्याला फारसे यश नाही मिळाले.
CSR अंतर्गत काही संस्थांनी आणि बिगर सरकारी संस्थांनी काही तलावांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आणि राचेनहल्ली, दासरहळ्ळी, पुट्टेनहळ्ळीसारख्या अनेक तलावांना नवसंजीवनी मिळत आहे. अनेक छोटे तलावसुद्धा लोकसंवर्धनातून परत पाण्याने भरत आहेत, तिथे मासे परत आले आहेत आणि मासे आहेत म्हणून वेगवेगळे पक्षी पण यायला लागले आहेत. नैसर्गिक परिसंस्था परत जोर धरताना बघायला मिळत आहे..
पाण्याने भरलेले तलाव जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच केवळ पावसाचे पाणी रोखून धरणारे, सांडपाणी साठवून ठेवणारे तलावसुद्धा महत्त्वाचे आहेत. माणसांना राहायला जागा हवी म्हणून आपण या कोरड्या पडलेल्या तलावांवर, नद्यांवर आक्रमण करतो. आपल्याला जागा मिळते मात्र हे मागे हटलेले तलाव, नद्या त्यांचे शाप देतातच. बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी खास करून रिंग रोडच्या पलीकडच्या नव्या बेंगलोरमध्ये, बाहेरून आलेल्या लोकांना सामावून घेणाऱ्या बेंगलोरमध्ये टँकर लॉबी खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे, हे त्याचेच एक द्योतक आहे.
शहर म्हणजे फक्त तिथली माणसे, इमारती, रस्ते नसतात. त्या शहरातील नद्या, तलाव, झाडे, पक्षी, प्राणी हे सगळेसुद्धा शहराचाच भाग असतात; त्यामुळेच बेंगलोर म्हणजे काही फक्त विधानसौदा, चिन्ना स्वामी स्टेडियम, इलेक्ट्रॉनिक सिटी नाही; तर बेंगलोर म्हणजे आज असलेले – नसलेले तलाव पण आहे. या तलावांच्या भोवती तयार झालेला निसर्गाचा अधिवास अनुभवण्यासारखाच आहे. जुन्या तलावांना नवीन आयुष्य मिळो, ते दीर्घायुषी होओत, नवीन तलावांना नवीन जागा मिळो, माणसांच्या घरांबरोबरच प्राणी-पक्ष्यांची घरे देखील भरभराटीला येओत अशी आशा जरूर करू या! कोणास ठाऊक लुप्त झालेले, बुजवलेले तलाव, नद्या तथास्तु म्हणत उःशापही देतील!
(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)
या लेखातील आकडे खालील संकेत स्थळांवरून घेतलेले आहेत.
Lakes Department (bbmp.gov.in)
Lakes in Bangalore – Wikipedia
काईकोंडनहळ्ळी तलाव
अलसूर तलाव
