दत्तकृपेने मंतरलेल्या, कवी सुधांशु व सदानंद यांच्या कर्तृत्वाने पुनीत झालेल्या भूमीत नुकतेच सर्वस्वी लोकसहभागावर चालणारे ८१ वे औदुंबर साहित्य संमेलन संपन्न झाले. ‘सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर’ ही संस्था या संमेलनाची आयोजक होती. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, साहित्यिक, विचारवंत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. औदुंबर (जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलन भरत आले आहे. हे संमेलन दरवर्षी मकर संक्रांतीला भरते. या संमेलनाची छापील निमंत्रणे पाठवली जात नाहीत. कार्यकारी मंडळाची बैठक होते. तीत अध्यक्ष निवडला जातो. संक्रातीच्या दोन दिवस आधी ही बातमी सांगलीच्या व कोल्हापूरच्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होते. निमंत्रित अध्यक्ष हे नामवंत मराठी साहित्यिक असतात. लगतच्या जिल्ह्यांतील अनेकांना ही बातमी मौखिक प्रचाराद्वारे समजते; मग परिसरातील साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि अन्य साहित्यप्रेमी औदुंबर गावी दुपारी चार वाजता पोहोचता येईल अशा बेताने आपापल्या गावी बस पकडण्यासाठी गर्दी करतात. संमेलनस्थळी असलेला लांबरुंद उंच कट्टा हे व्यासपीठ असते. पूर्वी छायादार वृक्षांच्या सावलीत अंथरलेल्या मोठ्या सतरंज्यांवर मंडळी आसने पकडून बसत आणि संमेलनातील वक्त्यांची भाषणे व कविसंमेलनांत कवींच्या कविता मनापासून ऐकत. भाषणे ऐकताना ज्या विशाल वृक्षाची सावली श्रोत्यांवर पडत असे, तो वृक्ष २००७ साली कोसळला; त्यामुळे त्यानंतर दरवर्षी संमेलनाच्या जागी मांडव घालावा लागतो. औदुंबरच्या कृष्णाकाठी १९३७ साली सदानंद सामंत व हणमंत नरहर जोशी या दोन शाळकरी मुलांच्या मनात गावात ‘बालशारदा मंडळ’ स्थापण्याची कल्पना आली आणि त्यांनी तशी स्थापनाही केली. या निमित्ताने आपल्या सवडीनुसार कधीतरी काव्यवाचन करावे आणि साहित्यिक गप्पाटप्पा कराव्यात एवढाच माफक हेतू मनात ठेवून ही सभा सुरू झाली; पण दुर्दैवाने १९३९ साली सदानंद सामंत या गुणी मुलाचा विषमज्वराचा ताप येण्याचे निमित्त होऊन अकाली मृत्यू झाला. त्याचे सारे सवंगडी सैरभैर झाले आणि यातूनच भविष्यात गुणवंत कथाकार म्हणून नावारूपाला आलेले म. बा. भोसले व हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांनी आजच्या ‘सदानंद साहित्य संमेलना’ला प्रारंभ केला.
डॉक्टर दाभोळकर यांचे अध्यक्षीय भाषण नेहमीप्रमाणे वेगळे व मननीय होते. त्याचा गोषवारा खालील प्रमाणे.
१ सध्या मराठी भाषेचा पडता काळ चालू आहे हे खरे आहे. इंग्रजी माध्यमातून होणारे शिक्षण हे त्याचे एक कारण म्हणून सांगितले जाते. इंग्रजी ही ज्ञानभाषा असल्याने ती शिकलीच पाहिजे; परंतु आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर होत नसल्याने आपली मुले मराठीपासून तुटत चालली आहेत.
२ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजून मिळालेला नाही; कारण आपल्यालाच या भाषेची महत्ता वाटत नाही. फादर स्टीफन्ससारखा एक विदेशी माणूस कोकणी, मराठी या भाषांसाठी बरेच काही करून जातो; आपण मात्र याबाबत बरेचसे उदासीन असतो.
३ मध्ययुगीन मराठी संतांनी मराठी टिकवण्यासाठी व रुजवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. काळाची चौकट न मोडता प्रबोधन करीत समाजाला पुढे नेण्याचे आव्हान या सर्व संतांनी लीलया पेलले. या संतांची भाषा क्लिष्ट आहे, व्याकरण समजत नाही अशी एक समजूत प्रचलित आहे. त्याचबरोबर बोलीभाषा /प्रमाणभाषा, नवी भाषा /जुनी भाषा असे काही कप्पे आपल्या मनात असतात – प्रत्यक्षात असे काही नाही. ज्ञानेश्वर, बहिणाबाई, मुक्ताबाई यांनी अत्यंत सौष्ठवपूर्ण व समजण्यास सोपी मराठी भाषा वापरत प्रबोधन केले आहे. नंतरच्या कवींनी विषयानुरूप ही शब्दकळा काहीशी बदलली. हे नंतरचे कवी कालानुक्रमे आपल्याला जवळ वाटतात एवढेच
४ साहित्य हे संप्रेरकासारखे(Catalyst ) असते. संस्कार करणे ही साहित्याची प्राथमिक जबाबदारी आहे.
साहित्यिकांसाठी काही लक्ष्मण रेषा आहेत असे डॉक्टर दाभोळकरांनी नमूद केले :
विकले जाऊ नका; कदाचित तुमचे नाव विसरले जाईल; पण तुमची साहित्यकृती अमर राहणार आहे हे लक्षात ठेवा. स्वतःच्या कर्तृत्वाचा रास्त अभिमान बाळगा असे त्यांनी सर्व साहित्यिकांना सांगितले.

