ब्लॅक स्वान

The Black Swan: The Impact of the Highly Improbable [Paperback] Taleb, Nassim Nicholas

ब्लॅक स्वान (द इंपॅक्ट ऑफ द हायली इंप्रॉबेबल) – नस्सिम निकोलस तालेब 

प्रकाशक – पेंग्विन 

४८० पाने  

किंमत – रु.४१५ किंडल – रु.२५० 

 नस्सिम निकोलस तालेब हा मूळचा लेबनीज वंशाचा अमेरिकन लेखक, संपादक, संख्याशास्त्रज्ञ आणि वॉल स्ट्रीटवरचा माजी ट्रेडर आहे. यादृच्छिकता (randomness), संभाव्यता आणि अनिश्चितता हे त्याच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्याने काही प्रतिष्ठित विद्यापीठांमधे अध्यापनही केले आहे. ‘द संडे टाइम्स’च्या मते दुसर्‍या महायुद्धानंतरच्या सर्वाधिक प्रभावशाली पुस्तकांमध्ये त्याच्या ‘ब्लॅक स्वान’ या पुस्तकाचा १२वा क्रमांक लागेल. आर्थिक क्षेत्रातल्या धोक्याचे व्यवस्थापन करणार्‍या प्रचलित प्रणाली आणि पद्धतींवर त्याने सडकून टीका केलेली आहे. 

 ज्या गोष्टींचे आपण भाकीत करू शकत नाही अशा गोष्टी घडल्या तर त्यांना तोंड द्यायला समर्थ असणारा समाज बनवण्यावर लेखकाचा भर आहे. आपल्या प्रणालींमधे तकलादूपणा असण्याऐवजी रोजच्या व्यवहारात घडणार्‍या काही चुका, यादृच्छिक घटना आणि अस्थिरता यांचा एक प्रकारे फायदा करून घेण्याची क्षमता असली पाहिजे असे तो सुचवतो. संशोधनाचे विकेंद्रीकरण केल्यास त्याचा ठरावीक दिशेने नियोजित केलेल्या संशोधनापेक्षा फायदा होईल यावर त्याचा विश्वास आहे. 

 फक्त आपली निरीक्षणे आणि अनुभव यांवर आधारित काही गोष्टी समजून आणि शिकून घेण्यावर फार मोठ्या मर्यादा असतात; याचे एक मोठे उदाहरण म्हणजे १९१४ साली लोकांची जागतिक घडामोडींविषयी जी समज होती त्यावरून पहिल्या महायुद्धाचे भाकीत कोण करू शकला असता? आपल्याला जे थोडेसेच पण मोठे धक्के बसतात त्यांचा एकत्रित परिणाम आपल्या आयुष्यावर झालेला दिसून येतो. हंस पक्षी पांढर्‍या रंगाचे असतात हे आपण छातीठोकपणे सांगू शकतो; पण कधीतरी लाखांत एक काळा हंस दिसू शकतो. काळा हंस बहुतेकांना त्यांच्या आयुष्यात दिसणारही नाही. अनेकांना त्याची कल्पनाही नसते; पण नेहमी पांढरे हंसच बघायला मिळणे यातून काळा हंस नसतोच अशी खात्री देता येत नाही. संपूर्ण पुस्तकात लेखकाने काळा हंस हे रूपक वापरले आहे. काळ्या हंसाच्या तत्त्वानुसार आपल्याला जे माहीत असते त्यापेक्षा जे माहीत नसते ते जास्त महत्त्वाचे ठरते. अनेक फार मोठ्या घटनांच्या संदर्भात आपले ज्ञान आणि माहिती परिणामशून्य असल्याचे आढळून येते. काळा हंस ही संकल्पना अनुभवजन्य वास्तवाच्या आराखड्यावर आधारित आहे. काळा हंस म्हणजे फक्त एखादी घटना नाही तर त्या घटनेचे परिणाम किती सखोल आहेत हेही महत्त्वाचे असते. 

 लोक भविष्याची भाकिते करतात, ती मोठ्या प्रमाणात चुकतात यात काही नवल नाही; पण याची लोकांना जाणीवही नसते ही गोष्ट अधिक आश्चर्याची आहे. कोणताही महत्त्वाचा शोध किंवा नवे तंत्रज्ञान हे सुनियोजित पद्धतीने झालेले नाही. बहुतेक वेळा हा केवळ नशिबाचा हात  होता हे लक्षात घेतले पाहिजे. या अनपेक्षित घटनांची तुलना लेखक ‘काळा हंस’ या रूपकाशी करतो. हा काळा हंस कधी ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणे विध्वंसक असू शकतो किंवा पेनिसिलिनच्या शोधाप्रमाणे फायद्याचा असू शकतो.   स्वच्छतेच्या कल्पना आणि अपघातामुळे तयार झालेली प्रतिजैवके (काळा हंस) यांमुळे लोकांना दीर्घ आयुष्य मिळते आहे. त्यात डॉक्टरांच्या इलाजांचा वाटा काही फार मोठा नाही. एखाद्या ज्ञानाच्या मर्यादा आणि त्याची किंमत कळल्याशिवाय तुम्ही त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करू शकत नाही. 

 मार्क्स आणि अ‍ॅडम स्मिथ यांच्या अनुयायांशी लेखक सहमत नाही; कारण त्यांनी काय होईल याविषयी ठाम भाकिते केली आहेत आणि त्यांचे अनुयायी या दृष्टिकोनातली त्रुटी समजून घेत नाहीत. आपण अचूक निष्कर्ष काढायचा प्रयत्न करतो त्यात सर्वसाधारण गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आपण काही शिकून घेत नाही हे आपल्याला सहजासहजी समजतही नाही. आपल्याला वाटते त्यापेक्षा आपण खूपच कमी विचार करतो. 

 लेखकाकडे बरेच चांगले मुद्दे आहेत; मात्र पुस्तक वाचनीय बनवण्याच्या नादात लेखकाने चौफेर शेरेबाजी करून भल्यभल्यांना टपलीत मारली आहे आणि अनेकांना निकालात काढले आहे. कोणत्याही साधनाचा वापर करताना तारतम्य ठेवले नाही आणि अवाच्या सवा दावे केले तर अपयश पदरात पडणार हे निश्चित; पण अशा वेळी त्या साधनाच्या गैरवापराला दोष न देता लेखक त्या साधनाच्या वैधतेवरच तुटून पडतो.  

 संख्याशास्त्रातला लोकप्रिय बेल कर्व्ह फार मोठ्या फरकांकडे दुर्लक्ष  करतो – उदाहरणार्थ आपण प्रौढ माणसांची उंची मोजून त्याचा आलेख मांडला तर लोकांच्या उंचीमधे फार मोठ्या प्रमाणात फरक आढळणार नाही; पण शेअर बाजारातले चढउतार अतिशय तीव्र असू शकतात. अशा वेळी शेअर बाजारातल्या भावी घटनांचे भाकीत बेल कर्व्ह वापरून केले तर त्यात मोठाच धोका असतो. आपल्याला मात्र असा खोटा विश्वास वाटतो की आपण अनिश्चिततेवर मात केली आहे. 

 विट्गेंस्टाइन हा विसाव्या शतकातला एक महत्त्वाचा तत्त्ववेत्ता. तो असे म्हणाला होता की आपले बहुतेक तात्त्विक आणि वैयक्तिक प्रश्न हे भाषेच्या वापरातूनच निर्माण झालेले आहेत. लेखकाच्या मते जे लोक या विट्गेंस्टाइनचे लेखन किंवा त्याच्या लेखनावरची समीक्षा फार खोलात जाऊन वाचतात त्यांचा असा गैरसमज होऊ शकतो की भाषेतून निर्माण होणारे प्रश्न महत्त्वाचे असतात. इथे विट्गेंस्टाइनला वॉल स्ट्रीटवरचे आर्थिक प्रश्न अभिप्रेत नसणार हे उघड आहे; पण लेखकाने त्याचा विचार केलेला दिसत नाही. त्याच्या मते भाषा सेंद्रिय पद्धतीने वाढतात. ज्यांना आयुष्यात दुसरे काही रोमांचक करण्यासारखे नसते असे लोक – म्हणजे व्याकरणकर्ते भाषा सूत्रबद्ध करतात.

 लेबनॉनमधले युद्ध जवळून बघितल्यावर लेखकाला प्रश्न पडतो की आदर्श सहिष्णू म्हणून ओळखले गेलेले लोक एका रात्रीत रानटी कसे झाले? याचे कारण म्हणजे समाजाचा इतिहास रांगत-खुरडत येत नाही. तो मध्येच उसळ्या मारत पुढे जातो. अशा उसळ्यांचे भाकीत जवळजवळ अशक्यच असते. वृत्तपत्रांमधले वृत्तांकन अशा प्रकारचे असते की तुम्ही जितके जास्त वाचाल तितकी तुम्हांला त्यातून मिळणारी माहिती कमीकमी होत जाते; त्यामुळे अतिशय विद्वान आणि अभ्यासू लोकांची भाकिते एखाद्या टॅक्सी ड्रायव्हरच्या भाकितांपेक्षा अधिक अचूक असत नाहीत, असे लेखक म्हणतो. 

 लोकांची झुंडीने वागायची प्रवृत्ती असते. लेबनॉनच्या युद्धात विविध पत्रकारांची मते भिन्न असली; तरी त्यांच्या विश्लेषणाची पद्धत साधारण एकसारखीच होती. दुसर्‍या एका सामाजिक विचारपद्धतीकडे निर्देश करताना लेखक दाखवून देतो की जे लोक गर्भपाताला पाठिंबा देतात ते लोक मृत्युदंडाच्या शिक्षेला मात्र विरोध करताना दिसतात. याउलट गर्भपाताला विरोध करणारे लोक मृत्युदंडाच्या शिक्षेला पाठिंबा दर्शवताना दिसतात. जे लोक गर्भपाताला मान्यता देतात ते साधारणपणे अधिक कर बसवण्याच्या बाजूचे असतात; त्याच वेळी सामर्थ्यशाली लष्कराच्या विरोधात असतात. यामागचे तर्कशास्त्र शोधताना लेखक विचारतो की जे लोक लैंगिक स्वातंत्र्य मानतात ते लोक वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्याच्या विरोधात का जातात? या विधानांमागे अमेरिकेच्या डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांच्या लोकांचा विचार केलेला आहे. डेमोक्रॅटिक सदस्य हे साधारणपणे गर्भपाताच्या अधिकाराच्या बाजूचे, देहदंडाच्या शिक्षेच्या विरोधात, अधिक करांना मान्यता देणारे; पण फार सामर्थ्यशाली लष्कराच्या विरोधात, लैंगिक स्वातंत्र्याच्या बाजूचे; पण आर्थिक निर्बंधांचे पुरस्कर्ते असतात. रिपब्लिकन सदस्यांची मते साधारणपणे प्रत्येक बाबतीत याच्या उलट असतात. असे लोक त्यांच्या मतांच्या उलट बाजूचा विचारही करत नाहीत. साहजिकच त्यांची भाकिते चुकण्याची शक्यता मोठी असते. 

 लेखकाने एक्स्ट्रीमिस्तान आणि मिडीऑक्रिस्तान या दोन काल्पनिक जगांची मांडणी केली आहे. एक्स्ट्रीमिस्तानामध्ये इतकी असमानता असते की केवळ एखादे टोकाचे निरीक्षण सरासरी आणि एकूण संख्या यांवर फार मोठा प्रभाव टाकू शकते. मिडीऑक्रिस्तानामधे एखादे निरीक्षण सरासरी आणि एकूण संख्या यांवर फार मोठा प्रभाव टाकू शकत नाही. लोकांची उंची, वजन, आहार या गोष्टी मिडीऑक्रिस्तानामध्ये येतात; मात्र संपत्ती ही निश्चितपणे एक्स्ट्रीमिस्तान प्रकारात असते. मिडिऑक्रिस्तानमध्ये काय घडू शकेल याचा आपल्याला चांगला अंदाज बांधता येतो; पण एक्स्ट्रीमिस्तानामध्ये हे अंदाज पूर्णपणे चुकू शकतात. आर्थिक घडामोडी आणि स्टॉक मार्केट या एक्स्ट्रीमिस्तानामध्ये घडतात. तुम्ही सट्टा बाजारातले धोके कशाप्रकारे लोकांपुढे मांडता त्यावरून लोकांची त्या बाबतीतली समज बनते. तुम्ही ज्याचे मोजमाप करू शकता अशा प्रकारचे धोके पत्करणे हे आपण पत्करलेल्या धोक्यांचे मोजमाप करण्यापेक्षा जास्त शहाणपणाचे म्हणता येईल.  

 समजा आपण कोणतेही एक हजार लेखक निवडले आणि त्यांच्या पुस्तकांच्या खपाची संख्या विचारात घेतली – आता या यादीत हॅरी पॉटर लिहिणार्‍या जे.के. रोलिंगचे नाव घातले; तर तिच्या एकटीच्या पुस्तकविक्रीची संख्या ही उरलेल्या एक हजार लेखकांच्या एकत्रित पुस्तक विक्रीच्या संख्येच्या कितीतरी पट जास्त होईल. याच प्रकारे एक हजार सर्वसामान्य लोक आणि मुकेश अंबानी यांच्या एकत्रित संपत्तीमध्ये  मुकेश  अंबानी यांच्या संपत्तीचा वाटा  ९९%हून जास्त असेल. एक्स्ट्रीमिस्तानामध्ये आपल्याला एखाद्या अपघाती, अदृश्य किंवा ज्याचा विचारही करता येणार नाही अशा घटनेचा जुलूम सहन करावा लागतो. स्टॉक मार्केटमध्ये अनेकदा कुठलीही पूर्वसूचना न मिळता फार मोठे नुकसान निमिषार्धात झालेले दिसते.  

 एखाद्या कोंबडीच्या दृष्टीने दिवसेंदिवस किंवा महिनोंमहिने आयते खायला मिळाल्यावर भविष्यातही तसेच घडेल अशी अपेक्षा असू शकते; पण एके दिवशी त्या कोंबडीला खाटकाच्या सुरीखाली जायला लागणे हा काळा हंस म्हणता येईल. खाटकाच्या दृष्टीने ही पूर्वनियोजित कृती असू शकेल; म्हणजेच त्याच्या दृष्टीने हा काळा हंस नाही. याचा अर्थ काळा हंस प्रकट होणे हे तुमच्या अपेक्षांच्या संदर्भात असते.     

 प्रत्येक बाबतीत संशय घेतला तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो; पण प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला तर आपले जगणे अशक्य होऊ शकेल. आपण ज्या गोष्टी बघतो त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मेंदू करत असतो. त्याशिवाय मेंदू आपले काम करूच शकणार नाही. आपल्या मेंदूचे जे काम चाललेले असते त्याची अनेकदा आपल्याला जाणीवही नसते. माहिती मिळवण्याची प्रक्रिया खर्चीक असते. माहिती साठवणेही खर्चीक असते. त्यावर काही प्रक्रिया करणे आणि ती उपयोगासाठी पुन्हा मिळवणे ही गोष्टही खर्चीक असते. आपल्या मेंदूत साठवून (कोंबून) ठेवण्यासाठी माहिती ही सुसंगत आणि नियमाधारित असणे आवश्यक असते; त्यामुळे सुलभीकरण करणे आणि प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा हे जग कमी यादृच्छिक आहे असे समजणे ही आपली गरज असते. 

 आपली स्मृती म्हणजे घडलेल्या घटनांची आपल्याला सोयीस्कर अशी बदलती उजळणी करणारे यंत्र असते. काल्पनिका सत्य सांगतात; तर तथाकथित सत्यलेखन हे खोटे बोलणार्‍यांचे आश्रयस्थान असते का, असा प्रश्न लेखक विचारतो. कोणत्याही सिद्धांतानुसार सर्व गोष्टी गणितात बसवता येत नाहीत. जे झाले आहे त्या विषयी आपण आदर बाळगतो; पण जे होऊ शकले असते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. 

 कोणताही चित्रपट बनवणे किंवा काही विशेष इमारत उभी करणे या गोष्टी अनिश्चिततेने ठासून भरलेल्या असतात. ऑस्ट्रेलियामधल्या ऑपेरा हाऊससारखे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यांना बराच जास्त खर्च येतो आणि मूळ प्लॅनपेक्षा बराच जास्त वेळ लागतो. या सगळ्या गोष्टींचे अचूक भाकीत आपण संख्याशास्त्राचा वापर करून सरासरी आणि स्टँडर्ड डेव्हिएशन या संकल्पनांच्या आधारे करू शकत नाही. आपण भक्कम गणिताच्या आधारे अचूक भाकीत करू शकतो या तथाकथित तज्ज्ञांच्या गर्वाने फुगलेल्या छातीला ही आणि अशी अनेक उदाहरणे देऊन टाचणी लावण्याचे काम लेखकाने केले आहे.   

 जी गोष्ट आपल्याला माहीत नाही; पण इतरांना माहीत असू शकते अशा गोष्टींचा आपण अंदाज बांधू शकतो. जी गोष्ट अजून घडायची आहे तिच्याविषयी आपण भाकीत करतो. या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणे आवश्यक आहे. अतिप्रमाणात माहिती ही ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने निरुपयोगी किंवा नुकसानकारकसुद्धा असू शकते. ही गोष्ट आपण पडताळून बघू शकतो.  सर्व तज्ज्ञांची एक समस्या असते – आपल्याला काय माहिती नाही हेच त्यांना माहीत नसते. जर आपले भाकीत बरोबर आले तर  ते आपल्या कौशल्यामुळे आणि चुकले तर ते आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींमुळे किंवा यादृच्छिकतेमुळे असे मानण्याची त्यांची प्रवृत्ती असते. मोठा गाजावाजा करणारे तथाकथित तज्ज्ञ हे कॉलेजच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चांगले भाकीत करू शकत नाहीत असा अनुभवाधारित दावा लेखकाने केला आहे.  

 एकूणच भाकीत या प्रकाराच्या बाबतीत लेखकाने एकदम कडक भूमिका घेतली आहे. चुकीचे भाकीत करून इतरांचे नुकसान करणार्‍याला एकतर मूर्ख किंवा खोटारडा म्हटले पाहिजे असे त्याला वाटते.  भाकीत करणारे काही लोक समाजाचे गुन्हेगारांपेक्षा जास्त नुकसान करतात. असे लोक म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून स्कूलबस चालवणार्‍यांसारखे असतात. २००८ च्या आर्थिक पेचप्रसंगांमुळे अमेरिकेत हजारो-लाखो संसार धुळीला मिळाले, अनेकांची राहती घरे कर्ज न फेडता आल्याने बँकांच्या घशात गेली, फार मोठ्या प्रमाणात आलेल्या कोव्हिडसारख्या साथीचा मुकाबला करायची कोणत्याच सरकारची तयारी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. दुसर्‍या किंवा तिसर्‍या फळीतले एखाद-दोन अर्थतज्ज्ञ किंवा एखादा हॉलिवूडचा भयपट सोडता या गोष्टींचे भाकीत कोणीही केले नव्हते. लेखकाच्या मते या गोष्टींची चाहूल लागण्यासारखी होती; पण लोकांनी वापरलेली मॉडेल्स त्याकडे दुर्लक्ष करत राहिली.        

 फ्रॅन्सिस बेकनच्या मते सर्वात महत्त्वाच्या वैज्ञानिक सुधारणा या बहुतांशी अनपेक्षित असतात; त्या आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरच्या असतात. लेझरचा शोध लागल्यानंतर त्याचे अनेक महत्त्वाचे उपयोग वैज्ञानिकांच्या लक्षात आले. हे म्हणजे आधी उपाय सापडला आणि नंतर त्यासंबंधित समस्या सापडल्या असे म्हणता येईल. पुरुषांमधे लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी लोकप्रिय झालेले व्हाएग्रा हे मुळात उच्च रक्तदाबावरचे औषध होते. ही फायदेशीर काळ्या हंसाची उदाहरणे झाली. जर भविष्यात काही होईल अशी अपेक्षा असेल; तर ते काही तरी होईल अशी अपेक्षा आताच वर्तमानात असते. याचा अर्थ ज्याची वर्तमानात अपेक्षा नाही त्याची भविष्यातही अपेक्षा नसते; म्हणूनच बहुतेक शोध काळ्या हंसाप्रमाणे प्रकटतात.   

 लेखकाच्या मते हेन्री बर्गमन किंवा जाँ पॉल सार्त्र हे आदरणीय मानले गेलेले विचारवंत पाँकरे या फ्रेंच विचारवंताच्या जवळपाससुद्धा पोहचू शकत नाहीत. बर्गमन आणि सार्त्र यांची नावे घेणे हे फॅशनेबल होते इतकेच. काही फ्रेंच लोकांच्या मते पाँकरेने सापेक्षततेचा विचार आइनस्टाइनच्याही आधी केला होता आणि आइनस्टाइनने ही कल्पना त्याच्याकडूनच घेतली. पाँकरेचे मुख्य काम म्हणजे भाकिते करण्याच्या क्षेत्रात त्याने अल्पावधीत केलेली प्रगती. 

 आपल्या समीकरणांच्या मर्यादा समजून घेणारा तो कदाचित पहिलाच गणिती असावा. त्याने नॉन-लिनिअ‍ॅरिटीज, केऑस थिअरी अशा क्षेत्रांत मौलिक काम केले. जर आपण अधिकाधिक भविष्य काळातले भाकीत करत असू; तर आपल्या चुका अधिक मोठ्या प्रमाणात होत जातील.  काही काळात या चुका अगणित आकाराच्या होतील. थ्री बॉडी प्रॉब्लेम या नावाने ओळखली जाणारी एक साधी गोष्ट वापरून पाँकरेने ही गोष्ट दाखवून दिली. जर सूर्यमालेसारख्या प्रणालीत दोनच ग्रह असतील आणि त्यांच्या भ्रमण मार्गावर आणखी कशाचाही प्रभाव नसेल; तर अनंत काळापर्यंत तुम्ही या ग्रहांच्या भ्रमणमार्गाचे भाकीत लीलया करू शकता; पण एखादी तिसरी वस्तू, एखादा लहानसा धूमकेतू आला तर परिस्थिती बदलेल. सुरुवातीला त्याचे परिणाम दिसणार नाहीत इतके सूक्ष्म असतील. कालांतराने हे सूक्ष्म परिणाम संचयी स्वरूपात मोठा आकार धारण करून स्फोटक स्वरूपाचे बनतील आणि या दोन्ही ग्रहांचे भविष्य ठरवतील.            

 जर आपण कोणाच्या सर्व कृतींचे भाकीत करू शकलो; तर तो आपल्या मर्जीप्रमाणे वागायला स्वतंत्र नाही असे म्हणावे लागेल. जर माणसे आपल्या मर्जीप्रमाणे वागायला स्वतंत्र आहेत असे म्हणायचे असेल तर समाजशास्त्र आणि आर्थिक भाकिते यांवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. तर्कशुद्धता, भाकीत आणि गणिती नियोजन यांमध्ये एक समान सूत्र आहे. लोक आपल्या आर्थिक फायद्याचा विचार करून आपले निर्णय घेतात यावर अर्थतज्ज्ञांचा ठाम विश्वास असतो; पण लोक आपल्या आर्थिक फायद्यापलीकडे जाऊन विचार करू शकतील ही गोष्ट अनेक अर्थतज्ज्ञ विचारात घेत नाहीत. एकंदरीतच अर्थतज्ज्ञांवर कठोर टीका करताना लेखकाने पॉल सॅम्युअलसन आणि इतर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांचे वाभाडे काढले आहेत. 

 अनिश्चिततेच्या काळातही लोक तर्कसुसंगत वर्तन करतील ही अपेक्षा सपशेल चुकीची आहे; त्यामुळे सगळीकडे लागू पडेल अशी सर्वसाधारण उपपत्ती असणार नाही हे आपण मान्य करायला पाहिजे. जर तुम्ही उद्यापर्यंत जगलात तर दोन शक्यता आहेत : (१) तुम्ही अमर व्हाल (२‌) तुम्ही मृत्यूच्या जवळ पोहचलेले असाल. आर्थिक व्यवहार आणि निर्णय या संदर्भात अनेक लोक ‘अमर’ पद्धतीने विचार करतात हे लेखकाने दाखवून दिलेले आहे.  

 आपण जेव्हा उद्याचा विचार करतो तेव्हा आपण काल घडले तेच उद्या घडेल अशा प्रकारचा विचार करतो. आपण भविष्यकाळाचे भाकीत करू शकतो; पण भूतकाळाचे भाकीत कठीण असते. समजा आपल्यासमोर बर्फाची लादी आहे. तिचे पुढच्या तासाभरात काय होईल याचे आपण बर्‍यापैकी भाकीत करू शकतो; पण समजा आपल्यासमोर नुसतेच पाणी सांडलेले असेल तर ते बर्फ वितळून झाले असावे की दुसर्‍या कुठल्या कारणामुळे झाले असावे हे सांगणे फार कठीण असते.  

 जी प्रणाली खर्‍या अर्थाने यादृच्छिक असते तिचे अचूक भाकीत करणे शक्यच नसते. व्यवहारामधे यादृच्छिकता म्हणजे अपुरी माहिती असेच म्हणावे लागते. जग अपारदर्शक असते आणि त्याच्या दृश्य रूपांमुळे आपल्याला फसायला होते. इतिहासातून भविष्याविषयी फारशी मदत मिळू शकत नाही. भविष्याचा अंदाज व्यक्त करण्यात वेळ घालवावा की भविष्याला सामोरे जाण्याची शक्य तितकी तयारी ठेवावी? हे करण्यासाठी एखाद्या अनपेक्षित अपघाताचे परिणाम काय असू शकतील याचा विचार केला पाहिजे. एखादी घटना जितकी दुर्मीळ तितकी तिच्या शक्यतेबाबतची माहिती कमी असते. 

 बहुतेक मॉडेल्सचा उद्देश तंतोतंत भाकीत करण्याचा असतो. लेखकाला ही गोष्ट चीड आणते. जर सट्टा बाजार कोसळणार याचे अचूक भाकीत करता आले तर त्या घटनेला काळा हंस म्हणता येणार नाही. जगातले अर्थशास्त्रावरचे कोणतेही पुस्तक एक्स्ट्रिमिस्तानचा विचार करत नाही. लेखकाच्या मते अर्थशास्त्रासाठी दिलेला नोबेल स्मृती पुरस्कार समाजासाठी फार धोकादायक आहे; त्यामुळे चुकीच्या तत्त्वांना आणि निष्कर्षांना प्रतिष्ठा मिळते. हे सगळे लोक विश्लेषण पद्धतीत काटेकोरपणा आणतात. प्रत्यक्षात ते छ्द्मविज्ञान आणि बनावट गणिताचा वापर करतात. अमेरिकेच्या बँकेचा  माजी प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन याने म्हटले होते, “एखाद्या गणितज्ञावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी सट्टाबाजारतल्या ट्रेडरचा शब्द अधिक ग्राह्य मानेन.” 

 सामाजिक विज्ञानांमध्ये एखाद्या उपपत्तीच्या वैधतेपेक्षा ती किती लोकांपर्यंत वेगाने पसरते यावर तिचे नशीब अवलंबून असते. कोणत्याही अनुभवजन्य निरीक्षणांमध्ये एखादी साथ थांबवायची शक्ती नसते. शैक्षणिक संशोधनातले यश हे काही प्रमाणात लॉटरीसारखे असते. धनिकांना अधिक पैसा मिळवणे आणि प्रसिद्ध लोकांना अधिक प्रसिद्धी मिळवणे तुलनेने सोपे असते. सिनेमासारख्या कलाक्षेत्रात कलावंतांना निर्दयतेचा सामना करावा लागतो. आपण ज्याला कलागुण म्हणतो ते अनेकदा केवळ चित्रपटाच्या व्यावसायिक यशाचे निदर्शक असतात. 

 भांडवलशाहीत अनेकांना नशीब अजमावण्याची संधी असते. समाजवादी व्यवस्थेत सरकारी संस्थांना संरक्षण दिले जाते आणि इतर कोणाला नशिबाच्या जोरावर पुढे यायची संधी नाकारली जाते. नशीब हे बुद्धिमत्तेपेक्षाही समतावादी असते. नशिबाच्या जोरावर कोणालाही संधी मिळू शकते; मात्र जगात कुठेही कधीही कॅसिनोमधून अब्जावधी डॉलर मिलवून कोणीही बाहेर पडू शकत नाही; असेही लेखक बजावतो. 

 आर्थिक असमानतेकडे लक्ष देताना इतर प्रकारच्या असमानतेकडे दुर्लक्ष करणे हे लेखकाला चुकीचे वाटते. निःपक्षता ही काही फक्त आर्थिक बाबींत असायला पाहिजे असे नाही. आपल्या इतर मूलभूत गरजा भागवताना ही गोष्ट कमीकमी महत्त्वाची होत जाते. एका पाहणीनुसार ऑस्कर पुरस्कार मिळवणारे कलाकार हा पुरस्कार न मिळवणार्‍या कलाकारांपेक्षा सरासरी पाच वर्षे अधिक जगतात. ज्या देशांमध्ये सामाजिक उतरंड काहीशी सपाट असते तिथल्या लोकांचे आयुर्मान अधिक असते.  

 वेर्नर हाइझेंबर्ग याने १९२७ साली भौतिक विज्ञानातले अनिश्चिततेचे तत्त्व मांडले. या अनिश्चिततेच्या तत्त्वाचा आपल्या रोजच्या व्यवहारातल्या अनिश्चिततेशी काही संबंध आहे असे मानणे लेखकाला हास्यास्पद वाटते. सूक्ष्म कणांचे तत्त्व रोजच्या आयुष्यातल्या घटनांना लागू पडणार नाही हे त्याचे मत योग्य आहे. तत्त्ववेत्ते आणि त्यांची साधने यांमुळे आपल्या मनाची कवाडे बंद होतात. अशा लोकांबाबत फारशी सहनशीलता दाखवायचे कारण नाही. कोणी एखाद्या गोष्टीचे पुष्टीकरण केले तर लेखकाला संशय येतो – विशेषतः जर त्यातून होणार्‍या चुका फार महागात पडणार असतील तर. लेखकाला मधुमेहापेक्षा दहशतवादाची कमी काळजी वाटते; कारण मधुमेहाच्या परिणामांचे भाकीत हे दहशतवादी हल्ल्याच्या भाकितापेक्षा निश्चित असते. भूतकाळाकडे नजर टाकली तर अनेक गोष्टी स्थिर आणि कमी धोकादायक वाटू शकतात; पण त्याचमुळे आपल्याला भविष्यात आश्चर्याचे धक्के बसू शकतात. कंपन्यांमधे सेल्सचा अंदाज वर्तवतात त्याचा प्रत्यक्ष सेल्सच्या आकड्यांशी संबंध नसतो. 

 आपल्याला जे माहीत नाही त्यापासून आपले कसे नुकसान होऊ शकते आणि आपले ज्ञान कुठे उपयोगी पडणार नाही याच्या मर्यादा आखणे अशा प्रकारचा प्रयत्न इतिहासात पहिल्यांदाच आपण केला आहे असा दावा लेखकाने केला आहे. लेखकासारख्या उर्मट शेरेबाजी करण्याच्या  पद्धतीने हे कोणी केलेले नाही हे खरेच असावे; कदाचित त्याचमुळे प्रस्तुत लेखकाकडे वाचकांचे जेवढे लक्ष वळले तितके धोक्याचे इशारे देणार्‍या इतर लेखकांकडे वळले नसावे.     

 काही घटनांचे स्पष्टपणे हो किंवा नाही अशा प्रकारचे वर्गीकरण करता येते. एखादी स्त्री गरोदर आहे किंवा नाही हे ठरवता येते. ती थोडीशी गरोदर आहे किंवा फारच जास्त गरोदर आहे या म्हणण्याला काही अर्थ नसतो. याउलट एखादी साथ किंवा युद्ध हे सौम्य किंवा फार मोठ्या प्रमाणात विध्वंसक असू शकते. अशा गोष्टींची शक्यता आपण बदलू शकत नाही; मात्र त्यापासून आपल्याला कितपत धोका आहे याचे आपण नियमन करू शकतो. एखादी गोष्ट (उदा. साथ) असल्याचा पुरावा नसणे आणि साथ नसल्याचा पुरावा असणे या दोन गोष्टींमधे फार मोठा फरक आहे. प्रत्यक्षात हा फरक कोणी फारसा विचारात घेताना दिसत नाही.  

 अगदीच काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेले बरे या विचाराने कोणी दिल्लीत रस्ता चुकलेला असताना मुंबईचा नकाशा वापरला तर काय होईल? पण लोक कोणतेही भाकीत न करणे आणि चुकीचे भाकीत करणे यांत चुकीच्या भाकिताची निवड करताना दिसतात. जर्मनीमधल्या एका प्रयोगात समाजात मान्यता आणि आदर असलेल्या न्यायाधीशांना निकाल देण्यापूर्वी फासे टाकलेले दाखवले. जेव्हा जेव्हा फासे मोठा आकडा दाखवत होते तेव्हा तेव्हा या न्यायाधीशांनी ५०%  जास्त वर्षे काळासाठी शिक्षा ठोठावल्या. असे काही होते आहे याची त्यांनाही कल्पना नव्हती. 

 पुस्तकभर तुफान टोलेबाजी केल्यावर मजबूत अर्थव्यवस्थेसाठी  लेखकाने  काही उपाय सुचवले आहेत   – 

  1. जे मोडू शकते, त्याला नैसर्गिकरीत्या मोडू द्या. (विशेषतः आपल्याकडे बहुतेक लोक असे धैर्य दाखवू शकत नाहीत.)  
  2. कंपन्यांच्या कर्जाचे रूपांतर समभागांमध्ये करा. 
  3. अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र शिकवणार्‍या संस्थांचे महत्त्व कमी करा.
  4. अर्थशास्त्रासाठीचा नोबेल स्मृती पुरस्कार बंद करा.  
  5. एखादी कंपनी विकत घेण्यासाठी दुसर्‍या कोणाकडून कर्ज काढणे आणि कंपनी ताब्यात आल्यावर तिची मालमत्ता विकून कर्ज फेडणे यावर बंदी घाला. 
  6. बँकेच्या अधिकार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्या. 
  7. अनिश्चित वातावरणात कसे वावरावे याचे लोकांना प्रशिक्षण द्या. 
  8. निसर्गाला विविधता आणि विकेंद्रीकरणच मान्य असते. निसर्गात कोणतीच गोष्ट फार मोठी असत नाही. आपण मात्र सुपरस्पेशलायझेशन आणि मोठ्या आकाराची यंत्रे आणि साधने यांच्या मागे लागतो. या बाबतीत आपण निसर्गाकडून धडा घ्या.

 प्रत्येक गोष्ट कमीतकमी खर्चात करायच्या नादात आपण भविष्यातल्या अडचणी निर्माण करतो. एका मूत्रपिंडावर आपण जगू शकतो; तरीही निसर्गाने दोन मूत्रपिंडांची व्यवस्था केली आहे. हाही निसर्गाने दिलेला एक धडा आहे. आपल्या प्रणालीमधला धोका टाळण्यासाठी अनावश्यक वाटेल अशी जास्तीची क्षमता (redundancy) असू द्या.     

 ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने या पुस्तकाबाबत असे म्हटले होते की संपूर्ण पुस्तकभर भविष्याचे चांगले भाकीत करू न शकणार्‍या लोकांवर तालेबने तोंडसुख घेतले आहे; पण प्रत्यक्षात चांगले भाकीत कोण करू शकतो? त्यावर लेखकाचा खुलासा असा होता की त्याने चुकीच्या भाकितावर टीका केलेली नसून स्वतःची आणि इतरांची फसवणूक करणार्‍या, आपली चूक मान्य न करणार्‍या, आढ्यताखोर, स्वयंघोषित तज्ज्ञांवर टीका केली होती. एकंदरीत हे पुस्तक वाचनीय आहे. आर्थिक व्यवहार आणि स्टॉक मार्केट या संदर्भात ते उपयुक्तही आहे. बांधकामात ‘फॅक्टर ऑफ सेफ्टी’चा विचार होतो. अंतराळ प्रवास क्षेत्रातही या संकल्पनेचा मोठ्या फार प्रमाणात वापर केला जातो; मात्र लेखकाने या संदर्भात काही माहिती किंवा डेटा दिलेला नाही.    

Author

Leave a Reply