‘मला उमगलेला भारत’ या पुस्तकाची भूमिका

बदलता भारत हे भानू काळे यांचे गाजलेले पुस्तक बऱ्याच भ्रमंतीनंतर सिद्ध झाले होते.  अनेक व्यक्ती, संस्था व शहरे यांना भेट दिल्यानंतर जागतिकीकरण व त्याचे भारतावर झालेले  सकारात्मक परिणाम आपण वाचले होते.  (या गोष्टीला  जवळपास वीस वर्षे होत आली.  वीस वर्षांत भारत काही बदलला आहे का याचा पुन्हा एकदा शोध घेण्याची इच्छा बाळगून भानू काळे पुन्हा एकदा भारतातील काही निवडक ठिकाणांना भेट देऊन त्यांच्या निरीक्षणांसह पुस्तक स्वरूपात आपल्याला भेटणार आहेत.  पुस्तकाचे संभाव्य  नाव ‘मला उमगलेला भारत’  असे असेल.  या पुस्तकामागची भूमिका सोबतच्या लेखातून भानू काळे स्पष्ट करीत आहेत.  त्यांच्या या संकल्पाला हार्दिक शुभेच्छा ! –  संपादक

भानू काळे यांचे आगामी पुस्तक 

मला उमगलेला भारत

 (संभाव्य शीर्षक)

हे पुस्तक लिहिण्यामागची लेखकाची भूमिका

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत…’ अशी सुरुवात असलेली एक प्रतिज्ञा

देशातल्या प्रत्येक शाळेतील प्रत्येक पाठ्यपुस्तकात अगदी सुरुवातीला छापलेली असते. असंख्य वेळा ती वाचली जाते, म्हटली जाते; पण खर्‍या अर्थाने आपल्या देशावर आपले प्रेम असते का? किंबहुना, आपल्याला आपला हा देश पुरेसा समजला तरी असतो का? परप्रांतीयांचा अनेकदा आपण काहीशा कुचेष्टेने उल्लेख करत असतो. लुंगीवाले’, यंडूगुंडू’, दाढीवाले’, गुज्जू’, भय्ये शीखडे अशी विशेषणे त्यांच्या संदर्भात वापरत असतो. या परप्रांतीयांची व त्यांच्या-त्यांच्या प्रांतांची आपल्याला बहुतेकदा पुरेशी ओळखही झालेली नसते. अर्थात हे उभयपक्षी खरे आहे; म्हणजे इतर प्रांतीयांचेही आपल्या महाराष्ट्राबद्दल असेच गैरसमज असतात.   

हल्ली प्रवास करायचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक प्रवासी कंपन्या जगभर दौरे नेत असतात आणि त्यांना प्रचंड लोकाश्रयही मिळत असतो. त्यात काही वावगे आहे अशातला भाग नाही; पण ते सारे बघताना, त्यांच्या काही दौर्‍यांमध्ये सहभागी होत असताना मला अनेकदा हे जाणवले आहे की यांतल्या बर्‍याच जणांनी स्वतःचा भारत देशही नीट उघड्या डोळ्यांनी बघितलेला नाही. आपल्या देशातील अनेक प्रांतांबद्दल त्यांना अगदीच अपुरी माहिती आहे. हे पुस्तक वाचून तशा काहींना तरी आपला देश एकदा बघावा, पुरेसा समजून घ्यावा असे वाटेल अशी आशा आहे. 

अर्थात भारताचे एक प्रवासी म्हणून झालेले दर्शन शब्दबद्ध करणे हा हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश नाही. हे केवळ प्रवासवर्णन नाही; एका संवेदनशील लेखकाला दिसलेला, अनेक स्थानिकांशी अनौपचारिक संवाद साधून जाणवलेला, दीर्घ चिंतनातून उमगलेला भारत वाचकांपर्यंत पोचवायचा हा प्रयत्न आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली बदलत असलेल्या भारताचे चित्रण करण्यासाठी साधारण २००३ आणि २००४ साली देशाच्या विविध प्रांतांत प्रवास करून मी ‘बदलता भारत’ नावाचे पुस्तक लिहिले होते. ऑगस्ट २००५मध्ये मौज प्रकाशनातर्फे ते प्रकाशित झाले. त्याला काही प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले, वाचकप्रियताही लाभली. सध्या त्याची सहावी आवृत्ती चालू आहे. अनेकांनी आपली प्रतिक्रिया पत्राद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीत कळवली होती. त्यांच्याशी झालेल्या संवादातून वेगवेगळे दृष्टिकोन पुढे आले होते; शिवाय बदलाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी असते; नंतरच्या वीस वर्षांतही बरेच काही बदलत गेले आहे. माझ्या स्वतःच्या काही जाणिवाही काळाच्या ओघात साहजिकच बदलल्या आहेत. ते सारे विचारात घेत असताना भारताबद्दल लिहिण्याचा प्रयोग आपण पुन्हा एकदा करायला हवा असे वाटते; पण यावेळी केवळ जागतिकीकरणानंतर देशात होणारे बदल टिपणे एवढाच मर्यादित उद्देश न ठेवता एकूणच आपला देश जरा अधिक खोलात जाऊन समजून घ्यावा असे वाटते. काही भागांविषयी इथे नव्यानेच लिहायचे आहे; तर पूर्वी भेट दिलेल्या आणि लेखनात नोंदवलेल्या काही भागांची नव्याने जाणवलेली वैशिष्ट्ये नोंदवायची आहेत.

पाच-एक हजार वर्षांचा ज्ञात इतिहास, २८  राज्ये, २२ प्रमुख भाषा हे सारे भारताचे अपार वैविध्य कुठल्याही एकाच चित्राच्या चौकटीत संपूर्णतः सामावून घेणे शक्य नाही; त्यामुळे एखाद्या राज्याचा सर्वसाधारण आढावा घ्यायचा आणि त्याच्या जोडीने चार-पाच प्रमुख वैशिष्ट्यांविषयी थोडे अधिक विस्ताराने लिहायचे असे साधारण सूत्र मी ठरवले आहे. 

भारताच्या राज्यघटनेत म्हटल्याप्रमाणे भारत हे विविध प्रांतांचे संघराज्य (युनियन ऑफ स्टेट्स) आहे. प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत. राज्यांतील वेगवेगळ्या विमानतळांना असलेली नुसती नावे जरी बघितली तरी देशाची ही विविधता जाणवते. मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, दिल्लीचा इंदिरा गांधी विमानतळ, पटन्याचा पाटण्याचा? जयप्रकाश नारायण विमानतळ, रांचीचा बिरसा मुंडा विमानतळ, गुवाहाटीचा लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलॉय विमानतळ, भुवनेश्वरचा बिजू पटनाईक विमानतळ, इंदोरचा देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ, भोपाळचा राजा भोज विमानतळ किंवा बंगळुरूचा केंपेगौडा विमानतळ! किती वेगवेगळ्या कालखंडांतील, वेगवेगळ्या विचारांच्या, वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या व्यक्ती आहेत या! या वेगवेगळ्या प्रांतांचा इतिहास व भूगोल, त्यांचे मानबिंदू, त्यांना पूज्य असणारे महापुरुष, त्यांचे साहित्य, सणवार, अर्थकारण, त्यांच्यापुढील समस्या, त्या हाताळण्याचा ते करत असलेले प्रयत्न हे सारे शक्य तितके समजून घ्यायचा प्रयत्न करणे हा या लेखनामागचा एक उद्देश आहे.   

त्याचबरोबर या वैविध्याच्या जोडीने ते एकमेकांशी कुठल्या धाग्यांनी जोडले गेले आहेत, त्यांच्यात सामायिक असे काय आहे, त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मकता कुठे-कुठे आढळते, आपापल्या स्वतंत्र परंपरा जपत असतानाच त्यांच्यात एकमयता, एकराष्ट्रीयत्व वर्धिष्णू करण्यासाठी कुठे-कुठे वाव आहे हेदेखील समजून घेणे, हा ह्या प्रवासामागचा माझा दुसरा उद्देश आहे. भारतासारख्या संघराज्यात वेगवेगळ्या राज्यांची अशाप्रकारे ओळख करून घेणे आणि त्याचवेळी आपले एकराष्ट्रीयत्वदेखील जोपासणे या दोन्ही गोष्टी परस्परपूरक आहेत व सारख्याच महत्त्वाच्या आहेत. 

आज इंटरनेटवर माहितीची गंगा दुथडी भरून वाहत असते, कुठल्याही विषयावर कितीही माहिती बसल्याजागी मिळवता येते; पण अशा माहितीचा आधार घेतला तरी केवळ इंटरनेटवरून मिळवलेल्या माहितीवर अवलंबून राहायचे नाही किंवा वेगवेगळी पुस्तके वाचून मिळवलेल्या माहितीवरही अवलंबून राहायचे नाही असे पूर्वीच ठरवले आहे. शेवटी काहीही लिहिणारा माणूस त्याच्या-त्याच्या नजरेप्रमाणे त्याला जे दिसते ते लिहीत असतो. ही नजर प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि एक लेखक म्हणून माझीही एक विशिष्ट नजर आहे. जग जसे आहे तसे आपल्याला दिसत नाही; तर आपण जसे असतो तसे ते आपल्याला दिसते हेही खरे आहे; त्यामुळे स्वतःला जे दिसते, जाणवते तेच लिहायचे असेही ठरवले आहे. आपल्या देशाची अधिक डोळस ओळख वाचकाला झाली, वैविध्याने नटलेल्या या आपल्या देशाविषयी अधिक सजग असे ममत्व त्याला वाटू लागले आणि त्याचबरोबर ह्या विशाल देशाच्या आंतरिक एकात्मतेची साक्ष त्याला पटत गेली तर या लेखनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.  

भारत भ्रमणाची सुरुवात तमिळनाडूपासून झालेली आहे.  महाराष्ट्र मंडळ ,चेन्नई येथे  नुकतीच याच विषयावर मी भानू काळे यांची सविस्तर मुलाखत घेतली.  ही मुलाखत ऐकण्यासाठीचा दुवा सोबत दिला आहे. 

Author

Leave a Reply