ये है बॉंबे मेरी जान 

मुंबईचा इतिहास भाग ४

ब्रिटिशांचा काळ सन १६६१ ते १८००

मुंबईचा खरा विकास कोणी केला असेल तर तो इंग्रजांनी केला. मागील लेखात आपण पोर्तुगीज व इंग्रज यांच्या दृष्टिकोनांतील फरक समजून घेतला आहे. मुंबईची सात बेटे व त्याला लागून असलेला साष्टी तालुका म्हणजे आताचा बृहन्मुंबईचा प्रदेश १३४ वर्षे पोर्तुगिजांच्या ताब्यात होता; परंतु त्यांनी मुंबईचा बंदर म्हणून विकास केला नाही. त्यांनी फक्त चर्चेस बांधली; परंतु इंग्रजांना मुंबई हे उत्कृष्ट सुरक्षित बंदर होऊ शकते याची कल्पना होती. सन १६५२ पासून त्यांचे तसे प्रयत्न चालू होते. इंग्रजांनी मुंबईची बेटे पोर्तुगिजांकडून विकत घेण्याचाही प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही, असो.

परंतु सन १६६१ मध्ये पोर्तुगालचा राजा चौथा  जॉन याची मुलगी कॅथरीन ब्रॅगान्झा हिचे लग्न इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा  ह्याच्याशी ठरले. त्या वेळी इंग्रज व पोर्तुगीज यांच्यामध्ये हुंडा म्हणून पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडच्या राजाला काय द्यावयाचे याच्या वाटघाटी होऊन भारतातील मुंबईची बेटे, मोरोक्कोमधील टॅन्जीएर बंदरात व्यापाराविषयीच्या सवलती व तीन लाख पौंड पोर्तुगिजांनी इंग्रजांना द्यावेत असे ठरले व त्या बदल्यात इंग्रजांनी पोर्तुगिजांना डचांविरुद्धच्या लढाईत मदत करावी असा रीतसर लेखी करार झाल्यानंतर २३ जून १६६१ मध्ये लग्न पार पडले. सन १६६८ मध्ये चार्ल्स दुसरा याने मुंबईची बेटे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक १० पौंड भाड्याने दिली; परंतु या भाड्याचे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून इंग्लंडच्या राजाला पन्नास हजार पौंड ६% व्याजाने ईस्ट इंडिया कंपनीने द्यावेत असा करार होऊन २८ मार्च १६६८ रोजी मुंबईची बेटे ईस्ट कंपनीच्या ताब्यात येतात. पोर्तुगालचा राजा याच्याशी १६६१ साली झालेल्या कराराप्रमाणे मुंबईची बेटे इंग्रजांना मिळायला हवीत; परंतु स्थानिक पोर्तुगीज अधिकारी सन १६६६ पर्यंत फक्त मुंबई बेटाचाच ताब इंग्रजांना देतात. परळ, माहीम, वरळी व माझगाव या बेटांचा ताबा पोर्तुगीज आपल्याकडेच ठेवतात; परंतु १६६७ मध्ये हम्प्रे कूकवरील  चार बेटे बळजबरीने पोर्तुगिजांकडून आपल्या ताब्यात घेतो.

मुंबईचा विकास –  आणि तो विकास कसा करायचा? याचा आराखडा तयार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे मुंबईचा दुसरा गव्हर्नर जिराल्ड ऑजिए. 

याने केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेऊ.

१) मुंबईला लागू होणारे पोर्तुगीज कायदे रद्द करून ब्रिटिश कायदे लागू केले. 

२) जमीन मोजणी, जमिनीची मालकी, जमिनीचा सारा याची नव्याने आखणी केली. 

Aungier’s Convention १६७२ म्हणून या सुधारणा इतिहासात नोंदल्या आहेत.

3) ऑजिएने मूळ मुंबई बेटांच्या समूहात नसलेली मोठा कुलाबा व छोटा कुलाबा (ओल्ड वुमन्स आयलंड) ही दोन बेटे सन १६७४ मध्ये कोळी लोकांकडून नगद पैसे मोजून विकत घेतली. त्यामुळे मुंबई हा सात बेटांचा समूह तयार तयार झाला.१) मुंबई २)माझगाव ३) परळ ४)माहीम ५) वरळी ६)छोटा कुलाबा व ७) मोठा कुलाबा (कृपया नकाशा पाहावा) यांपैकी मुंबई हे सर्वांत मोठे व मुख्य बेट. आजचा फोर्ट, बॅलार्ड पिअर हा भाग त्यात येतो.

४) ऑजिएने जहाजांसाठी पक्का धक्का बांधला, टाकसाळीची (मिंट) स्थापना केली. पोलीस व्यवस्थेची व न्यायदानाची व्यवस्था केली. आज मुंबईला आपण ज्या व्यवस्था किंवा सिस्टिम्स अनुभवतो आहोत त्याचा पाया जिराल्ड ऑजिएने  घातला 

५) या सर्व गोष्टींमुळे व्यापार वाढू लागला. याशिवाय त्याने व्यापारवृद्धीसाठी व्यापाऱ्यांना सवलती दिल्या, मालाच्या सुरक्षिततेची खातरी दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला आपापला धर्म व धार्मिक कृत्ये करण्याची मुभा दिली. या धार्मिक सहिष्णुतेचा परिणाम असा आहे की मुंबई हे जगातील एकमेव असे शहर आहे की जेथे हिंदू, ज्यू, सुन्नी मुस्लीम, बोहरी, कॅथलिक ख्रिश्चन्स, प्रोटेस्टंट ख्रिश्चन्स, जपानी बौद्धपंथ, थेरवादी बौद्ध, जैन धर्मातील सर्व पंथ अशी सर्व धर्म व पंथांची मंदिरे/ प्रार्थनास्थळे मुंबईला आहेत. त्यामुळे सुरत व दीव येथून गुजराथी बनिया, पारशी व्यापारी, दाऊदी बोहरा, ज्यू असे सर्व धर्मांचे व्यापारी व वाडियासारखे जहाज बांधणारे कुशल कारागीर मुंबईत आले, मुंबई कॉस्मॉपॉलिटन  होण्यामागे धार्मिक सहिष्णुता हे महत्त्वाचे कारण आहे. इंग्रजांनी पोर्तुगिजांसारखा धार्मिक कडवेपणा कधीच दाखविला नाही. त्यांचा सर्व भर व्यापार वाढवून आपली तिजोरी भरणे यावर होता.

वरील धोरणांमुळे मुंबईची वस्ती वाढू लागली. सन १६६१ मध्ये मुंबईची लोकसंख्या फक्त १० हजार होती, ती सन १६७५ पर्यंत साठ हजार झाली; त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाला. याशिवाय बेटांच्या मधील उथळ भागात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत असल्याने रोगराई वाढत होती. यावरचा उपाय म्हणून दोन बेटांमधील जागा बंधारा घालून बंद करणे व समुद्राच्या भरतीचे पाणी आत घुसण्यास अटकाव करणे अशी योजना आकाराला आली. या योजनेचा जनक जिराल्ड ऑजिएच असला तरी त्याची कार्यवाही पुढील गव्हर्नरांनी केली; कारण ऑजिए ३० जून १६७७ साली मरण पावला व ही योजना राबविण्याची ज्याच्यावर जबाबदारी होती तो इंजिनीअर कर्नल हर्मन बेक याचे जानेवारी १६७७ मध्ये निधन झाल्याने ही योजना लगेच अमलात येऊ शकली नाही. सन १६८० ते सन १७०० ही २० वर्षे राजकीय अस्थिरतेची होती. या काळात मुस्लीम, डच व पोर्तुगीज यांनी मुंबईच्या बेटांवर हल्ले केले. सन १७०८ मध्ये गव्हर्नर विल्यम आयल्बी याच्या कार्यकाळात ईस्ट इंडिया कंपनी सायन-धारावी व धारावी-माहीम असा बांध घालण्याचा निर्णय घेते व सन १७११ मध्ये हे बांध घालण्याचे काम पूर्ण होते. या बंधाऱ्यामुळे परळ व माहीम ही दोन बेटे जोडली जातात. सन १६९५ ते सन १७०० या काळात मुंबई बेट व माझगाव बेट यांच्यामधील उमरखाडीही बांध घालून बंद केली जाते. आजचा डोंगरीनजीकचा रामचंद्र भट्ट मार्ग व सरदार विठ्ठलभाई पटेल रोड याच बांधावरून जाणारे रस्ते आहेत. त्याचप्रमाणे माझगाव व परळ या दोन बेटांतील खाडीसुद्धा याच सुमारास बांध घालून बंद करून बुजवली गेली. कॉटन ग्रीनकडे जाणारा दत्ताराम लाड मार्ग आणि त्याच्या डाव्या-उजव्या बाजूच्या जागेतून पूर्वी समुद्राचे पाणी आत येत असावे. माहीम व वरळी बेट जोडणारा बांध म्हणजेच आजचा वीर सावरकर मार्ग किंवा कॅडल रोड, सन १७१४-१५ पर्यंत पाच खाड्यांपैकी चार खाड्या म्हणजे १) उमरखाडी २) माझगाव-परळ मधील खाडी ३) सायन- धारावी-माहीम म्हणजे परळ-माहीम मधील खाडी ४) माहीम- वरळी मधील खाडी बांध घालून बंद करण्यात आल्या; परंतु जोपर्यंत मुंबई- वरळी मधील खाडी बंद होत नाही तोपर्यंत मुंबईमधील दलदल व पाणथळपणा कमी होणार नव्हता; परंतु ही खाडी खोल व लांबीला जास्त असल्याने या खाडीला बांध घालणे हे एक त्या काळातील तंत्रज्ञान लक्षात घेता एक आव्हान होते. 

वरळीच्या बांधाची अद्भुत कथा :- ही अद्भुत कथा सांगण्याआधी आज हा बांध कुठे आहे ते पाहू. हा बांध म्हणजे हिरा-पन्नाच्या सिग्नलपासून नेहरू प्लॅनेटोरियम पर्यंतचा रस्ता म्हणजे हा बांध आहे. पूर्वी याला हॉर्नबी व्हेलार्ड स्ट्रीट म्हटले जात असे. असो.

११ एप्रिल १७२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा इंजिनीअर  कॅप्टन बेट्स गव्हर्नर चार्ल्स बूनला वरळी बांध घालण्याचा प्रस्ताव देतो. कॅप्टन बेट्सच्या प्रस्तावाप्रमाणे या बांधाला लाखभर रुपये खर्च येणार असतो व हे काम ९ महिन्यांत म्हणजे सन १७२१ पर्यंत  पूर्ण होणार असते; परंतु  प्रत्यक्षात हे काम सन १७२८ पर्यंत जेमतेम पूर्ण होते व त्यावर रु.३,२०,०००/-  खर्च होतात. या सर्व प्रकारामुळे कॅप्टन बेट्सची भयंकर नालस्ती होते आणि त्याला बांध घालण्याचे श्रेयसुद्धा मिळत नाही. ते श्रेय मिळते १७७७ ते १७८४ या काळात गव्हर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबीला; कारण सन १७२८ ते १७७७ पर्यंत दरवर्षी या बांधावर दुरुस्तीसाठी बराच खर्च होत असतो. हे दुरुस्तीचे काम ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीवर असलेला जुना जाणता कारागीर (इंजिनीअर?) रामजी शिवजी प्रभु हा करत असतो. दुरुस्ती करणे हे कामसुद्धा मोठे जिकिरीचे असते; कारण समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने काम टिकत नसते. अशा वेळी रामजी प्रभुच्या स्वप्नात महालक्ष्मी येते आणि सांगते की, “मी माझ्या बहिणींसह सागराच्या तळाशी आहे. तू आम्हांला बाहेर काढ; तरच हा बांध पूर्ण होईल, रामजी प्रभु ही गोष्ट गव्हर्नरला सांगतो व मूर्तीचा शोध घेण्याची परवानगी मागतो. गव्हर्नर हॉर्नबीचा असल्या भाकड कथांवर विश्वास नसतो; परंतु या स्वप्नाप्रमाणे खरंच काही घडलं तर बांधावर होणारा खर्च तरी थांबेल असा व्यापारी विचार करून मूर्तीचा शोध घेण्याची परवानगी देतो आणि आश्चर्य म्हणजे खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली अशा तीन मूर्ती सापडतात. रामजी प्रभु या मूर्तींच्या स्थापनेसाठी हॉर्नबीकडे जागा देण्याची विनंती करतो. हॉर्नबी आनंदाने जागा देतो. ती जागा म्हणजे आजचे महालक्ष्मीचे मंदिर. त्यानंतर वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण होतो. तात्पुरत्या दिलेल्या जागेवरच रामजी प्रभु मंदिर बांधतो. त्यामुळेच बांधाला ‘हॉर्नबी व्हेलार्ड’ हे नाव पडते. व्हेलार्ड म्हणजे पोर्तुगीज  भाषेत बांध किंवा फेन्सिंग. असो, या दंतकथेबद्दल संशय घेतला जातो; परंतु मूर्ती मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे. रामजी प्रभु हा इंग्रजांचा इतका विश्वासपात्र नोकर होता की, त्याला इराणच्या अब्बास बंदराच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी ४ वर्षे इराणला पाठविले होते. यावरून रामजी प्रभुच्या हुशारीची कल्पना येते. वरळीचा बांध पूर्ण झाल्याने मुंबईतील दलदलीच्या जागेत मुंबईतील टेकड्या फोडून भराव टाकला गेला; त्यामुळे वस्तीसाठी हजारो एकर जमीन उपलब्ध झाली. याच जमिनीवर रेसकोर्स, वल्लभभाई पटेल स्टेडियम, महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, सात रस्ता, वगैरे गोष्टी आहेत. यावरून खरोखरच महालक्ष्मी मुंबईवर प्रसन्न झाली असे म्हणता येईल. असो.

याच हॉर्नबीच्या काळात  सन १७७९ साली पुण्याजवळील ‘वडगाव’ येथे पहिले मराठा-इंग्रज युद्ध झाले. त्यात महदाजी शिंदे व तुकोजी होळकर यांनी इंग्रजांचा दणकून पराभव केला. त्या वेळी गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगने मुंबईचा गव्हर्नर हॉर्नबी याला पराभव का झाला? व तुम्ही मराठ्यांना तोफा का विकल्या? याबद्दल जाब विचारला. या प्रश्नांना हॉर्नबीने  उत्तर दिले आहे ते भारतीय व विशेषतः मराठ्यांची मान उंचावणारे आहे. हॉर्नबी म्हणतो, 

“आम्ही शिवाजीच्या काळापासून मराठ्यांना तोफा व बंदुका विकत आलो आहोत. आम्ही नाही म्हटले तर ते पोर्तुगिजांकडून व आता फ्रेंचांकडूनही  तोफा विकत घेतात; मग आम्ही नाही का म्हणावे? आम्ही शक्यतो भंगारात काढायला झालेली शस्त्रास्त्रे विकतो. (नको असलेली शस्त्रास्त्रे विकणे हा पाश्चिमात्यांचा धंदा किती जुन्या काळापासून चालू होता याची यावरून कल्पना येईल.) परंतु मराठे इतके बुद्धिमान आहेत की, ते ही हत्यारे स्वतःचे डोके वापरून अद्ययावत अवस्थेत आणतात. वडगावच्या लढाईत अशाच तोफा-बंदुका वापरून त्यांनी आमचा पराभव केला. तेव्हा रामजी शिवजी प्रभु याची हुशारी हा काही अपवाद नव्हता. योग्य व प्रोत्साहित करणारे वातावरण मिळाल्यास भारतीय उत्तम काम करू शकत होते हे लक्षात येईल.

तसे म्हटले तर मुंबईच्या प्रत्येक प्रसिद्ध बिल्डिंगला इतिहास आहे. उदा. व्हि.टी. रेल्वे स्टेशन, गेट वे ऑफ इंडिया, पहिली कापड गिरणी, माहीम कॉजवे – त्याची एक वेगळी लेखमाला होऊ शकते. असो.

मुंबई व बृहन्मुंबई या भागाचा जुना इतिहास जो सर्वसामान्यपणे ज्ञान नसतो तो उलगडून दाखविण्याचा मी प्रयत्न केला. तो तुम्हांला आवडला असे समजून मी हा विषय संपवितो.

Author

Leave a Reply