पारंपरिक निसर्ग बेटे.
मित्रहो,
ब्रह्मांडाची निर्मिती झाली,
पाठोपाठ आकाशगंगा, सूर्यमाला जन्म घेऊ लागल्या;
मग त्यातच आपल्या वसुंधरेचा जन्म झाला.
त्यानंतर सृष्टीची निर्मिती होऊ लागली,
मग त्या सृष्टीमध्ये सजीव उत्क्रांत झाले.
शेवटच्या टप्प्यात मानवजात जन्मली,
आणि मग त्यानंतर बहुदा,
देवांचा जन्म झाला असावा.
असे म्हणतात ना…
‘देव दानवा नरे जन्मले…’
अगदी खरे असावे!
देव असो किंवा नसो,
त्या वादात पडायचे नाही; पण
माणसामध्ये देववृत्ती आणि दैत्यप्रकृती जन्माला आल्या
आणि त्यांना मूर्त स्वरूप द्यायचे म्हणून
देव आणि दानव एकसाथ निर्माण झाले असावे,
भगवंत जसा आला,
तसेच भूतदेखील निर्माण झाले!
म्हसोबा पण आला,
आणि पाठोपाठ वेताळ पण आला!
देवत्व आले तसे असुरपणा देखील जन्मला.
ह्या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी म्हणून,
धर्म आला, संस्कृती निर्माण झाल्या,
मंत्र तयार झाले आणि तसे तंत्र देखील!
चालीरिती,रूढी आणि परंपरांनी जन्म घेतला.
त्यांचा तत्कालीन उद्देश मात्र एकाच होता :
मानवजातीला शिस्त लावणे.
परंपरेने एक जीवनप्रणाली निर्माण केली.
आपल्या प्रत्येक कृतीला धर्माचा, देवाचा संदर्भ दिला.
आपण सर्व गोष्टी अगदी धार्मिकेतेने करू लागलो.
धर्मगुरूंनी सांगितले,‘करा,’ म्हणून हे करायचे,
त्यांनी सांगितले ‘करायचे नाही,’ म्हणून नाही केले.
आपल्या प्रत्येक कृतींमागे; मग त्या चांगल्या वा वाईट असो,
काही ना काहीतरी अध्यात्म असते.
आता हेच बघा ना…
आपण जेवतो धार्मिक अंगाने,
बेंदूर असला की त्या दिवशी पुरणपोळी खातो,
चतुर्थीचा उपवास करतो;
पण महाशिवरात्र आणि एकादशीला दुप्पट खातो!
ऋषीपंचमीला स्थानिक भाजीपाला खातो,
तर गुढीपाडव्याला कडुलिंब खातो!
इतकेच काय तर आपण झोपतो आणि उठतो,
ते पण धर्मात सांगितले म्हणून!
दिवाळीला पहाटे उठतो,
मंगळागौरीला रात्री जागतो!
नवरात्री तर नऊ रात्री नाचतो!
देवांचे सुद्धा वार ठरलेले,
सोमवार शंकराचा,
शनिवार मारुतीचा,
गुरुवार दत्ताचा.
शुक्रवार मशिदीमध्ये जायचा,
रविवार सकाळी चर्चमधील प्रार्थना !
आपण प्रेम आणि हिंसा दोन्ही करतो,
का? तर धर्मात सांगितले म्हणून!
गायीला प्रेमाने जवळ करतो,
देवीच्या नावाने बोकडाचा बळी देतो.
कुणी धर्मात सांगितले म्हणून डुक्कर वर्ज्य,
कुणाला फक्त बैलाचे मांस लागते!
देवाला दुधाचा अभिषेक करतो; पण
पायरीवर बसलेल्या भिकाऱ्याला शिळे अन्न देतो.
घर बांधतो;
पण भूमिपूजनाचा मुहूर्त बघून!
शेतात काम करतो,
धान्य पेरतो, पीक कापतो
सगळे पंचांग बघतच.
आपण झाडे वाढवतो आणि तोडतो,
ते देखील धार्मिक अंगाने,
दारामध्ये अंगणात तुळस लावतो,
शंकराला बेलाचीच पाने तोडून वाहतो.
हरितालिका असली की पत्री तोडतो.
थोडक्यात काय की,
आपण पुण्य करतो ते धर्मात सांगितले म्हणून
आणि पाप देखील करतो ते परंपरेचे पाईक म्हणून.
कदाचित धर्म आणि अध्यात्म हे,
जन्माविषयीचे अज्ञान आणि मृत्यूविषयीची भीती
यांच्याशी निगडित आहे का?
आणि हीच भीती केवळ हिंदूच नव्हे, तर
जगातील कित्येक धर्मांत आणि संस्कृतींमध्ये दिसते!
ह्याच धाकाने, ह्याच भीतीने
आपण निसर्गाचा ऱ्हास करतो,
आणि त्याचे संवर्धनदेखील करत असतो!
होय, पर्यावरण – संवर्धनदेखील देवाने सांगितले म्हणून!
ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे
देवराई!
देवाचे जंगल!
देवासाठी राखलेले जंगल!
देव इथे राहतो म्हणून ही देव-राही!
त्या जंगलातील झाडे तोडली,
लाकडे पळवली, प्राणी-पक्षी मारले,
तर त्यांच्याबरोबर आपणपण मरून जाऊ,
आपल्यालाही शिक्षा होईल ही भीती!
तुम्ही ‘कांतारा’ सिनेमा बघितला असेल
कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हणजे देवाचे जंगल.
मराठी भाषेत देखील ‘कांतार’ चा अर्थ जंगल.
अगदी आपल्या धर्मग्रंथातदेखील उल्लेख आहे!
‘सिंह ससा असतां पाही । कांतार हिंडतां भय नाहीं.’
ते जंगल गूढ, रहस्यमय असते, मायावी असते.
तिथे मानव, निसर्ग आणि दैवी शक्ती एकत्र येतात.
आणि त्याचे संवर्धन हे परंपरेने करायचे असते,
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती जबाबदारी असते.
केवळ हिंदू संस्कृतीमध्येच देवराया आहेत असे नाही,
बायबल मधील ‘जिनेसीस’ (२१:३३) मध्ये लिहिले आहे,
‘अब्राहमने बीरशेबामध्ये देवाच्या नावाने जंगल राखले!’
युरोप, अमेरिका, आफ्रिका खंडांमध्ये देखील
देवासाठी राखून ठेवलेली जंगले आढळतात!
आफ्रिकेमधील घाना हा देश तर देवाच्या जंगलासाठी प्रसिद्ध !
इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये तर खूप देवराया आहेत.
पण ही जंगले काही वनखात्याने राखण केलेली नसतात!
ती स्थानिक गावकऱ्यांनी, समाजाने टिकवली असतात!
परंपरेने संरक्षित असतात!
त्यांना कुणी ‘देवराया’ म्हणते,
कुणी ‘चर्च फॉरेस्ट’ म्हणतात,
कुणी ‘अभयारण्य’ म्हणतात,
कुणी ‘शरणवन’ असेही म्हणतात.
देवराईची व्याख्या अशी केली आहे;
‘जमिनीचा असा काही राखीव भाग, जिथे वनसंपदा,जीव-जंतू आणि भौगोलिक वैशिष्ट्ये
‘आहेत त्या स्वरूपात’
जतन केली गेली आहेत.’
मग तो भूभाग ०.१ ते १५० हेक्टर असा कितीही असो!
‘आय.यू.सी.एन’ या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेने देवराईला ‘पवित्र नैसर्गिक स्थळ’ असे म्हटले आहे.
ही ‘देवराई’ म्हणजे नक्की काय प्रकार आहे?
जंगलाचे जतन परंपरेने करायचे?
पण प्रत्यक्षात अशी गंमत आहे,
की तुम्हांला जंगल लावायचे असेल;
तर तुम्ही त्या जागेकडे फिरकूदेखील नका,
निसर्ग आपणहून जंगल लावत असतो,
तुम्ही ते तोडले जाणार नाही,
ते खाल्ले जाणार नाही,
ते जळून जाणार नाही,
ह्याची काळजी घ्या!
कारण;
मानवी हस्तक्षेप हाच जंगलाच्या जीवावर उठतो!
अगदी हेच आपल्या पूर्वजांनी हेरले,
आणि त्यांनी आदेश दिला,
हे जंगल तोडायचे नाही!
मग तिथे प्रतीकात्मक म्हणून,
दगडाला शेंदूर फासला गेला,
श्रद्धा आणि भीती निर्माण होईल
असे नाव त्या पवित्र ‘धोंड्याला’ देण्यात आले.
(अंध)श्रद्धेचा इतका उत्तम आणि उचित उपयोग
आजपर्यंत मी कुठेही बघितला नाही
आणि त्या भक्ती किंवा भीतीमुळे देवराया रुजल्या.
एखादी गोष्ट वाचवायची असेल,
तर तिथे देवाची वा भुताची भीती दाखवायची.
म्हणजे तिकडे कुणी फिरकू नये,
आणि तो भाग संरक्षित रहावा!
कोकणामध्ये देवाच्या नावाच्या देवराया आहेतच;
पण तिथे एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला;
तर त्या व्यक्तीच्या नावाची राखीव जंगले आहेत!
त्यांना तिथे ‘मसण-राया’ असे म्हणतात!
देवावरील श्रद्धेमुळे राखलेली ती देव-राई,
भूत-पिशाच्चाच्या भीतीमुळे राखलेली ती मसण-राई !
ऐकावे ते नवल नाही का?
परंतु आपण त्यामागील चांगला उद्देश तेवढा घेऊ या,
देवराई हे एक समृद्ध जंगल असते.
अगदी वैदिक काळापासून ही संकल्पना होती.
देवरायांच्या आसपास पाषाणयुगातील शस्त्रे सापडली आहेत.
म्हणजेच ताम्र आणि पाषाणयुगामध्ये देखील देवराया असणार.
हा काल तर चक्क तेरा हजार वर्षे जुना !
ग्रीक आणि सुमेरियन (मेसोपोटेमिया) मध्ये उल्लेख आहेत,
त्यांचा काल ६५०० वर्षे जुना!
विक्रमोर्वशीयम् ग्रंथात तर
उर्वशी चुकून देवराईमध्ये प्रवेश करते,
तेव्हा तिचे एका वेलीत रूपांतर होते!
असा उल्लेख आहे!
हनुमान जेव्हा द्रोणागिरी पर्वत खांद्यावरून नेत होता,
त्यावेळी त्याचे काही लहान मोठे तुकडे जिथे जिथे पडले,
तिथे तिथे या देवराया निर्माण झाल्या,
अशीही एक श्रद्धा!
या देवरायांचे आध्यात्मिक अंगाने तीन प्रकार सांगितले आहेत,
तपोवन, महावन आणि श्रीवन.
‘तपोवन’ म्हणजे तपस्या करणारी साधुसंत, ऋषीमुनी तिथे असतात.
‘महावन’ हे नावाप्रमाणे मोठे जंगल असते.
‘श्रीवना’मध्ये जागृत देव किंवा देवीचे स्थान असते.
प्रत्येक देवराईमध्ये एक देव असतो.
आणि प्रत्येक देवराईचा देव वेगळा असतो.
बहुतेक वेळा ती देवी असते.
ती देवता सर्वांवर देखरेख करते,
त्यांचे रक्षण करते, अशी श्रद्धा.
बहुतेक ठिकाणी ती मातृदेवता असते,
निराकार पाषाणात घडवलेली असते,
ती एकटीच असते,
तिला जोडीदार नसतो!
म्हणजे शंकर-पार्वती, विठ्ठल-रखुमाई असा प्रकार नसतो.
काळूबाई,काळकाई, उंबराई, शिरकाई, वरदाई असतात,
क्वचित म्हसोबा, चेलोबा, भैरोबादेखील असतो!
प्रत्येक देवराईशी निगडित कथा मनोरंजक असतात.
प्रत्येक देवराई म्हणजे मोठा सांस्कृतिक ठेवा.
प्रत्येक ठिकाणी सामाजिक भावना वेगळ्या असतात.
प्रत्येक देवराईचे पूजा-अर्चेचे विधी वेगळे असतात.
प्रत्येक देवराईत भूत-पिशाच्च दंतकथा असतात.
आपण ही श्रद्धा आणि भावना बाजूला ठेवू
आणि
एका शास्त्रीय दृष्टिकोनातून देवराई समजून घेऊ.
बहुतेक देवरायांमध्ये बिनकळसाचे लहानसे देऊळ असते;
पण त्याच्या भोवती मात्र महाकाय वृक्ष असतात,
शेकडो वर्षे जुनी झाडे असतात,
त्यांच्या अंगाखांद्यावर पसरेल्या अजस्र वेली असतात.
त्यांमधून असंख्य प्रकारचे पक्षी नांदत असतात,
अगदी धनेश, गरूड, घुबडापासून ते लहानशा सूर्यपक्ष्यापर्यंत,
नखाइतक्या फुलपाखरांपासून ते वीतभर मोठ्या पतंगापर्यंत.
तिथे असंख्य साप, सरडे, पाली वास्तव्य करतात.
उडते सरडे असतात, लाजवंती (स्लेंडर लॉरिस) असते.
महत्त्वाचे म्हणजे तिथे अदृश्य सूक्ष्म जीवसृष्टी असते.
या सृष्टीला जन्म-मृत्यू असतो बरं का,
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
येथे मृत्युपश्चात जीवनदेखील दिसते.
म्हणजे काय?
तेच तर या देवरायांचे आगळेवेगळेपण आहे.
ह्यांची पाने, फुले, फळे वाळली की येथेच पडतात,
झाडे वठली की इथेच कोसळतात,
त्यांची लाकडे कुणीही सरपण म्हणून नेत नाही.
ती येथेच कुजतात,
येथेच त्यांच्यावर विविध बुरशी, नेचे, कवके वाढतात,
येथेच त्यांच्यावर निसर्गाची प्रक्रिया सुरू होते,
त्यांच्या निष्प्राण देहातून सुंदर सुंदर भूछत्रे उगवतात.
आणि ‘निर्जीवा’तून ‘सजीवां’ची निर्मिती होते.
देवरायांमध्ये सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही,
तेथील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही,
तेथील माती ही उत्कृष्ट आणि सुपीक असते.
त्यात ‘ह्यूमस’ (मावा) भरपूर असतो.
पावसाळ्यात या मातीची धूप होत नाही.
येथील भूजलपातळी आपोआप वाढलेली असते,
बहुतेक देवरायांच्या जवळ लहान-मोठे तलाव असतात.
बऱ्याच ठिकाणी विहिरी असतात.
प्रत्येक देवराई ही एक स्वतंत्र परिसंस्था असते.
प्रत्येक देवराई ही उत्क्रांतीची प्रयोगशाळा असते,
जनुकीय विविधता आणि संपन्नता येथे दिसते.
दुर्मीळ गुणसूत्रांची ती ‘सेफ डिपॉझिट लॉकर’ आहे!
देवाजवळ जाणारी पायवाट सोडता
माणसाची लुडबुड तेथे नसतेच, म्हणा ना!
सामाजिक श्रद्धेतून या परिसंस्थांचे संरक्षण आपोआप होते.
त्यामुळे सजीवांच्या विविध जातींचे संरक्षण होते.
त्यांच्या जोडीला सूक्ष्मजीवजंतू येथे वाढतात.
औषधी वनस्पतींची येथे लयलूट असते.
वृक्ष-आयुर्वेद ग्रंथामध्ये देवराईचा उल्लेख आहेच;
शिवाय तेथील औषधी वनस्पतींची यादी देखील दिली आहे.
आता ‘गाव तिथे शाळा’ आहे,
तसे पूर्वी ‘गाव तिथे देवराई’ असे होते.
भारतात पूर्वी लाखो देवराया होत्या,
आता त्यांची संख्या काही हजारांत आली आहे.
एकट्या कोकणात तीन जिल्ह्यांत तीन हजार देवराया असाव्यात.
कर्नाटकमधील कूर्ग–मडिकेरी भागात तेरा हजार देवाची जंगले आहेत.
ब्रिटीश राज्यात भारतातील वनांचा अभ्यास झाला;
पण तो जंगले तोडून चहा, रबर, कॉफी, साल, साग यांच्या लागवडीसाठी.
त्यांनी एक जर्मन संशोधक ‘ब्रान्डीस’ला भारतात बोलावले,
त्याने अभ्यासान्ती निष्कर्ष काढला की,
देवराया ह्या वाचवायला हव्यात!
त्या काळी लाखो हेक्टर जंगल देवराया होत्या.
ब्रिटीश व्हॉईसरॉयला ते पसंत पडले नाही,
त्यांनी नवा माणूस आणला, त्याचे नाव ‘फ्रान्सिस बुचानन’.
त्याने भलतेच अनुमान काढले,
देवराया म्हणजे अंधश्रद्धा, जमिनीचा नाश!
त्यांना तोडून तिथे व्यापारी पिके घ्या!
अर्थात राज्यकर्त्यांना रुचेल असे!
हे सर्व झाले एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला
परंतु या देवरायांचा जगामध्ये पहिला शास्त्रीय अभ्यास झाला,
तो भारतात – आणि तो देखील पुण्यात.
येथील आघारकर संशोधन संस्थेमधील प्रख्यात शास्त्रज्ञ,
डॉ माधव गाडगीळ आणि डॉ वर्तक यांनी.
१९७० च्या दशकात त्यांनी अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढला,
देवराई ही एक विशिष्ट हवामानातील परिसंस्था आहे.
तिचे ‘मॉईस्ट क्लायमेट एकोसिस्टीम’ असे नामकरण केले.
जगातील दुर्मीळ होऊ लागलेल्या सूक्ष्मजीवजंतूंचे ते आगर आहे.
ती एक ‘रेफरन्स जीन बँक’ आहे!
आणि ती धोक्यात आली आहे.
तिचे संवर्धन झाले पाहिजे,
देवराई समजून घ्यायला हवी,
‘डाटा कलेक्शन’ व्हायला हवे,
संशोधन व्हायला हवे,
देवराईचे महत्त्व जाणून घ्यायला हवे.
नुसती श्रद्धा आणि भीती ठेवून भागणार नाही.
कायद्याने संरक्षण मिळायला हवे.
आजही सह्याद्रीमधील कितीतरी जाती नष्ट होत आहेत,
बुरशी, कवके, फन्जाय सहजासहजी आढळत नाहीत,
क्वचित त्या सापडतात,
त्या सह्याद्रीच्या उत्तर सीमेवरील गावांजवळील देवरायांमध्ये!
थोडक्यात काय,
देवराया ह्या एक स्वयंपूर्ण असा अधिवास असतात,
त्याच जागेत जन्माला येतात, त्याच जागेत मृत्यू पावतात,
एकमेकांना आधार देत जगत असतात,
महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण खेडेगावासारखे.
केवळ बारा नव्हे तर शेकडो हजारो बलुतेदार इथे आढळतात!
सारांश असा की,
देवराया म्हणजे ‘नोहाची नौका’ आहेत.
सर्व जग विनाशाच्या उंबरठ्यावर असताना,
जीवसृष्टीमधील वैविध्य टिकविण्याची ती एक आशा आहे!



