| ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे . शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे वेगवेगळे मराठी साहित्य मांडले जात आहे. या एका आगळ्या प्रयोगाविषयी लिहिताहेत या मालिकेच्या सादरकर्त्या अर्चना मिरजकर. |
ते लॉकडाऊनचे दिवस होते. २०२० सालच्या एप्रिल-मे महिन्याचे. देशात कोव्हिडची पहिली लाट उसळली होती. आमच्या दिल्लीच्या अपार्टमेंटमध्ये मी आणि माझा नवरा अनुपम असे दोघेच होतो. सासू-सासरे दर वर्षीप्रमाणे झारखांडला गेले होते ते तिकडेच अडकून पडले होते. ऑफिसचं काम घरूनच चालू होतं. कामवाल्या, आंतरजालावरून मागवलेल्या वस्तू घरी पोचवणारे कामगार यांना सोसायटीत प्रवेश वर्ज्य होता. एरव्ही सकाळ-संध्याकाळ माणसांनी फुलून जाणाऱ्या आमच्या घरासमोरच्या सार्वजनिक बागेत शुकशुकाट होता. सगळीकडे पसरलेल्या एका विचित्र शांततेत फक्त अँब्युलंसच्या भोंग्याचे आवाज ऐकू येत होते. नवीनच पसरलेल्या कोव्हिडच्या साथीविषयी मनात भीती होतीच; शिवाय आई-पपा तिकडे पुण्यात एकटेच होते – त्यांची काळजीही होतीच; पण मुख्यतः घरातून बाहेर पडणे शक्य नसल्याने प्रचंड कंटाळा आला होता. कोणाशी प्रत्यक्ष गाठीभेटी नाहीत, कार्यक्रमांना जाणे नाही, रोजचे ऑफिसला जाणेही नाही.
काही मोजके चित्रपट पाहून झाल्यावर टीव्हीवर पाहण्यासारखे काही उरले नाही; मग आंतरजालावर – विशेषतः मराठीत काही समाधानकारक मिळते का याचा शोध सुरू झाला; पण तिथेही फारसे चांगले काही सापडले नाही. कोव्हिडच्या साथीमुळे निर्माण झालेल्या नैराश्यजनक, भीतिदायक वातावरणात मनाला दिलासा देईल, भविष्याविषयी हुरूप देईल, जीवनाच्या शाश्वत मूल्यांविषयी विश्वास व्यक्त करेल असं काही हवं होतं. हिंसा, अत्याचार, गुन्हेगारी, विश्वासघात असे आशय असलेले कार्यक्रम नको वाटत होते.
आपल्याला हवं ते कुठे मिळेल असा विचार करताना लक्षात आलं की ते फक्त अभिजात साहित्यात मिळू शकेल; मग आंतरजालावर मराठी साहित्याचा शोध सुरू झाला; पण काही कविता वाचनाचे व्हिडिओ आणि पुलंच्या पुस्तकांतील काही विनोदी प्रवेश यांपेक्षा जास्त काही सापडलं नाही.
मराठी साहित्याला हजार वर्षांचा इतिहास आहे, त्यात एकाहून एक सरस पुस्तकं आहेत; पण त्या विषयी फारशी माहिती आंतरजालावर नाही; मग आठवलं, मला अनेकदा लोक विचारतात, आम्ही मराठी काय वाचावं? विशेषतः दिल्लीत किंवा परदेशी राहणारी कुटुंबं मराठी साहित्याच्या जगापासून दूर असतात. आपल्या मुलांनी मराठी साहित्य वाचावं असं त्यांना वाटतं; पण नेमकं काय वाचायला द्यावं हे सुचत नाही.
मनात विचार आला की आपणच मराठीतील उत्तम पुस्तकांविषयी माहिती दिली तर? तेव्हा हेदेखील जाणवलं की तरुण पिढी त्यांचा रिकामा वेळ मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यात घालवते. या पिढीपर्यंत मराठी साहित्याविषयी माहिती पोचवायची असेल तर ती व्हिडिओच्याच माध्यमातून पोचवायला हवी. मी असं ठरवलं की मराठीतील शंभर उत्तम पुस्तकांविषयी आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्यायची आणि ‘ग्रंथयात्रा’ या मालिकेच्या संकल्पनेचा उदय झाला.
मी ही कल्पना आई आणि पपा (म्हणजे ललिता आणि निशिकांत मिरजकर. हे दोघेही दिल्ली विद्यापीठात अठ्ठावीस वर्षं प्राध्यापक म्हणून कार्यरत होते) यांना फोनवर सांगितली. त्यांनाही आवडली. एके दिवशी आम्ही तिघेही झूमवर जॉईन झालो आणि तासभर चर्चा करून शंभर पुस्तकांची यादी तयार केली. अकराव्या शतकापासून ते आजपर्यंत अविरत चालू असलेल्या मराठी साहित्याचा आवाका लक्षात येईल, त्यातील वेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करतील अशी आणि साहित्यिक गुणांमुळे मैलाचे दगड ठरलेली पुस्तकं निवडली. ही निवड करणे अर्थातच अत्यंत कठीण होते कारण मराठीत चांगल्या पुस्तकांना तोटा नाही.
पुस्तकांची नावं ठरल्यावर त्यांच्या प्रकाशन वर्षाप्रमाणे ती क्रमवार लावून घेतली. काळानुसार जरी लीळाचरित्र हा आपल्यापर्यंत पोचलेला पहिला मराठी ग्रंथ असला तरी मालिकेची सुरुवात ज्ञानेश्वरीपासून करावी असे वाटले. या मालिकेच्या मागची भूमिका आणि ज्ञानेश्वरीची ओळख यांवर आधारित ग्रंथयात्रेच्या पहिल्या भागाची संहिता मी लिहून तयार ठेवली.
आता पुढची पायरी होती चित्रीकरणाची. मला चित्रीकरणाचा मुळीच अनुभव नव्हता. कॅमेऱ्याच्या समोर जाण्याचा कधी प्रसंग आलाच नव्हता; शिवाय चित्रीकरणासाठी लागणारी कोणतीच उपकरणं माझ्याकडे नव्हती; किंबहुना, संहिता लिहून होईपर्यंत मी चित्रीकरणाचा विशेष विचारच केला नव्हता; पण अनुपमने केला होता. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला या प्रकल्पात विशेष रस निर्माण झाला होता. खरंतर तो आय टी चा माणूस. साहित्याशी त्याचा कधी फारसा संबंध आला नाही. त्याने आयुष्यात जे काही वाचन केलं होतं ते इंग्रजी पुस्तकांचं; पण चित्रीकरण आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे जे सोपस्कार करावे लागतात त्याची सगळी जबाबदारी त्याने उचलली.
चित्रीकरणासाठी कॅमेरा होता पण ट्रायपॉड आणि चांगला माईक लागणार होता. दुकानं तर बंद होती. ॲमेझॉनवरून या दोन्ही गोष्टी मागवल्या. माईक आला पण ट्रायपॉडचं पार्सल चुकून चेन्नईला गेलं असं समजलं. ते रीडायरेक्ट होऊन येईपर्यंत आणखी एक आठवडा गेला. शेवटी पार्सल आलं; पण ते एक छोटं पाकीट होतं. ट्रायपॉड अर्थातच त्यात नव्हता; पुन्हा अथपासून सुरुवात!
शेवटी एकदाची सगळी तयारी झाली. एव्हाना फोनवरच्या रोजच्या गप्पांत मित्र-मैत्रिणींना या प्रकल्पाबद्दल सांगून झालं होतं…पण ते सगळे अमराठी!तेव्हा जाणवलं की मराठी साहित्याची माहिती अमराठी लोकांपर्यंतदेखील पोचवायला हवी; म्हणून ग्रंथयात्रेचा प्रत्येक भाग मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत प्रसिद्ध करायचं ठरवलं.
मग ज्ञानेश्वरीवर आधारित भागाची माझ्या निवेदनाची जी संहिता लिहिली होती त्याचं इंग्रजीत भाषांतर केलं. अगदी उदाहरणासाठी उद्धृत केलेल्या ओव्यांसकट!
ग्रंथयात्रेच्या या पहिल्या भागाचं तीनदा चित्रीकरण करावं लागलं. योग्य ती प्रकाशयोजना, अँगल, प्रॉंप्टरची गती याचं गणित बसायला अनेकदा रीटेक घ्यावे लागले.
चित्रीकरण झाल्यावर त्याचं एडिटिंग, फोटो, पार्श्वसंगीत, नामावली हे सगळं अनुपमने केलं. मालिकेच्या सुरुवातीच्या संगीतासाठी स्टॉकहोममध्ये राहणाऱ्या माझ्या शामिक सिन्हा या भाच्याने तबला वाजवला.
पहिल्या भागात तज्ज्ञ म्हणून बोलण्यासाठी पपांना विनंती केली. त्यांचं झूमवर रेकॉर्डिंग केलं.
असे एकूण दहा भाग तयार केले आणि नवीन यूट्यूब चॅनल घेऊन त्यावर अपलोड केले. माझ्या मुलीच्या – आरुषीच्या – पुण्यतिथीला तिच्या स्मरणार्थ कार्यरत असलेल्या ट्रस्टच्या नावाने ग्रंथयात्रेचा पहिला भाग ऑक्टोबर २०२० मध्ये प्रकाशित झाला.
ग्रंथयात्रा ही मालिका सुरू करण्यापूर्वी सोशल मीडियावर थोडीफार प्रसिद्धी केली होती; तरीपण साहित्यावर आधारित हा कार्यक्रम कोणी बघेल की नाही अशी शंका होती. फारसा प्रतिसाद मिळाला नाही तर पहिल्या दहा भागांचं चित्रीकरण केलं आहे तेवढे प्रकाशित करायचे आणि हा नाद सोडून द्यायचा असं ठरवलं होतं; पण पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी फोन करून, व्हॉट्सॲपवर आणि मेलवर कार्यक्रम आवडल्याचे कळवले. आम्ही उत्साहाने पुढच्या कामाला लागलो.
अकराव्या भागापासून आम्ही ‘क्रोमा की’चं तंत्र वापरायला सुरुवात केली. यात चित्रीकरण करताना एका हिरव्या पडद्यासमोर उभं राहून बोलायचं असतं. नंतर एडिटिंग करताना पडद्याऐवजी तिथे कोणतेही दृश्य घालता येते. त्यासाठी मोठे हिरवे पडदे, ते अडकवायचा भला मोठा सांगाडा, चित्रीकरणासाठी गोल दिवे असं सगळं सामान विकत घेतलं. ज्या दिवशी चित्रीकरण करायचे असे त्या दिवशी आमच्या दिवाणखान्याचं स्टुडिओत रूपांतर व्हायचं.
पन्नास आठवड्यांत पन्नास भाग धडाक्याने प्रकाशित केले. दर शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता नवीन भाग प्रकाशित केला. सोमवार ते बुधवार पुस्तकं वाचणे, गुरुवारी नोट्स काढणे, शुक्रवारी संहिता लिहिणे, शनिवारी भाषांतर करणे आणि रविवारी चित्रीकरण असं गणित बसून गेलं. दिवसभर माझं ऑफिसचं काम असायचं; पण संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून ग्रंथयात्रेच्या कामाला सुरुवात व्हायची.
प्रत्येक भागात माझ्या वक्तव्याखेरीज एका तज्ज्ञ व्यक्तीचं छोटं भाषण असतं. त्यासाठी योग्य व्यक्ती शोधणं, त्यांना विनंती करणं, झूमवर त्यांच्या भाषणाचं रेकॉर्डिंग करणं, त्याचं इंग्रजीत भाषांतर करणं हे देखील काम असायचं; पण आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातील अनेक प्रथितयश प्राध्यापक, लेखक, गायक यांनी या बाबतीत मोलाचं सहकार्य केलं. आपल्या व्यग्र आयुष्यातून वेळ काढून ते पुस्तकांवर बोलले. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या ९७ भागांत एकूण ६२ तज्ज्ञांची भाषणं आहेत. यांत सलील कुलकर्णी आणि श्रीधर फडके यांच्यासारखे गायक आहेत, भालचंद्र नेमाडे आणि श्रीनिवास कुलकर्णी यांसारखे लेखक आहेत, अश्विनी धोंगडे आणि वसंत आबाजी डहाके यांसारखे कवी आहेत, आणि मदन कुलकर्णी, अविनाश सांगोलेकर, अक्षयकुमार काळे, नीलिमा गुंडी व मनोहर जाधव यांसारखे प्राध्यापक – समीक्षक आहेत. या सर्वांच्या सहभागामुळे ग्रंथयात्रेचे सर्व भाग दर्जेदार होण्यास मदत झाली.
काही वेळा कटू अनुभवदेखील आले; नाही असं नाही. काही प्राध्यापकांनी सुरुवातीला बोलायचं कबूल करून नंतर नकार दिला, एका लेखिकेने तीन मिनिटं बोलण्याचा तुम्ही मोबदला किती देणार असं विचारलं; पण असे काही अपवाद वगळता अनेक जणांनी मदत केली. मुंबईच्या श्रीकांत भटकर यांनी दुर्मीळ पुस्तके मिळवून ती दिल्लीला माझ्याकडे पाठवून दिली.
चित्रीकरण करताना देखील अनेक अडचणी यायच्या. कधी बाहेर कुणीतरी बोलल्याचा आवाज आला किंवा कुणाचा फोन आला, दाराची बेल वाजली तर रीटेक घ्यावे लागायचे. मध्ये कित्येक महिने आमच्या सोसायटीत काही बांधकाम चाललं होतं म्हणून आम्ही पहाटे उठून, किंवा रात्री चित्रीकरण करायचो. एकनाथांच्या भावार्थ रामायणावरील भागाचं चित्रीकरण रात्री अडीचला संपवलं. महानोरांच्या कवितांवर आधारित भागाचं चित्रीकरण उत्तराखंडमधल्या कानासार या गावी केलं.
या मालिकेची आम्ही कोणतीही जाहिरात केली नाही; तरी साडेचार हजार लोक ग्रंथयात्रा चॅनलचे सबस्क्राइबर्स आहेत. अनेक अमराठी लोकांनी ही मालिका आवडल्याचे आवर्जून सांगितले आहे. मराठीत इतके दर्जेदार साहित्य आहे हे आम्हांला माहीतच नव्हते अशी प्रतिक्रिया अनेकदा ऐकू आली.
पन्नास भाग प्रकाशित होईपर्यंत कोव्हिडची साथ ओसरली होती. प्रत्यक्ष ऑफिसात जाऊन काम करणे सुरू झाले होते; मग अर्थातच ग्रंथयात्रेच्या कामाला वेळ मिळेनासा झाला. ऑफिसच्या कामानिमित्त किंवा वैयक्तिक कामांसाठी प्रवास पुन्हा सुरू झाला; त्यामुळे पुढचे भाग वेळ मिळेल तसे प्रकाशित होत गेले. सुरुवातीला संकल्प केल्याप्रमाणे १०० भाग आपण प्रकाशित करू शकू अशी खातरी नव्हती. आज ९७ भाग मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत प्रकाशित झाले आहेत. ९८व्या भागाचे काम चालू आहे.
१०० भाग पूर्ण झाल्यावर एक नवीन उपक्रम हाती घ्यायचा आहे. अनेक प्रेक्षकांनी अनेक सूचना केल्या आहेत. १०० पुस्तकांचा आढावा घेताना तितक्याच तोलामोलाची पुस्तकं दुर्लक्षित झाली आहेत. मनात अनेक कल्पना आहेत. त्यांतील कोणत्या साकार होतील ते आपण पाहालच!
अंतर्नादच्या या आणि पुढील ११ अंकांत ग्रंथयात्रेच्या निवडक भागांचे दुवे देण्यात येतील.
जनाबाईचे अभंग

अतिशय स्तुत्य उपक्रम. या उपक्रमात मलाही सहभागी व्हायला आवडेल. कृपया मला आपला संपर्क क्रमांक पाठवावा. श्रीकांत भटकर यांचाही क्रमांक पाठवावा. ९८९२०७२५७२. मी राज्य मराठी विकास संस्थेत ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे.