माझे आजोबा मालवणच्या कोर्टात बेलीफ होते. त्यांनी आयुष्यात कधीही चहा घेतला नाही आणि दूधदेखील नाही. चहा न घेण्याचे कारण ब्रिटिश लोकांचा राग असला तरी दूध न घेण्याचे कारण – त्या काळात मालवणात दूधच मिळत नसे. दुसरे आजोबा कोल्हापूरचे. तिथे ‘बाई माणसानं कुक्वाच्या बोटाला आणि गडीमाणसानं च्याच्या कोपाला कंदी नाय म्हणू ने !’ असा दंडक.
इथे काही मी चहाच्या इतिहासाबद्दल लिहिणार नाही; पण या बाबतचे माझे देशोदेशीचे अनुभव मात्र नक्की लिहीन.
आज मी साठी पार केली आहे; तरीही मी स्वत:ला चहाबाज म्हणवून घेणार नाही. दिवसातून सकाळी एक कप चहा पितो मी – तोदेखील आता बिनसाखरेचा!
माझे आईबाबा १९५०च्या आसपास मुंबईत राहायला आले तेव्हा घरी दूध वगैरे आणून ठेवायची पद्धत नव्हती. चहा करायचा असेल तर खाली जाऊन तिरकीची (एक पैशाचा तिसरा भाग) चहा पावडर, एक तिरकीची साखर आणि एक तिरकीचे दूध आणायचे. पुढे ते उपनगरात राहायला आले; तिथे गोठे होते. घरी दुधाचा रतीब सुरू झाला; तेव्हापासून आमच्या घरी सकाळी सात वाजता आणि दुपारी तीन वाजता चहा होऊ लागला…तो आजपर्यंत. तेव्हाची पद्धत म्हणजे चहा आणि साखर उकळायचे व ते कपात ओतून वरून दूध घालायचे. सकाळी चहा आणि ब्रेड बटर हा आमच्या घरातला अगदी रोजचा नाश्ता. आम्ही सगळेच सकाळी लवकर बाहेर पडत असू; त्यामुळे नाश्त्याचे बाकीचे प्रकार केवळ रविवारी.
पुढे मी नोकरी करू लागल्यावर ऑफिसचा अकरा वाजताचा चहा हा अधिकचा चहा. त्यावेळी प्रत्येक ऑफिसमध्ये चहा करण्यापुरते किचन असे. फोर्टमधल्या छोट्या ऑफिसमध्ये बाहेरून एक ‘भट’ चहा घेऊन येत असे. तो जरा मसालाबिसाला घातलेला असला तरीही चवीला मात्र गोडमिट्ट असे.
त्या काळात आजच्यासारखे चहाचे ब्रॅंड नव्हते. (येवले चहा, साहेब चहा वगैरे) बाहेर चहा प्यायचा तर खास चहाची काही हॉटेल्स होती. त्यांतले एक नाव म्हणजे ‘श्री शंकर विलास हिंदू हॉटेल.’ इथे चहाशिवाय फारसे काही मिळत नसे. एका मोठ्या पितळी बिनकल्हईच्या भांड्यात चहा उकळत असे आणि तो कारागीर त्या भांड्याभोवती एक पितळी ओगराळे गोलगोल फिरवत असे. चहा मनासारखा उकळून झाला की एखाद्या फडक्याच्या साहाय्याने तो दुसऱ्या भांड्यात गाळला जात असे. खास मागणीनुसार त्यांच्याकडे ‘उकाळा’पण मिळत असे. दुसरी एक हक्काची चहाची जागा म्हणजे रेल्वे स्टेशनवरचे स्टॉल्स. तिथे बाकी काही घ्यावेसे वाटत नसे; पण चहा रटारटा उकळलेला असल्याने सुरक्षित वाटे आणि स्टेशनवर थांबायचे प्रसंग वारंवार येत; कारण गाड्या नेहमी लेट असत; गर्दी ओसरायची वाट बघावी लागे.
पुढे मी परदेशी गेलो. पहिला जॉब होता मस्कतमध्ये. तिथे ऑफिसमध्ये शिपाई वगैरे प्रकारच नव्हता. आपला चहा आपणच करून घ्यावा लागे. अर्थात चहाचे सर्व सामान ऑफिसमध्ये कायम असे. त्या चहाची गंमत न्यारी असे. चहासाठी टी बॅग्ज असत. (तोपर्यंत भारतात त्या फारशा प्रचलित नव्हत्या.) दुधासाठी ‘निडो’ पावडर असे. भारतात तोपर्यंत उत्तम दर्जाची पावडर उपलब्ध नव्हती; जी होती तिला विचित्र वास येत असे आणि ती पाण्यात नीट विरघळत देखील नसे; पण ही ‘निडो’ मात्र अप्रतिम असते. पाण्यात तर ती लगेच विरघळते आणि चवदेखील ताज्या दुधासारखीच असते. (पुढे अनेक वर्षे मी ती वापरली. त्यापासून दही, ताक, मिठाई सर्वच छान होते.) लिप्टनच्या टी बॅग्जपण अप्रतिम स्वादाच्या असत. दुधाच्या पावडरला तिथे आणखी एक पर्याय होता तो म्हणजे इव्हॅपोरेटेड मिल्क. याचे छोटे टिन्स असतात आणि चव छान आटवलेल्या दुधाची. यात वेलचीच्या स्वादाचाही पर्याय आहे. एका कपाला चमचाभर हे दूध पुरते. भारतात आता उत्तम प्रतीची मिल्क पावडर मिळत असली तरीही इव्हॅपोरेटेड मिल्क मात्र अजूनही सहज मिळत नाही.
मी तिथे जाईपर्यंत भारतात ब्लॅक टी, ग्रीन टी वगैरे लोकप्रिय नव्हते. भारतात कोरा चहा काही ठिकाणी प्यायची प्रथा होती; पण ती बहुधा दुधाच्या कमतरतेमुळे. गल्फमध्ये कोरा चहा मात्र आवडीने प्यायला जातो. तिथे त्याला सुलेमानी म्हणतात. नाक्यानाक्यावर तो मिळतो. तिथल्या असह्य उन्हाळ्यात तो गरम चहा कमालीचा उत्तम लागतो. नियमित टी बॅग्ज वापरूनच तो करतात; पण त्यात लिंबू पिळतात. मस्कतमध्ये अख्खे लिंबू उन्हात वाळवून त्याची पावडर करून वापरतात. ही पावडर त्या चहात घालून तर मस्तच चव येते.
पुढे काही वर्षे मी केनया या देशात वास्तव्य केले. तिथे केरीचो नावाचा एक भाग आहे ; तिथे चहाचे मळे आहेत. आयुष्यात पहिल्यांदा मी चहाचे मळे बघितले ते तिथेच. तिथला केरीचो गोल्ड म्हणून जो चहा मिळतो, तसा चहा मी आधी आणि नंतर कधीही कुठे चाखला नाही. त्यावेळी वाचलेला एक संदर्भ : भारतात मागणीच्या मानाने चहा लागवडीखालचे क्षेत्र वाढलेले नाही; त्यामुळे आपण जी चहा पावडर विकत घेतो त्यात ३० टक्क्यांपर्यंत इतर वनस्पतींची भर (भेसळ नाही) असते; पण केरीचो गोल्ड मात्र अगदी १००% चहाच असतो; त्याशिवाय नैरोबीमध्ये मिळणारे उत्तम प्रतीचे दूध. तिथल्या वास्तव्यात तर मी रोजच तो चहा पीत असे. पुढेही कधी नैरोबीला जायचा चान्स मिळाला तर त्या चहाच्या काही बरण्या आवर्जून आणत असे. इंस्टंट चहादेखील मी पहिल्यांदाच केनयामध्ये प्यायलो. इंस्टंट कॉफीप्रमाणेच हा पाण्यात वा दुधात सहज विरघळतो. भारतात अजूनही हे उत्पादन मिळत नाही. (मिळते त्यात दूध पावडर व साखर मिसळलेली असते.)
चहाच्या मळ्याचे आकर्षण मला आहेच; पण दार्जीलिंगमधला अनुभव काही चांगला नाही. तिथे मी चहाच्या रोपाला पांढरे फूल आलेले बघितले. त्याचा फोटो घेण्यासाठी खाली वाकलो तर लगेच एक सुरक्षारक्षक धावत आला आणि ५०० रुपये दंड मागू लागला. तशा पाट्या तिथे होत्या म्हणा! तिथेच एका पॉईंटवर एकजण चहा विकत होता. तो चवीला बरा लागला. त्याच्याच आग्रहाने त्याच्याकडून चढ्या भावाने चहा घेतला तो मात्र अगदीच कमी प्रतीचा आणि बेचव निघाला.
पण याच्या अगदी उलटा अनुभव श्रीलंकेत आला. कोलंबो ते नुवारा एलिया व्हाया कँडी या प्रवासात भरपूर चहाचे मळे दिसले. मी माझ्या गाईडला गाडी थांबवायला लावली. मला ती पाने जवळून बघायची होती; पण थोडी भीती पण वाटत होती. गाईड म्हणाला की कुणी काही बोलणार नाही; तरीही तिथल्या मॅनेजरला मी विचारलेच; तर तो म्हणाला, मूठभर पाने तोडलीस तर काय होणार आहे? मनसोक्त फिर आणि हवे तितके फोटो काढ. त्याच देशात एका टी फॅक्टरीमध्ये पाने तोडल्यापासूनची पुढची सर्व प्रक्रिया अगदी जवळून बघितली. तिथल्या मुलीने ते सर्व नीट समजावूनदेखील सांगितले. तिथेच उत्तम चवीचा चहा आणि पेस्ट्री खाल्ली. तिथे चहा पावडर विकत मात्र घेतली नाही. माझ्या गाईडला विचारून, तो घरी कुठला चहा वापरतो तो बाहेर विकत घेऊन द्यायला लावला. तो मात्र उत्तम प्रतीचा होता.
अंगोला या देशात असताना तिथल्या चीनच्या प्रभावामुळे चीनमधले अनेक प्रकारचे चहा बघितले. ते बहुधा कोरे प्यायचे होते. त्या चहाला काही आरोग्यसंदर्भ होते; पण मला ते तितकेसे आवडले नाहीत. मी तिथे जाताना भारतातून किंवा दुबईहून चहा पावडर वगैरे नेत असे.
३१ देशांच्या भटकंतीत अनेक वेळा केलेल्या विमानप्रवासात मात्र क्वचितच चांगला चहा मिळाला. बहुधा ते बेचव पाणीच असते. सिंगापूर एअरलाइन्स मात्र मस्त चवीचा मसाला चहा देते. (शेवटच्या प्रवासात नाही मिळाला तो; आता बहुतेक बंद केला आहे.)
चहाच्या चवीत प्रक्रिया जितकी महत्त्वाची तितकेच जिथे ते मळे आहेत त्याचे भौगोलिक स्थान आणि हवामान महत्त्वाचे आहे. तसे लावले तर चहाचे झाड आपल्याकडेही वाढेल; पण त्याला ती चव येणार नाही. माझे वास्तव्य सेशल्स बेटांवर काही वर्षे होते. तिथे अन्नधान्य पिकू शकत नाही कारण सपाट जमीन फारशी नाही. तिथल्या डोंगरांवर केनयामधून आणून चहाची रोपे लावली गेली होती. ती रोपे तिथे जगली, वाढली; पण त्या चहाला अपेक्षित चव मात्र आली नाही. ती झाडे अजूनही आहेत; पण फॅक्टरी मात्र बंद पडली आहे.
मी वर लिहिल्याप्रमाणे आमच्या घरी सकाळी सात आणि दुपारी तीन या चहाच्या वेळा आहेत. नैरोबी किंवा एकंदर केनयामध्ये जेवणासोबतपण चहा घेतात. तिथल्याच एका छोट्या गावातला अनुभव मुद्दाम लिहिण्यासारखा आहे. तिथे शतकांपूर्वी गेलेल्या गुजराथी समाजाने आपले बस्तान नीट बसवलेले आहे. गावोगावी त्यांनी ‘हवेली’ मंदिरे बांधलेली आहेत. अशाच एक देवळात आम्ही सहज गेलो. दुपारचे चार वाजले होते. एका कुटुंबाच्या घरातच हे देऊळ होते. गेल्या गेल्या आमच्या जेवणाची चौकशी केली. ते झाल्याचे आम्ही सांगताच त्या बाईंनी चहा समोर आणून ठेवलाच. आम्ही संकोचल्यावर त्या म्हणाल्या, “ठाकूरजीच्या घरी आला आहात. चहाची वेळ आहे. मी तुम्हांला दिला नाही तर ते रागावतील ना?” घरचाच पुदिना घालून केलेला तो चहा आणि त्यापेक्षा त्यामागचे ते अगत्य मी कधीच विसरू शकणार नाही.
असे अगत्याचे चहा अनेक अनुभवले. न्यूझीलंडला लहानग्या मानसकन्येने स्वत:च्या हाताने करून दिलेला, दीर्घ विमानप्रवास करून भलत्याच वेळी घरी आल्यावर आईने करून दिलेला, हिमालयात ट्रेकवर असताना भल्या पहाटे आलेला कोरा, हेमकुंडसाहेबवरच्या गुरुद्वाराच्या लंगरमध्ये गरमागरम खिचडीसोबत प्रेमाने दिलेला ग्लास भरून, जुन्नरला मित्राच्या घरी सकाळी मिळालेला बकरीच्या दुधाचा, कोल्हापूरला मित्राच्या घरी त्यांच्या घरच्या म्हशीच्या दुधाचा, रात्रभर ट्रेक करून माथेरानला पोहोचल्यावर तिथल्या चहावाल्याला झोपेतून उठवून करायला लावलेला, अहमदाबादला मशिदीबाहेर गाईडने आग्रहाने पाजलेला, लेगोसला सिंधी मित्राच्या घरी चमेलीच्या कळ्या घातलेला, लांबच्या विमानप्रवासात झोप येत नव्हती म्हणून कोरियन हवाई सुंदरीने आणून दिलेला खास सुगंधी…!
अजूनही हे ग्रीन टी, हर्बल टी प्रकार मला झेपत नाहीत. आजही माझा प्रिय चहा – माझ्या कोल्हापूरच्या घरी सकाळी पोहोचल्यावर ताज्या दुधाचा निव्वळ चहा !
श्रीलंकेतील चहाची इस्टेट
चहाचे फुल व पाने
