
हरीभाऊ एक सधन शेतकरी. चांगली ५०-६० एकर शेती, काही वडिलोपार्जित, काही स्वतः घेतलेली. भरपूर गाई गुरं, पुण्यात २, मुंबईत १ आणि कोल्हापूरला १ फ्लॅट, पैसा-अडका, सोनं-नाणं भरपूर. हरीभाऊंना ५ मुलं. भाऊंची पहिली पत्नी फार लवकर गेली – तिला २ मुलं. मुलं फार लहान म्हणून, दुसरं लग्न केलं, तिची ३ मुलं. उत्तम आयुष्य जगून हरीभाऊ निघाले पुढच्या प्रवासाला. आता ही कथा इथे सांगण्याचं प्रयोजन काय? तर हरीभाऊंच्या पश्चात तेच घडलं जे साधारणपणे घडतं. हरीभाऊंच्या भावंडांनी वडिलोपार्जित शेतीवर हक्क सांगितला. ५ मुलं आपापसांत भांडायला लागली. त्यात सख्खा सावत्र वाद. जे फ्लॅट होते ते एकट्याच्या नावावर, सोनं-नाणं बायकोच्या ताब्यात. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय करणार, हे तर सगळीकडेच होतं!
हरीभाऊंचं उदाहरण हे प्रातिनिधिक आहे. थोड्याफार फरकाने अशी परिस्थिती अनेक ठिकाणी बघायला मिळते. कुठे परिस्थिती विकोपाची तर कुठे तांत्रिक गुंतागुंतीची. आता ही गुंतागुंत कमी करता येऊ शकते काय? तर उत्तर आहे होय! आता पुढे आपल्या हरीभाऊंच्या बाबतीत काय घडलं बघू या.
हरीभाऊंचे दिवसकार्य जसे उरकले तसे हरीभाऊंचे एक जुने मित्र घरी आले. ते वकील होते, पुण्यात प्रॅक्टिस करत. ते सर्वांना भेटले आणि मग सर्वांना बैठकीत बोलावलं. भाऊंच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करून म्हणाले की हरीभाऊंनी अलीकडेच आपलं वाढतं वय, पसारा आणि भविष्यात उद्भवणारे प्रश्न लक्षात घेऊन पुण्यात येऊन माझी भेट घेतली. त्यांच्या डोक्यात आपल्या मालमत्तेचे वाटप कसे करायचे ह्याचे ढोबळ स्वरूप तयार होते; पण ते कायदेशीर मार्गाने कसे करायचे ते ठाऊक नव्हते. मी त्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेऊन, मृत्युपत्र म्हणजेच WILL करण्याचा मार्ग सुचवला आणि त्याप्रमाणे ते तयार करून घेतले. आता मला त्यांनी सोपवलेल्या जबाबदारीने मी ते तुमच्या समोर वाचतो – हीच त्यांची शेवटची इच्छा होती.
आता हरीभाऊंच्या वारसांचे काही प्रश्न सुटतील; पण आपल्याला अनेक प्रश्न पडले असतील नाही? मग आपण मृत्युपत्राविषयी थोडी माहिती घेऊ या.
१. मृत्युपत्र म्हणजे काय? आणि ते कोण व कधी करू शकतो?
आपल्यामागे आपल्या स्थावर जंगम मालमत्तेचे काय करायचे ह्याचा मांडलेला लेखाजोखा म्हणजे मृत्युपत्र. कोणतीही सज्ञान व्यक्ती ते करू शकते. याला कालमर्यादा काही नाही. आपले वय, तब्येत , मालमत्ता आणि आपल्या पश्चात तयार होणाऱ्या प्रश्नांची गंभीरता लक्षात घेऊन योग्य वेळी ते करावे. मृत्युपत्रास इच्छापत्रसुद्धा म्हणतात.
२. मृत्युपत्रात प्रामुख्याने काय लिहावे?
मृत्युपत्रात प्रामुख्याने खालील गोष्टी अंतर्भूत असाव्यात
- मृत्युपत्रकाराचे संपूर्ण नाव, वय, पत्ता, ओळख प्रमाणपत्राचा संदर्भ (PAN / Aadhar)
- मृत्युपत्राची तारीख
- मृत्युपत्र तयार करतेवेळी मृत्युपत्रकाराचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याची वैधानिक सूचना. जर शक्य असल्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याचे डॉक्टर सर्टिफिकेट (दाखला) जोडावे. डॉक्टर सर्टिफिकेट (दाखला) जोडण्याची कोणतीही कायदेशीर गरज नाही; परंतु त्याने मृत्युपत्राच्या वैधतेविषयी भविष्यात उपस्थित होणारे वाद टाळता येऊ शकतात.
- आपल्या मालमत्तेचा एकूणएक तपशील, ती मालमत्ता आपण आपल्या पश्चात कोणाला देऊ अथवा सोपवू इच्छितो म्हणजेच वारस / लाभार्थींचा संपूर्ण तपशील. यात वारस / लाभार्थींचे नाव, वय, पत्ता, ओळख प्रमाणपत्राचा संदर्भ (PAN / Aadhar) जरूर असावा. जर वारस / लाभार्थी सज्ञान नसेल तर तो/ ती सज्ञान होईपर्यंत कोणा विश्वासू व्यक्तीला त्याचे पालक (guardian) म्हणून नियुक्त करावे.
- मृत्युपत्र हे मृत्युपत्रकर्त्याने स्वतः तारखेसहित सही करावे
- सदर मृत्युपत्र हे समाजातील कमीत कमी २ प्रतिष्ठित साक्षीदारांसमक्ष स्वाक्षांकित केले असल्यास उत्तम.
3.मृत्युपत्र हाती लिहावे का? कोणत्या भाषेत लिहावे? ते रजिस्टर करणे गरजेचे आहे का? ते वकिलांकडून वा CA कडून करून घेणे गरजेचे आहे का?
मृत्युपत्र हे हाती लिहिलेले, टंकलिखित कसेही चालू शकते. हाती लिहिलेले असल्यास आपले हस्ताक्षर समोरच्याला वाचता येइल ह्याची काळजी घ्यावी.
मृत्युपत्र कोणत्याही भाषेत लिहिता येते. मृत्युपत्रकाराला जी भाषा सर्वात उत्तम समजते व ज्या भाषेत तो आपले विचार सर्वात स्पष्ट मांडू शकतो त्या भाषेत मृत्युपत्र करावे.
ते रजिस्टर करणे कायद्याने बंधनकारक नाही; तरी, भविष्यात वारसांमध्ये / लाभार्थींमध्ये वाद उपस्थित झाल्यास रजिस्टर दस्तऐवजाची वैधता न्यायालयात सिद्ध करणे कमी जिकिरीचे ठरते; त्यामुळे मृत्युपत्र रजिस्टर करणे हितावह ठरते.
मृत्युपत्र वकील वा CA मार्फत करण्याची कोणतीही सक्ती नाही; परंतु तसे करताना लिहिणाऱ्याला आपले विचार हे स्पष्टपणे मांडता येणे गरजेचे आहे. वाक्यरचना करताना त्याचे विविध अर्थ निघू शकतात; त्यामुळे कमीत कमी गुंतागुंतीचे लिखाण करता येणे गरजेचे आहे. तसेच मृत्युपत्रकाराला कायद्याचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. अशा कारणांमुळे अनेकदा लोक तज्ज्ञ व्यावसायिक (प्रोफेशनल) माणसाच्या मदतीने मृत्युपत्र लिहिणे पसंत करतात; शिवाय तसे करताना संपूर्ण लेखनात एक त्रयस्थ दृष्टिकोन मिळतो.
४. एकदा केलेले मृत्युपत्र बदलता येते का?
होय, आपल्या हयातीत आपले मृत्युपत्र आपण कितीही वेळा बदलू शकतो. तसे करताना या आधीची सर्व मृत्युपत्रे रद्दबातल आहेत आणि हेच शेवटचे व अंतिम मृत्युपत्र आहे असा उल्लेख जरूर असावा. जर आधीची मृत्युपत्रे रजिस्टर केली असतील तर बदललेले मृत्युपत्र अवश्य रजिस्टर करावेच.
५. मालमत्तेचा तपशील कसा लिहावा?
मालमत्ता ह्या २ प्रकारच्या असतात स्थावर (Immovable) जसे घर, जमीन, बंगला इ . आणि जंगम (Movable) जसे दागिने, कलाकृती, गाडी इ.
स्थावर मालमत्ता (Immovable Properties):
स्थावर मालमत्तेचा संपूर्ण तपशील / पत्ता द्यावा ज्यात जमिनीचा सर्वे नं, घर नं, फ्लॅट नं, इमारतीचे नाव, विंगचे नाव, शहराचा / गावाचा भाग/प्रभाग, चतुःसीमा अशा गोष्टी अगदी स्पष्टपणे नमूद कराव्यात जेणेकरून भविष्यात ती मालमत्ता ओळखण्यात कोणतीही अडचण येऊ नये. सदर मालमत्तेच्या सरकारी दप्तरातील नोंद क्रं असल्यास तोसुद्धा जरूर लिहावा. सदर मालमत्ता एकापेक्षा जास्त वारसांमध्ये / लाभार्थींमध्ये विभागायची असल्यास ते विभाजन कोणांत व कसे असावे ह्यावरही स्पष्ट विवेचन असावे.
जंगम मालमत्ता (Movable Properties):
यात मुख्यत्वेकरून बँक अकाउंट्स, रोकड, विविध स्वरूपाची गुंतवणूक जसे shares, mutual funds, fixed deposits, गाडी, विविध कलाकृती : पेंटिंग्स, मूर्ती वगैरे गोष्टी मोडतात. ह्यात मोडणाऱ्या मालमत्तेचे मूल्य हे सतत बदलू शकते जसे बँक बॅलन्स मृत्युपत्र बनवताना आणि मृत्युसमयी वेगळा असणार आहे; त्यामुळे इथे अशा मालमत्तांची रक्कम नमूद करू नये. अशा मालमत्तांचा तपशील खालील प्रमाणे द्यावा :
बँक अकाउंट्स, shares, mutual funds, fixed deposits ह्यांचे अकाउंट नंबर अथवा folio नंबर नमूद करावेत म्हणजे मृत्युसमयी त्यात असलेल्या सर्व मालमत्तेचे वाटप करता येईल.
गाड्या
गाड्यांचा रजिस्ट्रेशन नंबर नमूद करावा जेणेकरून ती ओळखणे सोपे जाईल
दागिने
दागिन्यांचा प्रकार / नाव, त्यात वापरण्यात आलेल्या धातू / मौल्यवान खडे – हिरे, पाचू यांची माहिती, वजन इ. नमूद करावे
उदा. ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या – ४ नग
६. मृत्युपत्र लिहिताना घ्यावयाची काळजी
- भाषा, वाक्यरचना कमीत कमी गुंतागुंतीची असावी
- परस्पर विरोधाभास दर्शवणारी वाक्ये त्यात असू नयेत. उदा. एकीकडे माझे सर्व दागिने माझ्या मुलीला देण्यात यावेत असे म्हणून दुसरीकडे माझ्या सोन्याच्या पाटल्या, बांगड्या ह्या सुनेला द्याव्यात, अशाने केवळ संभ्रम तयार होऊन वारसांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता तयार होते.
- मृत्युपत्रकार/वारस/लाभार्थी ह्यांच्यापैकी कोणाला जर एकापेक्षा जास्त नावाने संबोधले जात असेल तर त्या सर्वांचा उल्लेख असावा उदा. श्रीकृष्ण यादव उर्फ मुरलीधर दादा
- स्थावर जंगम मालमत्तेचे वाटप करताना त्यासमोर जर काही दायित्वे (liabilities) असतील तर तीसुद्धा नमूद करावीत आणि त्याचे देय कसे करावे ह्याबद्दल सूचना करावी.
- मृत्युपत्र बनविल्यानंतर ते कोणा विश्वासू व्यक्तीकडे ठेवण्यासाठी देता येऊ शकते; जेणेकरून मृत्युपत्रकर्त्याच्या पश्चात ते उपलब्ध होऊ शकेल. तसेच त्याच्या सुरक्षित अंमलबजावणीची जबाबदारीसुद्धा विश्वासू, निःपक्ष व्यक्तीवर सोपविता येऊ शकते. अशा व्यक्तीचे नाव व जबाबदारी मृत्युपत्रात नीट लिहून ठेवावी. ही जबाबदारी परिवारातील व्यक्तीस किंवा वकील किंवा CA किंवा आणखी कोणी परिचयातील प्रतिष्ठित व्यक्तीला सोपवता येऊ शकते.
- भारतात वारसा हक्क व त्यान्वये संपत्तीचे वाटप ह्यांविषयीचे कायदे हे धर्मनिहाय आहेत; त्यामुळे आपण आपले मृत्युपत्र बनवण्यापूर्वी आपल्याला लागू होणाऱ्या कायद्याचा नीट अभ्यास करून घ्यावा अथवा त्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
मृत्युपत्राविषयी वरील सर्व प्राथमिक माहिती असून त्यातून ह्या विषयी जनजागृती व्हावी हा हेतू आहे. हा विषय गहन असून त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला घेणे इष्ट ठरते. मृत्युपत्राद्वारे त्या व्यक्तीच्या पश्चात त्या व्यक्तीच्या स्थावर-जंगम मालमत्तेविषयी होणारे संभ्रम, वाद, नुकसान टाळता येऊ शकते आणि तिचे सुयोग्य वाटप निश्चित केले जाऊ शकते. काही वेळा आपल्या वारसांना आपल्या स्थावर-जंगम मालमत्तेची संपूर्ण माहिती नसल्यामुळे ती इतर कोणाच्यातरी हाती जाण्याचा धोकाही याद्वारे टाळता येऊ शकतो. जन्म आणि मृत्यू काही आपल्या हातात नाही; मात्र या मृत्युपत्राद्वारे आपण आपल्या मागे राहिलेल्या आपल्या कुटुंबाचे जीवन थोडे आणखी सुखकर करू शकतो; त्यामुळे यावर विचार आणि कृती करण्यासाठी जागृती हेच या लेखामागचे प्रयोजन!

Well written Sanket . And details addressed properly especially mention of cars regn. nos., heirs called by different names .
CA Jayshree Karve.
A detail analysis ….Good article.