उच्च शिक्षणाचा गाभा: भाग ५ – पदवीदान समारंभाची चित्तरकथा!

 विद्यापीठाचा बँड वाजू लागला. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचली. त्यांना त्यांची मुलं पदवीदान समारंभासाठी विकत घेतलेल्या खास गाऊन, केप, आणि टोप्या घालून स्टेजवर जाऊन विद्यापीठाच्या प्रेसिडेंटच्या हस्ते पदव्या स्वीकारताना बघायची होती. “विद्यार्थी आता सभागृहात प्रवेश करत आहेत हो! कृपया सगळ्यांनी उठून उभं राहावं!” भालदार चोपदारांनी आवाज दिला. शेकडोंच्या संख्येत प्रेक्षकांत उपस्थित झालेले आई-बाप, आजी-आजोबा, भाऊ-बहिणी, इतर नातलग, मित्रमंडळी उठून उभी राहिली. टाळ्या वाजवण्यासाठी सज्ज झाली. आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अर्थातच महत्त्वाचा होता. आज त्यांचे कॉलेज जीवन संपून ते पदवीधर होणार होते. बाहेरच्या मोकळ्या जगात स्वतःचं पाऊल टाकणार होते. त्यासाठी लागणारी स्वतःची ओळख त्यांना ह्या पदवीतून मिळणार होती. तिथे जमलेल्या लोकांच्या मनात अनेक तऱ्हेचे विचार चालू झाले होते. चार वर्षांचं शिक्षण झाल्यानंतर, हजारो तास नाना विषयांचा अभ्यास केल्यानंतर आणि हजारो डॉलर्सची फी भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नक्की काय पदरात पडणार होतं ह्याचा विचार करत होते. प्रत्येकाची चित्तरकथा वेगळी होती. 

 ”काय त्रास आहे हा दरवर्षी,” प्रोफेसर स्टीव्हन्स मनातल्या मनात वैतागले होते,”निव्वळ भपका आणि डामडौल! दरवर्षी ह्या भडक सोहळ्यात अगदी वाजत गाजत पदव्या वाटतात. आम्ही सगळे प्रोफेसर लोक झुली घालून इथे उपस्थित होतो. तासंतास ह्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसतो. रिसर्चमधला बहुमोल वेळ खर्च करतो. इतकं काय साजरं करतात हे लोक कुणास ठाऊक! पदवी म्हणजे शेवटी एक कागदच आहे ना तो? तो पोस्टाने घरी पाठवून दिला तर काय बिघडणार आहे? खरं ज्ञान तर डोक्यात आहे;  ते किती आणि कसं मिळालं हे महत्त्वाचं आहे – ते बघायला पाहिजे! पण तसं चालत नाही ना!  हा सगळा व्यर्थ गाजावाजा करायला हवा. पब्लिकवर छाप पाडायला नको का? पेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये फोटो यायला हवेत! जाहिरातबाजी नुसती! लोकांना वाटतं जितका भपका जास्त तितकं शिक्षण चांगलं! जाऊ दे – ह्या भानगडीत पडण्यात अर्थ नाही – इथे वाद घालून उपयोग नाही. करू दे त्यांना काय करायचं ते!” प्रोफेसर स्टीव्हन्स उद्विग्नपणे हा पदवीदान समारंभ कधी संपतो आणि लॅबमध्ये जाऊन कधी काम सुरू करतो ह्याची वाट पाहू लागले. 

 विद्यापीठाचा प्रेसिडेंट हसऱ्या चेहऱ्याने समोर बघत होता. दोन-दोनच्या ओळीतून तरुण चेहरे सभागृहात येत होते. प्रेसिडेंटसाहेब मनातल्या मनात म्हणत होते,”चला! आणखी एक ॲकॅडेमिक वर्ष संपलं. ह्यावर्षी आठशे मुलं पदवीधर झाली. खरं म्हणजे आपलं टार्गेट साडेआठशेचं होतं. पन्नास विद्यार्थी कमी म्हणजे बजेटवर चांगलाच ताण पडणार. आपली संस्था खासगी आहे – म्हणजे सरकारी अनुदान नाही. विद्यार्थ्यांच्या फीवरच विद्यापीठाचा चरितार्थ चालणार; नाही म्हणायला काही देणग्या आणि रिसर्च ग्रँट्स आहेत; पण मुख्य मिळकत म्हणजे विद्यार्थी! ती नाडी गेली दोन वर्षे आवळली जात्ये. काय करायचं? आपल्या विद्यापीठाकडे जास्त विद्यार्थी कसे ओढायचे बरं? आपण आणखी चांगली जाहिरात करायला हवी, स्पोर्ट्सच्या टीम्सना टीव्हीवर झळकण्याची संधी मिळायला हवी, त्यांच्या विजयाचा बँडबाजा जोरात करायला हवा! विद्यापीठाचं नाव आजूबाजूच्या समाजात चांगलं गाजलं पाहिजे. त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून यायला पाहिजेत – आपल्या विद्यापीठाची अशी जोशीली हवा व्हायला पाहिजे – त्याशिवाय ह्या प्रचंड स्पर्धेच्या जगात आपल्याला यश मिळणार नाही. प्रोफेसर लोकांनीपण थोडं सहकार्य केलं तर बरं होईल. त्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षित, मर्यादित परिघाच्या बाहेर पडायला पाहिजे – समाजात मिसळायला पाहिजे. आजूबाजूच्या संस्थांशी, उद्योगधंद्यांशी नाती जोडायला पाहिजेत. नुसतंच आपलं ऑफिस, आपलं काम, आपला रिसर्च, आपली लॅब, आपला वर्ग इतकंच मर्यादित जग ठेवून चालणार नाही. त्यांच्या प्रसिद्धीवर काही मुलं ह्या विद्यापीठात आकर्षित होतील. त्यांना हे कळलं तर बरं होईल; नाहीतर दुर्दैवाने पुढच्या वर्षी काही नोकऱ्यांना कात्री लावायला लागेल. देव करो आणि असं न होओ…” ह्या भावी आर्थिक विवंचनेच्या विचाराने प्रेसिडेंट नकळत शहारले. इतक्यात त्यांना कुणीतरी हात केला, किंचित झुकत स्मितहास्य करत प्रेसिडेंटनी आदराने प्रत्युत्तर दिलं आणि भविष्यातून लक्ष काढून वर्तमानात घडत असलेल्या पदवीदान समारंभाकडे त्यांनी पुन्हा एकदा त्यांचं लक्ष केंद्रित केलं.  

 सभागृहात येणारे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या जगात हरवून गेले होते. काही जण आनंदी होते, काही जण घाबरले होते; तर काही जण चक्क वैतागलेले होते, ‘साली सोन्यासारखी, ऐन उमेदीची चार वर्षं इथे घालवली आणि आज आता पदरात काय पडणार – तर हा कागदाचा तुकडा! बापाने केलेला इतका खर्च, माझ्या माथ्यावर तीस हजार डॉलर्सचं कर्ज आणि हातात नोकरी नाही.’ 

 पदवीदान समारंभासाठी नाइलाजाने आलेला विद्यार्थी जॉन विचार करत होता, ‘मोठी मोठी स्वप्नं दाखवून फसवलं काय आपल्याला ह्या लोकांनी? त्यापेक्षा गेली चार वर्षं वेल्डिंग करून दरवर्षी साठ हजार डॉलर कमावले नसते? ती कमाई गेली पाण्यात आणि वर माझ्याच डोक्यावर कर्ज! हॅ! हा व्यवहार काही ठीक वाटत नाही राव; पण ‘कॉलेजला जा’, ‘कॉलेजला जा’ म्हणत आपला तिरपागडा बाप मागे लागला – एकतर स्वतः कधी कॉलेजला गेला नाही आणि मला कॉलेजात ढकलत राहिला. आईचीही त्यात भर – इतकं प्रेशर आणलं त्यांनी माझ्यावर की माझा काही इलाजच चालला नाही. इथे चार वर्षं जमेल तितकी नोकरी करत घास घास घासलं. इंग्लिश काय, कम्युनिकेशन काय, अकाउंटिंग काय, बिझिनेस काय आणि इंडस्ट्रियल इंजिनियरिंग काय – आणि आता पुढे काय? बोंबला! तेव्हा मारे सांगत होते आमच्या ९०% पदवीधरांना पदवी मिळाली की सहा महिन्यांच्या आत नोकऱ्या मिळतात! कुठे आहे मला नोकरी? म्हणजे परत वेल्डिंग करायला जाऊ ना? काही अर्थ आहे त्याला? ह्या पदवीदान समारंभात मला इथे मुळीच यायचं नव्हतं – पण बाप ऐकेचना – त्याची हौस! पण सुटेन आता त्याच्या तावडीतून – हा एवढा समारंभ झाला की मी मोकळा! फ्री बर्ड! वाजवा लेको बँड! आणखी जोरात वाजवा! बेकार महाराज येत आहेत हो!’ जॉनने सुस्कारा सोडत आजूबाजूला नजर फिरवली. कसं कुणास ठाऊक पण तेवढ्या त्या प्रचंड गर्दीत त्याच्या नजरेला जाग्यावर उठून उभं राहून, टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करणारं त्याचं सारं कुटुंब त्याला दिसलं. धाकटी बहीण शर्ली बेंबीच्या देठापासून “हू! हू! गो जॉन! गो जॉन!” असं अभिमानाने ओरडत होती. एकदम त्याच्या मनातला विषाद मावळला. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. त्यांचा उत्साह बघून त्याच्या नकळत त्याच्या हृदयातून अनामिक आनंदाचा, अभिमानाचा झरा वाहायला लागला. भविष्य उज्ज्वल वाटायला लागलं. ही पदवी आपली आहे, ही पदवी जन्मभर आपल्याला साथ करणार आहे, आपल्याला समाजात एक स्थान आणि सन्मान देणार आहे ह्या विचाराने त्याला हलकं वाटायला लागलं. दोन्ही हात उंचावून त्याने कुटुंबीयांना अभिवादन केलं आणि त्याच्या नेमून दिलेल्या खुर्चीच्या दिशेने तो चालू लागला.

 प्रेक्षकांत कसाबसा तोल सांभाळत उभ्या राहिलेल्या ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्या बिलच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं होतं. प्रायमरीच्या चार यत्ता झाल्यावर त्याने शाळेला रामराम ठोकला होता. हायस्कूलचं त्याने तोंडही बघितलं नव्हतं. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने त्याच्या शेतात मेहनत केली होती. हाताला घट्टे पडले होते. आता वयपरत्वे झालेल्या आर्थ्रायटीसमुळे त्याची बोटं वेडीवाकडी झाली होती; पण आत्ताचा हा क्षण त्याच्या आयुष्यात येईल हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मका, बटाटा, गाई, डुकरं, कोंबड्या, घोडे, गवत, शेतीची अवजारं, त्याचं कुटुंब आणि गावातलं त्याचं चर्च ह्यांच्यापलीकडे त्याचा अनुभव गेला नव्हता. जे होतं त्यात तो सुखी होता. कधी शेतातले बटाटे, टोमॅटो, पालेभाजी आणि अंडी ह्यांच्यापलीकडे डिनर टेबलावर ठेवायला अन्न नसे; पण पोटात भूक होती त्यामुळे जिभेला चव होती. बायको सुझी घरी ब्रेड करायची. त्याचा घमघमाट हा सगळ्या जगातला सगळ्यात सुंदर वास आहे असं त्याला वाटायचं. त्याच्या मुलांनी मात्र शिकावं असं त्याला वाटायचं. त्याचा धाकटा मुलगा मायकल शिकेल ह्याची त्याला खात्री होती. मोठा शार्प होता पोरगा. फार्मर्स मार्केटमध्ये कधी भेटले तर त्याचे गुरुजी मायकल किती हुशार आहे हे आवर्जून सांगायचे त्याला; पण मायकल वयात आला आणि त्याला त्या छोट्या गावी राहवेना – त्याला शहरात जायचं होतं. एक दिवस न सांगता गेलासुद्धा तो. लास वेगासला गेला. तिथेच त्याला ग्रेसी भेटली. त्याने शिक्षणाला रामराम ठोकला आणि तो ट्रक ड्रायव्हर झाला. दोघांनी नेटाने संसार केला आणि आज त्यांचा मुलगा जॉन कॉलेज ग्रॅज्युएट होतो आहे! कॉलेज ग्रॅज्युएट! वॉव! आपल्या आधीच्या सात पिढ्या कधी कॉलेजात गेल्या नाहीत; पण आपल्या लेकाचा लेक – आपला नातू – जॉन कॉलेज पूर्ण करून आज पदवीधर होतो आहे. आपल्याला आठवणीने बोलवलंन् त्याने ह्या समारंभाला! बिलने मायकलकडे नजर फिरवली आणि त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकला. मायकल आणि ग्रेसी – दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं, “हे बघायला आज आई असायला हवी होती,” मायकल पुटपुटला. “ओह! त्याची काळजी करू नकोस बेटा – ती इथेच आहे – वरून बघते आहे सारं, ” बिल म्हणाला.

सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या पाठीमागून येणाऱ्या प्रोफेसर्सचं स्वागत केलं. बँडचा आवाज क्रेशेंडोला पोचला आणि क्षणभर एकदम शांतता पसरली. स्टेजवरचे पदाधिकारी आधी खुर्चीवर बसले; मग प्रोफेसर्स बसले; मग विद्यार्थी बसले; मग सगळे प्रेक्षक आपापल्या जागेवर बसले. विद्यापीठाचा प्रेसिडेंट आपलं उपरणं आणि पगडी सावरत गंभीरपणे उभा राहिला. भालदार चोपदार सावरून उभे राहिले. नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही मोठ्या भपक्यात आणि डामडौलात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाची सुरुवात झाली. जगाच्या जडण-घडणीतली सुजाण नागरिकांची पुढची नवीकोरी पिढी आपली जबाबदारी खांद्यावर घ्यायला आता सिद्ध झाली होती!

Author

  • प्रियदर्शन मनोहर

    मटेरियस सायन्स मध्ये डॉक्टरेट.
    पिट्सबर्गमधील रॉबर्ट मॉरिस विद्यापीठात इंडस्ट्रियल इंजिनियरिंगचे प्राध्यापक

    View all posts

Leave a Reply