‘पत्र-सारांश’ एका अवलियाचा अभिनव प्रयोग

 डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा यांच्या दिलदार स्वभावाचा एक अनोखा पैलू आहे – त्यांची वाचून झालेली चांगली पुस्तके ते मित्रपरिवारात वाटतात.  या ज्ञानवर्षावाचा मलाही बऱ्याच वेळा फायदा होतो.  त्यांनी दिलेले असेच एक पुस्तक वाचत असताना त्यातून  एक   अन्तर्देशीय  खाली पडले. दाभोळकर सरांचे एखादे व्यक्तिगत पत्र बहुधा आपल्याकडे आले आहे आणि ते महत्त्वाचे असल्यास परत करायला पाहिजे या समजुतीने मी ते पत्र पाहिले.  ते पत्र नसून मराठी नियतकालिक प्रकाशनातील  तो एक अभिनव प्रयोग आहे; असे ते पत्र पाहिल्यावर लक्षात आले. त्यावर ‘यह अन्तर्देशीय पत्र नहीं है|’ असे स्पष्टपणे बजावणारा लाल रंगातील  शिक्का आहे.  त्याचबरोबर टपाल हशील आधी न लावता ते टाकण्याची रीतसर परवानगी घेतल्याचा क्रमांकदेखील नमूद आहे.  ‘पत्रसारांश’ असे अत्यंत अर्थवाही नाव या नियतकालिकाला आहे आणि हा मे १९८८  साली प्रसिद्ध झालेला या मासिकाचा अंक आहे. या अंकाला विकास केटरर्स  प्रायोजक म्हणून लाभले आहेत आणि त्याचे मालक मधू जोशी यांनी ‘आमच्या यशाची वाट तुमच्या पोटातून जाते,’ असे वाचकांना बजावले आहे.

   या  अभिनव प्रयोगाची संकल्पना कुणाची असे कुतूहल साहजिकच निर्माण झाले. अन्तर्देशीय  पत्र चिकटवण्यासाठी त्याला वरती एक तिरकी पट्टी असते. त्या पट्टीच्या एका बाजूला प्रेषक श्रीकृष्ण बेडेकर, संपादक ‘पत्र-सारांश,’ विद्यार्थी स्टेशनरी मार्ट समोर, जेल रोड इंदूर-४५२००७ (म. प्र.)भारत असा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतला उल्लेख आहे तो वाचला.  पट्टीच्या आतल्या बाजूला पत्र सारांशचे बोधचिन्ह, वर्ष १३/अंक : ७/ मे १९९८/  मूल्य:रु.६/-  कल्पना आणि संपादन:  श्रीकृष्ण बेडेकर व कंसात पत्रभेटीतील साहित्य प्रतिबिंबित करणारे पहिले एकमेव मराठी मासिक हे मासिकाचे वैशिष्ट्य थोडक्यात पण पूर्णपणे सांगणारी बॅनर लाईन. अंक चार पानी  आहे. अन्तर्देशीय पत्राची पहिली घडी  म्हणजे या मासिकाचे मुखपृष्ठ.  त्यावर सुप्रसिद्ध लेखिका सौ.गिरिजा कीर  यांचे छायाचित्र आहे, शेजारी वर्गणीदाराच्या पत्त्याचे स्टिकर  लावायला जागा. या पानाचा खालचा भाग म्हणजे अन्तर्देशीय  पत्राची तिसरी घडी.  त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया व काही निवडक बाबतींत त्यावरची संपादकांची खुसखुशीत टिपणी. मुंबई ,नागपूर, देवगड यांसारख्या ठिकाणी राहणाऱ्या वाचकांनी आवर्जून आपल्या प्रतिक्रिया कळविल्या  आहेत.  या सदराचे नाव ‘माझ्या मनाचा आरसा’ असे आहे.  या छोट्या मासिकाचा आकार भलेही पॉकेट साईज असला; तरी त्यातील  आशय मात्र  जॅकेट साइजचा आहे अशी एका वाचकाची प्रतिक्रिया आहे. पत्रसारांशमधून एरवी वर्ज्य समजले जाणारे काही विषय चर्चिले जातात ही समाधानाची गोष्ट आहे असे एका वाचकाचे  कौतुकाचे उद्गार… त्यावर – ‘चर्चिले जातात म्हणजे?  अहो याहून तुमच्या आमच्या हाती दुसरे आहेच  काय? ख्रिस्तवासी चर्चिल यांनी स्वतंत्र भारतातील माकडचेष्टांचे चित्र  तो इंग्रजांच्या ताब्यात असतानाच काढून ठेवले होते : त्यामुळे असले विषय ‘चर्चिले’ जातात असं म्हणण्याची टूम निघाली असावी !’  अशी संपादकांची काहीशी तिरकस मल्लिनाथी आहे. 

   मासिकाशी होणारा पत्रव्यवहार; मग तो वाचक म्हणून असो की लेखक म्हणून त्याची आचारसंहिता संपादकांनी स्पष्टपणे दिलेली आहे.  

‘पत्र-सारांश’ला आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया, शुचिर्भूत  सूचनांसह डाक पत्रावर (Post Card) पाठवाव्यात. आपल्याकडून सभ्य  पातळीवरील विविध अंगी साहित्य,  जुनी दुर्मीळ   पत्रे अपेक्षित आहेत. विषयविस्तार आवश्यक वाटल्यास अंतर्देशीय पत्रातूनही मजकूर धाडता येईल.  साहित्यपूरक चित्रे, छायाचित्रे, इतर महत्त्वाचे संदर्भ असल्यास ते बंद पाकिटातून पोचते करावे. व्याकरणाशी सख्य  राखणाऱ्या सुवाच्य लेखनाला अग्रक्रम दिला जाईल; मात्र त्या बाबतीत चौकशी नको. प्रत्येक पत्रावर टपाल खात्याच्या नियमांना साजेसे टपाल हशील लावा व शुद्ध मराठीत नाव पत्ता पिन कोड क्रमांक लिहा, स्वतःचा संभाषक क्रमांक( दूरध्वनी) असेल; तर तोपण अवश्य  नोंदवा. 

संपादकाचे पसायदान काहीसे असेच असेल नाही का?  हे सर्व वाचल्यानंतर संपादकांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक चित्र डोळ्यांसमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही.  हे चित्र चाकोरीतून जाणाऱ्या माणसाचे नक्कीच नाही.  मराठीचे प्रेम, साहित्यप्रेम असणारा, भाषेवर,भाषेच्या व्याकरणावर प्रेम करणारा व नवनवीन प्रयोग करण्यास न घाबरणारा एक अवलिया असे  चित्र माझ्या मन:पटलासमोर उभे राहिले. 

     पान क्रमांक दोनवरती ‘एक बंगला बने न्यारा’ या शीर्षकाचे संपादकीय आहे. या संपादकीयाला पूर्वरंग आहे. सन १९९६  मध्ये घेतल्या  गेलेल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी दिल्ली दूरदर्शनवरून सादर केली जाणारी ‘विकास गीते’ पाहून तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या  अवनतीचे  चित्र आमच्या नजरेपुढे तरळू लागले होते; त्यावेळी लिहिलेले खुमासदार संपादकीय, ‘पत्रसारांश’ ‘BAD REST’ वर असल्यामुळे त्यात देऊ शकलो नव्हतो.  ते या अंकात केवळ आमच्या विचारांची दिशा वाचकांच्या ध्यानी यावी म्हणून देत आहोत; असा तो पूर्वरंग आहे. BAD REST कशासाठी त्याचा उल्लेख किंवा खुलासा नाही.  संपादकीयामध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नावातील ‘पी व्ही एन’ या आद्याक्षरांचा  अर्थ  ‘परदेशी  वारी निपुण’  असा होतो असा तिरकस उल्लेख आहे. नरसिंहराव व कुंदनलाल सैगल  यांची मनोरंजक तुलना संपादकांनी केली आहे.  शीर्षकात उल्लेखलेल्या गाण्यात कुंदनलालजी एका सोनेरी बंगल्याचे वर्णन करत आहेत.  असे बंगले फक्त स्वप्नातच असतात आणि अशा वर्णनांनी लोकांचे कान कदाचित भरतील; पण पोटाचे काय असे संपादकांना विचारायचे आहे. लोकांना विकासगीते ऐकवण्यापेक्षा त्यांच्या पोटातील भूक भागवण्याकडे पंतप्रधानांचे लक्ष हवे असा संपादकीयाचा सूर व हे न झाल्यास आगामी निवडणुकीमध्ये तुमचा ‘स्ट्रीट सिंगर’  होईल असा या श्रीकृष्णाचा म्हणजे संपादक श्रीकृष्ण बेडेकरांचा होरा आहे असे नोंदवले आहे. संपादकीयात नरसिंहराव यांचे अर्कचित्र आहे व ते बहुधा स्वतः संपादकांनी रेखाटले आहे.  शेजारी चित्रकाराची लघुस्वाक्षरी आहे; परंतु त्यातून नावाचा स्पष्ट बोध होत नाही. अर्कचित्रावरती सैगल यांच्या ‘जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे’  या आणखी  एका गाजलेल्या गाण्याचा उल्लेख आहे. एकंदरीत संपादक महोदयांना कुंदनलाल  सैगल खूप आवडत असावेत. अर्थात  त्यांची पंतप्रधानांची केलेली तुलना ही गायलेल्या गाण्याच्या अर्थानुसारी आहे हे उघड आहे. 

              मुखपृष्ठ गिरिजा कीर यांचे आहे हे यापूर्वी सांगितलेच आहे. त्यांनी, ‘माझं हे असं आहे’ (स्वानुभव)  अशा नावाने पान नंबर दोनवर थोडक्यात लिहिले आहे. स्वतःच्या जीवनविषयक दृष्टिकोनाविषयी लिहिताना त्यांनी ‘कोन’  हरवला आहे अशी खंत व्यक्त केली आहे. ‘बरं बोलावं; पण खरं बोलू नये,’ हा आजचा मूलमंत्र आहे, ‘साधी राहणी आणि लुच्ची विचारसरणी’ ही आचारसंहिता आहे, ‘बोले त्याच्याविरुद्ध चाले’ हा आजचा नीतिधर्म आहे; असे सांगत मला हा नीतिधर्म कळत नाही; पटत नाही आणि सहनही होत नाही. जे त्यानुसार वागतात त्यांना मी वाईट कशी म्हणू?  हा त्यांचा प्रश्न मनाला  भिडतो. काळाची पावलं न ओळखणाऱ्या माझ्यासारख्या स्त्रीने जीवनाविषयी न बोलणं बरं; कारण ती पराभवाची गाथा असेल.  हे त्यांचे चिंतन बेचैन   करणारे आहे.

            अंकात कथा आहे,  कविता आहेत.  देवळातल्या घंटेवर बसलेले फुलपाखरू या एका विषयावर तीन वेगवेगळ्या कवींनी केलेले हायकू आहेत. गाव तुझा तो पैलतिरी (निरोप दिवंगतांना)  या सदरात यदुनाथ थत्ते, तलत  महमूद, लक्ष्मीकांत कुडाळकर, विश्वनाथ पेंढारकर, दरबारा सिंह, मिनू मसानी, डॉक्टर मधुकर अष्टीकर यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. 

         पान क्रमांक चारवरती पुस्तक परीक्षण आहे.  त्यासाठी ‘आम्हा घरी धन शब्दांचे’ हे सदर आहे; तर ज्वाला आणि फुले या नावाने समीक्षेचे सदर चालत असल्याचा उल्लेख आहे.  या दोन्ही सदरांसाठी पुस्तकांच्या दोन प्रती पाठवणे आवश्यक अशी सूचना आहे.  पाखरांची शाळा नावाने बाल विभाग आहे.  त्यात एक बोधकथा दिलेली आहे.

     त्या काळात काही  मार्मिक   प्रश्न व  नियतकालिकाच्या वतीने त्यांना दिली गेलेली चुरचुरीत उत्तरे अशी सदरे लोकप्रिय होती.  या मासिकातही ‘सवाल माझा ऐका( शंका निरसन)’  या नावाचे अशाच प्रकारचे सदर आहे. प्रश्न आहे कैलासवासी पी. सावळाराम यांचे ‘तुझे डोळे पाण्याने भरले माझे डोळे पाण्याने भरले’  अशात काय करावे? संपादकांनी उत्तरात सुचवले आहेत. 

१ शक्यतो कांदे हाताने अथवा नाकाने न सोलता वाफवून सोलावेत 

२ ते सासूला देऊन ती खाते का ते पाहावे.

पुढील अंकाची रूपरेषादेखील दिलेली आहे. त्या अंकाचे प्रायोजक ‘एशियन ॲग्री हिस्टरी फाउंडेशन सिकंदराबाद’ हे आहेत असाही उल्लेख आहे. प्रायोजकाचे नाव जरा वेगळे वाटल्याने त्यावर आंतरजालाच्या मदतीने थोडे अधिक संशोधन केले. १९९४ साली  सिकंदराबाद येथे स्थापन झालेली ही एक संस्था आहे.  प्राचीन भारतीय व एशियन  कृषी इतिहासातील परंपरांचे अध्ययन, जतन व संवर्धन करणे हा या संस्थेचा हेतू आहे.  काही शेतीशास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन स्वतःचे पैसे घालून ही संघटना उभी केली आहे. संस्थेची स्थापना कैलासवासी डॉ. यशवंत लक्ष्मण नेने  यांनी केली. ते २०१८ साली निवर्तले . भारतातल्या अग्रगण्य कृषी शास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर नेने यांचा समावेश होतो. त्यांचे शिक्षण मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे झाले.  अशा एका विद्वान व जाणकार माणसाने ‘पत्रसारांश’चा अंक पुरस्कृत केला होता ही माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची व अंकाचा दर्जा सूचित करणारी गोष्ट आहे.

        एकंदरीत अंक वाचून श्रीकृष्ण बेडेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी स्वाभाविक कुतूहल निर्माण झाले.  प्रकाशन स्थळ इंदूर असल्याचे अंकात नमूद आहे. काही जाणकारांकडे  हा अंक व त्याचे संपादक यांचेबाबत विचारणा केली.  सुमारे सहा महिन्यांपूर्वी श्रीकृष्ण बेडेकर यांचे निधन झाल्याचे समजले. व्यवसायाने ते कमर्शियल आर्टिस्ट होते.  अत्यंत हरहुन्नरी  असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ‘शब्द दरवळ ‘या नावाने ते आणखी एक मराठी मासिक चालवायचे.  ‘जास्वंदी प्रकाशन’ या नावाने त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था देखील होती.  त्यांचे हस्ताक्षर  अत्यंत वळणदार, देखणे होते. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या कलंदर माणसावर ललित मासिकात  विस्ताराने लिहिले आहे असे कळले;  परंतु अजूनपर्यंत प्रयत्न करूनही ललितचा तो अंक हाती लागलेला नाही. 

                         कै श्रीकृष्ण बेडेकर, संपादक ‘पत्रसारांश’

Author

One thought on “‘पत्र-सारांश’ एका अवलियाचा अभिनव प्रयोग

  1. खूप नवीन माहिती कळली. मराठी भाषेचे हे unsung भोई 🙏🙏

Leave a Reply