पंडिता मालिनीताई राजूरकर 

गृहिणी ते विख्यात गायिका

त्यांची माझी प्रत्यक्ष भेट फक्त दोन वेळा झाली होती. एरवी त्या व्यासपीठावर गायिका म्हणून आणि मी समोर श्रोता हेच आमचं मुख्य नातं होतं. त्यांच्या असंख्य सामान्य चाहत्यांपैकी, रसिकांपैकी मी एक! संगीताच्या व्याकरणापर्यंत मी कधी पोहोचले नाही – पोहोचावं असं कधी वाटलंही नाही. संगीतानंदाच्या पायरीवरच थांबले.

त्यांचं गाणं आवडूनही मैफलींनंतर आवर्जून भेटून तसं कधी सांगितलं नाही; कारण त्यांच्या भैरवीचे शांतवणारे सूर बरोबर घेऊन निःशब्दपणे माझ्यासारखे असंख्य श्रोते सभागृहाबाहेर पडत असत; ते एक प्रकारचं भारावलेपण घेऊनच!

त्यांचा माझा  संबंध म्हटला तर दूरचा! कार्यक्रमाव्यतिरिक्त सभा-संमेलनांतून त्या फारशा कधी भेटल्या नाहीत; पण ते स्वाभाविक होतं; कारण त्यांचं वास्तव्य हैदराबादला. दुसरं, त्यांच्या कार्यक्रमांच्या परीक्षणांखेरीज दैनिकांतून, दिवाळी अंकांतून त्यांच्यावर भरभरून लिहिलं गेलंय असं नाही; किंवा त्यांच्या मुलाखतीही माझ्या वाचनात फारशा आल्या नाहीत. त्याही अर्थानं त्या काहीशा अपरिचितच राहिल्या; परंतु त्यांच्याविषयी एक प्रकारचं आकर्षण मात्र नेहमीच वाटत राहिलं. आदर तर होताच. त्या गेल्याची बातमी वाचली : ‘अभिजात संगीताचे स्वरलेणे – पंडिता मालिनी राजूरकर यांचे निधन!’ आणि आपल्या जवळची व्यक्ती गेल्याचं दुःख झालं. अगदी थोड्या सहवासातही त्या मला एवढ्या जवळच्या का वाटाव्यात? नाही सांगता येणार! पण एवढं मात्र खरं, की त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असं काही आपलेपण होतं; जसं आपल्या घरातील मावशी, मामी, काकू अशा कुठल्याही नात्यात फिट बसतील असं! माझ्या बाजूनं त्यांच्याशी माझं हे दूरचं; पण आपलेपणाचं नातं होतं, हे मला त्या गेल्यानंतर प्रकर्षानं जाणवलं म्हणून मी मालिनीताईंविषयी लिहिते आहे.

डॉ.अनिल जोशी यांनी ‘अंतर्नाद’साठी मालिनीताईंवर एखादा लेख लिहाल का? असं विचारलं, तेव्हा वाटलं मी कुठल्या अधिकारानं लिहू? मी संगीताची जाणकार नव्हे. त्यांच्यावर लेख लिहिण्याएवढा त्यांचा मला सहवासही मिळाला नाही. अनेक अभ्यासकांनी वर्तमानपत्रांत त्यांच्या गायन वैशिष्ट्यांसह श्रद्धांजलीपर आठवणी लिहिलेल्या आहेत; मग मी वेगळं काय लिहू?

परंतु ज्या दोन प्रसंगांमध्ये मालिनीताई मला भेटल्या तेवढ्यातही त्या माझ्या मनावर ठसा उमटवून गेल्या हेही तेवढंच खरं! १९९३ सालची गोष्ट! पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या साठीनिमित्तानं मुंबईत – विलेपार्ले इथं दीनानाथ नाट्यगृहात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्या निमित्तानं दोन दिवसांच्या संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. त्यात मालिनीताईंचंही गाणं झालं होतं. त्यांच्या गाण्यापूर्वी मी त्यांचा परिचय करून दिला. गाणं संपल्यावर माझ्यापाशी येऊन त्या म्हणाल्या, “छान बोललात. मोजकं आणि नेमकं.” ही आम्हां दोघींची पहिली प्रत्यक्ष भेट!

दुसऱ्यांदा ताई भेटल्या एका घरगुती समारंभात. मुख्य लग्नसमारंभापूर्वी हल्ली जो संगीताचा कार्यक्रम असतो त्यात. ‘हम आपके है कौन’ सिनेमा येऊन गेल्यानंतर अगदी मराठी मध्यमवर्गातही लग्नसमारंभ चार दिवसांचे होऊ लागले आहेत. अलीकडच्या काळात या समारंभाला विविध गुणदर्शनाची जोड मिळाली आहे. त्यात अनेकांना आपल्यामधल्या कलावंताचा शोध लागत असतो. हा गमतीचा भाग सोडा; पण त्या दिवशीच्या संगीताच्या कार्यक्रमात त्या आमच्याबरोबर सहभागी झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या गायिकेसमोर आम्ही साऱ्याजणी निःसंकोचपणे गात होतो. त्या आमच्यात इतक्या मिसळून गेल्या होत्या की त्यांच्या प्रसिद्धीचं, वलयाचं कुठलंच दडपण आम्हांला वाटलं नाही हा त्यांचा मोठेपणाच! या दोन प्रसंगांतून त्यांच्या शालीन, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर खोलवर ठसा उमटला. त्या गेल्यानंतर हे दोन्ही प्रसंग आठवले.

मालिनीताईंना अनेक वर्षं तबला साथ करणारे पं. सुभाष आणि पं. भरत या कामत बंधूंबरोबर मी एका संकल्पनेवर सध्या काम करत आहे. या दोघांकडूनही ताईंचा साधेपणा, त्यांच्यामधील गृहिणी, घराण्याच्या परंपरेचा बुद्धिनिष्ठ स्वतंत्र विचार, संगतकारांना सन्मान देण्याचा स्वभाव… असं बरंच काही ऐकायला मिळालं. योगायोगानं भरतजींनी मला ‘छन्दोवती, पंडिता मालिनी राजूरकर गौरविका’ वाचायला दिली होती. वाचता वाचता ताईंविषयीचा आदर द्विगुणित झाला आणि ठरवलं आता लिहायचं : ‘मला भावलेल्या मालिनीताई!’ मालिनीताईंविषयी लिहिताना त्यांचे पती आणि गुरू पं. वसंतराव राजूरकरांविषयी लिहिणंही ओघानंच येतं. या दोघांचं सांगीतिक सहजीवन एखाद्या जोडरागासारखंच होतं.

प्रसिद्ध कलाकारांना मुलाखतीत जे प्रश्न विचारले जातात ते मालिनीताईंनाही विचारले गेले होते. उदाहरणार्थ, ‘गायिका होणं हे तुमचं स्वप्न होतं का? स्वतःमध्ये एक ‘परफॉर्मर’ आहे हे तुम्ही ओळखलं होतं का?’ या दोन्ही प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असंच त्यांनी दिलं होतं; तरीही त्या गायिका झाल्या – नव्हे विख्यात गायिका झाल्या. हे त्यांचं विधिलिखितच होतं. देश-परदेशांत त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. संगीतविश्वात त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.

मालिनीताई पूर्वाश्रमीच्या प्रभा वैद्य. वैद्य कुटुंब अजमेरचं. प्रभाताईंचे आई, वडील, काका  सारेजण संगीतप्रेमी. रोज संध्याकाळी घरात हौस म्हणून गाणंबजावणं चालत असे. साहजिकच प्रभाताई आणि त्यांच्या भावंडांवर संगीताचे संस्कार झाले. ही मुलं गाऊ लागली, हार्मोनियम, तबला ही वाद्यंही वाजवू लागली. प्रभाताईंना शाळेतही ‘गाणं’ हा अभ्यासाचा विषय होता. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर अजमेरच्या गायनशाळेत प्रभाताई जाऊ लागल्या. या गायनशाळेचे प्राचार्य होते पं.गोविंदराव राजूरकर. गोविंदराव हे पं.राजाभैय्या पूँछवाले यांचे शिष्य. या शाळेत दोन-तीन वर्षं प्रभाताईंचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांना ‘राजस्थान संगीत नाटक अकादमी’ची शिष्यवृत्ती मिळाली. अशा रितीनं गोविंदरावांकडे त्यांचं एकूण सहा वर्षं गायन-शिक्षण झालं.

त्यानंतरही आपण व्यावसायिक गायिका व्हावं असं त्यांना चुकूनही वाटलं नाही. प्रभाताईंचा आवडता विषय गणित. गणितात एम. एससी. करावं, संशोधन करावं, कॉलेजात प्रोफेसर व्हावं असं मात्र त्यांना मनापासून वाटत होतं. अजमेरच्या ‘सावित्री हायर सेकंडरी स्कूल’मध्ये त्यांनी गणित आणि संगीत हे दोन विषय शिकवले. ही नोकरी त्यांनी जेमतेम दोन-तीन वर्षंच केली.

१९६० च्या दरम्यान गोविंदरावांचे काही शिष्य ग्वाल्हेरला परीक्षेसाठी गेले होते. त्यात प्रभाताईही होत्या. त्या काळात पं. राजाभैय्या पूँछवाले हे ग्वाल्हेर संस्थानचे राजगायक होते आणि ग्वाल्हेर संगीत विद्यालयाचे प्राचार्यही होते. याच विद्यालयात वसंतराव राजूरकरांचं शिक्षण झालं होतं. प्रभाताई परीक्षेसाठी ग्वाल्हेरला आल्या असताना वसंतरावांनी प्रथमच त्यांचं गायन ऐकलं. त्यांच्या टप्पा गायनानं ते विशेष प्रभावित झाले आणि त्याच वेळेला ही मैफलीची गायिका होऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला. १९६१च्या सुमारास हैदराबादच्या म्युझिक कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारून ते हैदराबादेत स्थायिक झाले. त्यानंतरही आपल्या काकांना – गोविंदरावांना भेटायला ते अजमेरला येत असत. गोविंदरावांचं आणि वैद्यांचं घर जवळजवळ असल्यामुळे दोन्ही कुटुंबांत जाणं-येणं होतं, दाट परिचय होता. त्यातूनच सात जुलै १९६४ रोजी प्रभा वैद्य सौ. मालिनी वसंत राजूरकर झाल्या.

लग्नानंतर वसंतराव त्यांचे गुरू झाले. पुढलं बरंचसं शिक्षण वसंतरावांकडेच झालं. मालिनीताईंच्या गाण्यासाठी त्यांच्या मातोश्री आणि गुरू गोविंदराव या दोघांनीही खूप कष्ट घेतले होते. पुढे वसंतरावांच्या रेट्यामुळे आणि धाकामुळे त्या गायिका झाल्या. डॉ. श्रीराम लागू म्हणाले होते, “भारतातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी त्या एक आहेत असं मला निर्विवादपणे म्हणावंसं वाटतं. ‘गानसम्राज्ञी’ असं त्यांना म्हणावं एवढं त्यांचं गाणं श्रेष्ठ आहे; मात्र खंत अशी वाटते, की त्यांच्या गाण्याचं ‘मार्केटिंग’ जरा कमी पडलं. पंचवीस वर्षांपूर्वी एका खाजगी बैठकीत त्यांनी गायलेला ‘झूला’ मी विसरू शकत नाही.”

वसंतरावांनी स्वतः मात्र शिक्षकाची म्हणा किंवा गुरूची भूमिका मनोभावे स्वीकारली आणि निभावलीही. सर्वसाधारणपणे प्रत्येक गायकाला ‘परफॉर्मर’ व्हायचं असतं; परंतु सगळ्यांना ते जमतंच असं नाही. विद्वान गायकालाही मैफील जमवता येईल असं नाही. मैफलीत गाणं मांडता येणं – तेही रंजकतेनं – हा खरोखरच स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. वसंतरावांनी आपल्या पत्नीमधील ‘परफॉर्मर’ आधीच ओळखली होती. तिनं मैफलीची गायिका व्हावं हे खरंतर वसंतरावांचं स्वप्न होतं.

शेकडो वर्षांच्या पुरुष-प्रधान संस्कृतीत असं उदाहरण विरळाच! एरवी एकाच क्षेत्रातील पतिपत्नींमध्ये अधूनमधून ‘इगो’ उफाळून आल्याची अनेक उदाहरणं आपण बघत असतो. राजूरकरांच्या घरात मात्र अगदी उलट चित्र होतं – तेही पन्नास वर्षांपूर्वी! परंतु वसंतरावांना आणि स्वतः मालिनीताईंनाही आपल्या गाण्याचा पसारा एवढा वाढेल असं वाटलं नव्हतं… 

पूर्वार्ध…

 मालिनीताई यांनी गायलेला  खमाज टप्पा

या लेखाबरोबर मालिनीताईंच्या मैफलीचे दोन फोटो आणि गायनाचं ध्वनिमुद्रण हे  मंदार वैद्य यांनी त्यांच्या खाजगी संग्रहातून उपलब्ध करून दिलं आहे. त्याबद्दल त्यांचे ‘अंतर्नाद’च्या वतीनं आभार.

Author

Leave a Reply