The small wisdom is like water in a glass : clear, transparent, pure. The great wisdom is like the water in the sea : dark, mysterious, impenetrable –
शहाणीव ही ग्लासातल्या निवळशंख पाण्यासारखी असते; तर शहाणपण अथांग गूढ सागरासारखे –
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.
बंगाल आणि महाराष्ट्र यांच्यातील अनेक पदरी अनुबंधातील एक भरजरी पदर म्हणजे महाराष्ट्राचे गुरुदेवांवर आणि त्यांच्या साहित्यसृष्टीवर असणारे अतोनात प्रेम. पुलंमुळे हे प्रेम अधिकच बहरले. ‘वंगचित्रे’ हे पुललिखित पुस्तक ही त्याची आणखी एक फलश्रुती. गुरुदेवांच्या असंख्य कवितांपैकी काही कविता महाराष्ट्रात जन्माला आल्या आहेत . गुरुदेवांचे थोरले भाऊ सत्येंद्रनाथ ठाकूर हे इसवी सन १८८६ ते १८८७ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकालात जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या त्यांच्या शासकीय निवासात गुरुदेव आपल्या थोरल्या बंधुंसमवेत वास्तव्याला होते. रत्नागिरीतील हे न्यायाधीश निवास अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. समोर समुद्र दिसतो. या निळाईकडे नजर लावून गुरुदेव निसर्गाची व मानवी अस्तित्वाची कोडी शोधण्याचा प्रयत्न करत असावेत. कोर्टाच्या आवारात कविता जन्मावी हे तसे अक्रीतच; पण ते रत्नागिरीत घडले खरे! या ऐतिहासिक घटनाक्रमाची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारात नुकतेच अत्यंत देखणे आणि अभिरुचिपूर्ण असे रवींद्रनाथ टागोर स्मृती – भित्तिचित्र तयार करून त्याचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे हस्ते करण्यात आले. ऐतिहासिक स्मृती जपण्यात एकंदरीतच आपल्याकडे अनास्था असते; त्याला हा अत्यंत सन्माननीय व आनंददायी अपवाद म्हणावा लागेल.
या शिल्पनिर्मितीचाही स्वतःचा असा एक इतिहास आहे. इसवी सन २००९ साली कविवर्य टागोर यांच्या साहित्याचे अभ्यासक असलेले पुखराजजी बोरा हे रत्नागिरीला जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. त्यांना गुरुदेवांच्या रत्नागिरी न्यायालय परिसरातील वास्तव्याबद्दल आणि त्यांनी तेथे केलेल्या काव्यनिर्मिती व इतर लेखनाबाबत माहिती मिळाली. नोबेल पारितोषिक विजेत्या या महाकवीचे रत्नागिरीत उचित स्मारक व्हावे असे त्यांना वाटले. न्यायपालिका व राज्यशासन यांनी ही उत्तम संकल्पना प्रत्यक्षात आणली.
या वैशिष्ट्यपूर्ण शिल्पनिर्मितीखेरीज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला त्याचा स्वतःचा असा वेगळा इतिहास आहे. हे न्यायालय १८६७ साली स्थापन झाले. या कोर्टाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे : जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींच्या दालनात या न्यायालयात १८९५-१९०० व १९०४-१९१० या कालावधीत काम केलेल्या न्यायमूर्ती मंचरजी पेस्तनजी खारेघाट यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. अत्यंत सहृदय, दानशूर व ज्ञानी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या सन्मानार्थ जिल्हा न्यायालयाशेजारून जाणाऱ्या रस्त्याला ‘खारेघाट रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे. या न्यायालयाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मुख्य न्यायमूर्ती विराजमान झाल्यानंतर त्यांच्या आसनासमोर एक चांदीचा राजदंड मांडला जातो. अत्यंत मोजक्या न्यायालयांमध्ये ही परंपरा आहे. गुरुदेवांच्या रत्नागिरीतील वास्तव्याची दखल घेऊन ही स्मृती जतन करण्यासाठी न्यायपालिका प्रशासन, राज्यशासन, रत्नागिरी वकील संघ यांनी जे विशेष प्रयत्न केले त्यांचे हार्दिक अभिनंदन !

शहाणीव आणि शहाणपण यातील हा सूक्ष्म फरक माहिती नव्हता.
प्रसन्न दाभोलकर