मुंबई म्हणजे मूळ सात बेटांचा समूह आणि त्यांना वेढणारा समुद्र म्हणजे अरबी समुद्र. एक मुंबईकर या नात्याने साहजिकच अरबी हा शब्द चिरपरिचित. नरीमन पॉइंटवर फिरायला येणारे, पायघोळ झगा घातलेले अरबी प्रवासी लहानपणापासून पाहिले होते. पावसाळ्यात पाऊस बघायला ते मुंबईला येत! शेजारच्या मरीन ड्राइव्हवरील एखाद्या हॉटेलात मुक्काम करत कारण तेथील खोल्यांच्या खिडक्यांतून समोर धो धो कोसळणारा पाऊस आणि समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा अधिकच छान दिसत. मी बघितलेली पहिली परदेशी माणसे म्हणजे तेच अरब. माझ्या वाचनातूनही अरबस्तानशी ओळख झाली होती. लहानपणीच ‘अरेबियन नाईट्स’, सिंदबादच्या सफरी, अलीबाबा आणि चाळीस चोर, इसापच्या बोधकथा, अल्लादिन आणि त्याचा दिवा, उमदे अरबी घोडे, उंटांवर बसून वाळवंट ओलंडणारे अरबांचे तांडे या सगळ्यांनी भारावून गेलो होतो. इस्लामचा उदय इथलाच. पुढे लक्षात आले की आपले अनेक शब्दही मुळचे अरबी शब्द आहेत. उदाहरणार्थ, जबाबदारी, हजर, हाल, सही, सोबत, वकील, मुलुख, नजर, नक्कल, कैद, दहशत, तालीम, महसूल, खबर. आपल्याकडच्या मुसलमानी सत्ताधीशांची राज्यभाषा फारसी होती आणि त्यामुळे फारसीच्या माध्यमातून हे सारे शब्द मराठीतही स्थिरावले. उजवीकडून डावीकडे लिहीत जाण्याच्या त्यांच्या पद्धतीचेही कायम आश्चर्य वाटत असे. सत्तरच्या दशकात इथे तेल सापडल्यावर विकासाची गंगा वेगाने वाहू लागली; मोठेमोठे प्रोजेक्ट्स आकाराला येऊ लागले. अरबी स्थानिकांची लोकवस्ती अगदी कमी; तीही त्यावेळी अगदी कमी शिकलेली. साहजिकच भरपूर नोकऱ्या तिथे उपलब्ध होत्या. पगारही भारतापेक्षा पाच-सहापट. माझ्या वडलांच्या ओळखीचे अनेक मुसलमान कामगार त्या काळात मुंबईहून आखाती देशांत गेले. मुंबईला सुट्टीवर आले की ते बरोबर खजूर, परदेशी सेंटची एखादी बाटली किंवा तलम टेरेलिनचे कापड आमच्यासाठी भेट म्हणून घेऊन येत. या गोष्टी त्या काळात मुंबईत सहसा मिळत नसत व त्यांचे आम्हाला अप्रूप होते.
या साऱ्यामुळे अरबांविषयी साहजिकच भरपूर कुतूहल होते. अतिप्राचीन संस्कृती असलेल्या इराक आणि सिरियापासून सौदी अरेबिया आणि येमेनपर्यंत आज जगात बावीस अरब देश आहेत. त्यांची नाममात्र अरब लीगही आहे पण आपापसातील मतभेदांमुळे युरोपियन युनियनप्रमाणे त्यांच्यात एकसंधता मात्र कधीच निर्माण होऊ शकली नाही; त्यांची एक लॉबी अशी कुठे तयार होऊ शकलेली नाही. (इराण, तुर्कस्तान, अफगाणिस्तान हे देश काही जण समजतात तसे अरब देश नव्हेत. पाकिस्तान आणि बांगलादेश हेही मुस्लिम असले तरी इतर अरब देशांपासून अगदी वेगळे आहेत.) पुढे जगातील अनेक देशांत फिरायचा योग आला, पण का कोण जाणे कुठलाच अरबी देश मात्र मी कधी बघितला नव्हता. अगदी अलीकडे, सत्तरीचा उंबरठा ओलांडल्यानंतर, प्रथमच तो योग गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला. जेव्हा पत्नी वर्षा आणि मुलगी प्रियांका यांच्यासह मी मस्कतला भेट दिली. मस्कत ही ओमान देशाची राजधानी आणि ओमान हा जगातला अगदी पहिला शंभर टक्के अरबी देश. अशाच देशातून अरबी मुलखाशी प्रथम परिचय होणे हा एक सुखद योगायोग. त्या प्रवासातील काही क्षणचित्रे पुढे नोंदवत आहे.
मुंबईहून निघालेले आमचे ओमान एअर कंपनीचे विमान तसे छोटेच होते. अंतरही फार नव्हते. फक्त तीन तासांची फ्लाइट. मस्कत विमानतळ छोटा पण व्यवस्थित आखणी केलेला आहे. इमिग्रेशन, लगेज ताब्यात घेणे, सिक्युरिटी चेक वगैरे सोपस्कार पटापट पार पडले. गर्दी फारशी नव्हतीच आणि सगळा स्टाफदेखील तत्पर आणि सौजन्यशील होता. बाहेर पडल्यावर लगेचच अधिकृत स्टँडवर टॅक्सी मिळाली आणि संध्याकाळी सातच्या सुमारास म्हणजे अर्ध्या तासातच आम्ही अल खुवेर भागातील हिल्टन गार्डन इन या आमच्या हॉटेलात दाखल झालो. सगळी बुकिंग्स मुंबईहूनच केली होती.
मस्कतमध्ये सर्वप्रथम नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे तेथील वातावरणात जाणवणारी एक प्रकारची निवांत अशी ‘खुशहाली’. विमानतळ, आसपासचा परिसर, हॉटेलात जाताना दुतर्फा होणारे शहराचे दर्शन हे सगळेच तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या एखाद्या मध्यम आकाराच्या युरोपियन शहराची आठवण करून देणारे आहे. एकेकाळी सगळे अरबस्तान अतिशय मागासलेले, गरीब आणि आपापसात भांडणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेले होते. ‘लॉंरेन्स ऑफ अरेबिया’ चित्रपटात दाखवलेल्या थॉमस एडवर्ड लॉंरेन्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात त्यांच्यात अरब अस्मिता निर्माण केली. पुढे त्यांच्यातल्या लढाया आटोक्यात आल्या आणि त्यांची वेगवेगळी स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. त्यातल्याच एका राज्यात, सौदी अरेबियात, १९३८ साली एका अमेरिकन कंपनीने केलेल्या उत्खननात प्रथम तेल सापडले. नंतर इतरही अरब देशांत तेलाचे प्रचंड साठे सापडत गेले. जगभरातली पेट्रोलची वाढती भूक त्यातून भागू लागली. पुढे पाश्चात्य राष्ट्रे त्यांच्या जीवनशैलीसाठी अत्यावश्यक असलेले तेल अतिशय स्वस्तात विकत घेऊन आपले शोषण करत आहेत हे लक्षात आल्यावर १९७५ नंतर हे देश तेलाची किंमत झपाट्याने वाढवत गेले आणि त्यातून आखाती देशांत सोन्याचा धूर वाहू लागला. शेजारच्या अबू धाबी किंवा कुवेतएवढा नसला तरी ओमानमध्येही तेलाचा भरपूर साठा आहे; सत्तर टक्के राष्ट्रीय उत्पन्न तेलाच्या निर्यातीतून मिळते. सहा-सहा लेन्सचे रस्ते, आलिशान मोटारी, जगभरच्या महागड्या मालाने खच्चून भरलेली दुकाने! लोकवस्ती कमी असणे हेही समृद्धीचे एक कारण असावे. जगातील सर्व फॅशनेबल ब्रँड्स इथे मिळतात. ओमानशी फ्रान्सचे जुने आणि जवळचे व्यापारी संबंध आहेत, ओमानला येणाऱ्या युरोपियन प्रवाशांमध्ये सर्वाधिक प्रवासी फ्रेंच असतात आणि त्यामुळे कार्फुर ह्या प्रचंड फ्रेंच सुपरमार्केटची शाखा मस्कतमध्येही आहे. सगळेच इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने निर्माण केलेले असल्याने अत्याधुनिक आहे. विकासाच्या वाटेवर उशिरा प्रवास सुरू केल्याचा हा एक अनपेक्षित फायदा असतो; पूर्वसुरींच्या चुकांपासून शिकता येते आणि जे पूर्वसिद्ध आहे, सर्वोत्तम आहे त्याचाच आग्रह धरता येतो. अतिशय प्राचीन संस्कृती असूनही या देशात जुन्या वास्तू अशा फारच थोड्या आहेत आणि ज्या आहेत त्यांचेही नूतनीकरण करण्यात आलेले आहे.
ओमानची एकूण लोकवस्ती ४५ लाख आहे आणि त्यात मस्कतमध्ये राहणारे १७ लाख आहेत. यात स्थानिक अरबी जेमतेम वीस टक्के असतील. बाकी सगळे इतर देशांतून नोकरीसाठी इथे आलेले. ओमानमध्ये ज्याच्याशी माझे पहिले संभाषण झाले तो बांगलादेशीच होता. आमचे सामान खोलीत नेणारा हॉटेलमधला एक बेलबॉय. दुसऱ्या दिवशी त्याच्याशी बोलताना थोडी अधिक माहिती मिळाली. मला मोडकीतोडकी येणारी दोन-चार बंगाली वाक्ये मी उच्चारल्यामुळे कदाचित तो थोडा खुलला होता! त्याचा रोजचा पगार पाच ओमानी रिआल होता. एक ओमानी रिआल म्हणजे आपले साधारण सव्वादोनशे रुपये. साहजिकच आम्ही दिलेल्या एक रिआल टीपवर तो खुश होता. त्याच्या म्हणण्यानुसार बांगलादेशी मजूर मोठ्या प्रमाणावर ओमानमध्ये राहतात. बांगलादेशी लोकांना दुबईचा व्हिसा मिळणे कठीण असते; त्याची कारणे मात्र त्याला ठाऊक नव्हती; पण त्यामुळे बांगलादेशी मजुरांचा ओढा ओमानकडे असतो. शहरापासून लांब असलेल्या एका भाड्याच्या खोलीत तो इतर आठ-दहा बांगलादेशी कामगारांबरोबर गचडी करून राहत होता. एका वेळचे जेवण हॉटेलात मिळे. या देशात इतर आखाती देशांप्रमाणेच अनेक गरीब देशांतून कामगार मजूर येतात, भरपूर कष्ट करतात, खूप काटकसरीने राहतात; पण इथे टॅक्स नाही आणि त्यामुळे दरमहा ते बऱ्यापैकी पैसे मायदेशी पाठवू शकतात. त्यांच्या स्वतःच्या देशात त्यांना इतका पगार मिळायची काहीच शक्यता नसते. एकीकडे रस्त्यावर दिसणारी समृद्धी आणि दुसरीकडे यथातथाच दिवस काढणारे ऐंशी टक्के परदेशी कामगार यांच्यातील विरोधाभास हे माझ्या मनावर कोरले गेलेले एक चित्र. अर्थात हे चित्र केवळ ओमानमधील विषमतेचे नसून एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले गरीब देश आणि श्रीमंत देश यांच्यातील विषमतेचे हे चित्र आहे.
दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलेल्या दोन वास्तू म्हणजे आधुनिक ओमानच्या वैभवाची प्रतीके आणि राजधानी मस्कतचे मानबिंदू मानता येतील. सर्वच प्रवासी कंपन्यांच्या आयटिनररीत या वास्तू सर्वोच्च स्थानी होत्या. पहिली वास्तू म्हणजे सुलतान क्वाबूस ग्रँड मॉस्क म्हणजेच शाही मशीद. ऐसपैस पार्किंग. त्याच्या चारी बाजूंना विस्तीर्ण हिरवळ; पण दुकानेवगैरे अजिबात नाहीत. कुठल्याच प्रकारची कमर्शियल अॅक्टिविटी नाही. वास्तूचे पावित्र्य कटाक्षाने जपलेले. सकाळी अकरापर्यंतच ही मशीद उघडी असते आणि कुठल्याही धर्माचे प्रवासी मोफत आत येऊ शकतात. प्रवाशांना मार्गदर्शन करायला जागोजागी तत्पर आणि हसतमुख स्टाफ. नावाप्रमाणेच ही मशीद भव्य आहे. आठ-दहा हजार माणसे सहज मावतील इतकी मोठी. संपूर्ण संगमरवरात बांधलेली. जागोजागी सुंदर रंगीत कोरीवकाम. पादत्राणे ठेवण्यासाठी बाहेर मोठे स्टँड होते. दिवसभरात ठरलेल्या पाच वेळांना नमाजपठन करायला येणाऱ्यांना बसता यावे म्हणून मऊ गालिचे अंथरलेले. इथे महिलांनाही प्रवेश आहे. पण पायाच्या घोट्यापासून हाताच्या मनगटापर्यंत सर्व शरीर झाकणे अत्यावश्यक आहे. अर्थात पुरुषांनाही शरीर उघडे टाकणारे कपडे घालता येत नाहीत. मुख्य मशिदीच्या बाहेर आल्यावर मात्र तेवढे बंधन नाही. मशिदीच्या आत पूर्ण शांतता आणि गंभीर वातावरण. आम्ही गेलो तेव्हा अर्थातच नमाजपठन करणारे कोणी नव्हते. गर्दी होती ती सगळी प्रवाशांची. तीही अगदी शिस्तबद्ध. जराही गोंधळ, गडबड नव्हती. त्यातही बहुतेक सगळे युरोपियन प्रवासी होते. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही सोडल्यास अन्य भारतीय प्रवासी जवळजवळ कोणीच नव्हते. भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर दुबईला जातात पण त्यांतले फारच थोडे ओमानला जातात; आणि जे जातात तेही केवळ नोकरीसाठी म्हणून.
शाही मशिदीच्या शेजारीच आहे रॉयल ऑपेरा हाऊस. तेही असेच भव्य. इथे तीन रिआल प्रवेश फी आहे; पण त्यात गाईडचाही समावेश होता. हे थेटर सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आहे. आतील खुर्च्या, रंगमंच, साऊंड सिस्टिम, लायटिंग, वेगवेगळी प्रशस्त लाउंजेस, प्रसाधनगृहे, जागोजागी बसायला सोफासेट्स. जगभरातील नावाजलेले तंत्रज्ञ बोलावून हे सारे बांधलेले आहे. इथला अनेक रंगांतला संगमरवर इटलीहून आणला, बारीकबारीक नक्षीकाम केलेले मऊ गालिचे इराणवरून आणले, झुंबरे बेल्जियमहून आणली, तांत्रिक उपकरणे जर्मनीतून आणली, ऑर्गनसारखी वाद्ये फ्रान्सहून आणली वगैरे सगळी माहिती स्थानिक तरुण अरेबिक गाईड अभिमानाने देत होता. त्याचे कपडे पारंपरिक अरेबिक होते पण त्याचे इंग्रजीवर चांगलेच प्रभुत्व होते. एरव्ही इथे अरेबिक हीच भाषा सर्वत्र वापरात आहे. उच्चारांच्या ढबीवरून तो परदेशात शिकून आला होता हे जाणवत होते. जगभरातील अनेक नामांकित कलाकार आपापले शो सादर करण्यासाठी इथे येत असतात हेही त्याने आवर्जून सांगितले. इथल्या सगळ्याच सुखसोयी डोळे दिपवणाऱ्या होत्या यात शंकाच नाही पण त्यांचा वापर करणारे किती स्थानिक कलावंत या देशात असतील, ऑपेरा किंवा बॅलेसारखे सोफिस्टिकेटेड कार्यक्रम इथे किती होत असतील याची मला शंकाच वाटत होती. आर्थिक समृद्धीबरोबर सांस्कृतिक समृद्धी येतेच असे नाही. इथल्या सर्वच भिंतींवर सुंदर फ्रेम केलेली चित्रे होती पण इस्लामी परंपरेनुसार ती माणसांची नव्हती तर फक्त निसर्ग आणि वेलबुट्टी (पॅटर्न्स) यांचीच होती.
सुलतानाचा अल आलम पॅलेस हा भव्य राजवाडादेखील आवर्जून बघावा असा आहे. तिथे सध्याचे सुलतान हैथम बिन तारीक राहत असल्याने आतील कक्षांत अर्थातच प्रवेश नव्हता पण आसपासचा परिसर बघता आला. एक विशेष म्हणजे हा राजवाडा शापूरजी पालनजी या भारतातील विख्यात कंपनीने बांधलेला आहे. इथली अनेक मोठी सार्वजनिक बांधकामे त्यांनी केलेली आहेत. अनेक कर्तबगार भारतीय कंपन्यांना भारतातील टेंडर सिस्टिम आणि त्यातील भ्रष्टाचार यांच्यामुळे भारतात सार्वजनिक बांधकामे करण्यात फारसा रस नसतो, पण इतर अनेक देशांत त्यांना त्यांचा अपेक्षित तो दर मिळाल्यामुळे ते उत्तम बांधकाम करत असतात. राजवाड्याच्या जवळच असलेल्या दोन टेकड्यांवर पोर्तुगीजांनी बांधलेले अल मिरानी आणि अल जलाली हे दोन मोडकळीला आलेले किल्ले आहेत. समुद्रातून जाणाऱ्या पोर्तुगीज व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे हा त्यांचा उद्देश असावा. ओमानवर दीडशे वर्षे पोर्तुगीजांचे राज्य होते. १८ नोव्हेंबर १६५० साली ओमानच्या सुलतानाने पोर्तुगीजांचा पराभव करून देश स्वतंत्र केला. हा त्यांचा स्वातंत्र्यदिन. एक योगायोग म्हणजे १९७० ते २०२० अशी सलग पन्नास वर्षे ज्यांनी ओमानवर राज्य केले आणि जे ओमानचे भाग्यविधाते मानले जातात त्या सुलतान क्वाबूस यांचा वाढदिवस दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी असतो. त्यामुळे हे दोन्ही दिवस ओमानमध्ये सार्वजनिक सुट्टी असते आणि मोठ्या थाटात ते साजरे केले जातात. आम्ही तिथे होतो तेव्हा त्या सोहळ्याची पूर्वतयारी सुरू झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा कोपऱ्याकोपऱ्यावर ओमानचा ध्वज उभारलेला दिसत होता; जागोजागी रोषणाई केली होती. ओमानमधील अनेक महत्त्वाच्या वास्तूंना सुलतान क्वाबूस यांचे नाव दिलेले आहे. एक देश म्हणून ओमान आणि इथली संस्कृती खूप प्राचीन असली तरी एक आधुनिक राष्ट्र म्हणून ओमानची स्थापना १९५१ साली झाली. सुलतान क्वाबूस एकेकाळी पुण्यात शिकायला होते आणि त्यावेळी शंकर दयाळ शर्मा हे त्यांना शिकवायला होते; जे पुढे राष्ट्रपती बनले. राष्ट्रपती बनल्यानंतर शर्मा यांनी ओमानला अधिकृत भेट दिली होती आणि त्यावेळी त्यांचे सुलतान क्वाबूस यांनी अतिशय थाटात स्वागत केले होते. सुलतान क्वाबूस यांचे वडीलही अजमेरच्या मेयो कॉलेजात शिकायला होते. त्यामुळे साहजिकच भारताविषयी ओमानला विशेष आत्मीयता आहे. शंभर टक्के मुस्लिम देश असूनही इथे हिंदूंना आदराने वागवले जाते. सुमारे पाच लाख भारतीय इथे नोकरीला आहेत.
राजवाड्याच्या जवळच असलेले कॉर्निश (म्हणजे समुद्रकिनारा) हेही प्रवाशांच्या आवडीचे ठिकाण वाटले. कारण तिथे बरीच गर्दी दिसली. त्याच किनाऱ्यालगत सुलतानाची आलिशान यॉट नांगरलेली होती. मस्कत उत्तम बंदर असल्याने खोल समुद्रात फिरणारी जहाजेही इथे येऊ शकतात. इथे सतत युरोपियन क्रूझ येत असतात. त्यांच्या पंधरावीस दिवसांच्या पाच-सहा देशांतून फिरणाऱ्या सफरी असतात आणि त्या दरम्यान मस्कतमध्येही त्यांचा दोन दिवस मुक्काम असतो. एकेका क्रूझवर तीन-चार हजार प्रवासी सहज असतात. एकूणच मस्कत युरोपियन प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. येथील स्थानिक बायका अर्थातच कायम बुरखे घालत होत्या पण इतर प्रवाशांवर तसे काहीच बंधन नव्हते. त्यांचे कपडे कुठल्याही आधुनिक पर्यटनस्थळी आढळतात तसेच होते. काही निर्बंध अर्थातच पाळावे लागतात. उदाहरणार्थ, इथे स्त्री-पुरुष दोघांनाही पोहोताना शॉर्ट्स घालणे आवश्यक आहे. सार्वजनिक जागी शारीरिक जवळीक करता येत नाही. तसेच इथे शरिया कायदा असल्याने मद्य फक्त हॉटेलात किंवा परवानाधारकांना मिळू शकते.
येथील दीड-दोनशे वर्षे जुने ‘मात्रा सुक’ एकदा बघण्यासारखे आहे. सुक म्हणजे अरेबिक भाषेत पारंपरिक बाजार. मात्रा हे त्या परिसराचे नाव. इथे परदेशी प्रवासी जवळपास नव्हतेच पण स्थानिक रहिवाश्यांची खूप झुंबड उडाली होती. अर्थात स्थानिक रहिवासी म्हटले तरी ते नोकरीनिमित्त अनेक देशांतून आलेले असतात. इथे वेगवेगळ्या दिशांनी जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना चिकटून चिकटून असंख्य छोटी छोटी दुकाने. बारीकसारीक कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, स्वस्त दागिने वगैरे विकणारी. काहीशी आपल्या पुण्यातील तुळशी बागेसारखी; पण बाजाराचा एकूण आकार त्याच्या कैकपट मोठा. आतले रस्ते छोट्याछोट्या दगडांनी तयार केलेले; अगदी पूर्वी होते तसेच ते कायम ठेवले आहेत. मला इथे फिरताना इस्तंबूलची आठवण झाली; तेथील ग्रँड बझार असाच आहे. जवळजवळ दोन तास आम्ही इथे भटकत होतो. एक विशेष म्हणजे इथे एक ‘काश्मिर शॉप’देखील होते. जसे आपल्या देशातही कानाकोपऱ्यात आढळते. सुबक शाली, ड्रेसेस, देवदाराच्या वस्तू वगैरे विकणारे. चालूनचालून दमल्यावर बसण्यासाठी जागोजागी बाकेही होती. काही जण बरीच खरेदी करत होते आणि त्यांच्याजवळचे जड सामान उचलून नेण्यासाठी चाकांच्या गाड्या घेऊन अनेक हमाल इकडेतिकडे फिरत होते. बाजारात सफाई करणारेही बरेच मजूर दिसले. जराही काही कचरा, कागदाचा बोळा जमिनीवर पडलेला दिसला तर तो लगेच त्यांच्या हातातल्या काठीने उचलला जाई. त्यामुळे सगळ्या गल्ल्या चिंचोळ्या आणि गजबजलेल्या असूनही बऱ्यापैकी स्वच्छ होत्या.
याच मात्रा सुकमध्ये एक दुकानावर ‘द्वारकादास’ असे नाव दिसले. कुतुहलाने त्या दुकानदाराशी थोड्या गप्पा मारल्या. ओमानमधील खिमजी रामदास या एका विख्यात कच्छी व्यापारी कुटुंबाच्या मालकीचे ते दुकान होते. ठाकरसी या आडनावाने हे कुटुंब पुढे भारतात अधिक प्रसिद्ध झाले. गुजरातच्या कच्छमधील व्यापारी हे भारतातून व्यापारासाठी परदेशी जाणारे पहिले. त्यांच्या या परदेशी व्यापाराची सुरुवात ओमानपासूनच झाली. त्यांच्यातले एक अगदी सुरुवातीचे म्हणजे रामदास खिमजी (ठाकरसी). कच्छमधल्या मांडवी बंदरातील एक वैष्णव व्यापारी. १८७० सालापासून त्यांनी ओमानबरोबर व्यापार सुरू केला. भारतातून ते धान्य, मसाले आणि कापड जहाजातून इकडे आणत आणि परतताना येथील धूप (frankincense) भारतात नेत. उदबत्त्या आणि सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठी त्याला इतर जगाप्रमाणे भारतातही प्रचंड मागणी होती. धूपाप्रमाणेच येथील खजूर आणि चुनखडीदेखील ते भारतात नेऊन विकत आणि त्यांनाही खूप मागणी होती. खिमजी रामदास स्वतः मांडवीमध्ये जहाजबांधणीचा व्यवसाय करत पण ओमानी लोक जहाज बांधण्याच्या कलेत त्यांच्याहूनही अधिक निपुण होते आणि त्यांच्याकडूनही या कलेतील काही गोष्टी खिमजी रामदास शिकले. ओमानी लोक भारतातील जहाज यायची अगदी आतुरतेने वाट बघत असत कारण त्यानंतरच त्यांना वेगवेगळ्या खाण्यासाठी लागणाऱ्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत असत; ज्या त्याकाळी ओमानमध्ये दुर्मिळ होत्या. त्यामुळे असलेले व्यापाराचे महत्त्व पटलेल्या ओमानी सुलतानाने त्यांना उदार आश्रय दिला. पुढे त्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबार या बेटावरही आपली मोठी पेढी सुरू केली. झांजिबार हे पूर्वीपासून लवंगा, दालचिनी, जायफळ आणि मिरी या मसाल्यांच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध होते. ‘स्पाइस आयलंड’ म्हणूनच ओळखले जाणारे झांजिबार त्यावेळी ओमानच्याच अधिपत्याखाली होते. मांडवी-मस्कत-झांजिबार असा एक व्यापारी त्रिकोणच तयार झाला. ‘पेडगावचे शहाणे’ या राजा परांजपे आणि शरद तळवलकर यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘दुनिया वेड्यांचा बाजार…. झांजिबार झांजिबार झांजिबार’ हे नाचासोबत गायलेले विनोदी गाणे आजही काही प्रेक्षकांना आठवत असेल. पुढे झांजिबार सध्याच्या टांझानियामध्ये समाविष्ट झाले. रामदास खिमजी (ठाकरसी) यांचा नातू म्हणजे खिमजी रामदास (आजोबांचेच नाव असलेला). त्याची आद्याक्षरे असलेला ‘केआर’ हा इथला सर्वांत मोठा ब्रॅंड आहे. जवळजवळ चारशे नामांकित जागतिक ब्रँड्स ते विकतात. या उद्योगसमूहाच्या ४० उपकंपन्या असून ओमानमधील त्यांच्या दीडशे दुकानांत पाच हजार कर्मचारी काम करतात. खिमजी कुटुंब कट्टर हिंदू वैष्णव असून पूर्ण शाकाहारी आहे. कनकसी हे या कुटुंबाचे सध्याचे प्रमुख. त्यांना ओमानचे सन्माननीय नागरिकत्व आणि विशेष म्हणजे शेख ही उपाधी येथील सुलतानाने दिली आहे. जगातील हे एकमेव हिंदू शेख असावेत! तेल सापडण्यापूर्वीच्या काळात खिमजी कुटुंब खूपदा सुलतानाला कर्जही देत असत. या कुटुंबाला सुलतानाच्या राजवाड्यात मुक्तद्वार आहे. साध्या कपड्यांत आणि फारसे सोपस्कार न पाळता ते सुलतानाला भेटू शकतात. अगदी प्रतिष्ठित ओमानी नागरिकांनाही तो सन्मान नाही. आश्चर्य म्हणजे या खिमजी कुटुंबातील मालविका या एका मुलीने सुलतानाच्या एका नातेवाइकाशी प्रेमविवाह केला आहे सध्या ती समूहाची एक संचालिका आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी याच खिमजी कुटुंबाने १९२५ साली बांधलेले शंकराचे आणि हनुमानाचे मंदिर बघायला गेलो. मस्कतच्या जुन्या गावठाणासारख्या भागात ते आहे. आकाराने फारसे मोठे नाही पण त्या काळातील मस्कतच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. या परिसरात पूर्वीपासून मस्कतमध्ये राहणाऱ्या भारतीयांची वस्ती आहे. मागे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानला भेट दिली तेव्हा ते आवर्जून इथे दर्शनाला आणि आरतीला आले होते. रोज साधारण तीन-चारशे हिंदू देवळात येतात. इथल्या एका दुकानात शंकराला वाहायला दूध, हनुमानाला वाहायला तेल, फुले आणि प्रसादासाठी पेढे विकत मिळतात; पण इतर काहीही विकले जात नाही. अतिशय शांत, स्वच्छ परिसर. इथे येणाऱ्या भविकांमध्ये केरळचे सर्वाधिक. कारण इथे काम करणारे बहुसंख्य मजूर केरळचेच आहेत. कच्छी आणि गुजराती समाजही आहे पण तो मुख्यतः व्यापारात. त्यांची संख्या तुलनेने कमी. इतरही प्रांतांतले भक्त येतच असतात. सगळी व्यवस्था पाहायला मंदिरात आठ-दहा जण कामाला आहेत; त्यांत तीन पुजारीही आहेत. घंटानाद, साष्टांग नमस्कार, मूर्तींना अभिषेक करणे, पूजाअर्चा, मंत्र म्हणणे, प्रार्थना, आरत्या, प्रसाद घेणे वगैरे सर्व प्रथा थोड्याफार फरकाने भारतात असतात तशाच. धक्काबुक्की, बोलण्याचा गोंगाट, गोंधळ मात्र अजिबात नाही. जगभर कुठेही गेले तरी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या आणि वेगवेगळ्या जातींच्या सर्वच स्थानिक भारतीयांना एकत्र आणणारा मंदिर हा एक महत्त्वाचा घटक आहे हे अशावेळी प्रकर्षाने जाणवते.
पुण्यातील एक सरदेशपांडे नावाचे कुटुंब (नाव बदललेले आहे) मस्कतमध्ये राहते. पती, पत्नी आणि एक मुलगा. त्यांचे पुण्यातही घर आहे पण गेली चाळीस वर्षे ते मस्कतमध्येच राहत आहेत. पुण्याला त्यांची वर्षातून फक्त एखादी चक्कर असते. मस्कतमध्येच त्यांना इंजिनियर म्हणून सरकारी नोकरी मिळाली होती. आता ते निवृत्त झाले आहेत, पण विशेष म्हणजे निवृत्त झाल्यानंतरही त्यांना मस्कतमध्ये राहायची सुलतानाने परवानगी दिली आहे. हे तसे खूप दुर्मिळ आहे. अंतर्नादच्या व्याकरण-सल्लागार यास्मिन शेख यांचे धाकटे जावई डॉ. श्याम बावीकर हेही पंचवीस-तीस वर्षे इथे सरकारी रुग्णालयात नोकरी करत होते पण निवृत्तीनंतर ते पुण्याला परतले होते त्याची आठवण झाली. एका रात्री सरदेशपांडेंकडे जेवायला जायचा योग आला आणि त्यानिमित्ताने ओमानी जीवनाबद्दल बरेच काही ऐकायलाही मिळाले. ते सांगत होते, या देशातील बहुतेक जमीन म्हणजे वाळवंट असूनही पाण्याची टंचाई अशी कुठेच जाणवत नाही. पण पिण्यासाठी मात्र सगळीकडे बाटलीतले पाणी वापरावे लागते. इथला उन्हाळा इतर अरब देशांइतका कडक नसतो पण पाऊस वर्षाला जेमतेम तीन-चार इंचच पडतो. त्यामुळे किनाऱ्यालगतचा आणि जिथे झऱ्यांचे पाणी उपलब्ध आहे तसा इतर थोडा भाग सोडला तर शेतीवाडी अशी फारशी नाही. सलालाह आणि धोफार या परिसरात मात्र भाजीपाला आणि फळे यांची मोठ्या प्रमाणावर आणि विशेष म्हणजे सेंद्रिय (ऑर्गनिक) पद्धतीने उपज होते. त्यांना युरोपमध्ये मोठी मागणी आहे. तेलावरचे अवलंबित्व कमी करायचे म्हणून अशा शेतीला सुलतानातर्फे खूप उत्तेजन दिले जाते. तेथील निसर्गसौंदर्यही अप्रतिम आहे. साधारण हमुस आणि पिटा ब्रेड आणि त्याच्यासोबत चटणीसारखे खायचे हमुस हे अन्य अरब देशांप्रमाणे इथलेही सर्वांत लोकप्रिय खाद्य. इथला खजूर जगभर प्रसिद्ध आहे पण आपल्यासारखे इथे खजुराचे फक्त तीनचार प्रकार नसून दहा-बारा प्रकारचा, वेगवेगळ्या चवीचा खजूर इथे मिळतो. अनेक भारतीय इथे नोकरीनिमित्त राहत असल्याने बहुतेक सगळे भारतीय पदार्थही इथल्या बाजारात मिळू शकतात.
तेलामुळे आलेल्या पैशातून सुलतानाने सर्व सुविधा स्थानिक लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. शालेय शिक्षण मोफत आहे पण उच्चशिक्षण घेण्याकडे बहुतेकांचा कल नाही. अधिक श्रीमंत व्हायची स्पर्धाही इथल्या लोकांत फारशी नाही. इथेही एक मराठी मंडळ आहे पण सरदेशपांडेंच्या मते ते फारसे क्रियाशील नाही. कारण या देशात दीर्घकाळ वास्तव्य करणारे अगदी कमीच असतात. इथे राहणे म्हणजे फक्त नोकरीपुरते. अर्थात सोशल डिस्टन्सिंग पाळायची आपली सवय हा केवळ करोनाचा परिणाम नाही! भारताप्रमाणेच इथे अनेक जण पाकिस्तानातून आलेले आहेत पण हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाक वैरभाव इथे अजिबात नाही. अगदी क्रिकेट मॅचच्या वेळीही नाही! एकूणच स्थानिक अरबी लोकांना भारताबद्दल आदर आहे. इथे सगळेच पुरुष पायघोळ झगे घालतात, सगळ्याच स्त्रिया घराबाहेर वावरताना बुरखा घालतात. पण सरदेशपांडे यांच्या मते बायकांनादेखील तो पोशाख चालतो, किंबहुना आवडतो. त्यांच्याकडून या पोषाखाला जराही विरोध होताना दिसत नाही. कदाचित हा सवयीचा परिणाम असावा. त्यांचा पोशाख आधुनिक नसला तरी इतर बाबतीत आधुनिकता आहे, सौंदर्यप्रसाधनांचा वापरही त्या भरपूर करतात. म्हणूनच महागडी फ्रेंच किंवा इटालियन सौंदर्यप्रसाधने मस्कतमध्ये उपलब्ध आहेत. इथले कायदे अतिशय कडक आहेत आणि अंमलबजावणीही तितकीच कठोर. रस्त्यांवर पोलीसही फारसे दिसत नाहीत. पण जवळजवळ पूर्ण रिकामे रस्ते असतील तेव्हाही सिग्नल कटाक्षाने पाळले जातात. सगळीकडे कॅमेरे लावलेले असतात; तुमचा पहिलाच ट्रॅफिक गुन्हा असेल तर पाचशे रिआल (सुमारे अकरा हजार रुपये) दंड, दुसरा गुन्हा असेल तर तो दंड अधिक एक दिवस तुरुंगवास आणि तिसरा गुन्हा असेल तर तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द! मध्येच कोणी रस्ता ओलांडायला पुढे झाले तर आवर्जून मोटर थांबवली जाते. हे युरोपमध्ये आढळते याचे आपण खूप कौतुक करतो पण हीच शिस्त या अरब देशातही कटाक्षाने पाळली जाते. स्त्रियांना कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचे प्रमाण तर जवळपास शून्य आहे. अगदी गर्दीच्या ठिकाणी किंवा रात्री उशिराही स्त्रियांना अगदी सुरक्षित वाटते. त्यांनी कधी तक्रार केली तर समोरच्याची काहीच धडगत नाही! पण एकूणच ओमानमध्ये गुन्हेगारी खूप कमी आहे. एक विशेष नोंदवावी अशी बाब म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वेबसाइटनुसार ओमान हा आज जगातील सर्वाधिक सुरक्षित देश आहे!
सरदेशपांडेंकडील जेवण आटोपल्यावर आम्ही सगळे रात्री जवळच असलेल्या कुर्रम बीचवर फिरायला गेलो. कुर्रम हा शहरातला उच्चभ्रू भाग आणि इथल्या लोकांची ही चौपाटी. समोरची पुळणी नजर पोचेल तेवढी पसरलेली पण आपल्या मानाने गर्दी काहीच नाही. समोर पसरलेला अफाट अरबी समुद्र आणि वर अत्यंत निरभ्र आकाश. ढग अजिबात नाहीत. एक चंद्रकोर तेवढी आकाशाचा एक तुकडा उजळत होती. लांबवर दिसत असणारे जहाजांचे दिवे सोडले तर सगळे क्षितिज अंधारलेले. इस्लामचा जन्मच अरबी वाळवंटातला आणि त्यामुळे इस्लामच्या अनुयायांना चंद्राचे इतके आकर्षण का आहे हे अशावेळी कळते. इथे फिरताना घडलेला एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. एक तरुण जोडपे शेजारूनच चालले होते. आपापसात ते मराठीत काहीतरी बोलत होते. ते कानावर पडल्याने कुतुहलाने मी सहज चौकशी केली. वाटेत थांबून ते बोलू लागले. दोघेही कोल्हापूरचे होते. तेथील एका मोठ्या आइसक्रीम कंपनीत त्याला नोकरी मिळाली होती आणि त्याची बायको इथेच नर्स म्हणून नोकरीला होती. अलीकडेच ते इथे आले होते पण पुढची चार वर्षे इथेच राहणार होते. जेमतेम पाच-दहा मिनिटे आमच्या गप्पा झाल्या असतील; त्यानंतर ते त्यांच्या रस्त्याने पुढे निघून गेले, पण तेवढ्या गप्पा मारतानाही खूप छान वाटले. समान भाषा अपरिचित माणसांनाही पटकन कशी जोडते याचा तो पुन्हा एकदा आलेला प्रत्यय होता.
किनाऱ्याच्या कडेकडेला गप्पा मारत फुटपाथवर बसलेले स्थानिक पुरूषांचे घोळके दिसत होते. गरमीच्या दिवसांत इथला मोकळा वारा लोकांना हवाहवासा वाटत असावा. पण नवल म्हणजे त्यात बायका मात्र मुळीच नव्हत्या. हा अर्थातच धर्माने लादलेल्या रुढींचा प्रभाव होता. पण एरव्ही मस्कतमध्ये फिरताना आम्हाला धर्माचे अवडंबर माजवले आहे असे कुठेही दिसले नाही. मुल्ला-मौलवीही कुठे दिसत नव्हते. मशिदीही फारशा दिसत नाहीत. एकूणच इथे धर्माचे सार्वजनिक प्रदर्शन नाही. इस्लामचे इथले रूप भारतातील किंवा आपल्या कल्पनेतील इस्लामपेक्षा खूपच सौम्य वाटले. इथले बहुसंख्य लोक इबादी मुसलमान आहेत; सुन्नी किंवा शिया मुसलमानांइतके ते कडवे नाहीत. शिवाय सुलतानाने बहुधा धर्मसत्तेवर कडक नियंत्रण ठेवले आहे. सरदेशपांडे यांच्या मते इथे लोकशाही नाही, सुलतानाची सत्ता आहे याचे अनेक फायदेही आहेत. त्यातला एक म्हणजे इथे मुल्ला-मौलवींची दंडेली नाही. उद्या राजेशाही संपली आणि लोकशाही स्थापन झाली तर लोकांच्या नावाने धर्मांध शक्तींच्या हातीच सगळी सत्ता जायची दाट शक्यता आहे. सिरिया किंवा इराक येथे तसेच घडले आहे आणि तसे इतर अरब राज्यांतही झाले तर एकूण अरबी समाज बराच मागे फेकला जाईल. आपण नेहमी लोकशाहीचे खूप कौतुक करतो पण इथे मात्र लोकशाहीपेक्षा सुलतानाची राजवटच श्रेयस्कर असावी. निदान सध्याच्या परिस्थितीततरी. आपली बहुसंख्य प्रजा इस्लामवर संपूर्ण श्रद्धा असलेली आहे याची सुलतानाला पुरती जाणीव आहे आणि त्यामुळेच आधुनिकतेकडे नेणारी काही धोरणे अंमलात आणतानाही लोकांच्या धार्मिक भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी तो घेतो. वाढत्या टुरिझममुळे आणि टीव्हीमुळे आज जगात इतरत्र काय चालले आहे ते सगळ्यांना कळतच असते; पण मस्कतचे धार्मिक स्वरूप सुलतान आणि त्याच्या वतीने राज्य चालवणारा अधिकारीवर्ग जपत असतो. अत्याधुनिक उपकरणे आणि बँकिंगसारखी आर्थिक रचना इथे सगळीकडे दिसते, त्या बाबतीत ओमान पाश्चात्त्य जगाच्या फारसे मागे नाही; परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अजून इथे खूप बदल व्हायचे बाकी आहेत. पोशाख हे त्याचे पटकन नजरेत भरणारे प्रतीक मानता येईल. सर्वच अरब देशांमध्ये हा प्रकार दिसतो. अजून काही वर्षांनी कदाचित इथली परिस्थिती आणि बहुसंख्य लोकांची मानसिकता बदलेल आणि त्यानंतर मग लोकशाही आणण्याचा मार्ग मोकळा होईल असे म्हणता येईल.
सरदेशपांडेंप्रमाणे आम्हाला तिथे भेटलेल्या आणखी एका व्यक्तीबद्दल इथे लिहावेसे वाटते. एअरपोर्टवरून हॉटेलात जाताना आम्ही सरकारी टॅक्सीतून प्रवास केला होता; त्यांच्या मीटरनुसार जे होईल तेवढेच भाडे त्यांना द्यावे लागे. पण एरव्ही मस्कतमध्ये फिरण्यासाठी त्या टॅक्सीज् मिळत नसत. त्यासाठी आम्ही एक वेगळा टॅक्सीवाला ठरवला होता. त्याच्याबरोबर प्रत्येक ठिकाणासाठी वेगळा दर निश्चित करावा लागे. त्यासाठी हॉटेल स्टाफचा आगाऊ सल्ला घ्यावा लागे. पण या बाबतीत आमचा टॅक्सीवाला फारसा लोभी नव्हता असे आमचे निरीक्षण होते. पुढच्या चार दिवसांत त्याच्याशी वरचेवर संवाद साधता आला. त्याचे नाव होते हैथम. इथल्या सध्याच्या सुलतानाप्रमाणे! पहिल्या फेरीतच आम्हाला तो आवडला. उंच, शिडशिडीत. इतर ओमानी लोकांप्रमाणे तोही कायम त्यांच्या पारंपरिक पोषाखात असे; पायघोळ पांढराशुभ्र झगा आणि मान झाकेल एवढे लांब डोक्यावर गुंडाळलेले कापड. इंग्रजी मोडकेतोडकेच येत होते पण बोलायला नम्र होता. वेळेचाही पक्का. आम्ही सांगू त्या वेळेला बरोबर हॉटेलसमोर किंवा ठरवलेल्या जागी हजर असे. सामान गाडीत ठेवायला आणि उतरवताना तो तत्परतेने आणि न सांगता हात देत असे. त्याचे ड्रायव्हिंगदेखील आम्हाला खूप सुरक्षित वाटले. इथल्या इतर सर्व मोटरींप्रमाणे त्याचीही टॅक्सी पॉश होती. हैथमने दिलेल्या माहितीनुसार मस्कतमधे फक्त स्थानिक ओमानी लोकच टॅक्सी चालवू शकतात. इतर कामे करायला परदेशी कामगार भरपूर आहेत पण हा एक व्यवसाय त्यांनी स्वतःकरिता राखून ठेवला आहे. आमच्याप्रमाणेच त्यालाही एकच मुलगी होती. तिचा मोबाइलवर सेव्ह केलेला फोटोही त्याने दाखवला. आठवड्याचे दोन दिवस तो फायर फायटर म्हणून सरकारी नोकरी करायचा आणि बाकीचे चार दिवस त्याची टॅक्सी चालवायचा. तो कितपत शिकलेला होता कोण जाणे, पण गुगल मॅपचा तसेच मोबाइलवरील इतर अॅप्सचा तो सराईतपणे वापर करत होता. एक विशेष गोष्ट म्हणजे तो पंधरा-सोळा वर्षांपूर्वी पुण्याला आला होता. त्याच्या खांद्याचे ऑपरेशन करुन घ्यायला. त्यावेळी मस्कतमध्ये सर्जरीची चांगली सोय नव्हती. माझ्या लहानपणीही औषधोपचार करून घेण्यासाठी अनेक अरब मुंबईला येत हे आठवत होते. आता अर्थातच ही परिस्थिती पालटली आहे. सगळ्या प्रकारची उत्तम वैद्यकीय सेवा मस्कतमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही जर ओमानी नागरिक असाल तर तुम्हाला ती फुकट मिळते. ड्रायव्हिंगच्या पलीकडे आम्हाला परिसराची माहितीही तो पुरवत होता. इथली कुठली मिठाई सगळ्यात चांगली असते आणि ती कुठे मिळेल याची आम्ही चौकशी केली तेव्हा एका-दोघांना फोन करून त्याने त्याच परिसरातील एक दुकान हुडकले. कुनाफा नावाची एक खास मिठाई आम्हाला तिथे मिळाली. साधारण फुलक्याचा आकार, खाली आणि वर अगदी बारीक अशा खरपूस भाजलेल्या शेवयांचा थर आणि मध्ये गोड मलई. अत्यंत रुचकर पदार्थ. शिवाय त्या दुकानदाराने आम्हाला अगदी गरमागरम कुनाफा तिथल्यातिथे बनवून दिला. नंतर पुण्यातही एक-दोन ठिकाणी मला कुनाफा खायला मिळाला पण मस्कतमधील त्या ताज्या कुनाफाची गोडी काही वेगळीच होती. येथील रबरासारखा चिवट, गोड, भरपूर सुकामेवा घातलेला हलवादेखील खूप प्रसिद्ध आहे. तो खाताना मला दादरच्या चंदू हलवाईची आठवण झाली; मुंबईत पूर्वी फक्त त्याच दुकानात तसा हलवा मिळत असे. “इथली तुला आवडेल ती मिठाई तूही घे. आमच्यातर्फे तुझ्या मुलीसाठी भेट म्हणून” असे त्याला म्हटल्यावर त्याने तिच्या आवडीचा म्हणून कुठलातरी केशर हलवा घेतला. आम्ही जायच्या दिवशी जेव्हा त्याने आम्हाला विमानतळावर सोडले त्यावेळी त्याने आमच्या हाती एक पॅकेट दिले. प्रियांकासाठी खाऊ म्हणून! रिटर्न गिफ्ट! यातून दिसणारा त्याचा आत्मसन्मान मला वेधक वाटला. त्या पॅकेटमध्ये चांगल्या प्रतीचा ओमानी खजूर होता आणि पुण्याला परतल्यावर ज्यांना ज्यांना आम्ही तो दिला त्यांना तो खूपच आवडला.
मस्कतमधल्या रस्त्यांवर दुकाने भरपूर आणि उत्तम होती पण गजबज अशी जराही नाही. युरोपप्रमाणेच अत्यंत शिस्तबद्ध वाहतूक. हॉर्न सहसा कधीच वाजवला जात नाही. लोकांचे बोलणेही हळू आवाजात. कोणालाही भेटताना ‘सलाम आलेकुम’ म्हणून अभिवादन करणे आणि समोरच्याने तसे केल्यावर ‘वालेकुम सलाम’ म्हणून प्रतिसाद देणे हे सौजन्य सर्रास आढळते. रस्त्यावर भिकारी कुठेच दिसले नाहीत. भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. शहरात उंच इमारती फारच कमी. बहुतेक सगळी घरे फारतर दोन मजल्यांची. तीही पांढरी किंवा फिक्कट तपकिरी (बेज) रंगाचीच. या देशात वाळूची वादळे होतात व त्यामुळे इतर रंग खराब व्हायची शक्यता असते म्हणून कदाचित ती प्रथा पडली असावी. इमारतीला वेगळा कुठला रंग द्यायचा असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागते. पण या सलग पांढरट बुटक्या घरांमुळे एकूण शहराची स्कायलाइन खूप छान दिसते. बंधनातूनही कधीकधी सौंदर्य निर्माण होते! सुलतानी कारभाराचा हाही एक फायदा आहे. स्वतःच्या घरात तुम्ही काहीही करू शकता पण बाहेर वावरताना सुलतान म्हणेल तीच पूर्व दिशा! एकूणच इथली सर्व सत्ता सुलतानाच्या हाती असल्याने राजकीय पक्ष, निवडणुका, संप-निदर्शने, मोर्चे यांना इथे जराही वाव नाही. शिवाय लोकवस्ती खूप कमी असल्याने कुठेच गर्दी, गजबजाट, आरडाओरडा दिसत नाही. अशा गोष्टींना आपले भारतीय मन इतके सरावलेले असते की या गोष्टी नसल्या तर जणू चुकल्याचुकल्यासारखे वाटते!
शेजारच्या दुबईप्रमाणे इथे जगभरातील अतिश्रीमंत वास्तव्यासाठी येत नाही. बहुसंख्य फॉर्च्यून 500 कंपन्यांनी दुबईप्रमाणे इथे आपली कार्यालये उघडलेली नाहीत. त्यामुळे दुबईतला डोळे दिपवणारा लखलखाट, झगझगाट इथे दिसत नाही. अवघे आयुष्य एखाद्या देशात राहूनही तेथील समाज आपल्याला पुरता समजला असे म्हणता येत नाही; त्यामुळे अवघे चार दिवस एखाद्या शहरात राहून त्या शहराबद्दल काही निष्कर्ष काढणे अशक्यच आहे; माझे मत हे मुख्यतः माझ्या नजरेला दिसलेले मर्यादित चित्र आहे हे उघड आहे. पण ‘खुशहाल’ शब्दात अभिप्रेत आहे ते समाधान मस्कतमधल्या लोकांमध्ये आहे असे मला वाटले. खुदा हाफिज!
सुलतान काबूस स्ट्रीट मस्कत ओमान (Alexey Komarov )
अल आलम पॅलेस
सुलतान अल काबूस मशीद

आता मस्कत ला फिरायला येणं सोपं झालं आहे. कुणालाही अगदी एकाट्यादुकट्याला ऑनलाईन व्हीसा दोन दिवसात मिळतो.
इथे फोटो दिलेला राजवाडा हैतीचा आहे का ? पूर्वी तो आधीच्या राजाचा होता, परंतु फारच गावात आल्याने काबूस बीन सैद नंतर नव्या राजवाड्यात गेला.
तेलाला मागणी भरपूर हे तर खरंच. पण माझ्या माहितीप्रमाणे तो कायमचा पुरणार नाही म्हणून त्याच्या किमती वाढत गेल्या, शिवाय पर्यटनाचा व्यवसायही वाढवण्याकडे लक्ष दिलं.
बाकी लेख छानच आहे. मिट्ट काळोखात चंद्रप्रकाशाचं महत्त्व वाढतं. परंतु त्या लोकांना ईदमुळे त्याचं महत्त्व अधिक. चंद्र पाहील्याखेरिज उपास सोडायचा नाही, शिवाय ईदची सुट्टी .. त्या दिवशी चंद्राचं दर्शन आपल्याला हवं तेव्हा मिळावं म्हणून हेलिकॉप्टरनेही ते त्याचा शोध घेतात.
ओमानी महिलांना बुरख्याची सवय झाली आहे हे खरं. त्याबद्दल चांगलं वाईट विचार करायला त्यांना मुभा नसते. पण म्हणून त्या त्यातून सुटायला धडपडत नाहीत असं नव्हे. देशाबाहेर पडायचं झालं तर प्रसाधन गृहात जाऊन बुरखा काढून मस्त जीन्स घालून मोकळेपणाने फिरतात. तरुण मंडळी कुणी मित्रांना सोडायला म्हणून आली असतील तर मुलं मुली बाहेर बसून आईस्क्रीम खात हसतखेळत बसतात. अशावेळी डोक्यावरचा रुमाल सरकल्याचं भान त्यांना नसतं. किंवा तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. अर्थात एकदाच जाऊन या गोष्टी लक्षात येणं कठीण. वहिबा सँडस् , रास अल हाद अशा कुठल्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली दिसत नाही .
पण लेख फारच छान आहे यात शंका नाही. कुनाफा ही मिठाई मात्र आम्हाला खायला किंवा बघायला मिळाली नाही.सौ स्वाती कर्वे .