उच्च शिक्षणाचा गाभा ४ –  नेतृत्व पाहिजे 

  अमेरिकेत पाय ठेवल्यापासून अगदी बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत आणि त्यानंतर नोकरी धंद्यामध्येसुद्धा सतत नेते व्हा’ हा धोशा ऐकू येतो. ‘काम सुरू करा! थांबू नका! पुढे व्हा! करून बघा! मोठी स्वप्नं बघा! नव्या कल्पना मांडा!’ असा आग्रह जिकडे तिकडे चालू असतो. सुरुवातीला ह्याचा मला फार विस्मय वाटायचा. कळायचंच नाही की बालवाडीतल्या चिंगऱ्या पोरांना कशाला  आणि कसले नेतृत्व शिकवायचे? पुढे मग मुलं हायस्कूलमध्ये गेल्यावर पुन्हा तोच  अनुभव आला! आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे लोक बारावी झाल्यावर हायस्कूलच्या मुलांना त्यांच्या त्यांच्या दलात सामील होऊन ‘नेतृत्वाचे’ शिक्षण घ्या असं सांगू लागले. आता सैनिक दलात भरती होणे म्हणजे कुणाच्यातरी आज्ञा सदैव तंतोतंत पाळणे असंच असतं ना? मग ह्यात नेतृत्व ते काय ? त्याच्याही पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी आमचा मोठा मुलगा MBA करायला गेला तेव्हासुद्धा ‘जागतिक स्पर्धेत तुमच्या धंदा-उद्योगाला नेतृत्व कसे द्यायचे  हे शिकण्यासाठी आमच्या युनिव्हर्सिटीत या – कारण इथले प्रोफेसर्स आपापल्या क्षेत्रातले नेते  आहेत!’ अशा जाहिराती प्रत्येक कॉलेज करत होते. गेली पंधरा वर्षं अमेरिकन शिक्षणपद्धतीचा कसून अभ्यास करून, आम्ही दोघे त्यातले छोटेसे घटक होऊन काम करून, आमच्या मुलांना त्या शिक्षण पद्धतीतून घालून मला आता असं वाटतं की संपूर्ण अमेरिकन शिक्षण आणि शिक्षणपद्धती मुलांमध्ये नेतृत्वगुण  रुजवण्यासाठी आणि जोपासण्यासाठीच आरेखित केलेली आहे. ह्या पद्धतीची मूलतत्त्वे म्हणजे आपल्या शिक्षणाची जबाबदारी आपणच घ्या, काय शिकायचं ते तुम्हीच निवडा, कसं शिकायचं, कोणत्या वेगाने शिकायचं हे तुम्हीच ठरवा आणि त्याचे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न तुम्हीच सोडवा. हे सगळं भारतीय शिक्षणपद्धतीपेक्षा किती वेगळं आहे ना?

पुण्याला कॉलेजमध्ये असताना इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाच्या प्रत्येक सत्रात आम्हांला एक ऐच्छिक (elective) विषय घेता यायचा. त्यासाठी चार ते सहा वेगवेगळे विषय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये होते. त्या सहांतले चार विषय शिकवायला विद्यापीठाकडे प्रोफेसर नव्हते आणि पाचवा विषय घेता येत नसे; कारण त्यात रस असलेली पुरेशी मुलं नव्हती! थोडक्यात म्हणजे काय की जो एक विषय उरलेला असे तोच ‘कंपल्सरी’ असलेला ‘इलेक्टिव्ह’ विषय असे! अशा तऱ्हेने पहिल्या सत्रापासून ते आठव्या सत्रापर्यंत एकही ऐच्छिक विषय घेता येत नसे. प्रत्येक सत्रात ठरलेले विषय – तेच ते विषय आणि तेसुद्धा त्याच क्रमाने घेत राहायचे – विद्यार्थ्याला कसलीही निवड करायची तसूभर मोकळीक नसे. सध्या भारतीय विद्यापीठांमध्ये काय परिस्थिती आहे ते मला माहीत नाही; पण हे जे वर्णन मी करत आहे ते वर्षानुवर्षे चालू होतं. त्या उलट इथे अमेरिकेत मुलांना विषय निवडायची इतकी मोकळीक आहे की काही विचारू नका. कधी कधी त्याचा त्रास होतो!! प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज/विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्या घेतल्या एक शैक्षणिक सल्लागार (अकॅडेमिक ॲडव्हायझर) देण्यात येतो. प्रत्येक मुलाने आधी अभ्यास करून हवे ते विषय निवडायचे आणि मग ह्या सल्लागाराच्या सल्ल्याने आणि परवानगीने त्यात प्रवेश घ्यायचा. त्याला जे काही करायचं आहे ते योग्य वेळात (उदाहरणार्थ चार वर्षांत) करता येईल की नाही, प्रत्येक विषय घेण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करून घेणारे कोर्सेस (prerequisite, co-requisite) त्याने घेतले आहेत की नाही हे तपासणे, मुलांनी इंटर्नशिप केली आहे की नाही, कॉलेजच्या शेवटच्या वर्षी करायचा मोठा प्रोजेक्ट केला आहे की नाही हे तपासणे हे त्या सल्लागाराचं काम असतं. त्यातही काही हुशार मुलांना डबल मेजर करायचं असतं, काही मुलांना मेजर – मायनर करायचं असतं, काही मुलांना बॅचलर्स – मास्टर्स एकत्रित करायचं असतं आणि ही सगळी मोकळीक विद्यापीठ देते. हे शैक्षणिक सल्लागाराचं काम मी गेली अनेक वर्षे करत आहे. माझ्या एका विद्यार्थ्याने तर मेकॅनिकल इंजिनीअरिंग  मेजर बरोबर चक्क संगीत नाटकात (म्युझिकल थिएटरमध्ये) मायनर केलं होतं! त्याला नाटकाची फार आवड होती म्हणून हे त्याने केलं होतं आणि मी ही त्याची नाटकाची आवड तपासून घेऊन त्याला असं करण्याची परवानगी दिली होती. शक्यतो मेजरला पूरक असेल असे मायनर घेण्याची पद्धत आहे – म्हणजे दुसऱ्या एखाद्या अभियांत्रिकी शाखेचं शिक्षण किंवा गणित किंवा बिझनेस इत्यादी – ज्याचा पुढच्या करियरला फायदा होऊ शकेल. हा विद्यार्थी मात्र अपवाद होता; पण त्याला जे मनापासून करायचं होतं ते तो करू शकला. माझा स्वतःचा पोस्ट डॉक्टरल गाईड केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संगीत आणि मटेरियल्स सायन्सचा पदवीधर होता! संगीतकार म्हणून तो ऑर्गन वाजवायचा आणि इंजिनीयर म्हणून तो ऑर्गन दुरुस्त करायचा! काही काही ऑर्गन तर इतके प्रचंड मोठे असतात – काही मजले उंच! त्यातून निर्माण होणारं संगीत इतकं मोठं आणि गोड असतं की त्यात बुडून जायला होतं; पण असे ऑर्गन इन-ट्यून आणि तंदुरुस्त ठेवणं हे ही एक कठीण काम आहे. त्याचं विद्यापीठाचं प्रथम पदवी शिक्षण झाल्यावर तो अमेरिकेत आला तो इंजिनियरिंगच्या नोकरीसाठी; पण त्याला संगीताची आवड स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून तो त्या गावातल्या एका चर्चमध्ये ऑर्गन वाजवायला जायचा. आणि तिथेच त्याला एक गाणारी मुलगी भेटली जी पुढे त्याची जीवनसाथी झाली! आता असा विचार करा की त्याने केंब्रिजमध्ये संगीत हा विषय घेतलाच नसता तर त्याला साता समुद्रापार असलेली ही अमेरिकेन पोरगी भेटली असती काय?

   पण स्वतःचे इतके मोठे निर्णय स्वतःच घेणे हे नक्कीच सोपं नाही. त्यासाठीसुद्धा अमेरिकेत एक खास पद्धत उपलब्ध आहे. ह्याला ‘खांद्यावरून डोकवा आणि शिका’ ऊर्फ शॅडोइंग    (‘shadowing’) असं म्हणतात; म्हणजे एखाद्या व्यावसायिकाबरोबर अगदी त्याच्या सावलीसारखे काही दिवस घालवायचे. तो नक्की काय करतो ते त्याच्या खांद्यावरून बघायचं. त्याला प्रश्न विचारायचे. त्याच्याबरोबर खुल्या दिलाने चर्चा करायची; म्हणजे त्या माणसाचं दैनंदिन आयुष्य काय आहे ह्याची चांगली माहिती आपल्याला मिळते. त्याच्या आयुष्यात येणारे ताणतणाव, तो सोडवत असलेल्या समस्या आणि त्यांची उत्तरं, त्याच्या संपर्कात येणारे इतर व्यावसायिक, त्याची गिऱ्हाइकं/पेशंट्स, त्याचे बॉस, त्याचे सहकारी, त्याचे विद्यार्थी, त्याला भरावी लागणारी कागदपत्रं, त्याच्या कामाशी संलग्न असलेले कायदेकानू आणि आचारसंहिता, बोलण्या-चालण्या-वागण्याची पद्धत – एकूणच त्याच्या जगाशी तुमचा अगदी जवळून परिचय होतो. समजा एखाद्या शाळकरी मुलाला पुढे गेल्यावर डॉक्टर व्हायचं आहे; तर आमच्या इथल्या पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये असा थेट अनुभव देणारा ‘Medical Explorers’ नावाचा एक प्रोग्रॅमच आहे. ह्या प्रोग्रॅममध्ये अशा डॉक्टर होण्यात रस असलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टरचं आयुष्य कसं असतं याचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. त्यांना मेडिकल कॉलेजच्या वर्गात प्रत्यक्ष बसायला मिळतं, डॉक्टरांबरोबर वेळ घालवता येतो, त्यांची मुलाखत घेता येते, वेगवेगळ्या औषधांची आणि त्यांच्या बऱ्या-वाईट परिणामांची त्यांना माहिती देण्यात येते. पेशंट्सशी कसं बोलावं, पेशंट्सची माहिती कशी मिळवावी ह्याचं प्रात्यक्षिक मिळतं. फर्स्ट एड, माऊथ-टू-माऊथ रिसायसटेशनचं ट्रेनिंग आणि परीक्षा पास केल्यास सर्टिफिकेट मिळतं; इतकंच नाही तर मुलं अकरावी-बारावीत असतील तर त्यांना शवविच्छेदनही करू देतात! आमचा मोठा मुलगा तन्मय ह्या प्रोग्रॅममध्ये चार वर्षं गेला होता. एकदा अशीच एक लॅब झाल्यानंतर त्याला घरी घेऊन जात होतो तेव्हा मी त्याला सहज विचारलं,”आज काय शिकवलं रे तुम्हांला?” त्यावर तो म्हणाला,”आज मेंदू दिला होता डायसेक्शन करायला.” हे ऐकून मला कसंतरी व्हायला लागलं. मी तसा कुणाला घाबरत नाही पण माझं सगळं धाडस डॉक्टरच्या ऑफिसच्या पायरीवरच संपून जातं! म्हणून विषय बदलण्यासाठी मी घाईघाईने म्हणालो,”रात्रीचे नऊ वाजून गेले आहेत – भूक लागली असेल ना? काय खावंसं वाटतंय तुला?” त्यावर तो शांतपणे म्हणाला,”बाबा! तो मेंदू बघून मला बर्गरची आठवण आली!” धन्य आहे! मी मनातल्या मनात म्हटलं हा पोरगा डॉक्टर व्हायला योग्य वाटतोय! त्याने पुढे वेगळी करिअर निवडली ती गोष्ट वेगळी; पण तो निर्णय त्याने अगदी जाणीवपूर्वक घेतला होता.

 माझी पुतणी तन्वी भारतात डॉक्टर होऊन इथे अमेरिकेत शॅडो करण्यासाठी आली होती. काही महिने तिने इथे शॅडोइंग केलं, इथल्या डॉक्टरीच्या परीक्षा दिल्या आणि आता ती इथे इंटर्नशिप पूर्ण करून डॉक्टरीची प्रॅक्टिस करते आहे. अशाच तऱ्हेने वकील, इंजिनीअर, शिक्षक, वित्त-सल्लागार अशा अनेक प्रकारच्या व्यावसायिकांच्या खांद्यांवरून पाहून शिकण्याची सोय उपलब्ध आहे. माझ्यासारख्या प्रोफेसर/रिसर्च डायरेक्टरच्या खांद्यावरून पाहिलंत तर मिनी विश्वरूपदर्शन होऊ शकेल! कोणी टीममधल्या इतर विद्यार्थ्यांची तक्रार घेऊन येतो, कुणाला ग्रेड वाढवून हवी असते, कुणाला पुढच्या टर्मला कोणते कोर्स घ्यावेत त्याचा सल्ला हवा असतो, कुणाला मास्टर्स करायचं असतं – त्यासाठी काय करावं ह्याची माहिती हवी असते, कुणा विद्यार्थ्याला जॉब किंवा ग्रॅज्युएट अर्जासाठी रेफरन्स लेटर हवं असतं. कोणत्यातरी जर्नलला त्यांच्याकडे सबमिट केला गेलेला रिसर्च पेपर मी रिव्यू करायला हवा असतो. कुठल्या कॉन्फरन्सने मला भाषण द्यायला बोलावलेलं असतं –  त्यांना माझा पेपर पाठवायचा असतो, कुठल्यातरी प्रोजेक्टच्या फंडिंगसाठी मला माझा अर्ज पाठवायचा असतो. कुणा मास्टर्स किंवा पीएचडीच्या विद्यार्थ्याचा थिसीस डिफेन्स जवळ आलेला असतो त्याला मदत करायची असते. कोण्या फॅकल्टीला रिसर्च ग्रॅन्टसाठी अर्ज करायचा असतो – त्यांना युनिव्हर्सिटी प्रोटोकॉलची माहिती द्यायची असते. तितक्यात डीनला माझ्याकडून स्ट्रॅटेजिक प्लॅनचा मसुदा हवा असतो. चार दिवसांनी प्रोफेशनल सोसायटीची एक्झेक्युटिव्ह मीटिंग जवळ आलेली असते त्यासाठी रिपोर्ट द्यायचा असतो. नवा मास्टर्स प्रोग्रॅम निर्माण करायचा आहे त्याच्यासाठी करिक्युलम ठरवायला हवं असतं. ॲक्रिडिटेशनसाठी फॅकल्टीला मार्गदर्शन करायचं असतं, प्रयोगांसाठी मानव वापरायचे असतील तर ते प्रयोग नीट काळजीपूर्वक केले जावेत, प्रयोगात कुणाला कसली इजा होऊ नये ह्याची खात्री करण्यासाठी आणि ह्या प्रयोगांवर एथिकल/नैतिक नियंत्रण ठेवण्यासाठी ‘इन्स्टिट्यूशनल रिव्ह्यू बोर्ड’ असतं त्याचा चेअरमन ह्या नात्याने मला एका रिसर्च प्रपोझलवर मत मांडायचं असतं…असे अनेक चेंडू एकाच वेळी हवेत उडत असतात. हे सगळं बघून त्या व्यक्तीने निर्णय घ्यायचा की आपल्याला खरोखरच विद्यापीठात प्रोफेसरची नोकरी करायची आहे की नाही. अशा तऱ्हेने पूर्ण माहिती मिळवून आणि पूर्ण विचारान्ती घेतलेला करियरचा निर्णय नक्कीच लोकांना आपापल्या क्षेत्रात नेता व्हायच्या मार्गावर झटकन घेऊन जातो ह्यात काही वाद नाही.  

  मला वाटतं असं नेतृत्व-शिक्षण लहानपणापासून मिळाल्यामुळे मुलांमध्ये काही नवीन करून पाहण्याचं धाडस निर्माण होतं, नव्या वाटांनी – नव्या दिशांनी प्रवास करायची भीती वाटत नाही, स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्याची सवय लागते; पण त्याचबरोबर हे करण्यासाठी अत्यावश्यक असलेली समाजाची बैठकही भक्कम असावी लागते. उदाहरणार्थ : ह्या नव्या वाटा धुंडाळायच्या प्रयत्नात काही चुका झाल्या, वाटा साफ चुकल्या तरी समाज सावरून घेतो – मुलांना दोष देत नाही. त्यांच्या पाठीवर थाप टाकून पुन्हा दुसरा प्रयत्न करायचा धीर समाज देतो. हे फार महत्त्वाचं आहे. नेतृत्वाची इतकी मनापासून पूजा करणारा दुसरा समाज मी पाहिलेला नाही. जगभरचे अनेक समाज आणि संस्कृती मी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत आणि त्यांतल्या बऱ्याच संस्कृतींत प्रथांना, रुळलेल्या वाटांना, चाकोरींना, जपून-जपून वागण्याला, सेफ्टी फर्स्टला अतोनात महत्त्व दिलेलं असतं; त्यामुळे तारुण्याच्या कर्तृत्वाला, जोशाला, धाडसाला एक प्रकारच्या मर्यादा पडतात. स्वप्नं बघायची भीती वाटते. नवं काम करण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठी आपला हात वर करावासा वाटत नाही आणि गुणी माणसांनी कामात पुढाकार न घेणे हा समाजाचा फार मोठा तोटा आहे. समाजाला दिशा द्यायची असो, वैयक्तिक आयुष्यातल्या संकटांमधून मार्ग काढायचा असो, आपल्या उद्योगधंद्याला यशस्वी करण्याचं आव्हान असो – जे काही करायचं असेल त्याच्यासाठी अंगात नेतृत्व असले पाहिजे आणि हे नेतृत्व अचानक येत नाही. त्याची तयारी, अनुभव आणि शिक्षण लहानपणापासूनच झालं पाहिजे; म्हणूनच पुढे येणाऱ्या काळासाठी, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘नेतृत्व  घडवणे’ हा एक उच्च शिक्षणाचा महत्त्वाचा गाभा आहे.

Author

  • प्रियदर्शन मनोहर

    मटेरियस सायन्स मध्ये डॉक्टरेट.
    पिट्सबर्गमधील रॉबर्ट मॉरिस विद्यापीठात इंडस्ट्रियल इंजिनियरिंगचे प्राध्यापक

    View all posts

Leave a Reply