| वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव – संपादक. |
कामशेत न सोडता राहायचा महिना झाला. पगार झाला. दोनशे रुपये उधारी चुकवली – परत हजार रुपयेच उरले. कसं जमवावं आता? एवढ्यात एक मित्र असाच भेटायला आला. तो आता मेडिसीनमध्ये पदव्युत्तर शिकणार होता. त्या खुशीत तो खास भेटायलाच आला, तेही पैसे घेऊन !
एव्हाना इथलं सर्व ताळतंत्र समजलं होतं. नळाला पाणी पहाटे येई. उठेपर्यंत गेलेलं असायचं. बादलीत भरलेल्या पाण्यावर देहधर्म आणि अंघोळ उरकायची. पाणी गरम करता येत नाही कारण हिटर लावला की फ्यूज उडतो मग कुडकुडत पट्कन अंघोळ करायची. दुधाची पावडरवापरून चहा करायचा आणि आदल्या संध्याकाळी आणलेला ब्रेड त्यात भिजवून खायचा. दोन मोठे कप भरून चहा बनवायचा. एक मग चहासोबत जास्त ब्रेड खायला आणि एक मग नंतर सिगरेट पिताना सोबत. मग कपडे बघायचे. थेट काखेजवळ वास घेऊन ठीक असले तर तसंच अन् नसलं तर पावडर लावायची आतून अन् बाहेरून अथवा कॅंपातून आणलेला ‘ब्रूट’शिंपडायचा, एप्रन झटकून घालून स्टेथो लटकावला की झालं. मग OPD बघायची. लोकांना बिनकामाच्या गोळ्या द्यायच्या, समजूत घालायची आणि वेळ काढायचा. दोन वाजले की कधी मगनलालकडे जाऊन मिसळपाव आणि तिखट तर्री खायची, चहा प्यायचा अन् खोलीकडे परतायचं. काही दिवस दुसऱ्या आयुर्वेद कॉलेजच्या मुलीही यायच्या सकाळी! तेव्हा बरं असायचं. अगदी पुण्यातील साजूक बोलणाऱ्या मुली, त्यांनी जमवलेली लग्नं, लग्न झालेल्या काहींच्या घरगुती विवंचना ऐकताना मजा यायची. त्यांनी बरेचदा डबा आणला माझ्यासाठी. तेवढाच घरगुती जेवणाचा स्पर्श…
आई कशी सुरेख आमटी करते. साध्या पालेभाजी भाकरीच्या आठवणीने कसे मन विव्हळते! आपण घरी राहिलो तेव्हाही खाण्याचा उतमात केला नव्हता तरी हे असं… वर्षानुवर्षे घराबाहेर राहून तिथल्या खाण्याशी, चवींशी जमवून घेत आलो…असो…मग खोली बंद करून अंधार करून भर दुपारी झोपायचा प्रयत्न अथवा जुने-पाने दिवाळी अंक उघडून त्यातून सानिया, आशा बगे अथवा लक्ष्मण लोंढे, मतकरी, धारप यांचं वाचायचं. दिवाळी अंकात चिकार कविताही असतात. त्यांना चाली द्यायच्या अथवा मग काहीतरी लिहायचे,फाडायचे,लिहायचे अथवा हैदोस वगैरे बिनीतली पुस्तक वाचून आपला आंबटशौकीनपणा पुरवायचा अथवा मग एकदम विरक्त होऊन खोली आवरायची, थोटकं गोळाकरायची, थोडी मोठी परत बाजूला ठेवायची (नंतर कामी येतात ) अथवा एकदम गदगदूनरडायचं – पण आवाज होऊ द्यायचा नाही! अथवा मग कुणीच आपलं कसं नाही अथवा आपल्याला मित्र या टप्प्यावरून पुढे कसं कोणी नेलं नाही (आपण सदैव मुलींचा चांगला,समजून घेणारा,आधार देणारा, संवेदनशील मित्रच राहिलो!) असं वाटवून घेत आणखीन कडवट व्हायचं!
दुपार सरायची आणि मी वेडापिसा. सरांना म्हटलं मी असतोच इथे तर आमच्या खोलीत राहून संध्याकाळीपण पेशंट बघू का? त्यांच्या आणि विशेष सहायकांच्या चर्चेनंतर काही रुग्ण तुम्ही बघा असं ठरलं. आठवडा चांगला गेला. संध्याकाळीयेणारे लोक साध्या तक्रारींसाठी तसे कमी असायचे. मग त्यांना नीट समजवावं, त्यांना चांगल्या सवयी सांगाव्या असं जरा बरं वाटायचं; पण एकदा असं झालं की एक जण सरांकडे जाऊन भांडला. ते छोटे डॉक्टर नीट सांगतात आणि तुम्ही बघत नाही नीट! मग साहजिक मास्तर चिडला. मला बोलावून खूप बडबड केली. कुठून तुझ्यासारखे लोक उगवतात आणि आम्हांला त्रास… तात्पर्य संध्याकाळी रिकाम्या. तर मग अशाच एका वैताग संध्याकाळी दिलीप आला. थेट खोलीत घुसला आणि सवयीप्रमाणे दोनचॉकलेटं मला फेकून मारली – त्याची प्रेमाची तऱ्हा! मग गप्पाटप्पांना ऊत आला. त्याला घेऊन दिलबहारला गेलो. एव्हाना बाबू ओळखीचा झालेला.
वरती निवांत जागा, दिलीपचे मोजकेच बोलणे आणि उपलब्ध सर्वात स्वस्त व्हिस्की… पण आज त्याची चव लागली. गप्पा रंगल्या, सिगरेट पाकीट संपले. दिलीप बोलत राहिला.त्याची तगमग, जवळपास निरक्षर घरातून येऊन जोपासलेले छंद, कमावलेले शरीर, इतक्या खडतर परिस्थितीत अपवादात्मक अपयश सोडल्यास सर्व काही मनापासून पूर्ण केलेला मित्र .
त्याच्यामध्ये एक वेगळंच शहाणपण आणि फँटसी एकत्र नांदत होते .
आमच्या बॉईज हॉस्टेलमध्ये पाण्याची प्रचंड मोठी टाकी होती. त्यावर जायला वक्राकार असे ६-७ जिने होते. तिथला रखवालदार खालीच तळाशी खुर्ची टाकून बसलेला असे (न जाणे कोणी वरून उडी मारली तर!)
अशाच एका हिवाळ्याच्या सकाळी दिलीप आणि मी चहा पिऊन आलो आणि कसं कोण जाणे रखवालदार नव्हता. दिलीप म्हणाला, “चल,वरती जाऊ.” मला उंचावरून बघताना भोवळल्यासारखे होते म्हणून मी नाही म्हणालो; पण हट्टाने मला तो घेऊन गेला. चक्राकार जिने चढता चढता वेगळंच वाटू लागलं; पण दिलीप माझ्या मागून चढत होता तो सावकाश वरती घेऊन गेला. वरती टाकीच्या घुमटाखाली पॅरापेटसारखं बांधलेलं आणि त्याला भक्कम लोखंडी रूळ लावलेले. तिथे घाबरत बसलो आणि आजूबाजूचं बघून थक्क झालो. छोट्याशा काडेपेटीसारखे दिसणारे आमचे होस्टेलचे ब्लॉक्स, मागच्या बाजूला असलेलं मुलींचं हॉस्टेल, अगदी छोटी दिसणारी वाहनं आणि माणसं… मग सरकत सरकत जागा बदलून वरून ते छोटेसे दिसणारे जग पाहत राहिलो आणि मग दिलीपने एका दिशेला बोट केले . मुख्य प्रवेशाच्या समोरचा वर्दळीचा चौक, सगळ्या बाजूने येणाऱ्या PMT बसेस, दुचाकी,चालवणाऱ्या माणसांचे ठिपके… सर्व काही एका लयीत सुरू होते . दिलीप म्हणतो & I quote, ‘असं काय नक्की आहे, अशी कोणती शक्ती आहे ज्याला ईश्वर म्हणता येईल की तो अदृश्यपणे हे सर्व चालवत आहे. क्वचितच काही अपघात होतो तेव्हा त्या शक्तीचं लक्ष क्षणभर विचलित होत असतं की त्या आयुष्याचा खेळ संपल्याचे ठरलेले असते?’ unquote. मला तंतोतंत ते पटले. इतक्यात खालून रखवालदार भयचकित होऊन ओरडू लागला – ‘कोणेरे ते,आधी खाली उतरा.’ मग खाली न बघता उलटा जिना मी उतरलो. त्यावेळी दिलीप आधी उतरला. तर तोच दिलीप इथे दिलबहारमध्ये गुंग होता . शेवटी बार बंद होत आला तसा बाबू नम्रपणे म्हणाला चला साहेब आता उद्या या! मग ते अडखळत त्याच्या बाईकला किक मारत खोलीवर अन् गादी टाकायच्या आधी दिलीप तसाच जमिनीवर लुडकला .
दुसरे दिवशी भयानक डोकं दुखत जाग आली. दिलीप अंघोळ करून आला. मग मी आज सुट्टी घेतली आणि दिलीपसोबत मगनलाल. तिथल्या गोडमिट्ट चहाने डोके एकदम थांबले. “दिलीप , काय करायचं? लोणावळ्याला जाऊन यायचं ?”
“नाही रे तू साल्या फिरत नाहीस आज आपण भारी ठिकाणी जाऊ.”
नागमोडी काही डांबरी सडका, मग कच्च्या वाटा , सगळीकडे गळणारी पानं, उबदार सूर्यप्रकाश,
सावलीच्या जाळ्या… एक रास्ता है जिंदगी जो थम गये तो कुछ नही…
अचानक समोर विस्तीर्ण जलाशयाचा काठ. निबिड झाडी, चिटपाखरू नाही. पक्ष्यांचे आवाज, पाण्यावर उठणारे तरंग… प्रगाढ शांतता… आणि मग दिलीपने भराभर अंगावरचे कपडे काढले…अगदी पूर्ण दिगंबर. अगदी आदिम अन् माझ्याकडे बघून जोरात ओरडला,”अरे काढ की कपडे! इथे आहेच कोण बघायला?” शेवटी शर्ट काढून मी पाण्यात उतरलो तसा धावत जाऊन त्याने डिकीत लपवलेली व्हिस्कीची क्वार्टर आणली आणि म्हणेआता आपण इथे पिऊ.
“अरे कशाला आता? आणि इथे पाणी सोडा काहीच तर नाही.”
यावर समोर पसरलेल्या अथांग पाण्याकडे बोट दाखवत तो हसला. बुचाची मान मुरगाळून बूचभर पाणी त्याने बाटलीत घातले एक घोट घेतला, मलाही घ्यायला लावला. मग रिकाम्या जागेत पाणी भरले परत बूचभर. असं करत त्या थंडगार पाण्यात मुक्त सूर मारत त्याने उत्साहाने ते द्रव्य संपवले. काठावर येऊन दाट सावलीत पहुडून तो बोलत सुटला – अपमानाचे, मानभंगाचे, ढोंगीपणाने आणि अंतर्गत राजकारणाने पोखरलेले मेडिकलचे आयुष्य. मध्येच रडला, मध्येच हसला, मध्येच ध्यान लावून बसला… सर्वच अनाकलनीय.
टोकाचे जगत टोकाच्या गोष्टी करत हा हरहुन्नरी मित्र नंतर अकाली जाणार होता हे कळले असते तर? ज्या गोष्टींची लक्षणे दिसली त्याचेच व्यसन होऊन सगळीकडे हार पत्करत तो जाणार होता, हे संचितच.
ज्या वयात सतत मैत्राचे, प्रेमाचे छत्र पसरलेले असावे असे वाटते,नवीन काहीतरी आयुष्याशी जोडले जावे वाटते, निखळ माया आणि कडवटपणा दूर होईल असे घडावे वाटते त्या वयात घट्ट होत गेलेली आत्मनाशाची व्यथा…
संध्याकाळी दिलीप परत गेला. जाताना एकदम १००० रुपये देऊन म्हणाला मध्ये night duty केली एका हॉस्पिटलला. चिकार पैसे आहेत. तू दे नंतर परत.
आलो तेव्हा तीच ती उखडलेली वाट, मिणमिणते दिवे, अंधारात बुडालेल्या इमारती, खोलीत शिरून लाईट लावला आणि नुसताच बसून राहिलो. काय असतं प्रयोजन सगळ्याचं ? आपण कोण, का शिकलो, का इथे आलो, आपल्याला न पटलेलं भावलेलं शिकत, वागत आणि आवडणारं तुटत,दग्ध होत आपण काय करणार आहोत? मुळात आपण म्हणजे कोण? हे बाहेरचं शरीर की विचार करणारं मन? आणि आपल्याला झेपत नसणाऱ्या अथवा आपण काही करू शकत नाही अशा प्रश्नांच्यासमोर आपण दुबळे होत अश्रू गळतो अथवा अगदी ठार होईपर्यंत झुंजतो ते असंच वांझोटं? कदाचित आयुष्यभर! आपलं शिक्षण, घरच्या आशा, नसंपणारं शिक्षण, सर्व व्यवस्था, आपल्या घासातला घास काढून प्रेमाने पिशवीभर तांदूळ देणारी म्हातारी आज्जीबाई पेशंट, अविवाहित मुलगी गर्भार राहिली म्हणून तोंड चुकवत संध्याकाळी येणारा आणि फाड्कन तिच्या तोंडात मारणारा तिचा बाप आणि आहेच गर्भार तर आपणही मजा करून घेऊ म्हणणारा xxxxx कर्मचारी अन् आपल्या डोळ्यांत एकदमआलेलं ऊन ऊन पाणी… कशाचा संबंध कशाशी नाही…
कैसे कैसे हादसे हम सहे गये
फिर भी जीते रहे हसते रहे
कैसे कैसे हादसे सह गये
क्रमशः
