बेंगलोर की बंगळुरू? सदराचे नाव ठेवतानापण मला प्रश्न पडला होता; पण जरी कागदोपत्री नाव बदलले असले तरी तोंडी बसलेले नावच ठेवू म्हणत ‘बेंगलोर डायरी’ हे नाव ठेवले. या शहराच्या या नावाबाबतपण एक आख्यायिका आहे. बाराव्या शतकातील होयसळ राजा वीर बल्लाळ दुसरा हा शिकारीहून येताना रस्ता चुकला; तेव्हा त्याला एक झोपडी दिसली. राजाला भूक लागली होती म्हणून त्याने तिथल्या म्हातारीला काही खायला आहे का विचारले. तेव्हा म्हातारीने त्याला उकडलेले चणे खायला दिले. त्यावरून त्याने बेंदीत-काळू-ऊरु (बेंदीत म्हणजे उकडलेले, काळू म्हणजे खरेतर कोणतेही कडधान्य आणि ऊरु म्हणजे गाव) म्हणजे ‘उकडलेल्या चण्याचे गाव,’ असे नाव या गावाला दिले – ज्याचा अपभ्रंश होऊन आजचे बेंगळुरू झाले असे म्हणतात; पण त्याचवेळी नवव्या शतकात बांधलेल्या बेगूर येथील नागेश्वर मंदिराच्या शिलालेखावर मात्र बंगळुरू असा उल्लेख आहे.
आज जे शहर बंगळुरू म्हणून ओळखले जात आहे, ते विस्ताराने एवढे मोठे आधी नव्हतेच. छोटी छोटी गावं, वस्त्या – ज्यांना स्वतंत्र ओळख होती – त्या सगळ्यांचे मिळून हे गाव बनले आहे. हळ्ळी म्हणजे गाव त्यामुळेच आजही बेंगलोरमध्ये कोडीगेहळ्ळी, बोम्मनहळ्ळी, मार्थहळ्ळी, मावल्ली अशी अनेक गावं गावपण विसरून या शहराचा भाग झाली आहेत. गमतीची गोष्ट अशी की जरी ही गावं आता शहराचा भाग झाली असली तरीही गावच्या म्हणून असलेल्या काही खास प्रथा आजही पाळल्या जातात; किंबहुना गावचे उत्सव तितक्याच उत्साहाने मूठभर टिकून असलेल्या स्थानिक रहिवाशांकडून आजही साजरे केले जातात. असाच एक अनेक शतकांची परंपरा असलेला मेळावा दरवर्षी कार्तिक महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी साजरा केला जातो – ही ‘कडले परिषे’ बंगळुरूची ओळख आहे.
बुल टेंपल किंवा दोड्ड बसवा टेंपल ही बेंगलोरची एक ओळख आहे. पूर्वी गावाबाहेर असलेला बसवनगुडी हा भाग आता अगदी शहराचा मध्यवर्ती भाग झाला आहे. (मालगुडी डेजमधले मालगुडी म्हणजे (मल्ले)श्वरम+बसवन(गुडी) असे आलेले आहे) बेंगलोरमध्ये काय बघावे या यादीत अग्रस्थानी असलेल्या या जागेजवळ दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ‘कडलेकाई परिषे’ भरते. कडलेकाई म्हणजे भुईमुगाच्या शेंगा आणि परिषे म्हणजे मेळावा. खूप पूर्वी या देवळाच्या आसपासची जी गावं होती तिथल्या शेतांमध्ये शेंगदाण्याची शेतं होती; पण दर महिन्यात पौर्णिमेला एक वळू यायचा आणि शेतांची नासधूस करून जायचा; त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी बसवाच्या देवळात म्हणजे नंदीबैलाच्या देवळातल्या नंदीला साकडे घातले, की आम्ही आमच्या शेतातली पहिली कापणी तुला वाहू; पण आमची शेते वाचव आणि त्यानंतर अचानक शेतात होणारा हा वळूचा उपद्रव थांबला. त्याचेच प्रतीक म्हणून कार्तिक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हा मेळा भरतो असे म्हणतात. इसवी सन १५३७ सालापासून ही परिषे भरत आहे. या परिषेच्या निमित्ताने बसवाला शेंगांचा प्रसाद दाखवला जातो. तेथील बसवाची मूर्ती दरवर्षी थोडी थोडी वाढायची आणि या वाढत्या मूर्तीमुळे देवळाला धोका होऊ नये म्हणून त्या मूर्तीच्यावर त्रिशूळाच्या रूपात खिळे ठोकले आहेत. या सोमवारच्या मागचे पुढचे दोन दिवस बुल टेंपल रोड हा फक्त शेंगाच नव्हे तर इतर अनेक गोष्टींनी भरलेला असतो. या वर्षी ११ डिसेंबरला शेवटचा सोमवार आहे. हा परिषेचा मुख्य दिवस आहे.
पूर्वीच्या काळी तर या परिषेच्या निमित्ताने शाळेला एक दिवसाची सुट्टी दिली जायची. भुईमुगाच्या शेंगा, भाजलेले दाणे, फुटाणे हे या परिषेचे प्रमुख आकर्षण असते. एखाद्या छोट्या यात्रेसारखे इथे रस्त्यावर शेतकरी, विक्रेते त्यांच्या मालाची विक्री करतात . मुलांसाठी खेळणी, छोटे आकाशपाळणे अशा अनेक गोष्टींनी रस्ता भरून वाहत असतो. एक वेगळीच ऊर्जा असते त्यावेळी. याच धर्तीवर स्थानिक लोकांच्या आवडीच्या अवरेबेळे म्हणजे वालाच्या शेंगांचासुद्धा मेळावा जानेवारीमध्ये भरतो. व्ही. व्ही. पुरम भागात तिंडी बिदी म्हणजेच खाऊ गल्ली (बेंगलोरची खाद्य यात्रा इथे भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही.) भागात हा मेळावा भरतो. या भागातील वासवी कोंडीमेंट या दुकानाच्या मालकीण के. एस. गीता शिवकुमार यांनी २००० सालच्या आसपास हा मेळावा सुरू केला.
स्थानिक लोकांचे वालाच्या शेंगांवर इतके प्रेम आहे, की थंडीच्या दिवसांत अनेक घरांत डाळीचे सांबार न करता फक्त या वालाच्या शेंगांचेच सांबार करतात. भाजीमध्ये, सांबारामध्ये, घट्ट सार करण्यासाठी शक्य तितक्या पद्धतीने वालाच्या शेंगा वापरल्या जातात. पूर्वी घरोघरी दुपारी बायका बसून या शेंगा निवडण्याचे काम करायच्या. आताशा सोललेले दाणेदेखील मिळतात. नंतर साले रस्त्यावर फेकली जायची, मुद्दाम लोकांनी पायदळी तुडवावी अशा पद्धतीने, कारण जितके जास्त लोक ही सालं तुडवतील, तितकी जास्त चव साराला येते अशी एक खुळचट कल्पना आजही अनेक जण बाळगून आहेत. मी हे स्वानुभवातून सांगत आहे. असेच रस्त्यावर फेकलेल्या सालांवरून झालेले एक भांडणदेखील मी पाहिले आहे.
अवरेबेळे परिषेमध्ये सबकुछ अवरेबेळे / काई असते. म्हणजे डोसा, इडली, थालीपीठ, चित्रन्ना या तर अगदी मामुली गोष्टी झाल्या; पण या मेळाव्याच्या निमित्ताने, वालाच्या शेंगांची जिलबी, गुलाबजाम, बर्फी, पुरणपोळीदेखील केली जाते. एका वर्षी आईस्क्रीमसुद्धा केले होते म्हणे. बाकी फरसाणासारखे प्रकार तर असतातच. काही वेळा दोन-तीन वेगवेगळ्या जागांवरसुद्धा हा मेळावा भरवला जातो. तुलनेने खूप नवीन असला हा मेळावा; तरीही याला दरवर्षी भरभरून प्रतिसाद मिळत असतो. वालाच्या शेंगा – त्यांवरचे इतके ओसंडून वाहणारे प्रेम हे बेंगलोरच्या कन्नडीगा, तेलगू, तमीळ या सगळ्यांना जोडून ठेवणारा एक धागा आहे म्हणले तर ते चुकीचे ठरणार नाही.
असाच बेंगलोरमधला आणखी एका महत्त्वाचा मेळा म्हणजे मॅंगो मेळा! दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लालबाग आणि कबन पार्क या बेंगलोरमधल्या बागांमध्ये हॉर्टीकल्चर विभागाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले जात असते. यात आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. आंब्यांबरोबरच फणसांचीदेखील विक्री होते आणि हो, इथे गरे विकत घेण्याऐवजी लोक अख्खा फणस विकत घेऊन तो घरी कापून खाणे जास्त पसंत करतात. फणस कोकणपट्ट्यात जितका आवडीने खाल्ला जातो, तेवढ्याच प्रेमाने इथेपण खाल्ला जातो. खीर, इडली, नुसते गरे किंवा मध घालून गरे तर खाल्ले जातातच; पण नंतर त्या आठळ्यांचादेखील वापर खूप नजाकतीने केला जातो.
बेंगलोरचे एक खूप मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे महानगर असले तरीही याने ग्रामीण चेहरा कायम ठेवला आहे आणि त्यामुळेच एखाद्या मोठ्या गेटेड कम्युनिटीच्या शेजारीच एखादे मोठे शेत, गोठा बघायला मिळतो; किंवा विमानतळाच्या रस्त्यावर दोनशे एकरांत कृषिविद्यापीठ वसलेले असते. या कृषिविद्यापीठात (GKVK गांधी कृषिविज्ञान केंद्र)देखील दरवर्षी नोव्हेंबरमध्ये कृषीमेळा भरतो. हा मुख्यत्वे शेतकऱ्यांसाठी असतो; मात्र शहरातील लोकदेखील मोठ्या हौसेने तिथे जातात.
बेंगलोर, बंगळुरू किंवा आमच्या भाषेत ऊरु/ लुरू अनुभवायचे असेल तर या अशा परिषे किंवा मेळ्याला नक्की भेट द्या. आधुनिक होताना जुनी मुळे सोडण्याची गरज नसते याचा प्रत्यय नक्कीच तुम्हांला येईल!!
(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर,माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)
