The Democrats are the party that says government will make you smarter, taller, richer and remove the crabgrass on your lawn. The Republicans are the party that says government does not work and then they get elected and prove it .: P J O’Rourke
आता थोडेसे या निवडणूक प्रक्रियेविषयी पाहू या. एखाद्या व्यक्तीला अमेरिकेचे अध्यक्ष व्हायचे असेल तर त्या व्यक्तीचा जन्म अमेरिकेतला असला पाहिजे, त्या व्यक्तीने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली हवीत आणि ती व्यक्ती गेली चौदा वर्षे अमेरिकेतच वास्तव्याला असली पाहिजे.
या अटींत बसणारी व्यक्ती मान्यताप्राप्त पक्षाचे नामांकन मिळविण्यास पात्र होते. हे नामांकन किंवा तिकीट मिळण्यासाठी देशभर जोरदार प्रचार करावा लागतो. अमेरिका हा खंडप्राय देश असल्याने याला खूप साधनसामग्री, सहकारी व अर्थातच पैसाही लागतो. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अमेरिकेत रिपब्लिकन व डेमोक्रॅट असे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत व यांच्यातच चुरस असते. हे दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवाराला आर्थिक मदत करतात. अशी आर्थिक मदत किंवा स्रोत इतर लहान पक्ष किंवा इतर अपक्ष उमेदवार यांचेकडे उपलब्ध नसते त्यामुळे मुख्यत्वे या दोन पक्षांच्या उमेदवारांतच ही लढाई होते .
ज्या प्रक्रियेद्वारे अध्यक्ष निवड होते त्या प्रक्रियेला ‘Electoral College’ प्रक्रिया म्हणतात. येथे College हा शब्द प्रक्रियेचा निदर्शक आहे – जागेचा नाही – हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रक्रियेच्या तीन पायऱ्या आहेत :
१. Electors ची निवड :(५ नोव्हेंबर २०२४ )
२. या Electors ची अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीसाठीच्या मतदानासाठी बैठक व मतदान : (१७ डिसेंबर २०२४)
३. कॉंग्रेसद्वारा या मतांची मोजणी.
Electors ची निवड सर्वसामान्य अमेरिकन नागरिक मतदानाद्वारा करतो. मतदान करताना जी मतपत्रिका वापरली जाते त्यात दोन्ही पक्षांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे असतात. प्रत्यक्ष Electors म्हणून काम करणाऱ्यांची नावे असतातच असे नाही : काही राज्यांत ती असतात, काही राज्यांत नाही. एकंदरीत या इलेक्टोरल कॉलेजात ५३८ मते असतात हे मागेच सांगितले आहे. अर्थात अध्यक्ष होण्यासाठी २७० मते मिळणे आवश्यक आहे. ५३८ भागिले दोन = २६९. एक जास्त म्हणजे २७० असा साधा हिशोब आहे . आता हा ५३८ आकडा कोठून आला हे सांगितले पाहिजे. ४३५ प्रतिनिधिगृहांची सदस्य संख्या, १०० सिनेटची सदस्यसंख्या व कोलंबिया जिल्ह्याला २३ व्या घटना दुरुस्तीने मिळालेली ३ जादा मते.
४३५+१००+०३ = ५३८ असा तो हिशोब आहे . एका राज्यात जितके लोकप्रतिनिधी तितकी electoral votes त्या राज्याकडे असतात. दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनुसार ही लोकप्रतिनिधी संख्या व त्यावरून Electoral votes ठरतात. आताची निवडणूक ही २०२० च्या जनगणनेनुसार होत आहे.
District of columbia वर ३ मतांची मेहेरनजर का? Washington DC ही अमेरिकेची राजधानी आहे . Washington हे शहराचे नाव अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या बहुमानार्थ ठेवलेले आहे. हे शहर १७७ वर्ग किलोमीटर क्षेत्रात वसलेले आहे व या जिल्ह्याला District of Columbia असे संबोधन आहे. हा एक प्रकारे तेथील केंद्रशासित जिल्हा आहे. ते शहरही नाही व राज्यही नाही. कोलंबिया हे कोलंबसचे स्त्रीरूप. भारत आणि भारतमाता – तसेच काहीसे. अध्यक्ष निवडीत येथील निवासी लोकांनाही भाग घेता यावा म्हणून ३ मते त्यांना देण्यात आली आहेत.
आता दोन पक्ष आपापले अध्यक्षपदाचे उमेदवार कसे निवडतात ते पाहू या. प्रत्येक पक्षाकडे अध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार असतात. त्यांतून एकाला अंतिम नामांकन मिळून तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरा जातो. अध्यक्षपदाचा उमेदवार आपला उपाध्यक्ष कोण असेल ते ठरवून ते जाहीर करतो . अध्यक्ष व उपाध्यक्ष या जोडगोळीला त्या पक्षाचे ‘तिकीट’ असे संबोधन मिळते. हे संभाव्य उमेदवार देशभर फिरून आपल्या पक्षातील जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. आपले विचार, ध्येयधोरणे, मते आपल्या पक्षाच्या सदस्यांना सांगून त्यांची मते आपल्याला पडावी यासाठी शिकस्त करतात. या प्रकाराला तेथे Campaign ‘प्रचार मोहीम’ असे संबोधन आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, प्रत्यक्ष संवाद, भाषणे आदी सर्व प्रकार यासाठी वापरले जातात. ते ५० राज्यांपैकी प्रत्येक राज्यात जातात व तेथे त्यांना एक संमेलन घ्यावे लागते. त्याला Primary असे म्हणतात. प्रत्येक राज्य त्या त्या पक्षासाठीचा आपला उमेदवार निवडतो. त्या त्या पक्षाचे नोंदणीकृत सभासद आपापल्या पक्षाच्या त्या राज्यासाठीच्या Primaryमध्ये भाग घेऊन आपला संभाव्य उमेदवार निवडतात. काही ठिकाणी Caucus नावाचा एक प्रकार होतो. Primary व Caucus यांत फारसा फरक नसतो. Caucus मध्ये चर्चेला जास्त वाव मिळतो असे फार तर म्हणता येईल. Primary जिंकणाऱ्या उमेदवाराला त्या राज्यातील ठरलेले Delegates (प्रतिनिधी) मिळतात. सर्व राज्यांच्या या प्राथमिक निवडीनंतर त्या त्या पक्षाचे एक देशव्यापी किंवा राष्ट्रीय अधिवेशन (Convention) होते. तेथे राज्यांनी निवडलेले प्रतिनिधी एकत्र येऊन मतदान करून आपल्या पक्षाचा उमेदवार ठरवतात. या मतदानाच्या निकालानुसार पक्षाची उमेदवारी अंतिमत: कुणाला मिळणार ते ठरून त्याची अधिकृत घोषणा होते. अशा प्रकारे निवडलेले दोन्ही पक्षांचे उमेदवार आपापला प्रचार करून सुरुवातीला सांगितलेल्या ‘Electoral College’ द्वारा २७० मतांची बेगमी करून White House चा दरवाजा आपल्यासाठी उघडायचा प्रयत्न करतात. हा प्रचारही देशव्यापी, अत्यंत खर्चीक, प्रचंड दगदगीचा व उमेदवारांचा अनेक प्रकारांनी कस पाहणारा असतो. या प्रचारमोहिमेचे बारकावे पुढील लिखाणात पाहू या. आजमितीला माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेसह रिपब्लिकन पक्षाकडे ३-५ इच्छुक आहेत; तर डेमोक्रॅट पक्षाकडे विद्यमान अध्यक्ष बायडन यांचेसह तब्बल १०-१२ इच्छुक आहेत. खरेतर विद्यमान अध्यक्षालाच पुन्हा एकदा उमेदवारी द्यायची असा एक संकेत आहे; परंतु जो बायडन यांचे वय व त्यांची एकंदरीत कामगिरी पाहता त्यांना पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन मिळेल का हा कुतूहलाचा विषय आहे.
The Only reason to vote for a democrat is when you are tired of Winning ! – Donald Trump
