अमूर्ततेचा शोध

भारतात अनेक जातींची, वेगवेगळ्या धर्मांची, विविध पंथांची, विविध भाषांची, वेगवेगळ्या विचारसरणींची, वेगवेगळा पेहराव करणाऱ्यांची जशी रेलचेल  आहे तसेच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण वास्तववादी चित्रं काढण्यात, काही जण व्यक्तिचित्रं रेखाटण्यात; तर काही जण निसर्गचित्रांत माहीर असतात. काही जण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेले असतात. या सर्व चित्रकारांची माध्यमेही वेगवेगळी असतात. काही चित्रकार जलरंग, काही तैलरंग; तर काही जण ॲक्रेलिक रंगांचा वापर करतात.   एकाच विषयाच्या  वेगळ्या अमूर्त आकारांच्या चित्रशोधकार्यात कलाकार मंडळी कधी पाहून रंगवत असतात; तर काही जण प्रथम रंगवतात व नंतर पाहत असतात. प्रत्येकाची रंगवण्याची पद्धती वेगवेगळी असते. माझा एक जिज्ञासू चित्रकार मित्र भेटला की मला नेहमी अमूर्त चित्रांविषयी माहिती विचारायचा; पण त्याच्या प्रश्नांना उत्तरे देताना मी भांबावून जायचो; कारण ॲब्स्ट्रॅक्ट  चित्र काढणे एक अवघड आणि तितकीच सोपी पण आव्हानात्मक, मानसिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे मला आजही प्रामाणिकपणे वाटते .

                 १९९३ साली उमेदीच्या काळात मी मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीटला पारशी डेअरीशेजारी असलेल्या प्रसिद्ध केमोल्ड फ्रेम्समध्ये कामाला होतो. त्या ठिकाणी अनेक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे फ्रेमिंगसाठी येत असत. एके दिवशी  मजबूत पॅकिंग केलेले एक मोठे पार्सल स्पेशल गाडीत घेऊन कंपनीचे मालक केकू गांधी स्वतः वर्कशॉपला आले होते. एका मोठ्या चित्रकाराचे चित्र  महागडी फ्रेम करण्यासाठी ते घेऊन आले होते. ते अमूर्त चित्र एक कोटी रुपयांचे असून त्या चित्राला कंपनीद्वारे खास विमा संरक्षण  दिले होते; त्यामुळे त्या चित्राची फ्रेम काळजीपूर्वक करून घेण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे होते.

                वर्कशॉपचा इनचार्ज म्हणून मी काम करत असल्याने त्या चित्राची पूर्ण जबाबदारी माझी होती. त्यासाठी मी सर्व तयारी केली; पण मला चित्र समजून घेण्याचीही मोठी उत्सुकता होती. वर्कशॉपला एक मोठे बहिर्वक्र भिंग घेऊन ते अमूर्त चित्र इतके महाग का आहे याचाच शोध घेण्याचे ठरवले. ते चित्र पूर्ण रात्रभर अगदी जवळून भिंगातून मी पाहत होतो. कधी दुरून पाहायचो. त्या अद्भुत चित्राचे आकार, रंगांचे ॲप्लिकेशन भलतेच वेगळे वाटत होते. कशाचा कशालाच मेळ लागत नव्हता. कधी वाटायचे फाटक्या विविध रंगांच्या लहानमोठ्या  चिंध्या एका लाकडाच्या तुकड्यात अडकल्या आहेत; तर कधी वाटायचे ह्या छोट्या छोट्या आकारांच्या रंगांच्या फटकाऱ्यांमुळे या चित्रात एक वेगळी रंगसंगती तयार झाली आहे. संपूर्ण चित्रात एक निर्जर,निवांत शांतता पसरली आहे असे वाटायचे. कधी वाटायचे एक निवांत बेदरकार वाहणारी नदी एका नादभऱ्या तालात मनसोक्तपणे, स्वच्छन्दीपणे वाहत आहे. ते चित्र गतिमान वाटायचे; तर काही अँगलमधून शांत वाटायचे. अनेक वेळा पाहूनही मला त्यावेळी त्याचा अर्थ नक्की समजला नव्हता. त्या चित्राचे न समजलेले आकार, रंग, चित्राची रचना कित्येक वर्षं कायमची डोक्यात ठाण मांडून बसलेली होती. ते अमूर्त चित्र नक्कीच विसरण्यासारखे नव्हते.

          पावसाळा संपल्यामुळे आज सकाळी  स्वच्छ वातावरण होते. मेणवली गावाजवळ कृष्णा नदी वाहते तेथे निवांतपणे फिरायला नदीकिनारी गेलो होतो.  हिरवागार परिसर, थंड हवा व नुकतीच सूर्याची किरणे पडत असल्याने पाण्याचा खळखळाट व त्या पाण्यावरील प्रतिबिंब मोत्याचा सर विखुरल्यासारखे  चमकत होते. अनेकविध पक्ष्यांच्या चिवचिवटामुळे आसमंतात एक वेगळे नादभरे संगीत कानांवर पडत होते.

             नदीच्या किनाऱ्यावर चालताना मात्र एकदम वेगळेच अद्भुत चित्र दिसले. नदीच्या प्रवाहातून वाहत आलेली घाण, माणसांनी टाकलेले, फाटलेले रंगीबेरंगी कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या, बारदाने , थर्माकोलच्या वस्तू, बिसलरीच्या बाटल्या, जुन्या बॅगा, वापरलेल्या बुटांच्या व चपलांच्या जोड्या झाडांच्या मोठमोठ्या बुंध्यांवर व लटकत्या फांद्यांवर लोंबकळत होत्या . 

   ती लाल,पिवळी,जांभळी  अनेकरंगी छोटी-छोटी फाटकी  लक्तरे  निसर्गाच्या मोठ्या कॅनव्हासवर जणू अमूर्त चित्रांसारखी वाऱ्यावर डोलत होती. त्यांच्या एकत्रित असण्याने, फडकण्यामुळे त्या कॅनव्हासला एक अद्भुत गूढता निर्माण झाली होती. त्या चमकणाऱ्या सूर्यकिरणांच्या साक्षीने तो कॅनव्हास आता एक मोठे अमूर्त पेंटिंग असल्यासारखाच भासत होता. 

          तीस वर्षांनंतर त्या अमूर्त चित्राचा विषय आता मनामध्ये हळूहळू पूर्णपणे उलगडत होता. माणसांनी टाकलेल्या अनेक बिनवापराच्या वस्तू, माणसांनी टाकलेला कचरा माणसांसाठीच  किनाऱ्यावर सोडून नदी स्वच्छंदपणे पाण्याच्या प्रवाहाचा खळखळाट करत नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या ध्येयाने, नव्या आकांक्षेने वाहत चालली होती… 

नव्या अमूर्ततेच्या शोधात… 

कोणतीही अपेक्षा, कोणतीही गुंतागुंत, कोणतीही तक्रार न करता, मनात कोणतीही अढी न ठेवता स्वच्छ  नदी वेगाने वाहत चालली होती…  

नव्या अमूर्ततेच्या शोधात… 

        आपणही कोणतीही अढी,  कोणतेही वादविवाद डोक्यात न ठेवता नदीसारखे स्वच्छ वाहत  राहिले पाहिजे. कशातही गुंतून न राहता  जात-पात-धर्म, उच्च-नीच, आशा-अपेक्षांचा डोक्यात साचलेला कचरा, राग, लोभ, मोठेपणाची हाव किनार्‍यावरच सोडून दिली पाहिजे आणि जीवनात मुक्तपणे आशाविरहित निर्विकार प्रवास केला पाहिजे नदीप्रमाणे… 

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

Author

Leave a Reply