एक न-खेळाडूंचा क्रिकेट सामना

   ‘भारताची ओळख काय?’  असा प्रश्न जर विचारला तर सिनेमा व क्रिकेट यांचे वेड  हे एक संभाव्य उत्तर देता येईल. आपण सर्वजण नुकतेच जागतिक करंडकाच्या निमित्ताने भारतात आलेल्या क्रिकेट प्रेमाच्या साथीतून हळूहळू बरे होत आहोत.  या क्रिकेट प्रेमाला मराठी सारस्वतदेखील कसे अपवाद  असेल? नानासाहेब गोरे,  माधव मनोहर, ग.  ल.  ठोकळ इत्यादी मान्यवर  गोलंदाजी, फलंदाजी करत आहेत,  चेंडूमागे जमेल तसे धावत आहेत  आणि त्यांना रणजीत देसाई, दि.बा.मोकाशी उत्तेजन देत आहेत हे चित्र म्हणजे आत्यंतिक  कल्पनाविलास वाटण्याची शक्यता आहे; परंतु मंडळी असा क्रिकेट सामना नारायणगाव येथे झालेला आहे  आणि त्याचा वृत्तांत दस्तूरखुद्द दि . बा.  मोकाशी यांनी  लिहिलेला आहे. या वेगळ्या क्रिकेट  सामन्याचा  आनंद घेऊ या. 

   हा लेख करत असतानाच  वि.ग. कानिटकर यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीधर कानिटकर यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्याकडून आणखीन एक-दोन रंजक तपशील मिळाले.  २६ जानेवारी हा कै.कानिटकर यांचा  वाढदिवस.  वाढदिवसाला अनेक मित्रमंडळी येऊन ताप देत असत; त्यामुळे त्याला वळण देण्यासाठी अशा प्रकारचे क्रिकेट सामने योजण्याची  त्यांची कल्पना!!  श्रीधर कानिटकर यांच्या स्मरणाप्रमाणे जवळपास दहा वर्षे असे संमेलन, मेळावे व क्रिकेटचे सामने झाले. फर्ग्युसन कॉलेजचे उत्तम क्रीडांगण व क्रीडासाहित्य प्राचार्य बाळ गाडगीळ यांच्यामुळे उपलब्ध होत असे. त्या वेळेस लहान असलेली त्यांच्यासारखी सर्व मुले-मुली उत्साहाने या सामन्यांसाठीचे स्वयंसेवक म्हणून काम करीत असत. दहा वर्षांनंतर मात्र हा उपक्रम थांबला.

:  संपादक 

एक न-खेळाडूंचा क्रिकेट सामना 

दि.  बा.  मोकाशी

गेल्या वर्षी, निमित्ताने खंड पडलेले, व प्रत्येक 26 जानेवारीस भरणारे साहित्यिक, चित्रकार, प्रकाशक, संपादक यांचे अनौपचारिक स्नेहसंमेलन नारायणगाव, जि. पुणे येथे साजरे झाले !  गेले दोन-तीन वर्षे, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे अनंतराव कुलकर्णी,  नारायणगाव येथील त्यांची शाळा पाहण्यास आम्हाला निमंत्रण देत होते.  यंदा त्यांचे निमंत्रण मी सर्वांच्या वतीने माझ्या जबाबदारीवर स्वीकारले.  कारण त्यात जबाबदारी नव्हती ! असले निमंत्रण कुणी  नाकारण्याचे कारण नव्हते असे मला वाटले.  मागील संमेलनाच्या वेळी एक आयोजक असलेले ‘सोबत’ चे संपादक ग. वा.  बेहेरे यांच्याशी सल्लामसलत करून माझ्या सहीने पत्रक तयार केले. 

या संमेलनाला निमंत्रणाचा औपचारिकपणा राहू नये ही आमची प्रथमपासूनची कल्पना.  निमंत्रण-पत्रके धाडावयाची ठरली की नावे व पत्ते आठवणे व विसरली की नाखुषी  हा प्रकार येतो.  पुढील वेळेस वरील व्यवसायातील सर्वांनी आमंत्रणाची वाट न पाहता मोकळेपणाने यावे अशी इथे एक विनंती करून ठेवतो.  यावर्षीच्या या स्नेहसंमेलनाचा विशेष म्हणजे ते एका लहान गावात झाले.  लहान गावातील लोकांना,  ऐकलेल्या नावांच्या व्यक्ती पहावयाचे कुतूहल असते.  त्यामुळे नारायणगावला जाण्यात खेड्यातील वाचकांशी आम्ही थोडा संपर्क साधला असे म्हटले तरी हरकत नाही.  तेथील शाळेतील शिक्षिका व शिक्षक यांच्याशी परस्पर ओळखीचा कार्यक्रम चालू असता त्यांचे हे कुतूहल पुरे होत आहे हे लक्षात आले.  आमची क्रिकेट मॅच पहावयालाही आम्हाला खूप प्रेक्षक त्यामुळे मिळाले.  पुण्याला आम्हीच आमचे प्रेक्षक असतो!!

 या वेळी काही नवी मंडळी आली होती.  नानासाहेब गोरे, माधव मनोहर,  ग. ल. ठोकळ, रणजीत देसाई, काकतकर,  रा. बा. कुलकर्णी,  रंगा मराठे अशी काही नावे सांगता येतील.  सर्वच वातावरण अतिशय खेळीमेळीचे व थट्टामस्करीचे होते.  नारायणगावात उतरताच शाळेच्या मुलांनी केलेल्या ध्वजवंदनात आम्हीही भाग घेतला.  नंतर चहापाणी होऊन क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली. 

 नाणेफेकीत प्रकाशक-संपादक संघाने नाणे जिंकले. हा  सामना सर्वसाधारणपणे साहित्यिक विरुद्ध इतर असा होता.  अर्थात गडी वाटताना समविभाग पडावा म्हणून काही इकडची नावे तिकडे होतात.  काही वस्ताद, दोन्हीकडे खेळायला पाहतात.  चेंडू आणायला धावायचा त्यांना कंटाळा असतो.  निरनिराळ्या प्रौढ वयातील ही मंडळी खेळताना पाहून मोठी गंमत वाटते.  नानासाहेब गोरे,  माधव मनोहर अशी वयस्क  मंडळी कॅच घ्यायला धडपडत आहेत,  चेंडू अडवायला धावत आहे याचे चित्र डोळ्यास पुढे उभे करा म्हणजे यातली गंमत लक्षात येईल!  या वयात पोट सुटलेले असल्याने पुष्कळांची धावताना होणारी धांदलही त्यातलीच.  चेंडू टाकताना सरळ फेकणारे काही होते.  बहुतेकांनी पावडे धरावे तशी बॅट धरली होती!  पण हौस दांडगी! अशी अडवी बॅट  धरूनही  बाद व्हावयास त्रास देणारे वीर होते.  त्यांच्या बॅटीला चेंडू का अडतो,  हे कळत नसे.  त्याचप्रमाणे चेंडू टाकणाऱ्यांनाही कोणी बाद झाल्यावर तो स्टम्पवर  का लागला हे कळत नसावे!  प्रत्येकाला बॉलिंग हवे होते,  व चेंडू आणायला धावण्यातही तशी कसूर नव्हती.  सु. सा. च्या काकतकरांना धोतर वर करून चपळाईने धावताना पाहिल्यावर जिराफाचीच आठवण यावी!  सर्वात मनापासून चेंडू अडवण्याचे व बाउंड्री वरून आणण्याचे काम त्यांनी केले.  खेळण्यात व बॉलिंग मध्ये दर्दी अशी चार-पाच मंडळी होती.  विद्याधर पुंडलिक,  मुकुंदराव किर्लोस्कर,  अनंतराव कुलकर्णी,  पद्माकर गोवईकर,  सोनटक्के.  पण यांच्या दर्दीपणाचा या रामभरोसे खेळात फारसा उपयोग नव्हता!  अनपेक्षित चेंडूने ते आऊट होत किंवा अनपेक्षित फलंदाज त्यांचे चेंडू हाणत राही.  कोणताही खेळ खेळाचे नियम पाळले नाहीत की त्यातल्या दर्दी खेळाडूंनाही गोंधळात टाकीत असावा. 

 या मॅचमध्ये लेखक जिंकले.  ‘लेखक नको तिथे जिंकत असतात’ असा रणजित देसायांनी थट्टेत शेरा मारला!

 खेळानंतर भोजन झाले.  भोजनाचा बेत खेडेगावी होता व तो सर्वांस अतिशय रुचला.  बाजरीची भाकरी,  वांग्याची भाजी,  पिठले,  लोणी,  मसालेभात,  ताक व शेवटी तोंड गोड करायला शिक्रण.  वर्षातून एकदा होणाऱ्या या व्यायामानंतर सर्वांनाच भूक लागली होती.  जेवणानंतर पान-सिगारेट चघळीत काही वेळ आराम केला.  नंतर दुपारचा,  शाळेच्या अध्यापक वर्गाशी परिचयाचा कार्यक्रम सुरू झाला. विद्यामंदिराचा इतिहास सांगण्यात आला.  या शाळेचे प्रवर्तक श्री सबनीस.  त्यांनी गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांनी ही शाळा उभी केली व आज त्यांच्यानंतरही ती चांगले कार्यकर्ते लाभल्याने प्रगतीपथावर आहे.  

सामन्यानंतर लगेच ना. सं.  इनामदार यांच्या ‘मंत्रावेगळा’  या कादंबरीचे प्रकाशन नानासाहेब गोरे यांच्या हस्ते झाले होते.  आमच्यापैकीच एकाचे हे  कौतुक सर्वांनी मानले,  पण या बाबतीत या स्नेहसंमेलनात भाग घेणाऱ्या सर्व मित्रांना माझी विनंती अशी की,  या अनोपचारिक सहलीत असे समारंभ टाळावेत.  निदान भाषणे वगैरेचा औपचारिक भाग आवर्जून टाळावा. ‘ पुस्तक प्रकाशित झाले’  असे एका वाक्यात म्हणावे व मोकळे व्हावे ! ‘हस्ते ‘ वगैरेही टाळावे.  सर्व जमलेल्या मित्रांच्या हस्ते झाले असे समजावे.  या विनंतीचा हेतू एवढाच की,  या स्नेहसंमेलनाचे अनौपचारिक खिलाडू रूप कायम राहावे. 

 झालेल्या मॅचमध्ये लेखक संघात सर्वात जास्त म्हणजे ३४ धावा क. दि. सोनटक्के यांनी काढल्या व प्रकाशक- संपादक संघात शं. ह. देशपांडे (विशाल सह्याद्रि) यांनी २५ धावा काढल्या.  लेखक संघाच्या एकूण धावा ९२ झाल्या व प्रकाशक-संपादक संघाच्या ८६ धावा झाल्या.  क्रिकेटच्या सामानाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे बाळ गाडगीळ यांनी अंगावर घेतली होती. 

नारायणगावच्या विद्यामंदिराचे क्रीडांगण छान विस्तृत आहे.  तेथे खेळपट्टी तयार करून ठेवलेली होती. नारायणगावची सर्वच व्यवस्था अनंतराव कुलकर्णी यांनी अतिशय चोख व तत्पर ठेवली होती.  

प्रजासत्ताक दिनी असा सामना होण्याचे हे चौथे वर्ष.  दरवर्षी याची ‘लोकप्रियता’ वाढते आहे.  तशी वाढत राहो.  ती वाढताना पाहून सर्वांना आनंदच होईल.  विशेषता या कल्पनेचे उत्पादक वि.  ग.  कानिटकर यांना.  ते व ‘सोबत’ चे ग. वा. बेहेरे यांनी प्रथम वर्षाची आखणी केली व वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा रथ चालू झाला.  या विषयात माझी पुन्हा एकदा विनंती ही की,  सर्व मित्रांनी या संमेलनातल्या अनौपचारिकता व खेळकरपणा याचे कसोशीने संगोपन करावे,  त्याला बाध येईल असे काही करू नये. 

सरते शेवटी पुढील वर्षीच्या स्नेहसंमेलनासाठी ग. ल.  ठोकळ,  वि. ग.  कानिटकर आणि मी स्वतः अशी तिघांची निवड होऊन संमेलन संपले.  विद्यामंदिराचे कुक्कुटपालन केंद्र पाहून संध्याकाळी आम्ही पुण्याकडे परतलो.  

* आमचे वडील  दि.  बा.  मोकाशी यांचे हे लेखन कोणत्या मासिकात/साप्ताहिकात व कधी प्रकाशित झाले ते वर्ष सापडले नाही. 

संपर्क 

बिंबा जोशी-९८८१०७२४७२; ज्योती कानिटकर ९८१८३६९३२८ 

माहिती व लेखाचे छायाचित्र अजित कानिटकर यांचे सौजन्याने . 

Author

Leave a Reply