आत्ता या क्षणी… 

मागणं

आज लग्नाचा पन्नासावा  वाढदिवस, बोल तुला काय देऊ? 

फूल, अत्तर, साडी? 

अरे हो, तुझा विश्वास तर ढगात बसलेल्या देवाला साकडं घालण्यावर आहे नाही का?

त्याच्याकडेच सतत काही ना काहीतरी मागत असतेस! आमचं दीर्घायुष्य असो, मुलाचा संसार असो, मुलीची बढती असो – सतत दुसऱ्यासाठी मागणं असतं. 

मग म्हणतेस की “तुमच्या भल्यातच माझं भलं आहे, माझ्यासाठी वेगळं काय मागणार?” 

पण आज मी काहीतरी मागतो.

 “सत्तरी पार केली तरी हरकत काय? 

तुझ्यातली हरवलेली रती मागतो 

 लगेच डोळे भरून येतात तुझे

तुझ्या काजळाची सलामती मागतो” 

वन्स मोअर

ती – तू ऐकवत राहिलास, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर,’ 

माझे बेभान होऊन वन्स वर वन्स मोअर! खरंतर हे फीमेल व्हॉईसमधलं गाणं – पण तू म्हंटलं भारी हां… क्राउडलाही तेच हवं होतं रे, तुझं तल्लीन होऊन गाणं…

 तो – आणि मी तिथे, “माझ्याशी लग्न करशील?” म्हंटलं असतं तर? कितीतरी तरुणी होत्या गर्दीत… 

ती – आता सगळ्या गर्दीतून तुला माझंच वन्स मोअर ऐकू आलं, म्हणजे कमाल आहे की नाही?… 

मर्मबंधातली ठेव

खूप वर्षांनी आले तुमच्या वाड्यात. त्याला अल्झायमर्स झाल्याचं ऐकलं. आताशा त्याला माणसं आणि एकंदरच फार कमी ओळखू येतं म्हणे… मलाही विसरला असेल का तो? अंगणातलं चाफ्याचं झाड, परसातली विहीर, ओसरीतल्या फडताळातल्या कप्प्यातले जुने फोटो विसरला असेल? 

ती वही… त्यात दडवून ठेवलेली माझ्या फर्माइशीची गाणी त्याच्या खोलीत ग्रामोफोनवर तो नक्की न चुकता लावायचा… माझ्या आवडीचे गाणे…बस्स… नको आठवायला. 

स्मृतींचीच स्मृती चालली… नाही  बघवत, त्याच्याशी भेटही नको… येते  मी. 

निघताना त्याच्या खोलीतल्या ग्रामोफोनवर गाणं लागलेलं… मर्मबंधातली ठेव ही…

समोसा

तू लिहिलेल्या पत्रांचा ना, ढेर साचलाय… तो जपून ठेवलाय उशाशी. बेरात्री जाग आलीच तर वाचून पुन्हा झोपून जाते बिनदिक्कत

… उत्तरं तर लिहिलीत पण कधी पाठवायची हिंमत नाही झाली. काय करू त्यांचं?? रद्दीत विकू? त्या नाक्यावरच्या समोसेवाल्याला?? 

माझ्या पत्रात बांधून देईल समोसे… मला माहीत आहे रोज सकाळी तू तिथेच नाश्ता करतोस… कदाचित एखाद्या कागदावरचं हस्ताक्षर तुला माझी आठवण करून देईल…कोण जाणे… 

Author

One thought on “आत्ता या क्षणी… 

  1. सगळ्या अलक खूपच अर्थपूर्ण, अंतर्मुख करणार्या आणि खोल आशय व्यक्त होणार्या आहेत. अशीच लिहीत रहा.

Leave a Reply