शांताबाई शेळके
शांता शेळके हे नाव अगदी लहानपणापासून माहीत झालेले होते. पाठ्यपुस्तकातील त्यांची ‘बघ आई आकाशात सूर्य हा आला’ सारखी कविता पाठ करताना त्याखालचे ‘शांता ज. शेळके’ हे नावदेखील मी पाठ करून ठेवले होते; मग हळूहळू त्यांचे बालसाहित्य – तीन शिलेदारसारखी रूपांतरित कादंबरिका वाचता वाचता, मी त्यांच्या परदेशी चित्रपट कथांपर्यंत पोहोचलो. त्यांची चित्रपटगीते, भावगीते, कोळीगीते तर कानांवर पडून पडून आवडायला लागली होती आणि मोठे होता होता त्यांच्या कविता वाचू आणि रेडिओवरील कविसंमेलनांतून ऐकू लागलो होतो; पण त्यांची प्रत्यक्ष भेट झाली ती १९७७ मध्ये.
निमित्त होते दूरचित्रवाणीवरील नवोदितांचे कविसंमेलन. महाराष्ट्र टाइम्सच्या मासिक कविता स्पर्धेत निवडलेले दहा नवोदित कवी – ज्यात मी होतो; त्यात सहभागी झाले आणि या नवकवींशी त्यांच्या कवितांवर बोलायला, त्यांना निवडणारे पाच प्रथितयश परीक्षक होते, ज्यात शांताबाई होत्या.
भेट ओझरतीच होती; पण लक्षात राहिले ते त्यांचे कवितेला व्यासपीठावरूनच भरभरून दाद देणे. १९८२ मध्ये माझा ‘होड्या’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि तो भेट द्यायला मी साहित्य सहवासमध्ये गेलो होतो. माझ्याबरोबर कविमित्र निरंजन उजगरे होता. शांताबाईंच्या घरी जायला आम्हांला खूपच उशीर झाला – रात्रच – पण आम्ही गेलो. श्री प्रभुणे यांनी दार उघडले. आम्ही आमची नावे आणि काम त्यांना सांगितले. आतल्या खोलीतून शांताबाईंनी डोके बाहेर काढले. त्या म्हणाल्या, “माफ करा हं. मी अगदी घरच्या कपड्यात आहे.” निरंजन म्हणाला, “काही हरकत नाही. आम्हीच इतक्या उशिरा आल्याबद्दल माफी मागायला हवी; पण तुम्हांला भेटायचेच होते.” नेहमी बाहेर टापटीप साडी आणि डोक्यावरून पदर घेऊन वावरणाऱ्या शांताबाईंना नाईट गाऊनमध्ये आमच्या समोर यायला, तेव्हा त्या साठीच्या घरात असल्या तरी चक्क लाज वाटत होती! पण आम्ही दिलगिरीयुक्त आग्रह केल्यावर त्या बाहेर येऊन बसल्या. आमचे आगत-स्वागत झाले. मी माझा नवा कोरा कवितासंग्रह त्यांना दिला. त्या म्हणाल्या, “मी प्रतिभेट म्हणून तुमच्यासारख्या कवीला आपल्या स्वतंत्र कवितांचा संग्रह द्यायला हवा; पण आत्ता माझ्याजवळ त्यांच्या प्रती नाहीत.” म्हणून त्यांनी मला त्यांचा ‘तोच चंद्रमा’ हा गीतसंग्रह दिला. तोही अर्थातच त्यांच्या स्वतंत्र कवितांप्रमाणेच मनोरम होता. माझ्या काही विडंबन कविता एकत्रित करून लिहिलेला, त्या वर्षीच्या दिवाळी अंकात आलेला ‘मर्ढेकर ते जोगळेकर – एक अतिजलद काव्यप्रवास’ हा माझा लेख त्यांनी वाचला होता. त्याची आठवण काढीत त्या म्हणाल्या,”फार बारकाईने लिहिला आहे तो तुम्ही.” खरेतर तो त्यांनी फार बारकाईने आणि जाणकारीने वाचला होता हे त्यांच्या बोलण्यावरून समजत होते. हे मी बोलून दाखवायला हवे होते; पण माझ्या मुखदुर्बळपणामुळे मला ते जमले नव्हते. शांताबाईंचा आणि प्रभुण्यांचा निरोप घेऊन आम्ही परत फिरलो.
पण या छोट्याशा भेटीमुळेच धीर येऊन पुढे मी त्यांना पत्र लिहिले होते. त्याचे असे झाले होते की, माझा ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ हा विडंबन कवितासंग्रह मी ‘श्री प्रकाशना’तर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी पाठवला होता . श्री प्रकाशनाचे सर्वेसर्वा विजय हरि वाडेकर यांनी मला आतल्या गोटातील बातमी म्हणून, ‘विडंबन कविता या कविताच नव्हेत,’ अशा विचाराने मंडळाचे परीक्षक तो नाकारू शकतात असे सांगितले. ते ऐकून मी अस्वस्थ झालो आणि मी ‘चांगली विडंबन कविता ही चांगली कविताच असते,’ ही माझी भूमिका स्पष्ट करणारे पत्र शांताबाईंना पाठवून त्यांचे मत विचारले होते. शांताबाईंचे माझ्या पत्राला उत्तरही आले. त्यांनी माझ्या मताला दुजोराच दिला होता. पूर्वीपासून मराठी काव्यक्षेत्रात विडंबन कवितांची परंपरा असल्याचे त्यांनी लिहिले होते. त्यासाठी त्यांनी ज. के. उपाध्ये यांच्या भगवद्गीतेचे विडंबन करणाऱ्या ‘चालचलाऊ भगवद्गीते’ चा दाखला दिला होता. आपले मत त्यांच्यासारख्या जाणकार व्यक्तीला पटते आहे याचे मला समाधान वाटले. पुढे ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ ला अनुदानही मिळाले. त्यावेळी शांताबाई परीक्षकांत होत्या किंवा काय हे मात्र मला कधी कळले नाही.
त्यानंतर शांताबाईंची प्रत्यक्ष भेट मुंबईला दूरदर्शनवरील हास्यकविसंमेलनात झाली. त्यात मंगेश पाडगांवकर होते, शांताबाई होत्या आणि इतर मोठे कवी होते. पोरसवदा कवी मी एकटाच होतो. कार्यक्रमाआधी शंकर वैद्य काहीसे नर्व्हस झाले होते. ते सूत्रसंचालन करणार होते. ते मला म्हणाले,”तुम्ही माझ्यासारखे नर्व्हस होऊ नका.” मी म्हणालो, “नाही,नाही! मी माझ्यासारखाच नर्व्हस होईन.” हे बोलणे वैद्यांनी पाडगांवकरांना सांगितले. पाडगांवकर हसले, म्हणाले, “There he will have his originality!” कार्यक्रमाआधी स्टुडिओत कॅमेऱ्यासमोर येणाऱ्या सर्वांचा मेकअप केला जायचा. पाडगांवकर मजेत हास्यविनोद करीत होते. शांताबाई मेकअप रूममध्ये गेल्या, तेव्हा पाडगांवकर खुसखुसत आपल्या मित्रकवींना म्हणाले, “ओहोहो! शांताबाई आणि लिपस्टिक!!” कायम डोक्यावरून पदर घेऊन शालीन चेहऱ्याने वावरणाऱ्या शांताबाई लिपस्टिक लावणार या कल्पनेनेच पाडगांवकरांना हसू येत होते; पण लावलेल्या थोड्याशा मेकअप नंतरही शांताबाईंचा चेहरा तेवढाच सोज्ज्वळ दिसत होता. कार्यक्रमात मी माझ्या विडंबन कविता वाचल्या. त्या ऐकताना स्टेजवरूनच शांताबाई मोठ्यांदा हसून दाद देत होत्या. अशी दाद मिळाली की श्रोतेही अधिक दाद देऊ लागतात. काही मोठे कवी मात्र हा पोरटा बाजी मारून जाणार की काय अशा विचाराने अस्वस्थ झाले होते; पण शांताबाईंची अशी दाद मला नेहमीच मिळत राहिली .
त्यानंतर शांताबाई भेटल्या त्या केसरीवाड्यातल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात झालेल्या कविसंमेलनात. आयोजकांनी वसंत बापट, नारायण सुर्वे आणि शांताबाई या तीन मान्यवर कवींबरोबर अरुणा ढेरे आणि मी अशा दोन नव्या कवींना बोलावले होते. वसंत बापट सूत्रसंचालन करणार होते. त्यांनी सुर्वे आणि शांताबाईंना सांगितले, “आपण तिघे या कविसंमेलनाचे डोके, धड आणि पाय – सुरुवात,मध्य आणि शेवट! आपल्या तिघांमध्ये या दोघांना सांभाळून घेऊ.” पण शांताबाईंनी नेहमीप्रमाणे भरभरून दाद देऊन आम्हांला नुसते सांभाळूनच नाही तर उचलूनच घेतले!
माझ्या कविता नियतकालिकांतून दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होत होत्या. दिवाळी अंकांवर आकाशवाणीवर चर्चा व्हायच्या. एका कार्यक्रमात शांताबाई होत्या. कवितांवर बोलताना त्यांनी माझा ‘सातत्याने लक्षणीय कविता लिहिणारा कवी’ म्हणून उल्लेख केला होता. अक्षर दिवाळी या दिवाळी अंकांतील निवडक साहित्य प्रसिद्ध करणाऱ्या वार्षिक अंकाच्या संपादक मंडळात त्या काही वर्षे होत्या.
माझ्या कविता जवळजवळ सर्वच वार्षिक अंकांत निवडल्या गेल्या होत्या.
शांताबाईंची प्रत्यक्ष निवांत भेट झाली ती बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेने आयोजित केलेल्या १९९२ च्या वार्षिक संमेलनात. शांताबाई त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. कविसंमेलनासाठी बाहेरगावहून अरुणा ढेरे, निरंजन उजगरे ,प्रवीण दवणे आणि मी निमंत्रित होतो. संमेलनाध्यक्षांची राहण्याची सोय परिषदेच्या अध्यक्षांच्या घरी केलेली होती. त्यांच्याबरोबर अरुणाही होती. निरंजन व प्रवीण सपत्नीक आले होते. आमची राहायची सोय इतरत्र होती. अरुणा शांताबाईंबरोबरच त्यांच्या तैनातीत गुंतली होती. आम्ही इतर कवी बडोद्यातल्या परिषदेचे तरुण कार्याध्यक्ष रविकांत जोशी यांच्याबरोबर रिकाम्या वेळात बडोद्यात उंडारत होतो. कविसंमेलनात माझ्या गंभीर कविता वाचून झाल्यानंतर श्रोत्यांनी विडंबन कवितांची फर्माईश केली. मी विडंबनकविता वाचून दाखवत असताना स्टेजवरून शांताबाईंनी आणि अरुणाने भरभरून हसून दाद दिली. शेवटच्या दिवशी अध्यक्षीय भाषणावर चर्चेचे एक सत्र होते. निमंत्रित वक्ते आले नव्हते म्हणून आम्हां कवींनाही त्यात बोलण्यासाठी बोलावले गेले. मी बोलताना म्हटले, “शांताबाईंसारख्या साहित्यक्षेत्रातील जाणकार व्यक्तीचे भाषण मी श्रद्धापूर्वक ऐकले. ते नक्कीच चिंतनीय मननीय होते; पण त्यांनी व्यक्त केलेल्या काही मतांबद्दल मला काही वेगळे वाटते.” असे बोलून मी काही मतभेदाचे मुद्देही मांडले. आपल्या अध्यक्षीय समारोपात शांताबाईंनी माझ्या बोलण्याचा आवर्जून उल्लेख केला आणि माझे काही मुद्दे मान्य केले. त्यांच्यासारख्या मोठ्या कवयित्रीकडे माझ्यासारख्या छोट्या कवीचे म्हणणे मान्य करण्याचा दिलदारपणा होता. कार्यक्रमाव्यतिरिक्तच्या अनौपचारिक गप्पांत त्यांनी मला पूर्वसुरींपैकी कोणते कवी आवडतात तेही विचारले. माझ्या यादीत रविकिरण मंडळाचे कोणतेच कवी नसावेत याची त्यांना खंत वाटली होती. रविकिरणीय कविता त्यांच्या मर्मबंधातली होती.
माझ्या स्वतंत्र कवितांचे दुसरे पुस्तक ‘मनातले घर’ची संहिता तयार झाल्यावर मी प्रकाशकाच्या शोधात होतो. मौज – पॉप्युलरसारख्या कवितांच्या प्रकाशानात अग्रणी असलेल्या प्रकाशकांकडे माझ्या कविता संग्रहाचा नंबर लागत नव्हता. निरंजन उजगरेने मला माझा संग्रह शांताबाईंना दाखवायला सांगितला. त्यांना जर तो आवडला तर त्या त्यांच्या प्रकाशकाकडे त्याची शिफारस करतील असे त्याला वाटत होते. मी माझ्या ‘मनातले घर’ची संहिता शांताबाईंना नेऊन दिली आणि त्यांना तो कसा वाटतो आहे ते सांगायची विनंती केली. शांताबाईंनी संग्रह हातात घेऊन पाहिला. त्यावर ‘सावित्रीस’ एवढीच अर्पणपत्रिका लिहिलेली पाहून त्यांनी आश्चर्याने विचारले, “तुमच्या पत्नीचे नाव सावित्री आहे?” मी त्यांना ही सावित्री पु.शि.रेगे यांची सावित्री आहे असे सांगितले. एका कवीने आपला संग्रह रेग्यांच्या कादंबरीच्या नायिकेला अर्पण करावा याचे त्यांना कौतुक वाटले. त्या म्हणाल्या, “मी संपूर्ण संग्रह निवांतपणे वाचते आणि मग माझे मत सांगते.” शांताबाईंनी संग्रह वाचला आणि मग वेळ ठरवून त्या स्वतः माझ्या घरी आल्या. त्यांनी संग्रहावर सविस्तर चर्चा केली. त्यांना आवडलेल्या कविता सांगितल्या . काही कवितांतील उणिवाही सांगितल्या. जवळजवळ तासभर त्या बोलत होत्या. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ माझा संग्रह वाचण्यासाठी दिला आणि त्यावर इतके सविस्तर मतप्रदर्शन केले ही खूप मोठी गोष्ट होती; पण हा संग्रह त्यांच्या प्रकाशकाकडे द्यावा असे काही त्यांनी सुचवले नाही. मग मीही त्यांना तसे विचारले नाही. पुढे हा संग्रह कविमित्र अरुण म्हात्रेच्या ‘नव्यांची अक्षर चळवळ’ प्रकाशनाने काढला.
पुण्यात अनिल कांबळे यांची ‘कविता’ ही संस्था ‘कवितेचे दोन दिवस,’ नावाचा कार्यक्रम दरवर्षी करू लागली. त्यात ‘कविता फुलते अशी’ नावाच्या परिसंवादात त्यांनी शांताबाई, अनुराधा पोतदार, सुधीर मोघे, किशोर पाठक यांच्याबरोबर मलाही बोलावले होते. मी मला कविता कशी स्फुरते हे उदाहरणे देऊन सांगितले. परिसंवाद संपल्यावर शांताबाई मला म्हणाल्या, “या विषयावर सर्वात नेमके तुम्हीच बोललात.”
१९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा शांताबाई होत्या. शांताबाईंचे अध्यक्षीय भाषण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी कसे बोलावे याचा वस्तुपाठच होता. त्यांच्या भाषणात मला सर्वात आवडलेला मुद्दा होता साहित्यातील श्रुतयोजनाचा. पूर्वीच्या प्रसिद्ध गद्य वचनांचे किंवा काव्यपंक्तींचे लेखकाने आपल्या लेखनात केलेले पुनर्योजन म्हणजेच श्रुतयोजन. शांताबाई भाषणात म्हणाल्या, “रसिक आणि चोखंदळ लेखकाने पूर्वसाहित्यपंक्तींचे श्रुतयोजन करताना आपल्या व्यक्तित्वात ते मुरवून त्याची सुंदर पुनर्निर्मिती केलेली असते. त्याला स्वतःचे असे एक नवे परिमाण दिलेले असते. लेखकाच्या गाढ व्यासंगाची तिथे साक्ष भेटते आणि वाचक जितका बहुश्रुत असेल तितका त्याला तिथे पुन:प्रत्ययाचा आनंद लाभतो.” त्यांचे हे मत ऐकून मलाही खूप आनंद वाटला. माझ्याही कवितांत इतर कलाकृतींचे संदर्भ येत असतात. पुढे मी डोंबिवलीच्या काव्यरसिक मंडळाच्या एका वार्षिक संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर, माझ्या भाषणासाठी ‘कवितेत येणारे इतर कलाकृतींचे संदर्भ’ हाच विषय घेतला. यावर एक पूर्ण लेख माझ्या ‘अगा कवितांनो’ या अंतर्नादमध्ये पूर्वी येत असलेल्या लेखमालेत आलेला आहे. तो आता माझ्या ‘अगा कवितांनो’ या संग्रहात समाविष्ट झाला आहे. या लेखात मी शांताबाईंचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.
शांताबाई पुण्यात येऊन स्थायिक झाल्यावर पुण्यात होणाऱ्या अनेक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषवू लागल्या. जसे पूर्वी मुंबईत अनंत काणेकर आणि पुण्यात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार कायम अध्यक्ष असत तसेच आता शांताबाई पुण्यातल्या साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अध्यक्षपदी झळकू लागल्या. बहुधा कोणी बोलावले तर शांताबाईंना नाही म्हणताच येत नसे. त्या एवढ्या मोठ्या कवयित्री; पण कोणी गळ घातली तर कुणाच्या लग्नाची मंगलाष्टकेही त्या आनंदाने लिहून देत. पुण्यात एका पुस्तक पारितोषिक वितरण कार्यक्रमात संयोजकांनी ज्येष्ठ कवयित्री म्हणून शांताबाई आणि नवकवी म्हणून अरुण म्हात्रे यांना पुरस्कार दिला. कोणताही अनमान न करता शांताबाईंनी हौसेने तो पुरस्कार स्वीकारला. अरुणच आपल्या आभार प्रदर्शक भाषणात म्हणाला की शांताबाईंनी आता असे पुरस्कार स्वीकारणे थांबवावे , त्या अशा पुरस्कारांच्या पुष्कळ वरच्या स्थानावर आहेत; पण असे तो शांताबाईंना सुनावू शकला कारण ‘मला हा कोण सांगणार?’ असा अहंकार शांताबाईंकडे नव्हता.
शांताबाईंचे कविता लेखन, गीत लेखन चालूच होते. त्यांनी केलेले संपादनाचे मोठे काम म्हणजे ‘कविता विसाव्या शतकाची’ या ग्रंथाच्या त्या एक संपादिका होत्या. जुन्या आणि नव्या कवितांचा त्यांचा व्यासंग जबरदस्त होता. अतिशय कष्ट करून त्यांनी हे काम केले. त्यात त्यांनी माझीही एक कविता घेतली. ती घेताना त्यांनी मला फोन करून सांगितले, “आम्ही संपादकांनी या ग्रंथात तुमची एक कविता घ्यायचे ठरवले आहे; पण तुमची ‘होड्या’सारखी गाजलेली कविता घेण्याऐवजी तुमची अलीकडची ‘लक्ष्मी’ ही कविता मी सुचवलेली आहे. ती तुमची एक वेगळी ओळख अधोरेखित करील.” हा त्यांचा माझ्यावरील लोभ मला सुखावणाराच होता.
आज जेव्हा मी शांताबाईंचा विचार करून पाहतो तेव्हा मला वाटते कवितेवरील आणि कवींवरील निरपेक्ष लोभ हा त्यांच्या त्यांचा स्थायीभावच होता. त्यांना भेटणाऱ्या सर्वच व्यक्तींसाठी त्या उत्साहाचा आणि आनंदाचा झराच होत्या. आपल्यामुळे कोणी काळजीत पडावे असे त्यांना वाटत नसे; म्हणूनच त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाल्यावर त्यांनी त्या गोष्टीची फारशी वाच्यता होऊ दिली नव्हती. ६ जून २००२ रोजी त्यांना मृत्यूने गाठले… पण त्यांची गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत . त्यांनीच लिहून ठेवले होते :
….असेन मी, नसेन मी तरी असेल गीत हे….

