संतकवी एकनाथ
मुक्ताफळालागीं सागरीं |
बुड्या देती नानापरी |
तें सापडल्या घरींच्या विहिरीं |
जो अव्हेरी तो मूर्ख |
तैशी संस्कृत व्याख्यान आटाटी |
अतिकष्टें परमार्थी भेटी |
तें जोडल्या मराठीसाठीं |
उपेक्षादृष्टी न करावी ||
घरच्या विहिरीतले सहज मिळणारे मोती अव्हेरून समुद्रात बुड्या मारून आटापिटा करून तसेच मोती कशाला शोधायचे? तसंच किचकट वाटणाऱ्या संस्कृतातलं ज्ञान सोप्या मराठीत मिळत असेल; तर का अव्हेरायचं?
संस्कृत भाषा देवें केली| प्राकृत काय चोरापासोनिया झाली? अशी स्पष्ट भूमिका मांडत चतुःश्लोकी भागवत, आनंदलहरी, स्वात्मसुख, हस्तामलक, शुकाष्टक, चिरंजीव-पद, स्फुट अभंग, भागवत, रुक्मिणी स्वयंवराचे आख्यानकाव्य अशी मौलिक साहित्यसंपदा मराठी साहित्यसृष्टीला अर्पण करणारे संत एकनाथ.
हे लिहिताना त्यांची भावना,
ग्रंथार्थीं निजओज|
श्रीरघुराज स्वयें वदवी||
अशी विनम्र! एकनाथांचं व्यक्तित्वच मृदू. वाळवंटात तहानलेल्या गाढवाला गंगेचे पाणी पाजणारे, लाही लाही होणाऱ्या उन्हाळ्यात गोदेच्या वाळवंटात तोल जाऊन पडलेल्या अस्पृश्याच्या लहानग्यास कडेवर घेऊन घरी पोचवणारे एकनाथ.
‘कीं ते भूतदयार्णव|
कीं माहेरा आली कणव|’ अशी मूर्ती!
ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला उपमा, माधुर्य, उत्कट भक्तिरसाची देणगी दिली. नामदेवांच्या अभंगांतून आत्मकथनाचं, शब्दचित्रांचं दालन उघडलं गेलं. एकनाथांची रचना ओवीबद्ध होतीच; त्याचबरोबर आख्यानांमधून त्यांनी मोठं कथाविश्व उभारलं.
भागवतावरची रसाळ टिका वाचताना त्यांचं अनुवाद सामर्थ्य वेगवेगळ्या अलंकारांतून, शब्दयोजनेतून प्रतीत होतं.
‘निरपेक्षं मुनिं शांतं| निर्वैरं समदर्शनम्… ‘
याचा अनुवाद करताना ते लिहितात,
‘समुद्रोदक मेघीं चढे |
त्यासी मधुरता अधिक वाढे |
जग निववी वाडेंकोडें |
फेडी सांकडे दुकाळाचें ||
अनुवादाचं सामर्थ्य वाचकाला मूळ संहितेच्या आशयापर्यंत उचलून नेण्यात अथवा आशयच वाचकाच्या संस्कृतीशी मिळताजुळता करण्यात आहे असं जर्मन साहित्यिक गोएथंचं सुंदर वाक्य आहे.
यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्यः प्रविष्टा इव नामरूपे
(गोपींचे भान हरपले आणि समुद्रात जशा नद्या प्रवेश करतात तशा त्या माझ्यात मिसळल्या.)
एकनाथ संस्कृतीशी जुळणारे दृष्टान्त देतात.
गायीचें दोहन करितां
माझे स्मरणीं आसक्तता
एवं सर्व कर्मीं वर्तता
माझ्या विसराची वार्ता विसरल्या |
मला विसरणं विसरल्या हे सांगताना देहभान हरपलेलं चित्र एकनाथ उभं करतात.
सुंदरकांडातील हनुमंताचं कर्तृत्व वर्णन करताना एकनाथांची वाणी बहरून येते. द्विज शब्दाचा अर्थ दात आणि ब्राह्मण – दोन्ही अर्थांशी ते सुंदर क्रीडा करतात. सीता त्याला पडलेली फळं खायची अनुमती देते
तेव्हा :
‘हनुमंत खाजवी दोन्ही कुशी… मग बैसला फळभोजनीं’
भोजनसमयींचे अतीत( अतिथी)
मुख्य ‘द्विज’ मुखाआंत|
आधी या द्विजांना (दातांना) आहुती मिळाली पाहिजे. द्विजांच्या दोन्ही पंक्तींना दिल्याशिवाय अन्नग्रहण करू नये म्हणून वरच्या खालच्या पंक्तींना फळं भरवतो.
द्विजांसीं सांगे हनुमंत । भोक्ता म्हणा श्रीरघुनाथ ।
द्विज कांहीं न बोलत । अतित लोलुप रसस्वादा ॥ अशी मिस्किलीही जोडतात.
एकनाथांचं संस्कृतवरचं प्रभुत्व दाखवणारा एक अनुवाद –
‘भवित्री रंभोरु त्रिदशवदनग्लानिरधुना|
स ते रामः स्थाता न युधि पुरतो लक्ष्मणसखः|
इयः यास्यत्युच्चैर्विपदमधुना वानरचमू-
र्लघिष्ठेदं षष्ठाक्षरविपरिलोपात्पठ पुनः|
या श्लोकात फार सुंदर गर्भितार्थ आहे. प्रत्येक ओळीतलं सातवं अक्षर वगळलं तर दशवदन – रावण – ग्लानीत जाईल अशा अर्थाची भविष्यवाणी आहे. मूळ संस्कृत श्लोकात चुकून षष्ठाक्षर म्हटलं आहे; पण ते खरं सातवं आहे. एकनाथांनी हे जाणून टिकेमध्ये :
लोपोनियां तिन्हीं सप्ताक्षर
असा बदल केला आहे. शब्दाला शब्द मांडणं एवढीच अनुवादकाची जबाबदारी नसते, हे एकनाथांच्या अशा सूक्ष्मदर्शी वृत्तीतून जाणवत राहतं; पण एकनाथ पंडित कवींसारखे शब्दांच्या खेळात अडकूनही पडत नाहीत.
त्यांची शब्दसंपदा हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. ‘ऐसा वानर मीसगाढा’ – ढोंग करण्यात कुशल, ‘वोहरे’- वधूवर, ‘वाहमाय’-वधूमाय, ‘एकलें एक च्यूतफळ’-आंबा, ‘अधरतळींची चिबुका’- हनुवटी, कुरर-टिटवी, ‘जारसे’ – पक्व, बहु मावा (कपट), ‘होत लुलुबुटी डोळ्यां’-तृप्ती होई ना! अशा सुंदर शब्दांची लड त्यांच्या लेखनात वाचायला मिळते.
एकनाथांची लेखणी प्रसंगी मिश्कील होते. बाह्य वेषधाऱ्यांना उपदेश करताना, ते म्हणतात, दोऱ्याला चवदा गाठी मारल्या की त्याला अनंत म्हणायचं, तोही अनंत नेला चोरा| म्हणजे अनंतासी अंतु आला/
प्रसंगचित्र उभं करत पोट धरधरून हसवतातही. सुंदरकांडातील मारुतीचा पराक्रम आणि राक्षसांची फजिती वाचताना चित्रपटात होणाऱ्या खलनायकाच्या फजितीसारखी ती समोर दिसते आणि मनस्वी आनंद होतो. शेपटीची ताकद दाखवत, ‘फोडी घागरी निजपुच्छे!’ स्त्रियांच्या नाकांत हनुमान शेपटीचे केस घालतो… नारी शिंकती खसाखसां,
नारी शिंकती थटाथटां, घागरी फुटती फटफटां|
पुच्छ भोवंडितां भोयांचे कानीं|
दोघे चमकोनि पाहती|
भोई नाचती तडतडां|
कान झाडिती फडफडां|
मारायला आलेल्या राक्षसांच्या घावाचा हनुमानावर ढिम्म परिणाम होत नाही.
राक्षसघायांचा समेळ ।
ढेकणाऐसी त्याची बुळबुळ|
तुझा घावो अति निर्बळ ।
जैसी पेळ कापसाची ॥
अशी हनुमंताने केलेली टिंगल सुखावून जाते.
रावणासमोर मारुती बसतो तोही प्रसंग खास!
बैसोनियां वांकुल्या दावित
कांखा कुशी खाजवीत
शेपूट त्याच्या नाकाला लावतो.
केश भरले नासिकीं|रावण शिंकेवरी शिंकी|
दहाही मुखांनी ऐकत, दहाही नाकांनी शिंकत बृहती वाजे परपराट
अशा बीभत्स रसाची जोडही रेखाटनाला मिळते; पण ती आनंदच देऊन जाते. रसपरिपोष एकनाथांच्या लेखणीचा गुण. जराही अश्लील न होता शृंगार रसाची अभिव्यक्ती हा मोठा विशेष. वारियाने कुंडल हाले| डोळे मोडीत राधा चाले| या नितांत शृंगारिक अभंगात राधा रिकामा डेरा घुसळते आहे आणि कृष्ण बैलाचं दूध काढत आहे – बैल दुभवी नंदाघरी! परस्परांविषयीच्या उत्कट प्रेमात हरपून जाणारं हे अद्वैत शृंगाराला आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातं तसंच प्रियतम अशा परमेशाच्या बाल्यरूपानं वात्सल्यरसही निर्माण होतो.
सुनीळ श्रीरामचंद्र पाळण्यात पहुडला आहे.
‘चरणकमळींचा अंगुष्ठ|करकमळीं धरोनि स्पष्ट|
मुखकमळीं करितां प्रविष्ट | गोडी उद्भट लागली|
पायाचा अंगठा हातात धरून ‘आवडी चुरचुरां’ चोखणारा बालराम हे जीवीच्या वात्सल्यरसाचं निधान आहे.
पुढे हाच बालक एकाच हाताने शिवधनुष्य उचलतो. त्याच्या नादाने रावणाची दांतखिळी बसते.
नादाचेनि घन घर्घरारी
बैसलीं वीरांचीं दांतेरीं
कीरकरोनि वाजिकुंजरीं( घोडे हत्ती)
उभीं शरीरें उलंडली…
नादामुळे पृथ्वी गेली चिरढोविरढी, नभीं नक्षत्रां पातझाडी, पक्षी विसरले पळावयासी अशी अवस्था झाली.
मंथरेच्या मनात पेटलेला जहरी निखारा भयानक रसाचा परिपोष करतो.
‘रामराज्याचा सोहळा|जंव जंव मंथरा देखें डोळां| तंव तंव क्रोध चढे बळा| द्वेषाचा आगळा आक्रोश|
क्रोधाने नेत्र गरागरा फिरवणारी, द्वेषाने थरथरा कापणारी मंथरा म्हणजे साक्षात भयानक रसच रामाच्या मधुरकथेत उभा ठाकतो. तो रामकथा पुढे नेण्यासाठी पोषक ठरतो.
अशोकवनातील सीतेची अवस्था करुणा उत्पन्न करते.
निधानाभोवती विवसी
तैशा राक्षसी सीतेपासीं…
नाहीं अभ्यंग ना स्नान
तेणें सर्वांग मलिन संपूर्ण
वस्त्र पीतांबर अति जीर्ण
नाही प्रावरण दुसरें|
छातीशी गुडघे धरून बसलेल्या सीतेची बाह्यावस्था अशी करुण होती.
रावण तेथे येताच
कंपायमान अति भयार्ता अशी सीता – जेंवी कदली वायुघाता- केळ वाऱ्यानं कंपित व्हावी तशी थरथरायला लागली. फाटक्या वस्त्रांची काया झाकून घेणाऱ्या अधोवदना सीतेचं करुण वर्णन रावणाप्रतीचा संताप वाढवणारं ठरतं.
मायासागराचं रूपक वापरत रौद्ररसाचा भीषण आविष्कार एकनाथ दाखवतात.
लाटांवर अचाट लाटा|
मोहाचिया अतिदुर्घटा|
आदळती विवेकतटा|
अहंकुवावो बाजतो, क्रोधाचे प्रबळ भरते| भरी द्वेषाचिया तरियांतें|, कामपर्वतांची शिखरें, झाडांचे विषयांकुर, निंदेच्या सुसरी असं मनातल्या विकारांचं प्रभावी वर्णन अंतर्मुख करत जातं.
देदीप्यमान अद्भुताचं वर्णन करताना एकनाथ म्हणतात,
अमित सूर्यांचिया कोटी|
हारपती नखतेजांगुष्ठीं|
चैतन्याचा पुतळा अशा त्याच्या अंगप्रभेमुळे प्रभेलाच शोभा येते, व्यतिरेक अलंकाराचं सुंदर उपायोजन ते इथं करतात.
वेगवेगळ्या रसांमधून भेटत जाणारं ते सावळं परब्रह्म प्रत्यक्षात
चंद्राहुनी शीतळ| रवीहुनी सोज्वळ| असं आहे, ‘अमृताहुनी स्वादु गगनाहुनी मृदु| रूपेंविणु आनंदु’ आहे… त्याच्या चिंतनाने ‘एकाजनार्दनीं आनंदु परिपूर्ण’ लाभतो… शांतरस पाझरतो.
या पारंपरिक रसांबरोबरच एकनाथांच्या साहित्यात अनुभवता येतो खाद्यरस! तत्कालीन पदार्थांची सुरस वर्णनं!
एकनाथ पूर्णतः अध्यात्माशी समरस असल्याने त्यांचे पदार्थवर्णनही अध्यात्माच्या निखाऱ्यातून तावून सुलाखून आलेलं दिसतं.
‘वैराग्यकढें कढविली कढी|
तीमाजी माया मूगवडी|
अत्यंत लाडें वळिले लाडु । विवेकतिळवियाचे जोडु ।
पापड भाजिले वैराग्यआगीं ।
तेणें ते फुगले सर्वांगी ।
अशी गमतीदार वर्णने सीता स्वयंवरात आणि रुक्मिणी स्वयंवरातही आढळतात.
एकनाथांचा विडाही आध्यात्मिक आहे.
शांतिपक्वपानाची दशा|वासना शिरा काढोनि निःशेषा , सोऽहं चा शुद्ध चुना अशा उपमा त्यांच्या साहित्य उद्देशाला अनुसरून भक्तीचे बीज लेऊन येतात.
हे ललित वाङ्मय नव्हे; त्यामुळे अर्थातच हा दोष नव्हे. औषधाची कडू गोळी साखरेतून देण्यासारखी ही रचना आहे.
एकनाथांच्या लेखनाचा आणखी विशेष म्हणजे व्रज भाषेतील रचना :
हामे आपले सोवेते घरछे|रात्री कृष्ण आला… मारी वेनी पकड करी हातछे|दाढी बांधी गाठ छे| अशा मजेदार रचना शब्दचित्र रेखाटतात.
मऊ मेणाहुनी असलेले एकनाथ समाजातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढतात. तत्कालीन समाजाचं दर्शन त्यांच्या काव्यातून स्पष्ट दिसतं.
‘नैवेद्या नारळ नेऊन फोडिती|
खोबरे एकमेकांसी वांटिती
नुसती नरोटी देवापुढे ठेवती’
निंब नारळ उतारा आणि खापराचे भदाडे दिवस मावळल्यावर तिकाटण्यावर ठेवणाऱ्यांना ते सुनावतात, त्यापेक्षा बळी दुष्ट मनोविकारांचा द्यावा, कामक्रोधाची बकरी, अहंभावाचा मेंढा, मोहाचा रेडा मारावा.
सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंत सूक्ष्म रूपाने निरनिराळ्या जातींच्या आळ्या फिरताना दाखवून एकनाथांनी विविध स्तरांतील जनतेच्या स्वभावादोषांवर आगपाखड केली आहे. व्यवहारियांची ऐसी दशा म्हणत ते वर्णन करतात.
लक्ष्मी देऊन पुढिल हातीं
काळा कागद लिहूनि घेती
वेदपाठक म्हणजे कोरडी शब्दांची खणखण
शास्त्री पंडितांठायी ज्ञातेपणें गर्वाभिमान
समाजातील दोषदिग्दर्शन आणि सुधारणा ही तळमळ सीताशोधाच्या निमित्ताने हनुमंताच्या मनातील विचारांमधून त्यांनी मांडली आहे
एकनाथांची विशेष रचना म्हणजे भारुडे आणि कूट अभंग!
नाथाच्या घरची उलटी खूण|
पाण्याला मोठी लागली तहान
आत घागर बाहेर पाणी.
बाहेरचं पाणी आता देहरूपी घटात भरलं गेलं. या आतल्या पाण्याला आता बाहेरची तहान लागली आहे.
कामक्रोधाचा विंचू, देहाच्या घरात राहणारे नातलग – अहंकाररूपी सासरा, नणंदेचं पोर म्हणजे असूया, दादला म्हणजे विवेक, शरीर म्हणजे मळा आणि बागकाम करणारा आत्मा हा माळी विवेकाचे खुरपे घेतो, मायेचं पडळ डोळ्यांवर आल्यामुळे झालेला आंधळा यांशिवाय आशीर्वाद-पत्र, विनंती-पत्र, ताकीद-पत्र, अर्ज ही भारुडे आशय आणि भाषिक सौंदर्याच्या दृष्टीनेही मुद्दाम वाचावीत अशी!
चिरंजीव जीवाजीपंत ठाणेदार, वास्तव्य देहपूर यांना आत्मारामपंत आशीर्वाद देतात आणि सांगतात, देहगावची १०० वर्षांची सनद देऊन पाठवले आहे, ‘कामक्रोध या रयतेचे ऐकू नये, आशामनशा यांची संगत धरू नये… ‘
ताकीदपत्रात
कायापुरास जिवाजी नामें गृहस्थांना देहगावची वस्ती आबाद ठेवण्यास पाठविलें आहे.
मनाजीराव सुभेदार, बुधाजीपंत फडणीस हे थोर! देहगावचा कारभार अहंकाराजीपंत सबनीसांकडे दिला, विकल्पाजी महाजन, मोहाजी शेटे, कामाजी कोतवाल अशी अनेक पात्रं यांत दिसतात. अशा रचनांमुळे मजा तर वाटतेच ; पण त्याचबरोबर अंतर्मुखताही येते.
नाथांच्या काव्याविषयी काय आणि किती बोलावं? ते शब्दमर्यादेत कसं बांधावं?
नाथ सांगतात-
अफाट न करावा ग्रंथ
ग्रंथी बोलावा मुख्यार्थ
नाथांच्या एखाद्या रचनेतला मुख्यार्थ मांडताना ती रचना शब्दसंख्येनेही अफाट मोठी होते जाते; तरीही मुख्य भाग राहूनच गेला असं वाटत राहतं.
शेवटात नाथांच्याच शब्दांत
सेवितां तुमचे वचनामृत|
पुरे न म्हणे माझे चित्त|
आस्वादितां शब्दी शब्दार्थ|
श्रवण क्षुधार्थ अधिक जाहले||
