फेसबुकवर विविध प्रकारच्या विषयांच्या पोस्ट्सची गर्दी असते. हिंदी भाषेतले पाच-सहा दोस्त आहेत. त्यांच्यामार्फत येणार्या पोस्ट्सची हिंदी भाषा आणि मांडणी नेहमीच्या मजकुरापेक्षा वेगळी असते. अशीच एक पोस्ट एकदा वाचण्यात आली. वर-खाली वेगवेगळ्या विषयांच्या पोस्ट्सची दाटी, वेगवेगळे विषय – कधी प्रस्तुत कधी अप्रस्तुत. आपली ती घाई – धांदलीत गर्दीतून फिरावे तशी, स्क्रोल करीत फिरण्याची.
अशाच गडबडीत एक हिंदी पोस्ट अगदी गर्दीत हरवलेले पोर असावे तशी समोर आली. ते छायाचित्र पाहताच लक्ष वेधले त्यासोबत दिलेल्या लघुतम कथेकडे. त्या छायाचित्राची लघुकथेशी घातलेली सांगड. ‘छायाचित्राला शीर्षक सुचवा’, ‘व्यंगचित्राला योग्य असे वाक्य सुचवा,’ अशा स्पर्धा पूर्वी मासिकांतून असायच्या, त्या आठवल्या. (‘बीसवीं सदी’ या उर्दू मासिकात मुखपृष्ठाच्यामागे सुरेख तरुणीचे छायाचित्र असायचे अन् तिच्या मूडला अनुकूल शेर असायचा. शायरीची माझी आवड याच ‘मार्गाने’ विकसित झाली!) पण शब्द-चित्रांचं एवढं एकरूप कधी पाहण्यात नव्हतं. अगदी छायाचित्र पाहून कथा सुचली, असे वाटावे, इतकी ती तंतोतंत होती. कथेतले ते निरागसपण, छायाचित्रातला तो पोरगा…
(फेसबुक पोस्ट: पीयूष कुमार)

लघुकथा: माँ की पहचान
बोगोटा (कोलंबिया) के मेले में एक छोटा बच्चा अपनी मां से बिछड़ गया।
मां को खोजते उसे एक सिपाही मिला तो बच्चे ने उस से कहा –
“क्या आपने मेले में एक ऐसी औरत को देखा है जिसका मेरे जैसा एक बेटा है?”
– गेब्रिया गार्सेल मार्केज
आवडलेल्या गोष्टी कडेवर घेऊन ज्याला-त्याला सांगत मिरवायची जुनी हौस कधी उफाळून येते. गप्पपणाची- आवळून असलेली ‘पाईप लाइन’ फुटते अन् किती सांगू असे होते. पोस्ट नुसती शेअर केली नाही; सांगत सुटलो ज्याला त्याला. दिवसभर हे पोरगं नजरेसमोर फिरत होतं – त्याच्या आईला शोधणारं.
मला मग आठवली माझी जुनी वही. तीसेक वर्षं झाली त्याला- त्या वेळी वय होतं चाळिशीचं; पण शाळकरी सवय शाबूत होती – आवडलेलं लिहून ठेवायची. या वहीत रवींद्रनाथ टागोरांची कविता लिहून ठेवली होती. वही काढली आणि या पोराला कडेवर घेऊन वाचू लागलो-
द्वाडपणा करून
जर मी चाफ्याचं फूल झालो
चाफ्याच्या फांदीवर जाऊन बसलो,
पहाटेच्या वार्यासवे
डहाळीवर डोलू लागलो,
कोवळ्या कोवळ्या पानासंगे
लोळण फुगडी खेळू लागलो
तर तू मला ओळखशील का गं आई?
तू मला कशी शोधशील?
तू हाक मारशील,
“बाळा तू कुठे आहेस?”
तेव्हा मी गालात हसेन
आणि गुपचूप बसेन.
(हा ‘लोळण फुगडी’ शब्द मला तेव्हा फार आवडला होता.)
कवितेला, छायाचित्रातला आणि लघुतम कथेतला- ही पोरं मनात बसली. असंही वाटू लागलं, तिकडे मेळ्यात हरवलेल्या आईची अवस्था कशी झाली असेल… आणि या पोरांचा तो निरागसपणा तर मनातून उतरायला तयार होईना. त्या महान लेखकाची तीन ओळींची ती लघुकथा…
आवडलेल्या गोष्टीसोबत इतर आवडलेल्या गोष्टी आठवण्यासारखा आनंद दुसरा नसेल. या हरवलेपणावरचं असंच आणखी एक व्यंगचित्र आठवलं – या मुलाच्याच वयाचा एक कुत्रा, विमानतळाच्या प्रचंड परिसरात हरवला आहे. तो एका महिलेला अगदी असेच मान वर करून विचारतो आहे, ‘मॅडम, हातात सूटकेस असलेला आणि त्या सूटकेसवर, ‘बिलोनी आणि त्याचा बोलका कुत्रा’ असं लिहिलेलं आहे, असा माणूस दिसला का हो तुम्हांला कुठं…’ या तीनही गोष्टींतून विनोद म्हणण्यापेक्षा एक गंमत जाणवते. ही गंमत हलक्या-फुलक्या विनोदाच्या स्वरूपात, गमतीच्या-खोडकरपणाच्या रूपात दिसते. उत्तम विनोदाची दुसरी बाजू निरागसपणाची असते असं म्हणतात. आस्था असलेली थट्टा जिव्हाळ्याची असते. या व्यंगचित्रातून, उपरोक्त कवितेतून, छायाचित्रातून आणि लघुकथेतून ते जाणवतं.

निरागसतेला दृश्यात्मकता मिळाली की ते दृश्य हवंहवसं वाटत राहतं. लागलीच आणखी एक व्यंगचित्र आठवले. एका ‘तक्रार-खिडकी’शी बसलेल्या माणसाला एक प्रौढ स्त्री येऊन सांग़ते आहे- I changed my mind, don’t find him. गंमत वाटायला लागली. गाणं आठवलं की जसं ते गाणं आपण शोधून ऐकतो; तसंच आवडलेलं व्यंगचित्र आठवलं की होत असतं. हे चित्र शोधायला लागलो.
बरीच शोधाशोध केली; हे व्यंगचित्र मात्र सापडेना. नजरेसमोर दिसत होतं ते – खिडकीवर ‘मिसिंग’ असा बोर्ड आहे- गणवेषातला काउंटरवर बसलेला तो कर्मचारी आणि तिथे आलेली ती स्त्री – तिचा चेहरा… तो मात्र व्यवस्थित आठवेना. ते वाक्य पक्कं आठवत होतं – I changed my mind, don’t find him! ते व्यंगचित्र ‘स्पॅन’ मासिकातलं आहे, त्या मासिकातल्या चित्रांच्या फाईलमध्ये आहे हे लक्षात येऊ लागलं. त्या तीन-चार फाइल्स शोधल्या. जिकडे तिकडे चित्रांची दाटी- गर्दी; पण हे चित्र काही सापडेना. नेहमीची वस्तू नेहमीच्या जागी सापडत नसली की माणूस बेजार होऊन नको तिथेही शोधून पाहतो, तसं बरेच संग्रह, फाइल्स शोधून पाहिल्या. असं कधी झालं नव्हतं, वय झाल्याची लक्षणं आहेत ही, असंही जाणवायला लागलं. थकून गेलो. चित्र सापडले नाही. आठवलेल्या चित्रात त्या स्त्रीचा चेहरा धूसर दिसू लागला; पण तिच्या चेहर्यावरचा तपशील काही आठवेना- कसा होता तिचा चेहरा- वैतागाचा, का काही निर्णय घेतल्यावर येणार्या ठामपणाचा? व्यंगचित्राचा ‘जीव’ तर अशाच ठिकाणी लपलेला असतो ना! एक मात्र पक्के होते- व्यंगचित्रातली ती स्त्री तरुण नव्हती, प्रौढा होती. व्यंगचित्रात नुसते पात्र नसते – ते आपले वय सांगणारे पात्र असते – त्यामुळे चित्रातले विधान अधिक प्रत्ययकारी होत असते. या वयातला, आपल्या पतीबाबतचा तिचा तो फिरलेला निर्णय… म्हणजे काल ती तक्रार दाखल करायला आली होती, ती घाबरलेल्या, असहाय अवस्थेत आली होती; शिवाय नवरा हरवल्याची काळजी आणि दु:ख म्हणा – ताजे होते. घाईत तिने तक्रार दिली आणि परत गेली असणार. मग घरी गेल्यावर चहा वगैरे घेतल्यावर तिला सवड मिळाली असेल. नवर्याची आठवण आली, तसे त्याचा विक्षिप्तपणा, तिरसटपणा आणि अरेरावी आठवत असेल. नवर्याशिवायचा एकटेपणात घालवलेला तो दिवस… नकळत आलेल्या स्वातंत्र्याची जाणीव झाली असेल अन् ती थबकली असेल. रात्रभर एकटं राहण्याचा सैलपणाही अनुभवला असेल आणि ‘काय हरकत आहे’ सारखे विचारही आलेले असतील की मनात!
हरवलेल्या माणसाचा शोध घेताना जसे तणाव येतात तसेच त्या चित्राबद्दल होऊ लागले. चित्र पाहायची कमालीची इच्छा होऊ लागली, शोधू लागलो, सापडेना. सतत वाटू लागलं, चित्रातल्या बाईचा हा निर्णय भोळेपणाचा आहे, सैल मन:स्थितीची कल्पना देणारा आहे; पण मजेदार आहे! हे व्यंगचित्र काही सापडले नाही. दिवस याच्यातच गेला. या विषयाची अन्य काही चित्रे आठवली, ती शोधायला लागलो. दरम्यान एक व्यंगचित्र आठवले होते – मॉलमध्ये त्या स्त्रीने भरपूर खरेदी केलेली आहे. सोबत नवरा आहेच आणि खरेदी केलेल्या त्या सगळ्या बॉक्सेसचे ‘रुखवत’ आपल्या हातावर तोलून सांभाळता-सांभाळता तिच्या नवर्याचा चेहरा आपल्याला दिसत नाहीये आणि काऊंटरवर ही बया तक्रार करते आहे – माझा नवरा सापडत नाही! पण सकाळी पाहिलेल्या, त्या हरवलेल्या गोड पोराच्या तुलनेत हे चित्र काही आवडले नाही. बायकांच्या धांदलीच्या-भाबड्या स्वभावाला वेंधळेपणाची फोडणी देऊन काढलेली अशी शेकडो व्यंगचित्रे असतात; ज्याची हसायची तयारी असते अशा वाचकांनाच ती हसवून जातात. उत्तम व्यंगचित्र हे आपल्या सोबतीला येत असते, ते काही सांगू पाहते. व्यंगचित्रातही तीव्र-मध्यम-कोमल स्वर असतात. कोमल स्वरांची चित्रं कानात गाणं रेंगाळावं तशी नजरेसमोर रेंगाळत राहतात.
आज मला अशा चित्रांच्या कोमल स्वरांचे, निरागसतेचे वेध लागले होते. तशी चित्रे आठवत होती, शोधत होतो.
…त्या दिवसांत, ‘हास्यवती’ या महिलाविषयक व्यंगचित्र प्रदर्शनाच्या नादाला लागलेलो होतो. एकाच विषयाची विविध व्यंगचित्रं शोधणे हे मोठे अवखळपणाचे काम असते – भुईमुगाच्या वावरात घुसल्यावर वानराची जी अवस्था होते तसाच हा अनुभव. प्रदर्शन म्हटले की तीव्र-मध्यम-कोमल असे सर्वच स्वर असलेली व्यंगचित्रं पाहिजेत, त्यातही वाह्यात, वात्रट चित्रे टाळायची होतीच! शोधू लागलो. कोमल स्वरांच्या चित्रांपाशी रेंगाळू लागलो. या परकीय व्यंगचित्रकारांनी स्त्रीच्या भोळेपणाची थट्टा करताना स्त्री-पुरुष संबंधांचे किती छान आणि मजेदार असे दर्शन घडविले आहे याचा पुन्हा प्रत्यय येऊ लागला. त्या प्रदर्शनासाठी निवडलेले एक व्यंगचित्र मात्र आजच्या विषयासारखे निरागस म्हणावे असे होते – हरवणे आणि सापडणे या धडपडीचे :
दोन भागांतले ते चित्र होते.


चित्र पहिल्यांदा पाहिले, तेव्हा घाई-घाईत चित्रातला विनोद समजला नव्हता. उशिरा समजला! शब्दरहित असलेल्या या व्यंगचित्राकडे पाहताना मजा आली होती. ही महिला आपल्या हरवलेल्या पतीची तक्रार द्यायला आलेली आहे. हीसुद्धा प्रौढा. तो काऊंटरचा माणूस- गणवेषात टापटिपीने बसलेला आहे. अशी गणवेषातली माणसं, त्यांचे जे पद आहे, त्या पदामुळे ओळख कायम ठेवलेली असतात. पोलीस, कंडक्टर, सिक्युरिटी गार्ड्स यांना त्यांची अशी नावे कुठे असतात? (माझ्या आईचे नाव कळायला मला सात आठ वर्षं तरी लागली असतील. आई, ताई, अगं अशाच नावाने ती वावरायची. स्वत:चे नाव लिहितानाच तिला तिचे नाव भेटायचे, तेसुद्धा वर्षा-दोन वर्षांतून एखाद्या वेळीच.)
तसा हा युनिफॉर्ममध्ये असलेला माणूस स्वत:ला सांभाळून बसलेला आणि बाईने नवरा हरवल्याबाबत अर्ज लिहितानाच बहुधा – ओळखले की, आपला नवराच घरातून पळाला आणि इथे येऊन बसलेला आहे! ओळखलेच! लागलीच त्याला ‘हातकडी’ घालून ती परत जात असल्याचे दुसर्या चित्रात दिसते आहे! कुठे घाई नाही, गडबड नाही, वाद नाही ना नाराजी! मानवी वर्तणुकीतला हा निरागसपणा… आपली मन:स्थिती जेवढी हलकी-फुलकी असेल, तेवढ्या कल्पना आपल्या मनात येतात – आता घरी परत गेल्यावर या बाईच्या घरातले वातावरण कसे असेल… तिची मन:स्थिती कशी असेल… (आंद्रे फ्रान्स्क्वाच्या एका व्यंगचित्रात इंग्रजी ‘एस’ आकाराचा एक जोड-सोफा आहे. एका खुर्चीवर बायको काहीतरी शिवते आहे, तिच्या – सुई घेतलेल्या हाताच्या बाजूलाच दुसरी जागा- ती रिकामी दाखवलेली आहे आणि नवरा- तिथे न बसता, सोफ्याच्या पायथ्याशी पेपर वाचण्यात मग्न आहे! ना तक्रार ना वादावादी, शब्दविरहित त्यांचे ते निरागस असणे!)
नवरा हरवलेल्या बाईचे ते- शोध थांबवा म्हणणार्या बाईचे- हरवलेले चित्र शोधून-शोधून थकलो. (आता प्रचंड अशा या संग्रहाकडे पाहिले की उल्हास मावळून काळजी वाटायला लागते. चित्र सापडत नाहीत लवकर…काय होणार आता या संग्रहाचे… आपल्या माघारी… उर्दू लेखक मुज्तबा हुसैन यांच्या एका लेखाबद्दल मित्राने सांगितले होते, आपल्या पुस्तकांचा प्रचंड संग्रह पाहून, आता आपल्या माघारी या संग्रहाचे काय होईल ही काळजी मांडताना हुसैन यांना गालिबच्या एका शेराची ओळ आठवली होती – कहाँ जाएगा ये सैलाबे-बला मेरे बाद…)
त्यातच एक गंमत झाली. या व्यंगचित्राच्या फार आधी पाहिलेले दुसरे एक व्यंगचित्र आठवले, अशाच हरवण्या-सापडण्याच्या मुद्द्याचे ते व्यंगचित्र. ‘ललित’मध्ये त्यावर लिहिलेले टिपण आठवले. त्या दिवसांत माझी व्यंगचित्रांची आवड अगदी भरात होती. त्या चित्रानेच मला लिहायला शिकवले होते. व्यंगचित्रांचा नाद लागलेला, व्यंगचित्रांवरचे लेखन वाचताना गुदगुल्या व्हायचे ते वय होते, मलाही लेखनाचे कोंब फुटायला लागलेले होते. त्या दिवसांत ‘स्पॅन’मधल्या ‘लायटर साईड’ची पानं काढून गोळा करायचा छन्द लागला होता. अर्धी-अधिक चित्रं समजायची नाहीत; पण त्याचे काही वाटायचे नाही. त्या पानांचा गुळगुळीतपणा, चित्राची छपाई एक प्रकारच्या श्रीमंतीची जाणीव करून द्यायची. स्पॅन अन् सोवियेत यूनियनच्या पानांची कव्हर्स वह्या-पुस्तकांना लावली की अभ्यासाचा निराळाच असा हुरूप यायचा.
तर एकदम आठवले ते ‘युरेका!’ वाले व्यंगचित्र. ‘स्पॅन’मधलेच. चित्रात माणूस नसलेले! ते तसे व्यंगचित्र मी पहिल्यांदाच पाहत होतो. फार आवडलेले होते हे चित्र. मला त्या वेळी वाटून गेले, या चित्रावर लिहावेच. चित्राला शोभेल अशी ती गाण्याची ओळ – ‘हरवले ते गवसले का…’ सुचली आणि ‘व्यंगचित्र-आस्वादपर लेखन करणार्या’ छंदिष्टाच्या पहिल्या लेखन-अपत्याचा जन्म झाला की! तथापि, चित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने लिहिलेला तो लेख नव्हता – ते केवळ टिपण होते. ‘ललित’, जुलै १९८५च्या अंकात प्रसिद्ध झालेले ते माझे पहिले-वहिले व्यंगचित्रावरचे एक पानी टिपण. किती अप्रूप होते या लेखनाचे.
कितीतरी वर्षं या अंकाच्या दोन प्रती सांभाळल्या होत्या; मग दहा-बारा वर्षांनंतर केवळ एक पान बाजूला ठेवून जपून ठेवले होते; पण नेमके कुठे ठेवले ते आता कळेना. शोधाशोध सुरू झाली. या चित्राशिवाय हे लेखन अपुरे राहणार या कल्पनेने अस्वस्थता वाढू लागली. जिथे-जिथे मिळू शकेल त्या जागा, फाइल्स शोधल्या आणि थकून गेलो. हा शोध आणि लेखन मग दोन-तीन दिवस थांबवले. हे कात्रण मिळाले नाही तर हे चित्रसुद्धा नाही मिळणार; कारण त्या वेळी ते मूळ व्यंगचित्र त्यावरच्या चित्रासोबतच ‘ललित’ ला पाठवलेले होते.
नंतर अचानक लक्षात आले – अमुक ठिकाणच्या पुठ्ठ्याच्या फोल्डरमध्ये ते असणार. शोधून काढले तेव्हा ते मिळाल्याचा काय आनंद झाला! (लेखकाचे साहित्य असे, त्याच्या वयापुरते अजरामर असते!) वाचू लागलो. नवोदित लेखनवयातले ते लेखन वाचताना आता गंमत वाटत असते. त्यातले अर्धेअधिक बाद करायला पाहिजे किंवा सुधारून लिहायला पाहिजे असे वाटत असते. विषय चांगला असला तरी त्याची मांडणी बालिश झालेली असते. (प्रत्यक्ष वयाचा संबंध नाही, मात्र लेखन वाचताना पोराच्या अडखळत बोलण्यासारखे ते लेखन…) व्यंगचित्र मात्र तेच असते, तसेच असते!
व्यंगचित्रातल्या या झपाटलेल्या ‘वेड्या’ शास्त्रज्ञाला अदृश्य होण्याच्या रसायनाचा शोध लावायचा होता. तो पूर्ण झाला, रसायनाची ‘टेस्ट’ घेतली – तो अदृश्य झाला आणि हर्षातिरेकाने ओरडला, ‘युरेका!’ हरवल्याने, त्याचा फक्त उद्गार हवेत उमटला! शोधणं आणि हरवणं यांची मस्त सांगड घातली आहे या व्यंगचित्रात. आता त्या शास्त्रज्ञाला निरागस म्हणताना गंमत वाटते! या निरागस शब्दाला का कोण जाणे, लहानपण चिकटलेले असते – मग, मोठेपणातली निरागसता- तिला काय म्हणावे… ही निरागसता मोठी होऊन अजाणतेपणात मिसळून जात असते! उत्तम विनोदाची दुसरी बाजू ही निरागसतेची असते याचा प्रत्यय या सगळ्या व्यंगचित्रांतून, त्या छायाचित्रांतून आणि त्या लघुतम कथेतून येतो.

**
‘ललित’ मधले या चित्रावरचे टिपण आता, अडतीस वर्षांनंतर वाचताना वाटू लागले, काय बालिशपणाने आपण लिहिलेले होते त्या वेळी- छे! उद्गारवाचक चिन्हांचा तो पुन्हा-पुन्हा वापर, (आजकाल मला या उद्गारवाचक चिन्हांचा रागच आहे. या चिन्हांचा सारखा वापर करणारा लेखक हा बोलताना खांद्याला, बसलेलो असू तर – गुडघ्यांना धक्का देऊन बोलणार्या माणसासारखा वाटतो.) शिवाय ते इंग्रजी शब्द… उत्साहाने लिहिलेले त्यावेळचे हे टिपण-
हा व्यंगचित्रकार मला एकदम अनोळखी; पण त्या अज्ञात चित्रकाराने माझा एक दिवस मजेत घालविला! गंमत म्हणजे, चित्रकार ‘अज्ञात’ असल्यामुळे मनात कोणताही ‘रेफरन्स’ नव्हता, त्यामुळे मला निर्भेळ आनंद वाटला!
असं ते टिपण वाचताना आता चीड येऊ लागली. एक मन विचारू लागले, ‘अरे, बाबा ‘मला निर्भेळ आनंद झाला,’ असं कसं म्हणू शकतं कुणी? शिवाय तू सांगतोस, तोच अर्थ या चित्राचा आहे असा का आग्रह? या शास्त्रज्ञाला अदृश्य व्हायचे रसायन शोधायचे होते; का कोणत्या दुसर्या शोधात तो होता, त्याला ते सापडले मात्र त्याची चव घेताच तो अदृश्य झाला – असे का नाही होणार?… ‘या टिपणात आणखी एक दोन चुका होत्या… व्यंगचित्रकलेच्या छंदातला माझा तो उतावळेपणा… त्याशिवाय, चित्रातला इंग्रजी ‘युरेका’ शब्द मराठीत बदलून ते चित्र संपादकाने छापले होते.
माझ्या लेखनातला तो उत्साह ‘निरागस’ होता असे म्हणता येईल का आणि माझं जाऊ दे, ‘ललित’च्या संपादकांनी असे का करावे – माझे लेखन सुधारून का घेतले नाही, तो शब्द मराठीत का घेतला, शिवाय ‘निर्भेळ आनंद’वाले वाक्य कापून का नाही टाकले संपादकांनी? माझं टिपण ‘एडिट’ करायला पाहिजे होतं त्यांनी…
मे २०२३ मध्ये, केशवराव कोठावळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम झाला. कार्यक्रम छान झाल्याबद्दल अशोकराव कोठावळे यांचे अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला; तेव्हा सहजच विचारले, ‘तुम्ही ‘ललित’च्या संपादनाची जबाबदारी केव्हा घेतली?’
अशोकरावांनी जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली त्या कालावधीतच हे माझे ‘युरेका’वाले हे टिपण प्रसिद्ध झालेले होते,
म्हणजे आमच्या दोघांचेही ते ‘अजाणतेपण’ होते असे म्हणायला हरकत नाही!
****
