मुंबई टू बॉम्बैम् टू बॉम्बे टू मुंबई
(अर्थात बृहन्मुंबई परिसराचा इतिहास)
या लेखाचे शीर्षक वाचून जरा आश्चर्य वाटेल; परंतु ही सर्व ‘मुंबई’ या शहरावर सत्ता गाजविणाऱ्या निरनिराळ्या राजवटींत प्रचलित असलेली मुंबई शहराचीच नावे आहेत हे आपल्या नक्कीच लक्षात येईल. ‘महाम्बाई’ हे मुंबईची ग्रामदेवता मुम्बादेवीचे मूळ नाव. या महा अम्बा आई याचे बोली भाषेतील रूपांतर किंवा अपभ्रंश म्हणजे मुंबई. बोलताना अशी मोठी नावे किंवा जोडाक्षर असलेले शब्द / नावे शॉर्ट केली जातात. जसे कन्हैय्याचे रूपांतर कान्हा या नावात झाले आहे; त्याप्रमाणे पोर्तुगीजांच्या राजवटीत मुंबईचे रूपांतर बॉम्बैम् मध्ये झाले (पणजीम् सारखे). इंग्रजांनी बॉम्बैम् या पोर्तुगीज वळणाच्या नावाचे रूपांतर इंग्रजी वळणाच्या नावात म्हणजे ‘बॉम्बे’ असे केले; परंतु बॉम्बेचे, परत मुंबई असे नामांतर होण्यासाठी सेहेचाळीस वर्षे लागली व त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. यावरून आपल्या बौद्धिक गुलामीच्या मानसिकतेची कल्पना करता येईल.
सर्वसाधारण भारतीय माणसाला इतिहास या विषयाचा व्यावहारिक जीवनात काहीही उपयोग नाही असे वाटत असते; त्यामुळे हा विषय का शिकवला जातो? असा प्रश्न त्याला शालेय जीवनापासून पडलेला असतो; त्यामुळे इतिहास का समजून घ्यायचा याविषयीचे थोडे स्पष्टीकरण या लेखमालेच्या सुरुवातीलाच देणे आवश्यक आहे असे मला वाटते.
प्रत्येक मानवसमूहाचा एक स्वभाव असतो; एक वृत्ती असते. या स्वभावाला धरून तो मानवसमूह वागत असतो. काळ व परिस्थिती बदलली तरी विशिष्ट मानवसमूहाच्या स्वभावात, प्रवृत्तीत खूप मोठा बदल होत नाही; त्यामुळे विशिष्ट मानवसमूहाचा स्वभाव समजून घ्यावयाचा असेल तर त्या समूहाचा इतिहास समजून घेतला तर तो विशिष्ट समूह एका विशिष्ट परिस्थितीत कसा वागेल याचा अंदाज बांधता येतो. या विधानाची सत्यता अफगाणिस्तानच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. अफगाणी माणूस आपापसांत कितीही भांडत असला तरी जेव्हा परकीय सत्ता अफगाणिस्तानवर हुकमत गाजविण्याचा प्रयत्न करते; तेव्हा ते एकत्र होऊन परकीय सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतात; हा त्यांचा स्वभाव आहे. याचा अनुभव मौर्यकाळात सम्राट अशोक यालाही आलेला आहे. तसाच अनुभव इंग्रजांना इ.स. १८३९ ते इ.स १८९७ या काळात जी तीन अँग्लो अफगाण युद्धे झाली त्यावेळी आलेला आहे. या तीन युद्धांतून इंग्रजांना कळून चुकले की, अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापणे आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही; त्यामुळे अफगाणिस्तान हे बफर स्टेट आहे असे जाहीर करून त्यांनी अफगाणिस्तानचा नाद सोडून दिला. एका इंग्रज लष्करी अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की Afghans are at peace when they are at war. वरील इतिहास रशिया व अमेरिका यांनी समजून घेतला असता; तर त्यांची अशी वाताहात झाली नसती. मानवसमूहाचा स्वभाव बदलत नाही हे दाखविणारे दुसरे उदाहरण म्हणजे भारतीयांचा शरण आलेल्या शत्रूला क्षमा करून सोडून देणे हा स्वभाव! पृथ्वीराज चौहानपासून बांगलादेश युद्धातील ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडून देणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधींपर्यंतच्या हजार वर्षांत बदललेला नाही हे लक्षात येईल.
मुंबईच्या इतिहासाचा मागोवा घेताना असे दिसून येईल की आज मुंबईची सात बेटे एकत्र करून जो भूभाग तयार झालेला आहे तो भाग इ.स. १६६६ साली इंग्रजांच्या ताब्यात येईपर्यंत ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा नव्हता; कारण तो मूळ भूमीशी जोडलेला नव्हता. इसवी सनाचे पहिले शतक ते इसवी सनाचे सतरावे शतक या १७०० वर्षांत ज्या घडामोडी झाल्या त्या हल्लीचा बृहन्मुंबई म्हणून ओळखला जाणारा जो भाग आहे त्या भागात झालेल्या आहेत. १०० ते १५० वर्षांपूर्वी वांद्रे ते दहिसर हा भूभाग साष्टी या नावाने ओळखला जात होता; कारण या भागात त्या काळात ६६ गावे होती. इंग्रजांनी साष्टी या शब्दाचे रूपांतर ‘सिलसेट’ असे केले होते. साष्टी हा एक ठाणे जिल्ह्याचा तालुका म्हणून ओळखला जात असे. तेव्हा मुंबईच्या इतिहासाची सुरुवात बृहन्मुंबईपासून करावी लागेल.बोरिवली नॅशनल पार्क मधील कान्हेरीची लेणी, दहिसर येथील मंडपेश्वर लेणी, अंधेरी येथील महाकाली केव्हज, जोगेश्वरी येथील जोगेश्वरी मंदिर गुंफा या सर्व वास्तू मुंबईचा इतिहास सांगणारी महत्त्वाची साधने आहेत.इ.स.पू. ३०० ते इ.स. २५० या काळात साष्टीच्या प्रदेशावर सम्राट अशोकाच्या वंशजांची सत्ता होती याचा भक्कम पुरावा म्हणजे सोपारा (शूर्पारिका) येथील सम्राट अशोकाचा शिलालेख, स्तूप होय. सोपारा बंदरातूनच अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेला गेल्याचा उल्लेख आहे. मुंबई परिसरातील सर्वात जुनी वास्तू म्हणजे कान्हेरीची सुंदर लेणी. ही लेणी ज्या डोंगरात कोरली गेली आहेत त्याचे मूळ नाव कृष्णगिरी; कारण हा डोंगर काळ्या कातळाचा आहे. येथे एकूण ११० लेणी आहेत ही लेणी इसवी सन पहिले शतक ते इसवी सन तिसरे शतक या ३०० वर्षांच्या काळातील आहेत. ही सर्व लेणी बौद्ध लेणी आहेत; परंतु सुरुवातीची म्हणजे या इसवी सनाच्या पहिल्या शतकात जी लेणी खोदली गेली आहेत ती बौद्धधर्माच्या हीनयान पंथाची आहेत. या पंथात बुद्धाला मूर्ती स्वरूपात दाखवणे मान्य नसून तो स्तूपाच्या स्वरूपात दाखवला जातो. बुद्धाच्या मृत्यूनंतर जी पहिली धर्मपरिषद वैशाली (बिहार) येथे झाली त्यातून महायान पंथ निर्माण झाला. या पंथात बुद्धाला मूर्तिस्वरूपात दाखविण्यास मान्यता मिळाली व त्यामुळे बुद्धाची चित्रे, मूर्ती निर्माण होऊ लागल्या. कान्हेरी येथे महायान पंथाची जी लेणी आहेत त्यात बुद्धाच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. कान्हेरीच्या लेण्यांमधील ५१ शिलालेख (inscriptions) वाचता येतात व २६ मुद्रालेख (epigraphs) वाचण्याच्या स्थितीत आहेत. हे लेख ब्राह्मी, देवनागरी लिपीत असून तीन मुद्रालेख ‘पहलवी’ लिपीत आहेत. ही लिपी इसवी सन पूर्वकाळात इराणमध्ये वापरली जात असे, ही गोष्ट खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. माझ्या मते पहलवी लिपीतील मुद्रालेख असण्याचे एक कारण म्हणजे पूर्वी सोपारा (शूर्पारिका) किंवा कल्याण बंदर-नाणेघाट-जुन्नर नाशिक-पैठण असा एक व्यापारी मार्ग होता. कान्हेरीची लेणी या मार्गापासून अगदी जवळ असल्याने काही इराणी(पहलवी) व्यापाऱ्यांनी या लेण्यांना देणगी दिली असेल व तसा मुद्रालेख लिहिला गेला असेल; असे म्हणण्याचे कारण ग्रीक व्यापाऱ्यांनी देणगी दिल्याचा उल्लेख कार्ले किंवा भाजे या लेण्यांमध्ये आहे. दुसरे कारण म्हणजे त्याकाळी पूर्व इराणपर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता; तेव्हा काही इराणी बौद्ध भिक्षुक अभ्यासासाठी कान्हेरी येथे आले असण्याची शक्यता आहे; कारण त्याकाळी कान्हेरी हे एक बौद्ध धर्माचे विद्यापीठ होते. अगदी १० व्या शतकात अतिशा नावाची एक बौद्ध शिक्षिका बुद्धिस्ट ध्यान (meditation) शिकण्यासाठी राहूल गुप्त यांचेकडे आली होती असा उल्लेख कान्हेरी लेण्यांत आहे. लेणी क्रमांक ४१ मध्ये कोरलेले एकादशमुखी (अकरा) अवलोकितेश्वराचे शिल्प हे या देवतेची जगातील सर्वात प्राचीन ज्ञात दगडी मूर्ती मानली जाते. लेणे क्र. ११ हे कान्हेरीतील सर्वात विशाल लेणे असून ते ‘दरबार लेणे’ या नावाने प्रसिद्ध आहे. कान्हेरी येथील एका शिलालेखात इराण/पर्शिया येथून शक (scythian) क्षत्रप भारतात आले; त्यांपैकी रुद्रदामन् या क्षत्रपाने सातवाहन राजा वसिष्ठपुत्र सातकर्णी यास आपली मुलगी दिली असा उल्लेख आहे. यावरून सातवाहनांनी शक क्षत्रपांचा पराभव केला हे सिद्ध होते.
कान्हेरी येथील लेण्यांची खास सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तेथील जलव्यवस्थापन. येथे लेण्यांच्या जवळ दगडात मोठ्या टाक्या खोदल्या आहेत. डोंगरउतारावरून खाली येणारे पावसाचे पाणी दगडात चर खणून टाक्यांमध्ये वळवून टाक्या भरण्याची व्यवस्था केली आहे. कान्हेरी येथील लेणी तीन टेकड्यांवर खोदली गेली आहेत. या तीन टेकड्यांमधील जो सखल भाग आहे तो एका बाजूने धरणासारखी भिंत घालून बंद करून टेकड्यांच्या मध्यभागी मोठा कृत्रिम जलाशय १८०० वर्षांपूर्वी तयार केला होता. लेणी क्र. ४१ जवळ या धरणाच्या भिंतीचे अवशेष बघायला मिळतात. या धरणाच्या भिंतीचे दगड एकमेकांना लोखंडी खिळ्याने जोडल्याचेही दिसून आले आहे व हे लोखंडी खिळे आजही गंजलेले नाहीत.कान्हेरी लेण्यांच्या अभ्यासातून दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय लोक व्यापार, स्थापत्यशास्त्र, मेटॅलर्जी, जलव्यवस्थापन वगैरे गोष्टींत किती पुढे होते याचा अंदाज येतो. बाराव्या शतकानंतर परकीय आक्रमणामुळे जसे नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त झाले तेच कारण कान्हेरी लेण्यांमधील वस्ती उठण्यामागे असावे.
मंडपेश्वर, महाकाली (अंधेरी), जोगेश्वरी व घारापुरीची ही सर्व लेणी सातव्या शतकानंतर बांधली गेली आहेत व ती शैवपंथाची लेणी आहेत. सातव्या शतकानंतर बौद्ध धर्माचा ऱ्हास सुरू झाला; परंतु लेणी, मूर्ती खोदण्याची कला/ टेक्निक होतेच – त्यांचे विषय बदलले – कारण समाजाची धारणा बदलली.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतिहास म्हणजे घटनांची जंत्री नव्हे. घटना घडण्यामागील कारणपरंपरा, वैचारिक धारणा यांचा शोध घेऊन तो समाजापुढे मांडणे हे इतिहासाच्या अभ्यासकाचे काम आहे; परंतु जॉर्ज बर्नाड शॉ म्हणतो ते ही खरेच आहे; तो म्हणतो –
‘That all we learn from the history is that we learn nothing from the History.’
मुंबईच्या रंग ढंगांवरती केले गेलेले हे एक हिंदी सिनेमाई भाष्य…..
