बोल माधवी : एक पुनरावलोकन

आज जरा सर्वांची डोकी खाणार आहे.मंडळी खालील लेखावर आपले विचार अवश्य नोंदवा.

नुकताच  कुठल्यातरी संदर्भात आसावरी काकडेंचा उल्लेख होता, तेव्हा त्यांचा बराच गाजलेला ‘बोल माधवी’ हा चंद्रप्रकाश  देवलांच्या मूळ हिंदी पुस्तकाचा अनुवाद परत एकदा पाहावासा वाटला. १९९८मध्ये देवलांना या पुस्तकासाठी राजस्थान साहित्य अकादमीचा ‘मीरा’ पुरस्कार मिळाला होता. त्याचा आसावरी काकडेंनी २००४ मध्ये केलेला मराठी अनुवादही गाजला. देवलांनी महाभारताच्या उद्योगपर्वामधील गालवोपाख्यानावर आधारित एक खंडकाव्य मुक्तच्छंदामध्ये स्त्रीवादी भूमिकेतून लिहिले आहे. त्यामधे माधवीला उद्देशून सतत – हेटॉरिकल (वक्तृत्वमंडित)प्रश्न करीत त्यांनी ययातिकन्या माधवीची त्यांना जाणवलेली अंत:पीडा व्यक्त केली आहे. त्या निमित्ताने पुरुषसत्ताक जीवनपद्धतीमधे होणारी स्त्रीची गळचेपी त्यांनी प्रभावीपणे प्रस्तुत केली आहे. त्यांच्या खंडकाव्यासोबत परिशिष्टामधे मूळ गालवोपख्यानही दिलेले आहे. १९९३ ते २००७ पर्यंत मी स्त्रीवादी विचाराचा हिरिरीने पाठपुरावा केला. उत्तर-आधुनिकतावादाचे शस्त्रही साथीला होते. बऱ्याच जुन्या पौर्वात्य-पाश्चिमात्य मिथकांचा, साहित्यकृतींचा स्त्रीवादी पुनर्विचार मीही मांडला. लेख,चर्चासत्रे,संमेलने या सगळ्यांतून अगदी ऊत आल्यागत स्त्रीवादाचा पाठपुरावा केला. तेव्हा पुरुष लेखक असूनही स्त्रीवादी विचार मांडणारे, मन अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारे हे देवलांचे पुस्तकही फार महत्त्वाचे वाटले होते.

मूळ आख्यानकथा संक्षेपाने अशी आहे:

गालवमुनींना विश्वामित्रांना गुरुदक्षिणा देण्यासाठी आठशे श्यामकर्ण घोडे हवे होते. त्यासाठी ते ययातीराजाकडे गेले. नष्टवैभव ययाती याचकाला विन्मुख पाठविण्याऐवजी अभंग कौमार्याचा वर (की अभिशाप) मिळालेली आपली कन्या माधवी गालवमुनींना दान करतो; कारण त्याच्यापाशी गालवांनी मागितलेले आठशे श्यामकर्ण घोडे नसतात. तो सुचवितो की गालवमुनी वैभवशाली सम्राटांना ही कन्या देऊन त्या बदल्यात श्यामकर्ण घोडे मिळवू शकतील. एकाच सम्राटाकडे पुरेसे घोडे न मिळाल्यामुळे घोड्यांच्या प्राप्तीसाठी गालव (माधवीच्या सूचनेनुसार) परतपरत तिचा विनिमय करतात. ती अनुक्रमे इक्वाक्षुकुलोत्पन्न हर्यश्व,भीमसेन कुमार दिवोदास आणि भोजनगरीच्या उशीनर राजांना एक-एक तेजस्वी पुत्र देऊन त्याबदल्यात गालवांना सहाशे घोडे मिळवून देते; परंतु पूर्वी ऋचिकमुनींकडून गाधि राजाला मिळालेल्या हजार श्यामकर्ण घोड्यांपैकी चारशे घोडे वितस्ता नदीमध्ये वाहून गेले असल्यामुळे उरलेले दोनशे घोडे गालवांना मिळण्याची शक्यताच खुंटते; मग ते विश्वामित्रांकडे जातात. विश्वामित्र उर्वरित दोनशे घोड्यांऐवजी तिचा स्वीकार करतात. त्यांनाही तिजपासून एक पुत्र होतो; नंतर गालव माधवीला परत ययातीकडे सोपवितात. ययातिपुत्र पुरु आणि यदु तिचे स्वयंवर योजतात; परंतु ती स्वयंवरातील कुणाला वरण्याऐवजी तपोवनात निघून जाते.

या कथासूत्राचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करून देवलांनी १२० पानांचे खंडकाव्य लिहून माधवीवर झालेल्या ‘अन्यायाला’ वाचा फोडली आहे. त्यातील ‘न संपलेला हिशोब’ या शीर्षकांतर्गतच्या कवितेतील मोठा अंश पुस्तकाच्या मलपृष्ठावर उद्धृत केलेला आहे, तो असा :

किती चातुर्मास

प्रायश्चित्त घ्यायला हवंय मानिनी

कुणी चतुर्मुख,चतुर्भुज

नाही सांगणार

वासनांची चतुरंग सेना शृंगारून

चार-चार सेनापतींनी

एका अनभिज्ञ अबलेवर

निर्घृण अत्याचार केलेत…

त्या गुन्ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला

पुरुषांचा वंशज

मी एक पुरुष

आज मुक्त होऊ पाहतो आहे

त्या अश्लाघ्य पितृ-कर्मातून..

सत्य, द्वापार, त्रेता आणि कली… 

चार युगांच्या या अंतिम टोकावर

उभा आहे मी

शून्याच्या मधोमध

नचिकेताई जिज्ञासांनी

चहूकडून घेरला गेलेला

बोल माधवी,

स्त्री कधी बोलणारच नाही काय?

एका पुरुषाने मांडलेल्या या आत्मप्रताडनेची साहित्यिक अणि सामाजिक विचारवंतांनी गंभीर दखल घेतली. युगानुयुगे स्त्रीवर होत असलेल्या अन्याया-अत्याचारांच्या विरुद्धचा एक सच्चा स्वर म्हणून हे खंडकाव्य गाजलं. देवलांचे माधवीशी चाललेले हे स्वगत त्यांच्या हळुवार, संवेदनशील, विचारी आणि भेदक प्रश्नांमुळे वाचकांचे मनही हेलावून सोडते. त्यात ते माधवीच्या मिषाने जागोजागी स्त्रीच्या अबलापणाचे, परवशतेचे, सोशिकपणाचे दाखले देत पुरुषसत्ता कशी अन्याय्य आणि आप्पलपोटी आहे  हे चरचरून जाणवून देतात. प्रतिभावंत, संवेदनशील कविहृदयाची साक्ष त्यांच्या या काव्यात अवश्य मिळते. चतुर्मुख, चतुर्भुज, चतुरंग सेना अशा शेलक्या अभिधानांतून आपल्या पौराणिक वारशाचे एकांगी पुरुषसत्ताकपण ते प्रखर बोचरेपणाने व्यक्त करतात. माधवीची मानसिक कुतरओढ, तिच्या स्त्रीत्वावर, मातृत्वावर होणाऱ्या बेपर्वा आघातांची कल्पनाचित्रे त्यांना अस्वस्थ करतात. माधवीला सर्व वंचित,परतंत्र आणि पुरुषसत्तेच्या बळी ठरलेल्या समस्त स्त्रीजातीची प्रतिनिधी समजून देवलांनी खूप हळहळ, चीड, सात्त्विक संताप, दु:ख, अपराधभाव व्यक्त केले आहेत. हळुवारपणे तिला बोलतं करावं या त्यांच्या धडपडीमुळे त्यांचे हे खंडकाव्य वाचकांनाही विषण्ण करते.

परंतु आज या खंडकाव्याकडे पुन्हा वळून पाहताना काही वेगळ्याच मुद्द्यांनी माझे ध्यान आकर्षून घेतले; ते असे :

१. मूळ संस्कृतातील गालवोपख्यानामध्ये कुठेही माधवीचा उपभोग्य ‘वस्तू’ म्हणून निर्देश आलेला नाही; अगदी जिथे ययाती आपली कन्या गालव मुनींना दानरूपाने सोपवितो तेव्हाही तिचा निर्देश ‘तत्’, म्हणजे ‘असे काही,’ असा येतो. तिच्याद्वारा मुनींचे मनोरथ पूर्ण होतील, अशा विश्वासाने, दारी आलेल्या याचकाला विन्मुख न पाठविण्याच्या धर्मशीलतेने तो हे दान देतो. असे दान तर चांगुणामाता आपले अपत्य चिलया देऊनही करते; मग ययातीची वागणूक अश्लाघ्य कशी?

२.ज्या अयोध्यानरेश हयार्श्व राजाकडे गालव प्रथम माधवीला घेऊन जातात, त्याचं वर्णन गालव उपाख्यानाच्या एकशे सोळाव्या अध्यायातील १९ व्या श्लोकात प्रजा व ब्राह्मणांचा प्रिय, त्यांचे हित जपणारा, विरक्त आणि संयमशील असे केलेले आहे. त्याने जरी माधवीच्या देहयष्टीचे सुचारु वर्णन केले असले तरी ते भोगलिप्सेतून नसून ती शुभलक्षणी आणि अनेक अपत्यांना जन्म देण्यास सक्षम आहे या दृष्टीने केलेले आहे. गालवही तिची तुलना अग्नी निर्माण करणाऱ्या तेजस्वी अरणीशी करतात. हर्यश्व जरी तिला पाहून लोभावला तरी त्याचेजवळ गालवांनी मागितलेले आठशे घोडे हे विनिमय शुल्क नसल्यामुळे तो सात्त्विकतेने म्हणतो, की दोनशे घोडे देऊन तो त्या कन्येपासून एकाच अपत्याला जन्म देईल. यात त्याचा कोणताही अतिरिक्त कावा वा हव्यास दिसत नाही. हा विनिमय उभयपक्षी मान्य होता. अशाप्रकारे हर्यश्व राजाला माधवीपासून वसुमना हा तेजस्वी पुत्र होतो.

३.यावर माधवी स्वत:च गालवांना सुचविते की तिला प्रत्येक प्रसूतीनंतर कौमार्याचा वर असल्यामुळे तिला चार राजांपासून चार पुत्र आणि गालवांना आठशे घोडे मिळतील; जेणेकरून त्यांना गुरुदक्षिणा देता येईल. यामध्ये गालव तिच्यावर कुठलीही बळजबरी करतात, असा उल्लेख मूळ आख्यानात नाही.

४. नंतर ती दोघे काशीच्या दिवोदास राजाकडे जातात. त्याचेही वर्णन धर्मात्मा, संयमी आणि सत्यपरायण असे आहे.दिवोदासाला गालवांच्या प्रस्तावाची पूर्वकल्पना होती.तो माधवीवर अनुरक्त होतो आणि अनेक उत्कृष्ट जोडप्यांसारखे त्यांचे दांपत्यजीवन(प्राचीन कालातील ३९ उत्कृष्ट दंपतींसारखे दिवोदास-माधवी हे दांपत्य होते, या आशयाचे१० श्लोक आहेत) असूनही, तोही दोनशेच घोडे देऊ शकल्यामुळे यथासमय तो माधवी गालवांना परत करतो. माधवी त्याला प्रतर्दन नावाचा पुत्र देते.तीही राजवैभव त्यागून ‘सत्यसंगरा’स सन्मुख होते.

५.नंतर ते दोघे भोजनगरीच्या अपत्यहीन उशीनर राजाकडे जातात. त्याच्याहीपाशी दोनशेच श्यामवर्ण घोडे असल्यामुळे तोही एका पुत्रावर समाधान मानून गालवांना म्हणतो, की त्याचे इतर धन त्याच्या प्रजेसाठी असल्यामुळे तो त्या धनाचा इतरत्र विनियोग करू शकत नाही.उशीनर राजासोबतही माधवी ऐश्वर्योपभोग घेते. त्यालाही एक पुत्र देउन ती गालवांकडे परतते. परंतु गालवांना गरूडाकडून समजते की पूर्वी चारशे घोडे वितस्ता नदीत वाहून गेल्यामुळे आता बाकीचे घोडे त्यांना मिळू शकत नाहीत.(येथे गाधीराज, सत्यवती आणि ऋचिकाची कथा येते)म्हणून ते विश्वामित्रांना उर्वरित घोड्यांऐवजी माधवीचा स्वीकार करण्याची विनंती करतात.विश्वामित्रही तिचा स्वीकार करतात व त्यांना तिच्यापासून अष्टक नावाचा पुत्र होतो.यानंतर गालव माधवीला ययातीकडे परत नेतात.ययातीपुत्र पुरु आणि यदु तिचे स्वयंवर योजतात; परंतु ती कुणा राजा वा मुनींना वरण्याऐवजी ब्रह्मचारिणी होऊन तपोवनात जाणे पसंत करते.

या कथासूत्रात कुठेही माधवीचे शोषण केले गेले अथवा तिच्यावर बळजबरी झाली, असा उल्लेख नाही. यावर असे स्पष्टीकरण देता येते की तिच्यावरचे संस्कारच तिच्या गळचेपीचे कारण होते आणि त्यांचीच पाळेमुळे उखडून टाकायला हवीत. तिने काय म्हणून पित्याच्या आज्ञेखातर स्वत:चा असा वारंवार बळी दिला? हा प्रश्न आपल्या आधुनिक मनांना पडणे साहजिक आहे; परंतु समाजव्यवस्था बदलत असतात, त्यानुसार योग्य-अयोग्य वर्तनाच्या व्याख्याही बदलत असतात. मला आठवते, की माझ्या एका थोरल्या काकांना आमचे वडील आम्हांला प्रेमाने जवळ घेत,आपल्या ताटातून घास भरवीत, याचा फार राग येत असे. त्यांच्यामते ते फाजील लाड होते. आताच्या संदर्भात ते काका दुष्टच ठरावेत! तर मुद्दा हा की पित्याची आज्ञा पाळण्यासाठी जसा राम वनवासाला गेला किंवा हरिश्चंद्राच्या सत्त्वपरीक्षेत तारामती, रोहिदासही त्याच्यासोबत हाल अपेष्टा भोगतात; तशीच माधवीही गालवांसोबत गेली. इतकेच नव्हे तर तिने स्वत:च आठशे घोडे गालवांना मिळेपर्यंत चार राजांशी परिणय करण्याची तयारी दाखविली. तदनंतर स्वत:चा निर्णय स्वत: घेण्याची तिला मुभा मिळाल्यावर तिने तपोवनात जाणे पत्करले.

७.आता आपण मुद्दा क्रमांक २ मधील माधवीची तुलना गालव अग्नी निर्माण करणाऱ्या अरणीशी करतात या तपशीलाकडे येऊ.समाजधारणेच्या प्रारंभिक कालात विवाह हा प्रजोत्पादनासाठीचे कर्तव्य गणला गेला आहे. शुभलक्षणी माधवी तिन्ही राजांना आणि विश्वामित्रांना गुणी,पराक्रमी पुत्र देते आणि त्यांना पितृऋणातून मुक्त व्हायला साहाय्यभूत होते; असा उल्लेख मूळ आख्यानात आहे. दिवोदास राजाशी तिचा मनोमिलाप घडून येतो; तरीही दोघे वचनबद्ध असल्यामुळे अधिक संगतीचा मोह सोडतात. ते विरहक्लेश दोघांना भोगावे लागतात. त्याग आणि यज्ञ या दोन संकल्पनांवर तत्कालीन सामाजिक नीतिमत्ता आधारित होती; मग देवल याला अनभिज्ञ अबलेवर केलेले निर्घृण अत्याचार,अश्लाघ्य पितृकर्म असे सोयीने, संदर्भ टाळून कसे म्हणतात? दिवोदासाने विधिपूर्वक माधवीचे पाणिग्रहण केले, असा स्पष्ट उल्लेख एकशेसतराव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकात आहे; तरीही देवल त्यांच्या कवितेच्या ‘तुझी सावली’ या अंशात म्हणतात की पाण्याला चाललेल्या इतर बायका तिला बिनलग्नाची असं हेटाळून फिदीफिदी हसतात. कॉन्ट्रक्ट मॅरेज तर आधुनिक कालातही स्वीकारले गेले आहे; मग एकट्या दिवोदासाला दोष का द्यायचा?

८ अयोध्या, काशी, अवंतिका या तीन प्रमुख,पावनतीर्थ राज्यांच्या राजांचे माधवीशी वैध संबंध स्थापले जाऊन त्यांना आदर्श आणि उत्कृष्ट पुत्र होतात; या तपशीलाकडे पाहिले तर तत्कालीन समाजस्थैर्याच्या दृष्टीने हे इष्टच होते. यातील कुणी राजा वा त्याचा पुत्र दुर्व्यसनी, ऐयाशी, बेजबाबदार होते, असे नाही. एकाहून अधिक विवाहसंबंधांनी राज्यांना बळकटी देण्यचे धोरण तर छत्रपती शिवाजी वा अकबरानेही राबविले; पण म्हणून ते अन्यायी ठरले नाहीत. त्यांच्या स्त्रियांच्या वाट्याला दु:ख, वंचना आली असेही इतिहास सांगत नाही. जे इतिहासाने झाकले तेच उकरून,उकलून दाखविण्याचा यत्न आपण करीत आहोत, त्याद्वारे पश्चात्ताप व्यक्त करीत आहोत; अशी देवलांची भूमिका आहे; परंतु मूळ आख्यानात माधवीला बळीही ठरविलेले नाही किंवा तिच्या त्यागाचे स्तुतिगानही केलेले नाही.

९.चारी राजांचे आणि गालवांचे ईप्सित साध्य करून दिल्यावर मात्र ती स्वत:च तपोवनाची निवड करते; तेव्हा ययाती, यदु वा पुरू कोणतीही हरकत घेत नाहीत, तिला मज्जाव करीत नाहीत. भोगनिवृत्ती ही तिची निवड आहे. तेव्हाही ती स्थिरमती असल्याचेच जाणवते. ती खिन्न, भग्नमना, विषण्ण होऊन तपोवन निवडते; असे तिथे जाणवत नाही. चार-चार घरोब्यांतून आलेल्या शिणाची ती अभिव्यक्ती असेल किंवा कर्तव्यपूर्तीच्या समाधानातूनही आली असू शकेल; पण एखादी वात जशी जळून उजळते तसे तिचे आचरण-विचरण तप:पूत होते. मूळ आख्यानात ते श्लोक अतिशय कोमल, हृद्यपणे तिच्या विश्रब्ध, विश्रांत, समचित्ततेची साक्ष देतात.

हे सर्व इतक्या तपशीलात जाऊन अशासाठी मांडावेसे वाटले की, कुठल्याही सामाजिक विचारबंधांचा, राजकीय वादांचा तर्कटपणाने, आपल्या अभिमताच्या सोयीने केलेला पाठपुरावा तात्पुरता चमकदार किंवा चतुर असला तरी त्याचे प्रतिपादनच अंतिम सत्य असत नाही. पुष्कळदा आपल्या अभिनिवेशामुळे आपण त्याचा विपर्यास करतो; याविषयी विचारवंतानी जागे असले पाहिजे.

Author

  • सुखमणि रॉय

    एम् ए, एम् फिल्, पंडित
    एक्स रीडर व विभागाध्यक्ष, इंग्रजी विभाग, पी एन् दोशी कॉलेज,घाटकोपर, मुंबई

    संशोधन क्षेत्र: उत्तर-आधुनिकतावादी व स्त्रीवादी साहित्य व विचार

    View all posts

Leave a Reply