| वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव – संपादक. |
शेवटी सवय झालीये म्हणायचं इथली! रेल्वेलाइनच्या दोन बाजूला रांगेत पसरलेलं हे गाव – छोटी छोटी घरं, बाजारपेठ, थोडी दूरवर असलेली धनिकांची फार्महाउसेस आणि चिक्कार रासवटपणा! लोकलच्या वेळा सोडल्या तर निपचित असे हे गाव. इथे डोसा चटणी नाही, पोहे,उप्पीट वगैरे तर नाहीच नाही. सकाळी इथे काही खायला मिळत नाही. स्टेशनजवळ फक्त गाडी असते एक. तिथे भयाण तेलकट बटाटेवडा (कधी केलेला असतो माहीत नाही), चहा, खारी बिस्किटे असं काहीबाही मिळतं. तिकडे आमच्या आरोग्य केंद्रावरून चालत गेलं की एक मगनलालचं हॉटेल लागतं. तिथे शेवचिवडा, फाफडा, मिसळ पाव, चहा, कोल्ड्रिंक अन्
कधीमधी उडीदवडा मिळतो. समोरच्या सिस्टर खूप चांगल्या आहेत. त्यांचे साहेब सरकारी नोकरीत आहेत. आठवडाअखेर येऊन जाऊन असतात. बोलायला भारी! कोंबडी, मासेपाहिजेतच त्यांना जेवणात अन् हातात सतत पेटती सिगारेट. घरी चहाला म्हणून गेलं तर अगदी जेवायचाच आग्रह. त्यांची सोन्या अन मोन्या दोन मुलं. कॉलेजात जाणारी,देखणी! खरंतर डोक्यानेही चांगली; पण कमालीची वाह्यात. तोंडात भयंकर शिव्या अन् द्यायला कचरत नाहीत आईबापांसमोरही. एकदा दोघांमध्ये भांडण झालं तर एक दुसऱ्याला म्हणाला
“साल्या आयxx”
त्यावर दुसरा म्हणाला, “मादरxx”; मग आणखीन शिव्या अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण. मी दचकून खिडकीतून बघतोय. शेवटी आईवडिलांवरून एकमेकांना आणखीन शिव्या तारस्वरात दिल्यावर सिस्टर आल्या आणि दोघांच्याही कानाखाली सणसणीत वाजवली तेव्हा छोटा दरवाजाकडे पळत जात म्हणाला मोठ्याला, “आयxx थांब, दाखवतोच तुला डुकरा!”
होस्टेलला इतकी वर्षे काढल्याने शिव्या ऐकल्या नव्हत्या असे नाही; पण म्हणी म्हटल्याप्रमाणे अथवा सुभाषिताप्रमाणे शिव्यांची माळ ऐकणे म्हणजे थोर; शिवाय माझ्या इतर ज्ञानात आणि आकलनात मोठीच भर पडते आहे – म्हणजे कसं की सकाळी-सकाळी आवरून अगदी किलबिलाट करत स्टेशनवर विविध कॉलेजेस, शाळांत पुण्याकडे जाणारे हे नवथर लोक म्हणजे वेगळेच जग असावे. जसं की सोन्याच्या पाच मैत्रिणी; तर मोन्याच्या तीन.आलटून पालटून ( कसे जमवतात माहिती नाही ) एकेका मैत्रिणीसोबत ते शिवाजीनगरला उतरणार अन् मग तिथे वडा-सांबार खाऊन थेट मंगला अथवा नटराजला अथवा स्टेशनपर्यंत गेले की अलंकारला मॉर्निंग बघणार; मग तो बघताना तिथे ते धगधगून पेटून उठणार आणित्याबद्दल आपण चकित होऊन तोंडात बोट घालावं इतक्या फुशारकीने बोलणार. म्हणजे ते तसे वाक्प्रचार लोकलच्या डब्यात ऐकायचो; पण संदर्भ लागायचा नाही. तर इथे हे जेव्हा समग्र वृत्तांतासहित म्हणत त्यावेळी अंगावर काटा यायचा .
बाकी सर्व इथे भीषण आहे. मुख्य डॉक्टर इंटर्न असेपर्यंत म्हणजे दुपारी १-२ वाजेपर्यंत भययुक्त प्रशासन दाखवतो. इथे धनुर्वाताचे, व्हिटॅमिन बी चे इंजेक्शन, लोहाच्या (आयर्न ), कॅल्शियमच्या आणि पॅरासिटॅमॉल आणि ब्रुफेनच्या वेगवेगळ्या गोळ्या, अँटिबायोटिकमध्ये septran आणि पेनिसिलीन ही इंजेक्शन्स, सलाईनच्या बाटल्या, भुलीची किरकोळ औषधं एवढंच उपलब्ध आहे. बाह्यरुग्ण विभाग शिकाऊ लोकांनी बघायचा. मुख्यत्वे बाया बापड्या असतात. कंबर दुखते, अंगावर जाते,पाळी लांबली, अशक्तपणा, ताप येतोय, विंचू चालवला…असं सगळं. ते बघून मग औषधं लिहायची. आवारात फार्मसी. तिथे मग उपलब्ध असेल तेवढं देऊन तिथल्या बाई हात वर करायच्या; मग आपण दुसरी चिट्ठी लिहायची. बाहेरून औषध आणायचं म्हटलं की आधीच गांजलेले लोक आणखीन चिंताग्रस्त व्हायचे . मग हताश वाटतं. आणखीन वाईट वाटतं. एकदा ‘औषधं का नसतात?’ म्हटल्यावर आमचे सर एकदम रागवले. असंच असतं इथं आणि सगळीकडे. आहे त्यात भागवा म्हणतात वरचे लोक. द्यायचं सगळ्यांना लोह आणि आणखी काही! खूप वाटलं तर एखादं इंजक्शन मारायचं आणि गप्प बसायचं
त्यांची ती एका टोकाला असलेली खोली, खुर्चीच्या समोर असलेलं काळं कुळकुळीत शिसवी टेबल, अगम्य भगव्या रंगाच्या भिंतीवर लावलेला नेहरूंचा फोटो अन दुसऱ्या कोपऱ्यात असलेला स्थानिक पुढाऱ्याचा बेरकी फोटो, खोलीला लागून असलेले आतूनच दरवाजा असलेले टॉयलेटचे दार! तिथून हा पॅन्टची बटणे लावत बाहेर आला की भयंकर अश्लील वाटते. सुरुवातीला वाटले आणि काही प्रमाणात खरे आहे की हा माणूसही व्यवस्थेचा बळी आहे; पण मग राहताना लक्षात आलंय की त्याची खरी करामत दुपारी अन् संध्याकाळी.
त्यासाठी तत्पर असा तयार सहायक. मग त्या रुग्णांना ऐपत असेल तर औषध उपलब्ध
करून मिळतं; पण खरे कसब अविवाहित गर्भवती बायकांचे गर्भपात करतानाचे.
त्यातून घसघशीत रक्कम तो मिळवतो. याबाबत माझ्याशी कोणी उघड बोलत नाही; पण कळते आहे. बहुसंख्य रात्रींना तो दारू पिऊन धुंद होई. कधीतरी घरात तमाशा, मारहाण होते.
इथे संध्याकाळी फिरायला बाहेर पडलं तर लोक संशयाने बघतात. संध्याकाळी
लोकलमधून ऑफिस संपवून परतणारे लोक असतात. त्यांचे वेगळे ग्रुप, मस्करी, पान-सिगारेटची देवाणघेवाण अन् समोर वाहणारी ती इंद्रायणी. दुपारपासूनच किंबहुना सकाळपासून टाकून डुलणारी कैक! तीन-पानी, मटका, आकडा – दैनंदिन जगण्याचा भाग.
असे लांबलचक दिवसाला जोडलेले दिवस, स्वस्त सिगारेट, चहा, जेवणाच्या दशा आणि डिसेंबरमधली थंडी, कौलातून दिसणारे आकाशाचे तुकडे, मनातल्या प्रतिमांचे होणारे तुकडे तुकडे अन् मग आठवणारी ती. ‘खूप आवडलं तरी सगळ्या गोष्टी हातात नसतात, ‘ कधीकधी म्हणणारी! खिशात दिसणारं सिगारेटचे पाकीट दटावून आत ठेव म्हणणारी, चांगल्या पुस्तकांमध्ये रमणारी, वादविवादात जाणवणारा तिच्या नाकाचा शेंडा, एखाद्याच वेळी सोबत असताना वाजलेल्या एखाद्या सुरावटीच्या तुकड्यातून का कसे माहीत नाही — तरारून आलेली प्रेमाची अन्
विरहाची निर्णायक भावना… हे काय होतंय नक्की आणि कसं येतंय सारखं समोर…
आटोकाट प्रयत्न करताना हे आताच का अंगावर आलंय जोरदारपणे! देवा…!
तिकडे मगनलालच्या हॉटेलपुढे डाव्या बाजूला इथला एकमेव बार आहे – दिलबहार. हिरव्या रंगाची इमारत,ओबडधोबड आणि अनाकर्षक. बाहेर चिकटून असलेली अपरिहार्य पानटपरी. आत शिरल्यावर इतका अंधार की दिवसाढवळ्या डोळे फाडावे लागतील; मग अशा एका अंगावर येणाऱ्या रात्री मी दिलबहारमध्ये गेलो. माहोल भीतिदायक होता. पिवळे मंद दिवे, लाकडाची टेबलं, जोरजोरात बोलणारे लोक आणि गल्ल्यावरही दिसणारे काही वादविवाद. संगीत वगैरेची भानगड नाही. मी उभा राहिलो आणि बघतोय इकडेतिकडे.
उकडलेले आणि भाजलेले दाणे, अंडी, मासे चिकन दिसतंय. काही ठिकाणी मीठ आणि लिंबू फक्त समोर आहे. थोड्या वेळाने काहीजण माझ्याकडे एकटक बघताहेत, मलाही कळत नाहीये परत जावं का थांबावं?
शेवटी एक उंच किरकोळ अंगाचा माणूस अचानक उगवून विचारतोय, “काय पाहिजे साहेब?”
“बियर आहे का?”
“आहे की !”
कुठे बसावं समजेना तेव्हा तो भला माणूस म्हटला, “इकडे या साहेब.”
मग मला दिसलं की अरे, वरती जाणारा जिना आहे. वर आल्यावर जरा शांतता. दहा-बारा टेबलं अन् त्यावर बसलेले तुलनेने शांत घोळके.
एका कोपऱ्यात हवी तशी जागा मिळाली. खोलीचा गडद निळा रंग आणि पिवळा प्रकाश एक रहस्यमय वातावरण तयार करतो आहे. काहीजण कुतूहलाने बघताहेत – हे एकटं यडं कोण?
…पण आता मी स्थिरावलोय. केरळवरून येऊन इथलाच झालेला बाबू थंडगार किंगफिशर आणतोय. सोबत उकडलेले शेंगदाणे,फरसाण.
बाहेरही थंड आणि आत थंडगार फेसाळणारी बियर, सोबतीला कोणीच नाही; असलीच तर अस्वस्थ पसरलेली अनिर्णित रात्र अन् हे सर्व बघितले तर आई-वडील,बहिणी काय म्हणतील हे प्रश्नचिन्ह आणि एक उदास हास्य स्वतःचे स्वतःसाठी…
मुझको यकीन है ,सच कहती थी
जो भी अम्मी कहती थी
जब मेरे बचपन के दिन थें
चाँद पे परियाँ रहती थीं…
एक ये दिन जब सारी सडके
रूठी रूठी लगती है
एक वो दिन जब सारी गलियाँ
आओ खेले कहती थीं
क्रमशः
