थँक्स, ओबामा (माय होपी, चेंजी व्हाईट हाउस यीअर्स – अ स्पीच राईटर्स मेम्वार) – डेव्हिड लिट
प्रकाशक – एको
३२० पाने
किंमत – रु.४०९ किंडल – रु.३८८
डेव्हिड लिट या अमेरिकन राजकीय नेत्यांसाठी भाषणे लिहून देणाऱ्या लेखकाने, ‘थँक्स, ओबामा’ या आपल्या पहिल्याच पुस्तकात त्याच्या व्हाईट हाउसमधल्या चार वर्षांच्या कारकिर्दीतल्या आठवणी सांगितल्या आहेत. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्याने अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सल्लागार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी भाषणे लिहायला सुरुवात करून शेवटी खुद्द अध्यक्षांची भाषणे लिहून देण्यापर्यंत प्रगती केली. अध्यक्षीय भाषणातले विनोद लिहायची जबाबदारी लेखकावर होती. लेखकाच्या विनोदबुद्धीचा प्रत्यय ओबामा यांना लिहून दिलेल्या भाषणांप्रमाणे या संपूर्ण पुस्तकात येतो.
लेखकाने आपली रोजनिशी ठेवली नाही; कारण अमेरिकन काँग्रेसकडून एखाद्या केसच्या संदर्भात अशी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याचा आदेश येऊ शकतो. भविष्यात अशा प्रकारचा धोका त्याला पत्करायचा नव्हता. लेखक शिक्षणासाठी ज्या येल विद्यापीठात दाखल झाला, त्या अभिजनवादी विद्यापीठातले बरेच विद्यार्थी जन्मल्यापासूनच कुठलीतरी निवडणूक लढवण्याच्या मागे असायचे. व्हाईट हाउसमधल्या नियुक्तीमुळे लेखकाला तरुण वयातच लोक ‘सर’ म्हणायला लागले. कधीकधी असे म्हणवून घ्यायची आपली योग्यता असल्याचा त्याचा समज होत असल्याचे त्याने नमूद केले आहे. नेहमी पडद्यामागे राहून भाषणे लिहून देणारा लेखक एकदा ओबामांच्या भाषणाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी समोर येऊन बसला तेव्हा, ‘तो लिट समोर असला की नेहमीच मला अस्वस्थ वाटतं,’ असे अध्यक्ष ओबामा काहीसे विनोदाने म्हणाले होते. लेखकाने व्हाईट हाउसमध्ये आपण कोणी विशेष शक्तिशाली होतो असा आव आणलेला नाही. त्या काळातल्या आपल्या चुकाही त्याने प्रांजळपणे सांगितलेल्या आहेत.
ओबामा यांची अध्यक्षपदी निवड ही प्रचंड आशावादातून झाली होती. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचे विरोधक, “तुमचे ते परिवर्तन आणि भविष्याची आशा वगैरे गोष्टी कशा चालल्या आहेत?” असे सतत उपहासाने विचारत होते. उपहास असला तरी हा प्रश्न महत्त्वाचा होता असे लेखकाला वाटते. त्याने ऐन विशीतली बरीच वर्षे अध्यक्ष ओबामा यांच्याबरोबर घालवली. करीअर म्हणून ते चांगले झाले तरी; एकूण सगळा विचार करता काय म्हणता येईल, याचे उत्तर त्याच्यासाठी सरळ सोपे नव्हते.
शाळा-कॉलेजमध्ये असताना लेखकाचे राजकारण्यांविषयी कधीच चांगले मत नव्हते. परिवर्तन वगैरे घासून घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांवरचा त्याचा विश्वास उडाला होता. आपण स्वतः जगात काहीही बदल घडवून आणू शकत नाही; हे लक्षात आल्यावर त्यावर काही विनोद करण्यातही त्याला काही स्वारस्य उरले नाही. मात्र ९/११ नंतरच्या वर्तमानपत्रांमधल्या विडंबनात्मक लेखांमुळे त्याला भविष्याविषयी नवीन आशा निर्माण झाली.
मागे वळून पाहताना लेखक स्वतःच्याच भाबड्या आशावादाची टिंगल करतो. इतिहास या विषयाचा अभ्यास आणि कॉमेडी ट्रूपच्या दिग्दर्शनाचा अनुभव, यांच्या जोरावर आपण ओसामा बिन लादेनला पकडून आणू शकतो असा विश्वास मनाशी बाळगून त्याने सी.आय.ए.कडे नोकरीचा अर्ज केला असे त्याला वाटते. नोकरीच्या अर्जात, ‘तुम्ही गेल्या वर्षात काही बंदी असलेल्या अमली पदार्थांचे सेवन केले आहे काय?’ असा प्रश्न होता. लेखकाने जर त्याचे धडकून खोटे उत्तर दिले असते तर तो कदाचित त्यांची परीक्षा पास झाला असता. तसे झाले असते तर हे पुस्तक लिहिण्याऐवजी, राष्ट्रहितासाठी एका मोठ्या बंदुकीच्या आत दडवलेल्या छोट्या बंदुकीतून एखाद्या ड्रगलॉर्डला विषारी छर्रा मारणे किंवा मादक सौंदर्यवती सुपरमॉडेल बरोबर मजा मारणे अशा गोष्टींत तो व्यग्र राहिला असता, असे तो म्हणतो. अशा प्रकारे संपूर्ण पुस्तकभर लेखकाने इतरांप्रमाणे स्वतःलाही विनोदाचा विषय बनवले आहे.
लेखकाने पहिल्यांदा मतदान केले तेव्हा त्यावेळचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी, ‘तुम्ही एकतर आमच्या बरोबर आहात नाहीतर आमच्या विरोधात आहात,’ अशी भूमिका घेतली होती. याउलट ओबामा यांनी सुरुवातीपासूनच, ‘आपण एकेकट्याने जे काही करू शकू, त्यापेक्षा एकजुटीने बरेच काही जास्त करू शकू,’ अशी समन्वयाची भूमिका घेतली. ज्यांचे मधले नाव हुसेन आहे अशा कृष्णवर्णीय ओबामांच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात लेखकाने त्याकडे गंभीरपणे बघितले नाही. त्यावेळी त्याच्या मते हे व्हूपी गोल्डबर्ग या कृष्णवर्णीय अभिनेत्रीचा पोप म्हणून विचार करण्यासारखे होते, अशी कोपरखळी तो स्वतःलाच मारतो. नंतर मात्र त्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो.
ओबामा यांचा करिष्मा आणि प्रभाव इतका होता की त्यांना राज्यकारभाराचा विशेष अनुभव नसतानाही ते उत्तम काम करू शकतील असा विश्वास त्यावेळी अनेक तरुणांना वाटला. त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या हजारो लोकांकडे बघून लेखकाच्या लक्षात आले की त्या समुदायात खऱ्या अर्थाने विविधता होती. त्यावेळच्या विशीतल्या तरुणांच्या दृष्टीने ओबामांच्या अमेरिकेत काहीही शक्य होते. ओबामांच्या प्रभावामुळे तरुण मुलेमुली फक्त राहण्याच्या आणि जेवण्याच्या सोयीच्या बदल्यात इतर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता; दिवसाचे सोळासोळा तास त्यांच्या प्रचारासाठी काम करायला तयार झाली. निवडणुकीपूर्वीच्या सहा महिन्यांत लेखक बिअर आणि मैत्रिणी या तारुण्यसुलभ आकर्षणांपासूनही दूर राहिला होता. त्या काळात त्याने बातम्या देणाऱ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्याही टाळल्या.
निवडणूक प्रचाराच्या काळात रिपब्लिकन सेरा पेलीन यांनी अप्रामाणिकपणे ओबामा यांच्या वक्तव्याची मोडतोड केल्याचा लेखकाला राग आला होता; तरीही त्यातून त्याने निवडणुकीसाठी एक आकर्षक आणि प्रभावी घोषणा तयार केली. याचे श्रेय तो पेलीन यांना देतो. ओबामा यांच्या कुठल्याही प्रस्तावावर मतप्रदर्शन करणे हे रिपब्लिकन लोकांसाठी हिटलरच्या एखाद्या कलाकृतीवर मतप्रदर्शन करण्यासारखे होते. त्यांना ते आवडो वा नावडो, त्याचा तिरस्कार करणे ही त्यांच्यासाठी अपरिहार्यता होती.
ओबामा यांनी निवडणूक जिंकली आणि प्रचाराचे काम संपले. लेखकाकडे त्यावेळी कोणतीही नोकरी किंवा भविष्याच्या योजना नव्हत्या. त्या काळात वॉशिंग्टनमध्ये शेकडो तरुण नव्या सरकारात काही काम मिळेल या आशेत होते. एकीकडे चापलुसी आणि दुसरीकडे सत्तेच्या कल्पनेने येणारा माज या गुणांची चलती होती. या सगळ्यातून काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेखकाला भाषणे लिहून देण्याच्या नोकरीसाठी व्हाईट हाउसमधून बोलावणे आले.
सुरुवातीला एक शिकाऊ उमेदवार म्हणून मुद्रितशोधन आणि हवापाण्याचे विनोद लिहिणे, एवढेच काम त्याच्याकडे होते. एखाद्या राजकारण्यासाठी विनोदी भाषण लिहिणे म्हणजे मार्लन ब्रँडोसारख्या अभिनेत्याच्या उतारवयात त्याच्यासाठी फार आकर्षक आणि छाप पाडणारे डिझाईन बनवण्यासारखे आहे; याची लेखकाला जाणीव झाली. व्हाईट हाउसमध्ये काम करताना लोकांच्या अपेक्षांचे ओझे वाढतच जाते ही गोष्ट अन्याय्य आहे; हे त्याच्या लवकरच लक्षात आले. शिकाऊ उमेदवारांना त्यांच्या अधिकाऱ्याने पहिल्याच दिवशी तंबी दिली, “तुम्ही काहीतरी बिनडोकपणा केलात आणि त्याला पेपरात प्रसिद्धी मिळाली, तर तुम्हांला हाकलून दिलं जाईल. तुमचं म्हणणं काय आहे हेही आम्ही विचारणार नाही.” यामुळे चुका न करणे हा अग्रक्रम होऊन बसला. बिनचूक कामाचे कोणी कौतुक करत नसे.
ऋणनियंत्रण (डेट सीलिंग) या तरतुदीमुळे अमेरिकेचे सेनेटर्स आणि काँग्रेसमेन हे सरकारला त्यांची देणी फेडण्यापासून रोखू शकतात. ही एक विचित्र पद्धत आहे असे लेखकाला वाटते. जर अमेरिकन सरकारने आपली देणी फेडली नाहीत; तर जगभराची अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते. जागतिक अर्थव्यवस्थेचा विध्वंस करणारे अशा प्रकारचे बटण अमेरिकेच्या राजधानीत असायचे कोणतेही सयुक्तिक कारण नाही. रिपब्लिकन पक्षाच्या या तरतुदीच्या वापराच्या हट्टामुळे, ओबामांच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था दोन आठवड्यांत कोलमडून पडायच्या अवस्थेला आली होती. शेवटी ओबामा यांनी थेट अमेरिकन जनतेशी संवाद साधताना सांगितले, “मतदारांनी अध्यक्ष एका पक्षाचा आणि काँग्रेसवर नियंत्रण दुसऱ्या पक्षाचे अशी निवड केली होती; पण सरकार ठप्प व्हावे अशी त्यांची इच्छा नव्हती.”
पुढे अध्यक्षांनी तडजोड मान्य केली; कारण त्यांना ती तशी करावी लागली. अवास्तव मागण्यांसाठी सरकारला ओलीस धरणाऱ्या ‘टी पार्टी’वरच्या रागापेक्षा, अध्यक्षांनी माघार घेतल्यामुळे लेखकाची घोर निराशा झाली. आपले सर्व प्रामाणिक प्रयत्न वाया जाणार नाहीत याची खातरी काय? असा मोठा प्रश्न त्याला पडला.
अमेरिकेत गौरवर्णीय पुरुष असल्याच्या काही फायद्यांविषयी आणि विशेषाधिकारांबद्दल बरेच काही बोलले जाते. लेखक म्हणतो की तो जर भर रस्त्यावर जाऊन, “मी गोरा पुरुष आहे, आणि सगळं जग माझं देणं लागतं!” असे ओरडला असता तर त्याला काही विशेष संधी मिळाली नसती; मात्र त्याला प्रोत्साहन, पुन्हा प्रयत्न करायची संधी आणि काही सोयी निश्चितपणे मिळाल्या; हे तो मान्य करतो.
व्हाईट हाउस हे काही ‘द वेस्ट विंग’ या लोकप्रिय मालिकेतल्यासारखे नाही. कदाचित ते स्टार वॉर्स चित्रपटातल्या डेथ स्टारसारखे आहे असे लेखकाला वाटते. तिथे हजारो लोक आपल्याला नेमून दिलेले काम करण्यासाठी धावपळ करत असतात. अध्यक्षांबरोबर काम करताना त्यांच्याशी मैत्री होईल असे लेखकाने गृहीत धरले नव्हते; मात्र तसे व्हावे अशी मनात इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. हे अमान्य करणारा एकतर खोटे बोलतो आहे किंवा तिचे नाव मिशेल आहे, अशी मिस्कील मल्लिनाथी त्याने केली आहे. व्हाईट हाउसमध्ये काम केल्यामुळे त्याच्याकडे कोणी मुली आकर्षित झाल्या नाहीत. उलट कामाच्या प्रचंड ताणामुळे इतरांच्या भेटीगाठी अधिकच कठीण होऊन बसल्या.
लेखकाच्या मते भाषण लिहून देणारे लोक हे फार तर वैयक्तिक प्रशिक्षकासारखे असतात. त्यांच्यात राजकारण्यांवर प्रभाव टाकण्याची शक्ती नसते. राजकारण्यांमधला एखादा गुण ते लोकांसमोर आणू शकतात; पण जे त्यांच्यात मुळातच नाही, ते केवळ चमकदार भाषणांमधून लोकांपर्यंत पोहचवता येत नाही. तुम्ही जर तज्ज्ञ असाल तर तुम्ही कंटाळवाणे असण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी तुम्हाला भाषणे लिहून देणाऱ्याची गरज भासते. राजकारण्यांचे काही विचार असतात . त्या विचारांना सुसंघटीत करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता असते. एखादा चांगला भाषण लिहिणारा, तुमच्या दहा कल्पना घेऊन त्यातून एक सुसंगत चित्र निर्माण करू शकतो; मात्र भाषण करणारा आणि लिहून देणारा यांच्यात मतभेद असतील; तर भाषण करणाऱ्याचे मतच योग्य असते.
काही लोक भाषणात आपण काय सांगणार आहोत हे सांगतात; मग जे सांगायचे आहे ते सांगतात आणि शेवटी आपण काय सांगितले ते सांगतात. अध्यक्षीय भाषणे म्हणजे काहीतरी चांगला आभास निर्माण करणाऱ्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी सांगणे; अशी काहीशी वैफल्यग्रस्त भावना लेखकाच्या मनात काहीवेळा निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. लेखकाचे काम ही त्याच्या मते कला नसून कारागिरी होती. सरकारी कामात काही असामान्य क्षमता किंवा प्रचंड हुशारी यापेक्षा अचूकता आणि कार्यक्षमता या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. यामुळे करदात्यांच्या पैशातून मिळणाऱ्या आपल्या पगाराची योग्य परतफेड आपल्याकडून होते आहे की नाही याबद्दल त्याला अपराधी वाटत असे. जेव्हा संस्कृती कोसळत असल्याचे भासत होते, तेव्हा लेखकाची भाषणे लिहिण्याची करीअर जोरात चालली होती, हा विरोधाभास त्याला अस्वस्थ करणारा होता.
‘प्रचार हा काव्यात करायचा असतो आणि राज्यकारभार गद्यात,’ अशी वॉशिंग्टनमधली एक जुनी म्हण आहे. व्हाईट हाउसचे कर्मचारी हे अध्यक्ष ओबामा यांच्यासाठी काम करतात; पुढच्या निवडणुकीतले अध्यक्षपदाचे उमेदवार ओबामा यांच्यासाठी नाही याची खबरदारी घेण्यासाठी तिथले वकील दक्ष असत. २०१२ च्या निवडणुकीतले आपले काम २००८ पेक्षा जास्त महत्त्वाचे; पण कमी आनंदाचे होते अशी लेखकाची भावना आहे; कारण २०१२ मध्ये ओबामा हे लोकांना आवडत होते; पण ते परत निवडून येतील की नाही याची खातरी वाटत नव्हती. आर्थिक आघाडीवर ओबामा यांची कामगिरी समाधानकारक नव्हती; त्यामुळे या विषयावर काही बोलण्याऐवजी ओबामा हे त्यांचे प्रतिस्पर्धी रॉमनी यांच्यापेक्षा कसे चांगले आहेत यावर भर देण्यात आला.
टीव्हीवरचे डिबेट म्हणजे रिऍलिटी शो झाले आहेत असा उद्वेग लेखकाने एके ठिकाणी व्यक्त केला आहे. अध्यक्ष ओबामा यांच्यासाठी प्रत्येकच भाषण अमेरिकेविषयी होते आणि संपूर्ण अमेरिका हाच त्यांचा श्रोतृवृंद होता. त्यांना तान्ह्या मुलांना भेटायला आवडायचे; कारण त्या मुलांना ओबामा कोण याची काहीच कल्पना नसायची. अन्यथा सध्याच्या टी.व्ही.मुळे अगदी पाच वर्षांची मुले सुद्धा अध्यक्षांना ओळखायची.
‘अध्यक्ष ओबामा हे अतिशय हुशार आणि प्रतिभावान होते, त्यांना इतरांपेक्षा भविष्याचा अंदाज चांगला आला होता; पण शेवटी तेही एक माणूसच होते,’ या निरीक्षणामधून लेखकाने ओबामा यांच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे. अध्यक्षांना आवडलेली गोष्ट त्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीने अयोग्य आहे हे सांगायची हिंमत कोणी करू शकत नव्हते. व्हाईट हाउसमध्ये काम करणे हा अनुभव लोकांना वाटतो तितका खास नसला; तरी एअरफोर्स वन हे विमान मात्र लोकांच्या अपेक्षेप्रमाणे खास आहे. लेखकाच्या मते व्हाईट हाउसपेक्षा एअरफोर्स वन हे विमान अध्यक्षांच्या प्रभावाचे जास्त चांगले आणि मोठे प्रतीक आहे. एअरफोर्स वन या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खास विमानात अध्यक्षांचा आहार आरोग्यकारक असायचा. बाकीच्या लोकांच्या आहाराबाबत लेखक म्हणतो की तो नरभक्षकांनी आपल्या भक्ष्याला मारण्यापूर्वी त्याला भरपूर खायला घालून जाडजूड करावे, अशा प्रकाराचा असायचा.
व्हाईट हाउसच्या कर्मचाऱ्यांपैकी संशोधन करून भाषणातल्या चुका दुरुस्त करणाऱ्या लोकांमुळे केवळ अध्यक्षांनाच नाही तर लोकशाहीलाही फार मोठी मदत झाली. संशोधकांच्या मते त्यांच्या नियंत्रणाविना भाषण लिहिणारे लोक कल्पनेच्या आकाशात भराऱ्या मारत सुटतात. याउलट भाषण लिहिणाऱ्यांच्या मते, संशोधकांची धोका टाळण्याची प्रवृत्ती हास्यास्पद पातळीला जाऊन पोहचते. संशोधकांच्या मते, ‘आमच्यापुढे दुसरा मार्ग नव्हता,’ हे म्हणायला ठोस पुरावा नसेल; तर ‘आमच्याकडे मर्यादित पर्याय उपलब्ध होते,’ असे म्हणणे जास्त सुरक्षित असते. त्यामुळे कुठलाही दावा करताना संशोधक लोक ‘जवळजवळ’ हा शब्द घुसडायला लागले; तर अध्यक्षांनी तो शब्द प्रत्यक्ष भाषणातून गाळायला सुरुवात केली.
राजकारण्यांना लिहून दिलेल्या भाषणात प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडावा लागतो याचा धडा लेखकाला एका प्रकरणात मिळाला. पत्रकारांसमोर करायच्या अध्यक्षीय भाषणात मुक्त पत्रकारितेचा गौरव करण्यासाठी लेखकाने एक वाक्य टाकले – ‘पत्रकारांनी सीरिया आणि केनियासारख्या देशांमधून बातम्या आणण्यासाठी फार मोठी जोखीम पत्करली आहे.’ यावर केनियाची राजधानी नैरोबीमधून प्रसिद्ध होणार्या डेली नेशन या वृत्तपत्रातला मथळा होता – ‘केनिया परदेशी पत्रकारांसाठी असुरक्षित आहे – ओबामा.’ पुढे हा घोळ निस्तरण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांना बरीच धावपळ करावी लागली. लेखकाने ओसामा बिन लादेनवर लिहिलेला एक विनोद अध्यक्षांनी गाळल्याचा लेखकाला आधी राग आला होता; पण नंतर त्याच्या लक्षात आले की अमेरिकन लष्कराच्या प्लॅनप्रमाणे पुढच्याच आठवड्याभरात ओसामाचा वध होणार होता.
सध्या अमेरिकेतल्या जनतेचे राजकीय ध्रुवीकरण अत्युच्च पातळीवर पोहचले आहे. १९६० मध्ये ५% अमेरिकन लोकांनी असे सांगितले की त्यांच्या मुलांनी विरोधी पक्षातल्या कोणाशी लग्न केले तर त्यांना आवडणार नाही. एका अर्धशतकानंतर हा आकडा ४०% वर गेला. ज्या लोकांना तडजोड आणि विश्वासघात यांच्यातला फरक समजत नाही; त्यांच्याशी मैत्री करून तरी काय फायदा, अशी स्वतः लेखकाची भावना आहे.
टीव्हीवरच्या पत्रकारपरिषदेत अध्यक्षांची प्रतिमा भव्य वाटते. प्रत्यक्षात ते एखाद्या काचेच्या बरणीतल्या शोभेच्या माशासारखे दिसतात असे लेखक म्हणतो. व्हाईट हाउसमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा एखाद्या पक्षाविरुद्ध पूर्वग्रह असेलच असे नाही; पण ते सगळे अध्यक्षांच्या मागे हात धुऊन लागतात. ते एक प्रकारे नैसर्गिक म्हणायला पाहिजे. ओबामा यांना स्वतःची खिल्ली उडवताना विशेष आनंद होत होता असे नाही; पण त्यांना त्याचे महत्त्व समजले होते. त्या दृष्टीने त्यांच्या भाषणात वापरण्याजोगे विनोद लिहिणारे लोक नशीबवान म्हणायला पाहिजेत.
आज जगातली हिंसा पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे; पण यूट्यूबमुळे आपण स्वतः ती हिंसा बघण्याचे प्रमाण फार वाढले आहे. अमेरिकेचे माजी सेनाध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल इराकच्या युद्धाबाबत म्हणाले, “इराकला चिनी मातीच्या सामानाच्या दुकानाचा नियम लागू होतो. तिथे तुम्ही जर एखादी वस्तू फोडलीत तर तुम्हांला त्याची किंमत मोजावी लागते.” लेखकाच्या मते हे बोलायला सोपे आहे. शेकडो अब्ज डॉलर्स आणि हजारो अमेरिकन सैनिकांचे जीव इतकी प्रचंड किंमत मोजावी लागेल अशा प्रकारची तोडफोड ही कल्पनेपलीकडची आहे.
लेखकाला त्याचे काम नेहमीच आवडत होते असे म्हणता येणार नाही. इतकी त्रासदायक नोकरी करण्यात काही अर्थ होता का? अर्थात हा प्रश्न सगळ्याच त्रासदायक कामांच्या बाबतीत पडतो. खुद्द अध्यक्षांचे काम सगळ्यात जास्त त्रासदायक होते. व्हाईट हाउस मध्ये त्यांचेच वय सगळ्यात जास्त दिसायला लागले. अमेरिकेच्या अध्यक्षांना जास्तीत जास्त आठ वर्षे अध्यक्षपदी राहता येते. ओबामा यांची कारकीर्द संपताना आलेल्या रितेपणाविषयी लेखक म्हणतो, “एका क्षणापर्यंत तुमचे भवितव्य जगातल्या सर्वात महत्त्वाच्या माणसाबरोबर जोडलेले असते; मात्र दुसऱ्या क्षणाला तुम्ही एखाद्या रिकाम्या वर्गात नाहीतर कार्यालयात माश्या मारत बसलेले असता.”
या पुस्तकाच्या शेवटी ओबामांनंतरचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांच्या शपथविधीनंतर एका आठवड्याभराच्या काळाचा उल्लेख आहे. आपल्या अस्सल विनोदी शैलीत लेखक म्हणतो की या आठवड्याभरात तो असंख्य वेळा एक खेळ खेळला होता – ‘मी शेवटचा फोन बघितल्यावर अमेरिकेची परिस्थिती आणखी किती वाईट झालेली आहे?’ हे तपासून बघण्याचा.
कितीही म्हटले की व्हाईट हाउस सोडताना त्याबरोबर येणाऱ्या सत्तेचाही त्याग करावा लागला याचे लेखकाला थोडे वाईट वाटले होते; पण आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या राजकीय लढ्यामध्ये त्याने एक लहानशी भूमिका बजावली होती; याचेच त्याला समाधान आहे.
