अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय – AI) ह्याचं नाव जगभर दुमदुमत आहे. चॅट जीपीटी किंवा जीपीटी-४ असे काही प्रोग्रॅम्स एआय प्रणालीच्या अग्रस्थानी आहेत. गूगलनेही स्वतःची एआय प्रणाली – गूगल बार्ड – आणली आहे. त्यामुळे सगळीकडे एआय भला की बुरा – हिरो की व्हिलन – हवा की नको असे वाद पेटायला लागले आहेत. अगदी चोऱ्या करण्यापासून बँकांना लुटण्यापर्यंत नवे नवे शोध लावत मानवापुढचे सारे प्रश्न सोडवण्यासाठी एआयचा वापर करता येईल असे अंदाज वर्तवण्यात येऊ लागलेले आहेत. इतकंच काय, एआय मोठा मोठा होऊन अगदी शेवटी भविष्यात माणूसच एआयचा गुलाम होणार असे दारुण भविष्य काही लोक पाहू लागले आहेत; पण ह्याला उतारा म्हणून, ‘बुद्धिमत्ता नैसर्गिक असो की कृत्रिम असो – माणसाचा गाढवपणा मात्र सदा नैसर्गिक आहे आणि तो तसाच राहणार आहे – त्यामुळे काळजीचं कारण नाही,’ असा दिलासा काही लोकांना वाटतो! माणसाचा शहाणपणा किंवा गाढवपणा ह्यात शिक्षणाचा भाग मोठा असल्यामुळे एआय हा विषय शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
आमच्या शिक्षणाच्या क्षेत्रात धुमाकूळ घालून एआय सगळ्या शिक्षकांना दे माय धरणीठाय करून सोडणार आहे अशी लक्षणं आहेत. बाटलीचं बूच उघडून ‘एआय’ ह्या भुताला मोकळं करण्यात आलेलं आहे. आता काही केलं तरी ह्या एआय भुताला दूर ठेवता येणार नाही आणि त्यामुळे ह्याला सांभाळून घेत घेत मुलांना कसं शिकवायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिक्षकांनी परीक्षा दिली की मुलं लगेच त्यातले प्रश्न एआयला (उदा. चॅट जीपीटीला ) विचारणार आणि एआयने दिलेली उत्तरं लगेच तिकडची इकडे करून स्वतः चांगले मार्क मिळवणार अशी लोकांना रास्त भीती वाटते. अशा परिस्थितीत मुलं नक्की काय शिकली हे शिक्षकांना कळणार कसं? म्हणजे त्यांना परीक्षेत असे प्रश्न घालायला हवेत की जिथे एआयसुद्धा नीट उत्तरं देऊ शकणार नाही!
अशा वेळी एआयचा एक ‘गुण’ लक्षात घेण्यासारखा आहे. ह्या एआय बाळाला ‘मला माहीत नाही’ किंवा ‘मला येत नाही’ असं सांगता येत नाही! म्हणजे एआयला जर काही माहिती नसेल तर काहीतरी शब्दांच्या डब्याला डबा जोडून तो वाटेल ती उत्तरं तयार करतो आणि ते उत्तर आहे असं तो ठोकून देतो! बसा बोंबलत! ह्याला भ्रमिष्टावस्था (hallucination) असं म्हणतात. एआयला आपल्याला सर्व काही कळतं असा भ्रम होतो आणि एआय उत्तर म्हणून काय वाटेल ते बोलतो! अलीकडेच मी एआयची परीक्षा घेतली. त्याला गणितं घातली तेव्हा एआयची दांडी उडाली. विशेषतः अमेरिकन मोजमापांची सिस्टीम (इंच, गॅलन, पाउंड, फॅरनहाईट वगैरे) आणि मेट्रिक/एसआय सिस्टीम (मीटर, लिटर, किलोग्रॅम, सेंटीग्रेड) ह्यांच्यामध्ये बदल करताना त्याची गडबड होते आहे हे दिसून आलं. साधी समीकरणं त्याला सोडवता आली नाहीत; पण एआय पठ्ठ्याने ‘मला माहीत नाही’ असं एकदाही उत्तर दिलं नाही! जे काही जमेल ते करून जो आकडा वाटला तो दिला ठोकून उत्तर म्हणून! खोटं कशाला बोला – आम्हीसुद्धा विद्यार्थिदशेत असताना असे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग इंजिनीयरिंगच्या परीक्षेत अनेक वेळेला केलेले आहेत! काय आहे – काही येत नाही म्हणून कोरा पेपर टाकून येण्यापेक्षा काही तरी पांढऱ्यावर काळं केलेलं बरं! न जाणो चुकूनमाकून उत्तर बरोबर यायचं! अगदीच काही नाही तर केवळ उत्तर देण्याचा प्रयत्न केला म्हणून एखाद-दोन मार्क परीक्षक पदरात टाकेल एवढी तर अंधुक आशा! त्या एक-दोन मार्कांनी माणूस नापासाचा पास होऊ शकतो.
आता एआयच्या मुख्य मुद्द्याकडे वळतो. प्रश्न असा आहे की आपलं शिकण्याचं काम आपण दुसऱ्याकरवी करवून घेऊ शकू का? हल्लीच्या ‘आऊटसोर्सिंग’च्या जमान्यात लोकांना इतरांकडून कामं करून घ्यायची सवय लागलेली आहे. उदा. औद्योगिक उत्पादन, संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) बनवणे, आरेखन (डिझाईन) अशा अनेक गोष्टी लोक इतर कंपन्यांकडून करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्यावतीने दुसरा कुणीतरी शिकतो आणि ते शिक्षण आपल्या डोक्यात सहज येऊ शकेल का? किंवा शिक्षणाविना आपल्याला व्यवस्थित जगता येईल का हा प्रश्न आहे; पण इथे सुदैवाने (किंवा दुर्दैवाने) शिक्षणाचं एक मूलतत्त्व ध्यानात घ्यायला हवं – जो शिकायचं काम करतो तोच शिकतो! आपलं शिकण्याचं काम आपल्यासाठी, आपल्यावतीनं दुसऱ्या कुणाला करताच येत नाही. जो वाचतो, लिहितो, ऐकतो, विचार करतो, प्रश्न विचारतो, चर्चा करतो, हाताने काम करतो, प्रयोग करतो, गणितं सोडवतो तोच शिकत जातो. अरेरे! सध्याच्या दुसऱ्याला काम वाटून देण्याच्या (outsourcing च्या) जमान्यात अजूनही शिकायचं काम दुसऱ्याला देऊन त्यांच्याकडून करवून घेता येत नाही! काय हे! असं म्हणता येत नाही की, ‘हे घे हजार रुपये आणि माझं गणित शिकून ये किंवा माझ्यासाठी ही इंग्लिश कविता शिकून ये!’ दुर्दैवाने असं काही आउटसोर्सिंग करता येत नाही! मग तुमच्या भोवती टेक्नॉलॉजीचा कितीही पसारा का असेना, एआय तुमचा जिवलग मित्र का असेना, भोवती इंटरनेटचा ज्ञानसागर का असेना, खिशात कितीही पैसे का असेनात; पण शिकण्याची प्रक्रिया प्रत्येकाला स्वतःची स्वतःला करावी लागते. अर्थात व्यक्तिश: ह्या बाबतीत माझी काही म्हणजे काहीच तक्रार नाही; कारण हे असं आहे म्हणून माझा प्रोफेसरचा जॉब टिकून आहे! नाहीतर काय लोक गाडीत पेट्रोल ज्या सहजपणाने भरतात त्या सहजपणाने मेंदूत माहिती आणि अक्कल भरता आली असती तर आमच्यासारख्या शिक्षक, प्रोफेसर लोकांच्या नोकऱ्यांची गच्छंतीच झाली असती! ते पेट्रोल भरणारे पोऱ्ये असतात ना तसं ‘ज्ञानपंपा’वर आम्हांला उभं राहावं लागलं असतं. मग ‘टाकीत शंभर रुपयांचं ऑइल टाक रे!’ अशा थाटात लोकांनी ऑर्डर सोडली असती ‘डोक्यात पन्नास रुपयांचं इंटिग्रल कॅल्क्युलस आणि पन्नास रुपयांची केमिस्ट्री पण टाक बाबा! आणखी घेऊन काय करू – परीक्षेपर्यंत पुरली की झालं काम!’ जरुरीपुरतं घ्यावं हे बरोबरच आहे; पण असे ज्ञानाचे पंप अजूनतरी अस्तित्वात आलेले नाहीत!
ज्ञानाचे पंप जोपर्यंत नाहीत तोपर्यंत आपल्याला प्रत्येकाला हा शिकण्याचा त्रास घ्यावाच लागणार. आणि इथेच ग्यानबाची मेख आहे – ‘शिकण्याचा त्रास’ हाच खरा प्रश्न आहे. हा त्रास घेण्याची तुमची खरंच तयारी आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला मनापासून शिकावंसं वाटतं का? आणि काय शिकावंसं वाटतं? किती शिकावंसं वाटतं? का शिकावंसं वाटतं? ह्याला ‘मनाची तयारी’ (mindset) असं शिक्षणक्षेत्रात म्हटलं जातं. मनाची तयारी जशी असेल त्याप्रमाणे शिकण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेता, किती आव्हानं पेलता, एखादी गोष्ट जमली नाही तर ती पुन्हा शिकण्याचा किती प्रयत्न करता, तुमच्या ज्ञानावर / कामावर टीका केली गेली तर त्याला कसं तोंड देता, शिकण्यासाठी किती धोका पत्करू शकता हे सगळं तुमच्या मनाच्या तयारीवर अवलंबून आहे.
स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉ. कॅरोल ड्वेक (Dr. Carol Dweck) ह्यांनी शिक्षणक्षेत्रात गेली तीस वर्षे संशोधन करून असा निष्कर्ष काढला आहे की आपण किती शिकू शकतो हे मुख्यतः आपल्या बुद्ध्यंकावर (IQ) अवलंबून नसून आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मानसिकतेचे दोन प्रकार आहेत: (१) ठाशीव मानसिकता (fixed mindset) आणि (२) वर्धिष्णू, लवचीक मानसिकता ( Flexible Mindset/Growth Mindset )
ठाशीव मानसिकता असणाऱ्या लोकांचे विचार असे असतात:
१.माणसाचा बुद्ध्यंक बदलता येत नाही – तो जन्मजात व एकच एक असतो
२. काही गोष्टी मला येतील, काही गोष्टी अजिबात येणार नाहीत
३. ज्या गोष्टी मला येत नाहीत त्या मी कितीही प्रयत्न केला तरी येणारच नाहीत – मग प्रयत्न करून तरी काय उपयोग?
४. मी एखाद्या विषयात किती हुशार आहे हे माझ्या परीक्षेतल्या गुणांवरून दिसेल!
५. मला शिकण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात म्हणजेच मी हुशार नाही; कारण हुशार लोकांना गोष्टी आपोआप, सहजपणाने येतात!
६. ज्या दिशेने मला जायचंच नाही त्या दिशेचं ज्ञान मिळवून तरी काय फायदा?
उलटपक्षी लवचीक मानसिकतेच्या लोकांना असे वाटते की
१. बुद्ध्यंक वाढू शकतो – जितका मी जास्त शिकेन, तितका मी जास्त हुशार होत जाईन.
२. काही गोष्टी मला सहजपणाने येतील तर काही गोष्टी मला कष्ट करूनच साध्य होतील.
३. ज्या गोष्टी मला येत नाहीत त्यात मी प्रयोग करून बघायला पाहिजेत – कोणत्या तरी मार्गाने मला यश मिळेलच! थॉमस अल्वा एडिसनने लाईट बल्बचा शोध लावण्यासाठी असंख्य अयशस्वी प्रयोग केले होते. शेवटी एका पत्रकाराने त्याला विचारले की ह्या प्रयोगांमध्ये तुला इतकं अपयश येतंय तर तू हे प्रयत्न सोडून देणार आहेस का? तेव्हा एडिसन म्हणाला मी लाईट बल्ब शोधण्यात सातशे वेळा अपयशी झालेलो नाही – उलट मी हे सिद्ध केलेलं आहे की ह्या सातशे मार्गांनी लाईट बल्ब निर्माण करता येत नाहीत! ह्या मुलाखतीनंतर थोड्याच दिवसात त्याला यशस्वी मार्ग सापडला आणि सगळं जग प्रकाशमय झालं!
४. शिकण्यासाठी मी कोणताही धोका पत्करेन, मला हे येईपर्यंत मी कितीही कष्ट करीन, रियाझ / सराव करेन.
५. माझी बुद्धी आणि गुण, कला झापडबंद नाहीत – मी जितका प्रयत्न करेन तितके हे सर्व वाढत राहतील.
यशस्वी होण्यासाठी, शिकण्यासाठी फक्त बुद्ध्यंकाची आवश्यकता असते असं नाही. तुमच्या मनाची शिकण्याची तयारी असेल, कष्ट घेण्याची, सराव करण्याची तयारी असेल तर काय मनात आणाल ते तुम्हांला शिकता येईल. त्यामुळे कॅरोलच्या म्हणण्याप्रमाणे माध्यमिक शाळेमध्ये (इयत्ता सहावी ते आठवी) मुलांच्या डोक्यात माहिती कोंबत बसण्यापेक्षा त्यांच्या मनाची तयारी करून त्यांना शिकण्यासाठी योग्य असलेला growth mindset निर्माण करणं ही मोठी जबाबदारी आहे. कारण ही मनाची तयारी अशा कोवळ्या वयात झाली तर ते जन्मभर शिकत राहतील! ह्या अनुषंगाने खालील गोष्टी मुलांच्या मनात ठसवाव्यात-
१. मेंदू कधीच भरून जात नाही; मेंदूची शिकण्याची क्षमता प्रचंड असते.
२. बुद्धी एकसुरी व सरधोपट नसते – बुद्धी वर्धनशील असते आणि त्यामुळे नव्या नव्या गोष्टी आपण सदैव शिकू शकतो. त्याला वयाची कोणतीही मर्यादा नाही.
३. मेंदू स्थिर नसतो – तो सतत बदलत असतो. मेंदू आतल्या पेशींची नवी नवी जुळणी (कनेक्शन्स) करून नव्याने शिकलेल्या गोष्टी व जुन्या गोष्टींचा समन्वय साधतो.
४. बुद्ध्यंक एकच एक, जन्मतः मिळालेला असतो आणि तो तसाच राहतो असं मुळीच नाही! जसे तुम्ही शिकत जाल तसा तुमचा बुद्ध्यंक वाढत जातो!
५. तुम्हांला आत्ता परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे आत्ता तुमचं ज्ञान आणि कसब पुरेसं नाही – ह्याचा अर्थ तुम्ही मूर्ख / बुद्दू आहात असं नाही. तुम्ही अधिक कष्ट केलेत तर शिकू शकता.
मोठेपणीसुद्धा आपण स्वतःच्या मानसिकतेची परीक्षा घेऊ शकतो! मी वर जे मुद्दे दिले आहेत ते तपासून बघा किंवा त्यावर स्वत:शी संवाद साधून बघा. त्यातून तुमचं तुम्हांला कळेल की तुमच्या मनाची नवे काही शिकण्याची तयारी कशी आहे ते. समजा तुम्हांला लहानपणी तबला शिकावासा वाटत असेल आणि काही कारणामुळे तेव्हा ते जमलं नसेल तर आत्ता का शिकू नये? ह्याला तुमचं काय उत्तर येईल? छे! ह्या वयात आता कुठे शिकणार मी? जमेल का मला – बोटं तरी हलतील का? आणि नाही जमलं तर? वर्गातली इतर चिल्लीपिल्ली पोरं हसतील ना मला! आता वेळ कुठून काढू? आणि शेवटी शिकलो तरी त्याचा उपयोग काय मला? ह्यावरून आपल्याला आपल्या मनाची तयारी बरोबर नाही हे नक्कीच कळेल आणि मग आपलं मन आपण बदलू शकू! असं म्हणतात की विश्वनिर्मितीच्या वेळेस ‘एकोऽहं बहुस्याम्’ असं ब्रह्मदेवाच्या मनात आलं म्हणजे ‘मी एकटा आहे त्याचे अनेक होऊ दे!’ आणि सर्व विश्वाची निर्मिती झाली! ही एवढी अफाट असलेली मनाची ताकद! मग जे काही शिकायचं आहे ते का नाही जमणार? म्हणूनच उच्च शिक्षणासाठी मनाची योग्य तयारी करण्याची जबरदस्त ताकद जाणा – आणि उच्च शिक्षणाच्या वाटेवर तुमची घोडदौड जन्मभर चालू ठेवा!
