संपादकीय – वेध भवितव्याचा

दैव जाणिले कुणी?  अर्थात भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे जाणणे अशक्यप्राय आहे असे जुने जाणते वेळोवेळी सांगत असतात; तरीही जिज्ञासा आपल्याला काही गप्प बसू देत नाही.  वर्तमानापेक्षा भविष्य अधिक सुखकारक असण्याची आशा हा माणसाला वर्तमान सोसण्याची ताकद देणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. 

     एका मराठी चित्रवाहिनीवर भविष्याचे मंथन/ सूचन  करणारा एक कार्यक्रम होतो. तो बराच लोकप्रिय आहे.  हा कार्यक्रम एवढा का गाजतो आहे ते जाणून घेण्यासाठी मी त्याचे काही भाग आवर्जून पाहिले.  या कार्यक्रमात प्रश्नोत्तरेही असतात.  प्रेक्षकांचे आपल्या व्यक्तिगत भविष्याबाबतचे प्रश्न येतात व तज्ज्ञ सूत्रसंचालक त्याला प्रश्नकर्त्याच्या कुंडलीच्या आधारे उत्तरे देतात. ज्योतिष विज्ञान आहे की छद्मविज्ञान या वादात सध्या आपल्याला शिरायचे नाही. कार्यक्रमाच्या प्रश्नकर्त्यांत  तरुण वर्ग खूप मोठ्या संख्येने असतो. प्रश्नात प्रामुख्याने मी नोकरी करू का व्यवसाय?  मला सरकारी नोकरी मिळेल का?  माझे लग्न कधी होईल व जोडीदार कसा असेल?  असे प्रश्न असतात. 

      या प्रश्नांवरून समाजमनाचे जे चित्र पाहायला मिळते ते चिंताजनक व आपल्याला गांभीर्याने विचार करायला भाग पाडणारे असे आहे.  आपल्या सुशिक्षित पदवीधर तरुणांपुढे रोजगार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.  त्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय हे पर्याय असू शकतात याची त्यांना जाणीव आहे;  पण यांतले काय करावे याचा निर्णय ठामपणे घेण्याची क्षमता आपली शिक्षणव्यवस्था त्यांच्यात निर्माण करू शकत नाही. 

    वाढत्या कंत्राटीकरणामुळे सरकारी  नोकऱ्या आता किती  घटल्या  आहेत; जागतिकीकरण व कृत्रिम प्रज्ञेसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रोजगार संधींवर काय व कसा परिणाम होणार आहे याची आकडेवारी वेळोवेळी समोर येत असतानाही सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण अजूनही अबाधित आहे.  सरकारी नोकरीला असणारे कायदेशीर संरक्षण,  या नोकरीतून होणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आर्थिक लाभ व उत्तरदायित्वाचा जवळपास संपूर्णपणे अभाव ही त्याची संभाव्य कारणेदेखील काळजी वाढवणारीच आहेत.  लग्नाबाबतच्या प्रश्नाचेही काहीसे तसेच आहे.  स्त्री-पुरुष  जन्मदरातील तफावत हे या प्रश्नाचे मूळ आहे हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. जोडीदार कसा मिळेल या प्रश्नामागे लग्न टिकेल का नाही याची सुप्त भीती असू शकते; पण या प्रश्नाचे उत्तर एखादा  तिऱ्हाईत  माणूस कसे देणार? आपणच विवाहसंस्थेबाबत काही चिंतन करून त्याचे उत्तर हुडकले पाहिजे ना! 

     बहुतेक प्रश्नांची उत्तरे सर्वांनाच माहिती आहेत; पण तरीही हे प्रश्न सुटत नाहीत ते का? 

गदिमांनी म्हणून ठेवले आहे ,

राजपुत्र जे नृपती उद्याचे 

शिशुपण त्यांचे दीनपणाचे

रत्नकंदुका जागी हाती मातीची खेळणी

हो दैव जाणिले कुणी /

दैववाद , नियतिशरणता यांचा मर्यादित स्वीकार करत प्रयत्नशील राहणे हे उत्तर आहे का ? 

Author

One thought on “संपादकीय – वेध भवितव्याचा

  1. जेव्हां भविष्य धूसर दिसते तेव्हां, मला वाटते, मणुष्य दैववादाकडे झुकतो. परंतु जीवनातील सर्वच घटना जर पूर्व-निश्चित असतील तर मग ” असेल हरि तर देईल खाटल्यावरी” या उक्ती नुसार जीवन ठप्प होईल. तेव्हा दैववादाची कास न धरता केवळ विज्ञानाला आपलेसे केल्यानेच जीवनात प्रगती शक्य आहे.

Leave a Reply