वाईवरून पाचगणीकडे निघालो की वळणावळणाचा पसरणी घाट सुरू होतो. या घाटातून प्रवास करताना आजही मी भारावून जातो. मनातल्या मनात कितीतरी आठवणी जपल्यायत या घाटाने. बारावी सायन्स शिकत असताना पास काढलेला असायचा. रोज पाचगणी – वाई एसटीने प्रवास करायला लागायचा. हॅरिसन फॉली (थापा पॉईंट) संपला की पांडवगड, मांढरदेवीचा डोंगर आणि मग पसरणी, एकसर, कुसगाव अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांनी केलेली भातशेती दिसायची.
त्या भातशेतीत तुंबवलेले पाणी सूर्यप्रकाशामुळे चमकायचे व एक वेगळीच चित्रांची मालिका दिसायला लागायची. आजही हा प्रवास करताना मला सृष्टीमध्ये हिरवागार नवचैतन्याचा बहर दिसून येतो.
चित्रकला महाविद्यालयात जाण्याचे ठरले होते आणि त्यासाठी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा द्यावी लागते अशी माहिती मिळाली. त्या परीक्षेत A ग्रेड मिळाली तर कलामहाविद्यालयात लगेच प्रवेश मिळतो असेही समजले. त्यामुळे मी वाईला केंद्र असलेल्या द्रविड हायस्कूलमध्ये प्रथमच आलो. प्रवेश करताना शाळेच्या एका शिपाईमामाने अष्टपुत्रेसरांना भेटायला सांगितले. इमारतीच्या शेवटच्या टोकाला एक जिना होता त्या जिन्यातून गेले की उजव्या बाजूला भलामोठा चित्रकला वर्ग होता.
अष्टपुत्रेसरांची काही निसर्गचित्रे त्या वर्गात लावलेली होती. वाईच्या घाटात जशी वडाची झाडे होती तशाच प्रकारची जलरंगातील ती चित्रे पाहून मी भारावलेल्या अवस्थेत अष्टपुत्रेसरांच्या पाया पडलो आणि त्यांना माझा कलामहाविद्यालयात जाण्याचा विचार सांगितला. अष्टपुत्रेसर मनापासून हसले आणि – ‘अगोदर ग्रेड परीक्षा द्या; चित्रकार होण्याची स्वप्ने नंतर बघा,’ अशी तंबी देऊन म्हणाले, “रियाज करा, रियाज करण्यावाचून गत्यंतर नाही. रियाज करा, रियाज करा.”
मी रियाजाच्या मागे लागलो. रियाज करायचा म्हणजे काय हे माहीत नव्हते; पण सतत चित्रे काढायची म्हणजे रियाज करायचा एवढे ठरवून ग्रेड परीक्षा दिली आणि खरोखर A ग्रेड मिळाली; मग पुन्हा अष्टपुत्रेसरांच्या घरी जाऊन मार्गदर्शनासाठी पाया पडलो व निसर्गचित्रे कशी काढायची ते शिकवा अशी विनंती केली. अष्टपुत्रेसर पुन्हा हसले. शांतपणे म्हणाले ही माझी डायरी आहे. आजची तारीख मी यामध्ये लिहून ठेवतो. आजपासून बरोबर एक वर्षाने म्हणजे ३६५ दिवसांनी तू मला भेट. रोज एक चित्र काढायचं, त्या चित्राच्या पाठीमागे तारीख टाकायची – अशी एका वर्षाची ३६५ चित्रे झाली की मला चित्रांचा गठ्ठा घेऊन भेटायला ये; मग मी तुला निसर्गचित्रे कशी काढायची याचे मार्गदर्शन करतो. “रियाज करा , रियाज करा, रियाजाशिवाय गत्यंतर नाही. खूप खूप शुभेच्छा !” असे सांगून त्यांनी बाहेर जाण्याचा दरवाजा दाखवला .
पुण्यात अभिनव कलामहाविद्यालयात आलो त्यावेळी ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ या वसतिगृहात राहायचो. कमवा शिका योजनेत काम करत-करत अनेकविध अडचणींना तोंड द्यावे लागायचे; पण रोज एक चित्र काढायचोच . त्या पाठीमागे तारीख लिहून ठेवायचो. रोज डायरीत चित्र काढतानाचा अनुभव लिहून ठेवायचो. एक वर्ष झाल्यानंतर अष्टपुत्रेसरांना भेटायची ओढ लागली होती; कारण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ३६५ चित्रे पूर्ण केली होती. त्यानंतर ते मला निसर्गचित्रे काढायला शिकवणार होते .
विद्यार्थी साहाय्यक समिती या हॉस्टेलवर राहत असताना माझे पर्यवेक्षक तांबोळीसरांबरोबर काही गोष्टींमुळे मतभेद झाले व मी एका वर्षानंतर कायमस्वरूपी या वसतिगृहातून बाहेर पडलो. कॉलेजला मे महिन्याची सुट्टी लागली होती. वसतिगृह बंद झाले व मला पाचगणीला सर्व सामानासह परत जाणे एवढाच पर्याय शिल्लक राहिला. माझे सर्व सामान बांधून मी परत निघालो .
रिक्षाने स्वारगेट बस स्थानकाला आलो. त्या काळी एसटीशिवाय पर्याय नव्हता. टॅक्सीने जाण्याची ऐपत नव्हती. स्वारगेट स्टेशनला प्लॅटफॉर्मवर आलो; तर तोबा गर्दी. मे महिन्यात उन्हाळी सीझन सुरू झाल्याने सर्व गाड्या पुणे स्टेशनवरूनच भरून यायच्या; त्यामुळे तीन चार गाड्या सोडल्या. शेवटी संध्याकाळची शेवटची गाडी आली. तोपर्यंत एका हमालाला सांगून चित्रांच्या फायली व माझ्या सर्व बॅगा टपावर नीट व्यवस्थित बांधण्यासाठी पैसे ठरवले. त्यासाठी त्याची हमाली अगोदरच दिली. एसटी आल्यानंतर घाईने गर्दीत घुसलो; पण बसायला काय उभे राहण्यासाठीसुद्धा जागा नव्हती. हळूहळू प्रवास करत एसटी वाई स्टेशनला आली आणि मग बसायला जागा मिळाली .
वाई ते पाचगणी घाटातून जाताना मी प्रवासात खूप खूश झालो होतो. बसायला खिडकीशेजारी जागा मिळाली होती. घाटातील वनश्री, झाडे, छोट्या-छोट्या तुकड्यांची शेती, पांडवगड व थंडगार भन्नाट वेगाने वाहणारा वारा मनाला सुखावत होता. वाऱ्याच्या उलट्या दिशेने एसटी वेगाने चालली होती. बुवासाहेबाचे मंदिर पार करून आता नागेवाडीच्या १६ नंबर स्टॉपवर एसटी थांबणार होती…
पण या स्टॉपवर बस पोचायच्या अगोदरच एसटी अचानक थांबली . एसटीचा ड्रायव्हर गाडी थांबवून खाली उतरून आकाशाच्या दिशेने पाहात होता. आकाशात हजारो कागद पक्ष्यांप्रमाणे हळुवारपणे तरंगत तरंगत पसरणीच्या खोल दरीत उडत चालले होते. ते एसटीच्या टपावरून उडत होते. क्षणार्धात माझी तंद्री भंग पावली…सगळा प्रकार माझ्या लक्षात आला.वेगाने खाली उतरून मी एसटीच्या टपावर चढलो. माझ्या सामानाच्या बॅगा वजनदार असल्याने तशाच होत्या; पण हमालाने चित्रांच्या पोर्टफोलिओच्या फायलीच्या दोऱ्या बांधायला काही नसल्याने एसटीच्या ग्रिलला बांधल्या होत्या. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे दोऱ्या तुटल्या होत्या व फायलींमध्ये हवा भरून सर्व चित्रे फडफडत वेगाने घाटाच्या खोल खोल दरीमध्ये उंच-उंच उडत होती. दरीमध्ये उतरून चित्रं गोळा करणे शक्य नव्हते; शिवाय एसटीमध्ये बसलेली माणसे उशीर होत असल्याने वैतागली होती. आरडाओरड करू लागली होती. मी एसटीत परतल्यावर प्रत्येकजण विचारत होता काय झाले ? काय झाले?
काय सांगू त्यांना? माझा रियाज – ३६५ दिवसांची – दिवसरात्र जागून केलेली मेहनत, हजारो स्केचेस, निसर्गचित्रे , असाईनमेंट्स क्षणार्धात माझ्याच डोळ्यांसमोर पसरणी घाटाच्या दरीत दिसेनासे झाले होते.’
“रियाज करा , रियाज करा, रियाजाशिवाय गत्यंतर नाही;” असे सांगणारे अष्टपुत्रेसर पाणवलेल्या डोळ्यांसमोर धूसर दिसू लागले. आता काय सांगणार त्यांना? कोणता रियाज दाखवणार आता? आता एसटीचा उरलेला प्रवास आवडेनासा झाला. खूप खूप राग आला – स्वतःचा , नियतीचा , हतबल परिस्थितीचा. त्यानंतर खरोखरच खूप रियाज केला. त्यानंतर चार वर्षं अष्टपुत्रेसरानां भेटलोच नाही. अथक परिश्रमाने आर्थिक परिस्थिती बदलली . १९९६ साली स्वतःची चार चाकी गाडी घेतली. एसटीने प्रवास करून आता सत्तावीस वर्षे झाली असावीत.
परवा वाईवरून स्वतःच्याच गाडीने पाचगणीला जात होतो. स्वच्छ हवा होती , डोंगरदऱ्या, पांडवगड , पसरणी , कुसगाव , एकसर – गावांतली शेती हिरवीगार दिसत होती. पाणी साठल्याने चमकत होती, मस्त थंडगार बेभान वारा सुटला होता. त्या एसटीच्या स्पॉटवरच, त्याच जागेवर मुद्दाम थोडावेळ थांबलो होतो. वर आकाशात असंख्य पक्षी दरीच्या दिशेने वेगाने उडत चालले होते. ते उडत चाललेले पक्षी जणू मला माझ्या दरीत झेपावलेल्या चित्रांसारखे वाटत होते .
माझा रियाज वाया गेला नव्हता.
रियाज कधीच वाया जात नाही.
प्रत्येक रियाज नव्याने काहीतरी शिकवत असतो.
निसर्ग हाच खरा सर्वश्रेष्ठ कलाकार – त्याच्याकडची अद्भुत रंगांची पॅलेट, नयनरम्य विविधता, क्षणात दृश्य व वातावरण बदलण्याची तत्परता आपल्याकडे कशी असणार? म्हणून त्याने माझी असंख्य चित्रे मला रियाजाचा गर्व होऊ नये म्हणून स्वतःकडे – पसरणी घाटाच्या दरीत – ओढून घेतली व मला मुक्त केले. एक नवा विचार दिला. रियाज हा फक्त प्रत्यक्ष कृतीने करण्याची गोष्ट नसते. रियाज सतत मनन, चिंतन करूनही करता येतो. आपण आपल्या कलेचा रियाज खूप केला असा गर्व कलाकाराने कधीही करू नये. कोणतीही कला ही तात्पुरत्या स्वरूपाची नसून आयुष्यभर सतत करण्याची साधना असते; त्यासाठी सतत रियाज करत राहणे हाच उपाय असतो. आपली उत्कट वृत्ती सतत जागृत, सावध ठेवली पाहिजे . कधीही विसरली न जाणारी नवी जाणीव निसर्गाने मला दिली. त्या समृद्ध निसर्गगुरूपुढे मी मनापासून नतमस्तक झालो आणि …
अचानक दरीमधून मला मोठ्याने अष्टपुत्रेसरांचा एकोसारखा घुमणारा आवाज ऐकू येऊ लागला…
“मित्रांनो क्षेत्र कोणतेही असू द्या
रियाज करा ,
रियाज करा ,
सतत रियाजाशिवाय गत्यंतर नाही .”
लेखक व चित्रकार सुनील काळे स्वतःविषयी :
पाचगणी आणि महाबळेश्वर ही निसर्गसौंदर्याने नटलेली ठिकाणे आहेत. हिरवीगार जंगले, आकाशाला भिडणारी उंच सिल्व्हर ओकची झाडे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा – त्यांमधून चकाकणारी कृष्णा नदी संथपणे निर्विघ्न वाहते. गूढ धुक्याने पाचगणी समृद्ध झाली आहे. पावसाळ्यातील निसर्गाचा उत्सव दऱ्या-खोऱ्यांमधून नाचतो, चौरस आणि आयताकृती शेती व त्यांचा हिरवागार रंग आपल्या जाणिवांवर वर्चस्व गाजवतो . ही भातशेतीची खाचरे आहेत. या शेतांवर केशरी आणि लाल ठिपके पडले आहेत. त्या छोट्या झोपड्या उंचावरून अतिशय सुंदर दिसतात. पावसाळ्यात वाहणारे धबधबेदेखील माझ्या सर्जनशील आकर्षणाचे केंद्र आहेत. हे माझे नंदनवन आहे !
प्रत्येक कानाकोपर्यात नवनवी दृश्ये शोधणे, चित्र काढणे, पुन्हा पाहणे आणि निसर्गातील नावीन्य शोधणे याचा मला आनंद वाटतो… निसर्गामध्ये असलेली सौंदर्यस्थळे माझ्या मनाला भिडतात. माझे शरीर आणि आत्मा नवे चित्र रेखाटण्यासाठी सतत तयार असतात. माझ्या पद्धतीने कागदावर किंवा कॅनव्हासवर ती जागा मी दाखवतो . ही माझ्या हृदयाची अभिव्यक्ती आहे… ती हे निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य दर्शवते. कधी कधी ते अनाकलनीय आणि भीतिदायक असते आणि गुदमरलेली अभिव्यक्ती उफाळून येते… तो रूपांचा उद्रेक असतो… तो रंगांचा अतिरेक असतो… तो अनेक छटांचं मिश्रण असतो … ही माझी उत्स्फूर्त कलाकृती आहे… निखळ आनंदाने माझे मन वेधून घेणारे चित्र. हा एक अनोखा अनुभव आहे… सर्जनाचा एक क्षण – ज्याचा मी वेगवेगळ्या माध्यमांत काम करत असताना आनंद लुटला; त्यामुळे मला एक शाश्वत समाधान मिळते. माझ्या दृष्टिकोनातून मला प्रतीत होणारे जगाचे सौंदर्य कलाप्रेमींबरोबर शेअर करायचे आहे. आनंद घेणे हा एक मोठा आनंद आहे… आणि समाधान वाटणे हाही एक मोठा आनंद आहे!
रोमँटिक पाऊस, दाट धुके , कृष्णा नदीच्या खोल निळ्या दऱ्या, आकाशाचे चुंबन घेणारे सिल्व्हर ओक वृक्ष आणि जुनी वडाची झाडे, घनदाट सावलीचे रस्ते, टेबललॅंडचा प्रचंड विस्तार , वाईची मंदिरे – घाट या विषयांवर मी स्वानंदासाठी सतत चित्रे रेखाटत असतो; येणारे अनुभव शब्दांकित करत असतो. निसर्गाची ही विविध रूपे रेखाटताना मी रोजच उत्सव असल्यासारखा आनंदाने जगत असतो .
