‘चले जाव’चा लढा : आजच्या संदर्भात

८ ऑगस्ट १९४२. मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन चालू होते. या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यानंतर वल्लभभाई पटेल बोलले आणि त्यांच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचे ओजस्वी भाषण झाले. एव्हाना सूर्यास्त झाला होता. संतापाने थरथरत असलेले नेहरू म्हणाले,  “आज आम्ही सारे पाश तोडून अखेरच्या युद्धाला तयार झालो आहोत. या मुकाबल्यात यशस्वी झालो तर स्वतंत्र हिंदुस्तानच्या भूमीवरच उभे राहू; नाहीतर खवळलेल्या या दर्यात बुडून मरून जाऊ.” भाषणानंतर ‘आमचे काय व्हायचे असेल ते होऊ दे, ब्रिटिशांनी हा देश सोडून ताबडतोब निघून जावे,’ अशी मागणी करणारा ठराव समोरच्या समुद्राला साक्षी ठेवून पंडित नेहरूंनी मांडला आणि पुढ्यातल्या विशाल जनसागराने टाळ्यांच्या प्रचंड गजरात तो संमत केला. त्यानंतर रात्री जवळजवळ दहाच्या सुमारास महात्मा गांधी अधिवेशनाच्या समारोपाचे भाषण करायला उभे राहिले.  अत्यंत धीरगंभीर आवाजात आणि ढासळत्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत ते तब्बल दोन तास दहा मिनिटे बोलले. शेवटी ‘चले जाव’ (quit India) ही घोषणा त्यांनी दिली, हजारो कंठांतून तिचा पुनरुच्चार झाला. ‘छोडो भारत’च्या गर्जनांनी आसमंत दुमदुमला. तो रोमांचक क्षण ही बेचाळीसच्या आंदोलनाची सुरुवात होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे हे अंतिम पर्व ठरले. देश स्वतंत्र झाला ह्याचे मोठे श्रेय ह्या आंदोलनाला सामान्यतः दिले जाते. 

आज नोव्हेंबर २०२३ मध्ये या ऐतिहासिक आंदोलनाकडे मागे वळून बघताना काय वाटते? या संदर्भात माझे काही स्वैर विचार पुढे मांडत आहे.  

अर्थात बेचाळीसच्या आंदोलनाचे प्रत्यक्षातले स्वरूप कसे होते, याबद्दल पुढे काळाच्या ओघात वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे विवेचन केले आहे; शिवाय आपापल्या राजकीय विचारसरणीनुसारच आंदोलनाचे विश्लेषण करण्याची प्रवृत्ती स्वाभाविक आणि प्रबळ आहे. शेतकरी, कामगार, पांढरपेशा नोकरदार, उद्योगपती, व्यापारी, जमीनदार, संस्थानिक, धर्मगुरू, वरिष्ठ शासकीय अधिकारी, कलावंत, लेखक, पत्रकार, पोलीस दलातील वा लष्करातील भारतीय या सगळ्यांचाच स्वातंत्र्यआंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी या सगळ्यांचाही या आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. आंदोलनातला प्रत्यक्ष सहभाग हा आपापल्या दृष्टिकोनानुसार ठरणारा असल्याने तोही साहजिकच भिन्न होता. छातीवर गोळ्या झेलणारे भारतीय होते आणि त्यांच्यावर बंदुका चालवणारे सैनिकही बहुतांशी भारतीयच होते. गांधीजींसकट बहुतेक सर्व कॉंग्रेसनेत्यांना ९ ऑगस्टच्या पहाटेच – म्हणजे सभेनंतर दोन-तीन तासांतच, अटक झाली होती; आंदोलनाला दिशा द्यायला बाहेर नेतृत्वच उरले नव्हते. परिणामतः थोड्याच दिवसांत चळवळ निवळली होती, रीतसर जनजीवन सुरू झाले होते. ह्या काळात विन्स्टन चर्चिल यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘आम्ही भारताला स्वातंत्र्य द्यावे ह्याच्या समर्थनार्थ ज्या स्वातंत्र्यआंदोलनाचा तुम्ही उल्लेख करता, ते सुरू असतानाच इंग्रज लष्करात स्वतःला नोकरी मिळावी म्हणून भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात हजारो हिंदू व मुसलमान तरुणांच्या रांगा लागलेल्या आहेत.’ हा उल्लेख तसा बोलका आहे. अर्थात कुठलीही ऐतिहासिक महत्त्वाची घटना हा अनेक कारणांचा परिपाक असतो. काही विचारवंतांच्या मते देश स्वतंत्र झाला ह्याची मुंबईतील नाविकांचे बंड, महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये सत्तेवर आलेल्या मजूर पक्षाचा साम्राज्याला असलेला विरोध, अमेरिकेने ब्रिटनवर टाकलेला दबाव, महायुद्धामुळे खिळखिळे झालेले ब्रिटन वगैरे कारणेही होती. भारताव्यतिरिक्त जगातले इतरही शे-दीडशे देश दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झाले. त्यांच्यापैकी अनेक देशांत स्वातंत्र्यचळवळ नव्हती आणि तरीही त्यांना स्वातंत्र्य मिळालेच. इतिहासाचा स्वतःचा असा एक प्रवाह असतो, ओघ असतो आणि त्या विशिष्ट कालखंडाचा तो जणू युगधर्म बनतो. वेगवेगळ्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळणे हा त्या एकूण कालखंडाचा युगधर्म बनला होता; जसा नंतरची तीस-चाळीस वर्षे समाजवाद हा जगात युगधर्म बनला.   

हे सारे असले तरी बेचाळीसच्या आंदोलनात मोठ्या संख्येने भारतीय रस्त्यावर उतरले होते, कामगारांनी संप पुकारले होते, जागोजागी निघणाऱ्या प्रभातफेऱ्यांमध्ये महिला आणि मुले यांचाही सहभाग होता आणि एक प्रकारचे चैतन्य समाजात संचारले होते यात शंका नाही. आमच्या सर्व दुःखांना ब्रिटिश सत्ता कारणीभूत आहे आणि ब्रिटिशांना हाकलून लावल्यावर लवकरच आपण आपला हा देश सुजलाम, सुफलाम बनवू, ह्या उदात्त स्वप्नाने देशातील जनता – विशेषतः युवावर्ग – भारावून गेला होता. आदल्या दीडशे वर्षांच्या पारतंत्र्याच्या पार्श्वभूमीवर हे एक रोमहर्षक पर्व होते. 

त्या पर्वाला आता ७६ वर्षे उलटून गेली आहेत. आज मागे वळून बघताना काय जाणवते? त्या वेळचे ते स्वातंत्र्योत्तर भारताचे स्वप्न किती प्रमाणात साकार झाले आहे? त्या वेळी आम्ही ब्रिटिशांना ‘चले जाव’ हा आदेश दिला व त्यानुसार ते देश सोडून गेलेही. आज अशा कुठल्या गोष्टी आपल्या अवतीभवती दिसतात, ज्यांना ‘चले जाव’ म्हणून हद्दपार करणे त्या स्वप्नपूर्तीसाठी अत्यावश्यक आहे? 

ह्याचे उत्तर म्हणजे खरेतर एखाद्या पुस्तकाचाच विषय आहे; पण लेखासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित जागेत त्यातील केवळ तीन गोष्टींचा इथे उल्लेख करतो.

देशातून हटवायला हवी अशी पहिली गोष्ट म्हणजे गरिबी. ह्या गरिबीचे एक अत्यंत दाहक रूप म्हणजे दुष्काळात होणारे मृत्यू. १९४२ हे वर्ष भारतीय इतिहासात जसे स्वातंत्र्यआंदोलनासाठी प्रसिद्ध आहे, तसेच खरेतर ते बंगालमधील अभूतपूर्व अशा दुष्काळाचे वर्ष म्हणूनही आपण स्मरणात ठेवले पाहिजे. त्या वर्षी तत्कालीन अखंड बंगाल प्रांतात भात जवळजवळ पिकलाच नाही आणि त्यामुळे पडलेल्या दुष्काळात २५ ते ३५ लाख लोक मरण पावले. हा आकडा अगदी कमीत कमी अंदाजानुसार धरला तरी, खरोखरच भयानक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या युद्धांमध्ये मरण पावलेल्या भारतीय जवानांपेक्षा ही संख्या कित्येक पट मोठी आहे. ह्या दुष्काळामागे इतरही काही कारणे असणार; पण आत्यंतिक गरिबी हे याचे सर्वांत मोठे कारण होते हे नक्कीच. आज स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली आहेत; पण दुदैवाने आजही ही गरिबी आहेच. ती कमी झाली असली, तरी जगाच्या तुलनेत आजही आम्ही गरीबच आहोत. भारत ही लवकरच जगातील तिसरी किंवा चौथी महासत्ता बनणार असे म्हणणे ही मोठी आत्मवंचना आहे; कारण लोकवस्ती प्रचंड असल्याने देशाच्या उत्पन्नाचा एकूण आकडा मोठा दिसतो; पण व्यक्तिगणिक उत्पन्नाचा विचार केला तर आपण जगातल्या पहिल्या शंभर देशांतही नाही. अधिक दुःखद बाब म्हणजे जगातील प्रगतिपथावरचे चीन किंवा ब्राझील यांच्यासारखे अन्य देश आणि आपण यांच्यातील अंतर हे कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आज दुष्काळात पूर्वीसारखी मनुष्यहानी होत नाही ही गोष्ट खरी असली, तरी आजही देशाच्या अनेक भागांत कुपोषित किंवा अर्धपोटी राहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि हे कुपोषण व उपासमार म्हणजे गरिबीचेच एक अतिशय उग्र असे रूप आहे; एका अर्थाने हे म्हणजे हळूहळू येत गेलेले मरणच आहे. आणखी एक कटू सत्य म्हणजे ह्या कुपोषित समाजाची पुढची पिढीही जन्मतःच काही वैगुण्ये घेऊन, पुरेशी शारीरिक आणि आनुषंगिक मानसिक क्षमता न घेताच जगात येणार आहे; इतक्या पिढ्या हे सातत्याने घडतच आले आहे. ह्याचे दुष्परिणाम प्रदीर्घ काळ आपल्याला भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागणार आहेत. हे वास्तव दुष्काळापेक्षा कमी भयानक नाही. ही गरिबी म्हणजे जणू आपल्या पायातली जड बेडीच आहे. आज आपल्याला जगाशी शर्यत करायची आहे; पण ही शर्यत जिंकण्यासाठी आवश्यक ती शारीरिक व मानसिक क्षमता आपल्यात पुरेशी नाही. ही एक मोठीच मूलगामी समस्या आहे आणि तिचा फारसा विचारही कोणी करत नाही. ही गरिबी हटवणे सर्वांत प्राधान्याचे आहे.  

जिला ‘चले जाव’ म्हणायला हवे अशी दुसरी गोष्ट म्हणजे आपापसांतील दुही किंवा फुटीरता. आपण परक्या शक्तींचे गुलाम बनलो ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपली आपापसांतील भांडणे व त्यांचा परक्यांनी उठवलेला लाभ. उत्तरेत पृथ्वीराज चौहान हरला, दक्षिणेत वास्को द गामा जिंकला, पूर्वेत रामदेवराय हरला आणि पश्चिमेत क्लाइव्ह प्लासीची लढाई जिंकला ह्यामागे आपल्यातील दुही होती हे उघड आहे. आजही आपण सारे मुळात भारतीय आहोत, एक आहोत ही जाणीव युद्धप्रसंग किंवा पाकिस्तानविरुद्धचा क्रिकेटचा सामना सोडला, तर फारच कमी वेळा जाणवते. एकराष्ट्रीयत्वाच्या, समरसतेच्या किंवा एकमयतेच्या भावनेचा अभाव हे आपण कुठलेच धोरण देशभर एकजुटीने व सारख्याच तडफेने अमलात आणू शकत नाही ह्याचे मोठे कारण आहे. बुलेट ट्रेनपासून विमानतळ बांधण्यापर्यंत आणि खाणीतून खनिजे काढण्यापासून धरण बांधण्यापर्यंत कुठल्याही प्रकल्पाला केवळ विरोधासाठी विरोध करणारे काही घटक कायमच असतात; ते पावलोपावली अडचणी निर्माण करतात, कोर्टबाजी करतात, विदेशांतून प्रकल्पांना मदत मिळू नये म्हणून प्रसार करतात आणि परिणामतः ज्या प्रकल्पाला चीनसारख्या देशात जेमतेम एखादे वर्ष लागते, तसले प्रकल्प आपल्याकडे वर्षानुवर्षे रेंगाळतात, अत्यंत खर्चीक बनतात. कुठल्याच प्रयत्नामागे सगळ्या राष्ट्राचे बळ एकवटलेले आहे असे घडत नाही. ह्या दुहीची कारणे तशी खूप खोलवर रुजलेली आहेत. जगातील बहुतेक सर्व राष्ट्रांची निर्मिती ही ‘एक भाषा-एक राष्ट्र’ ह्या तत्त्वाच्या आधारावर झाली आहे; जसे की, फ्रेंच बोलणाऱ्यांचे फ्रान्स, जर्मन बोलणाऱ्यांचे जर्मनी, स्पॅनिश  बोलणाऱ्यांचे स्पेन, पोर्तुगीज बोलणाऱ्यांचे पोर्तुगाल, स्वीडिश बोलणाऱ्यांचे स्वीडन, रशियन बोलणाऱ्यांचे रशिया, चिनी बोलणाऱ्यांचे चीन, जपानी बोलणाऱ्यांचे जपान इत्यादी. भारत हा ह्या तत्त्वाला असलेला एक अपवाद आहे. काही वर्षांपूर्वी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गोवा सरकारतर्फे मडगाव येथे भरलेल्या एका साहित्य संमेलनाला मी हजर होतो. ‘कोकम संमेलन’ असे ह्या संमेलनाला म्हटले होते. कोकम हे गोव्यात सर्वत्र उपलब्ध असलेले रोजच्या वापरातले एक फळ; पण त्याचबरोबर कोकणी, कन्नड आणि मराठी ह्या गोव्यात बोलल्या जाणाऱ्या तीन भाषांची ही आद्याक्षरे. मुळात असे संमेलन ही बोरकरांची एक संकल्पना; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या संमेलनाचे सर्व सूत्रसंचालन ह्या तिन्ही भाषा वगळून इंग्रजी ह्या परकीय भाषेत करावे लागले; कारण सर्व उपस्थितांना समजेल अशी ह्या तिघांपैकी एकही भाषा नव्हती. एकमेकांशी संवाद साधतानाही सर्वांना पुन्हा इंग्रजीचाच आधार घ्यावा लागत होता. तथाकथित कोकणी-मराठी वाद अशा प्रसंगी हास्यास्पद ठरत होता; कारण दोघांनीही आपापल्या भाषा बाजूला सारून इंग्रजीचा सुखेनैव आसरा घेतला होता! वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या भारतीयांना जोडणारी एक जोडभाषा नसणे ही आपल्या समाजात एकमयता निर्माण होण्यातली एक मोठीच अडचण आहे. भारतासाठी अशी एक जोडभाषा हवी हे सत्य स्वातंत्र्यपूर्व काळातही अनेक नेत्यांना उमगले होते. भारतासाठी अशी एक जोडभाषा (लिंक लँग्वेज) फक्त हिंदीच होऊ शकते हे महात्मा गांधींसारख्या द्रष्ट्या नेत्याने खूप पूर्वीच ओळखले होते. म्हणूनच १९१८ साली इंदूर येथे भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी हिंदी राष्ट्रभाषा कशी बनेल याच मुद्द्यावर भर दिला होता; शिवाय निव्वळ चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या त्या नेत्याने संमेलन चालू असतानाच आपले कनिष्ठ पुत्र देवदास यांना हिंदीच्या प्रसारार्थ दक्षिण भारतात रवानाही केले होते. त्या वेळी त्यांच्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसादही मिळत गेला. दुर्दैवाने या सर्व प्रयत्नांना  स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय कारणांनी विरोध होत गेला आणि ते प्रयत्न बारगळले. भारतासाठी एक जोडभाषा, एक राष्ट्रभाषा निर्माण करायची सुवर्णसंधी आपण गमावली. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांसारख्या परक्या शत्रूचे अस्तित्व आपल्यात एकजूट निर्माण करायला जणू पूरक ठरले होते! त्यांच्यापश्चात ते बघताबघता नाहीसे झाले. आज भारताच्या कुठल्याही मोठ्या शहरात रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा किंवा स्मारक हमखास दिसते, त्यांच्या नावाने एखादे कलादालन किंवा सभागृह असते; पण त्यांच्यानंतर गेल्या शंभर वर्षांत एकाही अन्य भारतीय साहित्यिकाला अशी देशव्यापी मान्यता लाभलेली नाही हे वास्तव कशाचे द्योतक आहे? जगातल्या अन्य देशांपेक्षा अगदी वेगळी अशी निर्मिती ज्याची आहे त्या भारतासारख्या देशात हे एकराष्ट्रीयत्व निर्माण करायला कदाचित धर्म किंवा सांस्कृतिक एकात्मता हे सूत्र प्रभावीपणे राबवल्यास उपयुक्त ठरू शकेल; परंतु गेल्या काही दशकांत आपण तो विषय इतका वादग्रस्त बनवून टाकला आहे, की त्या दिशेने प्रयत्न करणे तर सोडाच, पण साधा विचारही करणे आज अवघड होऊन बसले आहे. एकमयतेचा हा अभाव म्हणजेच देशाचे समाजीकरण न होणे; स्वतःचे कुटुंब हाच फक्त आपल्या सर्व विचारांचा व कृतींचा केंद्रबिंदू असणे. गुणार म्युरडाल यांच्यासारख्या समाजशास्त्रज्ञाच्या व अर्थतज्ज्ञाच्या मते भारतातील भ्रष्टाचाराचेही एकमयतेचा किंवा समाजीकरणाचा अभाव हे एक मूलभूत कारण आहे. जे समाजाचे आहे, ते मी ओरबाडून घेणे ही भ्रष्टाचाराची एक व्याख्या मानता येईल.  

देशातून हटवायला हवी अशी तिसरी गोष्ट म्हणजे वरपासून खालपर्यंत बोकाळलेली ‘चलता है’ ही वृत्ती. भेटीसाठी वा कार्यक्रमासाठी दिलेली वेळ न पाळणे, कबूल केलेल्या वेळात किंवा खर्चात एखादी गोष्ट न करणे, आपल्या कामात चूक होत आहे हे लक्षात आल्यावरही ते तसेच रेटून नेणे, बारीकसारीक बाबतीतही खोटे बोलणे, सिग्नल तोडून खुशाल गाडी पुढे घालणे, कचरा कुठेही टाकणे अशा एक ना दोन, शेकडो बाबतींत आपली ही ‘चलता है’ वृत्ती दिसून येते. कारखान्यातला कामगार असो वा बँकेतला क्लार्क, मेकॅनिक असो वा मॅनेजर, कलाकार असो वा मंत्री, हा ‘चलता है’ दृष्टिकोन म्हणजे प्रगतीच्या मार्गातला फार मोठा अडसर आहे. अशा वृत्तीतूनच ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ ही वृत्ती निर्माण होते. आहे हे सारे असेच चालवून घ्यायची एकदा सवय झाली की मग आवतीभोवतीच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा अशी आच निर्माण होत नाही. अगदी साधी गृहनिर्माण सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा घ्या. तिथे उपस्थित राहायलाही सदस्य उत्सुक नसतात; किंबहुना मिनतवाऱ्या करून, घरोघर निरोप पाठवून पुरेशी गणसंख्या (कोरम) जमवावा लागतो. प्रत्येक बाबतीत इतरांवर अवलंबून राहायची, सरकारकडून किंवा समाजाकडून मिळेल तेवढे ओरबाडून घ्यायची; पण स्वतः मात्र त्या दिशेने काहीच न करायची प्रवृत्ती यातूनच निर्माण होते. ह्या ‘चलता है’ वृत्तीमुळे एक प्रकारचा व्यक्तिगत आणि सामाजिक आळशीपणा, सुस्तपणा आपल्या अंगात मुरला आहे. आवतीभोवती बघितले तर छोट्याशा पावसानेही नुकत्याच बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडणे, पुलावरच्या चेंगराचेंगरीत किंवा इमारत अकालीच कोसळल्याने वीस-पंचवीस निरपराध लोक मरण पावणे, चार-पाच किलोमीटर अंतर कापायलाही तासंतास लागणे, दिवसातून चार-चार वेळा वीज जाणे ह्या कशानेच आपण चवताळून उठत नाही. देशपातळीवर विचार करताना शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचूनही आपण कधी पेटून उठत नाही; किंबहुना तशा भ्रष्ट नेत्यांना आपण विनातक्रार पुनःपुन्हा निवडूनही देतो. आमच्या सर्व नद्या इतक्या प्रदूषित आहेत, की जमशेदपूरसारखे एखादे शहर सोडले तर आमच्या कुठल्याच शहरात आज आपण नळाचे पाणी पिऊ शकत नाहीत, त्यासाठी आपल्याला बिसलेरी किंवा ॲक्वाफिनासारख्या ब्रँडवर अवलंबून राहावे लागते  ह्याचे आपल्याला वैषम्य वाटत नाही. जागतिक पातळीवर विचार करायला लागले तर स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरी आम्हांला एकही नोबेल पुरस्कार मिळत नाही किंवा वर्षानुवर्षे दरसाल हजारो कोटी रुपये खर्च करूनही आमच्या विज्ञान व संशोधन संस्थांनी ह्या देशाचा एखादा प्रश्न सुटेल असा एकही महत्त्वाचा शोध लावलेला नाही किंवा आपल्या दैनंदिन वापरातले एकही उपकरण आपण शोधलेले नाही ह्याची आपल्याला जराही खंत वाटत नाही; किंवा ज्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आपल्यापेक्षा कितीतरी छोटे असलेले देश दहा-दहा सुवर्णपदके मिळवतात, त्या स्पर्धांमध्ये आपल्या सव्वाशे कोटी लोकांच्या देशाला एकही सुवर्णपदक मिळवता येत नाही ह्याचा आपल्याला काहीच विषाद वाटत नाही. घरोघरी तीन-तीन, चार-चार हजारांचे स्पोर्ट्स शूज नुसते पडून असतात; पण आपण स्वतः प्रत्यक्षात कुठलाही खेळ खेळायला मैदानात दहा मिनिटेसुद्धा उतरतच नाही, आपले क्रीडाप्रेम फक्त टीव्हीवरचे सामने बघण्यापुरतेच असते; ह्यातला विरोधाभास आपल्याला जाणवतच नाही. ही सगळी अनास्था मूलतः ह्या ‘चलता है’ वृत्तीतच निर्माण होते. जितक्या लवकर आपण ती हद्दपार करू तितके श्रेयस्कर. 

अशा असंख्य गोष्टींना ‘चले जाव’ म्हणायची आणि त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करून देशपातळीवर सक्रिय व्हायची नितांत आवश्यकता आहे; कुठेतरी सुरुवात करायची म्हणून प्रकर्षाने जाणवणाऱ्या एवढ्या तीन गोष्टी इथे नमूद केल्या.

Author

Leave a Reply