मोठी माणसे २

श्री. पु. भागवत

   श्रीपुंच्या बाबतीत  ;श्री.पु.’ एवढी आद्याक्षरेसुद्धा त्यांचे नाव (श्री. पु. भागवत) आपल्या मनात उमटवण्यास पुरेशी आहेत; जसे ‘पु. ल.’ हे शब्द.   शिवाय हे   वर्ष श्रीपुंचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे येथे स्मरण करणे औचित्यपूर्णही होईल. श्रीपुंची आणि माझी पहिली भेट डिसेंबर १९८१ मध्ये मुंबईत झालेल्या ‘स्वाभिमान साहित्य संमेलना’त झाली. त्याआधीपासूनच माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला होता. लहानपणापासून वाचत आलेल्या सत्यकथा, मौज यांमध्ये येणारे आधुनिक साहित्य आणि मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेली अनोखी पुस्तके यांच्या मागे श्रीपुच आहेत हे मनावर ठसले होते. यथावकाश मीही कविता लिहू लागलो होतो आणि १९८० च्या जानेवारीत ‘कविता दशकाची’ हा प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित झाला. मागच्या दशकात कविता लिहू लागलेले आणि येत्या दशकात प्रभावी होतील असे संपादक मंडळाला वाटलेले  दहा कवी निवडून त्यांच्या प्रत्येकी दहा कविता या संग्रहात घेतलेल्या होत्या. माझ्याही कविता त्यात समाविष्ट झाल्या होत्या आणि त्यातले इतर नऊ कवीही या निमित्ताने मित्र झाले होते. त्यात मौजेत काम करणारे कवी गुरुनाथ सामंतही होते. त्यांच्या मैत्रीमुळे मी मुंबईत गेलो  की गुरुनाथ सामंत यांच्या कचेरीत जाऊ लागलो होतो.‌ मौजेचा सुप्रसिद्ध लाकडी जिना चढून वर आल्यावर समोरच राम पटवर्धनांची केबिन होती आणि डाव्या बाजूच्या कचेरीत गुरुनाथ सामंत असत. गुरुनाथ माझ्याशी आस्थेने बोलत. मौजेची नवीन पुस्तके दाखवत. राम पटवर्धनांनाही नव्या लेखकांशी बोलायला आवडत असे त्यामुळे त्यांनाही मी भेटू लागलो. माझी एक कविताही त्यांनी डिसेंबर १९८० च्या सत्यकथेच्या अंकात छापली. पटवर्धनांना वर्तमानात आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींबद्दल सजग राहणे आवडे. सत्यकथेतले परिक्रमा सदर त्यांनीच चालू केले. १९८१ मध्ये संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर मी ‘तारा’ नावाची कविता लिहिली. त्यात फक्त निखळलेला तारा आणि त्याला जन्म देणारे आभाळ आले होते. संजय गांधी, इंदिरा गांधी आणि भारतीय जनता त्यात अध्याहृत होती. ती पटवर्धनांनी अगत्यपूर्वक सत्यकथेच्या ऑगस्ट १९८१ च्या अंकात छापली. श्रीपुंचे ऑफीस जिना चढून गेले की उजव्या बाजूला होते. तिकडे वळण्याचे धाडस मी केले नव्हते. श्रीपु- सत्यकथा हे ललितमधल्या ठणठणपाळांच्या लेखनाचे नेहमीचे लक्ष्य असे आणि ते वाचून वाचून श्रीपुंबद्दलच्या दंतकथा मला परिचित झाल्या होत्या. १९८० च्या जानेवारी महिन्यापासून मी पु.आ. चित्रे यांच्या ‘अभिरुचि’ मासिकात  ‘खडा मारायचा झाला तर’ नावाचे ठणठणपाळासारखेच सदर लिहू लागलो – बाळ गोविंद या टोपण नावाने. ते मी लिहितो आहे हे पुरुषोत्तम आत्माराम आणि हेमंत गोविंद या दोघांखेरीज अन्य कुणाला (बहुधा आजतागायत) माहिती नव्हते. त्यातही अर्थात सत्यकथेचा उल्लेख येत असे. मी खडे मारूनही कुठल्याच मधमाशा डिवचल्या गेल्या नाहीत याची खंत व्यक्त करून मी १९८० च्या जुलै-ऑगस्ट अंकात लिहिले होते की ‘… नाही म्हणायला, सत्यकथेच्या राम पटवर्धनांनी श्रीपुंना मागच्या अंकातला मजकूर, ‘हे पाहिलंत का काय लिहिलंय सत्यकथेबद्दल ?’ असे म्हणत दाखवला.  श्रीपुंनी तो मजकूर वाचून आपला अभिप्राय आपली जिवणी केसभर रुंदावून अत्यंत संयतरीत्या अभिव्यक्त केला; पण त्यामुळे राम पटवर्धनसुद्धा श्रीपुंनी संतोष दर्शवला, संताप दर्शवला की औपरोधिक हास्य केले अशा संभ्रमात पडले. ‘आविष्कार दुर्बोध झाला तरी हरकत नाही; मात्र तो संयमित रूपातच झाला पाहिजे,’ हे तत्त्व श्रीपुंच्या इतके रोमारोमांत भिनले आहे की श्रीपु जेव्हा टॅक्सीतून जात असताना तळेगावनजीक नुकताच जो अपघात झाला, त्यामुळे त्यांच्या पाठीच्या एका मणक्याला धक्का बसल्यानंतर त्या परिस्थितीतसुद्धा त्यांनी आपल्याला केसभरच फ्रॅक्चर होऊ दिले. त्यामुळे त्यांच्या जिवणीचे केसभर रुंदावणेसुद्धा आमच्या दृष्टीने फार मोलाचे आहे . असो !’

माझ्यासारख्या नवोदित कवीने कवीने श्रीपुंची अशी चेष्टा करावी हे मोठे धारिष्ट्य होते; पण ते कवी ‘हेमंत गोविंद’ ने केले आहे हे त्यांना कळायची काही शक्यता नव्हती नव्हती. तेव्हा माझ्या कविता इतरत्रही प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यातल्या राजस मासिकाच्या विजय हरी वाडेकरांना माझ्या कविता खूप आवडत होत्या. त्यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने (मरासासंमं) नवोदित लेखक अनुदान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत मंडळ निवडलेल्या हस्तलिखित पुस्तकांना प्रकाशनासाठी निर्मिती खर्चाच्या ७५ टक्के अनुदान देणार होते. वाडेकरांनी त्यांच्या ‘श्री प्रकाशना’तर्फे माझा पहिला संग्रह या योजनेअंतर्गत प्रसिद्ध करण्यासाठी पाठवण्याचे सुचवले. १९८१ या वर्षी मरासासंमंने माझ्या’ होड्या ‘कविता संग्रहाला या योजनेअंतर्गत अनुदान मंजूर केले. पुस्तक ३१ मार्च १९८२ पर्यंत प्रकाशित करण्याची अट होती. मी त्यासाठी वाडेकरांना घाई करू लागलो. इतक्यात ‘श्री प्रकाशना’चे मालक ज्ञानेश्वर आगाशे यांनी राजस मासिकाचा तोटा हाताबाहेर जाऊ लागल्याने मासिक बंद करायचे ठरवले. वाडेकरांना राजस मासिक जीव की प्राण होते. ते बंद होणार म्हणून वाडेकर अत्यंत व्यथित झाले होते. तशातच मी माझ्या संग्रहाचे काय असे विचारताच, त्यांनी ‘आता आम्ही संग्रह काढू की नाही सांगता येत नाही’ असे सांगितले. थोड्या दिवसांनी ‘आम्ही पुस्तक काढू; पण अनुदानाच्या वर जो खर्च होईल तो तुम्ही उचला आणि पुस्तके वितरित करायचे कामही तुम्हीच करा’ असे सांगून टाकले. वरचा खर्च उचलण्याची माझी तयारी होती; पण पुस्तक वितरणातले मला ओ की ठो माहीत नव्हते. अशा मनःस्थितीत असतानाच मला मुंबईत होणार असलेल्या स्वाभिमान साहित्य संमेलनात कविता वाचनासाठीचे निमंत्रण आले. श्रीपु या संमेलनाचे एक संयोजक होते. मी संमेलनाला गेलो. तिथे श्रीपु भेटले. मी त्यांना माझी अडचण सांगितली. गडबडीत असतानाही त्यांनी माझे बोलणे अतिशय सहानुभूतीने ऐकून घेतले आणि मला संग्रह घेऊन त्यांना भेटायला यायचे सुचवले. संमेलनानंतर श्रीपु काही दिवस पुण्याला येणार होते. मी माझ्या संग्रहातल्या कविता एका जुन्या फायलीत (ज्यावर ‘इन्कम टॅक्स’ असे लिहिले होते) नीट लावून त्यांच्याकडे घेऊन गेलो. श्रीपुंनी फाईल घेतली आणि कळवतो असे सांगितले. थोड्याच दिवसांत त्यांचे पत्र आले. त्याच्या सुरुवातीसच इन्कम टॅक्सच्या फायलीत कविता घातलेल्या पाहून गंमत वाटल्याचे लिहिले होते. कविता त्यांनी वाचल्या होत्या आणि ‘संग्रह बरा होईल’ असा अभिप्राय दिला होता. पसंत पडलेल्या साहित्यालाही श्रीपु आपल्या शास्त्रकाट्याच्या कसोटीनुसार ‘बरे’ म्हणत असत. पुढे पत्रात त्यांनी ‘मौज प्रकाशन गृह या पुस्तकाचे जरूर वितरण करील’ असे लिहिले होते. हे मी वाडेकरांना सांगतातच त्यांनी ‘तुम्ही फार चांगली गोष्ट केली’ असा संतोष व्यक्त केला. ३१ मार्च १९८२ पर्यंत संग्रह सिद्ध झाला आणि माझ्या पहिल्याच कविता संग्रहावर वितरक म्हणून ‘मौज’चे नाव पडले. त्याचे प्रकाशन साक्षात बा.भ.बोरकरांच्या हस्ते झाले. या प्रकाशन समारंभाचे निमंत्रणपत्र मी श्रीपुंना पाठवले होते. त्यांनी त्यावर ‘प्रकाशन बोरकरांच्या हस्ते झाले यासारखी उचित व शुभ गोष्ट दुसरी नाही,’ असे पत्र पाठवले. पत्रात पुढे समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही याची हळहळ आणि समारंभाचे तपशील जाणण्याची उत्सुकताही व्यक्त केली होती. वितरणाचा व्यवहार ‘श्री प्रकाशना’बरोबर करायचा होता. त्याला श्रीपुंची तत्त्वतः काही हरकत नव्हती. प्रकाशन संस्थेचे कोणी आपल्या परिचयाचे नसल्याचा दोष आपल्या फारसे न मिसळण्याच्या वृत्तीला देऊन ते मोकळे झाले होते.

एप्रिलमध्ये श्री प्रकाशनाने पुस्तकांचा पहिला हप्ता मौजकडे पाठवला आणि चक्क डिसेंबर ८२ पर्यंतच्या झालेल्या पुस्तकांच्या विक्रीचा हिशेब आणि धनादेश मला प्राप्त झाला. दरम्यान श्री प्रकाशनाने अनुदानाव्यतिरिक्तचा खर्च उचलल्याने मी हा धनादेश त्यांच्या नावे काढून पाठवावा असे कळवले. पुढे काही वर्षांनी ‘होड्या’च्या मौजकडे असलेल्या प्रती संपत आल्या आहेत आणखी प्रती पाठवाव्यात असे मौजने कळवले;  पण वाडेकर त्या पाठवू शकले नाहीत – कदाचित त्यांनी आणखी प्रती काढलेल्याच नसाव्यात.

    सप्टेंबर १९८२ पासून सत्यकथा मासिक बंद केले गेले. त्या आधी लिहिलेल्या एका मनोगतात श्रीपुंनी ‘ज्यांच्यासाठी मासिक चालवायचे त्यांनाच जर त्यामध्ये रस नसेल, तर मासिक कशासाठी चालवायचे?’ अशी खंत व्यक्त केली होती. सत्यकथा मासिक खरेतर, मराठी साहित्यातील एक सम्राट होते. त्याचे अशा तऱ्हेने बंद होणे मला रोमन सम्राट सीझरच्या हत्येसारखे वाटले;  म्हणून मी ‘ज्यूलियस सीझर’ नाटकातले संवाद वापरून एक दीर्घ कविता लिहिली. ती मी ‘कविता-रती’कडे पाठवली; पण संपादक पुरुषोत्तम पाटील यांना तिचा संदर्भ समजला नाही की काय कुणास ठाऊक, त्यांनी ती साभार परत पाठवली. नंतर ती मी इतरत्रही कुठे पाठवली नाही. पुढे एका ‘दखल’ नावाच्या मासिकाने ‘साभार परत कविता’ मागवल्या होत्या. त्यात ती प्रसिद्ध झाली; पण तिची दखल कोणी घेतली नाही. एका तऱ्हेने मी हा वर्तमानातील सीझरला केलेला सलाम होता. अर्थात श्रीपुंपर्यंत तो पोचण्याचे काही कारण नव्हते.

    १९८३ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने निवडक लेखकांच्या दुसऱ्या पुस्तकालाही पन्नास टक्के अनुदान देण्याचे ठरवले. त्या अंतर्गत माझा दुसरा कवितासंग्रह ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ निवडला गेला आणि तो विश्वमोहिनीच्या आनंद अंतरकरांनी प्रकाशित केला. या संग्रहाची भेट प्रत मी श्रीपुंना पाठवली आणि त्यांचे चक्क खुशीपत्र आले. संग्रह त्यांना रुचला होता. एक अगदी वेगळ्या धर्तीचा विडंबन कवितांचा संग्रह प्रसिद्ध केल्याबद्दल माझे, प्रकाशकांचे आणि विशेषतः वसंत सरवटे यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले होते. ‘सरवट्यांची हास्यचित्रे विडंबनाला साजेशी, त्यात भर घालणारी आहेत’ असा त्यांचा अभिप्राय होता. सरवट्यांची चित्रे विलक्षण सर्जक होती; फक्त मी त्यांना हास्यचित्रे न म्हणता व्यंगचित्रे म्हटले असते, त्यात माझ्यासकट अनेक मूळ कवींच्या व्यंगछब्याही होत्या. विडंबन कवितांना मी गद्य मजकुराची जोड दिली होती. त्यायोगे सर्व कविता एकमेकींशी जोडल्या गेल्या होत्या, मूळ कवितेचा संदर्भ दिला गेला होता आणि तेव्हा लिहिल्या जाणाऱ्या समीक्षकीय भाषेचेही विडंबन केले होते.  श्रीपुंना स्वतःला ती प्रास्ताविके नसती तरी चालले असते. त्यांच्या मते, पुस्तकातले ‘ओढून ताणून आणलेले चंद्रबळ’ तेवढेच होते. श्रीपुंना ‘नव्या कवींची गय केली असती तरी चालले असते,’ असे वाटले होते. यात विडंबन हा एक तऱ्हेचा हल्ला आहे असेच तेही (केशवकुमारांप्रमाणे) मानत असावेत असे दिसते. माझ्या मते विडंबन हा आवडलेल्या मूळ कवितांशी खेळलेला एक खेळ होता, ज्यात मूळ कवितेतले काही विशेष ताणले तर कसे हास्योत्पादक होऊ शकेल एवढेच मला दाखवायचे होते. त्यामुळे त्यात बुजुर्गांपासून नव्यांपर्यंत सर्वच कवींच्या मला आवडलेल्या कविता आल्या होत्या. पत्रात श्रीपुंनी मुद्रणदोष खटकल्याचेही लिहिले होते आणि त्याबद्दल कंसात ‘मुद्रकाची नजर’ असे कारणही दिले होते. पत्रात श्रीपुंनी शेवटी ‘या खटाटोपात आपली कविता तेवढी जपा,’ असा सल्ला दिला होता. दुसऱ्या कवींच्या कवितांची विडंबने लिहिता लिहिता माझी स्वतःची कविता हरवू नये याची त्यांना वाटणारी काळजी त्यातून व्यक्त होत होती. त्यांनी दाखवलेल्या माझ्याबद्दलच्या या आस्थेमुळे मला फार आनंद झाला. मीही विडंबन कवितांतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र कविता माझ्या गतीप्रमाणे लिहीतच होतो आणि त्यातली एखाद दुसरी मौजेतही स्वीकारली गेली.

मी स्वतंत्र कविता लिहीतच होतो आणि अशा साचलेल्या कविता एकत्रित करून मी १९९० च्या सुमारास त्याचे हस्तलिखित मौजकडे प्रकाशनासाठी विचारार्थ दिले. बरेच दिवस त्यांच्याकडून काही कळले नाही. शेवटी मी १३.७.९१ रोजी एक स्मरणपत्र पाठवले. त्यावर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी ‘हस्तलिखित अद्याप वाचू शकलो नाही याचा विषाद वाटतो. लवकरच वाचायचा प्रयत्न करतो,’ असे उत्तर पाठवले. १९९२ मध्ये अचानक मला श्रीपुंचे पत्र आणि त्याबरोबर पाठवलेला संग्रह मिळाला. पत्रात श्रीपुंनी ‘संग्रह अद्याप वाचू शकलो नाही. म्हणून तो परत पाठवीत आहे,’ असे लिहिले होते. परत पाठवलेल्या हस्तलिखितावर बरोबर-चूकच्या खुणा आणि काही शेरेही होते. 

संग्रह मौजला प्रकाशनायोग्य वाटला नसेल तर त्यांनी तसे मला कळवायला काहीच हरकत नव्हती. तो त्यांचा अधिकारच होता. मी त्यांना पत्र लिहून त्यांनी तसे का कळवले नाही असे विचारले. माझ्यासारख्या छोट्या कवीने त्यांच्यासारख्या मोठ्या संपादकांना असा प्रश्न विचारणे हा कदाचित त्यांना माझा उद्धटपणा वाटू शकला असता; पण त्यांचे त्या पत्रावर काहीच उत्तर आले नाही.

हा संग्रह  ‘मनातले घर’ नावाने ‘नव्यांची अक्षर चळवळ’ प्रकाशनातर्फे अरुण म्हात्रे यांनी प्रकाशित केला- १९९५ मध्ये; पण संग्रहाचे वितरण करण्याची पुरेशी व्यवस्था अरुणकडे नव्हती. शेवटी मीच त्याला ‘मौजकडे तो वितरणासाठी देता येईल का?’ असे विचारले. अरुण तयार झाला आणि श्रीपुंना त्यासंबंधी विचारले. माझ्या आधीच्या पत्राबद्दल मनात कोणतीही अढी न बाळगता, त्यांनी आम्हांला संग्रह घेऊन भेटायला बोलवले. आम्ही दोघेही श्रीपुंच्या शीव येथील घरी त्यांना भेटायला जायचे असे ठरले. ठरल्यावेळी मी गेलो. अरुण आला नव्हता. श्रीपुंनी अगत्याने माझे स्वागत केले. श्रीपुंच्या संकोची स्वभावाबद्दल मी खूप ऐकून होतो . त्यांना अधिक संकोच वाटू नये असे वाटून मी त्यांना वाकून नमस्कार केला नव्हता‌; पण अरुणने आल्या आल्या ‘पाय लागू’ केले. श्रीपुंना थांबवायला वेळही मिळाला नाही. मी पाहतच राहिलो. मला वाटले, हाच माझ्यासारखा भिडस्त कवी आणि अरुणसारखा परफॉर्मर कवी यांमधील फरक असावा. श्रीपुंनी संग्रह पाहिला आणि कुठलाही अनमान न करता, तो मौजतर्फे वितरित करायची तयारी दाखवली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता; पण पुढे मौजचे प्रकाशनासाठीचे नियम व अटी अरुणला झेपण्यासारख्या वाटल्या नाहीत आणि हा संग्रह मौजतर्फे वितरित होऊ शकला नाही.

हळूहळू श्रीपुंची प्रकृती ढासळत होती आणि २००७ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीपु साहित्य स्वीकारण्यापूर्वी किती पारखून घेत असत आणि त्यासाठी लेखकांबरोबर सतत संवाद करीत असत याबद्दल मी ऐकून होतो. मला स्वतःला ते कधी अनुभवता आले नव्हते; पण अलीकडेच हेमकिरण पत्की यांची जरा निवांत भेट झाली होती, त्या वेळी त्यांनी त्यांचा स्वानुभव सांगितला. त्यांच्या ‘अप्राप्य एकांतातून’ या कवितेत ‘ऋता’ शब्द आला होता. हा शब्द त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला आहे हे श्रीपुंनी  पत्कींना विचारले. त्यावर पत्कींनी वरवर दिलेल्या उत्तरातून श्रीपुंचे समाधान झाले नाही. ते त्याचा स्रोत विचारत राहिले. शेवटी पत्की यांनी ऋग्वेदात ऋत शब्द निसर्गव्यवस्थेच्या नित्यतेसाठी आला आहे हे सांगितले. त्यावरून पत्की यांनी ऋता शब्द घडवला आहे हेही सांगितले. हे ऐकल्यावर ऐकल्यावर श्रीपुंचे समाधान झाले आणि त्यांनी ही कविता मौजसाठी सहर्ष स्वीकारली; पण एखाद्या शब्दासाठीही श्रीपु किती जागरूक असत आणि त्यांचे समाधान होईपर्यंत त्याचा अथक पाठपुरावा करीत असत हे प्रत्यक्ष प्रत्ययाला आले आणि त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे वाटले.

वर्णमुद्रा प्रकाशनाचे मनोज पाठक हे माझ्या अलीकडील चार पुस्तकांचे प्रकाशक. त्यानिमित्ताने ते पुण्यात आले की भल्या सकाळी माझ्या घरी येतात. मी पायजमा नेहरू शर्ट अशा घरगुती पेहरावात असतो. त्यांचे स्वागत करतो. अशाच एका भेटीनंतर त्यांनी माझ्यासोबत एक सेल्फी काढला आणि फेसबुकवर टाकला; त्यासोबत लिहिले की ‘श्रीपुंबरोबर सेल्फी काढून घ्यायचा कधी योग आला नाही; पण देव दयाळू आहे तो पुन्हा एकदा तुम्हांला संधी उपलब्ध करून देत असतो आणि प्रतिरूप श्रीपु व कवी अशा हेमंत जोगळेकरांबरोबर सेल्फी काढता आला.’ मला मनोजने प्रति श्रीपु म्हणायला आमच्या पेहरावातील साधर्म्य आणि कदाचित माझे मितभाषित्व एवढेच कारण असावे. कर्तृत्वाच्या बाबतीत मी श्रीपुंच्या पासंगालाही पुरणार नाही; पण माझ्या दर्शनमात्रे त्याला श्रीपु आठवावेत हे देखील माझ्यासाठी मोठेच आनंदाचे आहे! 

Author

Leave a Reply